ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, June 21, 2013

१६९. सावली

काल संध्याकाळी मुंबईला येणा-या गाडीत बसल्यापासून सुनंदाला एकदम शांत वाटत होतं. उन्हातान्हात भटकून झाडाच्या सावलीत आल्यावर वाटावं तसंच काहीसं! थकल्याभागल्या अवस्थेत डोळे मिटून निवांत पडावं, कशाचाही विचार करू नये अशी काहीशी तिची अवस्था झाली होती. अर्थात मागे वळून पाहण्याइतकं काही तिचं आयुष्य लांबलचक नव्हतं – अवघी सतरा वर्षाची तर होती ती. हं, आता लग्न लावून द्यायचं म्हणून मामाने दडपून तिचं वय दोन वर्षांनी वाढवून सांगितलं . पण मामाच्या घरातून बाहेर पडायची लग्न ही एकच संधी होती सुनंदाला, आणि तिने ती घेतली होती. आता या सावलीत सुनीलच्या साथीने आपण एक सुंदर जग उभं करु असं स्वत:ला सांगत तिने कालची रात्र गाडीत जागून काढली होती.

काल सुनंदा तिच्या मामाच्या घरातून निघून गाडीत बसली होती ती मोठ्या अपेक्षेने, सुनीलच्या भेटीची स्वप्न रंगवत. सकाळी सूर्य उगवला की मुंबई - या तिच्या कल्पनेला धक्का बसला तो सकाळीच. पावसामुळे गाडी उशीर करत, रेंगाळत चालली होती. जी गाडी सकाळी आठला पोचायची तिला दुपारचे  दोन वाजले होते दादर गाठायला. सुनंदाकडे पैसे होते थोडेसे, पण ते खर्चायची तिला भीती वाटली होती म्हणून ती उपाशीच राहिली होती. मग अकरा-साडेकराला तिच्या सोबत असलेल्या एका अनोळखी मावशीबाईने तिला एक भाकर दिली होती खायला. दरम्यान सुनीलनेही फोन करून काळजी करू नकोस, मी येतो आहे स्टेशनवर घ्यायला’ असं सांगितलं होतं. त्याचा फोन आला तेव्हा ती एकदम दचकलीच होती. हा फोन सुनीलनेच दिलेला पाठवून. तो कसा वापरायचा ते रम्याने – तिच्या मामाच्या लहान मुलाने – तिला शिकवलं होतं. रम्याच्या आठवणीने तिच्या डोळ्यांत क्षणार्धात पाणी तरारलं.

दुपारी सुनील स्टेशनवर तिला घ्यायला आला खरा, पण तो तिला लगेच ‘घरी’ घेऊन गेला नाही. ऑफिसात तातडीची मीटिंग आहे, त्यामुळे लगेच गेलं पाहिजे – असं काहीतरी तो बोलला ते सुनंदाची नजर चुकवतच. मग त्याने सोबत आलेल्या एका माणसाची – लहानसाच दिसत होता तोही – ओळख करून दिली. हा अनिल. माझा जीवाभावाचा दोस्त. सख्ख्या भावासारखा आहे तो मला. त्याच्याबरोबर जा. काळजी करू नकोस. तो सांगेल तसं कर. सुनीलच्या या बोलण्यावर काय म्हणायचं हे सुनंदाला कळलंच नव्हतं. 

कधी याल तुम्ही मला घ्यायला परत? सुनंदाने आशेनं विचारलं सुनीलला. मला नाही माहिती या सुनीलच्या उत्तरावर ती चकित झाली होती. ती काहीतरी बोलणार हे ओळखून सुनीलने घाईने पुस्ती जोडली होती, उशीर होईल भरपूर. अनिल सांगेल ते ऐक”, असं म्हणून तो निघाला होता. दोन पावलं पुढे गेल्यावर अनिल त्याला काहीतरी म्हणाला इंग्रजीत, जे तिला नीट कळलं नव्हतं  – त्यावर सुनील परत आला होता. माझा फोन बिघडलाय. तुझा दे मला. लागला तुला; तर अनिलकडे आहेच फोन, तो वापर, असं म्हणाला. सुनंदाने मुकाट्याने त्याला मोबाईल दिला – सुनीलानेच तर दिलेला फोन होता तो, त्याला कसं नाही म्हणणार?

