ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Sunday, April 1, 2012

१२०. पुन्हा जंतर मंतर: भाग २


दोन शहीदांची माहिती देऊन झाल्यावर टीम अण्णाचे एक ज्येष्ठ सदस्य श्री. संतोष हेगडे बोलायला येतात तेव्हा त्यांच्यासाठी खुर्ची येते. ते ७२ वर्षांचे आहेत (असे तेच सांगतात पुढे) त्यामुळे त्यांना कदाचित उभ राहून बोलायला त्रास होत असणार. त्यांच्या सोबत श्री. केजरीवाल दुसरा ध्वनिवर्धक हातात घेऊन का उभे आहेत हे मला आधी कळत नाही - पण ते पुढच्याच क्षणी कळत. हेगडे साहेब इंग्रजीत बोलतात आणि दर दोन तीन वाक्यांनंतर त्यांचा अनुवाद केजरीवाल (त्यांचा उल्लेख इथ अरविंदभाई असा होतो आहे) करतात. मला केजरीवालांच्या साधेपणाचं कौतुक वाटत. तितक्याच सहजतेने ते पुढे आंध्र प्रदेशातून सोला रंगा राव यांच्या नातेवाईकांच्या इंग्रजी बोलण्याचा अनुवाद हिंदीत करतात. केजरीवालांशी वैचारिक मतभेद आपले असू शकतात पण हा माणूस हाडाचा  कार्यकर्ता आहे याची खूणगाठ नकळत माझ्या मनात बांधली जाते. कर्नाटकातील अवैध खाणकामाचा तपास लोकायुक्त या नात्याने श्री. हेगडे यांनी सुमारे चार वर्षे केला आहे आणि त्याचा २६००० पानांचा अहवालही सादर केला आहे. श्री. हेगडे यांच्या मते कर्नाटकातील अवैध खाणकामात ३ मुख्यमंत्री, ५ मंत्री आणि ७०७ अधिका-यांचा सहभाग आहे. श्री. हेगडे स्पष्टपणे सांगतात, "राजकीय पाठबळाशिवाय इतक्या मोठया प्रमाणावर बेकायदेशीर काम होऊ शकत नाही."

उत्तर प्रदेशच्या समाजकल्याण खात्यातील अधिकारी श्री. रिंकु सिंग राही हे नंतर बोलायला समोर येतात. त्यांना धमक्या तर अनेक मिळाल्या आहेत  आणि या गृहस्थावर  एकदा सहा  गोळ्या झाडल्या गेल्या आहेत - त्यात त्यांनी एक डोळा गमावला आहे; त्यांचा जबडा कायमचा वाकडा झाला आहे; त्यांच्या दोन्ही हातांत गोळ्या घुसल्या आहेत. आता कृत्रिम डोळा बसवून ते काम करतात. हे असे घडण्याचे कारण? आपल्याच खात्यातील भ्रष्टाचाराविरुद्ध ते लढत आहेत. “मी मेलो नाही या शहीदांसारखा गोळ्या खाऊन याचे मला कधीकधी वाईट वाटते” अशी सुरुवात करून ते म्हणाले, "याचा अर्थ इतकाच की माझे इथले काम अजून संपले नाही." हा गृहस्थ २६ मार्चपासून लखनौमध्ये उपोषणाला बसणार होता. इतके सोसून, हाती काही न पडूनही या माणसाकडे लढण्याची प्रेरणा कुठून आली असेल असा प्रश्न मला त्यादिवशी पडला. हा माणूस अशी लढाई लढताना आणखी किती काळ जिवंत राहू शकेल अशी एक काळजी मला त्या वेळी वाटली, आजही वाटते.

श्री. मनीष सिसोदिया यांनी गेल्या एप्रिलपासून घडलेल्या घटनांचा संक्षिप्त आढावा सादर केला. त्यानंतर बोलायला उभे राहिले अरविंदभाई. अरविंदभाईंनी लोकांना एक थेट प्रश्न विचारला. "सध्याची संसद जन लोकपाल बील आणेल असे तुम्हाला वाटते का?" यावर समुहाने एकमुखाने "नाही" असा घोष केला. हे का शक्य नाही याचे स्पष्टीकरण मग अरविंदभाईंनी सविस्तर दिले. "मी संसदेचे पावित्र्य मानतो, तिचा अपमान होईल असे वक्तव्य मी कधीही केलेले नाही" असे सांगून ते म्हणाले की, "संसदेत बसणारे लोकच संसदेचा अपमान त्यांच्या व्यवहारातून करत असतात हे पुन्हापुन्हा दिसते आणि त्यामुळे मी व्यथित होतो."

