ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Wednesday, March 9, 2011

६५. भीषमदादा


“तो हम कहाँ  थे?” सिग्नलला उजवी बाजू पकडण्याच्या प्रयत्नात मागचे दहा सेकंद गप्प असलेल्या चक्रधराने (Taxi driver) मला अचानक विचारलं तेव्हा मी दचकले. मला वाटलं -  हा गृहस्थ नक्की रस्ता चुकला आहे आणि आता योग्य रस्ता शोधायची धडपड मला करावी लागणार! आदल्या दिवशी पुण्यात सकाळी शंकरशेठ मार्गावरून पत्र्या मारुतीपर्यंतचा, दुपारी असाच कुठून तरी प्रतिज्ञा मंगल कार्यालयापर्यंतचा रस्ता शोधून माझा मेंदू इतका शिणला होता की रात्री मी मैत्रिणीच्या घरचा नेहमीचा रस्ताही चुकले होते. “पुण्यात तू खूप दिवसांनी आलीस ना, मग असं होणारच” हा माझी समजूत घालण्यासाठी इतरांनी केलेला युक्तिवाद फोल होता – कारण रस्ते चुकण्यात मी पुष्कळ आयुष्य घालवलेलं  आहे!  (आणखी पुराव्यासाठी ‘पळवाट’ ही जुनी पोस्ट वाचा!) त्याचा एक फायदा असा की मुक्कामाला पोचण्याइतकाच चालण्याचाही आनंद घ्यायला मी शिकले! असो, तर मुद्दा असा की आणखी एकदा रस्ता शोधावा लागणार तर!

सुदैवाने माझा चेहरा चक्रधरकाकांना वाचता आला आणि ते हसून म्हणाले, “रास्ते की बात नहीं कर रहा हूँ मैं, उसकी चिंता मत करियेगा आप, मैं तो भीषमदादा की बात कर रहा था!”

हा माणूस रस्ता चुकलेला नाही हे कळल्यावर मला एकदम हायसं वाटलं! मग मी फारसा विचार न करता म्हटलं, “आप कह रहे थे - भीषमदादा सोयेला था” – मी चक्रधराचं वाक्य अचूक सांगितल्यामुळे तो एकदम खूष झाला. पितामह भीष्म माझ वाक्य ऐकून बहुधा पुन्हा शरपंजरी पडले असते आणि उत्तरायणाची वगैरे वाट न पाहता त्यांनी घाईने प्राणत्याग केला असता. अर्थात ही एक शक्यता. कदाचित सारखं संस्कृत बोलून कंटाळलेल्या भीष्माला ही बोली भाषा ‘बदल’ म्हणून किंवा ‘fashion म्हणून आवडलीही असती म्हणा – काही सांगता येत नाही! आणि भीष्माभोवतीची सगळी मंडळी – विशेषत: स्त्रिया  तर – संस्कृत बोलत नसत! त्यामुळे तर त्याला प्राकृताची सवय असेल! भीष्माचं व्यक्तिमत्त्व एकदम जबाबदार, गंभीर, भारदस्त अशी प्रतिमा आहे माझ्या मनात – पण तोही मनुष्य होता म्हणजे कधीमधी हसत असेलच की! माझं बोलणं कदाचित त्याने हसण्यावारी पण नेलं असतं!

मुंबईतल्या एका उपनगरात मी काल रात्री साडेबारा - एक वाजता पोचले होते. मित्राच्या घरच्या लोकांशी गप्पा मारून झोपायला अडीच तीन झाले होते. दिवसभरात नंतर भेटायला जमणार नव्हतं म्हणून मी आणि आणखी एक मैत्रीण सकाळी सहा वाजता भेटून तासभर चालत गप्पा मारत होतो. आता परत दिवसभरात ब-याच जणांकडे जायचं होतं. तसेही मागचे चार पाच दिवस मी बोलून बोलून दमले होते. उपनगरीय प्रवासात अर्धा पाऊण तास थोडी झोप घ्यायचा माझा विचार होता. आणि भेटला होता हा गप्पिष्ट चक्रधर!

