ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, July 1, 2019

२५८. फिलिपिन्स नोंदी: भाग ४: डवावमध्ये १५ जून ते २३ जून



आपत्ती व्यवस्थापन

या आठ-दहा दिवसांत बऱ्याच घडामोडी झाल्या. त्यातली एक म्हणजे तीन दिवसांचं ‘Emergency Preparedness Plan’ प्रशिक्षण. सहा स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, माझी सगळी टीम असे तीस लोक तीन दिवस विचार करत होते तो संकटकालीन परिस्थितीला तोंड देण्याच्या आमच्या संस्थांच्या तयारीचा. आमच्या सहा पार्टनर संस्था तळागाळात काम करतात आणि विविध संकंटांना (नैसर्गिक आणि मानवनिर्मित) त्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे त्यांचे विचार, त्यांच्या अडचणी आणि त्यांची तयारी समजून घेणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं.

फिलिपिन्स देश ‘Ring of Fire’ च्या परिसरात आहे. रिंग ऑफ फायर हा पॅसिफिक महासागरातला घोड्याच्या नालीच्या आकाराचा चाळीस हजार किलोमीटरचा परिसर आहे. जागृत ज्वालामुखी आणि वारंवार होणारे भूकंप  हे या परिसराचं वैशिष्ट्य आहे. गेली हजारो वर्ष हा परिसर असाच आहे. २६ जूनच्या आकडेवारीनुसार मागच्या वर्षभरात फिलिपिन्समध्ये २२३ भूकंप झाले आहेत. एका वर्षात साधारणपणे वीस चक्रीवादळं फिलिपिन्समध्ये येतात आणि त्यातली पाच विध्वंसक असतात. यासोबत मिंडनावमधला गेली अनेक दशकांचा सशस्त्र संघर्ष आहे. या सगळ्या परिस्थितीत काय घडू शकतं आणि त्यासाठी आपली संघटनात्मक तयारी कशी असायला हवी यावर विचारविनिमय करणं हे या प्रशिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट होतं.

आपत्तीव्यवस्थापनातल्या मुलभूत संकल्पनाची तोंडओळख करून घेतल्यानंतर प्रत्येक संस्थेने स्वतंत्र गटांमध्ये काम केलं. यात पहिली पायरी होती ती आपत्कालीन परिस्थितींची यादी करून त्यांचा प्राधान्यक्रम ठरवणं. ते प्राधान्यक्रम जरासे भीतीदायक होते हे खरं आहे.


या आपत्तीला तोंड देण्याची आपली किती तयारी आहे याचं सविस्तर विश्लेषण प्रत्येक गटाने केलं. सिनारिओ बिल्डिंग यावर चर्चा करताना वाईटात वाईट काय घडेल आणि त्यासाठी आपण तयारी करायची तर आपल्या संस्थात्मक रचना तयार आहेत का, इतर संस्था आणि सरकारी खात्यांसोबत संवादाचे आपले मार्ग काय असणार आहेत अशा अनेक विषयांवर सखोल चर्चा झाली. या सर्व कार्यकर्त्यांचे अनुभव ऐकणं म्हणजे एखादा छोटा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासारखंच होतं.

गंभीरपणे शिकणं चालू असताना अनेक गमतीजमतीही होत होत्या. एका प्रशिक्षिकेचं नाव बाई असं होतं. त्याचा अर्थ तिला विचारल्यावर तो राजकन्या, लाडकी असा आहे हे तिने सांगितलं. पण विसया नामक फिलिपिन्समधल्या भाषेत कोणत्याही वाक्यात सहज येणारा हा शब्द आहे हेही तिने सांगितलं. आता जाऊयात ना बाई, सोड ना तू बाईअशी वाक्य स्त्रिया-पुरूष दोघेही सर्रास वापरतात. लिंगनिरपेक्ष शब्दप्रयोग आहे हा. जमलेल्या लोकांमध्ये प्रत्येकाला किमान तीन तरी भाषा बोलता येत होत्या. भावंडं किती आहेतअशा गप्पा चालू असताना किमान नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना किमान चार भावंडं होती. जमलेल्या गटाचे सरासरी वय बत्तीस ते पस्तीस होतं हे लक्षात घेता कुटंबाचा आकार माझ्या अंदाजाला धक्का देणारा होता. एकीला तर तेवीस भावंडं आहेत. माझ्या आईवडिलांची मात्र मी एकटीच मुलगी आहे (इतर भावंडं वडिलांच्या इतर लग्नांपासून झालेली आहेत) असं तिने हसत सांगितलं.