प्रसारमाध्यमांचा हवाला देत त्यांनी पुढे म्हटले की, "आज लोकपाल कायदा असता तर केंद्रिय मंत्रीमंडळातील १४ मंत्र्यांवर अधिकृत तक्रार दाखल करता येईल. कोण असतील हे मंत्री, सांगा पाहू" असे लोकांना त्यांनी आवाहन केल्यावर लालूप्रसाद यादव, राहुल गांधी अशी नावे प्रथम पुढे आली. "अरे, हे केंद्रिय मंत्री नाहीत" असे अरविंदभाईंनी समजावून सांगितल्यावर मग लोकांनी चिदंबरम आणि कपिल सिब्बल या दोघांपासून सुरुवात केली. तांदूळ निर्यातीच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख झाल्यावर "चावलचोर" अशी पदवी लोकांनी दिली. कोळसा घोटाला आदल्या दिवशीच उघड झाला होता - त्याचीही चर्चा झाली. एअर इंडियाला आवश्यकता नसताना कशी विमाने खरेदी करण्यात आली आणि त्यामुळे देशाचे किती नुकसान झाले हेही त्यांनी सांगितले. या चौदा मंत्र्यांच्या यादीत चार मंत्री महाराष्ट्रातले आहेत - म्हणजे निदान या क्षेत्रात तरी महाराष्ट्र मागे नाही(!) असे म्हणता येईल. या चर्चेच्या दरम्यान लोकसभेत लोकपाल बीलावर झालेल्या चर्चेच्या काही क्षणफिती दाखवण्यात आल्या. संसद किती गांभीर्याने या विषयावर चर्चा करत होती, याचे पुन्हा एकदा झालेले दर्शन लोकांना चीड आणणारे होते.

केजरीवालांनी संसदेतील आकडेवारी जाहीर केली. ते म्हणाले: “आज लोकसभेत १६२ खासदार असे आहेत की ज्यांच्यावर ५२२ विविध अपराधांबाबत तक्रार दाखल झालेली आहे. देशभरात एकूण ४१२० आमदार आहेत, त्यांपैकी ११७६ आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा आरोप झाला म्हणजे कोणी लगेच गुन्हेगार ठरत नाही हे मान्य करूनही काही प्रश्न शिल्लक राहतातच. न्याय जलद न मिळण्यात राजकीय नेत्यांचा फायदा असतो त्यामुळे तीस तीस वर्ष खटला चालू राहणा-या व्यवस्थेत आपण काहीच दुरुस्त्या केल्या नाहीत असे सांगून त्यांनी मागणी केली की : आमदार-खासदारांवरील गुन्ह्यांचा निकाल लावण्यासाठी 'फास्ट ट्रॅक कोर्ट' स्थापन करा; वर्षभरात त्यांच्यावरचे खटले चालवून निकाल जाहीर करा; जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होईल; जे निर्दोष आहेत त्यांना परत त्यांचे संसदेतले, विधानसभेतले स्थान द्या.” हीच आकडेवारी पुढे केजरीवाल यांनी राज्यसभेकडून त्यांना आलेल्या 'संसदेचा अपमान केल्याच्या' नोटीसला दिला आहे. ते सविस्तर उत्तर इथे पाहता येईल. ज्यांच्यावर आरोप आहेत अशा लोकांना विविध राजकीय पक्ष निवडणुकीचे तिकिट देतातच का? - असाही एक मूलभूत प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

किरण बेदी यांना मागच्या दोन्ही प्रसंगी मी ऐकलं नव्हत - ती संधी आज मिळाली. थोडसं पुढे झुकून शांतपणे बोलण्याची त्यांची शैली एखाद्या अभ्यासू प्राध्यापकाला साजेशी वाटली. मधेच कोणीतरी बोलत होत आपापसात तेव्हा त्यांना "आप दो मिनिट चूप बैठेंगे?" असं विचारताना त्या पोलिस अधिकारी होत्या त्यांच्या उमेदीची अनेक वर्षं हे चांगलच जाणवलं. आश्चर्य म्हणजे होत असलेल्या घटनांची जबाबदारी काही अंशी आपलीही आहे - हे त्यांनी लोकांना समजावून सांगितलं. आपलं 'एक' मत मौल्यवान आहे आणि आपण ते जबाबदारीने वापरलं पाहिजे याची त्यांनी लोकांना आठवण करून दिली. लोकपाल बील लोकसभेत मंजूर झालेलं आहे आणि राज्यसभेत बाकी आहे, राज्यसभेतली पक्षनिहाय स्थिती कशी आहे, सी.बी.आय. लोकपालच्या अखत्यारीत येत की नाही हा कसा महत्त्वाचा मुद्दा आहे अशा अनेक गोष्टी अतिशय सोप्या भाषेत त्यांनी समजावून सांगितल्या. पण लोकांना बहुतेक त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आवडत नाही. कारण बेदी बोलत असताना माझ्याशेजारी सकाळपासून बसलेला एक तरूण फोनवर सांगत होता, " अरे, यह मॅडम अब बोअर कर रही है, चलो, निकल जाते है यहासे ...".

