ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Sunday, May 23, 2010

२८. प्रयाग: भाग १

प्रयागला मी पहिल्यांदा १९९२ मध्ये गेले तेंव्हाची ही गोष्ट! त्यानंतर अनेकदा या शहरात जाण्याची, तेथे राहण्याची संधी मला मिळाली. पण तो पहिला अनुभव अजूनही मनात आहे......त्यावेळी लिहिलेली काही पाने परवा अचानक सापडली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या......

पूर्वी लोक तीर्थयात्रेला जायचे तेंव्हा म्हणे ’परत येऊ की नाही’ या आशंकेने आपल्या मागची सगळी तरतूद करून जायचे. स्वाभाविकच होतं ते! आजकाल परिस्थिती बदलली आहे, असं आपलं आपण म्हणतो! पण प्रत्यक्षात प्रवासाला निघालं की ’सा-याच बदलांना प्रगती मानू नये’ असा साक्षात्कार चडफडत का होईना पण होतोच!

गाडी ’ऊशीराने’ - ( हा खास मध्य रेल्वेचा शब्दप्रयोग!) धावत असल्याने आत्ताच्या वेळेचं काय करायचं हा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला. पहाटे निघायचं म्हणून मैत्रिणीने दुपारच्या जेवणाचा डबा सोबत दिला होता, तो दादर स्थानकात संपवला मी. बसल्या बसल्या झोप काढत असताना दुपारी कधीतरी माझा प्रवास सुरू झाला.

सहप्रवाशांशी बोलताना अलाहाबादला इलाहाबाद आणि खरं तर प्रयाग म्हणायचं असतं अशी माहितीत भर पडली. गंगा आणि यमुनेचा एकेरी उल्लेख करणं म्हणजे तर ’शांतं पापम!!’ ’गंगाजीके दर्शन हररोज सुबह करोगे ना बेटा?” असं एका बाईंनी मला विचारल्यावर मी जरा घाबरलेच! नदी म्हणजे निव्वळ H2O असं समजण्याइतकी मी टोकाची तर्कनिष्ठ नाही. मलाही नदी आवडते. पण नदीच दर्शन? डिसेंबरच्या थंडीत? पहाटे? जास्तच होती नुसती कल्पनाही. पण वाराणसीला ’गंगामय्या’ पाहताना ’दर्शन’ हाच शब्द मनात आला. पण ती पुढची गोष्ट झाली!

प्रयागला मी पोचले, तेंव्हा संध्याकाळचे फक्त साडेपाच झाले होते, पण अंधार असा की जणू रात्रीचे आठ वाजलेत! रस्ते अगदी सूनसान. थंडीचा पहिला झटका आधी जाणवला आणि मग प्रयागच्या आतिथ्याची झलक!

’केल्याने देशाटन’ माणूस शहाणा होतो म्हणतात. आजकाल माहितीचा इतका भडिमार आपल्यावर होत असतो की, जणू आपल्याला सगळ माहिती आहेच असं आपल्याला वाटायला लागतं! पण आपल्या देशाच्या विशालतेची, भव्यतेची खरी जाणीव प्रवासात होते. इतके दिवस अलाहाबाद आणि पंडित नेहरू एवढ एकच समीकरण डोक्यात होतं. पण जगदगुरू शंकराचार्यांनी ज्या पूर्वमीमांसकाचे श्रध्दापूर्वक दर्शन केले ते कुमारिल भट्ट प्रयागनिवासी होते हे येथे पोचल्यावरच लक्षात आलं.

मला प्रवास करायला आवडतं ते वेगवेगळी माणसं भेटतात म्हणून. बाकी निर्जीव ठिकाणं पाहण्यात मला काही रस नसतो. प्रयागच्या लोकांबरोबर हिंडताना त्यांचा एक वेगळा पैलू जाणवला- तो म्हणजे ते कोणतीही बाब निर्जीव मानत नाहीत. सिंहगडावर जाऊन तानाजीची समाधी न पाहताच परत येणारे अनेक लोक मला माहिती आहेत. ’त्यात काय पाहायचं? समाधीसारखी समाधी असणार..” हे तुम्हीही ऐकलं असेल वाक्य! पण प्रयागमध्ये माणसं त्या त्या स्थानाशी मनाने जोडली गेली आहेत असं वाटतं. ’ब्रह्माने या ठिकाणी १०० अश्वमेध केल्याची’ माहिती ते मला अशा थाटात सांगत होते, की ते जणू त्याचे एक यजमान होते! गंमत वाटली मला.