या प्रशिक्षणात दोन दिवस आनंदमार्ग या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी योगविषयक मार्गदर्शन केलं. आनंदमार्गमधून तिघीजणी आल्या होत्या. एकजण रशियाची होती, दुसरी सिरियाची होती. मुख्य प्रशिक्षिका भारतातल्या आहेत हे आधीच मुरूगनने सांगितलं होतं. त्या थेट मुंबईच्या निघाल्या आणि मग आम्ही मराठीत गप्पा मारल्या. त्या गेली बावीस वर्ष आनंदमार्गच्या साधिका असून गेली दोन वर्ष डवावमध्ये आहेत.

आनंदमार्गविषयी मी काही फार चांगलं वाचल्याचं आठवत नव्हतं. त्यामुळे जालावर शोध घेऊन परत एकदा बरंच काही वाचलं. आता माझ्यापुढे दोन पर्याय आहेत. वाचलेल्या गोष्टींवरून धडा घेऊन आनंदमार्गशी अजिबात संपर्क ठेवणं. दुसरा पर्याय म्हणजे आनंदमार्गविषयीचे पूर्वग्रह बाजूला ठेवून मोकळ्या मनाने त्यांचं कार्य समजून घेणं. मी कोणता पर्याय स्वीकारते आहे हे थोड्याच दिवसांत कळेल.

डवाव डॉक्टर्स हॉस्पिटल (Davao Doctors Hospital)

नियमित तपासणीसाठी डॉक्टरांना भेटायचं होतं. पण माझ्या काही विशेष गरजा असल्याने नेमकं कोणत्या क्लिनिकमध्ये जावं ते कळत नव्हतं. कार्यालयाच्या मनिलामधल्या डॉक्टरांनी डवाव डॉक्टर्स हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला आणि तसं परिचयपत्रही मला दिलं. फिलिपिनो कामं फार व्यवस्थित आणि मनापासून करतात अशी मी मनातल्या मनात पुन्हा एकदा नोंद घेतली.

डवाव डॉक्टर्स हॉस्पिटलमध्ये माझे स्थानिक सहकारी जात नाहीत (ते महागडं आहे हे मुख्य कारण) त्यामुळे हॉस्पिटलशी संपर्क कसा साधावा ते कळत नव्हतं. मग मी त्यांचं फेसबुक पेज शोधलं आणि तिथं त्यांना निरोप लिहिला. मला दोन मिनिटांत त्यांचं उत्तर आलं. मी प्रश्न विचारत गेले आणि ते उत्तरं देत गेले. त्या संवादाच्या अखेरीस मग शनिवारी सकाळी सहा वाजता मी हॉस्पिटलमध्ये जायचं असं ठरलं. सहा हे मला फारच लवकर वाटतं होतं, पण इथं साधारण पहाटे साडेचारलाच उजाडतं, त्यामुळे सहा ठीकच होतं.

माझ्या घराच्या जवळ मिंडनाव विद्यापीठाचा परिसर आहे आणि तिथं झेब्रा क्रॉसिंग आहे. तिथं एक-दोन पोलिस नेहमी उभे असतात. सकाळी सहालाही पोलिस तिथं होता हे पाहून मी चकित झाले. रोजच्या सवयीने गुड मॉर्निंग वगैरे झाल्यावर मी सहज त्या पोलिसाला डवाव डॉक्टर्स हॉस्पिटल कोणत्या बाजूला आहे, टॅक्सी इकडून मिळेल की जवळच्या मुख्य रस्त्यावर जायला लागेल असं विचारलं. त्याने टॅक्सीसाठी कुठं जायची गरज नाही, मी आहे ना असं म्हणत एक टॅक्सी माझ्यासाठी थांबवली. इथल्या पोलिसांच्या कार्यतत्परतेचं मला कौतुक वाटतं. कायम हसतमुख असतात -कदाचित परकीय नागरिक असल्याचा मला हा फायदा होत असेल. कारण तसंही परकीय नागरिकांवर त्यांनी लक्ष ठेवणं अपेक्षित असतं.  

त्यावरून आठवलंइथं (डवावमध्ये) अमेरिकेसारखा ९११ हा संपर्क क्रमांक कार्यरत आहे. आणीबाणीच्या प्रसंगी पोलिसांशी थेट संपर्क साधून मदत मागता येते.