एकंदर सुनंदाला सुनीलचं ते सगळं वागणं खटकलं होतं खूप. पण काय करणार? ती गप्प बसली होती. विचारांत पडली होती.
******
चल, जरा समुद्रावर जाऊन येऊ; म्हणजे तुला एकदम ताजतवानं वाटेल, अनिलनं शांतपणे सुचवलं.

खरं तर सुनंदा अगदी काळजीत होती. तरी समुद्र ‘पहायच्या’ कल्पनेने ती एकदम भारावली. स्वत:ची द्विधा मनस्थिती ती विसरली. काळजीत असतानाही अनिलच्या बोलण्याने तिला एकदम आनंद झाला. अनिल आपल्याला ‘अगं-तुगं’ करतो आहे याकडेही तिने  काणाडोळा केला. सुनंदाने आजवर समुद्र पाहिला होता तो केवळ सिनेमांत आणि पुस्तकांत. सुनीलशी लग्न होताना तो मुंबईत आहे आणि समुद्राच्या गावात आहे याचं तिला अप्रूप वाटलं होतं. आता तिच्या मुंबईतल्या पहिल्याच संध्याकाळी तिला समुद्रावर घेऊन जायला सुनील नाही तरी निदान अनिल तयार होता. ही एक मस्त संधी होती; पण घ्यावी का नाही ती? जावं का नाही समुद्रावर अनिलबरोबर? सुनीलला काय वाटेल हे कळलं तर? नाराज तर नाही व्हायचा ना तो? आपल्या नाराजीचं त्याला काही सोयरसुतक नाही पण आपण मात्र नव-याच्या नाराजीची चिंता  करतोय याची सुनंदाला क्षणभर गंमत वाटली.

तशी मघापासून सुनंदा अस्वस्थ होती. नेमकं काय तिला टोचत होतं, ते तिलाही नीट कळलेलं नव्हतं – पण सगळ आलबेल नव्हतं हे मात्र तिला कळत होतं. तिचं वय लहान आणि तिला जगाचा फारसा अनुभव नव्हता हे खरं – त्यामुळे तिची अस्वस्थता तिला शब्दांत नसती मांडता आली; पण ती होती; अगदी आतून, गाभ्यातून होती. अनिल परकाच, त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नव्हता. उगीच त्याने सुनीलच्या डोक्यात काही भरवलं तर सुरुवातीलाच नको ती गुंतागुंत व्हायची. त्यापेक्षा थोडी वाट पहावी हे बरं – सुनंदा स्वत:शीच बोलत होती, स्वत:ची समजूत घालत होती.

अनिल एक सज्जन माणूस दिसत होता. त्याने तिच्या सामानाचा ताबा घेतला, तिला भूक लागली असेल हे जाणून एका हॉटेलात नेऊन भरपेट खायला घातलं. मुंबईतलं आयुष्य गावाकडल्या आयुष्यापेक्षा कसं वेगळ आहे हे आणि सुनीलला तिला असं सोडून जाणं कसं अटळ होतं हे अनिल तिला समजावून सांगत होता. अनिलने आपल्या मित्राची बाजू घ्यावी हे स्वाभाविक होतं तरी अनिल जे काही सांगत होता ते तिला काही पटलं नव्ह्तं – पण सुनीलचा राग या बिचा-या अनिलवर काढण्यात अर्थ नव्हता इतकी जाण तिला होती. 
*****
खरं तर आजचा दिवस सुनंदा आणि सुनीलसाठी खूप महत्त्वाचा होता. दोन महिन्यांपूर्वी त्याचं लग्न झालं होत – पण ते एकमेकांना भेटत होते ते आजच. त्यामुळे सुनंदाच्या मनात वेगळेच रम्य बेत होते या आजच्या भेटीचे.

