ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, February 11, 2013

१५०. विवेकानंदांचा वेदान्त विचार : भाग ३: वारसा


भाग: , २(अ), २ (आ) 

विवेकानंद मी पहिल्यादा वाचायला घेतले ते धर्मासंबंधी काही ठाम मते आणि त्यासोबतच त्याबाबतचे काही पूर्वग्रह मनात तयार झाल्यानंतरच! अर्थात तो १९८0 च्या आसपासचा काळ होता. आणिबाणी आणि त्यानंतरच्या राजकीय प्रयोगांचे आणि त्यातून होणा-या वाताहातीचे पडसाद आमच्या पिढीच्या मनावर उमटत होते. धर्मानेच देशाचे नुकसान केले आहे असे मानण्याचे माझे ते वय होते. मार्क्सवादी अभ्यासवर्गात जाऊन आल्याचा तो एक प्राथमिक परिणाम होता!

विवेकानंदांचे एक मोठे पुस्तक दोन दिवसांत वरवर चाळून पाहताना माझ्या मनात 'काय हे, यात तर नवीन काहीच नाही! तेच वेद आणि तीच पुराणे! अशी एक प्रतिक्रिया उमटलेली मला आजही स्पष्ट आठवते. The Master as I Saw Him’ या त्यांच्या पुस्तकात भगिनी निवेदितांची एक उल्लेखनीय प्रतिक्रिया आहे. विवेकानंदांचे पहिले भाषण ऐकल्यावर त्यांच्या मनात 'या माणसाने काय मोठं नवीन सांगितलं? हे सगळ तर आधीच सांगितलं गेलं आहे! अशाच आशयाचे विचार आले होते.
भगिनी निवेदिता ते सामान्य वाचक या दोघांच्याही प्रतिक्रियांमध्ये साम्य असणे वैशिष्टयपूर्ण आहे. यामधून विवेकानंदांची एक विशेषता समोर येते. ती म्हणजे त्यांची अत्याधिक विनम्रता! 'मी केवळ भारवाहक आहे’, अशी विनम्र भूमिका विवेकानंदांसारखे महापुरुष (आणि स्त्रियाही) नेहमी घेतात असे दिसते.

भारतीय स्वभाव

हा स्वभाव विवेकानंद या व्यक्तीचा एकटयाचा आहे असे मात्र नव्हे. तर हा भारतीय स्वभाव आहे! भारतीय लोकांना, समाजाला काही ऐतिहासिक जाणिवाच नव्हत्या असा आरोप भारतीयांवर नेहमीच केला जातो. पण भारतीय लोक व्यक्तीपेक्षा विचारांना जास्त प्राधान्य देतात अशी एक शक्यता दिसते. विचार सांगणारा 'कोण आहे हे येथे फारसे कधी महत्त्वाचे नव्हते, तर विचार 'काय आहे हे महत्त्वाचे होते. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण प्राचीन काळी खरोखरच होऊन गेले की नाही याचे येथे फारसे सोयरसुतक नसते. श्रीकृष्णाचे अस्तित्व ऐतिहासिक दृष्टया सिद्ध होवो अथवा न होवो, गीतेचे महत्त्व त्यामुळे काही कमी होत नाही!

शंकराचार्यांपासून आजपर्यंतच्या कोणत्याही महापुरुषाचे उदाहरण घ्या. 'मी काही नवे सांगतो आहे असे कोणीच म्हणत नाही. म्हणजे इतक्या वर्षांमध्ये भारतात काहीच नवे सांगितले गेले नाही असे अजिबात नाही. सर्व महापुरुषांची समाजाला साद घालण्याची ती एक विलक्षण पद्धत आहे असे मला वाटते.