डवाव डॉक्टर्स हॉस्पिटल चोवीस तास चालू असलं तरी सकाळी सहा वाजता तिथं सामसूम होती. मग आधी सिक्युरिटी गार्डच्या आणि नंतर लॅब असिस्टंटच्या मदतीने सगळ्या औपचारिकता पूर्ण केल्या. मग कोणत्या डॉक्टरकडं जायचं याचा शोध घेताना पाच तज्ज्ञांची नावं मिळाली. शनिवारी दुपारी उपलब्ध असणाऱ्या एका डॉक्टरांच्या नावावर बोट ठेवत मी हे डॉक्टर पुरूष आहेत की स्त्री असा प्रश्न विचारल्या. त्या स्त्री डॉक्टर आहेत हे कळलं. पण त्यांच्या क्लिनिकमध्ये गेले तर त्या सुट्टीवर होत्या. मग तिथल्या परिचारिकेला मी त्या डॉक्टरांच्या नावांचा कागद दाखवत उरलेल्या चारांपैकी स्त्री डॉक्टर कोण आहेत असं विचारलं तर ती हसायलाच लागली. या पाचही डॉक्टर स्त्रियाच आहेत. नावावरून व्यक्तीचं लिंग ओळखायची मला सवय आहे (अजाणता घडतं हे, पण घडतं खरं) ती परदेशात वावरताना वेळोवेळी मार खाते. अर्थात इथंही स्त्रियांची नावं आणि पुरूषांची नावं अशी स्पष्ट विभागणी आहेती मला अद्याप उमजलेली नाही इतकंच.


हे हॉस्पिटल डवावमधलं पहिलं खासगी हॉस्पिटल आहे. १९६० मध्ये काही डॉक्टरांनी मिळून हे खासगी हॉस्पिटल चालू केलं. आता इथं २५० रूग्णांची सोय आहे. एका खोलीत हॉस्पिटलची माहिती संक्षिप्त रूपात सादर केली आहे

सापळा संग्रहालय

हॉस्पिटलमधून बाहेर पडून मी सापळा संग्रहालयाकडे कूच केली. देशोदेशीच्या प्राण्यांचे, पक्षांचे आणि जलचरांचे सुमारे सातशे सापळे (काही खरे, काही प्रतिकृती स्वरूपात) इथं आहेत. मुख्य म्हणजे कोणाही प्राण्याची-जलचराची शिकार करण्यात आली नाही, हे सगळे मरण पावलेल्या प्राण्या-पक्षांचे सांगाडे आहेत. हे संग्रहालय खासगी आहे. दीडशे पेसो प्रवेशशुल्क भरल्यानंतर संग्रहालयाचे प्रशिक्षित गाईड माहिती देतात. माझी गाईड साना नावाची एक तरूण मुलगी होती. तिने अगदी व्यवस्थित माहिती दिली. प्लास्टिक पोटात गेल्याने मरण पावलेल्या माशांचे सांगाडे पाहून पर्यावरणविषयक जागृती लोकांमध्ये झाली तरी खूप झालं म्हणायचं. मी गेले तेव्हा मुला-मुलींची आणि पालकांची गर्दी होती. शैक्षणिक सहलीसाठी अगदी योग्य जागा आहे ही.





आंतरराष्ट्रीय योग दिन

मनिलामधल्या भारतीय दूतावासाने पुढाकार घेऊन डवावमध्ये २३ या दिवशी -म्हणजे दोन दिवस उशिरा - आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. सगळ्यांसाठी पांढरे टीशर्ट होते. योगासनांसाठी लोक सतरंजी आणणार नाहीत हे लक्षात घेऊन मोठे पांढरे कागद सेलोटेपने व्यवस्थित चिकटवले होते. चारला सुरू होणारा कार्यक्रम पाच वाजता सुरू झाला. मार्गदर्शक व्यासपीठावरून सूचना देत होते त्याप्रमाणे स्ट्रेचिंग, योगासनं आणि प्राणायाम सगळ्यांनी केला. भारतीय दूतावासाचे सेकंड सेक्रेटरी श्री. संतोषकुमार मिश्रा आणि कोताबातोचे महापौर कार्यक्रमाला उपस्थित होते. एका फिलिपिनो गटाने योग आणि नृत्य असं एक फ्युजन सादर केलं, जे चांगलं होतं. इथं बरेच भारतीय आहेत हे या निमित्ताने दिसलं.


कार्यक्रमानंतरच्या जेवणाला भारतीय पद्धतीने झुंबड उडाली. मग मी घरी येऊन जेवले.