सगळ्यात शेवटी अण्णा बोलायला उठले तेव्हा समूह एकदम शांत झाला. "प्रजासत्ताक दिवस आपण गावात साजरा करतो पण सत्ता मात्र मुंबई-दिल्लीत असते" असं सांगून ते म्हणाले, "की चूक आपलीच आहे. मालक आपण असून आपण झोपी गेलो. ज्यांना आपण सेवा करायला निवडून दिले ते मग आपल्या तिजोरीवर डल्ला मारायला लागले." अण्णांची ही सोपी साधी भाषा समुहाला भुरळ घालते हे मी पुन्हा एकदा पाहिलं. अण्णा अनेक मराठी शब्द त्यांच्या भाषणात वापरतात. आजही ते म्हणाले, "अभी जग गये है अच्छी बात है, लेकिन अब दुबारा डुलकी मत लेना." आता तिथं डुलकी शब्दाचा अर्थ कोणाला कळणार? माझ्या शेजारचा एक माणूस म्हणाला, "यह क्या बोल रहे है अण्णा?" त्यावर दुसरा म्हणाला, "अरे, झपकी मत लेना ऐसा बता रहे है". त्यावर तिसरा म्हणाला, "यह अण्णा थोडे और पढे-लिखे होते तो अच्छा होता" त्यावर चौथा म्हणाला, "अरे, जादा पढे-लिखे लोगोंनेही तो हमको मूर्ख बनाया है आज तक, हमे ऐसाही गाँवका आदमी चाहिये."

"मी मंदिरात राहतो, माझ्याजवळ काही नाही; तरी मी आजवर ४ मंत्र्यांच्या आणि ४०० अधिका-यांच्या विकेट घेतल्या आहेत" हे अण्णांच बोलणं कोणालाच आत्मप्रौढीच वाटलं नाही यातून लोकांचा अण्णांवरचा विश्वास दिसून येतो. अण्णांनी मग नकाराधिकार, निवडून दिलेला प्रतिनिधी परत बोलवण्याचा अधिकार यावर त्यांचे विचार मांडले. बाबा रामदेव आणि ही टीम एकाच लढयाचा भाग आहेत आणि इथून पुढच्या घडामोडींत ते एकमेकांच्या बरोबर असतील अशीही घोषणा त्यांनी केली. (भ्रष्टाचार करणारे एक होतात, तर भ्रष्टाचाराविरोधात लढणा-यांनी एक का होऊ नये असे आधीच कोणीतरी बोलण्याच्या ओघात म्हणून गेला होता.) लोकांनी याही घोषणेचे स्वागत केले. ज्या चौदा मंत्र्यांची नावे केजरीवालांनी वाचून दाखवली होती, त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल न झाल्यास ऑगस्टमध्ये आंदोलन पुढचे पाउल उचलेल असेही त्यांनी सांगितले.

दिवसभराचा कार्यक्रम एकंदर शांततेत आणि शिस्तीत पार पडला. असंख्य तरूण स्वयंसेवक ही शिस्त राखण्यासाठी कायम उभे होते सभोवताली. त्यांचेही कौतुक वाटले.

एक दोन गोष्टी अर्थातच मला खटकल्या. उदाहरणार्थ इमामांचे 'संपूर्ण मुस्लिम समाज या आंदोलनाच्या पाठीशी उभा असल्याची घोषणा'. संपूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीने बोलण्याचा इमामाचा अधिकार हा देखील माझ्या मते एक पारंपरिक भ्रष्टाचार आहे. मुस्लिम नागरिकांना त्यांचे स्वतंत्र मत असण्याचा अधिकार हे आंदोलन पण नाकारते का - असा एक प्रश्न माझ्या मनात आलाच. 

