खरं तर कन्याकुमारीला जायचा माझा काही बेत नव्हता.
पण वीसेक महिने काम केलेला एक प्रकल्प नुकताच संपला होता. ऑनलाईन काम करण्याचे फायदे खूप जास्त असले तरी सतत संगणकाच्या स्क्रीनवरून लोकांशी बोलण्याचा कंटाळा आला होता. बाहेर कुठंतरी लांबवर भटकायला जाण्याचा मूड होता. तसं तर मला जायचं होतं “स्पिती व्हॅली”त. पण ज्या गटाबरोबर मी जाणार होते, त्यांचा तो कार्यक्रम रद्द झाला. मग म्हटलं “चला, कन्याकुमारीला जाऊयात.”
कन्याकुमारीला जाणं हे वेळ घेणारं प्रकरण आहे. आता सुदैवाने बरेच वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. पुण्यातून बसने अथवा ट्रेनने मुंबईपर्यंत जायचं, तिथून तिरूवनन्तपुरमपर्यंतचं विमान पकडायचं, तिथून बसने अथवा ट्रेनने किंवा टॅक्सीने कन्याकुमारीला जायचं हा एक पर्याय. दुसरा असाच रस्ता पुणे-चेन्नै-कन्याकुमारी असा आहे. या दोन्ही मार्गांवरून प्रवास केला तर काही तासांचा वेळ वाचतो हे खरं आहे, पण दगदग फार होते. शिवाय वेळ वाचवून मला फारसं काही करायचं नव्हतं. म्हणून मग मी पुणे-कन्याकुमारी असा ट्रेनचा प्रवास निवडला.
काही दशकांपूर्वी जेव्हा मी पुण्याहून कन्याकुमारीला (पहिल्यांदा) गेले होते, तेव्हा १०८१ डाऊन ट्रेनने गेले होते. जनरल डब्यातून. लांब पल्ल्याचा असा माझा तो पहिलाच प्रवास होता. मुंबईहून तेव्हा रात्री साडेआठच्या सुमारास ही गाडी पुणे स्थानकात यायची. तेव्हा ती मुंबई-त्रिवेंद्रम गाडी होती. त्या दोन दिवसांच्या प्रवासातल्या अनेक रोचक आठवणी आहेत. ट्रेनमध्ये काही विक्रेते “पाल, पाल” असं ओरडत होते ते ऐकून मी दचकले होते ते आठवतं. “पाल” म्हणजे “दूध” हे कळल्यावर हुश्श झालं होतं. दोनेक वर्षांची रोझी नामक माझी एक सहप्रवासी होती. तिच्याशी खेळताना मजा आली होती. तिच्या आई-वडिलांनी प्रवासात मला खूप मदत केली होती. तेव्हा त्रिवेंद्रमला उतरून कन्याकुमारीचं तिकिट काढायचं होतं- तर सगळेजण मला “केप”चं तिकिट काढायला सांगत होते. “केप” म्हणजेच कन्याकुमारी हे सामान्यज्ञानही त्यानिमित्ताने झालं होतं. ... अशा अनेक रम्य आठवणी सोबत असल्याने मला पुणे-कन्याकुमारी ट्रेन सोयीची वाटली तर नवल नव्हतं.
आता ही गाडी १६३८१ पुणे- कन्याकुमारी अशी आहे. मुंबईऐवजी गाडी पुण्यातून सुटते आणि साधारणपणे छत्तीस तासांनी कन्याकुमारीला पोचते. आता त्रिवेंद्रमला गाडी बदलावी लागत नाही. या गाडीची मला आवडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, आणि केरळ अशा पाच राज्यांतून ही जाते. सोलापूर (महाराष्ट्र), वाडी आणि रायचुर (कर्नाटका), गुंटकल, कडप्पा, तिरूपती (आंध्र प्रदेश), सेलम, कोइंबतुर (तामिळनाडू) अशी महत्त्वाची स्थानकं ही गाडी घेते. केरळमध्ये बराच प्रवास करून नागरकोविलला पुन्हा तामिळनाडूत गाडी प्रवेश करते आणि कन्याकुमारीला पोचते. या प्रवासात ही गाडी भीमा, कृष्णा, तुंगभद्रा, पलार, वसिष्ठ, कोल्लार अशा अनेक नद्या ओलांडते.
तिकिट काढण्यापूर्वी राहायची व्यवस्था करणं आवश्यक होतं. कन्याकुमारीत जायचं तर विवेकानंदपुरममध्येच राहायला हवं. कन्याकुमारीत जाऊन दुसरीकडं कुठंतरी राहण्याची कल्पनाही मी करू शकत नाही. मग विवेकानंदपुरमच्या वेबसाईटवर जाऊन रीतसर माहिती वगैरे भरली. मग असं लक्षात आलं की हल्ली ते एकट्या व्यक्तीला खोली देत नाहीत.