कार्यक्रमात हजर असलेल्या तीन फिलिपिनो स्त्रियांशी मधल्या काळात बऱ्याच गप्पा झाल्या, फोन नंबरांची देवाणघेवाण झाली आणि शनिवार-रविवारी काही गोष्टी मिळून करायच्या ठरल्या. त्यातले किती बेत तडीस जाताहेत ते पाहू. मला योग्य त्या ट्रायसायकल आणि जीपनी मिळतील हे त्या तिघींनी जातीने बघितलं.

लॉन्ड्री, स्मशान
आमच्या कोंडो (अपार्टमेंट) मधल्या छोट्या घरांत कपडे वाळत घालायला जागाच नाही. इमारतीच्या गच्चीवर त्यासाठी ही अशी व्यवस्था आहे. प्रत्येक घरासाठी एक पिंजरा आहे. कुलूप आपलं आपण लावायचं. पिंजरे पाहून मला प्राणीसंग्रहालयच आठवतं दरवेळी. इथं पाऊस कधी येईल ते सांगता येत नाही. त्यामुळे इथं वाळत घातलेले कपडे एक-दोनवेळा भिजून पुन्हा वाळतात.



त्यामुळे मी पर्याय शोधत होते. लॉन्ड्री असे फलक जागोजागी दिसल्यावर मी घराजवळच्या लॉन्ड्रीत गेलेकपडे धुवायचे आणि वाळवायचे दर हे असे आहेत.



ही एक मोठी सोय झाली माझी.  

लॉन्ड्रीत कपडे धुवून होईपर्यंत काय करायचं म्हणून समोरच्या फॉरेस्ट लेकमध्ये गेले. नावावरून ही बाग असेल असा माझा समज झाला होता पण प्रत्यक्षात ही निघाली स्मशानभूमी. मला जी घरांची कॉलनी वाटली होती ती त्या त्या कुटुंबाची राखीव स्मशानभूमी आहे.


स्वच्छ आणि शांत परिसरात गर्दीही नव्हती, त्यामुळे मी निवांत पाऊण तास तिथं बसले. मृतांना इतक्या सुंदर आणि शांत वातावरणाची गरज नसते खरं तरती गरज असते जिवंत माणसांची. पण बहुधा फक्त श्रीमंत माणसांनाच या स्मशानात जागा घेणं परवडत असणारआणि कदाचित जिवंत असतानाही ते लोक अशाच रमणीय जागेत रहात असणार.

इथं दुर्बिण घेऊन पक्षी पाहायला यावंअसा एक विचार माझ्या मनात आला. पण ते फारच असंवेदनशील वाटल्याने मी तो विचार सोडून दिला

क्रमश:

Friday, June 14, 2019

२५७. फिलिपिन्स नोंदी: भाग ३: कोताबातो, स्वातंत्र्यदिन आणि राष्ट्रीयता


भाग २

८ ते १४ जून २०१९

दोन गोष्टी. एक तर या आठवड्यात डवावच्या बाहेर गेले होते. त्यामुळे आता जे अनुभव आहेत ते केवळ डवावमधले नाहीत, म्हणून लेखमालेचं आधीचं शीर्षक फसवं ठरेल. मग आता मला फारसं न आवडलेलं काहीसं घिसंपिटं असं शीर्षक तूर्तास वापरते आहे. कुणाला अधिक चांगलं शीर्षक सुचलं तर जरूर कळवा. बदलता येईल ते कधीही.

दुसरं म्हणजे शीर्षकात नोंदवलेल्या तीन शब्दांचा एकमेकांशी तसा काही संबंध नाही. या तीन गोष्टींबाबत मी काही अनुभवलं एवढ्या आधारावर मी ती मोट बांधली आहे. म्हणजे शीर्षकही तसं फसवं आहे. तर असो.

कोताबातो

फिलिपिन्समध्ये बेटं किती आहेत? फेब्रुवारी २०१६ मधल्या एका सरकारी घोषणेनुसार फिलिपिन्समध्ये ७६४१ बेटं आहेत. ही बेटं तीन मोठ्या समुहांमध्ये विभागली आहेत. उत्तरेला लुझॉन (Luzon), मध्यभागी विसया (Visayas) आणि दक्षिणेला मिंडनाव (Mindanao). मी या दक्षिणेच्या बेटावर मिंडनावमध्ये राहते. फिलिपिन्सची मनिला हा नॅशनल कॅपिटल रिजन आणि अन्य १७ रिजन (एकूण १८) अशी प्रशासकीय रचना आहे. १७ रिजन्सची विभागणी अनेक प्रांतांमध्ये करण्यात आली आहे.

