ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, February 24, 2014

१९०. ६१७४

त्या दिवशी ‘Our Scientists’ हे पुस्तक  वाचत होते. नॅशनल बुक ट्रस्टचं १९८६ मधलं प्रकाशन आहे ते. ब-याच काळापासून मागं पडलेलं पुस्तक आहे; म्हणून त्या दिवशी जरा नेटाने वाचत होते. ‘नेटाने’ कारण पुस्तकाची शैली. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची त्यातली ओळख इतकी संक्षिप्त आहे; की कंटाळा यायला लागला मला (म्हणून हे पुस्तक दरवेळी मागे पडत गेलंय माझ्यासाठी!) हे पुस्तक शाळकरी मुलांसाठी आहे हे तर मला आणखी विशेष वाटलं; कारण या पुस्तकात मुलं रमतील असं काहीच नाही दिसलं मला.

एका लेखात ‘स्थिरांक’ आढळला. काय आहे हा स्थिरांक?

१. एक चार अंकी  नंबर घ्या. त्यात किमान दोन वेगळे अंक असले पाहिजेत. म्हणजे ११११, २२२२ हे आकडे       चालणार नाहीत. (मी  लिहीलं: ४६३२)
२. हे चार अंक आता उतरत्या क्रमाने लिहा (६४३२)
३. आता तेच आकडे उलट्या क्रमाने लिहा (२३४६) इथं खर तर ते चार अंक चढत्या क्रमाने लिहा अशी एक सूचना देऊन काम भागलं असतं असं लगेच वाटलं. पण  या दोन्ही आकड्यांचा आपण उपयोग करणार आहोत, त्यामुळे दुसरी पायरी मोडीत काढायची घाई करू नका.
४. आता पहिल्या पायरीतल्या आकड्यातून तिस-या पायरीताला आकडा वजा करा. (४६३२ -२३४६= २२८६)

आता या क्रमांकाला दोन ते चार या प्रक्रियेतून न्या.
बघू काय होतेय ते.

उतरत्या क्रमाने लिहिले अंक: ८६२२
ते उलट्या क्रमाने लिहिले: २२६८
आता वजाबाकी :  ८६२२ -२२६८  = ६३५४

प्रक्रिया पुढे चालू.

उतरत्या क्रमाने लिहीले अंक: ६५४३
चढत्या क्रमाने ते होतात: ३४५६
आता वजाबाकी: ६५४३-३४५६= ३०८७

काही होत नाहीये असं वाटतंय का? थोडा धीर धरा; पुढे करा प्रक्रिया.

उतरत्या क्रमाने: ८७३०
क्रम उलट करून: ०३७८
वजाबाकी: ८७३० -०३७८= ८३५२

पुढे:
उतरत्या क्रमाने: ८५३२
उलटा क्रम: २३५८
वजाबाकी: ८५३२-२३५८ = ६१७४

हं! शीर्षक हे दिलंय – पण याचा अर्थ काय? कळेल, पुढे चालू ठेवा गणिती प्रक्रिया.

उतरत्या क्रमाने: ७६४१
क्रम उलटा: १४६७
वजाबाकी: ७६४१-१४६७= ६१७४
तोच आकडा आला पुन्हा. ६१७४. आता अनंत वेळा (!) हे गणित करत बसलो आपण तरीही नंबर तोच येत राहणार.

दुसरा एखादा प्रयोग करू.
९४२३
९४३२
२३४९
९४३२-२३४९= ७०८३

पुढे बघू काय होतंय ते.
८७३०
०३७८
८७३०-०३७८= ८३५२

काही कळत नाही – पण करत राहू.
८५३२
२३५८
८५३२-२३५८= ६१७४

अरेच्चा! आला की हा ६१७४ परत. काय भानगड आहे ही?

तिसरं उदाहरण घेऊन बघू.

८४१७
८७४१
१४७८
८७४१-१४७८= ७२६३
ठीक आहे; पुढे.

७६३२
२३६७
७६३२-२३६७ = ५२६५

परत एकदा
६५५२
२५५६
६५५२-२५५६= ३९९६

पुढे;
९९६३
३६९९
९९६३-३६९९= ६२६४

आता नाही येत तो ६१७४?
एक मिनिट.

७६४१
१४६७
७६४१-१४६७ = ६१७४

६१७४ हा नंबर ‘काप्रेकर स्थिरांक’ म्हणून ओळखला जातो.

या स्थिरांकाचा उपयोग नेमका कुठे केला जातो यासंबधी मला काहीही माहिती नाही; पण असा नंबर येतो हे पाहणं ही एक गंमत आहे. आणि हा स्थिरांक शोधून काढला आहे दत्तात्रय रामचंद्र काप्रेकर (की कापरेकर?) या आपल्या मराठी माणसाने! विकीवरच्या माहितीनुसार त्यांचा जीवनकाल १९०५ ते १९८६ असा आहे. त्यांचं माध्यमिक शिक्षण ठाण्यात तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं. नाशिकमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं. त्यांनी ‘गणितानंद’ या टोपण नावाने लेखन केलं असा उल्लेखही आहे आणि त्यांनी शोधून काढलेल्या इतर गणिती नंबरांची माहितीही या ‘विकी’ पानावर आहे . नॅशनल बुक ट्रस्टने  ‘Our Scientist’ या  पुस्तकात कै. काप्रेकर यांची दखल घेतली, पण मला मात्र या माणसाबद्दल आणि त्याच्या कामाबद्दल काहीच माहिती नाही हे लक्षात आलं.

Our Scientist’ या पुस्तकातली माहिती संक्षिप्त आहे. कुणाला त्यांच्याबद्दल, त्यांच्या गणितातल्या कामाबद्दल अधिक काही माहिती आहे का? अधिक माहिती कुठे मिळेल याविषयी कुणी सांगू शकेल का?

