ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, October 24, 2015

२३२. भीतीच्या भिंती: ९ हल्ला

गेला एक महिनाभर आमचं मुख्य रस्त्यावरचं प्रवेशद्वार बंद होतं. ते आहे दक्षिण प्रवेशद्वार. त्यानुळे आमची नियमित ये-जा पूर्वेकडच्या प्रवेशद्वारातून चालू होती. या बाजूला एक महत्त्वाचं सरकारी कार्यालय आहे – निवडणूक आयोग. तालिबान हिटलिस्टवरचं आणखी एक ठिकाण. एक दिवस सकाळी साडेदहाला एसएमएस आला, “पूर्व प्रवेशद्वाराजवळ के ९ तपासणीत एक संशयास्पद वाहन आढळले आहे. पुढची सूचना मिळेपर्यंत हे प्रवेशद्वार टाळा”. आमचं ऑफिस त्या प्रवेशद्वाराच्या अंगणातच. ताबडतोब सुरक्षा रक्षक आले आणि आम्हाला evacuate केलं गेलं. धोका बहुधा फार नसावा, कारण परिसरातल्याच दुस-या टोकाच्या इमारतीत आम्ही गेलो.
 मग बॉम्ब तपासणी पथक आलं, तपासणी झाली. तो एक कचरा वाहून नेणारा ट्रक होता, युएनचा नाही तर आउटसोर्स केलेला होता. युएनच्या परिसरात प्रवेश करणा-या प्रत्येक वाहनाची प्रत्येक वेळी श्वानपथकाद्वारे (बॉम्ब) तपासणी होते, कितीही वेळा ये-जा झाली तरी, आणि अगदी युएनच्या वाहनांचीही. शिवाय प्रत्येक व्यक्तीचं ओळखपत्र दरवेळी तपासलं जातं, त्यात अजिबात हयगय होत नसे. कुत्रा बॉम्बचा संशय येताच खाली बसतो – तसा इथं बसला आणि पुढची सगळी चक्रं फिरली. दोन तास तपासणी होऊनही काही संशयास्पद आढळलं नाही हे खरं. पण या ट्रकचा वापर अन्य कामासाठी झाला होता का, दहशतवाद्यांनी ही एक चाचणी करून बघितली का – असे अनेक प्रश्न मनात आलेच – माझ्या, इतरांच्याही.
एक दिवस नजीब होता गाडीवर. रस्त्याने येताना ‘इकडं अशी लढाई झाली होती, इतके लोक मारले गेले’ वगैरे सांगत होता तो. एकदा त्याचं एका अमेरिकन माणसाबरोबर अपहरणही झालं होतं. मग मला एकदम म्हणाला, “तुम्ही इथं काय करताय? आपल्या घरी जाऊन निवांत रहा की”. काय बोलायचं ते न सुचल्याने मी गप्प बसले.
सदैव पुढच्या क्षणी हल्ला होणार आहे अशा तयारीत राहायची सवय या अशा अनुभवांमुळे होत राहिली. हल्ला झालाच तर त्याला तोंड देण्याची मानसिकताही यातून कळत-नकळत घडत गेली असावी.
हल्ल्याचा प्रत्यक्ष अनुभव एक ना एक दिवस मला येणार होताच, तो त्यादिवशी आला.
शुक्रवार हा माझ्यासाठी अगदी निवांत दिवस असायचा. एरवी सुट्टीच्या दिवशी घरातली इतर बरीच कामं उरकायची असतात, पण मी इथं हॉटेलमध्ये रहात असल्याने घरकाम सदृश्य कुठलंही काम नसायच. बाहेर उगाच आपलं फिरून येऊ हे शक्य नव्हतं. हमीद हा माझ्या संस्थेचा एक श्रीलंकन सल्लागार याच हॉटेलमध्ये राहायचा. तो मुस्लिम होता, त्यामुळे जवळच्या मशीदीत जाऊन यायचा तासभर. पंधरा दिवसांनी एकदा