मिंडनावमध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत. डवाव हा एक प्रशासकीय विभाग आहे. मी ज्या कोताबातोमध्ये  (Cotabato)गेले ते शहर BARMM (Bangsamoro Autonomous Region in Muslim Mindanao) या प्रशासकीय विभागाची राजधानी आहे. हा रिजन आधी  Autonomous Region in Muslim Mindanao (ARMM) या नावाने आस्तित्वात होता. २१ जानेवारी २०१९ मध्ये झालेल्या मतदानानुसार आता हा BARMM झाला आहे. सध्या तीन वर्ष अंतरिम सरकार आहे आणि त्यानंतर लोकनियुक्त प्रतिनिधींच सरकार इथं स्थापन होईल. Bangsa हा मलाय शब्द असून त्याचा अर्थ रेस किंवा नेशन असा होतो, Moro म्हणजे लोक.  हा प्रदेश मुस्लिमबहुल आहे. Moro Islamic Liberation Front (MILF) सक्रिय असलेल् या प्रदेशाला संघर्षाचा मोठा इतिहास आहे, तो सवडीने कधीतरी सांगते – मलाही अजून तो नीट समजला नाहीये.

माझ्या दोन सहकाऱ्यांसोबत मी कोताबातोला निघाले ती दुपारच्या एक वाजता. दोनशे तीस किलोमीटरचं अंतर पार करायचं होतं, चालक अनुभवी होता, रस्ता चांगला होता आणि दुपारच्या वेळी रस्त्यावर फार वाहनं असण्याची शक्यता नव्हती.  पुर्वेकडून आम्ही पश्चिमेकडं चाललो होतो. रस्ता चांगला होता. काही भागात डोंगररांगा दिसल्या तर अनेक ठिकाणी खाचरांमध्ये भाताची लावणी चालली होती. नारळाची झाडं भरपूर दिसत होती. रस्ता रुंद होता आणि दोन्ही बाजूंना गावं होती. एकूण प्रवास सुखद झाला. वाटेत अर्लेनने भरपूर फळं घेतली होती – 
पोमेलो आणि रामबुतानचा आस्वाद घेत, गप्पा मारत प्रवास चांगला झाला. कामाच्याही गप्पा झाल्या.

हॉटेलमध्ये सामान ठेवलं आणि कॉफीसोबत मग उद्याच्या कार्यक्रमांची सविस्तर चर्चा झाली. कोणत्या मीटिंगमध्ये कुणी काय बोलायचं आहे, कोणते प्रश्न येऊ शकतात वगैरे चर्चा झाली.

दुसऱ्या दिवशी पाच तरूण मुस्लिम मुलींशी चर्चा झाली. या भागातल्या स्त्रियांचे प्रश्न काय आहेत, त्यांची स्वप्नं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी ही चर्चा होती. या पाचही मुली अस्खलित इंग्लीश बोलत होत्या. भाषेचा अडसर नसला की किती चांगला संवाद होऊ शकतो याचा हा आणखी एक अनुभव होता. एरवी इतर देशांमध्ये (आणि भारतातल्या अन्य राज्यांमध्येही) काम करताना भाषा-अनुवादक या सगळ्यांसोबत काम करण्याचं आव्हान पेलल्यानंतर सहज संवादाचा अनुभव फारच सुखद वाटतो आहे. अर्थात या सगळ्याचा एक दुष्परिणामही मला दिसतो आहे – तो म्हणजे स्थानिक भाषा शिकण्याबाबत मी एरवी जेवढी उत्साही असते त्याच्या दहा टक्केही उत्साह मी इथं फिलिपिनो शिकण्याबाबत दाखवत नाहीये.

या मुलींनी पंधरा एक मिनिटांत बावीस वेगवेगळे प्रश्न सांगितले. मग त्या प्रश्नांचं पाच मुद्द्यांमध्ये आम्ही वर्गीकरण केलं आणि त्यांचा प्राधान्यक्रमही ठरवला.
हे सगळं करत असताना या मुली त्यांचे व्यक्तिगत अनुभवही सांगत होत्या. उदाहरणार्थ 'मुलींवर लहान वयात लग्न करण्याची बळजबरी होते' हा प्रश्न सांगत असताना एकीने तिच्यावर कशी लग्नाची बळजबरी झाली होती आणि त्यातून तिने कसा मार्ग काढला हे सविस्तर सांगितलं. सामाजिक प्रश्नांवर काम करणं हे अनेकदा नैराश्य आणणारं असतं हे खरं आहे – कारण समस्या कधी संपताना दिसत नाहीत. पण समस्येवर मात करून मार्गक्रमण करणारी अशी एखादी मुलगी (अथवा स्त्री – आणि खरं तर कुणीही व्यक्ती) भेटली की मन उजळून निघतं. एका व्यक्तीचं आयुष्य बदलणं  - तेही मुस्लिमबहुल समाजातल्या मुस्लिम मुलीचं – तेही अशा भागात की जिथं गेली दोन दशकं समाजजीवन विस्कळीत होतं – अशा भागात की जिथं दहशतवाद फोफावलेला आहे  - हे अतिशय प्रेरणादायी होतं. एकवीस वर्षांच्या त्या मुलीकडून त्या दिवशी मला सकारात्मक उर्जा मिळाली, प्रेरणा मिळाली. तिचा पुढचा प्रवासही खडतर असणार आहे यात शंका नाही. पण तिच्या डोळ्यांतली चमक पाहताना मला खात्री पटली की तिची वाट चालायला ती समर्थ आहे.  

