ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Sunday, October 16, 2011

९५. कौल


सिल्वासाकडून दुधनीला चाललो होतो आम्ही तेव्हा भर दुपारची वेळ होती. सकाळच्या एका गावच्या भेटीने बरेच नवे प्रश्न समोर आणले होते. ते प्रश्न सोडवण्यात माझ्या सोबत असलेल्या लोकांना फारसा रस नव्हता याचं मला त्या प्रश्नांपेक्षाही वैषम्य वाटत होतं. प्रश्न सोडवायची इच्छा असेल तर कितीही अवघड वाटणारा प्रश्न सुटतो असा माझा आजवरचा अनुभव. आणि काही करायचंच नसतं, तेव्हा अनेक नवे प्रश्न निर्माण होत जातात असाही अनुभव. मी खरं तर त्याच विचारांत होते.

दादरा नगर हवेली या केंद्रशासित (तिथ ’संघशासित’ असा उल्लेख आहे सिल्वासाच्या स्वागत कमानीवर!) प्रदेश नवा होता माझ्यासाठी. जेमतेम ५०० (अगदी नेमकं सांगायचं तर ४८७!) चौरस किलोमीटरचा हा टापू. सिल्वासा ही त्याची राजधानी; गुजराथी आणि मराठी या दोन अधिकृत भाषा. तीन बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला प्रदेश. मराठ्यांच्या नाविक दलाने पोर्तुगीजांचं एक जहाज बुडवलं. पण इंग्रजांच्या विरोधातल्या धोरणाचा एक भाग म्हणून मराठ्यांनी पोर्तुगीजांना १७८३ मध्ये नगर हवेलीतून पैसा वसूल करण्याचे अधिकार बहाल केले एका करारान्वये आणि पुढे १७८५ मध्ये पोर्तुगीजांनी दादरा विकत घेतलं. पोर्तुगीजांची या प्रदेशावरची सत्ता १९५४ पर्यंत अबाधित राहिली. पण हा भाग भारतात ’विलीन’ व्हायला मात्र १९६१ साल उजाडावं लागलं – असा काहीसा इतिहास वाचला होता. पण इतिहासात – म्हणजे इतिहासाच्या  पुस्तकात – अनेक गोष्टी नसतात. त्या भागात गेलं की अनेक बाबी नव्यानेच कळतात. सुरेश या भागातला, खानवेलमधला आदिवासी तरूण. सकाळपासून काही आमच्या सोबत नव्हता, त्यामुळे त्याच्याशी काही फारसं बोलणं झालेलं नव्हतं.त्याच्याकडून काहीतरी ऐकायला मिळेल  अशी माझ्या मनात अपेक्षा निर्माण झाली.

रस्त्याच्या डाव्या बाजूला अचानक भरपूर पाणी दिसलं. “हे मधुबनी धरण” – सुरेशने मला सांगितलं. मी माझी चिंता बाजूला ठेवून तो जे काही सांगत होता त्याकडं लक्ष द्यायला लागले. “नगर नावाचं गाव होतं या डोंगराच्या पायथ्याशी पूर्वी. हे धरण बांधताना ते गाव पाण्यात बुडालं. तिथला देव – नगरदेव – आता त्याचं देऊळ इथं रस्त्याच्या उजव्या बाजूला आहे. “ मी ऐकते आहे हे पाहिल्यावर सुरेशला आणखी स्फुरण चढलं.

मग सुरेश आणि इतरांनी मला अनेक कथा सांगितल्या. नगर गावातून ही मूर्ती वरती आणायला कसे कष्ट पडले सगळ्यांना;  या नगरदेवाची बहीण म्हणजे डहाणूची महालक्ष्मी – तिच्याकडे तो वर्षातून एकदा (बहुतेक दिवाळीच्या सुमारास) जातो तेव्हा आकाशात कशी ज्योत दिसते; हा देव कसा नवसाला पावतो; त्याची जत्रा कधी असते – अशा असंख्य कहाण्या. त्या सगळ्या बोधप्रद नसल्या तरी त्यातून इथल्या माणसांची मनं कशी चालतात, त्यांची जीवनदृष्टी काय आहे हे थोडंफार समजतं – आणि प्रवासात करण्यासारखंही काही नव्हतं दुसरं – म्हणून मी ऐकत राहिले.

कोणी न सांगताच चालकाने गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला थांबवली. आम्ही सगळे खाली उतरलो. रस्त्याच्या खाली मधुबनी धरणाचं, त्या पलिकडच्या गावांचं रमणीय दॄष्य दिसत होतं. ते पाहून मी एकदम ताजीतवानी झाले. 
“ते नगरदेवाच देऊळ” सुरेशन मागच्या बाजूला उजवीकडं हात दाखवत सांगितलं. “अरे, ताईंना आपण घेऊन जाऊ तिकडं” मला न विचारताच दुस-याने हुकूम सोडला. बहुतेक वेळा लोकांना काही गोष्टी स्वत:ला करायच्या असतात आणि ते आपल्याला निमित्त बनवतात हे मला माहिती आहे. मी स्वत:शीच हसले आणि त्यांच्याबरोबर देवळाकडे निघाले.

पांढ-या रंगातलं ते एक साधं देऊळ होतं, नवंच बांधकाम असावं आणि फारसं मोठंही नव्हतं. एक सोडून दोन घंटा वाजवून  (मला देवळातल्या घंटा वाजवायला आवडतं – का ते माहिती नाही!) मी देवळात प्रवेश केला. शेंदुराने माखलेली एक मूर्ती होती – तिच्या डोक्याशी ध्वज होते, तिच्या चेह-यावर दोन डोळॆ कोरलेले होते, समोर त्रिशूळ होता. मागच्या भिंतीवर एक पाटी होती, तिच्यावर या देवाची आरती लिहिलेली होती. ती वाचून हा देव म्हणजे भैरोबाचा अवतार इतकं समजलं. म्हणजे या देवाचं ’कुळ’ समजलं म्हणा ना – आता त्याविषयी अधिक माहिती शोधण्याइतके पुरेसे धागे मला मिळाले होते! त्या देवाच्या (म्हणजे  मूर्तीच्या ) डोळ्यांखाली दोन छोटे खड्डे दिसत होते – नैसर्गिक असतील ते – पण मी उगीच विचारलं – ते काय आहे?

त्या सगळ्या ऐकणा-यांना माझा प्रश्न कधी नाही ते आवडला होता. दोघा तिघांनी एकदमच उत्साहाने बोलायला सुरुवात केली. त्यातून इतकं कळलं – की हा देव एकदम शक्तीमान आहे (कुठला नसतो?). आपण एक इच्छा मनात धरून बसायचं देवापुढे – ती इच्छा पूर्ण होणार असेल तर ती सुपारी आपल्यापर्यंत येते नाहीतर ती आपल्या उजवी- डावीकडं जाते. त्यातून मला काही अर्थबोध व्हायच्या आत एकाने मंदिराच्या पुजा-याला फोन लावला होता आणि तो पुजारी पाच मिनिटांत पोचणार तिथं -  येऊन पोचलाही.

इथले आदिवासी कोकणा – आणि हा महाराष्ट्राला जवळचा भाग. त्यामुळे मी पुजा-याशी अंदाजाने मराठीत बोलले आणि तो एकदम खूष झाला. मग त्या सगळ्यांनी मला  “तुमची इच्छा सांगा” अस भरीला घालायला सुरुवात केली. मला खरं तर त्यावेळी दुपारचे दोन वाजून गेल्यामुळे सडकून भूक लागली होती –पण सर्वशक्तीमान परमेश्वराकडे जेवणासारखी इतकी साधी गोष्ट काय मागायची, ही मागणी पूर्ण करणं तर आमच्या संयोजकाच्या हातात आहे  असा विनोदी विचार माझ्या मनात आला. पण हा विचार त्या लोकांना सांगणं शक्य नव्हतं आणि मला त्यांच्या श्रद्धा आणि भावनाही दुखवायच्या नव्हत्या. त्यामुळे मी थोडं गंभीरपणाने “काय मागायचं? माझ्या लायकीपेक्षा जास्तच दिलं आहे देवाने मला आजवर” असं म्हणाले. माझ्याही नकळत मी हे फार प्रामाणिकपणाने म्हटलं असणार – कारण त्यावर सगळे गप्प झाले.

