ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, April 24, 2014

१९८. अनुभव प्रकाशनाचा

गेल्या काही महिन्यांत आणखी एक अनुभव घेतला; प्रकाशनाचा.

‘विवेकानंदांचा वेदान्त विचार’ मी लिहिलं होतं कधीतरी १९९३च्या अखेरीस. पुण्यातली ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा’ एक प्रबंध स्पर्धा घेते - अजून घेते की नाही याची कल्पना नाही; मी ‘इतिहासा’ताली गोष्ट सांगते आहे इथं. तर १९९३ मध्ये अशी स्पर्धा घेतली गेली होती आणि त्या स्पर्धेसाठी मी हा प्रबंध लिहिला होता. लिखाण पंधरा वीस दिवसांत पूर्ण केलं होतं हे आठवतं.

प्रबंधाला पारितोषिक मिळालं ते १९९४ च्या अखेरीस. त्याची माझ्याकडे हाताने लिहिलेली कार्बनच्या साहाय्याने उमटलेली प्रत होती. आता हाताने लिहिणं, कार्बन पेपर वापरणं अशाही गोष्टी जवळजवळ इतिहासजमा झाल्यात. १९९७ मध्ये कधीतरी एका मैत्रिणीने तिच्या घरच्या संगणकावर ‘श्रीलिपी’त मला सगळा मजकूर टाईप करून दिला आणि एका फ्लॉपीवर साठवून मला तो दिला. (आता फ्लॉपीही इतिहासजमा!!) माझ्याकडे तेव्हा संगणक नव्हता. २००४ -२००५ मध्ये कधीतरी मी संगणक घेतला – त्याला फ्लॉपी ड्राईव्ह होता (अजून आहे तो माझ्याकडे) पण त्यावर ‘श्रीलिपी’ नव्हती – त्यामुळे फ्लॉपीवरचा मजकूर वाचता येत नव्हता.

दरम्यान १९९६ मध्ये एका नामवंत प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित करायचं ठरवलं. पुस्तकात मला न विचारता परस्पर बदल केल्यामुळे मी पुस्तकाचं प्रकाशन थांबवलं. आणखी एका प्रकाशनाने काही मुद्दे गाळल्यास प्रकाशनाची तयारी दाखवली – पण असे मुद्दे गाळायला मी तयार नव्हते. आणखी एका नामवंत प्रकाशनाने ‘पुस्तक चांगलं आहे, पण लेखिकेचं नाव नाही ‘ म्हणून पुस्तक परत केलं. मी या पुस्तकाच्या प्रकाशनाचा नाद सोडून दिला. तोवर माझ्याकडची कार्बन प्रतही सापडेनाशी झाली होती आणि फ्लॉपीवरचा मजकूर मला वाचता येत नव्हता.

एकदा (तिच्या) घरातला पसारा आवरताना एका मैत्रिणीला माझ्या लेखनाची कार्बन प्रत सापडली. मी चिकाटी दाखवून कृतीदेव ०२५ मध्ये ते लेखन उतरवून काढलं. ते करताना काही तळटीपा अस्पष्ट झाल्या होत्या- ते संदर्भ शोधून काढायचं एक काम सुरु केलं.

ज्या मैत्रीणीच्या घरात बसून मूळ प्रबंध लिहिला होता – ती २०१० मध्ये मृत्यमुखी पडली. आठवडाभर आधी झालेल्या आमच्या शेवटच्या भेटीत ती ‘या प्रबंधाचं पुस्तक कधी छापणार आहेस’ असं मला विचारत होती. तेव्हा मी नुसती हसले होते – पण ती गेल्यावर रुखरुख लागून राहिली. श्रीलिपीत काम केलेल्या मैत्रिणीने माझ्या कृतीदेवमधल्या लेखनाची पीडीएफ मला करून दिली. दुर्देवाने २०११ मध्ये ही मैत्रीणही गेली. 

या दोघींची आठवण म्हणून तरी हे लेखन प्रकाशित करायला पाहिजे असं मी मनावर घेतलं. तरीही ‘अब्द शब्द’ वर ही लेखमाला प्रकाशित करायला २०१३ उजाडावं लागलं. इथं पुन्हा कृतीदेवमधला मजकूर युनिकोडमध्ये आणण्याची बरीच खटपट करावी लागली. यातले दहा ते पंधरा लेख  ‘मी मराठी’ या संकेतस्थळावरही प्रसिद्ध झाले होते. संकेतस्थळावर लेख वाचून एका प्रकाशकाने “हे पुस्तक आम्हाला छापायला आवडेल” असं मला लिहिलं होतं – पुढे मात्र या प्रकाशकाने माझ्या निरोपांना उत्तर द्यायचं टाळल्यावर मीही गप्प बसले.