प्रत्येक महापुरुषाने भारताच्या ज्ञानाच्या आणि संस्कृतीच्या वारशात मोलाची भर घातली याबाबत मतभेद असण्याचे काही कारण नाही. धर्मावर आघात करुन नव्हे तर धर्माचे पोषण करुन त्यांनी ही भर घातली आहे. भगवद्गीतेचेच उदाहरण घ्या. किती विविध प्रकारांनी तिचा अन्वयार्थ लावण्यात आला आहे. हे विविध अर्थ म्हणजे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात त्या त्या महापुरुषांनी टाकलेली भर आहे. पण हे नवे विचार त्यांनी विघातक नव्हे तर विधायक पद्धतीने मांडले आहेत. हा भारतीय स्वभाव आहे!

विवेकानंदांनी काहीच नवे सांगितले नाही असे म्हणणे औद्धत्याचे ठरेल. विवेकानंदांचा वेदान्त विचार हा एका अर्थाने नव्या जुन्याचा, विविध विचारांचा समन्वय आहे - कडबोळे मात्र नव्हे. म्हणून विवेकानंदांचा वेदान्त विचार समजावून घेताना प्रस्थापित वेदान्त विचारांचा मागोवा घेणे अपरिहार्य ठरते.

हिंदुधर्म आणि वेदान्त

हिंदू धर्मावर वेदांचा फार मोठा पगडा आहे असा आपला समज आहे. सर्वसामान्य लोकांनी वेदग्रंथ वाचणे तर सोडूनच द्या,  पण पाहिलेलेही नसतात. बहुसंख्यांना कदाचित चार वेदांची नावेही पटकन आठवणार नाहीत.

आता हेच पहा ना! इंद्र हा ऋग्वेदकालीन समुहाचा प्रिय आणि आदर्श असा देव. या देवतेची स्तुती करणारी थोडीथोडकी नव्हे तर २५0 सूत्रे ऋग्वेदात आहेत. आज आपल्यापैकी किती लोकांना इंद्र हा राम आणि कृष्णासारखा देव वाटतो? भारतात आज इंद्राची किती मंदिरे आहेत? किती लोक इंद्राची पूजा करतात? वेदकाळात मूर्तिपूजा नव्हतीच असे उत्तर कोणाला सुचेल. पण गेल्या असंख्य वर्षांत इंद्रासाठी किती अभंग, कविता, प्रार्थना रचल्या गेल्या आहेत?

यज्ञ हा वैदिक संस्कृतीचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू होता. आज आपल्यापैकी अनेकांनी यज्ञ पाहिलेलासुद्धा नाही. तरीही आपण (म्हणजे असंख्य लोक) हिंदू आहोत आणि वेदांना आपण मनोमन सर्वोच्च स्थान देतो. त्याचबरोबर आपण हे देखील लक्षात घेतले पाहिजे की वैदिक धर्मावर कडाडून टीका करणा-या गौतम बुद्धाची येथे अवतार म्हणून पूजा केली जात आहे. भारतातील देवतांचा विकास हा अभ्यासाचा एक स्वतंत्रच विषय होईल, म्हणून त्याबाबत इथे अधिक लिहीत नाही. पण थोडक्यात सांगायचे झाले तर वेदमान्य ते सर्वमान्य, आणि तेच लोकमान्य अशी आपल्याकडची स्थिती  आहे.

वेद आणि वेदान्त यातला फरकही सामान्य माणसाला ठाऊक नाही असे दिसते.. सांप्रदायिक अनुयायी वगळले तर सामान्यत: (निदान महाराष्ट्रात तरी प्रामुख्याने) लोकांना एकच आचार्य ठाऊक आहेत. ते म्हणजे शंकराचार्य! 'तुमच्या हिंदुधर्माची मूलतत्त्वे कोणती?’, या प्रकारच्या प्रश्नावर पुनर्जन्म, कर्मसिद्धान्त याबरोबरच 'जग म्हणजे माया असेही अनेकजण सांगताना दिसून येते. केवळ वेदान्तदर्शन म्हणजे हिंदू धर्म नव्हे आणि हिंदू धर्म म्हणजे निव्वळ आद्य शंकराचार्यांचा वेदान्त नव्हे हे अनेकदा आपल्या गावीही नसते.

