ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Sunday, March 1, 2015

२२३. उलगडा

“आई गं, तू छोटी होतीस; म्हणजे खूप खूप पूर्वी; तेव्हा माझ्यासारखीच होतीस?” दीपिकाचा प्रश्न ऐकून श्वेता हसली. ही प्रश्नमालिका हे तिच्या लेकीचं मागच्या आठवडाभरातलं एक नवं खूळ होतं.

“अगदी थेट तुझ्यासारखी होते मी!” श्वेता उत्साहाने सांगते.
पण का कुणास ठावूक, दीपिकाच्या मनात अजून शंका आहेत.

“तू इतकी मोठी आहेस आता; आणि मी इतकी लहान! मग तू माझ्याएवढी असताना मी केवढी होते? आणि होते कुठे मी तेव्हा?” दीपिकाचे प्रश्न आत्ताशी सुरु झालेत.

“जवळच तर होतीस माझ्या”, श्वेता सांगते. आता आज कहाणी कोणत्या दिशेने जाणार आहे, देव जाणे!
आता आई सांगेल ते तंतोतंत खरं मानण्याइतकी दीपिका काही लहान नाही. मागच्याच आठवड्यात तर तिचा सहावा वाढदिवस साजरा झालाय.

“जवळ नव्हते काही मी तुझ्या; तेव्हा आकाशात स्टार होते मी. तू हाक मारलीस म्हणून आले मग मी ४०४, गजानन अपार्टमेंट....”

सायकल फेरी मारायला लेकीच्या मित्र –मैत्रिणींच्या हाका आल्या आणि श्वेताची सुटका झाली.

पण दीपिकाच्या प्रश्नांसमोर फार काळ तग धरता येणार नाही हे श्वेताला कळून चुकलं होतं. किती दिवस ती लपवू शकणार आहे सत्य? दहा नाही पण अजून किमान साताठ वर्ष आहेत हातात या प्रश्नांना सामोरं जायला हे तिचं गृहितक. पण प्रत्यक्षात मात्र दिवसेंदिवस स्मार्ट होत चाललेल्या दीपिकाच्या आकलनशक्तीला कमी लेखून चालणार नव्हतं आता.

*****
दीपिकाच्या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरं जाताना श्वेताला वारंवार तिच्या लहानपणीची आठवण येते. लहानगी श्वेताही असाच प्रश्नांचा भडीमार करायची – तो तिच्या बाबांवर. आणखी एक मोठा फरक म्हणजे श्वेता गेलेल्या दिवसांबद्दल, पूर्वीच्या काळाबद्दल कधीच प्रश्न विचारायची नाही; तिला वेध असायचे ते येऊ घातलेला दिवसांचे; भविष्याचे. “बाबांना ‘पूर्वी’ असा शब्द असेलेला प्रश्न विचारला की त्रास होतो’ हे लहानग्या श्वेताला जाणवलं होतं. म्हणून श्वेताचे प्रश्न “बाबा, मी मोठेपणी कोण होऊ?“; “बाबा, मी तुमच्याएवढी होईन तेव्हा पण माझ्या सोबत असाल ना?” या धर्तीचे असत.

घरात आजी पण होती; बाबाची आई. का कुणास ठावूक, आजीचा श्वेतावर भयंकर राग होता. सारखी श्वेताच्या तकारी सांगत राहायची ती. तसं घरी फार कुणी यायचं नाही म्हणा; त्यामुळे त्या सगळ्या तक्रारी बाबासमोर व्हायच्या. बाबा ब-याचदा हसून प्रसंग निभावून न्यायचा. अति झालं की गंभीर होत म्हणायचा, “जे घडलं त्यात या निष्पाप जीवाचा काही दोष नाही. उगा तिला त्रास देऊ नकोस आणि स्वत:लाही त्रास करून घेऊ नकोस. आई, तुला जसा फक्त मी आहे; तसाच या पोरीलाही या जगात फक्त मी आहे...” असं काही झालं की आजी दोन चार दिवस ठीकठाक असायची. मग पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!

आजीची बोलणी कमीत कमी खावी लागावीत अशा बेताने वागायला श्वेता लहान वयात शिकली. घरात अधेमध्ये कुणीतरी नातलग मंडळी यायची. त्यांनी श्वेताबाबत काही भोचक प्रश्न विचारले तर मात्र आजी त्यांना फटकारायची. “तिचा बाप समर्थ आहे तिची काळजी घ्यायला, तुम्हाला काय पडलंय?” अशी आजीची भाषा ऐकून समोरचा गपगार होऊन जायचा. एरवी आपल्याला धारेवर धरणारी आजी आपली बाजू घेऊन भांडतेय याचं श्वेताला नवल वाटायचं पण हळूहळू आजीच्या या दोन्ही रूपांची तिला सवय होऊन गेली. पण आजीचा आधार वाटावा इतकी जवळीक मात्र त्यांच्यात कधीच झाली नाही.