सुनंदा खूप लहानपणीच तिच्या मामाच्या घरी राहायला आली. तिचे आई-वडील तिला आठवतही नाहीत. कसल्यातरी अपघातात ते दोघेही जागच्या जागी मरण पावले इतकं तिला माहिती होतं - तेही आईबापाला खावून आता आमच्या उरावर बसली आहे कार्टी हे उद्गार मामी रागावली की तिच्या तोंडून हमखास बाहेर पडत म्हणून. पण मामाच्या घरी ‘नकोशी’ असूनही निलाजरेपणाने राहण्याशिवाय सुनंदाला काही पर्याय नव्हता. तिने अभ्यास जोरात केला, दहावीच्या परीक्षेत चांगले पंचाहत्तर टक्के मार्क मिळवले –पण शिक्षणाचा पुढचा रस्ता तिच्यासाठी बंद झाला कारण मामाच्या गावात कॉलेज नव्हतं. तालुक्याच्या गावी जाऊन शिकायचं तर ‘खर्च कोण करणार? – या मामाच्या प्रश्नावर ‘तिला पुढं शिकवा’ म्हणून सांगायला आलेल्या शाळेतल्या बाईही मुकाट बसल्या होत्या.

दहावीनंतर दोन वर्ष सुनंदा घरातच होती. झाडझूड, धुणीभांडी, स्वैपाकपाणी आणि घरातली पडतील ती कामं करण्यात तिचा वेळ ती घालवत होती. तिला आधार होता तो रमेश आणि मीना या मामाच्या मुलांचा. त्या दोघांचाही तिच्यावर जीव होता. मामीही करवादत असली तरी खायला प्यायला तसं कमी नव्हतं – पोटापुरत मिळत होत, अंगावर कपडे होते, झोपायला छप्पर  – आणखी काय पाहिजे? मामाच्या मोजक्या पगारावर चालणा-या  घरात आपला खर्च मामीचे सगळी हौस-मौज मारून टाकतो याची सुनंदाला जाणीव होती. म्हणून मामीवर तसा राग नव्हता तिचा. घरात टीव्हीही होता – त्यामुळे करमणूक व्हायची दोन-चार घटका. आयुष्य असंच चालत राहणार का ? – असा एक प्रश्न सुनंदाला कधीतरी पडत असे – पण तोही ती लगेचच विसरून जात असे.

म्हणून जेव्हा मामाने लग्नाचा प्रस्ताव मांडला – प्रस्ताव कसला म्हणा, हुकूमच होता तो – तेव्हा तिला लग्नाच्या आनंदापेक्षा ‘या घरातून सुटका होणार’ याचा जास्त आनंद झाला होता. ‘लग्नाच्या वयाच्या कायद्याचा’ तिने नुसता उच्चार करताच मामाने ज्या नजरेने तिच्याकडे पाहिलं होतं, त्यावर ती गप्प झाली होती. नाहीतरी एक दिवस इथून जायचं आहेच – आज काय आणि उद्या काय – काय फरक पडणार?  - असा विचार करून सुनंदा गप्प बसली. जगायची एक नवी संधी देणारी ‘लग्न’ ही एक किल्ली होती सुनंदासाठी. शिवाय होणारा नवरा मुंबईत राहतो या बातमीचं अप्रूप वाटलं होत तिला. मुंबई मोठी आहे, राजधानी आहे हे तिला माहिती होतचं. पण मुंबईतल्या मुलाशी लग्न केल्यामुळे समुद्र पहायला मिळेल यामुळेही ती खूष होती एकदम.