चूक माझीच होती म्हणा - नेहमीप्रमाणे! मला माणसांशी बोलायची हौसच दांडगी! मी Taxi stand वर आले तेव्हा चक्रधरकाका काहीतरी वाचत बसले होते. मीच विचारलं, “हनुमान चालिसा का?” आणि त्यावर आमचा संवाद सुरु झाला. संवादात माझ्याकडे फक्त ऐकण्याचं आणि मी झोपले नाही इतकं कळण्यापुरतं एखादं अक्षर उच्चारण्याचं काम होतं!

हनुमान कसा बलवान आहे याचे किस्से ऐकता ऐकता आम्ही महाभारतात कधी शिरलो ते कळलंही नाही मला! कृष्ण कर्णाला शाबासकी देतो तेव्हा अर्जुन जरासा रागावतो. तेव्हा कृष्ण त्याला सांगतो, ‘”बाबा रे, बलशाली हनुमान रथावर बसला आहे, मी सारथ्य करतो आहे तरी कर्णाच्या बाणाने आपला रथ मागे जातोय, कर्ण किती महान योद्धा आहे याचा आणखी काय पुरावा पाहिजे तुला? त्याचे कौतुक नको करायला?”

मला ही गोष्ट नवी वाटली. त्यामुळे मी चक्रधरकाकांना आणखी काही गोष्टी सांगायला प्रोत्साहित केलं. त्यांच्याकडे गोष्टींचा खजिनाच होता. म्हणजे मृत्युनंतर कर्णाला स्वर्गात खायला काहीच मिळत नाही – सोने चांदी मिळते फक्त! कारण? त्याने आयुष्यभर सोन्या- चांदीचेच दान केलं – अन्नदान कधीच केलं नाही. मग धृतराष्ट्र – भीष्म संवाद (बहुतेक तो दुर्योधन भीष्म संवाद असावा). तेव्हा भीष्म पाचही पांडवांना दुस-या दिवशी रणांगणात मारण्याची प्रतिज्ञा करतो. मग कृष्ण द्रौपदीला सल्ला देतो, “अंधार पडल्यावर सर्व ज्येष्ठांच्या शिबिरात जाऊन त्यांचा आशीर्वाद घे. सर्वात शेवटी भीष्माकडे जा. ” त्यानुसार  दौपदी पोचते तेव्हा “भीषमदादा सोयेला था”. मग तो तिला आशीर्वाद देतो वगैरे गोष्ट!

पितामह म्हणजे आजोबा – दादाजी. त्यामुळे भीष्माला दादा म्हणण्यात गैर काहीच नाही. राहता राहिला एकेरी उल्लेख. पण ‘अहो जाहो’ संबोधनाने आदर दाखवायची पद्धत काही विशिष्ठ सामाजिक घटकांतच आढळते. अरे-तुरे अगं-तुगं ही पाश्चात्य विशेषत: अमेरिकन पद्धत आहे असं अनेकांना वाटतं. पण  खेड्यांत, आदिवासी क्षेत्रात सगळ्यांनी एकमेकाना अरे-तुरे, अगं-तुगं बोलण्याची पद्धत आहे – आता शहरी माणसांच्या सहवासाने खेडीही बदलत चाललीत म्हणा! भीष्माचा भीषम पण स्वाभाविक! अशा भाषेत एक वेगळाच गोडवा वाटतो – कदाचित अशी भाषा आपण बोलत नाही म्हणून! मी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशात कामानिमित्त ब-यापैकी भटकले असल्याने मला अशी भाषा ऐकायला आवडतं! माणस मनापासून बोलतात असं वाटतं!

मला या माणसाला महाभारत इतकं सगळ माहिती आहे याचं नवल वाटतं होतं! शिवाय ही माहिती फक्त पुस्तकी नव्हती – त्या त्या प्रसंगाचे तात्पर्य हा माणूस मला समजावून सांगत होता. “आप समझ गयी ना इसका मतलब?” – अशी खात्री करून घेत होता. मला या माणसाच्या माहितीचं कौतुक वाटतं होतं आणि त्याच्या शहाणपणाबद्दल (wisdom या अर्थाने शब्द वापरतेय मी, अन्यथा मराठीत शहाणपणाला वेगळीच छटा आहे!) आदरही वाटत होता. पुष्कळ लोकांकडे पुस्तकी पांडित्य असतं – पण प्रगल्भता नसते - ती या माणसाकडे आहे असं मला वाटतं राहिलं!