प्रयागमधील सर्वात प्रेक्षणीय स्थळ म्हणजे अर्थातच त्रिवेणी संगम! गंगा, यमुना आणि सरस्वती या ठिकाणी एकमेकींना भेटतात! सरस्वती तुम्हा आम्हाला दिसत नाही, पण ती असते .. सूक्ष्म, अदृष्य पण प्रवाही...पहिल्या दिवशी काही वेळ यमुनेवर जाऊन बसलो होतो. विस्तीर्ण पण गलिच्छ घाट, पिण्डदानासाठी, श्राद्धासाठी तेथे जमलेले लोक, .. जणू मृत्यूच सर्वव्यापी होता.. ते दृष्य पाहून मन काहीसं उदास झालं. नंतर एक दोन वेळा चालण्याच्या हौसेपायी, तर कधी चक्का जाम म्हणून रात्री यमुनेच्या काठी भटकलो. रात्रीच्या अंधारात मात्र यमुना सौम्य, स्नेहमयी वाटली. खट्याळ श्रीकृष्णाच्या बालक्रीडांच गुपित तिच्याजवळ आहे याची जाणीव काळॊखात तिचा आवाज ऐकताना झाली.

प्रथमदर्शनी गंगेने मात्र माझा भ्रमनिरास केला. विस्तीर्ण वाळवंटात दूरवर एक इवलीशी जलधारा दिसत होती. ती गंगा, यावर माझा विश्वास बसेना. कदाचित गंगेबद्दल माझ्या अपेक्षाच अवास्तव होत्या. ऐकून, वाचून – विशेषत: आद्य शंकराचार्यांनी लिहिलेले गंगास्तोत्र वाचून मी केलेली अपेक्षा अगदीच फोल ठरली. मागे एकदा पानशेत धरण पाहायला गेले होते तेंव्हा आणि गोहत्तीला ब्रह्मपुत्रेचं ’दर्शन’ घ्यायला गेले तेंव्हाही माझी अशीच फसगत झाली होती. माझ्या मनातले भाव मला लपवून ठेवता आले नाहीत. कारण माझ्याबरोबरचे लोक पावसाळ्यात गंगेला किती पाणी असतं, त्याच पुन:पुन्हा वर्णन करत होते.

गंगा ही नदी मोठी मजेदार आहे. मला ती भारतीय जीवनशैलीची, संस्कृतीची प्रतिनिधी वाटते. दोन्ही गोष्टींची आपण थोरवी ऐकलेली असते, पण प्रत्यक्षात आपल्याला पहिल्यांदा दिसते ती त्यातली घाणच! गंगेबाबतही मला तोच अनुभव आला. पाणी इतक घाण होतं, की त्यात हात काय पायही घालावेसे वाटले नाहीत. चिकाटीने मागोवा घेत राहिलं, की भारतातल्या चांगल्या गोष्टीही दिसायला लागतात, मन त्यामुळे भारावून जातं! गंगेला एक सूक्ष्म नाद आहे, तिला एक विशिष्ट गंध आहे. तिच्या काठचा वारा इतका सुखद आहे, की त्याला कशाचीही उपमा देता येत नाही. माणूस हळूहळू गंगेच्या प्रेमात पडतो. ’नाहं जाने तव महिमानम, पाहि कृपामयी मामद्न्यानम’ या शंकराचार्यांच्या ओळी मी नकळत तोवर गुणगुणायला लागले होते. गंगेचा महिमा असा अपार आहेच.

गंगा यमुनेच्या संगमावर नावेत बसून जाताना उगीच भव्य दिव्य काहीतरी वाटलं मला. कोणी म्हणेल, त्यात काय एवढं? नद्यांसारख्या नद्या. पण त्या दोन्ही नद्यांच्या व्यक्तिमत्त्वांचा, शेकडॊ- हजारॊ वर्षे चालत आलेल्या त्यांच्याविषयीच्या कथांचा मनावर प्रभाव पडतो. गंगेचं पाणी गढूळ, काहीस घाण दिसणारं, हलक्या लाटांचं! आणि यमुना भव्य, काळीशार, मोठया लाटांची! त्यांच्या मीलनाचा तो क्षण चिरंतन आणि अविरत....कुठे तक्रार नाही, समर्पणाचा अविर्भाव नाही.. त्या संगमात स्नान करणारे असंख्य लोक, त्यांच्या आसपास उडणारे अगणित पांढरेशुभ्र बगळे... रमणीय दृष्य होत ते! या ठिकाणी मान्यतेनुसार यमुनेच अस्तित्त्व संपतं, आता ती गंगाच आहे. गंगा सगळ्यांना आपल्यात सामावून घेते, गंगेचं रूप देते. द्वैत संपून हा अद्वैताच्या प्रवासाचा शुभारंभ! म्हणून भारतीय संस्कृतीने इतक महत्त्व दिल का गंगेला?
भाग २ लवकरच...