वेदवाड्मय

वेद हा शब्द 'विद्’ या धातूपासून तयार झाला आहे. जाणणे, होणे, प्राप्त करणे, मनन करणे असे या धातूचे अनेक अर्थ आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद ही चार वेदांची नावे आपल्याला महिती आहेत. मंत्रांची रचना आणि त्यांचे संकलन ज्या काळात झाले त्याला 'मंत्र काल म्हणतात. हे मंत्र ज्या ठिकाणी संकलित केलेले आहेत त्यास 'संहिता असे म्हणतात. सर्वसाधारणपणे जेंव्हा जेंव्हा ऋग्वेदाचा संदर्भ दिला जातो तेंव्हा तेंव्हा तो ऋग्वेदसंहितेचा संदर्भ असतो.

संहितेप्रमाणेच वरील चारही वेदांची ब्राह्राणे, आरण्यके व उपनिषदे आहेत. संहितेत देवतांच्या स्तुतिपर मंत्र आहेत. ब्राह्राणग्रंथांत प्रामुख्याने यज्ञक्रियांचे विवेचन आहे. येथपर्यंतचे वेदवाड्मय कर्मकांडात्मक मानले जाते. त्यानंतर तत्त्वचिंतनाचे प्राबल्य असणारी आरण्यके व उपनिषदे येतात. आरण्यके व उपनिषदे यांतील सीमारेषा फारच लवचिक आहेत, अस्पष्ट आहेत. उपनिषदांना ज्ञानकांड असेही म्हटले जाते.

संहितांपैकी ऋग्वेद व  अथर्ववेद या दोन संहिता महत्त्वाच्या आहेत. सामवेदात ७५ नवे मंत्र सोडले तर बाकी सारी ऋग्वेदाचीच पुनरावृत्ती आहे. यजुर्वेदाच्या शुक्ल व कृष्ण अशा दोन शाखा आहेत. अथर्ववेद संहिता मात्र थोडी वेगळी आहे. प्राचीन काळी प्रारंभी फक्त तीन वेदांनाच मान्यता अथवा प्रतिष्ठा होती. अथर्वसंहितेला हे स्थान मिळविण्यासाठी बरीच वाट पाहावी लागली. ऋग्वेद हा उच्चभ्रूंचा व अथर्ववेद हा जनसामान्यांचा अशी एक त्याची संगती लावली जाते. आर्य जमातीतीलच बहुजनसमाजाच्या कल्पना, तसेच कदाचित आर्यपूर्व आणि आर्यकालीन स्थानिक आर्येतर समाजाच्या धर्मकल्पना अथर्ववेदात संग्रहित आहेत असाही एक मतप्रवाह आहे.

ब्राह्राणांपैकी शतपथ, ऐतरेय, जैमिनीय ब्राह्राणे प्रसिद्ध आहेत. उपनिषदांची संख्या बरीच आहे. 'अल्लोपनिषद्’ नावाचेही एक उपनिषद आहे. पण आदि शंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये उल्लेखिलेली
'ईश-केन-कठ-प्रश्न-मुण्ड-माण्डुक्य- तित्तरि:।ऐतरेय च छांदोग्यं बृहदारण्यकं तथा।।
ही दहा उपनिषदे प्राचीन मानली जातात. कौषितकी, जाबालि आणि श्वेताश्वतर या तीन उपनिषदांनाही काही लोक वरील दहांइतकेच प्राचीन मानतात.