गणितात आनंद शोधणारी आणि तो मिळवणारी माणसं असतात याचा आनंद होतोय.
आता तरी मला परत गणिताकडे वळायची प्रेरणा मिळतेय का ते पाहते!
**

Saturday, February 15, 2014

१८९. वाचननोंदी: १

मी वाचलेल्या पुस्तकांची अगदी थोडक्यात माहिती सांगतेय. मुख्य हेतू स्वत:साठी नोंद ठेवणं असा आहे. वाचकांना यातून काही चांगली पुस्तकं सापडली तर आनंदच आहे.

जानेवारी २०१४

१.   व्हय, मी सावित्रीबाई – सुषमा देशपांडे (पानं ५७)

सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा एकपात्री प्रयोग श्रीमती सुषमा देशपांडे गेली पंचवीस वर्ष करत आहेत. त्या एकपात्री प्रयोगाची ही छोटेखानी संहिता वाचनीय आहे. यातून फुले दाम्पत्याच्या कामाचे नवे पैलू तर कळतातच, शिवाय ज्या परिस्थितीत त्यांनी काम केलं आणि ते करतानाचे त्यांचे संघर्ष यांचीही माहिती होते. प्रयोग बोली भाषेत सादर केला जातो, संहिताही त्याच भाषेत आहे. ही भाषा वाचायला मस्त वाटते.  

2 . A Tale of Two CitiesCharles Dickens  (पानं २३७)

या जगप्रसिद्ध पुस्तकाबद्दल मी नव्याने काही सांगायची गरज नाही. माझ्यासाठी “All time great” मध्ये या पुस्तकाचा सहज सामावेश व्हावा. फ्रेंच राज्यक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मानवी मनाची आंदोलनं सांगणारं, शेवटपर्यंत उत्सुकता खिळवून ठेवणारं एक सुंदर पुस्तक.

पुस्तकाच्या सुरुवातीचा एक परिच्छेद – मला अतिशय आवडतो म्हणून इथं देतेय.

It was the best of times; it was the worst of times.
It was the age of wisdom; it was the age of foolishness.
It was the epoch of belief; it was the epoch of incredulity.
It was the season of the Light; it was the season of Darkness.
It was the spring of hope; it was the winter of despair.
We had everything before us, we had nothing before us.
We were all going direct to Heaven, we were all going direct the other way –

In short, the period was so far like the present period, that some of its noisiest authorities insisted on its being received, for good or for evil, in the superlative degree of comparison only. 

3. Gospel of Sri Ramkrishna: Mahendranath Gupta (पानं ३२२)

पूर्वी वाचलेलं पुस्तक. परत एकदा वाचावं असं.

महेंद्रनाथ गुप्त (एम) रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य. मूळ बांग्ला भाषेतल्या पुस्तकाचा हा इंग्रजी अनुवाद. हे रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र नाही. यात आहेत रामकृष्ण परमहंस यांचे विविध संवाद - जे एम यांच्यासमोर घडले, त्या संवाद-संभाषणांच्या नोंदी. ही संभाषणं वाचताना रामकृष्ण परमहंस यांचे तत्त्वज्ञान, त्यांची विचारप्रणाली तर कळतेच' पण त्याहून अधिक स्पष्ट कळतो तो त्यांचा (त्या तत्त्वांच्या अनुषंगाने) होणारा व्यवहार. विवेकानंद रामकृष्ण यांना एवढे  का मानतात हा प्रश्न मला पडला होता, त्याचं उत्तर ही संभाषणं वाचून कळतं. 

विचारांचा साधेपणा, सोपी अभिव्यक्ती, समोरच्याला समजतील अशी रोजच्या व्यवहारातली उदाहरणं - आणि त्यासोबत असलेली वैचारिक स्पष्टता; उदारमतवादातून आलेली लवचीकत आपण मूल्याशी कसलीही तडजोड नाही; लहान मुलाचा निरागसपणा  आणि उपजत शहाणपण ... असे रामकृष्णांचे विविध पैलू उलगडत जातात आणि मी चकित होते - पुन्हा एकदा. 

दोन संभाषणं बघा ही उदाहरणादाखल. 

एकदा ईश्वर सगुण आहे की निर्गुण अशी चर्चा चालू आहे. भक्त/शिष्य आपापली मतं सांगताहेत. रामकृष्ण म्हणतात: There is no harm in looking at Him from this or point of view. Yes, yes, to think of Him as Formless Being is quite right. But take care you do not run away with the idea that that view alone is right and all others are false.

जगात आपल्या वाट्याला आलेली कामं पूर्ण निष्ठेने करावीत पण त्यात गुंतून जाऊ नये, आपलं चित्त नेहमी ईश्वरचरणी असावं हे सांगताना ते म्हणतात: A rich man's maid-servant will do all her duties, but her thoughts are always set upon her own home. Her master's house is not hers. She will, indeed, nurse her master's children as if they were her own, saying often "My own Rama', 'My own Hari' . But all the times she knows full well the children are not hers. 

विद्वत्ता आणि शहाणपण; माहिती आणि अनुभव, वक्तृत्वकला आणि संभाषण - अशा अनेक गोष्टींबाबत आपली मतं किती वरवरची आहेत याची जाणीव हे संवाद वाचताना होत राहते. 

वाचलं आहे हे पुस्तक? नसेल तर नक्की वाचा. 

4. Life Beyond Death: Swami Abhedananda  (पानं २४०)

   हे पुस्तक माझ्या संग्रहात कधी आणि कसं आलं (म्हणजे कुणी दिलं, का मी विकत घेतलं) हे आठवत नाही. पुस्तकाच शीर्षक पाहून बरीच वर्ष पुस्तकाला हात लावला नव्हता. पण याच लेखकाची 'गीता प्रवचने' मला आवडली होती. पुस्तक संग्रहात ठेवायचं की नाही याचा एकदा काय तो निर्णय घ्यावा म्हणून अखेर हे पुस्तक वाचायला घेतलं. 
   