6 comments:

  1. > खट्याळ श्रीकृष्णाच्या बालक्रीडांच गुपित तिच्याजवळ आहे याची जाणीव काळॊखात तिचा आवाज ऐकताना झाली.
    >---

    खरं की काय? कृष्ण झालाच नसेल तर हे सगळे कल्पनेचे खेळच म्हणावे लागतील. आणि इलाहाबादची बाई एका 'बेटी'ला 'बेटा' म्हणण्याची शक्यता कमीच आहे.

    > तिच्या काठचा वारा इतका सुखद आहे, की त्याला कशाचीही उपमा देता येत नाही. -- हा असला भावनावेग तुमच्या एकूण शैलीशी फार विसंगत आहे. तो तुमचा विसाव्या शतकातला अवतार असावा, असंही वाटत नाही.

    बाकी लेख खूप चांगला आहे.

    ReplyDelete
  2. > ’नाहं जाने तव महिमानम, पाहि कृपामयी मामद्न्यानम’ या शंकराचार्यांच्या ओळी
    >---

    महिमानम्‌ ... कृपामयि ... मामज्ञानं
    'कृपामयी' breaks the Pajjhatika meter. So do the other two solecisms.

    ReplyDelete
  3. 'महिमानम' शब्द पज्झटिकेच्या छन्दनियमांत बसतो, पण तो शब्दच चूक आहे. 'महिमानं' व्याकरण आणि छन्द दोन्ही आघाड्यांवर बरोबर आहे. 'कृपामयी' छन्दात बसत नाही, म्हणून मी मूळ शब्द पाहिले आणि इतर दोन चुकाही कळल्या. तीनही चुका छन्ददोष निर्माण करतात, हा माझा दावा बरोबर नाही.

    ReplyDelete
  4. नानिवडेकरजी,
    तुमच्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे माझ्या माहितीत भर टाकणा-या आहेत.

    १. ’कृष्ण झालाच नसेल तर, हे सगळे कल्पनेचे खेळच म्हणावे लागतील’ हे तुमच मत बरोबरच आहे. तसही लेखात मला काय वाटल ते मी लिहिल आहे.. ते सगळं नेमक तसचं असेल अशी शक्यता कमीच. दुसरे कोणी तेच पाहून काही वेगळं लिहून गेले असतील. विचार आणि कल्पना, मत आणि कल्पना यात मला नेहमी साम्य वाटत आले आहे. बरोबर की चूक, माहिती नाही.
    २. इलाहाबादच्या बाई ’बेटा’ म्हणाल्या की ’बेटी’ - दोन्ही शक्यता आहेत. अनुभव असा आहे की अशा बिनमहत्त्वाच्या मुद्यात अहंकार फारसा पणाला लागलेला नसल्याने सहसा अशा गोष्टी चुकीच्या आठवत नाहीत. म्हणजे या जागी शाळेतले शिक्षक मला हुषार मानत की ढ मानत असा मुद्दा असता तर कदाचित मनाने सोयिस्करच लक्षात ठेवल असतं. इथे तशी शक्यता कमी. पण म्हणाल्या असतील त्या बेटी अस धरून चालण्याने काही बिघडत नाही. किंबहुना तुम्ही म्हणता तसं ते जास्त स्वाभाविक वाटतं.
    ३. ’कृपामयी’ नाही, ’कृपामयि’ हे बरोबरच. बाकी ’पज्झटिका’ वगैरे माझ्या डोक्यावरून गेलं - नेहमीप्रमाणेच!
    ४. मी रामकृष्ण मठाने प्रकाशित केलेले ’स्तवनांजलि’ आत्ता पाहत होते. त्यात ’पाहि’ ऐवजी ’त्राहि’ शब्द आहे. असे आणखीही काही पाठभेद आहेत का?

