ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Wednesday, March 26, 2014

१९४. निवडणूक २०१४. अनुभव ३. मुंबईत केजरीवाल (२)


लोकसभा मतदारसंघ ‘मोठे’ असतात हे माहिती आहे, पण ते किती मोठे असतात हे प्रत्यक्ष त्या मतदारसंघाविषयी माहिती घेतली की कळतं. ईशान्य मुंबई मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. ते आहेत शिवाजीनगर (मानखुर्द), मुलुंड, घाटकोपर पूर्व,  घाटकोपर पश्चिम, विक्रोळी आणि भांडूप. २००९ मध्ये या मतदारसंघात सुमारे १६ लाख मतदार होते – गेल्या पाच वर्षांत यात अजून चार लाख मतदारांची भर पडली आहे असे कुठेतरी वाचल्याचे आठवते. सहा उपनगरांत विखुरलेल्या वीस  लाख मतदारांशी संवाद साधण्याचं उद्दिष्ट ‘रोड शो’ मधून साध्य होत नाही हे उघड आहे. अर्थात इथले सगळे मतदार ‘आप’चे किंवा मेधाताईंचे समर्थक आहेत असं नाही – असं कुठेच नसतं म्हणा. त्यामुळे जिथं समर्थन आहे, किंबहुना ज्या भागात मेधाताईंच काम आहे अशा भागात केजरीवाल जात आहेत हे स्पष्ट होतं आणि ते योग्यही होतं.

केजरीवाल यांचा कार्यक्रम तसा आखीव होता.  पाच वाजून चाळीस मिनिटांनी आण्णाभाऊ साठे नगर, तिथून शिवाजीनगर मार्गे घाटकोपरचं रमाबाई नगर; तिथून विक्रोळीच्या कन्नमवारनगरमध्ये जाहीर सभा. निवडणूक आचारसंहितेनुसार रात्री दहा वाजता प्रचार बंद व्हायला हवा. थोडक्यात काय तर तीन विधानसभा मतदारसंघांना केजरीवाल भेट देणार होते – किंवा खरं तर तीन विधानसभा मतदारसंघांना केजरीवाल दर्शन देणार होते. दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबई अशा दोन लोकसभा मतदारसंघांत केजरीवाल दुपारी दोन ते साडेचार असे अडीच तास होते. पण ईशान्य मुंबई मतदारसंघात ते संध्याकाळी साडेपाच ते रात्री साडेनऊ असे चार तास असणार होते – म्हणजे ईशान्य मुंबईत विजयाची संधी जास्त आहे असा निष्कर्ष ‘आप’मधल्या जबाबदार लोकांनी काढला आहे का? जरा कुतूहल वाटत राहिलं मला या नियोजनाबद्दल.

मानखुर्दच्या रस्त्यावर वळताना बंदोबस्तासाठी उभे असलेल्या पोलीसांनाच पत्ता विचारल्यामुळे आमचं काम सोपं झालं. रस्त्यावर डावीकडे खूप गर्दी दिसली आणि अर्थातच अनेक टोप्या दिसल्या तिथं आम्ही थांबलो. या ठिकाणी सुमारे पाचेकशे लोक असतील. उपस्थितांमध्ये स्त्रियांची संख्या लक्षणीय होती. तरुण, प्रौढ, मध्यमवयीन, वृद्ध – असे वेगवेगळ्या गटातले स्त्री-पुरुष दिसत होते. मुस्लिम स्त्रियांची उपस्थिती त्यांच्या बुरख्यामुळे आणि त्यांनी परिधान केलेल्या ‘आप’च्या टोप्यांमुळे लक्ष वेधून घेत होती.

लोकांशी बोलताना कळलं की हा ‘मंडाला’ नावाचा भाग होता. अनेक वर्ष मुंबईत राहूनही मी इथं कधी आले नव्हते. किंबहुना संध्याकाळचा माझा प्रवास मला मी आजवर न पाहिलेल्या, एरवी माझ्यासाठी अदृश्य असणा-या  मुंबईची झलक  दाखवणारा होता.