उपनिषदांचा उगम

साधारणपणे आपला असा समज आहे की, यज्ञसंस्थेवर, पशुहत्येवर गौतम बुद्धाने सर्वप्रथम कडाडून हल्ला केला. सिद्धार्थ गौतमाचा हल्ला अतिशय प्रखर होता यात काहीच शंका नाही. पण उपनिषद काळातील ऋषींनीही हे काम कौशल्याने केल्याचे दिसून येते. ब्राह्मणग्रंथांच्या काळात यज्ञसंस्थेला अतिरेकी महत्त्व प्राप्त झाले. देवतेला प्रसन्न करण्यासाठी मंत्र ही कल्पना मागे पडून मंत्र म्हटले की देवतांनी प्रसन्न झालेच पाहिजे - जणू देवता ही मंत्राची गुलामच आहे - असा सारा यांत्रिक मामला बनला. यज्ञवेदी कशी बनवावी, तिची मापे, त्यासाठी लागणारे साहित्य, वेदी कोणत्या दिशेने असावी, कशाची आहुती दयावी, त्यासाठी कोणती भांडी वापरावीत........... अशा माहितीने खचाखच भरलेल्या कर्मकांडाच्या रगाडयात काहीजणांना जे हवे नेमके तेच गवसेनासे झाले. त्यामुळे काही विचारवंत बाहय कर्मांचा नाद सोडून अंतर्मुखतेकडे वळले. याचा अर्थ ब्राह्मणग्रंथ टाकाऊ आहेत असे मात्र नव्हे! विनोबाजींची उपमा वापरुन मी म्हणेन: ब्राह्मणग्रंथांच्या खांद्यांवर बसून उपनिषदकारांनी नवी वाट धुंडाळली!

यज्ञसंस्थेची बहिर्मुखता हे उपनिषदोदयाचे एकमेव कारण नसावे. एकंदरितच यज्ञ हा प्रकार प्रचंड खर्चिक झाला होता. यज्ञाच्या महत्त्वामुळे पुरोहित वर्गाचे समाजातील वजन भलतेच वाढले होते. उपनिषदांतील उल्लेखांवरुन असे दिसते की ब्रह्मविद्या प्रथम क्षत्रियांना उपलब्ध झाली. त्यांनी मग ती ब्राह्मणवर्गाला शिकविली. यज्ञाचे अपेक्षित फळ न मिळण्याचे अनेक प्रसंग घडल्यानंतर स्वाभाविकपणेच पुरोहित वर्ग फसवणूक करीत असल्याची भावना वाढीला लागली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अग्नी सर्व देवतांसाठी स्वर्गापर्यंत आहुती वाहून नेतो ही कल्पना निव्वळ बुद्धीच्या निकषावर हास्यास्पद वाटते. ईश्वरजिज्ञासेपेक्षा आत्मजिज्ञासा या काळात प्रभावी ठरली असावी. उपनिषदांत सृष्टीतील एकाही देवतेचे वर्णन नसून त्यात 'या सृष्टीच्या मुळाशी व सृष्टीस आधारभूत असे कोणते तत्त्व आहे  या प्रश्नाचा शोधक बुद्धीने व शास्त्रीय दृष्टीने विचार केला आहे. 'ऋग्वेद हा भावनाप्रधान असून उपनिषदे ही बुद्धिप्रधान आहेत हे गुरुदेव रानडे यांचे विधान मग सहज मान्य होते.

वेदान्त

'वेदान्त याचा शब्दश: अर्थ 'वेदानाम् अंत: वेदांचा अंत असा होतो. उपनिषदांना वेदान्त असे म्हटले जाते. कारण क्रमानुसार उपनिषदे हा वेदांचा अंतिम भाग होय. काहींच्या मते गुरुकुलांमध्ये उपनिषदांचे पठण सर्वात शेवटी केले जायचे म्हणून ती 'वेदान्त होत. वेदान्त शब्दाचे विवेचन करताना प्रा. आर. आर. देशपांडे म्हणतात, What is most important, however, is that the Upanishads were the culmination, the ultimate goal of Veda thought, the very highest point or acme, the point of perfection reached in respect of the Knoweldge, which is Spiritual Knowledge, Philosophical Knowledge.

