ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, January 3, 2014

१८४. सावित्रीच्या लेकी ....

३ जानेवारी. सावित्रीबाई फुले यांची जयंती.

“फुले वाड्यापासून दुचाकी फेरी आहे सकाळी. जाणारेस का?” एका ज्येष्ठ कार्यकर्तीशी फोनवर बोलताना त्यांनी विचारलं.

दोन अडचणी होत्या यात.

एक तर काय मोर्चे, फे-या काढायच्या आहेत त्या चालत काढाव्यात – असं माझं मत असल्याने मी असल्या इंधन जाळणा-या फे-यांत कधीच सहभागी होत नाही.
दुसरं म्हणजे आयोजक संस्था होती: ‘राष्ट्र सेवा दल’. या संस्थेची माहिती असली तरी माझा थेट संबंध कधी आला नव्हता.

पण भोवतालचे सगळे विचार पूर्वग्रह न ठेवता जाणून घ्यायचे आणि जे जे चांगलं वाटतं त्यात ‘डाव्या की उजव्या विचारसरणी’चं आहे याची चिकित्सा न करता सामील व्हायचं असं माझं गेली अनेक वर्ष धोरण आहे. तसंही उजव्या वर्तुळात मला ‘डावी’ समजतात आणि डाव्या वर्तुळात ‘उजवी’ समजतात. हे मी पुरेशी मध्यममार्गी असल्याचं द्योतक आहे अशी मी सोयीस्कर समजूत करून घेतली आहे स्वत:ची.

मुख्य म्हणजे यावेळी नाव सावित्रीबाईचं होतं – जे माझ्यासाठी वादातीत आहे.

कधी नव्हे ती मी  ३ जानेवारीला पुण्यात होते, शिवाय त्या निमित्ताने फुले वाड्यात जाणं होईल असं एक आकर्षण मनात होतं. नुकत्याच ओळखी झालेल्या काही मैत्रिणी तिथं भेटायची शक्यता होती.

‘एक अनुभव घेऊन पाहावा’ म्हणून जायचं ठरलं. मग पहिला शोध ‘फुले वाड्यात कसं पोचायचं’ तो घेतला. तीन सुहृदांनी तीन वेगळे मार्ग सांगितले आणि गुगल नकाशाने चौथा रस्ता दाखवला. वाटेत जिथं रस्त्याबाबत मनात शंका येईल, तिथं थांबून लोकांना विचारायचं ही नेहेमीची पद्धत अवलंबली. चहा-नाश्त्याची एक गाडी, एक सायकलस्वार, एक रिक्षावाला आणि शाळेत जाणारी एक मुलगी – इतक्या लोकांना विचारत मी गेले आणि थेट वाड्यात पोचले. त्यांच्यातलं कुणीही ‘कोण फुले, कुठला वाडा’ असं विचारलं नाही, सगळ्यांना ‘फुले वाडा’ माहिती होता; हे खूप बरं वाटलं.  ‘कच-याची पेटी दिसली की त्या बोळात वळा’ ही एकाने सांगितलेली खूण अचूक निघाली आणि त्याचा विषादही वाटला.

एका गावात किती गावं असतातं, एका जगात किती जगं असतात - याचं पुन्हा एकदा दर्शन झालं. रस्ता, तिथली घरं, सार्वजनिक नळावर कपडे धुणा-या स्त्रिया, अंगणात चुलीवर तापवलं जाणारं पाणी – असं वाटलं की काळ या वस्तीसाठी पुढे सरकलाच नाहीये.


वाड्याचं पाहिलं दर्शन लोभस होतं.



मी आधी इथं कधी आले होते ते मला आठवत नव्हतं इतकी ऐतिहासिक गोष्ट आहे ती. आज समारंभाचं वातावरण होतं. सनईचे सूर मन प्रसन्न करून गेले. मस्त रांगोळी होती. वाडा आत शिरून बघता आला नाही. अनेक स्त्रिया आणि मुलींचे गट तिथं येत होते, सावित्रीबाई आणि जोतिबांना अभिवादन करत होते. लहान मुली ‘सावित्री’च्या  वेषात पाहून आधी गंमत वाटली – नंतर, अशा अनेक मुली पाहिल्यांनातर  मात्र ही एक ‘फॅन्सी ड्रेस’ स्पर्धा आहे की काय अशी शंका आली.



