ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, March 1, 2013

१५४. वाट

त्याची वाट पाहायची तिला सवय झाली होती. नेहमी.
येणं नक्की झालंय म्हणताम्हणता किती वेळा रद्दही व्हायचं.

आणि मग तो आला की भरपूर गर्दी.
ओळखीचे आणि अनोळखीही त्याला भेटायला यायचे.
येणा-या गर्दीच्या डोळ्यांत अभिमान असायचा; चेह-यावर हसू असायचं; वातावरणात आनंद भरून जायचा.
ते पाहताना ‘तो फक्त आपला नाही’ याचं दु:ख ती विसरून जायची.

एक दिवस तार आली.
तो गेला होता. युद्धभूमीवर.
मग तर प्रचंड गर्दी.
अधिकारी, पत्रकार, छायाचित्रकार, राजकीय नेते, सामान्य माणसं.
रीघ नुसती.
त्याच्या शौर्याबद्दल, देशभक्तीबद्दल, त्याने निर्माण केलेल्या आदर्शाबद्दल खूप बोलले ते.

आणि मग कुणीच नाही आलं.
कधीच.
दु:खाने, आशेने आता ती वाट पाहतेय.  
त्या दुस-याची.
मृत्युची. 

(केवळ शंभर शब्दांत - शीर्षक सोडून शंभर शब्द-  अनुभव मांडण्याचा हा प्रयोग.)

18 comments:

  1. नेमके मुद्द्यावर बोट.. आवडलं!

    ReplyDelete
    Replies
    1. भाग्यश्री, शंभर शब्दांत लिहायचं तर पाल्हाळ लावायला वाव रहात नाही ना :-)

      Delete
  2. 'कुणीच आले नाही कधीच तो गेल्यावर', ह्यातून एक खंत आणि समाजाची थंडावत जाणारी वृत्ती जाणवते.
    कोणी गेले कि त्यापाठी शोक फार कालावधी टिकत नाही, वेदनेची तीव्रता कमी होऊन जाते तसे काहीसे..
    "मी जाता राहील कार्य काय!" हि ओळ आठवली...
    छान लिहिले आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. श्रिया, इथं 'मृत्यू' हा विषय तर आहेच पण त्याहून आहे आपली बेगडी आणि तत्कालिक देशभक्ती!!

      Delete
  3. Ani tehi nemkya shabdat.... bhaanas ani aativas viruddharthi shabd aahet vatta ;-)

    ReplyDelete
    Replies
    1. श्रीराज, आभार.
      आणि हो, माझ्या आणि भाग्यश्रीमध्ये विनाकारण भांडण का लावून देतो आहेस बाबा? :-)

      Delete
  4. Replies
    1. आभार हेरंब, ब-याचं दिवसांनी ..:-)

      Delete
  5. त्याची वाट नसते पहायची, हे तिला माहिती नाही बहुदा. किंवा माहिती असूनही वळलेलं नाही. तो येतोच. येण्याची वेळ त्याची त्यानं ठरवलेली असते. आपण वाट पाहण्यात गुंततो ते उगाचच. त्या आशा-निराशेच्या खेळात काही अर्थ नसतो...

    ReplyDelete
    Replies
    1. हं! हे तू लिहीत होतास तेव्हा आपल्याला कुणालाच पुढचं माहिती नव्हतं. तू बरोबर आहेस - नेहमीप्रमाणे!! - रादर; होतास :-(

      Delete
  6. "मायबोली" वरचे प्रतिसाद: http://www.maayboli.com/node/52040

    ReplyDelete