   आधुनिक विज्ञान आणि Spiritualism (मराठी प्रतिशब्द सुचला नाही) याचा आढावा घेत पुस्तकाला सुरुवात होते. 'मृत्यूनंतर जीवन असते'  याविषयी प्राचीन समजुती (बायबल, इजिप्त, हिंदू, पारशी इत्यादी) काय होत्या हे सांगितल्यावर याविषयी विज्ञानाचा दृष्टिकोन लेखक सांगतात. या संदर्भात 'मृत आत्म्याशी संवाद घडण्याचे' स्वत:चे आणि इतरांचे अनुभव लेखक सांगतात तेव्हा मी शंकित झाले होते. 
   
   पण एकंदर वेदान्त दर्शनाचा आधार घेत स्वामीजी म्हणतात: आत्मा मरत नाही, तो अनादि-अनंत आहे; शरीर नष्ट पावते. आत्म्याला पुन्हा दुस-या कुणाच्या माध्यमातून परत माघारी बोलावू नये; कारण त्यामुळे त्याच्या पुढच्या प्रवासास बाधा येते. 
   
   खरं सांगायचं तर या पुस्तकातले सगळेच विचार मला पटले नाहीत, पण सगळे टाकून देण्याजोगेही वाटले नाहीत. त्यामुळे तूर्त हे पुस्तक संग्रहात ठेवायचं, पुन्हा एकदा कधीतरी वाचायचं असं ठरवलं आहे. 
   
   अरे हो, स्वामी अभेदानंद यांच्याबद्दल थोडी माहिती. ते रामकृष्ण परमहंस याचे शिष्य होते. अनेक वर्षे त्यांनी अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये वेदान्त विचारांच्या प्रसाराचे काम केले. १९०१ (०२?) मध्ये कॅलीफोर्निया युनिवर्सिटीने त्यांना मानद डॉक्टरेट दिली होती. त्यांचा जन्म १८६६ मधला आणि १९२१ मध्ये त्यांनी देह ठेवला. 

*  **
   वाचननोंदी: २ 


Sunday, February 9, 2014

१८८. आणखी एक जास्वंदी


बस अजून आली नाही म्हणून जास्वंदी खुशीत होती. आज बस चुकली असती तर तिला आजचा दिवस निभावून नेणं अवघड गेलं असतं. आज काहीही झालं तरी तिला शाळेत जायचं होतं. शाळेवर तिचं काही फार प्रेम नव्हतं; पण आज घरी बसावं लागलं असतं तर फार त्रास झाला असता तिला. कधी एकदा घरातून बाहेर पडता येतंय याची ती वाट पाहत होती कालपासून. आज तिला घर नकोसं झालं होतं.

काल रात्री बाबा घरी आले, ते चांगले पिऊन तर्र होऊन. चालताना त्यांच्या झोकांड्या जात होत्या ते लांबून कुणालाही दिसलं असेल. जास्वंदीला आठवतंय तसं बाबा आधी दारू पीत नव्हते. पण गेल्या दोनेक वर्षांत हे सुरु झालं. अलीकडे तिला त्याची सवय झाली होती. बाबा पिऊन आले की घरात एक प्रकारची शांतता असायची – भीतीदायक शांतता. ‘आता कधी स्फोट होईल’ याची वाट पाहणं एवढ एकच काम असायचं त्या शांततेत. तिला आता काय घडणार हे साधारण माहिती झालं होतं अनुभवाने, आणि म्हणूनच भीती वाटायची.

तसं ठरलेलं असायचं सगळं. बाबा पहिल्यांदा आईला काहीतरी घाणेरडं बोलायचे. आई आधी बराच वेळ शांत बसायची, मुकाट्याने स्वैपाक करायची; जेवायला वाढायची सगळ्यांना. मग  आई जास्वंदीला आणि अमोलला जाऊन गुपचूप झोपायला सांगायची. आईचा आवाज असा, की एरवी कटकट करणारा अमोलही निमूट अंथरुणावर पडायचा आणि मिनिटांत झोपीही जायचा. कधीकधी तर अभ्यासाची कटकट नाही, म्हणून अशा प्रसंगी अमोल खूष असायचा. जास्वंदीला मात्र झोप यायची नाही – आईच्या दबक्या हुंदक्यांचा मागोवा घेत राहायाची ती. आईला काहीतरी त्रास होतोय इतकं जास्वंदीला कळायचं पण उठून काही विचारायची तिची हिमंत व्हायची नाही. दुस-या दिवशी सकाळी आई शांत दिसायची पण तिचे डोळे सुजलेले असायचे आणि तिचा चेहरा दु:खी दिसायचा. हे इतक्या वेळा घडलं की बाबांच्या झोकांड्या पाहतातच जास्वंदीला पुढचं सारं दिसायचं – आणि पुन्हा पुन्हा ते तसंच घडायचं – पुस्तकातल्या धड्यासारखं. कधीही वाचा, धडा तसाच असतो, नेमकं तसंच!

दर वेळी बाबा दारू पिऊन आले की हे अगदी  असंच घडायचं. बाबांनी दारू पीत नव्हते तेव्हा किती छान होतं सगळं!

एखाद्या दिवशी तर गोष्टी आणखी बिघडायाच्या. आईचा आवाज चढायचा. त्यावर बाबांचाही. ते आईला घाणघाण शिव्या द्यायचे. आई काही ऐकून घ्यायच्या मूडमध्ये नसायची. मग दोघांचे चढे आवाज, धमक्या, आणि बाबांचा आईला मारण्याचा आवाज. तो आवाज घरभर घुमत राहायचा. शेजारच्या काकू, मावशी, नाना – कुणीतरी  मदतीला येतील म्हणून जास्वंदी वाट पाहायची – पण कुणीच यायचं नाही. आईचं तळमळणं तिला जाणवायचं; पण तीही उठायची नाही. आपण उठलो तर आपल्याला काय पाहावं लागेल याची तिला भीती वाटायची. जास्वंदीही तळमळत राहायची रात्रभर.