मामाने ‘सामुदायिक विवाह सोहळ्यात’ तिच लग्न उरकायचं ठरवलं त्याचं तिला फार काही आश्चर्य वाटलं नाही. गावातले एक राजकीय पुढारी दरवर्षी हा सोहळा आयोजित करत आणि तिच्यासारख्या गरीब मुला-मुलींची लग्न त्यात लावली जात हेही तिला माहिती होतं. आपल्या नशीबात लग्नाचा वेगळा मांडव नाही; हौस मौज नाही हे तिने समजून घेतलं होतं. तिला जेव्हा बोलताबोलता मामीकडून समजलं की सुनील – तिचा भावी नवरा – अनाथ आहे, त्याचे आई-वडील त्याच्या लहानपणीच गेले आहेत – तेव्हा सुनंदाला आनंदच झाला होता. आपला नवरा आपल्यासारखा अनाथ आहे म्हणजे आपण एकमेकांना जास्त समजून घेऊ शकू असं तिला वाटलं होतं. एकाच परिस्थितीतून गेलेले आणि एकमेकांशिवाय दुसरं कोणी नसणारे असे आपण दोघं – आपला संसार चांगला होईल अशी तिला मग सुनीलला प्रत्यक्ष पाहण्यापूर्वी जणू खात्री वाटली होती.

पण आज मात्र काहीतरी विचित्र घडत होतं. लग्नानंतर दोन महिन्यांनी आणि तेही पहिल्यांदाच भेटलेला तिचा नवरा तिला स्वत:च्या घरी न नेता त्याच्या मित्राच्या हाती सोपवून गेला होता – काही फारसं न बोलताच. सुनंदाला त्यामुळे एक प्रकारची भीती वाटायला लागली होती.
*****
पण अनिलबद्दल तक्रार करायला सुनंदाला काही जागा नव्हती. दुपारपासून अनिलने तिची व्यवस्थित काळजी घेतली होती. त्याला लोकांना बोलतं कसं करायचं ते चांगलं माहिती होतं असं दिसतं. त्याने सुनंदाचं बोलणं लक्ष देऊन ऐकलं होतं आणि त्यावर त्याने जी संवेदनशीलता दाखवली होती त्याचं सुनंदाला आश्चर्य वाटलं होतं. आपल्या नव-याचा मित्र इतका चांगला आहे म्हणजे सुनील पण तितकाच चांगला असणार अशी खूणगाठ तिच्या मनाने तिच्याही नकळत बांधून घेतली होती त्या तीन-चार तासांत.

पण तरीही अनिल काही तिच्या ओळखीचा नव्हता, त्यामुळे तिला तितकंस मोकळं वाटत नव्हतं. एक दोनदा तिने अनिलला आठवण केली ‘सुनीलला फोन करून विचारा ना कधी येणार ते’. पण त्यावर अनिल शांतपणे हसून दर वेळी ‘मीटिंगमध्ये फोन घ्यायला परवानगी नसते’ असं म्हणाला होता. फोनची गरजच नव्हती तर सुनील तिचा फोन का घेऊन गेला हे एक कोडं वाटायला लागलं होतं सुनंदाला.

काय करावं हे सुनंदाला सुचत नव्हतं. तिला असं एकटीला सोडून गेल्याबद्दल तिला सुनीलचा रागही येत होता आणि रडूही येत होतं. डोळ्यातलं पाणी अनिलला दिसू नये अशी ती खटपट करत होती. जे झालं त्यात अनिलचा काही दोष नव्हता, तो बिचारा तिची मदत करत होता मघापासून. उगीच त्याला दुखावण्यात अर्थ नव्हता.

सुनंदाला लक्षात आलं की या अफाट महानगरात सुनीलशिवाय ती कुणालाच ओळखत नाही. आणि सुनीलची ओळख म्हणजे तरी काय? तर इतर नव्व्याणव जोडप्यांबरोबर त्या गर्दीत स्टेजवरून कवायतीसारख्या दिलेल्या सूचनांवर एकमेकांना घातलेले हार आणि एकत्र केलेलं जेवण. सुनील त्या रात्रीच मुंबईला निघून गेला होता – तेही ठीकच म्हणा. नाहीतरी मामाच्या घरात कुठ राहणार होते ते दोघं ? त्यानंतर फक्त सुनीलने पाठवून दिलेल्या मोबाईलवर आठवड्यातून एकदा बोलणं  – तेही जेमतेम चार पाच मिनिटांच.