उपनिषद या शब्दाचा दोन तीन प्रकारे अर्थ लावला गेला आहे. गुरुच्या जवळ बसून केलेला रहस्यमय, गूढ संवाद असे त्याला थोडक्यात म्हणता येईल. उपनिषदांतून व्यक्त होणारी तत्त्वप्रणाली बांधीव स्वरुपाची नाही. वेगवेगळया विषयांवर विचारवंतांनी संवादरुपात प्रकट केलेले चिंतन असे उपनिषदांचे स्वरुप आहे. त्या तत्त्वविचारांची चर्चा आपण काही काळाने विस्ताराने करणार आहोत.

दर्शने

भारतीय तत्त्वज्ञानाच्या प्रांतात तत्त्वज्ञानाला 'दर्शन असे अत्यंत समर्पक नाव आहे. या दर्शनांचे प्रणेते म्हणून काही महापुरुषांची नावे घेतली गेली असली तरी ही दर्शने अतिशय प्राचीन आहेत असे मानले जाते. या दर्शनांचे वर्गीकरण दोन गटांत केले जाते. ते असे –

वैदिक दर्शने
अवैदिक दर्शने
सांख्य (कपिल)
चार्वाक
योग (पतंजलि)
बौद्ध (भगवान गौतम बुद्ध)
न्याय (गौतम)
जैन (भगवान महावीर)
वैशेषिक (कणाद)

पूर्वमीमांसा (जैमिनी)

उत्तरमीमांसा अथवा वेदान्त (बादरायण)


गणिताच्या काटेकोर भाषेत बोलायचे तर भारतीय तत्त्वज्ञानात वेदान्ताचे स्थान १/९ इतकेच आहे. पण जनमानसावर असलेला वेदान्ताचा प्रभाव पाहता या संदर्भात 'गणिताची भाषा बोलून चालणार नाही हे सहज लक्षात येते.

उपनिषदांतील तत्त्वज्ञान पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे बांधीव स्वरुपाचे नाही. तार्किक पद्धतीचा अवलंब करुन अंतिम सत्याचे ज्ञान होणार नाहीअशी उपनिषदांची धारणा आहे. उपनिषदांच्या स्वरुपाविषयी चर्चा करताना प्रा. दीक्षित म्हणतात की, 'एका व्यक्तीने सलगपणे निर्माण केलेले वाड्मय असे उपनिषदांचे स्वरुप नाही. भिन्नभिन्न काळात निरनिराळया ऋषींना स्फुरलेले विचार आणि आलेले काही महत्त्वाचे अनुभव यांचे उपनिषदांत कथन केलेले आहे. अर्थात तर्कदृष्टया चिरेबंद अशी एखादी इमारत उपनिषदांत आढळणार नाही. अंतिम सत्याच्या स्वरुपासंबंधी सर्वस्वी एकसारखे नसलेले विचार उपनिषदांत निश्चितपणे आहेत.

त्यामुळे वेदान्त दर्शनाचा विचार करताना फक्त उपनिषदांचाच नाही तर आणखी दोन प्रस्थानांचा विचार करावा लागतो. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे व भगवद्गीता ही प्रस्थानत्रयी म्हणजे वेदान्त दर्शन होय. वेदान्त दर्शनातही पुन्हा अनेक विचारप्रवाह आढळतात. निरनिराळया आचार्यांनी या प्रस्थानत्रयीवर भाष्ये लिहिली आहेत. किंबहुना, प्रस्थानत्रयीवर स्वतंत्रपणे जो भाष्य रचतो तोच आचार्य असाही अर्थ रुढ आहे. या आचार्यांमध्ये मतभेद खूपच आहेत. वेदान्ताचे प्रमुख आचार्य व त्यांच्या मतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
१ शंकराचार्य: केवलाद्वै
२ रामानुजाचार्य: विशिष्टाद्वैत
३ मध्वाचार्य: द्वैत
४ वल्लभाचार्य: शुद्धाद्वैत
५ निम्बार्काचार्य:द्वैताद्वैत

या सर्व वेदान्त मतांची थोडक्यात माहिती आपण पुढे घेऊ. 

7 comments:

  1. अतिशय रोचक.... मला हे वाचायला फारच आवडतंय.....