काल तसंच झालं. शेजारपाजारचे लोक एरवी इतके गोड बोलतात, मदतही करतात. पण बाबा आईला मारतात तेव्हा मात्र सगळे कुठे गायब होतात देव जाणे! कुणाचा आवाजही नाही ऐकू येत. शेजा-यांना हाक मारली आणि ते आलेच नाहीत तर – म्हणून जास्वंदीने काही कुणाला हाक मारली नाही.

रात्री बाबा आल्याआल्याच आईशी जोरदार भांडले. आईच्या अंगात काही ताकद नव्हती, सारखी रडत होती ती. मग जास्वंदीने भराभरा कणिक मळली, चपात्या लाटल्या, बटाट्याची भाजी केली, बाबांना जेवायला वाढलं. अमोलला एरवी बटाट्याची भाजी आवडते पण काल त्याला नको होती ती.  त्याची कशीबशी समजून काढून त्याला खायला लावलं. त्याने हट्ट केला किंवा नुसता आवाज चढवला असता तर बाबांनी त्यालाही मारलं असतं. अमोल लहान आहे. त्याला गप्प कधी बसायचं आणि कधी हट्ट करायचा हेही कळत नाही अजून. आई काही खायला तयार नव्हती – तिलाही बळेबळे दोन घास खायला घातले. सगळे जेवल्यावर जास्वंदीने उरलंसुरलं पोटात ढकललं; भांडी घासली, अंथरूणं घातली; अमोलला झोपवलं. जास्वंदीला कामाचं काही वाटत नाही, पण ज्या परिस्थितीत तिला काम करावं लागतं, ती परिस्थिती तिला आवडत नाही.

अशा भांडणाच्या रात्रीनंतर दुस-या सकाळी बाबा मात्र एकदम मायाळू होऊन जातात. सूर्य उगवला की बाबा बहुतेक शुद्धीत येतात. अमोलला मांडीवर घेऊन त्याच्या केसांवरून हात फिरवत बसतात, जास्वंदीकडे पाहून हसतात आणि मधेच तिला थोपटतात. त्यांचा आवाज अशा वेळी इतका मऊ असतो की जास्वंदीला एकदम झोप यायला लागते. ते आईकडे पाहून काहीतरी हळू आवाजात बोलतात. ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं आईने, तरी तिच्या चेह-यावरची दु:खाची एक रेषा कमी होते. आई हसली की किती छान दिसते. तिला का रडवतात बाबा?

आई हसली की तिला आईचा राग येतो. का हसते आई बाबांच्या बोलण्यावर? रात्रीच्या शिव्या, रात्रीची मारहाण, रात्रीच रडणं कसं काय विसरून जाते आई लगेच? आईने तिला आणि अमोलला घेऊन हे घर सोडून निघून जावं असं जास्वंदीला वाटतं. तिला नाहीत आवडत आई-बाबांच्या भांडणाचे आवाज आणि आईच हुंदके. पण अशी हसरी आई पहिली की जास्वंदी निराश होते. दारू पिण्याबद्दल आणि ती पिऊन सगळ्यांना त्रास दिल्याबद्दल बाबांना जबरी शिक्षा झाली पाहिजे असं जास्वंदीला वाटतं खरं – पण आईच बाबांच्या बाजूने झाली की शिक्षा कोण करणार बाबांना?

*****
जास्वंदीला खरं तर कधीपासून आईशी बोलायचं होतं. शाळेबद्दल बोलायचं होतं. बाबांशीही बोलायचं होतं. आईच्या आणि बाबांच्या कुशीत शिरून तिला खूप जोरात रडायचं होतं. एक दिवस नाही दोन दिवस नाही, चांगली आठवडाभर जास्वंदी वाट पाहत होती ती घरातल्या शांततेची. पण मागचा आठवडा घरात अगदीच वाईट गेला. रोज बाबा दारू पिऊन यायचे, आईशी भांडायचे, आईला मारायचे, आई रडत बसायची रात्रभर ... असं चालू होतं. महिनाभरातून एक-दोनदा जे व्हायचं ते रोजचं झालं होतं. एरवी काही न कळणारा अमोल पण एकदम उदास झाला होता. त्याचं असं गप्प बसणं जास्वंदीला पाहवत नव्हतं. तो एकदम मोठा झाला होता. जास्वंदीही अशीच नव्हती का मोठी झाली? जास्वंदीला स्वत:चं दु:ख पाहत बसायला वेळ नव्हता; तिला काहीच नव्हतं म्हणा. ना बोलायला कुणी, ना रडायला कुणी, ना पुढचा दिवस चांगला असेल अशी आशा. जास्वंदी मनोमन खचली होती.
*****

आज शाळेत जाण्यातही खरं तर  काही मजा नव्हती. परीक्षा जवळ आली होती आणि त्यामुळे की काय सर आणि बाई जास्त कडकपणे वागत होते सगळ्यांशी. घंटा झाली, मुलं-मुली वर्गात पळतपळत गेली. वर्गाच्या दारात "एमजी" सरांना पाहून जास्वंदीच्या छातीतले ठोके एकदम वाढले. तिच्या तळहाताला घाम फुटला.

एमजी सरांना सगळेजण “गुड सर” म्हणत – म्हणजे चांगले सर. फक्त शाळेतले बाकीचे सर नाही तर मुलं-मुलीही त्यांना “गुड सर” म्हणतात. ते सगळ्यांचे लाडके आहेत. तसे म्हातारे आहेत ते, पण मायाळू आहेत. वर्गातल्या खोडकर मुलांनाही ते कधी मारत नाहीत. छडी वापरत नाहीत, शिक्षाही वेगळ्याच असतात त्यांचा – ‘उठाबशा काढ’ असल्या शिक्षा कधीच नाहीत करत ते. शिकवतात पण छान ते. तास संपायची घंटी थोडी उशीरा वाजली तरी चालेल असं वाटतं त्यांच्या तासाला.