डिसेंबर २००४ मध्ये मंडालातल्या आणि परिसरातल्या  ८५००० घरांवर संक्रात आली होती. इथं घरटी सहा ते सात माणसं आहेत असा अंदाज धरला तर सुमारे साडेपाच ते सहा लाख लोक रस्त्यावर आले होते – त्यांची घरं उठवण्यात आली म्हणून. ‘झोपडपट्टी हटाव’ मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. न्यायालयाने इथल्या रहिवाशांचा हक्क मान्य केला आणि डागडुजी करून लोक राहायला लागले होते इथं; तोवर २००५ मध्ये पुन्हा बुलडोझर आले. सोबत होते लाठीचार्ज आणि आग!

मानखुर्दचा हा सगळा भाग म्हणजे मुंबईतल्या गरीबांची वस्ती. मुख्य शहरात राहणं यांच्या आवाक्याबाहेर असतं. गरीबीसोबत येणारे निरक्षरता, आरोग्याचे प्रश्न, बालमृत्यू ... अशा अनेक गोष्टी इथं आहेत. २००४- २००५ मध्ये इथं ‘घर बचाओ, घर बनाओ आंदोलन’ जन्माला आलं आणि इथल्या कार्यकर्त्यांनी मेधाताईंशी संपर्क साधला. तेव्हापासून मेधाताई इथल्या लोकांशी जोडल्या गेल्या आहेत. घराचा हक्क, घरासाठी जमिनीचा हक्क आणि त्यासाठी इथल्या लोकांची चालू असलेली लढाई – हा एक वेगळाच विषय आहे. पण मंडालातल्या काही लोकांशी प्रत्यक्ष बोलल्यावर माझ्या लक्षात आलं की मेधाताईंच्या शहरातल्या गरीबांबरोबर असणा-या कामाविषयी मला तितकीशी माहिती नाही. ‘नर्मदेचा परिसर सोडून मुंबईत काय मेधाताई निवडणूक लढवताहेत’ असा एक प्रश्न मला पडला होता – त्याचं उत्तर मिळायला सुरुवात झाली ती मंडालामध्ये!

इथं केजरीवाल, मेधाताई वगैरे मंडळी आली, त्याचं जोरदार स्वागत झालं, ते सोडून आम्ही पुढे निघालो.

आण्णाभाऊ साठे नगरात पुन्हा तशीच गर्दी. पुतळ्याजवळ उभं राहून एक तरुण मोठमोठ्याने सामाजिक गीतं म्हणत होता. वातावरण उत्साहाने भारलेलं होतं. “चार वाजल्यापासून आम्ही इथं उभे आहोत” असं एकाने मला सांगितलं. हातावर पोट असणारी ही माणसं; आज अर्धा दिवस काम सोडून आली असणार. त्यातल्या एक-दोघाशी मी बोलले. मेधाताई उमेदवार आहेत; त्या ‘आप’कडून उभ्या आहेत; ‘आप’चं निवडणूक चिन्ह ‘झाडू’ आहे;  आज केजरीवाल येणार आहेत – अशा गोष्टी त्यांना बरोबर माहिती होत्या. इथंही ‘घर बचाओ, घर बनाओ आंदोलन’ सक्रीय आहे. इथं सुमारे साडेतीन हजार झोपड्या आहेत. सहा वर्ष आंदोलन सक्रिय असताना इथं मे २०१० मध्ये ४०० झोपड्या तोडल्या गेल्या, १०० झोपड्या जाळून खाक झाल्या. इथल्या लोकांनी त्याच्या विरोधात, राहण्याचा हक्क मिळवण्यासाठी  आठवडाभर  धरणं धरलं होतं आणि नंतर श्रमदानाने घरांची पुन्हा उभारणी केली होती. या काळात मेधाताई आण्णाभाऊ साठे नगरातल्या रहिवाशांसोबत होत्या. खेड्यात जगायची सोय नाही, म्हणून माणसं शहरात ढकलली जातात आणि शहरही त्यांना बाहेर ढकलायला पाहतात तेव्हा त्यांनी जायचं कुठं हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. ही संख्या थोडीथोडकी नाही हे आज पुन्हा जाणवलं.