    ReplyDelete
  5. मराठीत आपण स्त्रियांना 'बाईसाहेब', 'आईसाहेब' म्हणतो. उर्दूवाला वा इलाहाबादी हिन्दीवाला नेहमी 'साहिबा'च म्हणणार, तो/ती कधीही बाईला 'साहेब' म्हणायचा नाही. धोंडो केशव कर्वे आश्रमातल्या मुलीला 'चल यार, कुल्फ़ी खा के ऐष करेंगे' किंवा 'चल यार, ज़ल्दी तय्यार हो जा प्रार्थना के लिये' वगैरे 'यार' म्हणण्याची शक्यता ज़शी शून्य, तशी इलाहाबादची बाई तुम्हाला उद्‌देशून 'बेटी' हा स्त्रीलिंगीच शब्द वापरणार याची खात्री बाळगायला हरकत नाही. तुम्ही म्हटल्याप्रमाणे मुद्‌दा बिनमहत्त्वाचा आहे; पण मला उगीच अक्कल पाज़ळण्याची हुक्की आली, म्हणा हवं तर.

    मला 'पाहि' शब्दाचा अर्थ ठाऊक नाही, 'त्राहि' बद्‌दलही थोडा अंदाज़ काय तो आहे. त्यामुळे पाठभेदांविषयी कल्पना नाही. 'कृपामयी' चूक आहे हे मला कळले ते छन्दशास्त्राच्या माझ्या अभ्यासामुळे, संस्कृत भाषेत मी अज्ञ असूनही. पादाकुलक या ३२ मात्रांच्या छन्दाचे अनेक विशिष्ट उपछन्द आहेत. त्यातला एक म्हणजे पज्झटिका. यात चार मात्रांचे आठ भाग असतात; एका चरणाचे १६+१६ उपविभाग असतात; या दोन उपविभागांचे यमक ज़ुळायला हवे. कुठलाही चार-चरणी घटक हा ज-गणाचा, म्हणजे लघु-गुरु-लघु मात्रांचा, नको. ज-गणाचा हा नियम पूर्ण पादाकुलकेला लागू होत नाही तर फक्त पज्झटिका या छन्दालाच तो लागू होतो. म्हणजे प्रत्येक पज्झटिका ही पादाकुलक असते, पण काही पादाकुलक रचनाच काय त्या पज्झटिकेत असतात. अज़ून माहिती हवी असल्यास पत्र पाठवा. इथे खूप विषयान्तर न केलेले बरे.

    तुम्ही पाठभेदांचा उल्लेख केलाच आहे म्हणून : चर्पटपंजरिका ही पज्झटिकेतली सर्वप्रसिद्‌ध रचना. त्यात दोन पाठभेद दिसतात.
    भज गोविंदम्‌, भज गोविन्दं - गोविंदम्‌ भज मूढमते
    संप्राप्ते सन्निहिते काले - न हि न हि रक्षति डुकृञ करणे
    आणि
    प्राप्ते सन्निहिते मरणे - न हि न हि रक्षति डुक्‌ऋञ करणे

    माझा कयास हा आहे की शंकराचार्यांनी 'संप्राप्ते सन्निहिते काले' शब्द वापरले असावेत. पण 'काले - करणे' उपविभागांत अन्त्यानुप्रास न आल्याने एक छन्दनियम मोडला. म्हणून पुढे कोणीतरी 'प्राप्ते सन्निहिते मरणे' भेद काढला असावा. आता 'मरणे - करणे' हे यमक ज़ुळले, पण 'प्राप्ते सन्निहिते मरणे' मधे सोळाऐवजी चौदाच मात्रा भरतात ही एक गडबड झाली. 'गोविंदम्‌ भज मूढमते' मधेही चौदाच मात्रा बसतात, याची इथे नोन्द घेणे.

    ReplyDelete
  6. > चर्पटपंजरिका ही पज्झटिकेतली सर्वप्रसिद्‌ध रचना.
    >---

    मला पज्झटिका छन्दातल्या दोनच रचना माहिती आहेत. चर्पटपंजरी, आणि गंगास्तोत्र. आश्चर्य म्हणजे माधवराव पटवर्धनांच्या 'छन्दोरचना' ग्रंथात 'पद्‌यप्रकारनामसूची' (index) मधे दीड हज़ाराहून जास्त छन्दांची नांवे आहेत, पण पज्झटिकेचा उल्लेख नाही.

    ReplyDelete