काही मुलांची-मुलींची ते स्पेशल शिकवणी घेतात. शाळा संपल्यावर थांबून ते हे काम करतात  ही शिकवणी कधी दोन तीन मुलांची एकत्र असते – पण ब-याचदा एकेकट्या मुलाला किंवा मुलीला ते शाळा संपल्यावर शिक्षकांच्या खोलीत यायला सांगतात. अशी शिकवणी ते काही फक्त श्रीमंत मुला-मुलींना देतात असं नाही, गरीब मुलं-मुली पण असतात त्यांच्या यादीत. फक्त मुलं नसतात; मुलीही असतात. अशी शिकवणी ते फुकट घेतात, म्हणून सगळेजण त्याचं कौतुक करतात. त्यांच्याबद्दल सगळे चांगलं बोलतात. हं, आता काही मुलं त्यांना नावं ठेवतात म्हणा – पण तशी मुलं-मुली कमीच.

“गृहपाठाच्या वह्या आणा इकडं,” एमजी सर हसून सांगतात. मुलं-मुली आपापल्या वह्या घेऊन टेबलाकडे धावत जातात.

आपण गृहपाठ पूर्ण केला नाही, हे जास्वंदीला आठवतं.  घरात कालपरवा  दप्तर उघडणं शक्यच नव्हतं.

मुलं-मुली आपापल्या वह्या ठेवून हसत परत जागेवर येतात. जास्वंदीचे पाय जड होतात. तिच्या पाठीवरून घामाचे ओघळ वाहायला लागतात. नजरेसमोर धुकं पसरल्यागत होतं. छातीतले ठोके कानात  घुमायला लागतात. चक्कर आल्यासारखं वाटतं तिला.

“जास्वंदी, बाळ, तुझा गृहपाठ कुठंय?” एमजी सर तिच्या अगदी जवळ उभे राहून गोड आवाजात विचारतात. जास्वंदीचे अंगांग थरथरतं. तिला शाळेतून पळून जावंसं वाटतं. ती काही बोलू शकत नाही, तिचे ओठ कोरडे पडलेत. मान खाली घालून ती उभी आहे.

“ठीक आहे, समजलं मला. तुझ्याकडे खास लक्ष देऊन अभ्यास करून घ्यायची गरज आहे दिसतंय. असं कर, आज शाळा संपली की शिक्षकांच्या खोलीत ये. आपण पूर्ण करून घेऊ तुझा गृहपाठ”, एमजी सर शांतपणे बोलतात आणि तिच्या पाठीवर हात फिरवून पुढे जातात. सगळा वर्ग समजूतदारपणे हसतो. त्यात सरांचं कौतुक आहे आणि जास्वंदीबद्दल कणव; अभ्यासात मागे पडलेल्या मुलांबद्दल बाकीच्यांना असते तशी कणव!

“पुन्हा एकदा?” जास्वंदी धीर करून पण असहाय्यपणे विचारते.

“होय बाळ, पुन्हा एकदा!  मागच्या वेळचा अभ्यास आवडला नाही का? पास व्हायचंय ना तुला? मग आवडून घ्यावा लागेल असा जास्तीचा अभ्यास.” एमजी सर मागे वळून तिच्याकडे पाहत बोलतात.  मग जास्वंदीच्या उत्तराची वाट न पाहता म्हणतात, “बरं बाई, थोडा जास्त वेळ घेऊ मग आज. मला काय, तुझी अभ्यास करायची तयारी असली की झालं!” वर्ग पुन्हा एकदा हसतो.

जास्वंदी सैरभैर होते. तिला मागच्या सोमवारची ‘शिक्षक कक्षातली शिकवणी’ आठवते. काहीही झालं तरी एमजी सरांबरोबर एकटीने कधी थांबायचं नाही – हे तिला मागच्या सोमवारी व्यवस्थित समजलं होतं. मागच्यावेळी तिला काही माहिती नव्हतं. पण माहिती असून आज संध्याकाळी थांबणं चांगलं नव्हतं. तिच्या लक्षात येतं की गृहपाठ नाही केला हे तर निव्वळ निमित्त आहे. काहीही झालं तरी आजच्या शिकवणीला तिचा नंबर ठरलेला आहे. गेलं तरी तिचं नुकसान; नाही गेलं त्या शिकवणीला तरीही नुकसान तिचचं. एमजी सर काय, नेहमीच चांगले राहणार सगळ्यांसाठी. आता तिला यातून काहीतरी वाट शोधायला लागणार होती. आईबाबांना भांडणाच्या नादात आपल्या पोरीची पण चिंता नव्हती. वाट काढायची तर ती कुणाच्याही मदतीविना, स्वत:ची स्वत:च.

तास संपल्याची घंटा झाली. पुढचे शिक्षक वर्गात यायच्या आत जास्वंदी तिथून बाहेर पडते. काय करावं? कुठे जावं? कुणाला सांगावं? कोण ऐकेल तिचं? कुणाचा विश्वास बसेल तिच्यावर? “मी असं केलंच नाही” असं एमजी सर म्हणतील आणि सगळे त्यांचचं खरं मानतील. तिला फक्त मार बसेल, ‘खोटारडी’, ‘नालायक’ , ‘आगाऊ’ म्हणतील. कदाचित शाळेतून नाव काढून टाकतील. ते बरं होईल म्हणा. पण शाळेतून नाव नाही काढलं तर? मग काय करायचं? जास्वंदीला खूप रडावंसं वाटतंय.