या रस्त्यावर अशी झोपड्यांची मोठी संख्या असलेली अनेक नगरं आहेत – रफिक नगर, संजय नगर, इंदिरा नगर अशा १९ वसाहती या परिसरात आहेत. ‘घर बचाओ घर बनाओ आंदोलन’ हा एका वेगळ्या लेखाचा विषय आहे, त्यामुळे त्याबद्दल जास्त लिहित नाही. मेधाताईंच्या बरोबर गेली दहा वर्ष काम कलेले अनेक लोक इथं आहेत आणि या भागाच्या प्रश्नांची मेधाताईंना माहिती आहे हे कळणं मला दिलासा देणारं होतं.

इथं केजरीवाल आणि मेधाताई यांनी आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला हार घातला. पण केजरीवाल लोकांशी बोलले मात्र नाहीत काही.

इथून आता रॅलीत सामील होणं अवघड व्हायला लागलं. एक तर रॅलीत वाहनांची संख्या मर्यादित असते, त्यामुळे वाहनातून जाणं शक्य नव्हतं. चालत जायचं म्हटलं तर अंतरं जास्त होती. दुपारी चार साडेचार किलोमीटर चालले होते आधी तरी चालायला माझी काही हरकत नव्हती. पण केजरीवाल जर काही बोलणार नसतील लोकांशी तर उगीच त्यांच्या पाठी फिरण्यात काही अर्थ नव्हता. मी लोकांशी बोलत होते तोवर केजरीवाल आणि त्यांची रॅली दूर निघूनही गेली होती. मी आणि एक मित्र चालत थोडे पुढे आलो तर रॅली दिसली.

पण गंमत म्हणजे इथं ‘टोप्या’ दिसत नव्हता ‘आप’ च्या. थोडं जवळ आल्यावर घोषणा ज्या ऐकू आल्या त्या  आश्चर्यजनक होत्या. कारण लोक ‘केजरीवाल हाय हाय’, ‘केजरीवाल वापस जाओ’ अशा घोषणा देत होते.  


मित्राने डोक्यावरची टोपी घाईने काढून खिशात टाकली – आम्ही आणखी जवळ गेलो. साधारण ७० ते ८० लोक होते केजरीवाल यांच्या विरोधात घोषणा देणारे. त्यांच्या हातांत काळे झेंडेही होते. पुरेसे पोलीस त्यांच्या आगेमागे होते आणि केजरीवाल दिसतही नव्हते इतके पुढे गेले होते. रस्त्यावरच्या एका माणसाने सांगितलं की ‘कॉंग्रेस समर्थक आहेत’ पण पुढे एका पोलिसाने ‘समाजवादी पक्षाचे लोक आहेत’ असं सांगितलं. कदाचित दोघेही असतील. या मोर्चाबद्दल मी नंतर एका ‘आप’ कार्यकर्त्याला सांगत होते तर तो म्हणाला, “दीदी, पाच दस लोग चिल्ला रहे थे’. पण मीच सत्तर ऐशी लोक पहिले होते. विरोधाला खिजगणतीत घ्यायचं नाही याबाबत ‘आप’चे लोक तयार झालेले दिसताहेत इतर प्रस्थापित पक्षांसारखेच! आणि ते मला पुरेसं चिंताजनक वाटलं.

दुपारी झाला होता तसा ट्रॅफिक जाम इकडे नव्हता – फार तर दहा मिनिटं उशीर होत असेल लोकांना.  रस्ते पुरेसे रुंद आहेत आणि स्थानिक लोकांची वाहने नाहीत यामुळे जाम झाला नसावा. शिवाय रॅलीत फारसे लोक नसावेत असाही त्याचा एक अर्थ होतो. आम्ही अर्धा तास असेच चालत राहिलो. कशी दिसली मला मुंबई?