आता जग “सोलो ट्रॅव्हल”च्या युगात आहे, आणि हे लोक एकट्या व्यक्तीला खोली देत नाहीत. The contrast remains strong as ever …. असं वाटलंच. तरीही मी परिसर व्यवस्थापकांना इमेल पाठवली. ओळखी वगैरै सांगायचा (त्यातही मोठ्या लोकांच्या ओळखी सांगायचा) मला प्रचंड कंटाळा येतो. पण मग मी त्या व्यवस्थापकांना शेवटी ‘त्यांच्या काही वरिष्ठ कार्यकर्त्यांशी - पदाधिकाऱ्यांशी - माझी ओळख असल्याचं’ सांगितलं. त्यांनी त्याची खातरजमा केली आणि मग राहण्याची व्यवस्था मार्गी लागली.
कन्याकुमारीला अनेक वेळा गेले असले तरी तिथल्या परिसरात कधी फारशी भटकंती करण्याची संधी मिळाली नव्हती. यावेळी त्यासाठी काही वेळ काढायचं ठरवलं. येताना तिरूअनन्तपुरमलाही दोन दिवस जावं असं ठरवलं. त्यानुसार राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली.
२३ जुलैला रात्री पुणे स्थानकावर पोचले. तिथं टॅक्सीचालकाला पैसे देण्यासाठी माझं मोबाईल इंटरनेट चालेना (बीएसएनएल, दुसरं काय?) तेव्हा टॅक्सीचालकाने त्याच्या मोबाईल इंटरनेटचा हॉटस्पॉट मला दिला आणि मी पैसे दिले. त्याच्या व्यावसायिकतेचं कौतुक वाटलं.
मेट्रो स्थानक आणि रेल्वे स्थानक यांना जोडणाऱ्या पुलावर काही वेळ निवांत बसून राहिले. गाडीची घोषणा झाल्यावर फलाटावर गेले. गाडी वेळेत लागली.
गाडी सुटायच्या पाच मिनिटं आधी एक बाई माझ्या समोरच्या बर्थवर आल्या. त्यांच्याशी जुजुबी बोलणं झालं. त्या इरोडला उतरणार होत्या. तिकीट तपासनीसाने आमचं कोणाचंच तिकिट पाहिलं नाही, फक्त नाव विचारलं, त्याच्याजवळच्या कागदावर खूण केली, आणि गेला.
अशा रीतीने प्रवासाला सुरूवात झाली.
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे मला जाग आली. प्रवासात असले, काही नवं करायचं असलं की मला गजराची गरज भासत नाही. खिडकीतून बाहेर मस्त पहात बसले.
थोड्या वेळाने समोरच्या अम्माही उठल्या. आणि मग सकाळी सहापासून त्यांचे जे व्हिडिओ कॉल्स सुरू झाले ते काही संपता संपेनात. त्याच्यातून थोडी उसंत मिळाली की त्या युट्युबवर काहीबाही ऐकत होत्या. त्यांचा फोन, त्यांचं इंटरनेट, त्यांनी काय ऐकावं यावर मी का मत व्यक्त करतेय असं तुम्हाला वाटत असेल. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्द्ल मला काहीच म्हणायचं नाही. पण माझी अडचण अशी होती की त्या इअरफोन-हेडफोन वापरत नव्हत्या. त्यामुळे ते सगळं माझ्या कानांवर सतत आदळत होतं. “बॅग भरताना गडबडीत इअरफोन घरी विसरला वाटतं तुमचा” - असं माझं गंमतीत म्हणून झालं. पण त्याचा अर्थ त्यांना बहुधा कळला नाही. त्यांचं मनोरंजन चालूच होतं. अखेर तासाभराने मी त्यांना “जरा आवाज कमी करता का तुमच्या मोबाईलचा” असं म्हटलं. काही वेळापुरता आवाज थांबला. परत तो चालू झाला. परत मी त्यांना टोकलं. हे चक्र दिवसभर चालू राहिलं. एकंदर सार्वजनिक जागेत वावरताना मोबाईलवर मोठ्या आवाजात काही ऐकू नये हे पथ्य फारच कमी लोक पाळतात हा अनुभव नेहमीचाच. त्यामुळे मी त्याचा त्रास करून घेतला नाही.
मला त्यांना असं पुन्हापुन्हा टोकताना वाईटही वाटत होतं. कारण त्या बाई तशा अगदी साध्या होत्या. गेली चार वर्ष पुण्यात राहताहेत. मराठी, हिंदी येत नाही. इंग्रजी कामापुरतं बोलू शकत होत्या त्या. त्यांच्या माहेरी भाच्याचं जावळं वगैरे काहीतरी होतं, त्यासाठी इरोडला चालल्या होत्या. प्रेमळ होत्या बाई.
