ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, May 28, 2010

२९. प्रयाग: भाग २

प्राचीन काळी प्रयाग ’तीर्थराज प्रयाग’ या नावाने ओळखले जायचे. भरद्वाज मुनींचा आश्रम या संगमाच्या काठी होता. वनवास काळात राम, लक्ष्मण आणि सीता या आश्रमात मुनींच्या दर्शनाला आले होते असा रामायणात उल्लेख आहे. ययातिकन्या माधवीशी गालव मुनींनी येथेच विवाह केला होता. रामायण, महाभारत, मत्स्यपुराण, वामनपुराण, पद्मपुराण, शिवपुराण, कूर्मपुराण, ब्रह्मपुराण अशा अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये प्रयागचा उल्लेख आहे. भक्त प्रल्हादाने येथील संगमात स्नान केले होते असे भाविक मानतात. जैनांचे पहिले तीर्थंकर श्री आदिनाथ स्वामींनी याच ठिकाणी तप करून कैवल्यद्न्यान प्राप्त करून घेतले होते असेही मानले जाते.

प्रयागसंबंधीचे अनेक उल्लेख ऐतिहासिक काळातही आढळतात. यमुनातीरीचा किल्ला सम्राट अशोकाने बांधलेला आहे. समुद्रगुप्ताचा ’प्रयाग प्रशस्ती’ शिलालेख प्रसिद्ध आहे. चिनी प्रवासी ह्युएन्संगने इसवी सन ६४३ मध्ये प्रयाग नगरीत सम्राट हर्षवर्धनची भेट घेतल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

इलाहाबाद ही उत्तर प्रदेशची सांस्कृतिक राजधानी आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आधुनिक काळात इलाहाबादने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पंडित मदनमोहन मालवीय, मोतीलाल आणि जवाहरलाल नेहरू, पुरूषोत्तमदास टंडन, सर तेजबहादूर सप्रू, चंद्रशेखर आजाद असे अनेक धुरंधर नेते दिले आहेत. तर साहित्याच्या दरबारात पंडित रामनरेश त्रिपाठी, श्रीमती महादेवी वर्मा, श्री. सुमित्रानंदन पंत, पंडित सूर्यकांत त्रिपाठी निराला, हरिवंशराय बच्चन अशी अनेक रत्ने सादर केली आहेत.

या थोर व्यक्तिमत्त्वांचा परिणाम म्हणून की काय, पण प्रयागमध्ये मला भेटलेले सर्व तरूण आणि तरूणी एकतर राजकीय कार्यकर्ते तरी होते किंवा कवी तरी होते. चर्चेचे, गप्पांचे विषय दोनच – राजकारण आणि साहित्य. अयोध्येसारखा भावनिक आणि स्फोटक विषय मी जाणीवपूर्वक टाळत होते पण ’आज सकाळच्या जेवणासाठी कोणती भाजी करायची?’ या साध्या प्रश्नाची सांगताही राजकीय विचारांनी अथवा कवितेने व्हायची. जीवनातल्या कोणत्याही समस्येवर उत्तरे दोनच – एक म्हणजे राजकीय व्यवस्था बदला; किंवा चांगल साहित्य लिहून जनमत परिवर्तन घडवून आणा! चर्चेला मी सोडून कोणीच कंटाळायचं नाही. इतक्या थकवा आणणा-या चर्चा फक्त पुणेकरच करतात असा माझा तोवरचा अनुभव होता. पण प्रयागकर पुणेकरांपुढे सहजासहजी हार मानणार नाहीत अशी माझी तेंव्हा खात्री पटली होती.

उत्तर भारतात हिंडताना महाराष्ट्र प्रगतीशील असल्याचा एरवी पोकळ वाटणारा दावा खरा वाटायला लागतो. सामाजिक शिस्त, सामाजिक जबाबदारी हे शब्द आपण येथे बोलतो तरी! माझ असलं बोलंण प्रयागच्या मुलामुलींना अगदी विनोदी वाटायच. परतीच्या प्रवासाला मी निघाले तेंव्हा रेल्वे स्थानकावर मला निरोप द्यायला आलेल्यांना मी ’प्लटफार्म तिकिट काढू तुमची’ असं सुचवताच एखाद्या गावंढळ माणसाला हसावं तसे सगळे मला हसले. “आमचं एवढं मोठं टोळकं पाहून हिंमतच नाही व्हायची कोणाला तिकीट विचारायची" असं त्यांनी मला स्वच्छपणे सांगितलं! त्यांच्या सांगण्यात काही साहसाची झलक नव्हती, होता सहज स्वाभाविकपणा!