फुटपाथवरचे पॉटहोल्स; रस्त्यावर तुंबलेली गटारं;  त्याच्या कडेला असलेली दुकानं; फुटपाथवर मानवी विष्ठेचे अंश विखुरलेले; तिथंच मुत्रविसर्जन करणारी मुले-पुरुष; भंगाराचे साठलेले ढीग; त्यातून वाट  काढणारी माणसं. हे शहर आहे? ही आहे मुंबई? सामान्य सोयीही नाहीत इथल्या रहिवाशांसाठी. लाखो लोकांच्या वस्तीत शौचालयं नसतील तर लोक रस्त्यावरच आपली सोय पाहणार ना? त्यांच्या वागण्याचं समर्थन नाही – पण नागरी सुविधा, शहरांची वाढ, शहरांचा विकास – हा राजकीय निर्णयप्रक्रियेचा भाग झाला पाहिजे. देशातली ४५% जनता आता शहरांत राहते हे वास्तव लक्षात घेऊन आपले शहरी नियोजन झाले पाहिजे. शहरी विकासाबद्दल राजकीय पक्ष जाहीरनाम्यांत काय म्हणतात त्यावर जरा लक्ष ठेवायला हवं अशी मी मनात नोंद करून ठेवली.  

रिक्षात बसून आम्ही कन्नमवारनगरला आलो. रिक्षावाल्याच्या मते ‘कदाचित कॉंग्रेसच बाजी मारेल अखेर’. तो गोरखपूरचा आहे, पण आता गेली वीस वर्ष मुंबईत आहे. ‘मतदान कुठे आहे तुमचं’ या माझ्या प्रश्नावर तो मोघम काहीतरी उत्तरला. ‘मतदान कुणाला करायचं ते अजून ठरवलं नाही’ म्हणाला. ‘काय पाहून मतदान करणार’ या प्रश्नावर त्याच्या  मते ‘महागाई कमी करा’ एवढा एकच महत्त्वाचा मुद्दा होता. ‘कॉंग्रेसने वाट लावली देशाची’ असं म्हणून ‘मुलायमजी भी कुछ कम नही है हमारे’ असंही म्हणाला. ‘इतक्या आधी लोक ठरवत नाहीत हो मत कुणाला द्यायचं ते’ असंही त्याने मला सांगून टाकलं.  “केजरीवाल उम्मीद जगा तो रहे है, पर जितायेंगे उनको तो जिम्मेदारी निभायेंगे क्या?” या त्याच्या प्रश्नावर निरुत्तर होण्याची वेळ माझ्यावर आली.

आम्ही सभास्थानी  पोचलो तोवर सभा सुरु झाली होती. लोक खुर्चीत शिस्तीत बसले होते. दोन्ही बाजूंना असंख्य लोक उभे होते. ‘आप’चे राज्यातले इतर उमेदवारही आले होते. ठाण्याहून संजीव साने, नाशिकचे विजय पांढरे, बीडचे नंदू माधव इत्यादी.

मेधाताईंचं भाषण चांगलं झालं; मला आवडलं आणि श्रोत्यांचाही प्रतिसाद चांगला होता. मयंक गांधी “प्रत्येकाला दोन बाथरूम असलेलं ४५० चौरस फुट घर देऊ” असलं काहीतरी विनोदी बोलले. केजरीवाल साहेबांचं भाषणं प्रसारमाध्यमांत तुम्ही वाचलं-ऐकलं असेलच – म्हणून त्याबद्दल लिहित नाही काही. पण एकंदर त्यांच्या भाषणाचा सूर अत्यंत ‘आत्मकेंद्रित’ वाटला मला. दिल्लीतल्या ४९ दिवसांच्या त्यांच्या सरकारच्या कामाबद्दल ते बोलले (चांगलं), मोदींबद्दल अर्थातच बोलले (वाईट), अंबानींबद्दल बोलले (वाईट). एकूण नवं काही नव्हतं. आपण ज्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलोय त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलावेत इतकं सौजन्यही त्यांनी दाखवलं नाही. मेधाताईंचा उल्लेख त्यांनी एकदाच केला तोही ‘मेधा  पाटेकर’ असा. आपल्या उमेदवाराचं नावही नीट माहिती नसणारा हा कसला नेता? शिवाय मेधाताई काही ‘अनोळखी’ नाहीत.  एकंदर दिवसभर मला केजरीवालांचा ‘डिसकनेक्ट’ जाणवत राहिला.