दुपारी डॉ. सुसान यांना भेटले. २०१९ ते २०२२ या काळात या परिसरात अंतरिम सरकार असणार आहे याचा उल्लेख मी आधी केला आहेच. या काळात कामकाज चालवण्यासाठी राष्ट्राध्यक्षांनी अनेक नियुक्त्या केल्या आहेत. डॉ. सुसान या Bangsamoro Transition Authority च्या कमिशनर आहेत. या बाई मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या असून Peace and Development या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. त्या एका विद्यापीठात अध्यापनाचं काम करतात. BARMM मुस्लिमबहुल रिजन असल्याने इथल्या ख्रिश्चन लोकांना आणि मूळच्या एथनिक गटांना आता त्यांच्या भवितव्याची चिंता भेडसावते आहे. सर्व गटांना सामावून घेत, BARMM सगळ्यांसाठी आहे (फक्त मुस्लिमांसाठी नाही) हे सर्व लोकांपर्यंत कसं पोचवावं याबाबत तासभर आमची चांगली चर्चा झाली. 'भारतात मुस्लिम आणि अन्य समूह कसे गुण्यागोविंदाने एकत्र राहतात' यासंबंधी मी त्यांच्या टीमला माझे अनुभव सांगावेत अशी त्यांनी मला गळ घातली. आपल्याला आपल्या देशातल्या समस्या माहिती असतात, पण तरीही इतर देश मात्र आपल्याकडून काही शिकायचा प्रयत्न करत असतात – हे मला आपल्यावरील जबाबदारी वाढवणारं वाटतं.

Institute of Autonomy and Governance च्या डेप्युटी डायरेक्टरशी पण चर्चा झाली. पॉलिसी रिसर्च क्षेत्रात काम करणाऱ्या या संस्थेचं कार्यालय भपकेबाज होतं. त्यांनी त्यांची काही प्रकाशनं मला भेट दिली. 

ती वाचून ज्ञानात नक्कीच भर पडेल. संध्याकाळी रुकसाना या आणखी एका  मुस्लिम तरूण मुलीची भेट झाली. फिलिपिन्समधला राष्ट्रीय महिला आयोग देशभरात National Gender Resource Persons तयार करत असतो. रूकसाना त्यापैकी एक. तिनेही या परिसरातल्या स्त्रियांच्या प्रश्नांविषयी मला बरीच माहिती सांगितली. मी मनिलात महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन भेटलं पाहिजे असा आग्रह केला आणि तत्परतेने तिथला संपर्क क्रमांकही मला दिला. या तरूण मुलीचं ज्ञान आणि उत्साह पाहून पुन्हा एकदा छान वाटलं. या सगळ्यांसोबत काम करताना मजा येणार आहे पुढचे काही महिने.

जाता जाता फिलिपिन्स आणि भारत यांची तुलना करण्याचा मोह होतो आहे. संक्षेपात सांगायचं तर २०१८ च्या Human Development Report नुसार १८६ देशांमध्ये  भारताचा क्रम १३० आहे तर फिलिपिन्सचा आहे ११३ वा.  एकूण आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्याही फिलिपिन्स भारतापेक्षा प्रगत आहे असं आकडेवारी सांगते आहे. येत्या काही महिन्यांत थोडं खोलात जाऊन हे तपासावं असा विचार आहे.

बाकी कोताबातोमध्ये फारसं काही पाहिलं नाही. सुरक्षेचं वातावरण नॉर्मल नाही हे रस्त्यात लष्कराकडून ठिकठिकाणी होत असलेल्या तपासणीवरून लक्षात आलं आहे. पण न पाहण्याने फारसं काही बिघडत नाही. इथं मला पुन्हा यायची संधी नक्कीच मिळेल.