    ReplyDelete
    Replies
    1. इंद्रधनू, ही लेखमालिका मात्र बरीच मोठी आहे हं!

      Delete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. आभार यशोधनजी. तुमचा ब्लॉग पाहते आहे.
      टिपणीस परवानगी वगैरे नाही, सध्या जरा स्पॅम येताहेत म्हणून थोडी अडचण आहे हे खरं!

      Delete
  3. सविता, बर्‍याच गोष्टी आपण ऐकलेल्या, वाचलेल्या असतातच पण तुझ्या इतक्या सहज व समग्र परामर्षाने, आढाव्याने पुन्हा एकदा नव्याने त्यावर विचार प्रवृत्त होत आहेत. वाचतेय...

    ReplyDelete
    Replies
    1. भाग्यश्री, आभार. आढावा समग्र आहे का नाही हे सांगता येणार नाही पण सविस्तर आहे हे नक्की :-)

      Delete
  4. वैदिक साहित्य प्रचंड आहे असं म्हणतात. पण समाजिक परिस्थितीत जाणवणारा फरक कसा आहे त्याचा एक मासला सांगतो.
    प्रवास करताना एका घरी आचार्य रजनीश यांचे ईशावास्य उपनिषदावर केलेले भाष्य पाहाण्यात आले. फक्त पहिले प्रकरण वाचले. त्यावर पहिल्या ओळीवर 'इदंम्‌ पूर्णंम्‌ ... इत्यादी ।' दहा बारा छापील पाने / विसेक पृष्ठे होती.
    एकदा आचार्य विनोबाजींचे छोटेसे भाष्यपण वाचले. मग गीताप्रेसमध्ये जाऊन शोधले. तेथे शंकराचार्यांचे संस्कृत व हिंदीत भाष्य मिळाले. त्यात पहिल्या ओळीवर वीस श्लोकांत भाष्य आहे. त्या पक्त पहिल्या ओळीवर अनेकांनी केलेलं भाष्य आणि अर्थ वेगवेगळे होते.
    मला वाटते ही पहिली ओळ या उपनिषदाचे साररूप आहे.
    खरी गोची यानंतर येते. आजही असे तपस्वी आहेत. उदा. 'E=mc2' किंवा 'Laws of Thermodynamics' लिहिणारे. या शास्त्राच्या काही जाणकारांना हे सिद्धांत मला समजावून सांगण्याची प्रामाणिक विनंती केली. त्यांनीही तसा प्रयत्न केला. पण मी दगडासारखा मख्ख! मी त्यांना विनंती केली : मला सांगा माझ्या सामान्य कौटुंबिक किंवा समाजिक जीवनात हे सिद्धांत कसे, कुठे, केव्हा लागू पडतात? ते पढतमूर्ख काय सांगणार डोंबल?
    मग मला आठवतो माझा लाडका तुकोबा. 'वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा । अन्यांनी वहावा भार माथा ॥' आणिक आठवतो ग्यानबाचा रेडा! अधिक काय लिहू?

    आपल्या या लेख-मालिकेचे साधन आणि साध्य काय ? यांचा संदर्भ मला लागत नाही. मला वाटते, शब्द-चित्र यांच्या मायावी वास्तवतेत माणूस अडकला कि वास्तवाचे अवधान राहत नाही. आणि भूतकाळात / भविष्यकाळात तो रमला की वर्तमान निसटून जातो.

    किती अवतार, प्रेषित होऊन गेले! मला वाटते ते सर्वच सत्तेचे भाट होते किंवा ते राजकीय सत्ता बळकट करण्यासाठी वापरले गेले. हे मी सर्व सुसंस्कृत समाजांबद्दल (Civilized Societies or Civilization) बोलतोय, इतर संस्कृतींबद्दल लिहित नाहीय. मी माझ्या पायाखाली काय जळतेय ते निरखण्यात मग्न आहे. बरोबरच सभोवार काय चाललेय तेपण पाहतो.

    ReplyDelete