विक्रोळी सभेला किती लोक होते? 


एका आडव्या रांगेत वीस  खुर्च्या होत्या. अशा किमान शंभर रांगा असाव्यात. म्हणजे  साधारण दोन हजार लोक झाले. रांगा जास्त असतील तर जास्तीत जास्त तीन हजार. पाचेकशे लोक जमिनीवर बसले होते. हजार लोक इकडेतिकडे उभे होते. असा सगळा हिशोब धरला तरी सहा हजारांवर संख्या जात नाही. यातले निम्मे अधिक ‘आप’चे पक्के लोक होते – काही कुतूहल म्हणून आले असतील, काही पत्रकार असतील, काही साध्या वेशातले पोलीस असतील.  शिवाय इतर गावांतून आलेले आमच्यासारखे लोक असतील. शंभर जागांवर आम्ही निवडून येऊ असं केजरीवाल कितीही म्हणोत, मुंबईत मेधाताई वगळता उरलेल्या दोन उमेदवारांची विजयाची शक्यता नाही हे त्यांना कळायला पाहिजे. मेधाताईंचाही विजय होईलच असं मी गृहित धरत नाही आत्ता, त्यासाठी मला अधिक फिरायला लागेल त्यांच्या मतदारसंघात. पण एक नक्की  त्यांचं मतदारसंघात काम आहे; निवडणूकीच्या आधीपासून काम आहे; लोकाशी त्यांचं नातं आहे. हे मतांत रुपांतरीत कसं करायचं हे आव्हान आहे त्यांच्यापुढे!

सभा संपली. व्यासपीठावर नेत्यांना भेटायला गर्दी जमली. ‘ज्यांची ओळख आहे त्यांनी नका भेटू आत्ता ताईंना, नव्या लोकांना भेटू द्या त्यांना’ असं त्यांचे कार्यकर्ते सांगत होते, जे योग्य वाटलं मला. मग आम्ही काहीजण मेधाताईंच्या घरी गेलो. तिथं रात्री अकरा ते बारा-सव्वाबारा बोलणं  झालं, जेवण झालं, उद्याच्या कामाची रूपरेषा ठरली आणि रात्री साडेबारा वाजता आम्ही बाहेर पडलो.

मुंबई केजरीवाल यांच्या पाठीशी उभी आहे का? मुंबईने केजरीवाल यांना स्वीकारले आहे का? केजरीवाल यांच्याकडून मुंबई काय अपेक्षा करते आहे? मुंबईचा कौल काय आहे? अशा अनेक प्रश्नांची पूर्ण उत्तरं नाही मिळाली दिवसभरात पण काही संकेत जरूर मिळाले. या संकेतातून ‘आप’ ने काही घेतलं आहे का – याचं उत्तर कालांतराने मिळेल. ‘आप’साठी बरेच मुद्दे आहेत; पण ‘आप’ची शिकायची तयारी मात्र पाहिजे! वास्तविक ‘आप’ने सामाजिक जाण आणि अनुभव असलेले अनेक उमेदवार उभे केले आहेत. त्यातले काही निवडून आले तरी सध्या केजरीवालकेंद्रित असलेले  ‘आप’ अधिक समाजाभिमुख होईल याची मला खात्री आहे.  पाहू मुंबई काय कौल देतेय ते! 

1 comment:

  1. Good experience sharing. Where are you going next?

    Ravi

    ReplyDelete