घराचा रस्ता सोडून जास्वंदी उजवीकडे वळते; दुस-याच रस्त्याला लागते. तिला सुटकेचा फक्त एक रस्ता दिसतोय. त्रास होईल का त्याचा? जमेल का तिला? शेवटच्या क्षणी ती माघार तर नाही घेणार? क्षणभर तिला अमोल आठवतो. तो छोटा आहे अजून, आईला बाबा मारतात तेव्हा अमोलला आपल्याशिवाय कुणी नाही, कसं होईल त्याचं? पण होईल तो मोठा; मी नाही का झाले? होऊ दे बाबांना शिक्षा त्यांच्या दारू पिण्याबद्दल! आईलाही कळू दे हसण्याचे परिणाम. ती बाहेर पडली असती आम्हाला घेऊन तर  दुस-या शाळेत गेले असते मी. मग कशाला हे एमजी सर भेटले असते मला? हं! एमजी सरांचं भांडं  झाकलेलं राहील – पण तसंही आपण काय करू शकणार त्यांचं  वाकडं?
*****

त्या संध्याकाळी  ६ वाजून ३६ मिनिटांनी रेल्वे रुळांच्या मधून एक मुलगी चालत होती. अंगात शाळेचा गणवेश होता, पाठीवर दप्तर होतं. दोन वेण्या वरती बांधलेल्या होत्या, लाल रिबिनी होत्या. तसं काही नवीन नव्हतं म्हणा यात; असे बरेच लोक रेल्वे रूळ ओलांडतात  रोज. पण आज जेव्हा शिट्टी वाजवत गाडी आली, जोरात आली, तेव्हा घडू नये ते घडलं. आसपासच्या लोकांनी बराच आरडाओरडा केला. पण ती मुलगी कसल्या तंद्रीत होती देव जाणे, ती काही बाजूला झाली नाही.

ड्रायव्हरने गाडीचा ब्रेक दाबला – पण तोवर खूप उशीर झाला होता. ती मुलगी क्षणात गेली. पाहणारे सगळे हळहळले. बारा-तेरा हे काही जाण्याचं वय आहे का? काय वाटेल तिच्या आई-वडिलांना? कशी ही आजकालची मुलं? कसल्या तंद्रीत असतात एवढ्या?

पोलीस आले. गणवेशावरून शाळा कळली. तिथं मुलीचा शोध घेतला. मिळालं मुलीचं नाव आणि पत्ता. कळवलं तिच्या वडिलांना.
*****

दुस-या दिवशीची सकाळ.
तीच शाळा. तोच शिक्षक कक्ष.

एक शिक्षिका दुसरीच्या कानात कुजबुजते, “आपल्या शाळेतल्या मुलीने आत्महत्या केली”
“आणखी एका मुलीने..” दुसरी शून्य नजरेने उत्तरते.
तिसरी एमजी सरांकडे एक कटाक्ष टाकते.
चौथी एक दीर्घ श्वास घेते.

सगळीकडे सन्नाटा पसरलाय.
शिक्षक शांत आहेत. मुलं शांत आहेत. भिंती शांत आहेत. पाखरं शांत आहेत.

आपला जबडा पसरून त्या शांततेने सगळं गिळंकृत केलं आहे.
पुन्हा एकदा.

उमलण्यापूर्वी कुस्करली गेलीय.
आणखी एक जास्वंदी.

**

Saturday, February 1, 2014

१८७. शिक्षा


म्या लिवत व्हते. आईशप्पत.
तरीबी गुर्जी म्हन्ले, “आन्जे, शिक्षा तुला. आंगठे धर.

म्या चालली बायेर.
तिकडं चिऊतै, खारुतै, मौ, मोत्या असतेत.
पण गुर्जी म्हन्ले, “आन्जे, माझ्यासमोर, वर्गात.”

आदी हाताचेच अंगठे पकाडले.
समदी हसाया लागली.
गुर्जीनी डोळे वटारल्यावर पायाचे.

गुर्जींच ध्यान नाय बगून हळूच भितीला टेकले.
पोरास्नी जीब काडून दावली. पाठ खाजिवली. नखं खाल्ली.
केसं मागे सारली. पैजण काडलं; बशिवलं.

पाय दुखायले.
येक उचलला. मंग तो टेकवून दुसरा.
डोळे पुसले.
मान वाकडी करून बायेर पायलं.
रस्त्यावर मोत्या बसला व्हता. माज्याकडं तोंड करून.

घंटी वाजली.
जौन मोत्याच्या गळ्यात हात टाकला.
मोत्या मला कदीबी शिक्षा देत न्हाई.  
शिक्षा फकस्त मान्सं देतेत का?


 * शतशब्दकथा

Tuesday, January 21, 2014

१८६. नजर

त्या सकाळी एक एसएमएस आला. “आज विशेषांक पोस्ट करायचं काम आहे. काम जास्त आहे म्हणून जास्त लोकांच्या मदतीची गरज आहे. तुम्ही येऊ शकाल का?”

निरोप एका संघटनेच्या कार्यकर्त्याचा होता.

अनायासे रविवार होता. मला दुपारी थोडा वेळ मोकळा होता. तीनेक तास या कामासाठी देणं मला सहज शक्य होतं. म्हणून मी गेले. अगदी नेमकी दोन वाजता. अपेक्षेप्रमाणे अजून कुणी आलेलं नव्हतं. पण पाच-दहा मिनिटांत इतर लोक यायला सुरुवात झाली आणि अडीचच्या सुमारास आमचं काम जोमाने सुरु झालं होतं. 

काम तसं सोपं होतं. एक पाकीट घ्यायचं, त्याला दोन तिकीटं लावायची. त्यासाठी दोन लोकांची टीम बनली. अशा खरं तर तीन जोड्या बनल्या. एक जोडी तिकीट लावलेल्या पाकिटात अंक घालून पाकीट नीट बंद करायला लागली. पाचव्या जोडीने बंद पाकिटांवर पत्ते चिकटवायला सुरुवात केली. आणि सहाव्या जोडीने त्या अंकांचे पोस्टात पाठवण्याजोगे गठ्ठे बांधायला सुरुवात केली.