दुचाकी यात्रेचा अनुभव पुण्यातल्या (किंवा खरं तर कोणत्याही शहरातल्या) ‘ट्रॅफिक जाम’च्या अनुभवासारखा होता – म्हणजे दुचाकी अत्यंत सावकाश चालवावी लागत होती. पोलिसांचं सहकार्य चांगलं होतं आणि मुख्य म्हणजे सकाळची वेळ असल्याने वाहनंही तुलनेत कमीच होती रस्त्यावर. जाता जाता अखंड घोषणाही होत्या. ‘सावित्रीच्या लेकी आम्ही, आता मागे राहणार नाही’; ‘आवाज कुणाचा, सावित्रीच्या लेकींचा’ यासारख्या नव्या घोषणांच्या (माझ्यासाठी नव्या) सोबत  ‘हम सब एक है’ ‘बघताय काय, सामील व्हा’ या युगचिरंतन घोषणाही होत्या. एका अर्थाने सामाजिक चळवळी आणि राजकीय चळवळी यांच्यात भाषेची बरीच देवाणघेवाण झाली आहे हे या निमित्ताने लक्षात आलं.

पुण्यात सकाळी दहाच्या आत दुकानं उघडत नाहीत – हे सत्य आज पुन्हा एकदा लक्षात आलं. रस्त्यावर फारसे लोक नसल्याने जनजागरणाचा हेतू कितपत साध्य झाला हे मला सांगता येणार नाही. पण एक दोन चौकात स्थानिक लोकांनी आमचं स्वागत केलं – आमच्यावर फुलं उधळून; एका ठिकाणी मुलींच्या लेझीम पथकाचा जोष होता स्वागताला  – तेव्हा सगळं काही अगदीच वाया गेलं नसणार हे नक्की.

अचानक आम्हाला ‘गाड्या रस्त्यावर लावा आणि इकडे या’ असा आदेश मिळाला. तो होता ‘भिडे वाडा’ – जिथे फुले दाम्पत्याने पहिली शाळा चालवली.


हा एक संघर्ष असतोच नेहमी – जुनं काय टिकवायचं, काय काळाच्या ओघात नामशेष होऊ द्यायचं. इमारत टिकवायची का नाही या मुद्द्यावर स्थानिक लोकांची मतं बाहेरच्या लोकांपेक्षा वेगळी असतात हे दिल्लीत अनेकदा अनुभवलं  आहे. इथल्या स्थानिक लोकांचं काय मत आहे ते मला माहिती नाही – एकदा गेलं पाहिजे त्या परिसरात आणि लोकांशी गप्पा मारायला पाहिजेत अशी मी मनाशी खूणगाठ बांधून ठेवली.

मग आम्ही गेलो ते थेट पुणे विद्यापीठात. या विद्यापिठाला ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ’ असं नाव देण्याला मान्यता मिळाली आहे – पण अजून ते दिलं गेलं नाही. आदर्श भूमिका घ्यायची तर व्यक्तींची नावं विद्यापीठांना देऊ नयेत असं मी म्हणेन. पण एकदा ‘जवाहरलाल नेहरु विद्यापीठ’ असं नाव एका विद्यापीठाला दिल्यावर हा आदर्श पर्याय राहत नाही आपल्याला. मग काही ठराविक नावं पुन्हा पुन्हा देशात सगळीकडं दिसत राहणार आणि काही नावं आली की मात्र लोक ‘पण नामांतर करून विद्यापीठाचा दर्जा सुधारणार आहे का’ असे प्रश्न विचारतात याचा खेद होतो. नामांतर हा एक संवेदनशील विषय आहे; त्याची हाताळणी सरधोपट पद्धतीने करून आपण विषय अधिक अवघड कसा बनवून घेतो – हे या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आलंय.

पुणे विद्यापीठातही मी ब-याच वर्षांनी गेले. मला तरी विद्यापीठ परिसर बराच उजाड आणि म्हणून उदास वाटला (अर्थात हे माझं वय झाल्याचं लक्षण – बाकी काही नाही!) तिथं गाड्या लावून सगळे जमलो तेव्हा मला एका गोष्टीचा सुखद धक्का बसला. तो म्हणजे ‘तरुणाई’ची उपस्थिती. इतका वेळ गाडी चालवत असल्याने (समोर पाहून!) सोबत नेमके कोण लोक आहेत याचा अंदाज नव्हता. पण अनेक तरुण मुलं-मुली सोबत आहेत, त्यांना सावित्रीबाईंच्या कार्यांचं महत्त्व माहिती आहे हे पाहून बरं वाटलं. समाजात प्रश्न नेहमीच राहतील; जुने संपले तर नवीन उभे राहतील – पण जोवर नवी पिढी परिवर्तनाच्या कामात सहभागी होते आहे (आणि ती अनेक ठिकाणी होते आहे) तोवर फार चिंता करायचं कारण नाही.

आम्ही परत निघालो आणि आम्हाला विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर थांबायला सागितलं. दोन मिनिटांत तीनचार मुलं-मुली प्रवेशद्वारावर चढली आणि तिथं त्यांनी कापडी फलक झळकावला.


