तसं पाहायला गेलं तर हे लेखन ‘त्या एका कादंबरी’बद्दल आहेही आणि नाहीही.
हे लेखन ‘त्या एका कादंबरी’बद्दल
नाही, कारण पुस्तक परिचय करून देण्याचा या लेखाचा उद्देश नाही.
हे लेखन ‘त्या
कादंबरी’बद्दल आहे,
कारण.... सांगते.
खरं म्हणजे हे लेखन त्या
कादंबरीबद्दल कमी आणि माझ्याबद्दलच जास्त आहे.
नेहमीप्रमाणेच 😉
*****
१९९३-९४ या काळातली ही गोष्ट. इतकी
जुनी, आणि बारकावे धूसर झालेली, की हे वर्षही कदाचित मला चुकीचं आठवत असावं. तर
मुद्दा इतकाच की गोष्ट भलतीच जुनीपुराणी आहे.
माझी एक मैत्रीण तेव्हा इलाहाबादला
काम करत होती. ‘इलाहाबाद’ न
म्हणता ‘प्रयागराज’
म्हणायचं असं त्या काळात आग्रहाने सांगण्याइतपत तिच्याभोवतीचं वातावरण होतं. ती
एका संघटनेचं पूर्ण वेळ काम करत होती. मी त्या संघटनेत साडेसहा वर्ष पूर्ण वेळ काम
करून दोन-तीन वर्षांपूर्वी बाहेर पडले होते. पण माझ्या जुन्या संघटनेतल्या स्थानिक
सहकाऱ्यांमध्ये आणि माझ्यामध्ये कसलीही कटुता नव्हती. किंवा असलीच तर ती मला
कळण्याइतपत मी शहाणी नव्हते असंही म्हणता येईल.
ही मैत्रीण, तिचं नाव मीना (आमचा आता
काहीही संपर्क नसल्याने नाव अर्थातच बदललं आहे). ती आग्रहाने मला प्रयागराजला
बोलवत होती. माझं तेव्हा असंच काहीबाही चालू होतं. स्पष्ट दिशा वगैरे असण्याचं आणि
माझं कधीच तितकंस जमलं नाही. त्यामुळे नवं काही खेळणं दिसलं की तिकडं डोकावून
बघायचं असा प्रवास त्या काळात चालू होता. (आजही काही वेगळं घडतंय अशातला भाग नाही
म्हणा!)
तर गेले
प्रयागराजला. मीना तिच्या कामात व्यस्त होती. सभोवताली कार्यकर्त्यांचा कोंडाळं
असायचं. सगळे उत्साही होते. तरूण होते. त्यातल्या काहींना संघटनेच्या कामानिमित्त मी
आधी भेटलेले होते. काहींना माझ्याबद्दल ऐकून माहिती होतं. त्यामुळे मीना मोकळी
नसेल तेव्हा त्यातले कुणी ना कुणी माझ्यासोबत असायचे. मला इकडंतिकडं घेऊन जायचे,
गप्पा मारायचे, खाऊ घालायचे, भेटवस्तू द्यायचे.
एकदा मात्र
कुणीच माझ्यासाठी वेळ द्यायला मोकळं नव्हतं. त्यांचा एक महत्त्वाचा कार्यक्रम ठरत
होता आणि अर्धा दिवस ते बैठकीत असणार होते. मला मीनाच्या टेबलावर एक पुस्तक दिसलं.
मी म्हणलं, “तुमची बैठक
निवांत होऊ द्या. तोवर मी हे पुस्तक वाचत बसते.” मग ते निश्चिंतपणे त्यांच्या कामाला लागले.
तोवर मी
बहुधा कधीच हिंदी पुस्तक वाचलं नव्हतं. त्यामुळे सुरूवातीला मी थोडी अडखळले. पण
त्या कादंबरीने मला गुंतवून टाकलं. ओघवती भाषा, आगळावेगळा विषय, प्रपंच आणि
आध्यात्मिकतेची त्यात घातलेली सांगड ... दिल खुष हुआ... मजा आली. तीन-साडेतीन तास
कसे गेले ते कळलंही नाही. एकदम दुसऱ्या जगात गेल्यासारखं वाटतं होतं. मी आठवणीने
पुस्तकाचं आणि लेखकाचं नाव एका कागदावर लिहून तो कागद व्यवस्थित माझ्या सॅकमध्ये
ठेवला. ‘आपलं जेव्हा
कधी घर होईल तेव्हा हे पुस्तक आपल्या संग्रहात नक्की असायला हवं’ असंही मनाने ठरवलं. हा
विचार कादंबरीच्या संदेशाच्या एक प्रकारे विरोधाभासी असल्याने मला हसूही आलं.
पुढचे काही
दिवस गडबडीत गेले. यथावकाश मी मुंबईला परतले. (तेव्हा मी मुंबईत रहात होते.) पुढं
मुंबईतून बाहेर पडले. दुसऱ्या शहरात स्थिरावले. लातूरच्या भूकंपग्रस्त भागात
वर्षभर स्वयंसेवी काम केलं. मग चार वर्ष आणखी एका संस्थेचं पूर्ण वेळ काम केलं.