बांदा जिल्ह्यातून प्रवास करताना माणसांचं एक वेगळं दर्शन घडलं. ठिकठिकाणी लोक खांद्यांवर बंदूक घेऊन हिंडत होते. मला तर आधी सैनिक किंवा पोलीस गणवेषात का नाहीत हे कळेना. एका सहप्रवाशाला विचारल्यावर ’पोलिसाबिलिसांवर आमचा विश्वास नाही, इकडे आपल रक्षण आपणच करायच असतं’ अशी त्याने माहिती दिली. ’आम्ही तिकीट काढणार नाही. एखाद्या दिवसाची गोष्ट वेगळी, आम्ही रोज शाळेत जातो ते शिकायला. तेथे काही आम्हाला पैसे मिळत नाहीत, मग आम्ही कुठून द्यायचे?” असली शाळकरी मुलांची गुंडगिरी कोणालाच खुपत नव्हती. वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षीच त्यांच्या गाठीशी इतका अनुभव होता!

प्रशासनव्यवस्थेवरचा लोकांचा अविश्वास लक्षात येण्याजोगा होता. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असल्याचा आपण तोरा तर मिरवतो, पण त्या लोकशाहीची खरी अवस्था काय आहे? लोकशाही म्हणजे फक्त आमदारकी, खासदारकी, महामंडळांची अध्यक्षपदे, मंत्रीपद, गाडया, बंगले, चैन! आणि मतदारांच्या दृष्टीनेही आपल्या पुढा-याकडून गैरमार्गाने आपापली कामे करून घेण्याचा परवाना! प्रशासनव्यवस्थेची स्थिरता, तिची विश्वासार्हता, तिची कार्यक्षमता, यांचे महत्त्व कोणालाच – अगदी जनता जनार्दनालाही नाही! एका प्रसंगी आमची बस ’चक्का जाम’मुळे बराच वेळ थांबून होती. त्यावेळी प्रवासी आपापसात गप्पा मारत होते. कशावरून तरी संजय दत्तचा विषय निघाला. एक तरूण म्हणाला, “ हे मराठी लोक जरा जास्तच संवेदनशील आहेत. एक एके ५६ मिळाली तर त्याला टाडा लावून तुरूंगात ठेवलय त्यांनी! त्या लोकांना इकडे आपल्याकडे येऊन बघा म्हणावं! घरोघरी एके ५६ आणि ५७ मिळतील. टाडा लावता लावता पळापळ होईल मराठी लोकांची!” त्यावर बसमधले सगळे लोक मनापासून हसले. तो संवाद ऐकताना माझ्या हृदयाचा एक ठोका नक्कीच चुकल होता!

याचा अर्थ उत्तर प्रदेशात सगळं काही वाईट आहे आणि महाराष्ट्रात सगळं काही आलबेल आहे, असा मात्र मुळीच नाही. सगळ्याच समाजांमध्ये, सर्वच काळात चांगल्या आणि वाईट गोष्टी बरोबरीने, अगदी हातात हात घालून नांदत असतात. महाराष्ट्रात गुंडगिरी, दहशतवाद नाही असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल. पण आपण आपल्यासाठी त्यातल्या त्यात सुरक्षित जागा शोधलेली असते, आणि इतरांनीही ती शोधली असेल हे आपण गृहित धरतो. आपली जागा सोडली की दुसरी बाजू दिसायला लागते. प्रवासात असे प्रसंग वारंवार येतात!

प्रयागमधल्या माणसांची खरी ताकद प्रयागच्या ऐतिहासिक महत्त्वात आणि इलाहाबाद विश्वविद्यालयात दडलेली आहे. अगदी सामान्य माणूसही या दोन विषयांवर भरभरून बोलतो. प्रयागची थंडी आणि गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर गूळ तूप खाणं हा एक अस्सल ’गावरान’ अनुभव होता. तेथील सांस्कृतिक चर्चासत्रांचे केंद्र असणा-या ’काफी हाऊस’ ला भेट देणे मात्र जमले नाही वेळेअभावी.

प्रयागला परत येण्यासाठी म्हणून तिथल्या मित्रमंडळींनी अर्धकुंभमेळ्याचे दिलेले आमंत्रण अजूनही तसे बाकी आहे. आठवणींच्या कप्प्यातले ते प्रयाग आता मला भेटत नाही. मागच्या दहा वर्षांत किमान पंचवीस वेळा प्रयागला जाणे झाले. पण आता मला वेगळेच प्रयाग दिसते, भेटते. मी बदलेले तशीच प्रयागही तर बदलणारच जगण्याच्या ओघात!

No comments:

Post a Comment