ऑफिसबरोबर आधी ठरवून आम्ही मॉलमध्ये खरेदीला जायचो. हॉटेलमध्ये रात्री फक्त ठरावीक जेवण मिळायचं, आणि ते ८ डॉलर्स असं महाग होतं. दुपारी व्यवस्थित जेवले असले तर मला रात्री इतक्या भरपेट जेवणाची गरज नसायची. मॉलमधली खरेदी म्हणजे या जेवणासाठी पर्यायी व्यवस्था – दूध, फळं, ज्यूस यांचा स्टॉक करून ठेवणं. त्यामुळे ही खरेदी झटपट व्हायची. तशीही २० मिनिटं ही आम्हाला मॉलमधल्या खरेदीसाठी घालून दिलेली वेळेची मर्यादा होती, त्यामुळे तिथं उगाच रेंगाळता यायचं नाही. ज्या मॉलमध्ये आम्ही जायचो त्याच्यावर काही महिन्यांपूर्वी हल्ला झाला होता हे एकदा एकाने सांगितल्यावर मॉलमध्ये जाण्याचंही मी शक्यतो टाळायला लागले.
शुक्रवारी मी निवांत उठायचे, रोजच्यापेक्षा अर्धा तास जास्तीचा व्यायाम करायचे, भरपूर  नाश्ता करायचे, वाचायचे, भारतात फोन करायचे, लिहायचे.
सोबतचे काही लोक सुरक्षा नियम मोडायचे, मलाही त्यात ओढायला बघायचे.
त्या शुक्रवारी सकाळी अकराच्या आसपास गुरखा सैनिकाशी हवापाण्याच्या गप्पा मारत मी उभी होते. तेवढ्यात माझी कॅनेडियन शेजारीण माझ्याकडं आली. तशी आमची आपली हाय-हॅलो पुरतीच ओळख होती. पण आज तिचा बोलायचा नूर दिसत होता.
आज काय करणार आहेस दुपारी?” शेजारणीने विचारलं.
विशेष काही नाही, नेहमीचंच. मी उत्तरले.
मी जाणार आहे बाहेर जेवायला. येतेस का? ” तिचा पुढचा प्रश्न.
तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी ऑफिसची परवानगी घेतली असती, असं आयत्यावेळी नाही मला येता येणार, जणू काही माझाच दोष आहे अशा नम्रपणाने मी उत्तरले.
त्यात काय विचारायचं ऑफिसला? माझ्या ओळखीचा एक टॅक्सीवाला आहे, तो घेऊन जाईल आपल्याला आणि परत आणून सोडेल, शंभर डॉलर्स घेईल तो, निम्मे मी देईन, निम्मे तू दे. मी येणार हे गृहीत धरून बाई बोलत होत्या.
या बाई पण युएनच्या एका संस्थेच्या होत्या. त्यांनी त्यांच्या ऑफिसची परवानगी घेतली असती तर त्या बळावर मला ऐन वेळीही जाण्याची परवानगी मिळाली असती. त्यांच्या ऑफिसचा सिक्युरिटी क्लीअरन्स आहे हे सांगितल्यावर मला काही अडचण आली नसती. पण या परवानगी न घेता चालल्या होत्या तेही खाजगी वाहनाने. अपहरणाविषयी काही दिवसांपूर्वी माझ्या    सहका-यांनी केलेली थट्टामस्करी आणि एक मीटिंग सोडून निघावं लागलं होतं मला – या घटना मी विसरले नव्हते, त्यामुळे मी शेजारणीला शांतपणे नकार दिला.
थोडा धोका तर पत्करायला लागतोच. इथं रूममध्ये नुसत्या भिंती पहात बसणार आहेस का एकटी?” तिने मला उचकवायचा आणखी एक प्रयत्न केला पण मी बधले नाही. निराश होऊन ती आणखी कुणी सोबत येईल का ते पाहायला गेली. तोवर शांतपणे आमचा संवाद ऐकणा-या गुरख्याने मला या देशात काय करायचं नाही हे तुम्हाला चांगलं कळलंय, तुम्ही कधी अडचणीत नाही सापडणार तुमच्या चुकीने असं प्रमाणपत्र कौतुकाने दिलं.  
त्यातले तुमच्या चुकीनेया शब्दप्रयोगाचा अर्थ मला त्यावेळी नीट समजला नव्हता हे थोड्या वेळातच मला समजणार होतं.
चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळी आणि चुकीच्या लोकांबरोबर असणं टाळलं, की साधारणपणे आपण नको त्या परिस्थितीत सापडत नाही असा आजवरचा अनुभव. पण इथं मुळात परिस्थितीच असाधारण असल्याने तुम्ही कधी संकटात सापडाल त्याचा भरवसा नाही.
दुपारचे चार वाजत आले होते. ही माझी कॉफी प्यायची वेळ. किचनमध्ये जाऊन आपल्याला हवी तशी आणि हवी तितकी कॉफी पिण्याइतका निवांत वेळ. हमीदही यायचा किचनमध्ये आणि मग थोडा वेळ गप्पा मारत बसायचो आम्ही. लिहित असलेली मेल अर्धवट तशीच ठेवून मी स्वच्छतागृहात गेले.
धडाड... धडाड...
खळ्ळ....खळ्ळ
कर्कश सायरन.
तिन्ही आवाज एकदम आले.
********
स्वच्छतागृहाच्या खिडकीच्या काचांचा खच माझ्याभोवती पडला आहे, बाहेर बंदुकांच्या फैरी झडत आहेत आणि सायरन वाजत आहे या तीन्ही गोष्टींची नोंद मी निमिषार्धात घेतली. हे वाक्य वाचायला तुम्ही जेवढा वेळ घेतला असेल, त्याच्या एक दशांश वेळात मी ही नोंद घेतली.
पण आपलं मन कमालीचं हट्टी असतं. अनुभवाला नाव दिल्याशिवाय त्याला पुढं जाता येत नाही, संवेदनेची खूण ओळखण्याचा त्याचा आटापिटा असतो.
बहुतेक भूकंप झालेला दिसतोय – परिस्थितीचं आकलन करून घेण्याची मनाची धडपड.
आधी बंकर गाठ, बुद्धीने प्रतिसाद नियंत्रित करण्यात पुढाकार घेतला.
स्वच्छतागृहातून बाहेर आले. खोलीतही काचांचा खच पडला होता.
सायरन वाजतच होता. बंदुकांचे आवाज येतच होते.
हेल्मेट चढवलं. जाकिट जड असल्याने घालता येत नव्हतं, ते हातात घेतलं. घाई कर.
पासपोर्ट, ओळखपत्र, पैसे असलेलं छोटं पाऊच गळ्यात अडकवलं.
किती सेकंदात? बहुधा दोन.
सायरन अजून वाजतोच आहे.
बंदुकांचे आवाज जवळून येताहेत का ?
माहिती नाही, लवकर चल.
हा तालिबान हल्ला आहे का ?
असेल किंवा नसेलही. तू पळ.
ट्राउझर घे हातात, बंकरमध्ये गेल्यावर घाल, आत्ता वेळ घालवू नकोस.
लॅपटॉप बंद करावा काय?
नाही, तेवढा वेळ नाही. तू पळ आता लगेच.
फोन? चार्जर?
हं, दोन्ही हॅन्डसेट घे.
वॉकी-टॉकी?
ती राहू दे, तू पळ आधी बंकरकडे.
बूट कुठे आहेत?
खिडकीजवळ. हं! काचांनी भरलेत ते. असू दे, तू बंकरमध्ये जा.
बाहेर सगळीकडे काचा आहेत, नीट पळ. पाय पूर्ण टेकवू नकोस.
नेहमी खोलीसमोर असतात ते आपले गुरखा ठीक आहेत ना?
त्यांची काळजी तू नको करूस. पळ जोरात.
तो गुरखा पाहिलास ? किती एकाग्रतेने नेम धरून उभा आहे तो.
त्याचा चेहरा विलक्षण शांत आहे.
नाही, त्याच्याशी आत्ता बोलू नकोस. तू पळ बंकरकडे.
तुला भीती वाटतेय ?
माहिती नाही. पण काय झालंय नेमकं ?
कळेल लवकरच.
सायरन वाजतोय अजून!
अजून ?
हं, आता उजवीकडे.
तो बघ, रशीद उभाच आहे दारात.
तो न बोलता बाजूला होतो आणि मला आत जाण्याची खूण करतो.
बंकर.
कुणीतरी माझं जाकिट चढवायला मला मदत करतं.
हेल्मेट मी नुसतं अडकवलं आहे, तेही तिसरं कुणीतरी नीट बसवतंय.
फोन चौथ्याच्या हातात देऊन मी ट्राउझर घालते.
आतमध्ये पंधराएक लोक आहेत.
हमीद कुठे आहे ? हं, आला तोही.
लोक पळत पळत येताहेत.
सायरन वाजायचा थांबला आणि बंदुकींचे आवाज अधिक स्पष्ट झाले.
****
रशीद आणि दोन गुरखा रक्षक. आधी हजेरी झाली. आम्ही २५ लोक असायला हवे होतो इथं (युएनच्या विविध संस्थांशी संबंधित २५ लोक या हॉटेलमध्ये राहतात), त्यापैकी २२ जण होतो. तिघांचा काय पत्ता ? जखमी तर नाही ना झाले ? नाही. उपस्थित सहका-यांकडून दोघे जेवायला बाहेर गेले असल्याची माहिती मिळाली – ती कॅनेडियन शेजारीण आणि आणखी एक. त्यांच्या ऑफिसला फोन केला. आता पुढचे निरोप ते लोक देतील. एकाला गुरखा सोबत घेऊन आला. नाही, तो जखमी नव्हता, पण काय करायचं हे न सुचून खोलीत नुसता उभा होता. गुरखा प्रत्येक खोलीत जाऊन  कुणी जखमी होऊन पडलं नाही ना हे तपासत होते. सुदैवाने आम्हाला कोणालाही काचा लागलेल्या नव्हत्या.
रशीदने सिक्युरिटीला फोन केला. रशीद आमच्या गटाचा वॉर्डन होता, तो सांगेल तसं आम्ही वागायचं होतं.
आपल्या परिसरात दहशतवादी हल्ला झाला आहे. कार बॉम्बचा स्फोट ही त्याची सुरूवात होती.  हल्ल्याचं लक्ष्य आपण आहोत का अन्य कुणी ते अद्याप माहिती नाही. किती वेळ आपल्याला इथं थांबावं लागेल ते सांगता येत नाही, त्यामुळे मोबाईलची बॅटरी पुरवून वापरा. कदाचित evacuation होईल (या जागेतून हलवलं जाईल) . प्यायच्या पाण्याचा साठा मर्यादित आहे. कोप-यात स्वच्छतागृह आहे. मेडिकल इमर्जन्सी वाटल्यास तत्काळ मला सांगा. रशीद हे सगळं इतक्या धीरगंभीरपणे पण सहजतेने म्हणाला की आता पुढं तो विमानाचे पायलट म्हणतात ना तसं पुश बॅक ऍन्ड रिलॅक्स म्हणणार की काय असं मला क्षणभर वाटलं.
बंकरमध्ये एक प्रकारची अवघडलेली शांतता होती. त्या शांततेत मला माझ्या हृदयाची धडधड मग स्पष्ट ऐकू आली. आम्ही सगळेजण एकमेकांना ओळखत होतो पण या आकस्मिक हल्ल्याने सगळेजण हादरले होते, काय बोलायचं ते कुणाला सुचत नव्हतं.
मग ज्याने-त्याने आपापल्या सुरक्षा अधिका-याला फोन करायला सुरूवात केली. जॉर्जला मी फोन केला. एका रिंगमध्ये फोन उचलला गेला आणि मी काही बोलायच्या आधी त्याने मला विचारलं, तू आणि हमीद दोघेही बंकरमध्ये आहात ?” अच्छा, म्हणजे हल्ला झाल्याला अजून तीन मिनिटंही झाली नाहीत तर याला माहिती आहे हल्ला झाल्याची. काही हेल्थ प्रॉब्लेम ? दर अर्ध्या तासाला आपण बोलत राहू. रशीद सांगेल तसं करा. इतकंच बोलणं झालं आमचं.
मग छोट्या गटात लोक आपापसात बोलायला लागले. हमीद मला म्हणाला की तो भावाशी स्काईपवर बोलत होता. अचानक काचा पडताना पाहून भूकंपअसं वाटून तो ताबडतोब कॉटखाली जाऊन आडवा पडला. मग सेकंदभरात गोळीबाराचे आवाज ऐकल्यावर त्याला हल्ला झाल्याचं लक्षात आलं.
बंकर. अदमासे दहा बाय बाराची खोली. दोन सोफा, दोन खुर्च्या. उरलेले खाली बसले.
पुन्हा एक मोठ्ठा हादरा. जणू आमच्या दारातच.
दुसरा स्फोट, कुणीतरी म्हणालं.
त्याक्षणी मला एका सनातन सत्याचा साक्षात्कार झाला. मला भीती मरणाची वाटत नाही, एक ना एक दिवस तो दरवाजा उघडून त्या अनोळखी प्रदेशात पाऊल टाकायचं आहेच. खरं सांगायचं तर त्या जगाबद्दल काहीसं कुतूहलही वाटतं. पण मृत्यूच्या त्या क्षणाकडे नेणा-या वेदनेची भीती वाटते. तुला वेदनारहित मरण देतो अशी कुणी खात्री दिली तर मला मरायचं भय वाटणार नाही. इथं अशा हल्ल्यात मेले तर ठीकच, पण कायमचं अपंगत्व आणि परावलंबित्व नको. – अर्थातच मरणं आपल्या हाती नसतं, जगणं असतं – म्हणून विचार जगण्याचा करावा हेही ओघाने आलं.
तिस-या स्फोटाने आमचा बंकर हादरला.

हे किती काळ चालणार आहे? यातून सुखरूप बाहेर पडणार की नाही आपण? – सगळ्यांच्या मनात तेच प्रश्न. कुणीही हे प्रश्न विचारले नाहीत. हे प्रश्न विचारायचे नाहीत असा आमच्यात जणू एक अलिखित करार झाला होता. ....

(अपूर्ण) 

3 comments:

  1. 'मिसळपाव' वरील प्रतिसाद - http://www.misalpav.com/node/33393

    ReplyDelete
  2. काय काय अनुभवलं आहे तुम्ही!!!

    आता हे पूर्ण कधी होणार म्हनून वाट बघणं आलं!

    ReplyDelete
  3. Hi
    I am pratik puri. I read your blog and liked it. I am also a writer and happen to work in Dailyhunt news and e-book mobile application. Dailyhunt releases news and e-books in 12 Indian languages. I would like to contact you regarding publishing your blog matter on our app. I look after the Marathi language. I would like to publish your blog content on our app for free or paid. In Marathi we have a readership of over 50 lakh people. We would be pleased to have you work with us. Please contact me for further details at pratik.puri@verse.in so that I can give you details of the proposal. Thank you!

    ReplyDelete