महाराष्ट्राच्या विविध भागात कामानिमित्त खूप फिरले. या सगळ्या घडामोडीत अधुनमधून
त्या कादंबरीची आठवण यायची. पण सॅकमध्ये व्यवस्थित ठेवलेला कागद गायब झाला होता.
मला कादंबरीतली काही पात्रं आठवत होती, काही संवाद आठवत होते, काही घटना आठवत
होत्या. पण कादंबरीचं नाव आणि लेखकाचं नाव – दोन्हीही आठवत नव्हतं. स्मरणशक्तीला
ताण देऊनही आठवत नव्हतं. मीना भेटली तेव्हा तिला मी त्याबद्द्ल विचारलं, पण असं
काही पुस्तक तिच्या टेबलावर होतं हेच तिला आठवत नव्हतं. त्यामुळे पुढचं काही विचारायचा
प्रश्नच राहिला नाही.
इलाहाबाद
भेटीला दहा वर्ष होत आली तेव्हा योगायोगाने मी परत एकदा त्या शहरात नियमितपणे
जायला लागले होते. स्वयंसेवी पूर्ण वेळ काम थांबवून मी आता एका सामाजिक संस्थेत
पगारी काम करायला लागले होते. प्रत्येक इलाहाबाद भेटीत त्या कादंबरीची हमखास आठवण
यायला लागली. माझ्या नव्या सहकाऱ्यांना मी या कादंबरीबद्दल काही विचारायचं म्हटलं,
तर मला विचारता येईल ते इतकं त्रोटक होतं की कदाचित त्यातला कुणी पट्टीचा वाचणारा
असता-असती तरी त्यांना ते कदाचित कळलं नसतं. शिवाय माझ्याभोवती वाचनाची आवड असणारे
फारसे लोक नव्हते. जे मोजके होते, त्यांना हिंदी वाचायची आवड नव्हती. आपसूक
इंग्रजी वाचन वाढत गेलं.
जसंजसं
आयुष्य स्थिरावत गेलं तसंतसं त्या कादंबरीचं नाव आठवायचा प्रयत्न नकळत होऊ लागला.
दरम्यान आंतरजालाशी चांगली ओळख झाली होती. पण शोध घेताना ‘कीवर्ड्स’ काय द्यायचे ते कळत नव्हतं. लेखकाचं नाव मला आठवत
नव्हतं. पुस्तकातले काही निवडक शब्द आठवत होते ते असे – ऋषिकुमार, राजकुमारी,
बैलगाडी, प्राण, ब्रह्म, याज्ञवल्क्य, तात्विक चर्चा .......मला देवनागरी टायपिंग
जेमतेम येत होतं. रिकामा वेळ मिळाला की यातलं काही शोधायचा प्रयत्न करायचे मी, पण
यश मिळत नव्हतं. योग्य कीवर्ड्स द्यायला मला फारसं काही आठवत नव्हतं.
मग मी
प्रसिद्ध हिंदी लेखकांची यादी शोधली. पण त्यातलं एकही नाव मला त्या
कादंबरीसंदर्भात आठवेना. मग सुरू झाली एक अस्वस्थता, अंधारातला आणखी एक शोध. आवडलेलं
पुस्तक असूनही त्याबद्दल काही आठवत नाही म्हणून होणारी चिडचीड. त्याबद्दल योग्य
माहिती देणारं (हिंदी वाचक) आपल्या संपर्कात कुणी नाही म्हणून येणारा वैताग. वीस
वर्षांपूर्वी पुस्तकाचं आणि लेखकाचं नाव लिहिलेला कागद हरवला म्हणून स्वत:चा येणारा राग. ‘जाऊ दे मरू दे. आपल्याला आठवत नाही
म्हणजे ते तितकं महत्त्वाचं नव्हतंच पुस्तक आपल्यासाठी’ अशी स्वत:ची समजूत घालण्याचे वारंवार येणारे प्रसंग आणि त्यानंतर
दाटून येणारी अगतिकता. बाहेर अनंत घडामोडी चालू होत्या. कामातून वेळ मिळत नव्हता
...पण मनातल्या मनात त्या पुस्तकाचं नाव आठवण्याची धडपड सातत्याने चालू होती.
दरम्यान
२०१० मध्ये मी दिल्लीत राहायला गेले. त्या काळात हिंदी पुस्तकं वाचण्यावर मी लक्ष
केंद्रित केलं. खूप हिंदी पुस्तकं खरेदी केली, ती सगळी वाचायला अनेक वर्ष लागली तो
भाग वेगळा. ‘कथासरित्सागर’, ‘संत कवियों के प्रमुख
दोहे’, प्रेमचंद
यांचं ‘मानसरोवर’, ‘श्रीकांत’, इस्मत चुगताई यांचं ‘टेढी लकीर’, श्रीलाल शुक्ल यांचं ‘राग दरबारी’ .... अशी बरीच पुस्तकं
विकत घेतली. पण मला हवी होती “ती” कादंबरी काही त्यात
मिळाली नाही.