मोडक्यातोडक्या आमच्या संवादाला आणखी चांगली भाषांतरकार मिळाली ती सकाळी आठच्या सुमारास. इंग्रजी आणि तामिळ दोन्ही उत्तम बोलणारी आणखी एक स्त्री प्रवासी रायचुरला आमच्यासोबत आल्या. त्या एका खत कंपनीत शेती अधिकारी होत्या. त्यामुळे ग्रामीण भारताविषयीचे - शेतकऱ्यांविषयीचे - त्यांचे अनुभव ऐकण्याजोगे होते. महाराष्ट्रातल्या विदर्भाचीही जबाबदारी त्यांना नुकतीच मिळाली होती. त्या त्यांच्या स्थानकावर बसताना तिथून इडली घेऊन आल्या होत्या. ती इडली खाण्याचा त्यांनी मला आग्रह केला. मग मी त्या दोघींना आणि तोवर वरच्या बर्थवरून उतरून खाली आलेल्या गृहस्थांना (हे त्रिवेंद्रमचे होते, पुण्यात काही कामासाठी आले होते) माझ्यासोबत कॉफी पिण्याचा आग्रह केला. मग पुढं आपापल्या स्थानकावर ते सगळे उतरून जाईपर्यंत एकत्र खाणं आणि कॉफी घेणं चालू राहिलं.
“गैरसोय झाली तरी चालेल, पण भाषिक अस्मिता आम्ही बाळगूच बाळगू” - या संकल्पनेत लोक कसे अडकलेले असतात त्याचा मग दिवसभर अनुभव आला. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना इंग्रजी येत नाही, आणि या तिघांना हिंदी अजिबात येत नाही - अशी स्थिती. त्यामुळे मला त्यांना मदत करावी लागली. सुरूवातीला मी उत्साहात होते, पण नंतर मात्र मला कंटाळा आला. दोन्ही पार्ट्या अडेलतट्टू आहेत असं माझ्या लक्षात आलं. “टी” म्हणजे “चाय” आणि “दस” म्हणजे “टेन” इतकंही लोकांना कळत नसेल यावर विश्वास बसणं कठीण होतं. मी नंतर निवांत वाचत बसले. तसंही हे पुस्तक लिहून झाल्यावर मी वाचलं नव्हतंच.
थोडं पल्याड फक्त हिंदी बोलणारं कुटुंब होतं. त्यांचं दीड-दोन वर्षांचं बाळ होतं. हिंदी बोलता न येणारे हे तिघं आणि इंग्रजी बोलता न येणारे ते दोघं यांच्यात काहीही संवाद झाला नाही. मला दोन्ही भाषा बोलता येतात त्यामुळे माझं काही अडलं नाही. मातृभाषेचा आदर केलाच पाहिजे. पण समोरच्या व्यक्तीशी बोलता नाही आलं तरी चालेल, पण मी त्यांची भाषा बोलणारच नाही अशा प्रकारचा (एकांगी) अभिनिवेश आपल्याला कुठं घेऊन जाऊ शकतो त्याची ही एक झलक लक्षात राहण्याजोगी आहे.
मी त्या संवादात पाचसहा तामिळ शब्द शिकून घेतले. वणक्कम (नमस्कार), नंद्री (आभार-धन्यवाद), तंबी (धाकटा भाऊ), सापाड (खाणं, जेवण), तन्नी (पाणी), चिन्न (छोटं), सरी (ओके), इप्पडी (कसं), नल्ला (सुंदर) ....... त्या दोघी आपापसात तामिळमध्ये बोलत होत्या तेव्हा असे बरेच शब्द संदर्भाने कळले आणि मी ते त्यांना परत विचारून खात्री करून घेतली. इच्छा असेल तर संवादासाठी कोणतीही भाषा शिकता येते. व्याकरण नाही शिकता येत लगेच, पण मोडकातोडका संवाद नक्कीच साधता येतो.
या प्रवासात आणखी एक प्रयोग केला. रेलरेस्ट्रोमधून जेवण मागवण्याचा. अनुभव चांगला होता.
वेगवेगळ्या राज्यांतून गाडी जात असताना समोरचं दृष्य बदलत होतं. भारताचं भौगोलिक वैविध्य(ही) अचंबित करणारं आहे हे पुन्हा एकदा जाणवलं.
खूप वर्षांपूर्वी कन्याकुमारीत मी पहिल्यांदा आले होते, ती माझ्या आयुष्यातली एक अत्यंत महत्त्वाची घटना होती. त्या घटनेचे तात्कालिक आणि दूरगामी असे अनेक चांगले-वाईट परिणाम झाले. तो प्रवास एका अर्थी आता पूर्ण झालाय. कदाचित तो साजरा करण्यासाठी कन्याकुमारी हे मला एक योग्य ठिकाण वाटलं असेल.
कळेलच काय ते पुढच्या काही दिवसांत - असं म्हणून जास्त विचार न करता मी निवांत बसून राहिले.
त्रिवेद्रमनंतर डबा जवळजवळ रिकामा झाला होता.
गाडी कन्याकुमारीला पोचली.
हे भारतातलं दक्षिणेतलं शेवटचं रेल्वे स्थानक.
इथं माझ्या एका प्रवासाची सुरूवात झाली होती - हे माझ्यापुरतं महत्त्वाचं.
(पुढील भाग लवकरच....)