सुनंदाच्या जवळ पैसेही नव्हते फारसे. अर्थात तिच्याकडे फोन नंबरही नाही म्हणा कुणाचा. मामाच्या शेजा-यांकडे आहे मोबाईल तो नंबर रमेशने – मामाच्या मुलाने - तिच्या मोबाईलमध्ये घालून दिला होता तिला. ‘आम्हाला फोन कर आणि मुंबईच्या गमतीजमती सांग”’ असा आदेश दिला होता तिला रमेश आणि मीनाने. येऊन –जाऊन फोन करायचा तो मामाच्या घरी – आणि काय सांगायचं? माझा नवरा मला अजून घरी घेऊन गेला नाहीये आणि मी त्याच्या मित्राबरोबर समुद्रावर आहे हे सांगायचं? आणि समजा असते पैसे खूप तरी काय करणार होती ती? सुनीलची तो येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. “सुनील आलाच नाही परत तर?” अशी एक शंका तिच्या मनात मधूनच डोकं काढते आहे मघापासून. पण तिला माहिती आहे की मामाकडे परत जाण्यातही अर्थ नाही. पैसे नाहीत तितके हे तर खरंच – पण तिकड जाऊन ती काय करणार? त्या घरात तिची जागा होती ती नाईलाज म्हणून. आता ती जागा तिची नाही – ती तिथं परत जाऊ शकत नाही.

आत्ता या क्षणी तिला फक्त एकाच माणसाचाच आधार आहे – तो अनिलचा.म्हणून समुद्रावर जाण्याची अनिलची कल्पना तिने काहीशा नाईलाजाने पण ब-याचशा उत्सुकतेने उचलून धरली.
******
आणि अनिलच्या बोलण्याला आपण नकार दिला नाही याचा तिला आनंदच झाला.

समुद्र! तिचे डोळे जिथवर पोचत होते तिथवर पाणीच पाणी होतं! कितीतरी पाणी! शेंदरी रंगाचा सूर्य त्या पाण्यात बुडायला निघाला होता. तापलेल्या सूर्याच्या स्पर्शाने पाणी गरम होत असेल का – असा एक बालिश विचार तिच्या मनात आला. थोडा हात लांब करून त्या थंड होणा-या सूर्याचं अंग कसं थंड होत जातं हे पाहावं असं तिला मनापासून वाटलं. आणि तिचं तिलाच हसायला आलं. सूर्य काही पाण्यात बुडत नाही खराखुरा, तसं फक्त दिसतं हे तिला माहिती होतं!

समुद्राच्या फेसाळत येणा-या लाटांना एक नाद होता. लक्ष देऊन पाहिलं की दिसत होतं की एका लाटेवर दुसरी लाट आदळतेय – एक क्षणही न विसावता. एक अखंड प्रवास जणू चालू आहे त्या लाटांचा. एक लाट दुसरीशी बोलते आहे, त्या एकमेकीना निरोप सांगताहेत असं वाटून हसू आलं तिला. निरोप  सांगण्याजोगं आहेच काय यांच्याकडे? या तर किनारा सोडून जाउच शकत नाहीत. यांना जन्म नाही आणि यांना मरणही नाही. त्या लाटांकडे पाहताना सुनंदाला उगीचच आपल्या चेहरेही न आठवणा-या आई-वडिलांची आठवण आली.

समुद्राचा वास मात्र तिला आवडला नाही. वारा वहात होता पण कसला तरी विचित्र वास होता तो. तिला समुद्रात जायला रोखून धरणारा वास होता तो.

किना-यावर गर्दी होती. लहान मुलांच्याच उत्साहाने मोठी माणसं पण पाण्यात खेळत होती. पाण्यात काहींची मस्ती चालू होती तर काहीजण अतिशय विचारमग्न होऊन लाटांकडे पहात होते. क्षणभर सुनंदा तिची सगळी काळजी विसरून गेली. लहान मुलाच्या उत्साहाने तिनेही पाण्याकडे धाव घेतली. पण पाण्याच्या जवळ आल्यावर तिच्या मनातल्या भीतीने एकदम उसळी घेतली. जर ती पाण्यात बुडाली तर?