त्यांच्या दृष्टीने विद्यापिठाचं नामांतर आज झालंय. त्याचा आनंद तिथल्या जमलेल्या सगळ्यांच्या चेह-यांवर स्पष्ट दिसत होता.

त्या ठिकाणी वाहनांची गर्दी झाली, पोलीस आले. आता काही अपप्रकार तर होणार नाही ना अशी एक शंका मनात आली. पण पोलिसांनी परिस्थिती चांगली हाताळली. प्रवेशद्वारात अडकलेल्या नागरिकांनीही संयम दाखवला त्यामुळे वातावरणात ताण निर्माण झाला नाही.

आम्ही परत आलो ते ‘साने गुरुजी स्मारका’ वर. इथं सेवा दलाच्या काही कार्यकर्त्यांशी ओळख झाली, गप्पा झाल्या. मग पुढचा दिवसभराचा कार्यक्रम चालू झाला पण मी तिथून निघाले.

काय ठरवून?

एक तर फुले वाड्याला सवडीने भेट दिली पाहिजे. आता कुणी ‘पुण्यात काय आहे पाहायला’ विचारलं तर हा वाडा पाहायला सागितलं पाहिजे.

दुसरं म्हणजे जोतीबांची ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतक-याचा आसूड’ ही दोन पुस्तकं केव्हापासून वाचायची पडली आहेत – ती लगेच वाचायला घेतली पाहिजेत.

तिसरं म्हणजे ‘राईट टू एजुकेशन’ चा थोडा अधिक अभ्यास केला पाहिजे.

चौथं – दुर्गम भागातल्या किमान एका तरी मुलीच्या शिक्षणाची आर्थिक जबाबदारी घेतली पाहिजे.

पाच – सोमवारी ६ जानेवारीला सुषमा देशपांडे यांचा ‘व्हय मी सावित्रीबाई’ हा प्रयोग एसएम जोशी फौंडेशनला संध्याकाळी साडेसहा वाजता आहे; हे ओळखीच्या सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे.

पुन्हा मी कधी अशा ‘दुचाकी फेरीत’ सामील होईन अशी शक्यता कमीच आहे. पण आज मी गेले ते चांगलं झालं इतकं नक्की. ‘सावित्रीच्या लेकी’ स्वत:ला म्हणवून घेण्यासाठी अजून बरंच काही करायला हवंय आम्ही आपण सगळ्यांनी!

18 comments:

  1. खूप सकारात्मक. वाचून बरं वाटलं. :)

    ReplyDelete
  2. आजच्या दुचाकीफेरीविषयी वाचलं होतं, जाणं शक्य नाहीये माहित असतानाही, जावं का आपण असा विचार करून झाला काल. त्याचा वृत्तांत बघून छान वाटलं! :)

    मला बघायचाय फुले वाडा!

    ReplyDelete
    Replies
    1. गौरी, कधी जाऊया? मलाही 'फुले वाडा' आतून पाहायचा आहे :-)

      Delete
    2. वाडा उघडा असण्याची काही वेळ आहे का?

      Delete
    3. १०.०० ते ५.०० – सरकारी सुट्टीच्या दिवशी बंद.

      Delete
  3. फेसबुकवर सुनीती सुलभा रघुनाथ यांनी थोडक्यात सांगितलेला पुढचा वृत्तांत - अन्य वाचकांच्या माहितीसाठी.