पुण्यात मी ज्या भागात राहते, तिथं ‘कोथरूड मित्र’, ‘कोथरूड प्लस’, ‘नवा सिंहगड परिसर’ अशी बरीच पाक्षिकं निघतात. मुख्य म्हणजे आपल्याला नको असली तरी ती आपल्या घरात येऊन पडतात – अर्थात ती फुकट असतात. यातल्या एकावर कधीतरी नजर टाकताना “सेल्फ पब्लिकेशन’ ला मदत करणा-या श्री. आशुतोष पुरंदरे या गृहस्थांची माहिती वाचनात आली, त्यात त्यांचा संपर्क क्रमांकही होता – तो मी टिपून ठेवला आणि विसरून गेले.

रोजच्या वापरातली छोटी टिपणवही भरली; ती टाकून देताना श्री. पुरंदरे यांचा क्रमांक पुन्हा नजरेस पडला आणि मी त्यांना फोन केला. त्यांच्या म्हणण्यानुसार मी ब्लॉगवरच्या लेखांचा दुवा त्यांना पाठवला. मग आम्ही प्रत्यक्ष भेटलो तेव्हा त्यांनी प्रकाशित केलेली काही पुस्तकं मला दाखवली. त्या पुस्तकांचा छपाईचा दर्जा मला आवडला आणि हे गृहस्थ चांगलं काम करतील असा मला विश्वास वाटला.

पुस्तक ब्लॉगवर ज्या फॉन्टमध्ये लिहिलं आहे तसंच छापायचं असं आधी ठरलं. त्यामुळे टंकन आणि प्रुफ रीडिंगचा वेळ वाचणार होता. पण प्रत्यक्षात पहिली नमुना प्रत छापून घेतली तेव्हा लक्षात आलं की तो फॉन्ट तितकासा चांगला दिसतं नाही. आणखी एक मुख्य अडचण होती ती पान जुळणीत. अनेक ठिकाणी शब्दांमध्ये रिकाम्या जागा राहत होत्या आणि त्या काही केल्या कमी होत नव्हत्या. म्हणून मग वेळ लागला तरी  चालेल पण पुस्तक श्रीलिपीमध्ये तयार करायचा निर्णय घेतला. मी दिलेल्या (आंतरजालावरून घेतलेल्या) प्रकाशचित्रावरून श्री पुरंदरे यांनी मुखपृष्ठ तयार केलं – तेही मला आवडलं. पुढे त्याचे रंग आम्ही काहीसे बदलून घेतले. दोनऐवजी तीन वेळा प्रुफ रीडिंग करून पुस्तक तयार झालं आणि ३१ मार्चला ते प्रकाशित केलं. 



स्वत:च स्वत:चं पुस्तक प्रकाशित करायची कल्पना कशी आहे? सुरुवातीला मला ती जितकी हास्यास्पद वाटली होती, तितकी नाहीये हे नक्की. प्रकाशन हा अखेर एक व्यवसाय आहे, त्यातल्या खेळाचे नियम आपल्याला मान्य होतीलच असं नाही. अशा वेळी प्रकाशन संस्थेकडं जायचं म्हणजे अनेक तडजोडी कराव्या लागणार हे लक्षात येतं (अमुक मजकूर बदला, इतकीच किंमत ठेवा वगैरे). वर्षाच्या अखेरीस ‘दहा प्रती फक्त खपल्या, हे घ्या दोनशे रुपये’ असं ऐकण्यासाठी प्रकाशकांच्या मागे कोण लागणार? शिवाय कानावर आलं (खरं-खोटं  प्रकाशक जाणोत – ही ऐकीव माहिती आहे, कुणाची बदनामी करण्याचा हेतू नाही) त्यानुसार आपल्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपणच पैसे द्यायचे असतात. लेखन आपलं, पैसे आपले मग नाव तरी प्रकाशकाचं कशाला?