त्या बाराजणांमध्ये मीच नवीन होते. बाकी सगळे अनुभवी, नेहमी हे काम करणारे. त्यामुळे अगदी दोन मिनिटांत कसलाही गोंधळ न होता शिस्तशीर काम सुरु झालं. एकदा ते मार्गी लागल्यावर लोक मग आपापसात गप्पा मारायला लागले. काम मुख्यत्वे ‘हाताचं’ होतं; ‘डोक्याचं’ नव्हतं त्यामुळे ‘सिनेमा’पासून ‘आप’पर्यंत; ‘फेसबुक’पासून ‘लता मंगेशकर’पर्यंत ...कोणताही विषय वर्ज्य नव्हता. मधेच चहा आणि खाण्याचे पदार्थही आले. दोन-तीन चांगली गायक मंडळी होती सोबत, त्यांच्या सुस्वर गायनाचा आस्वाद घेतला.

जो अंक पाठवला जात होता त्याच्या मुखपृष्ठाविषयी लोकांचं अगदी सुरुवातीलाच आपापसात बोलणं झालं. त्याची रंगसंगती, ते तयार केलेला कलाकार, त्यावरच्या मुख्य ओळीतून जाणारा संदेश – यावर सविस्तर बोलणं झालं. या अंकाची मी ‘आजीव सदस्य’ असले तरी मी अंक ‘ऑनलाईन’ वाचते – त्यामुळे मी छापील अंकाकडे पाहिलं नाही. शिवाय माझ्या कामातला ८०% वेळ तिकीटं लावण्यात गेला, आणि फक्त थोडा वेळ मी अंक पाकिटात घालण्याचं काम केलं. शेवटी काम संपवायची घाई असल्याने (मी तीन तास थांबणार होते, ती प्रत्यक्षात साडेचार तास थांबले होते – त्यामुळे मला निघायची घाई होती) मी अंक पहिलाच नाही.

“एक अंक घेऊन जा आणि पाहून सांगा कसा झालाय तो” असं संपादकीय काम करणा-या व्यक्तींनी दोन-तीन वेळा म्हटल्याने मग निघताना एक अंक मी सोबत घेतला. पुन्हा एकदा चहापान झालं, ‘पुन्हा भेटूयात’ असं एकमेकांना-एकमेकींना म्हणून झालं आणि मी तिथून (एकदाची) निघाले.

घरी आले. इतर कामं झाली. दुस-या दिवसाची तयारी करताना हा अंक पिशवीतून काढून टेबलावर ठेवला. सहज म्हणून मी त्यावर नजर टाकली आणि मी चमकले.

कारण अंकावर ‘जानेवारी-फेब्रुवारी विशेषांक २०१४’ ऐवजी ‘जानेवारी-फेब्रुवारी विशेषांक २१०४’ असं छापलं होतं.

माझी पहिली प्रतिक्रिया ‘माझी नजर मला धोका देतेय’ अशी होती. तिथं इतक्या लोकांनी हा अंक पाहिला होता की त्यांना हे दिसलं नसेल असं शक्यच नाही. म्हणजे माझीच नजर मला धोका देतेय. बरं ती सगळी जाणकार मंडळी आहेत – त्यामुळे इतकी ठळक चूक त्यांच्या नजरेतून निसटेल हे अशक्य आहे. त्यांनी मुखपृष्ठावर चर्चा केली होती माझ्यासमोरच; त्यामुळे ‘हे पाहायचं राहून गेलंय’ हेही शक्य नव्हतं.

मनाची कशी पळवाट शोधायची घाई असते बघा. वरचं सगळा तर्क खरा असला तरी माझ्या समोरच्या अंकावर ‘२१०४’ दिसत होतंच मला – मग माझ्या मनात असा विचार आला की ‘एवढ्या एकाच प्रतीवर चुकीने तसं छापलं गेलं असेल, बाकी प्रतींवर बरोबर २०१४ असेल’. माझा हा विचार हास्यास्पद होता. कारण प्रत्येक मुखपृष्ठ काही हाताने तयार करत नाहीत – सगळी एकदम छापली असणार; त्यामुळे एका प्रतीवर जी चूक आहे ती सगळ्या प्रतींवर असणार.

मी थोडी संकटात सापडले. आम्ही तिथून निघताना ‘काम लवकर संपल्याचा आनंद’ संयोजकांनी व्यक्त केला होता. अंक उद्या पोस्टात टाकायचे आहेत. आता ही चूक कळवली तर त्यांना सगळे अंक पाकिटातून पुन्हा बाहेर काढावे लागणार, त्यावर नवीन स्टीकर लावून पुन्हा अंक भरावे लागणार - म्हणजे त्यांची आजची रात्र बरबाद होणार.

हा अंक मी तिथे पाच तास होते तेव्हाच का नाही पहिला, अशी हळहळ वाटत राहिली. तेव्हा अनेक लोक होते, काम वाटून घेता आलं असतं, दुरुस्ती लगेच झाली असती. आता मी उशीरा अंक पहिल्याने आधीचे पुष्कळसे श्रम वायाच गेले म्हणायचे.

एक शक्यता अशीही आहे की, ही चूक लक्षात येउनही त्यांनी ‘ती दुरुस्त करायची नाही’ असं ठरवलं असेल तर? मी कोण त्यांना काही सांगणारी?

पण त्या गटाला मी जेवढी ओळखते, त्यावरून चूक अशी दडपून टाकण्याचा मार्ग ते स्वीकारतील असं वाटत नाही. त्यांना अधिक काम करावं लागेल, पण ते करतील. त्यांच्या नजरेतून सुटलेली एखादी महत्त्वाची गोष्ट मी सांगितली नाही तर ते योग्य ठरणार नाही.

मग मी ठरवलं – मुखपृष्ठावर चुकीचा मजकूर छापला गेला आहे हे सांगण्याचं आपलं काम आपण करावं; त्यावर काय निर्णय घ्यायचा ते संबधित लोक ठरवतीलच. त्यांनी निर्णय काय घ्यावा याबाबत आपल्या इच्छेचा काही प्रश्न उद्भवत नाही! पण आपण काय करावं हे मात्र आपण ‘इतर काय करतील/म्हणतील’ यावर अवलंबून ठेऊ नये.