दुसरे म्हणजे जंतर मंतर इथे आणखी एका गटाचे गेले सहा दिवस आमरण उपोषण चालू होते - तिथेही सुमारे पाचशे लोक होते. प्रसारमाध्यमांनी अण्णांच्या कार्यक्रमाला जितके महत्त्व दिले, तितके त्या दुस-या आंदोलनाला  नक्कीच दिले नसणार. ते बिचारे आधी शांत बसले होते. पण या व्यासपीठावरून कोणी त्यांची साधी दखलही घेतली नाही. मला वाटत होते की सिसोदिया, संजय सिंग, केजरीवाल यांपैकी कोणीतरी त्या आंदोलनकर्त्यांचा उल्लेख करतील पण तसे काहीच झाले नाही. मग ते आंदोलनकर्ते बिचारे थोडे नाराज झाले. "आम्हीही अण्णांचे समर्थक आहोत, भ्रष्टाचाराविरुद्ध आम्हीही लढत आहोत, आपला लढा एकच आहे अशी आम्ही अण्णांना आणि केजरीवालांना विनंती करतो" असे सारखे ध्वनिवर्धकावरून सांगत होते ते - पण इथे व्यासपीठावर बसलेले लोक काही ऐकू येत नसल्यासारखे बसले होते. ते दुसरे आंदोलनकर्ते इकडे बेदी, केजरीवाल, अण्णा बोलले तेव्हा एकदम शांत होते. पण बाकी वेळ त्यांच्या घोषणा, त्यांची भाषणे, त्यांची गाणी चालू होती. मला आंदोलनाचे वागणे काहीसे बालिश वाटले. ठीक आहे, त्या दुस-या आंदोलनाचा अजेंडा काय आहे ते माहिती नसेल, तेही आंदोलन गळ्यात घ्यायची टीम अण्णाची तयारी नसेल - हे सगळे मान्य आहे. पण आपल्यासारखच दुसरही कोणीतरी लढतं आहे, तेंव्हा निदान त्याला पाठिंबा देण्याचा मोठेपणा आंदोलनाने दाखवायला पाहिजे होता असं मला वाटलं. शेवटी कधीतरी तो भाग झाला पण माझ्या मते तोवर बराच उशीर झाला होता.

पण अशा घटनाच तर अधोरेखित करतात की हे आंदोलन माणसांनी चालवलेलं आहे, त्याला मर्यादा आहेत आणि चमत्कार काही एका रात्रीत घडणार नाही!!

6 comments:

  1. हम्म अतिशय विचार करायला लावणारी, काही नवी लोकं आणि नव्या घटनांचे कंगोरे सामोरे आणणारी आणि सगळ्यात महत्त्वाचं अतिशय संतुलित पोस्ट.....सविता, तुम्ही हे सर्व अशा नजरेने पाहू शकता म्हणून आमच्यासारख्या हे कधीच माहित न होऊ शकणार्‍या व्यक्तीना हे माहित करू होतं आणि हे लिहितानाचा तुमचा स्वतःचा साधेपणा मला खरंच खूप भावतो..तुमच्यासाठीही एकदा हॅट्स ऑफ़....:)

    ReplyDelete
  2. अपर्णा, माझ्या मते काही सामाजिक बदलाची सुरुवात कोणी करतो तेव्हा शक्यतो त्यातील सकारात्मक गोष्टी आपण पहाव्यात (आंधळा विश्वास अर्थातच ठेवू नये) - त्यांना फक्त नावं ठेवण्याआधी आपण काय करतो या प्रश्नासाठी ते विचारायला हव स्वत:ला. टीका करायला फारस काही लागत नाही - त्यात उतरायला मात्र बळ लागत. ते अण्णा, किरण बेदी, केजरीवाल आणि अन्य सहकारी दाखवत आहेत - ते महत्त्वाच!

    ReplyDelete
  3. खरं आहे, हे आंदोलन सामान्य माणसांना आपल्या वागण्या-व्यवहाराचं आत्मभान देणारं बनतंय हे फार महत्वाचं आहे.

    ReplyDelete
  4. Savita, tuza mhanna agdi vyavastit pohochla ithe... thanks

    ReplyDelete
  5. always awaiting to read your posts. Really thought provoking article.

    ReplyDelete
  6. प्रीति, हे आत्मभान किती काळ टिकत हेही महत्त्वाच आहे.

    श्रीराज, आभार.

    वैशालीजी, तुमचेही आभार.

    ReplyDelete