यथावकाश
दिल्ली सुटलं. दुसऱ्या देशांत राहताना उरला तो फक्त ‘किंडल’चा आधार. आणि इतर (इंग्रजी सोडून इतर) परकीय भाषांची
मुळाक्षरं गिरवण्याचा उद्योग. त्या भाषांमधलं काही वाचण्याचा मोडकातोडका प्रयत्न.
*****
हिंदी लेखकांचा शोध चालू असताना २०२१ मध्ये ‘राजकमल पेपरबॅक्स’ यांच्याकडून काही हिंदी पुस्तकं मागवली. त्यात एक होतं हजारीप्रसाद द्विवेदी यांचं ‘पुनर्नवा’. हजारीप्रसाद यांच्या पुस्तकांचा शोध घेताना त्यात ‘अनामदास का पोथा’ हे नाव आढळलं आणि काहीतरी ओळखीचं वाटलं. आंतरजालावर शोधलं तर हे मुखपृष्ठ दिसलं,
आणि हीच ती आपण गेली तीस वर्ष आठवण्याचा
प्रयत्न करत असलेली कादंबरी असं जाणवलं.
पण
राजकमलकडं ते पुस्तक उपलब्ध नव्हतं. बहुधा त्याची आवृत्ती संपली होती.
डिसेंबर
२०२३ मध्ये पुण्यातल्या पुस्तक प्रदर्शनात राजकमलच्या स्टॉलवर गेले. ‘काशी का अस्सी’ हे काशीनाथ सिंह यांचं
पुस्तक घ्यायचं ठरवून गेले होते. आणि अचानक ‘अनामदास का पोथा’ दिसलं. ते लगेच विकत घेतलं हे वेगळं सांगायला नकोच.
तर असं हे
तीस वर्षांनी पुन्हा भेटलेलं पुस्तक.
कायनात (कहते
हैं किसी चीज़ को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश
में लग जाती है.....) वगैरे काही नसतं, आपल्याला प्रयत्न करावे लागतात .. हेही
एक सत्य उमगलं या प्रवासात.
जणू काही भूतकाळातल्या मला मी पुन्हा एकदा भेटले. त्यावेळच्या मला ही कादंबरी जशी भावली होती, तशी आज पुन्हा भावेल का? तेव्हा जे कळलं असं वाटलं होतं, ते आज पुन्हा कळेल का? की नवे काही शोध लागतील – कादंबरीबद्दल, स्वत:बद्दलही?
पुस्तक
मिळाल्यावर जाणवली ती एक अपार स्वस्थता. आपल्याला मौल्यवान वाटणारं काहीतरी आपल्या
हातातून (आणि स्मरणातूनही) निसटंलय ... या जाणीवेतून येणाऱ्या अस्वस्थतेतून
मुक्ती. एक शांतता. बाहेरचा कोलाहल पूर्ण बंद करण्याची एक ताकद. आता शोधायचं काही
नाहीये .... अशी एक भावना. मुक्काम गाठलाय, आता काही करायची गरज नाहीये असं
समाधान.
कादंबरीतल्या
संदेशाशी या भावना अजिबात मिळत्याजुळत्या नाहीत असं आत्ता वाटतंय. पुन्हा कादंबरी
वाचेन तेव्हा याबाबत अधिक स्पष्टता येईल.
हे पुस्तक
वाचण्यासाठी उघडायला नंतर काही कारणांनी सहा महिने गेले.
सध्या वाचते
आहे, म्हणून हे इतकं सारं आठवलं.
*****
हजारीप्रसाद (१९०७ ते १९७९) हे हिंदीतले एक प्रसिद्ध लेखक आहेत.
त्यांनी अनेक वर्ष ‘शांतिनिकेतन’मध्ये शिकवलं आणि त्याचा प्रभाव त्यांच्या लेखनातही दिसतो.
छांदोग्य
उपनिषदात उल्लेख असलेल्या रैक्व ऋषिची कथा या कादंबरीत आहे.
लहानपणी
आईवडिलांचं छत्र गमावलेला रैक्व ध्यान आणि तप करत असतो, प्राण हेच ब्रह्म आहे या
निष्कर्षाप्रत तो आलेला असतो. एका वादळी पावसात त्याची भेट जानश्रुति राजाची मुलगी
जाबाला हिच्याशी होते. रैक्व याने पाहिलेली ही पहिली स्त्री असते. त्यातून पुढं
फुलते ती एक प्रेमकथा आहे आणि सत्याच्या शोधाचीही कथा आहे.
कादंबरीतल्या
सगळ्याच व्यक्तिरेखा विलक्षण आहेत. बरंच काही लिहिता येईल त्यासंबंधी. पण
सुरूवातीला म्हटलं त्याप्रमाणे पुस्तक परिचय हा उद्देश नाही.
कादंबरीसंबंधी
अधिक इथं जाणून घेता येईल.