घेतला फोन आणि केला एसएमएस. त्यावर उत्तर आलं एका शब्दाचं – त्यावरून मला निर्णयाचा अर्थबोध काही झाला नाही. पण निर्णयाचा विचार मी करण्याचं कारण नव्हतं – हे मी स्वत:ला आधीच सांगितलं होतं.

दुस-या दिवशी सकाळी फोन आला तेव्हा कळलं की चूक दुरुस्त करण्याचं काम काल रात्रीच हाती घेतलंय टीमने. ते ऐकून मला आनंद झाला.

मुख्य मुद्दा तो नाही.

मुख्य मुद्दा आहे की: जे इतर दहा लोकांना दिसलं नाही, ते मलाच का दिसलं?
का दिसतं नेहमीच?

अशी ‘नजर’ असली की जबाबदारी वाढते. 

असली कसली नजर लाभली आहे मला?

Sunday, January 12, 2014

१८५ . विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १९: मोक्षमार्ग (१)


मोक्ष हा प्राप्य नाही, उत्पाद्य नाही, विकार्य नाही आणि संस्कार्यही नाही हे खरे. मग माणसाने काय करायचे? एक गोष्ट सांगतात की, एकदा एक माणूस झाडाखाली निवांत झोपला होता. ते पाहून दुस-याने त्याला उठून काही काम करायला सांगितले. तो जे काही सांगेल त्यावर पहिल्याचा 'मग त्याने काय होईल? असा प्रश्न तयारच असे. बरीच लांबण लागता लागता ' तुला उद्योग करुन, भरपूर पैसे मिळवून निवांत बसता येईल असे दुसरा माणूस म्हणाला. त्यावर मग आळशी माणूस हसून म्हणाला, 'मग आत्ता मी निवांत बसलोच आहे की! त्यासाठी एवढी सगळी दगदग करायची काय गरज?

तमस आणि सत्व हे दोन्ही गुण टोकांनी पाहिले असता एकाच प्रकारचे दिसतात. जनकासारखा कार्यरत माणूस मुक्त असेल हा विचार आपल्या सहजी पचनी पडत नाही, हा एक भाग झाला. दुसरे असे की, ही आंतरिक अवस्था नेमकी मिळवायची कशी या प्रश्नाला नेमके एक असे सार्वजनीन उत्तर नाही. त्यामुळे संभ्रम पैदा होतो. जर आम्ही स्वरुपत: मुक्तच आहोत अन प्रत्यक्षात आम्ही स्वत:ला बंधनामध्ये पाहतो तर मुक्तीचा काही ना काही मार्ग, काही ना काही प्रक्रिया असलीच पाहिजे असे आपल्याला वाटत राहते.

विवेकानंद म्हणतात, जगातील माणसांची सर्वसामान्यपणे चार गटांत विभागणी होते. ते म्हणजे बुद्धिवादी, भावनाशील, साक्षात्कारवादी आणि कर्मशील. आता या सर्वांना एकाच प्रकारचा मार्ग देवून चालणार नाही. असे करणे म्हणजे त्या माणसाचे नुकसान करणे होय. एकाच मार्गाचे अनुसरण करण्यात सर्वांचे भले नाही. ज्याच्या त्याच्या स्वभावाला अनुसरुन, त्याला साहायक ठरतील असाच मार्ग प्रत्येक व्यक्तीसाठी असला पाहिजे असा विवेकानंदांचा आग्रह आहे .

अर्थात वेगवेगळे असणारे हे सर्वच मार्ग महत्त्वाचे आहेत - पण साधन म्हणून! त्यांच्याद्वारे प्राप्त होणारे गन्तव्यस्थान एकच असल्याने या मार्गांचे आपापसात भांडण असण्याचे काहीच कारण नाही. एखाद्या व्यक्तीला मुंबईहून दिल्लीला जायला अनेक गाडया आणि साधने आहेत. त्याने आपली सोयीची वेळ, दिवस, ऐपत आणि तिकीटाची किमत...इत्यादी पाहून गाडी ठरवावी व जावे - आपण दिल्लीला पोहोचणारच याबाबत कसलीही शंका न बाळगता! एकदा एका विशिष्ट गाडीत बसल्यावर मात्र अमूक एक स्थानक या मार्गावर आलेच नाही अशी तक्रार करत बसू नये. कारण महत्त्व मार्गावरील स्थानकांना नाही तर महत्त्व आहे मुक्कामास पोहोचण्याला!

स्वामीजी म्हणतात, धर्माचे ध्येय गाठण्याच्या पद्धतींना आम्ही 'योग म्हणतो. या योगाचे चार मार्ग आहेत. १. कर्मयोग - या पद्धतीनुसार कर्म व कर्तव्ये यांच्याद्वारे मनुष्य आपल्या दिव्य स्वरुपाचा साक्षात्कार करुन घेतो. २. भकितयोग - या पद्धतीनुसार सगुण ईश्वरावर प्रेम करुन आणि त्याची भक्ती करुन मनुष्य आपल्या दिव्य स्वरुपाचा साक्षात्कार करुन घेतो. ३. राजयोग- या पद्धतीनुसार मन:संयमाच्या द्वारे मनुष्य आपल्या दिव्य स्वरुपाचा साक्षात्कार करुन घेतो. ४. ज्ञानयोग - या पद्धतीनुसार ज्ञानाच्या द्वारे मनुष्य आपल्या दिव्य स्वरुपाचा साक्षात्कार करुन घेतो. त्या एकमेव स्थानाकडे म्हणजे ईश्वराकडे जाण्याचे हे भिन्न भिन्न मार्ग आहेत.


स्वामीजींनी सांगितलेले हे चार मार्ग बरेच प्रसिद्ध आहेत. त्यांचा आपण आता थोडक्यात आढावा घेऊ.
क्रमश: