ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, September 10, 2010

४३. शब्दांचे अर्थ

“कसं झालं लग्न?” मी घरात पाऊल टाकल्या टाकल्या सुधीरच्या आजीने विचारले.
मी जरा चकितच झाले. कारण ज्यांच लग्न झालं त्यांनाच काय मलाही सुधीरची आजी फार ओळखत नव्हती.

सुधीर माझ्या मैत्रिणीचा - निमाचा - नवरा. एका अटळ (म्हणजे मला उपस्थिती टाळता येण्याची शक्यता नसलेल्या) लग्नानिमित्त मी औरंगाबादला आले होते आणि पोटभर गप्पा मारण्यासाठी निमाकडे येऊन राहिले होते.

“छान झालं लग्न", मी हसत आजींना म्हटले आणि तत्काळ विषय बदलला. आजींना आणखी काहीतरी विचारायचे होते, पण तेवढयात सुधीर आला. “हं! काय, कस काय झालं लग्न?” सुधीरने मला विचारले. सुधीर आणि मी फार कमी वेळा प्रत्यक्ष भेटलो होतो. आमची एकमेकांशी ऒळख निमाच्या द्वारेच जास्त होती. त्यामुळे मी काहीशा कुतुहलाने त्याच्याकडे पाहिले. मला फालतू, निरर्थक पद्धतीने माणसं जपायचा कंटाळा येतो. म्हणून त्याच्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष करत मी म्हटले, “बापरे! सुधीर, ही नव्या घोटाळयाची बातमी पाहिलीस का?” (हाही तितकाच निरर्थक प्रश्न!)

सुधीर समंजसपणे हसला आणि आरामखुर्ची माझ्यापुढे सरकावत "झकास कॉफी करतो, बस तू निवांत" म्हणत स्वयंपाकघरात गेला. आम्ही कॉफी घेत होतो, तेवढयात निमा आली आणि आश्चर्य म्हणजे तिनेही तोच प्रश्न विचारला: “कसं झालं लग्न?”

“अगं निमा, लग्नासारखं लग्न! नवरा नवरीने एकमेकांना हार घातले, भटजींनी आणि काही उत्साही आजीबाईंनी मंगलाष्टका म्हटल्या, माणसं घाईघाईने जेवली, व्हिडीओ कॅसेट काढली वगैरे वगैरे. कोणत्याही लग्नात तपशिलातले फरक सोडले, तर कमी अधिक प्रमाणात याच गोष्टी नसतात का? आणि लग्नपत्रिका पाहून एका नजरेत कळतोच की त्या लग्नाचा प्रकार!” माझ्या स्वरांतला कंटाळा निमाला जाणवला.

क्षणभर गप्प बसून निमा म्हणाली, “फक्त तितकचं नसतं, त्यापलिकडच्याही पुष्कळ गोष्टी असतात. आता बघ, तू असल्या कार्यक्रमांना कंटाळतेस हे मला माहिती आहे. तरीही तू जातेस कारण तुला माणसांची मन जपायला आवडतं. अशा प्रसंगी ओळखीचे इतरही अनेक जण भेटतात. त्यामुळे माझ्या प्रश्नाचा खरा अर्थ होता की, तुझी इतर मित्रमंडळी तुला भेटली की नाही तेथे? तुझा वेळ बरा गेला का? ज्याअर्थी तू माझ्या प्रश्नावर एवढी वैतागलीस त्याअर्थी तुझा वेळ वाईट गेला असावा.”

मी कृतज्ञतेने निमाकडे पाहिले. तिचं हे वैशिष्टयच आहे. मला समजेल अशा भाषेत ती नेहमीच बोलते.

सुधीरकडे वळून मी म्हटले, “सॉरी सुधीर! तुला नेमके काय म्हणायचे होते?”
सुधीर म्हणाला, “ एक तर तुझा वेळ कसा गेला याबाबत आस्था होतीच. शिवाय लग्नातला देण्या-घेण्याचा बाजारूपणा, उधळपट्टी आणि निरर्थक कर्मकांड याबाबत आपली मतं जुळतात. त्याबद्दल तू काहीतरी बोलशील, बोलावेस अशी माझी इच्छा होती.”

“आणि आजी?” मी जरा खजील होत सुधीरला विचारले.
“अगं, आजी जुन्या जमान्यातली. त्यामुळे दागिने किती घातले, जेवायला काय होते, आग्रह कितपत झाला असेच प्रश्न तिच्या मनात असणार...” सुधीर शांतपणे म्हणाला.

“पण मग आपण नेमके प्रश्न विचारण्याऐवजी अशी सरधोपट भाषा का वापरतो?” मी स्वत:ला विचारायचा प्रश्न नाटकातल्या स्वगतांसारखा मोठयाने बोलले.

सुधीर हसला. म्हणाला, “ भाषा कशी बदलणार? आणि खूप नेमके प्रश्न कधीकधी फार उघडेनागडे आणि म्हणून दाहक वाटतात. त्यापेक्षा समोरचा माणूस, त्याच आपल्याशी असणारं नातं या बाबी लक्षात घेऊन सरधोपट भाषेचा खरा अर्थ लावण्याचे आव्हान तू का घेत नाहीस? सगळी माणसं व्यवहारात असचं करतात, त्यात एक गंमत आहे.....”

शब्द तेच, पण अर्थाच्या छटा वेगळ्या, भाव वेगळे, हेतू वेगळे, अपेक्षा वेगळ्या.
हा एक रंजक खेळच आहे तर!
*

6 comments:

  1. सुरेख.. नेहमीप्रमाणेच अप्रतिम..

    'अटळ' लग्न आवडलं :)

    ReplyDelete
  2. एकदम पटेश. अनेकवेळा मनात असते एक आणि विचारणा भलतीच. नेमकेपणा सरळ रस्त्याने गेला तरी उगाचच बोचरा होऊन जातो.

    व्यक्तिसापेक्ष शब्द. :)

    ReplyDelete
  3. हेरंब, आभार. नेहमीप्रमाणेच :-)

    भानस, स्वागत आणि आभार. मला तर वाटतं, फक्त शब्द नाही तर आपलं सगळं जगणच व्यक्तिसापेक्ष असतं!

    ReplyDelete
  4. जबरदस्त!
    खूपच सामान्य पण महत्वाची गोष्ट! हे आपण बरेचदा सबकॉन्शस लेव्हलवर करतोच... समोरचा माणूस पाहून शब्दांचे प्रश्नांचे वेगवेगळे अर्थ लावतो..मित्राच्या 'काय म्हणतोस?' ला दिलेलं उत्तर हे आतबट्ट्याच्या ओळखीनं विचारलेल्या 'काय म्हणतोस?' ला दिलेल्या उत्तराहून नेहमीच वेगळं असतं...
    तुम्ही शब्दांत छान मांडलंय...

    ReplyDelete
  5. विद्याधर, खरे आहे. आपण साधारणपणे नातं लक्षात घेऊन समोरच्याला सामोरे जातो. पण अनेकदा दोन व्यक्तींची नात्याबाबत समज वेगवेगळी असेल तर घोटाळा होतो. असा घोटाळा होऊ नये म्हणून माणसं मनातलं बोलायचं शक्यतो टाळतात असही मी पाहिलं आहे.

    ReplyDelete
  6. Khup precisely mandalet vichar tai. kharach baryach vela je vicharayala have te saral na vicharata valana valanane ka vichartat ha hai ek prashnach aahe... baki lokhan uttamach :)

    ReplyDelete