अर्थात प्रकाशकांकडे उत्तम वितरण व्यवस्था असते आणि त्यामुळे जास्त वाचकांपर्यंत पुस्तक पोचतं हा एक मोठा फायदा आहे. कुणी पुस्तक मागवलं की आपण कुठे पार्सल करत बसणार? स्वत: प्रकाशित केल्याने पुस्तक विक्रीचंही ओझं आपल्यावर येतं हा तोटा आहे. शिवाय आपले पैसे गुंतून राहतात. खूप जास्त प्रती छापल्या तर दर प्रतीमागे खर्च कमी येईल हे खर, पण त्या प्रती विकल्या गेल्या नाहीत तर खर्च आपल्या अंगावर पडणार. शिवाय जे कुणी भेटेल त्याला ‘माझं पुस्तक घ्या हो’ असं मागे लागायला सुरुवात केली तर लोक टाळणार आपल्याला.

मला अर्थात हे पुस्तक व्यवसाय म्हणून छापायचं नव्हतं – त्यामुळे थोडा खर्च करायची माझी तयारी होती. एरवी मला कसलेही महागडे छंद नाहीत – त्यामुळे हा एक महागडा छंद मला करता आला.

श्री. पुरंदरे यांनी पुस्तक वितरणासाठी दोन पर्याय सुचवले – असा पर्याय सुचवणं हा काही त्यांच्या कामाचा भाग नाही; तरीही. ‘बुकगंगा’ वर हे पुस्तक विक्रीला ठेवायची त्यांनी व्यवस्था केली आणि तिथंच ई-बुकही विक्रीसाठी ठेवलं आहे आता. श्री. पुरंदरे यांच्या व्यावसायिक कार्यक्षमतेमुळे एकंदर पुस्तक  प्रकाशनाचं काम मनस्ताप न होता पार पडलं. मुद्रितशोधनात काही चुका राहिल्या आहेत (हा दोष माझा)  – त्या आता लक्षात येताहेत – त्यामुळे कमी प्रती छापल्याचा अजिबात पश्चाताप होत नाही सध्या तरी.

मी ब्लॉग लिहिण्यापूर्वी वृत्तपत्रांत अनेक लेख लिहीत असे.  लेखाची पोच न देणं; लेख छापल्याची माहिती न कळणं; छापील अंक न पाठवणं .. अशा प्रकारच्या त्यांच्या मनमानीला कंटाळून मी तिथं लिहिणं बंद केलं. मग ब्लॉग लेखनाचा पर्याय मला आवडला. पाहिजे तेव्हा लिहा – बंधन नाही. अर्थात ब्लॉगलाही वाचकांच्या प्रतिसादाचा आयाम असतो. कितीही स्वान्तसुखाय लिहिलं तरी वाचक नसतील तर मी किती लिहीन हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ज्यांना बाहेरच्या बाजारात सामील तर व्हायचं नाही, पण वाचकांपर्यंत पोचायचं आहे त्यांच्यासाठी ‘स्वप्रकाशनाचा‘ पर्याय मर्यादित असला तरी चांगला आहे. विशेषत: श्री पुरंदरे यांच्यासारखे संयोजक भेटले तर!


‘अब्द शब्द’चे अनेक वाचक स्वत: लिहितात हे मला माहिती आहे. आपणही ‘स्वयंप्रकाशनाचा’ अनुभव घ्यावा अशी आपल्याला विनंती करत आहे. स्वयंप्रकाशन अनेक लेखक एकत्रही करू शकतात – त्यासाठी इच्छुक लोकांनी नक्की एकत्र यावं. 

9 comments:

  1. अभिनंदन.
    घेते पुस्तक विकत आता.

    - रमा

    ReplyDelete
  2. सविता,
    अभिनंदन पुस्तक निर्मितीबद्दल!
    http://www.rasik.com/ ह्यांच्याशी संपर्क साधला तर ते पुस्तकाची माहिती प्रसिद्ध करतात, विकतात. माझ्या
    ’मेल्टिंग पॉट’ पुस्तकाबाबतीत फार चांगला अनुभव आहे त्यांच्याबद्दल.
    मागे एकदा मी या सर्व गोष्टींची माहिती काढली होती. वितरण ही मोठी समस्या लेखकाची असल्याने प्रकाशक असणं भाग असतं. पण तरीही मला वाटतं सर्व लेखकांनी एकत्र येऊन हे काम करता येईल.