मग माझा एक सहकारी पुढे आला. हा चांगला शिकला-सवरलेला माणूस.  ’मानववंशशास्त्र’ असं अवघड नाव असलेल्या विषयात संशोधन केलेला, मोठ्या पदावर सरकारी खात्यात काम करणारा. मी कुतुहलाने त्याच्याकडं पाहिलं – पण तो वेळ निभावून न्यायला पुढं आला नव्हता तर त्याची खरंच मनापासून इच्छा होती या देवाचा कौल घेण्याची. त्याची तयारी होईपर्यंत मी पुजा-याशी गप्पा मारल्या. दिवसातून साधारणपणे किती लोक इथं येतात आणि किती लोकांना नगरदेवाचा कौल मिळतो याची मी चाचपणी करत होते. पण पुजारी हुषार होता – त्याने मला काही ताकास तूर लागू दिला नाही.

आमचा सहकारी डोक्यावर रूमाल बांधून आणि पुढे एक रूमाल पसरून नम्रपणे देवासमोर बसला. पुजारी त्याला म्हणाला, “सांगा तुमची काय इच्छा आहे ते.”

मोठ्याने बोलून इच्छा सांगायची आहे हे पाहिल्यावर आमचा सहकारी बिचकला. देवाचा आणि त्याचा खासगी संवाद असेल अशी त्याची कल्पना होती – पण प्रत्यक्षात तो सार्वजनिक संवाद होता. “तुम्ही पुजा-याच्या कानात सांगा पाहिजे तर” अशी सुरेशने तडजोडीची सूचना केली. पण आता आमच्या सहका-याची पंचाईत झाली होती. मग त्या विश्वसुंदरी स्पर्धेतल्या तरूणी कशा उदात्त विचार व्यक्त करणारी वाक्यं बोलतात – तशी काहीशी ’सर्वे भवन्तु सुखिन:’ अशा थाटाची काहीतरी मागणी त्याने केली.  “एकावर एक फ्री “चा जमाना असल्यामुळे असेल बहुधा, आमच्या सहका-याने एका दमात आरोग्य, मुलांचे शिक्षण आणि नोकरीतली स्वत:ची प्रगती अशा तीन इच्छा व्यक्त केल्या.

आता आमची नजर पुजा-याकडे वळली. त्याने सोबतच्या प्लास्टिकच्या पिशवीतून एक सुपारी काढली.कोकणी भाषेत देवाशी काहीतरी संवाद केला – म्हणजे या सहका-याची इच्छा देवाला सांगितली – थोडक्यात देवाला आमच्या      सहका-याची हिंदी भाषा कळत नसल्यामुळे त्याने कोकणीत देवाला ते समजावून सांगितलं. सर्वशक्तीमान देवालासुद्धा आपल्यासारखी भाषेची अडचण जाणवते तर – असा आणखी एक विनोदी विचार माझ्या मनात आला. सगळॆजण एकदम स्तब्ध उभे होते. मधेच मी पुजा-याला “फोटो काढला मी, तर चालेल का तुम्हाला?” असं विचारून घेतलं – त्याने होकार दिला.

ती सुपारी घरंगळत आमच्या सहका-याच्या डाव्या बाजूला गेली. आता जगात अनेक लोक अनेक विरोधाभासी गोष्टी देवाकडे मागत असतात – तो तरी कशा त्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार? मला वाटलं की संपला प्रयोग. पण पुजा-याने दुसरी सुपारी काढली – तीही उजवी-डावीकडं कुठंतरी गेली. मग तिसरी – मग चौथी. जसजशी सुपा-यांची संख्या वाढायला लागली तसतसा पुजा-याच्या देवाशी चाललेल्या संवादाचा स्वर बदलायला लागला. साधी नम्र प्रार्थना आता काकुळतीची झाली, लालूच दाखवणारी झाली, धमकीची झाली, करूणेची झाली. भक्तीचे विविध प्रकार, वेगवेगळे सूर त्या पाच मिनिटांत मला दिसले हाच खर तर मोठा चमत्कार होता.

अखेर चौदावी –पंधरावी सुपारी थेट आमच्या सहका-याच्या समोर पसरलेल्या रूमालावर येऊन थबकली आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. “भगवान का प्रसाद मिल गया” अस माझा सहकारी भावूकपणे मला म्हणाला तेव्हा मी त्याची नजर चुकवली – कारण मला खूप हसू येत होतं त्या कर्मकांडाचं. त्याचा एवढा विश्वास आहे या सगळ्यावर तर मग पहिली न आलेली सुपारी हीच परमेश्वराची इच्छा असं मानून मुकाट माघारी का परतला नाही तो? आपल्या इच्छा अनंत असतात, अनंत राहणार – त्यासाठी आपण प्रयत्न करावेत – मिळालं आणि न मिळालं आपल्या इच्छेनुसार – तर ते दोन्हीही तितक्याच श्रद्धेनं ’परमेश्वराची इच्छा’  म्हणून का घेता येऊ नये आपल्याला? स्वत:च्या अगदी प्रापंचिक, भौतिक इच्छा आकांक्षांना परमेश्वरी अधिष्ठान शोधण्याचा इतका खटाटोप कशाला?