तिची भीती तिचा चेहरा दिसत नसतानाही, तिच्या मागे उभे असूनही अनिलला कळली बहुधा.
जायचं आहे पाण्यात? काळजी करू नकोस. मी आहे ना. फक्त माझा हात पकड आणि चल... आपण जाऊ पाण्यात बरोबर, अनिल म्हणाला.

सुनंदाला हे ऐकून धक्का बसतो. ती एक विवाहित स्त्री आहे, त्याच्या मित्राची पत्नी आहे, त्यांच्या ओळखीला तीन –चार तास झाले असतील जेमतेम – अशा वेळी अनिलसारख्या अनोळखी  पुरुषाचा हात कसा धरेल ती हातात? तिने मान हलवून नकार दिला पण तिला अनिलच्या या बोलण्याने उगाचच अपराधी मात्र वाटायला लागलं. त्याकडे दुर्लक्ष करत ती तशीच पुढे निघाली.

उफाळत येणा-या लाटेत पाय घालता घालता सुनंदा एकदम थबकली. तिला जाणवलं की पुढे समुद्र तिला गिळायला तयार आहे .. आणि मागे वळायला जागा नाही कारण मागेही एक राक्षस उभा आहे. आपण एका सापळ्यात अडकलो आहोत हे तिला आतून उमगलं.

तिने मागे वळून अनिलकडे पाहिलं.
********
मी एक प्रश्न विचारू तुम्हाला? तिने अगदी शांतपणे अनिलला विचारलं.

हो, विचार की, अनिल हसत म्हणाला. त्या हसण्यात काय दडलं होतं?

सुनील, माझा नवरा - परत येणार आहे का मला घ्यायला? तिने विचारलं. तिला आशा होती की या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी यावं.

हुशार आहेस अनिलचं हसू आता रुंदावलं, त्याचे डोळे चमकले. सुनंदाच्या हृदयाचा ठोका चुकला. तिने एक पाउल मागे घेतलं. इकडेतिकडे पाहिल्यावर तिला त्या समुद्राच्या किना-यावर अनेक लोक दिसले. काही खेळत होते, काही पळत होते, काही हसत होते, काही बोलत होते, कोणी वाळूत किल्ले बांधत होते, कोणी आईस्क्रीम खात होते  ....हाक मारावी का त्यांना? देतील का ते लक्ष तिच्याकडे? मदत मागावी का त्यांना? पण ती काय सांगणार त्यांना? तिच्यावर कोण विश्वास ठेवणार? तिला त्यांची भाषा तरी बोलता येणार का?

शिवाय तिने अशी एकदम हाक मारली अनोळखी लोकांना तर अनिलला काय वाटेल? त्याची काय प्रतिक्रिया होईल? सुनीलचा तर काही ठावठिकाणाही माहिती नाही तिला – मग त्याच्याबद्दल काय सांगणार या लोकांना? अनिलबद्दल काय? ती काय तक्रार करणार होती त्याच्याबद्दल? तो तर तिच्याशी नीट वागला होता - आत्ताचं हे विचित्र हसू सोडलं तर. त्याच्या हसण्याबद्दल तक्रार शब्दांत नेमकी कशी करणार? शिवाय हे सगळे लोक अनिलच्या ओळखीचे निघाले तर ती काय करणार? लोकांकडून पोलिसांचा पत्ता घेता येईल. पण पोलिसांना तरी काय सांगणार? आणि त्यांनी तिलाच उचलून तुरुंगात टाकलं तर? सुनंदाला जोरात रडावं, ओरडावं असं वाटतं. पण ती गप्प बसते  परिस्थितीच्या या पिंज-यातून आता सुटका नाही याची तिला जाणीव झाली आहे तोवर.

काय विचारात पडलीस एवढी? दमलीस का? चल, मग आता घरी जाऊ आपण. अनिल त्याच शांतपणाने बोलत होता.

