ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, September 6, 2014

२०९. क्षणचित्रे: नैरोबी

नैरोबीत मला अचानक चोवीस तास रहायला लागलं ते एक विमान उशिरा सुटल्याने पुढचं चुकलं म्हणून. ट्रान्झिट विसा, हॉटेल, वाहन अशा सगळ्या व्यवस्था विमान कंपनी करते अशा वेळी; तशा त्या केल्या गेल्या होत्या; मला त्यासाठी काही इकडेतिकडे हिंडत बसावं लागलं नव्हतं. आणि त्यामुळे नैरोबी मी ‘पाहिलं’ असं खर तर म्हणता येणार नाही. नैरोबीबद्दल मला काही माहितीही नाही. मी काढलेली काही प्रकाशचित्रं तुमच्यापर्यंत पोचवताना उगाच खरडलेल्या या चार ओळी म्हणा ना!
नैरोबी जवळ आल्यावर आकाशातून दिसणारं हे चित्र बोलकं वाटलं मला.
किती प्रतिकूल परिस्थितीत माणूस वस्ती करतो, आणि निसर्गाशी लढाई करत करतच मानवी संस्कृतीचा विकास झाला आहे हे पुन्हा एकदा लक्षात आलं माझ्या. 

हा हिरवा पट्टा आणि त्याच्या सोबत तो निळा पट्टा – दोन विरोधी विचारसरणी दाखवणा-या. पण अवस्था अशी आहे की त्या निळ्याविना जगता येईल का माणसांना? आता पुढे आलेले मागं कसे जाणार आपण? जायची गरज आहे का नक्की?
आणि मग औद्योगिक संस्कृतीची चिन्हं. नैरोबी शहर नॅशनल पार्कच्या मध्यात आहे असं मला एका केनियन मुलीने सांगितलं.
खूप उशिरा उठायचं असं ठरवून आदल्या रात्री झोपले होते खरी, पण भल्या पहाटे पक्षांच्या किलबिलाटाने जागी झाले. तर बाहेर पाऊस पडत होता, हवेत विलक्षण गारवा होता आणि दोन आफ्रिकन पाईड वॅगटेल (धोबी) लपाछपी खेळत बसले होते. त्यांच्याकडे पाहताना ‘बॅगेतलं वजन कमी करायचं’ म्हणून अखेरच्या क्षणी काढून ठेवलेली दुर्बीण आठवून हळहळले!
हॉटेलच्या खिडकीतून दिसणारं हे आणखी एक दृश्य. अफाट वाळवंटात काही उभं केलंय याची की हे उभं करण्यासाठी वाळवंट निर्माण केलं आहे, हे जाणून घेतलं पाहिजे कधीतरी सवडीने!
हॉटेलमध्ये असताना एक गुजराती चॅनेल पाहायला मिळालं. 
नाही, याची श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान असण्याशी काही संबंध नसावा; केनियात अनेक भारतीय आहेत, आणि त्यातले बरेच  गुजराती भाषिक आहेत.
आणि ही केनया एअरवेज.
पुढच्या प्रवासाला निघताना फोटो, बोटांचे ठसे असे सगळे सोपस्कार चालू होते. तेव्हा समोरची स्त्री ‘अंगुठा” म्हणाली. आधी मला कळलं नाही, मग लक्षात आलं की ती हिंदी बोलायचा प्रयत्न करतेय. 
इथं परत यायला पाहिजे एकदा हेच खरं! 

3 comments:

  1. मग दाखवला ना अंगठा? ( तिला ’ठेंगा’ हा शब्द पण शिकवा पुढच्या भेटीत) :)
    नैरोबी किंवा एकंदर संपूर्ण केनियाच टेक्निकली वाळवंट नाही. उष्णकटीबंधीय गवताळ प्रदेश आहे, सॅवाना प्रकार.

    ReplyDelete
    Replies
    1. हाहा! वाळवंट 'शब्दार्थाने' नाही - 'उजाड करणे/विध्वंस करणे' अशा 'वाच्यार्थाने'!

      Delete
  2. nice photos..I think aatiwas chya wasti badalat aahet ;)

    ReplyDelete