    Suniti Sulbha Raghunath खूपच छान शब्दचित्र!
    पुढे काय झालं ते थोडक्यात सांगते.
    सेवादलाचं सभागृह विशेषत: तरुण मुलींनी फुलून गेलं होतं. कार्यकर्त्यांची उत्साही धावपळ चालू होती. राही भिडे, सुहिता थत्ते, आबिदा इनामदार वगैरेंच्या आटोपशीर भाषणांनंतर एका पुरुष कार्यकर्त्याने 'पहिली माझी ओवी गं सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला -' हे वसुधा सरदारने लिहिलेलं गीत म्हटलं. (हे संपूर्ण गीतच फार सुंदर आहे.) त्यानंतर झालेला 'सावित्रीच्या लेकीं'चा सत्कार अतिशय हृद्य होता. त्यामध्ये वाळू माफियांना धूळ (नव्हे, वाळूच) चारणाऱ्या सोलापूरच्या तहसिलदार शिल्पा ठाकडे होत्या तशाच पोकलेनसारख्या प्रचंड यंत्रसामुग्रीची दुरुस्ती करणाऱ्या लीलाताई फडके होत्या. नवऱ्याच्या आजारावर उपचार करता यावेत म्हणून ३ किलोमीटर्सची मॅरेथॉन अनवाणी पावलांनी पळून जिंकणाऱ्या ६५ वर्षांच्या लताताई करे होत्या तशाच आपल्या मतिमंद मुलीच्या अपंगत्वाचं दु:ख कुरवाळत न बसता आणि निराशही न होता तिच्या आणि कुटुंबाच्याच जीवनात आनंद पेरणाऱ्या सुजाता लोहकरेही होत्या. त्यामध्ये कागद-काच-पत्रा कष्टकरी संघटनेच्या, श्रमांचा अभिमान बाळगणाऱ्या आणि संघटनेचं बळ जाणणाऱ्या कष्टकरी बाया होत्या तशाच लवासाच्या विरोधात कंबर कसून आपली जमीन, आपली गावं, आपला परिसर वाचवण्यासाठी लढणाऱ्या लीलाबाई मरगळेही होत्या. जातपंचायतीच्या जिवे मारण्याच्या धमकीला न घाबरता तिच्या गैरप्रकारांच्या विरोधात उभी राहणारी दुर्गा देखील त्यामध्ये होती.
    या १७-१८ जणींचा सत्कार आणि त्यानंतर आयबीएन लोकमतच्या दीप्ती राऊतने या साऱ्याजणींची घेतलेली मुलाखत हा या कार्यक्रमाचा कळसाध्याय होता. यापैकी कुणाच्याच बोलण्यात अभिनिवेश नव्हता, ना कुठलीही कृत्रिमता! सगळ्यांचंच बोलणं अस्सल, अनघड, सहज. मनाच्या तळातून आलेलं. ते या मनीचं त्या मनीला कळत होतं हे सभागृहातून उत्स्फूर्तपणे उठणाऱ्या टाळ्यांतून आणि काही वेळा सर्वांनी उभे राहून दिलेल्या मानवंदनेतून व्यक्त झालं.
    या साऱ्याजणींच्या आयुष्यांना आणि त्यांनी सार्थ केलेल्या 'सावित्रीच्या लेकपणाला' सलाम!

    ReplyDelete
    Replies
    1. सुनीतिताई, या माहितीबद्दल विशेष आभार.

      Delete
  4. >>तसंही उजव्या वर्तुळात मला ‘डावी’ समजतात आणि डाव्या वर्तुळात ‘उजवी’ समजतात.
    :) :) :)

    छान माहिती.

    ReplyDelete
  5. सगळ्यांना फुले वाडा आणि फुले माहित होते हे फारच बरे झाले ..............आजून बरंच करायला हवे आहे हे मात्र नक्की ...............

    तसंही उजव्या वर्तुळात मला ‘डावी’ समजतात आणि डाव्या वर्तुळात ‘उजवी’ समजतात. हे मी पुरेशी मध्यममार्गी असल्याचं द्योतक .... हे भारी आवडले

    आपण आसे सतत उपक्रम करत राहणे हे खूप आवश्यक आहे हे मात्र नक्की .....आशा सगळ्या उपक्रम्माने खूप काही साधते आसे नाही पण इक तर विचारांना एक दिशा मिळते आणि charging होते हे नक्की

    दीप्तीने कुणाच्या मुलाखती घेतल्या ?......ते पण लिहिले आहेस का?..........

    छान वाटला वृत्तांत वाचून

    आश्लेषा

    ReplyDelete
    Replies
    1. आश्लेषा, आभार. दीप्ती यांनी घेतलेल्या मुलाखती ऐकायला मी थांबले नाही. पण वरती सुनीतिताई यांनी काही माहिती दिली आहे ती नक्की वाच.

      Delete
  6. तसंही उजव्या वर्तुळात मला ‘डावी’ समजतात आणि डाव्या वर्तुळात ‘उजवी’ समजतात.
    :D
    pune university cha nav badal malahi avdla nahiye. Fulyanchya kamacha adar rakhoon dekhil punyachya vidyapeethala tyancha nav dena justified nahi watat. Punyatlya shikshan sanskrutimadhe Maharshi Karve, Lokmany tilak ityadincha wata titkach motha ahe..... tyanchi nava kuthe lihuyat ata?!!

    ReplyDelete
    Replies
    1. म्हणून मी आधी म्हटलं की विद्यापीठांना व्यक्तीचं नाव देऊ नये – कारण त्यातून अमुकच का आणि तमुकच का नाही या स्वरूपाचे वाद निर्माण होतात. संवेदनशील हाताळणी झाली तर अनेक गोष्टी मार्गी लागतात. पण ... !!

      Delete
  7. अपर्णा +१

    टिपिकल सविताताई टच :)

    ReplyDelete