    ReplyDelete
  3. सविता....
    प्रथम पुस्तक प्रकाशनाबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. मीमराठी संकेतस्थळावर वेळोवेळी तुमचे या विषयाचे लेखन प्रकशित होत होते त्यावेळेपासूनच मी आणि दोन मित्र पक्के समजून होतो की सारे लेखन कधीनाकधी तरी पुस्तकरुपाने प्रकाशित होईलच. पण असे केवळ म्हणणे आणि प्रत्यक्ष प्रकाशनाच्या भुंग्यामागे घाम गाळत धावणे हा जो काही प्रकार आहे त्यामध्ये आर्थिक गुंतवणूक तर येतेच शिवाय त्यापेक्षाही लेखकाची झोपही खराब होऊन जाते, ते या मागील असलेल्या अनेकविध त्रासांमुळे. तुमच्या दोन मैत्रिणींचे अकाली तुमच्यातून कायमचे निघून जाणे हा प्रसंग तुम्हाला पाहावा लागला त्याचे दु:ख किती असह्य असेल हे मी जाणू शकतो. वाईट वाटते ते याचे की त्या दोघी तुमचे लिखाण पुस्तकाद्वारे आता लोकांच्यासमोर आल्याचे पाहू शकलेल्या नाहीत. असो. किमान त्यांच्या आठवणी या निमित्ताने तुमच्यासोबत कायम राहतील. श्री.आशुतोष पुरंदरे यांच्यासारखी उत्साही आणि सहकार्याला तत्पर असलेली व्यक्ती तुमच्या सान्निध्यात आली ही एक आनंददायी घटना. पुस्तकांच्या खरेदीबाबत मी तुम्हाला फ़ोनवरून सांगितले आहेच. आता हा प्रकाशनासंदर्भातील अनुभवाचा लेखही वाचायला मिळाला...तुमच्या जिद्दीला सलाम करतो मी.

    ReplyDelete
  4. बापरे! या पुस्तकाचा असा दीर्घ इतिहास आहे हे माहीत नव्हते!
    आपले ब्लॉगवरचे लेखन यूनिकोडमध्ये असते आणि हा फॉण्ट पुस्तकरुपात छापताना फालतू दिसतो. formatting ची अडचण आहेच. ती दूर करताना बरीच खटपट करावी लागते. मी अशी दोन स्वप्रकाशित पुस्तके पाहिली आहेत. दोघांनीही आपले पुस्तक पुस्तकासारखे दिसावे ह्याची चिंता केली नसावी बहुतेक. तुमच्या पुस्तकाचा म्हणूनच आधी प्रीव्यू घेतला होता आणि खुश होऊन तुमच्यापाशी चौकशी केली होती.

    संकेत (फेसबुक)

    ReplyDelete
  5. मनःपूर्वक अभिनंदन.

    ReplyDelete
  6. अभिनंदन!
    युनिकोडचं पुस्तक बनवतांना एवढे कष्ट पडतात हे माहित नव्हतं मला.

    ReplyDelete
  7. अभिनंदन, सविताजी.
    पुस्तक स्वप्रकाशित केल्याबद्दल खास अभिनंदन. कमी किंवा जास्त प्रती छापण्याऐवजी प्रिंट ऑन डिमांड पद्धतीने काढल्यास गुंतवणूक आणखी कमी होऊ शकते आणि पुस्तकात सुधारणा करायच्या असतील तर त्यासही वाव राहतो. पुस्तकाची छापील प्रत पीओडी पद्धतीने काढून ई-बुक मात्र बुकगंगा सारख्या संकेतस्थळावर ठेवल्यास लेखकाला तीळमात्र त्रास होत नाही. मी स्वतः या मार्गाने गेलो आहे.

    ReplyDelete
  8. सविता, अभेनंदन ! मीदेखील प्रकाशनासाठी आशुतोष पुरंदरे यांचे साहाय्य घेऊन तीन पुस्तके प्रसिध्दकेली आहेत. बुकगंगावरही. नावे- नेऽ कुठुही वादळा हा गझलसंग्रह, उर्दू शायरीचा आस्वाद भाग 1 व 2. त्यामुळे त्यांच्या चांगल्या कामाचा अनुभव मलाही आहे. माझे ब्लॉग-लेखन musicajoshi.blogspot वर वाचायला मिळेल. तुमचं लेखन आवडलं. शुभेच्छा.संगीता जोशी

    ReplyDelete