घरी? सुनंदाने अविश्वासाने विचारलं. तिच्या मनातल्या आशेने परत उचल खाल्ली.

हो, पण तुझ्या नव-याच्या घरी नाही, तर माझ्या घरी. अनिल पुन्हा हसत हसत म्हणाला.

या वाक्याने सुनंदाच्या मनात पुन्हा वादळ निर्माण झालं. आपल्यावर एवढ संकट आलं असताना हा माणूस हसतो कसा आहे – असा विचार तिच्या मनात आला.

तुमच्या घरी? सुनंदाने काहीतरी बोलायचं म्हणून विचारलं.

आता तुझा तो नवरा तुला माझ्यावर सोपवून पळून गेला, म्हणून मी पण पळून जाऊ काय? जबाबदार माणूस आहे मी. तुझं आत्ता या क्षणी या मुंबईत माझ्याविना कुणीही नाही हे मला माहिती आहे. ... अनिलच्या बोलण्याचा काय अर्थ लावावा हे सुनंदाला कळेना – तिची मती गुंग झाली होती. जे काही चाललंय बोलणं, त्यातून आपलं भवितव्य फक्त अंधारमय आहे हे तिला कळून चुकलं. पण तरीही हा माणूस घरी न्यायचं म्हणतोय म्हणजे कदाचित भलं होणार असेल अजूनही. आशेचा एखादा किरण असेल का त्यात?

घरी कोणकोण असतं तुमच्या? घरातले लोक रागावणार नाहीत का माझ्यासारख्या अनोळखी बाईला असं थेट घरी आणण्याने?सुनंदाच्या स्वरांत परत एकदा शंका आणि कुतूहल याचं मिश्रण होतं.

एका बाजूने तिला अनिलचा प्रचंड राग आला होता. सुनील आपल्याला घ्यायला परत येणार नाही हे या माणसाला आधीपासून माहिती – पण तरी त्याने ते सांगितलं नाही याचा तिला राग आला होता. अर्थात त्याने ते तिला सांगितलं असतं तरी तिने काय केलं असतं हा एक मोठा प्रश्नच होता म्हणा. दुस-या बाजूने तिला अनिलबद्दल कृतज्ञताही वाटत होती – त्याने तिला खायला घातलं; तिची विचारपूस केली होती; तिची पिशवी मघापासून सांभाळली होती; तिचं ऐकून घेतलं; तिला समुद्र दाखवला होता .... या माणसावर कसं रागावणार होती ती? आणि तो सोडून तिला कोण  इथं? थोड त्याच्या मर्जीने गेलं; तर काहीतरी वाट शोधता येईलही निदान. आत्ता अनिलला दुखावून आणि गमावून तिला चालणार नव्हतं.

छे! रागावतात कसल्या त्या सगळ्याजणी? तू काय बाई आहेस थोडीच, तू तर लहान मुलगी आहेस. माझी मावशी तर तुला पाहून एकदम खुश होईल. काळजी करू नकोस. तुला व्यवस्थित खायला-प्यायला मिळेल, चांगले कपडे मिळतील; राहायला जागा मिळेल ...हं, तुला थोड काम करावं लागेल. मुंबईत महागाई फार आहे. माझी मावशी मनाने चांगली आहे पण पैसे लागतात ना सगळया गोष्टींना!! अनिल समंजसपणे बोलतो आहे.

काय काम करावं लागेल मला? जमेल ना मला ते?सुनंदाचा ताण थोडा हलका होतो आहे या संवादाने.

अगं, विशेष काही नाही. शिकशील तू. लहान आहेस अजून पण सगळ्या मुलींना जमेल असं सोप काम आहे. माझ्या बहिणी आहेत त्या शिकवतील तुला ते.... अनिल हे बोलताना स्वत:शीच पुन्हा एकदा हसतो आणि ते पाहून सुनंदा चरकते.