मग इतिहासातून वर्तमानात येत मी जरा त्याच्याबद्दल चौकशी केली. हा गृहस्थ उत्तर प्रदेशच्या आझमगढ जिल्ह्यातला. १९६९ मध्ये मुंबईत आला. तेव्हापासून मुंबईत taxi चालवतो. आधी बरीच वर्ष स्वत:ची गाडी होती. पण गावाला गेल की दोन चार महिने येणं होत नाही, गाडी नुसतीच पडून राहते म्हणून गाडी विकून टाकली आणि आता दुस-याची गाडी चालवतो. दिवसभरात खर्च वजा जाता तीनशे रुपये सुटतात!

“तुम्ही गणित किती शिकलात?” त्यान मला मधेच विचारलं. गणितातल माझं शिक्षण आणि आत्ताचं त्यातलं ज्ञान हा एक मोठा विरोधाभास आहे. त्यामुळे मी नुसतीच हसले. त्यावर त्यानं सांगितलं, “मी फक्त दुसरी शिकलोय – पण तुमच्यापेक्षा माझा हिशोब जास्त पक्का आहे – विचारून बघा!” मला अर्थात त्याची परीक्षा घ्यायची नव्हती.

मग त्याने बायको, दोन मुलं, त्यांची शिक्षणं, शेतीची वाईट अवस्था, मुंबई आणि गाव यात होणारी त्याची कुतरओढ अशा अनेक गोष्टी सांगितल्या. माझीही चौकशी केली – ‘आप बुरा न माने तो’ अशी सभ्य प्रस्तावना हे प्रश्न करण्यापूर्वी करायला तो विसरला नाही अर्थातच!

माणसांना आपलं नाव, आडनाव याचं किती अप्रूप असतं! शिक्षण, जात, नोकरी, भाषा यांचा किती अभिमान असतो! ‘खानदान की इज्जत’ या नावाखाली किती चुकीच्या गोष्टी निमुटपणे स्वीकारल्या जातात! वंशाचा दिवा पाहिजे म्हणून किती भले-बुरे (जास्त करून वाईटच!) प्रयत्न केले जातात! पण आपल्याला आपले पूर्वज किती माहिती असतात? कदाचित आपण आपल्या आजोबांचं आणि पणजोबांचं नाव सांगू शकतो! त्याच्यापलीकडे काय? आणि अनेकदा नुसती  नावंच माहिती असतात – पण माणूस म्हणून ते लोक कसे होते याची आपल्याला माहिती नसते.

आणि इथे हे भीषमदादा. स्वत: ब्रह्मचारी पण मोठा प्रपंच केलेले. हे खरे होऊन गेले की कोणा प्रतिभावंताचा अविष्कार आहे हेही सांगता येणार नाही! पण त्यांचे नाव, त्यांचे जगणे, त्यांचे संवाद, त्यांचे इतरांशी असलेले नाते आजही भारतीय माणसांच्या मनात जिवंत आहे! आझमगढसारख्या भागातून आलेला एक माणूस आणि मी यांच्यात संवाद साधण्याचा तो एक पूल होऊ शकतो. भीषमदादाच्या आठवणीतून आम्हाला एकमेकांचे जगणे थोडेफार समजते. आम्ही एकमेकांशी जोडले जातो – पुन्हा कधीही आम्ही भेटणार नाही कदाचित तरी या क्षणाचे नाते काही कमी प्रतीचे नसते.

भीषमदादा आमच्यातील दरी कमी करतात. अल्पशिक्षित असा तो चक्रधर आणि शिकायची संधी मिळालेली मी, एक पुरुष आणि एक स्त्री, असे आमच्यात खूप अंतर ... पण भीषमदादा आम्हाला जोडतात. आम्ही एकाच रस्त्याचे पाईक आहोत याची जाणीव करून देतात. वर्तमान इतिहासातून फुलतो – म्हणून अभिनिवेश कशाचाच धरू नये तसे नाकारूही काही नये याची मला जाणीव होते.

व्यासांच्या – किवा जे कोणी अज्ञात लेखक असतील ते – त्यांच्या प्रतिभेच्या चमत्काराने मी पुन्हा एकदा भारावून गेले आहे. 

No comments:

Post a Comment