ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, February 26, 2010

२२. घडयाळवाला

काही अनुभव वरवर पाहता अगदी छोटेसे दिसतात. पण ते आपल्याला बरेच काही देऊन जातात. त्याचेच हे एक उदाहरण.

माझे घडयाळ थोडे गंमतीदारपणे वागत होते! म्हणजे ते चालत होते, पण बरोबर विरूद्ध दिशेने! पाच वाजून गेल्यावर चार वाजायचे आणि नंतर साडेतीन! मी नवे घडयाळ विकत घ्यायला गेले. तिथला विक्रेता सुनील मला घडयाळे दाखवत होता. मी माझे जुने घडयाळ त्याला दाखवून तसेच नवे घडयाळ द्यायला सांगितले.

सुनील म्हणाला, "हेच घडयाळ मी तुम्हाला दुरुस्त करून देतो. कशाला उगीच जास्त पैसे खर्च करता?"

"तुम्ही नवे घडयाळ विकून फायदा कमावण्याऐवजी जुनेच घडयाळ दुरुस्त का करून देत आहात?", मी आश्चर्याने विचारले. सुनील हसून म्हणाला, " घडयाळ विकणे हे माझे काम आहे. पण घडयाळाच्या खपाचा नुसता आकडा महत्त्वाचा नाही. मी विकलेले घडयाळ चांगले चालणेही तितकेच महत्त्वाचे आहे."

सुनीलने माझे जुने घडयाळ व्यवस्थित करून दिले. जवळजवळ सहा महिने ते छान चालले. एके दिवशी टेबलावरून खाली पडल्यावर मात्र ते बंद पडले.

परत मी त्याच दुकानात गेले. सगळी कहाणी सांगून मी सुनीलला नवे घडयाळ दाखवायला सांगितले. सुनील म्हणाला, "मी दुरुस्त केलेले घडयाळ असे बंद पडायला नको होते. मी जरा एकदा बघतो." हे घडयाळ आता पुन्हा चालेल असे मला वाटत नव्हते. त्यामुळे मी दुरूस्तीस फार काही उत्सुक नव्हते. ते ऒळखून सुनील म्हणाला, " आम्ही घडयाळाच्या दुरुस्तीवर एक वर्षाची हमी देतो. त्यामुळे यावेळी तुम्हाला त्याच्या दुरुस्तीचे वेगळे पैसे द्यावे लागणार नाहीत. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, उगीच नवे घडयाळ खरेदी करण्याची घाई करू नका. "

सुनीलने माझे घडयाळ नीट करून दिले. ते वर्षभर व्यवस्थित चालले. त्यानंतर घरात चोरी झाली तेव्हा इतर अनेक वस्तू गेल्या त्यात हे घडयाळही गेले. ज्या चार मैत्रिणींनी वीस वर्षांपूर्वी मला हे घडयाळ दिले होते, त्यातली एक तर हे जगही सोडून गेली.

माझे काम योग्य असले पाहिजे असे मानणारा ........... घडयाळ विक्रीचे टार्गेट पूर्ण करताना गुणवत्तेशी तडजोड न करणारा ....... काही बिघडलेच तर त्याची पूर्ण जबाबदारी घेऊन ते काम तडीस नेणारा हा विक्रेता....

आपल्या अवतीभवती अशी अनेक माणसे आहेत.. ती भेटली की उत्साह वाढतो, आशा वाटते. आपल्यावरच्या जबाबदारीचे भानही येते.
*

9 comments:

  1. अप्रतिम.. खूप छान अनुभव.. अशी माणसे विरळाच !!

    ReplyDelete
  2. अगदि छान वर्णन केल आहे, साध आणि सरळ,,,,,
    पोस्ट छान झाली आहे,

    हो आणि हे खरं की, सुनिल साारखी लोक भेटली तर उत्सह वाढतो हे नक्कीच

    ReplyDelete
  3. आभारी आहे हेरंब आणि giram तुमच्या प्रतिसादाबद्दल...

    ReplyDelete
  4. वा !खूप छान अनूभव खूप सरळ, सोप्या शब्दात सुंदर कथन केलाय.

    ReplyDelete
  5. धन्यवाद उद्गार तुमच्या प्रतिसादाबद्दल.

    ReplyDelete
  6. विरुद्ध दिशेने चालणारे घड्याळ? बाप रे! मला तो hollywood चा चित्रपट आठवला! 'The Curious Case of Benjamin Button'.
    :-)

    ReplyDelete
  7. अनामिक, तुमची comment राहून गेली होती पाहायची. हा कोणता सिनेमा तुम्ही म्हणताय तो पाहिलेला नाही.. बहुतेक सिनेमे मी ऐकलेले किंवा वाचलेले असतात .. :-) पण हा त्यातही नाही.. आता वाचते त्याबद्दल!

    ReplyDelete
  8. nice article..The curious case of Benjamin Button is about a man who is born as old and then get younger...Its a nice movie if you have patience to watch it...Brad Pitt in a different role...

    ReplyDelete
  9. अपर्णा, मी हा सिनेमा कधीतरी अर्धा पाहिला आणि तो मला आवडला .. आता उरलेला अर्धा कधीतरी पाहीन. (मी एका वेळी संपूर्ण सिनेमा पाहू शकत नाही .. तेवढा पेशन्स नाही माझ्याकडे!) मला त्या सिनेमाची कल्पना अतिरंजित असली तरी फार आवडली आहे... मला वाटत पेशींच्या पातळीवर तेच होत असत .. हळूहळू मागे जात जात अस्तित्वहीन होऊन जाण!

    ReplyDelete