सुनीलला विसरून जा, त्याला शोधायचा प्रयत्न करू नकोस, त्यातच तुझं भलं आहे. आणि तुला सुनीलपेक्षा कितीतरी चांगले पुरुष भेटतील, एक नाही, अनेक भेटतील; ते तुझ्यावर जीव ओवाळून टाकतील. तुझं आयुष्य एकदम चैनीत जाईल. हं, तुला मामाच्या घरी जाता येणार नाही. पण नाहीतरी तिथं कोण तुझी वाट पहात बसलं आहे?  ... अनिल बोलतोच आहे आणि सुनंदाला तिच्या ‘कामाचं’ स्वरूप त्यातून कळतं आहे.

किना-यावरून नाहीशा होत जाणा-या लोकांच्या सावल्यांकडे सुनंदा निराशेने पाहते. ‘लग्न झाल्यावर स्त्रीने नव-याची सावली होऊन राहिलं पाहिजे ..’ हे कुठल्यातरी सिनेमातलं वाक्य तिला आठवलं. पण नव-याला ती नकोशी आहे तर त्याची सावली होण्याला काय अर्थ राहिला? तो जसा गायब झाला तसंच तिनेही नाहीसं व्ह्यायला पाहिजे आता!!

इतका सारा प्रवास करून हाती काय आलं? तर आयुष्यातल्या एका अंधा-या खोलीतून फक्त दुस-या   अंधा-या खोलीत प्रवेश. पाहिलीतून बाहेर पडायची वाट पहात अनेक वर्ष गेली .. आता इथं किती जाणार? भूतकाळ निराशाजनक होता .. भविष्यकाळही तसाच दिसतो आहे. त्या अंधारात सावली कधीच पडणार नाही, दिसणार नाही इतका गर्द अंधार. हा सूर्य, हा समुद्र, ही हवा, लाटांचा हा आवाज .... हे फक्त या क्षणापुरतं... एकदा इथून पाउल मागे फिरलं की हे सगळ संपणार. पुन्हा आयुष्यात ते कधीच येणार नाही.

सुनंदापुढे दोनच पर्याय आहेत.
एकतर शरीरविक्रीच्या या अंधारात बुडून जायचं.
दुसरं .. सूर्याची सावली होत त्याच्या पावलावर पाउल ठेवायचं ...एका दिवसासारखं हे एक आयुष्य विनातक्रार संपवून टाकायचं ...

सावली नाहीशी झाली की सगळे प्रश्न संपतील.
कायमचे. 
**

6 comments:

  1. Savita, vishay/waytha navin nahi pan Sunandache manovaypar chan utarlae aahet.

    ReplyDelete
  2. मुलीच्या मनाची स्पंदनं उत्तम टिपली आहेत पण का कुणास ठाऊक ह्या कथेवर जरा उदास छाया जाणवली, तुझ्या नेहमीच्या शैलीच्या विपरीत :). अर्थातच लेखन म्हणून आवडलं आहेच!

    ReplyDelete
  3. मुलीच्या मनाची स्पंदनं उत्तम टिपली आहेत पण का कुणास ठाऊक ह्या कथेवर जरा उदास छाया जाणवली, तुझ्या नेहमीच्या शैलीच्या विपरीत :). अर्थातच लेखन म्हणून आवडलं आहेच!

    ReplyDelete
  4. सुरवातीलाच जाणवलं पुढे काय होणार ते…काय बोलणार ?
    तू कथा चांगलीच उतरवली आहेस.

    ReplyDelete
  5. asha goshti ghadu hi nayet ani kuni tya lihu hi nayet ase mazya manala kayam vatat rahate...pan tya ghadtat hi ani tyamule lihilya hi jatat... nakoshya vattat asha goshti vachayla... pan tya na vachne mhanje vastavapasun palvaat kadhnya sarkhe ahe...

    tu gosht uttam lihili ahes, savita! agdi khari ani
    mhanun katu hi.

    ReplyDelete
  6. hi gosht ahe thistimetattime warahi.... wachliye mi....
    tevahi ashich aswasth gosht watali hoti....
    aswasth pan khari!

    ReplyDelete