पण मी गप्प बसले.

संध्याकाळी परतताना एका आदिवासी वस्तीत उतरलो. गप्पा मारता मारता एका मध्यमवयीन आदिवासी गॄहस्थाने मला विचारलं: “माणसाचा धर्म हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन असा कसा काय असू शकतो? माणसाला जात कशी काय असू शकते? आपण सगळॆ या एकाच धरतीमातेची लेकरं नाही का? मग जमीन एवढी याच्या मालकीची आणि तेवढी त्याच्या मालकीची असली विभागणी कशी काय असते? ज्याला जेवढी गरज तेवढी जमीन त्यानं पिकवावी असं का नाही करत आपण? सूर्य आणि चंद्र आणि पाऊस हेच आपले खरे देव नाहीत का – ते कोपले तर आपलं काय होईल? मग एवढे देव आणि त्यावरून माणसा-माणसांत भांडणं कशाला हवीत? ….”

मी थक्क होऊन आणि अतिशय आदराने त्या आदिवासी माणसाकडं पाहिलं. त्याचा चेहरा रापलेला होता. अंगावर पुरेसे कपडे नव्हते. त्याचं घर म्हणजे एक झोपडी होती.  जगाच्या भाषेत बोलायचं तर त्याच्याकडं काही नव्हतं – पण त्याच्याकडे परमेश्वराकडं पाहण्याचा एक विशाल आणि सखोल दॄष्टिकोन होता….. शक्यता आहे की हा त्याचा केवळ बोलण्याचा भाग असेल. पण आम्ही तरी बोलण्याविना आणखी काय मोठं वेगळं करत असतो? 

देव मूर्तीत जरूर पहावा पण फक्त तो तिथंच पाहू नये, सर्वत्र पहावा -  हे विसरून आम्ही कर्मकांडांना चिकटून राहतो .. आमच्या स्वार्थाला आम्ही भक्ती हे गोंडस नाव देतो…

जिवंत माणसांशी संवाद साधण्याऐवजी, त्यांना समजून घेण्याऐवजी आम्ही दगडी मूर्तींना कौल लावत बसतो …
खरा कौल कसा मिळणार मग आपल्याला?


*******
तुम्हाला कदाचित 'भक्तीहीनता' वाचायला आवडेल. 

8 comments:

  1. सुखी माणसाच्या सदर्‍याची गोष्ट आठवली :)

    ReplyDelete
  2. बाकी सगळं सोडून ती सुपारीसाठी थांब्याची पद्धत वाचून माझी खूप करमणूक झाली...मला वाटल होत नॉरमली एकच कौल लावतात इथे तर पूर्ण छप्पर बांधलं ....:)

    ReplyDelete
  3. हेरंब, हो, अखेर सुख मानण्यावर असत ... तर कौल पण मानण्यावर असायला हरकत नाही.

    ReplyDelete
  4. अपर्णा, मला अस वाटल की ही 'साहेबाला' दिलेली खास वागणूक असावी. एखादा गरीब आदिवासी असता तर त्याला बहुतेक कोंबडी दिल्याविना दुसरी सुपारी मिळाली नसती कौल लावायला ... पण मला ते पक्क माहिती नाही म्हणून मी तसा आरोप त्या पुजा-यावर करण कदाचित अयोग्य ठरेल!

    ReplyDelete
  5. >>>जिवंत माणसांशी संवाद साधण्याऐवजी, त्यांना समजून घेण्याऐवजी आम्ही दगडी मूर्तींना कौल लावत बसतो …
    खरा कौल कसा मिळणार मग आपल्याला?

    हे खूप काही सांगून जात ग ....
    मलाही ते कर्मकांड अजिबात पटत नाही ...

    ReplyDelete
  6. ते करण्याची आपल्यावर सक्ती होत नाही तोवर ते मी मजेत बघू शकते - अर्थात त्यात कोणाचे शोषण, फसवणूक असता कामा नये हे आहेच.

    ReplyDelete