स्वातंत्र्यदिन

१२ जून हा फिलिपिन्सचा स्वातंत्र्यदिन. मी या दिवशी कोताबातो ते डवाव प्रवासात असणार होते. पण हा जेमतेम पाच तासांचा प्रवास होता, आणि ऑफिसला सुट्टी असल्याने दुपारचा वेळ मोकळा होता. स्वातंत्र्यदिनाचा शहरात काय कार्यक्रम असतो, त्यात कुठे सामील होता येईल का यासंबंधी मी विचारणा केली असता माझे डवावमधले सहकारी फक्त हसले होते. कोताबातोमध्ये भेटलेल्या तरूण मुलींशी या विषयावर बोलताना त्याही फक्त हसल्या होत्या. ऑफिसला सुट्टी असल्याने संघटित कार्यक्षेत्रातला वर्ग मॉल, बागा, समुद्रकिनारे अशा ठिकाणी जाऊन मनोरंजनात आपला दिवस घालवतो असं कळलं. शहरात परेड झाली असणार याबद्दल मला शंका नाही पण त्याबद्दल फारसा उत्साह दिसत नव्हता. आपल्याकडं जागोजागी लहरणारा तिरंगा, देशभक्तीपर गीतांची उधळण, गाड्यांवर लावलेले छोटे ध्वज ... असं जे एकूण वातावरण असतं त्याचा इथं काही पत्ता नव्हता.

स्पेन-अमेरिका युद्धाचा फायदा घेऊन १२ जून १८९८ या दिवशी फिलिपिन्सच्या सशस्त्र क्रांतिकारी गटाने स्पॅनिश राजवटीपासून मुक्तता जाहीर केली. १३ फेब्रुवारी १५६५ पासून असलेली स्पॅनिश राजवट संपुष्टात आली.  या दिवशी पहिल्यांदा फिलिपिन्स ध्वज फडकवला गेला आणि पहिल्यांदा फिलिपिन्स राष्ट्रगीत गायलं गेलं. पण हे स्वातंत्र्य अल्पकालीन ठरलं. स्पेनने वीस मिलियन अमेरिकन डॉलर्सना फिलिपिन्स अमेरिकेला विकलं. हो, एका देशाने दुसऱ्या देशाला - त्या दोघांचाही नसलेला - भूभाग विकला. अमेरिकेने फिलिपिन्सला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता न देता फिलिपिन्स ही अमेरिकेची वसाहत बनवली.

फिलिपिन्सच्या सशस्त्र क्रांतिकारी गटाने अमेरिकेच्या विरोधात संघर्ष चालू ठेवला. फिलिपिन्स –अमेरिका युद्धात ४२३४ अमेरिकन सैनिक आणि १२००० ते २०००० फिलिपिनो सशस्त्र क्रांतिकारक मारले गेल्याची नोंद आहे. सुमारे दोन लाख फिलिपिनो नागरिकनांही प्राण गमवावे लागले. ४ फेब्रुवारी १८९९ रोजी सुरू झालेलं हे युद्ध अशी अनेक लोकांची आहुती घेऊन २३ मार्च १९०१ रोजी संपलं – ते अमेरिकेच्या बाजूने.

१९३५ मध्ये अमेरिकेच्या परवानगीने Commonwealth of the Philippines स्थापन झालं. ४ जुलै १९४६ रोजी फिलिपिन्स स्वतंत्र झालं. अमेरिकेने ४ जुलै ही तारीख जाणीवपूर्वक निवडली होती. ४ ऑगस्ट १९६४ रोजी फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांनी १२ जून हा फिलिपिन्सचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येईल असा अध्यादेश काढला. तेव्हापासून १२ जून हा स्वातंत्र्यदिन आणि ४ जुलै हा रिपब्लिक दिवसअथवा फिलिपिन्स-अमेरिक मैत्री दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

स्वातंत्र्यदिन कोणता याबाबत झालेल्या या घडामोडींमुळे लोकांमध्ये स्वातंत्र्यदिनाबाबत फारसा उत्साह नसावा का? का माझ्या संपर्कात असलेल्या शहरी उच्च मध्यमवर्गीय लोकांवरून सबंध देशाबद्दल अंदाज बांधायची मी घाई करते आहे? दुसरी शक्यता जास्त असावी.