घरातला विषय मार्गी लागला तरी पण शाळेत प्रश्न यायचेच. शाळेतल्या इतर मैत्रिणी ‘आई’बद्दल बोलायला लागल्या की श्वेताला काही सुचायचं नाही, रडू यायचं. एकदा तर गृहपाठ म्हणून ‘माझी आई’ असा विषय दिला बाईंनी निबंध लिहायला तेव्हा श्वेता घाबरून बसली होती घरी आल्यावर. पण बाबाने तेव्हा मस्त युक्ती काढली होती. श्वेताने चक्क ‘भारतमाता’ या विषयावर निबंध लिहिला आणि कौतुकाची थाप मिळवली होती वर्गात. पुढे पुढे मात्र कुणी विचारलं तर ‘माझी आई मी लहान असताना देवाघरी गेली’ असं श्वेता सांगायला लागली – बाबा आणि आजीने तसं काही कधी म्हटलेलं नव्हतं तरीही! पाचवीत शाळा बदलली आणि ‘श्वेताची आई नाहीये’ हे जणू सगळ्यांनी न बोलता मुकाट स्वीकारलं.

पण श्वेताला मात्र आईबद्दल अनेक प्रश्न होते. कशी होती ती? माझ्यासारखी सावळी? तिचे केस कुरळे होते का? तिच्या गालावर खळी पडायची का? तिचा आवाज कसा होता? तिला पाऊस आवडायचा? आणि दही-भात? तिला डोसा बनवता यायचा का चांगला? मैत्रिणी जमवून घरात दंगा केला तर आई रागावली असती का? ती रोज नाचाच्या क्लासला घेऊन गेली असती का मला? .....

आपण बाबासारख्या नाही हे श्वेताला कळत होतं. बाबा उंच होता भरपूर – श्वेता दहावीतही पाच फूट दोन इंचाच्या पल्याड गेली नव्हती. बाबाच्या आणि तिच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी जुळत नव्हत्या – बाबा तिला आवडते म्हणून कॉफी घ्यायचा खरा; पण चहा पिताना तो जास्त खुलायचा. बाबा सावकाश; शांतपणे बोलायचं तर श्वेताचा नेहमी तारस्वर. इवल्याशा गोष्टींनी श्वेताचे डोळे पाण्याने भरून येत; बाबा मात्र कितीही अडचण असली तरी हसतमुख असतो. बाबा वक्तशीर इतका की त्याच्याकडे पाहून घड्याळ लावावं. श्वेताला अनेकदा वाटायचं की ती बाबाची मुलगी नाहीचय मुळी. पण बाबाची तिच्यावर इतकी माया कशी असेल मग?

सातव्या-आठव्या इयत्तेत असताना आजीचा दुपारी डोळा लागला की श्वेताचा एकच उद्योग असायचा; तो म्हणजे बाबा ऑफिसातून यायच्या आधी घरात असतील नसतील तितकी कागदपत्रं उचकून बघायची. पण श्वेताची निराशा झाली. तिला ना आईचा एखादा फोटो सापडला; ना कोणत्या कागदावर तिचं नाव दिसलं. ना बाबाने आईला किंवा आईने बाबाला लिहिलेलं पत्र दिसलं; ना आईंची एखादी जुनी साडी दिसली. एकाही पुस्तकावर आईचं नाव नव्हतं; श्वेता जणू आईच्या गर्भातून जन्माला न येता सीतेसारखी भूमीतून उगवली होती.

कधीतरी एकदा विचारांच्या तंद्रीत श्वेताने बाबाला विचारलं, “बाबा, माझी आई कशी होती रे?”

“मला नाही माहिती, शोना....” बाबाच्या स्वरांतली वेदना जाणवून तिने त्याच्याकडे पाहिलं होतं आणि बाबाचा विदीर्ण चेहरा पाहून ती हबकली होती. आईचा विषय बाबाला त्रासदायक आहे हे कळल्यावर श्वेताने तो विषय कायमचा बंद केला होता. आईबद्दल बाबाला काही माहिती नाही हा धक्का तिने आतल्या आत सोसला. तिची दहावीची परीक्षा संपली आणि आजी आजारी पडली. आजारी आजी श्वेताला सारखी काही सांगू पहात होती. पण तिने ‘आजी, राहू दे आता. काय फरक पडतो त्याने? तू बरी झालीस की बोलू मग हवं तर’ असं म्हणून आजीचा सूचक संवाद सुरु होण्यापूर्वीच बंद केला होता. त्या आजारपणात आजी गेली आणि मग आई हा बंद कप्पा होऊन गेला श्वेतासाठी.

*****
दीपिका धावत येऊन श्वेताच्या कुशीत शिरते. तिचा चेहरा लालभडक झालाय, डोळ्यातून पाणी वाहतेय. आईचा हात पाठीवरून फिरतानाही तिचे हुंदके कमी होत नाहीत. दीपिका आईला घट्ट मिठी मारते. दीपिकाला किती भीती वाटतेय ते त्या स्पर्शातून श्वेताला समजतं.

“काय झालं राणी? कुणी त्रास दिला तुला?” श्वेता विचारते.
“आई, रोशनी म्हणाली की मी तुझी मुलगी नाहीये; तू मला हॉस्पिटलमधनं विकत आणलंयस. मग विकी, सनी, जादू, मोना सगळे मला चिडवायला लागले.” दीपिकाचा स्वर दुखावला आहे चांगलाच.
“आपण त्यांच्या आई –बाबांकडे तक्रार करू हं!” श्वेता समजावते आहे लेकीला. पण त्या वाक्यात असं काहीतरी आहे की लेक आईपासून दूर होते.

“सगळ्यांना बाबा आहेत. माझा बाबा कुठं आहे? तो मला कधीच का भेटला नाही अजून? तो कधी फोन पण नाही करत. माझ्या वाढदिवसाला विश पण नाही करत तो कधी. कुठं आहे माझा बाबा?” दीपिका स्फुंदते आहे.

ज्याच्यावर प्रेम केलं; ज्याची साथ आयुष्यभर असेल असं मानलं तो ‘श्वेताला मूल होऊ शकत नाही’ असं लक्षात आल्यावर बदलला. मुलगी दत्तक घेऊन एक पाऊल पुढे टाकेतोवर तो आणखीच बदलला. दीपिका घरात आल्यावर ‘दुस-याचं मूल माझं नाही मानता येत मला. तुला पर्याय नसेल पण माझ्या बीजातून मी नवा जीव निर्माण करू शकतो’ असं म्हणून घरातून निघून गेलेला तिचा तो जीवनसाथी. घटस्फोटाला तिने लगेच संमती दिली. प्रेम करता येतं; मागता येत नाही. जीव लावता येतो पण त्या बदल्यात समोरच्याने पण आपल्यात जीव गुंतवावा अशी अपेक्षा नाही करता येत. त्याची सावलीही दीपिकावर पडू नये म्हणून मग नवं शहर; नवं काम ......

हे सगळं सहा वर्षांच्या कोवळ्या पोरीला कसं समजावून सांगायचं? कसं सांगायचं की मी तुला जन्म नसला दिला तरी सर्वार्थाने मी तुझी आई आहे? या इवल्या जीवाला कसा पेलवेल हा भार? हा निरागस जीव मिटून जाईल. तिला न दुखावता कसं सांगायचं सत्य?

दीपिका स्तब्ध बसलेल्या आईकडे पाहून भेदरली आहे आणखीच. श्वेता तिला जवळ घ्यायचा प्रयत्न करते. पण “तू मला विकत घेतलंस, मला बाबा नाही...” असं आक्रंदत दीपिका तिच्यापासून दूर होते आहे. लेकीला जपायचं तर आहे पण या क्षणी आपल्याला तिला जपता येत नाही हे कळून श्वेता आतल्याआत उध्वस्त होते आहे.

“आजू, मला आईने विकत आणलंय का रे?” दीपिकाने दारात उभ्या असलेल्या आजोबाकडे धाव घेतली आहे.

श्वेता कोप-यात उभ्या असलेल्या बाबाच्या चेह-याकडे पाहून दचकते. असा का दिसतोय हा आत्ता? याला काय होतंय? डॉक्टरांना फोन करावा का?

बाबाने नातीला उचलून कुशीत घेतलेय आणि तो तिला थोपटतोय. पण त्याची नजर कुठे हरवली आहे?

“बाबा ....” श्वेता हळूच हाक मारते.

“शोना, रडू नकोस. मी आहे ना. ....” बाबाच्या बोलण्यावर श्वेता दचकते. कितीतरी वर्षांनी त्याचा तोंडून ‘शोना’ ऐकताना ती परत एकदा लहान होऊन जातेय.

बाबाच्या खांद्यावर डोकं ठेवत ती म्हणते, “बघ ना रे बाबा, आता कसं सांगू मी राणीला? लहान आहे रे ती फार अजून.”

“श्वेता, बेटा रडू नकोस. तू माझी आहेस. माझीच मुलगी आहेस. मी आहे ना तुझ्याजवळ! मी तुला सोडून कधी कुठे जाणार नाही.....” बाबा त्याचं तंद्रीत बोलतो आहे.

रडतेय नात. बाबा बोलतोय लेकीशी. नातीला ‘लेक’ समजून तिची समजूत घालणा-या बाबाकडे पाहताना, त्याचे शब्द ऐकताना श्वेता चकित झाली आहे.

एक हात बाबाच्या गळ्यात आणि एक हात दीपिकाच्या केसांतून फिरवत गलितगात्र अवस्थेत उभ्या असलेल्या श्वेताला एका क्षणी बाबाच्या बोलण्याचा अर्थ उमगतो.
तिच्याही नकळत श्वेताचं मन उभारी घेतं.

इतकी वर्ष अबाधित असलेल्या त्या रहस्याचा अखेर उलगडा झाला आहे.

**

1 comment:

  1. कथा सुंदर, पण ...
    बाबा ने इतके दिवस का सांगू नये? तिला आधीच समजलं असतं तर किती सोपं झालं असतं ना सगळं! हे आपलं माझं मत.घोडा मैदान दूर नाही ... आधी सांगणं सोपं का अवघड, हे कळेलच लवकरच!

    ReplyDelete