राष्ट्रीयता आणि राष्ट्रवाद

मुरूगन हा माझा सहकारी श्रीलंकेचा आहे. श्रीलंकन हिंदू. तिथल्या वंशिक दंगलीच्या काळात तो फिलिपिन्समध्ये आला. तो पीस ऍक्टिविस्ट आहे. त्याची बायको, दोन मुलं-एक मुलगी हे सगळे इथं आले त्याला पंधरा वर्ष होतं आली. तो सांगत होता की मुलगी आजी-आजोबांकडं श्रीलंकेत गेली पण महिनाभरात कंटाळली आणि परत आली. तिला श्रीलंका आपली वाटत नाही याबद्दल तो तक्रार करत होता. मी सहज म्हटलं, खरं म्हणजे जितक्या जास्त लोकांना एकापेक्षा जास्त देशांबद्दल आपुलकी आणि प्रेम वाटेल तितकं राष्ट्रवादाच्या अतिरेकातून निर्माण होणाऱ्या युद्धखोर भावनांना आळा बसेल. लोक अशा परिस्थितीत जगाचे नागरिक बनत असतील तर ती स्वागतार्ह गोष्ट आहे. मुरूगनला अर्थातच माझा मुद्दा पटला नाही. तो म्हणाला, हे बघ. कितीही झालं तरी आम्ही फिलिपिन्समध्ये उपरे आहोत. माझी मुलगी इथंच लहानाची मोठी झाली आणि डवाव हेच तिचं घर आहे हे कबूल. पण उद्या आम्हाला इथून बाहेर काढलं तर ती जाणार कुठं? श्रीलंका हेच तिचं घर आहे हे तिने समजून घेतलं पाहिजे. जगाचे नागरिक वगैरे फार स्वप्नाळू बोलते आहेस तू. प्रत्यक्षात तुमच्या वंशिक आणि नागरिकात्वाच्या आयडेंटिटीज आता दिवसेंदिवस कळीच्या बनत जाणार आहेत. तू वर्षभरासाठी फिलिपिन्समध्ये आली आहेस ते ठीक, पण कायमचं राहावं लागलं तर तू काय करशील?” मी विचारांत पडले.

मग अर्लेनने चर्चेत भर घातली. तिने सुमारे वीस वर्ष फिलिपिन्सच्या बाहेर काम केलं. वर्षातून एकदा महिनाभराची सुट्टी घेऊन कुटुंबिय फिलिपिन्समध्ये यायचे खरे पण तिचा मुलगा वाढला तो बाहेरच्या देशांत आणि संस्कृतीत. मुलगा सोळा-सतरा वर्षांचा झाल्यानंतर मात्र तिने फिलिपिन्सला परत येण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीचं एक वर्ष मुलाला इथं स्थिरावणं फार जड गेलं (भाषा येत होती कारण घरात ते फिलिपिनो बोलत होते). तिचंही तेच म्हणणं होतं – जगाचे नागरिक वगैरे ठीक आहे, पण आपल्या देशाशी-संस्कृतीशी आपल्या मुलांची मुळं रूजलेली असायला हवीत. ते कुठेही जावोत आणि राहोत, त्यांना परतायला त्यांची हक्काची भूमी असायला हवी.

मग मला मोझाम्बिकमधली माझी सहकारी आठवली. ती मूळची बोस्नियाची. तिथल्या संघर्षाच्या काळात तिने पळ काढला (ती एक मोठी जबरदस्त गोष्ट आहे – मी तिला कायम तू या अनुभवावर पुस्तक लिहीअसा आग्रह करत असते) आणि ती अमेरिकेच्या आश्रयाला गेली. तिथं तिने अगदी पडेल ती कामं केली आणि आता मोझाम्बिकमध्ये ती एका आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेची कंट्री डायरेक्टर आहे. तीही मला एकदा सांगत होती की तिचा सध्याचा पासपोर्ट अमेरिकन आहे पण तिने बोस्नियन पासपोर्टही ठेवला आहे. उद्या काही झालं तर परतायला आपली जागा हवी हे तिचंही मत होतं.

कायम देशात राहणाऱ्या लोकांचा राष्ट्रवाद आणि देशाबाहेर अनेक वर्ष वास्तव्य केलेल्या लोकांचा राष्ट्रवाद (फक्त भारतीय नव्हे तर इतरही लोकांचा) यात दिसणाऱ्या साम्याने मी विचारांत पडले आहे. कारणमीमांसा वेगळी आहे दोघांची पण बाह्य भावनेचं रूप तेच आहे का? की समजून घेण्यात माझी गफलत होते आहे? ‘जगाच्या नागरिकत्वाच्या संकल्पनेबाबत मी जरा नीट विचार करणं गरजेचं आहे तर.

क्रमश: 
भाग ४