ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Wednesday, May 22, 2013

१६७. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १३ जगत्

भाग १२. ब्रह्म

सगुण आणि निर्गुण हे दोन्ही प्रकारचे ब्रह्म स्वीकारले म्हणजे जगाबाबतचा प्रश्न मिटला असे मात्र नाही! उलट तो अधिकच गुंतागुंतीचा बनतो. या जगाची निर्मिती कोणी केली? सगुण ईश्वराने? कधी? मग त्याआधी काय होते? ही निर्मिती कशापासून केली?  दुस-या एखाद्या वस्तूपासून? मग या दुस-या वस्तुचे स्थान ईश्वराच्या बरोबरीचे होते का? ईश्वर तर सर्वव्यापी आहे मग ईश्वरापासून भिन्न अशी ही दुसरी वस्तू कोठे होती?

की ईश्वराने ही सृष्टी स्वत:तूनच निर्माण केली? ‘सृष्टी निर्माण करावीअशी इच्छा त्याला कशी काय निर्माण झाली? अशी इच्छा निर्माण झाली याचाच अर्थ तो 'अकामहत्’ नाही. शिवाय हे जग जर ईश्वरापासूनच बनले असेल तर मग त्याच्यात वाईट गोष्टी आल्या कोठून?

या जगाला खरे म्हणजे काही अस्तित्वच नाही, ते केवळ भासमान होते (त्याचा आपल्याला भास होतो)  असे तर नाही? ते वास्तवात नाही पण केवळ आपल्याला प्रतीत होते असे तर घडत नाही ना? पण मग माणसांची सेवा वगैरे सगळया गोष्टीही भासमान नाहीत का? माणसे भूकंपाने मरोत अथवा अपघाताने, प्लेगने मरोत अथवा दुष्काळाने ..................या भासमान जगात सेवाकार्य करणे म्हणजे वेडेपणाच आहे. त्या सेवाकार्याने असे काय मोठे साधले जाणार आहे? पण विवेकानंद तर त्यांच्या गुरुबंधुंना आणि अनुयायांना अशा सेवाकार्यांसाठी सतत उद्युक्त करत. प्लेगग्रस्त भागातील मदतकार्यासाठी पैसा कमी पडतो म्हणून हेच विवेकानंद रामकृष्ण मठासाठी घेतलेली जमीनही विकायला तयार होतात!! .... या सगळया परस्परविरोधी विचारांची संगती कशी लावायची? जगाविषयी विवेकानंदांचे नेमके मत तरी काय आहे?

शंकराचार्यांचे जगाविषयी मत समजून घेणे तुलनेने सोपे आहे. त्यांनी सृष्टीच्या प्रक्रियेची चर्चा केली आहे. पंचीकरणाविषयी सांगितले आहे. पण शंकराचार्यांची जगाविषयीची चर्चा केवळ व्यावहारिक’ (पारमार्थिक, प्रातिभासिक आणि व्यावहारिक या सत्तात्रयाचे विवेचन आपण आधी पहिले आहे) पातळीवरुनच सत्य आहे. या जगाविषयीची आपली जाणीव, त्यातला आपला व्यवहार, त्यातील आपली सुखदु:खे ...... हे सारे काही खरे आहे पण कोठवर? जोवर आपण व्यावहारिक पातळीवर आहोत तोवरच! परमार्थिक पातळीवरुन पाहता या जगाला मुळी वास्तविकताच नाही. पारमार्थिक सत्तेच्या दृषिटकोनातून बोलायचे झाले तर 'अगा जे घडलेचि नाही, तयाची वार्ता पुससी कायि?  अशीच ही स्थिती  आहे!

विवेकानंदांना केवलाद्वैत वेदान्ताची, निर्गुण ब्रह्माची, पारमार्थिक सत्तेची कल्पना पूर्णत: मान्य आहे. पण त्याचबरोबर जगाची सत्ता - त्याची सत्यताही त्यांना मान्य आहे. जगाचा विचार करताना रामानुजाचार्य आणि मध्वाचार्य यांच्या संकल्पना विवेकानंदांना जास्त जवळच्या वाटतात असे दिसते. ब्रह्म (किंवा विष्णु किवा श्रीहरी) सर्वशकितमान आणि सत् आहे. त्याची निर्मिती असणारे हे जग मिथ्या अथवा असत् कसे बरे असेल? त्’पासून असत्’ कसे निर्माण होईल?

विवेकानंदांची भूमिका थोडक्यात खालील प्रकारे मांडता येईल. ' ब्रह्म सत्यं, जगत् सत्यं, जीवो ब्रह्रौव नापर: निर्माता आणि निर्मिती यांच्यातील भेद कायम स्वरुपाचा नाही. पारमार्थिक पातळीवर ब्रह्म आणि जगत् असा काही भेद नसतोच - कारण 'सर्व खल्विदं ब्रह्म. पण विवेकानंदांच्या मते केवळ ब्रह्मच नव्हे तर जगदेखील सत्य आहे.

हे जग काय आहे? तर अनंत, अनिर्वचनीय, निर्गुण, निराकार ब्रह्माची सान्त रुपातील अभिव्यक्ती आहे. 'अनंत सान्त कसे होईल? हा प्रश्न तर्कदृष्टया चुकीचा आहे. जे अनंत आहे ते आपल्या इच्छेने सान्त रुप का बरे धारण नाही करु शकणार? सान्त रुप ही त्याची पूर्ण अभिव्यक्ती नाही याचा मात्र आपल्याला कदापि विसर पडता कामा नये. समुद्रातले पाणी जर आपण एखाद्या वाटीत भरुन घेतले तर त्या पाण्याची चव थोडीच बदलते? तसेच काहीसे हे अनंत-सान्ताचेही आहे. एखाद्या राजाला एके दिवशी विनाकारणच भिकारी बनून राज्यात भटकायची इच्छा होते. आता राज्याचा मालकच तो! त्याच्या इच्छापूर्तीसाठी त्याला काही कोणाची परवानगी वगैरे घेत बसावे लागत नाही! त्याला अडवणार तरी कोण? पण म्हणून काही हा राजा एखाद्या खरोखरच्या भिका-यासारखा तहान-भुकेने व्याकूळ होत नाही. पण सोंग घेतलेल्या काळापुरता तो भिकारी खोटाही ठरत नाही.

हे अनंत ब्रह्म सान्त जगात कसे परिणत, परिवर्तित झाले हा प्रश्न आता समोर उभा राहतो. ज्ञानयोगावरील प्रवचनांमध्ये विवेकानंदांनी या परिवर्तनाचा सविस्तर आढावा घेतला आहे. विवेकानंद म्हणतात की, या जगाला भौतिक अस्तित्व आहे असे मानण्याची चूक आपण सारेचजण करतो! पण वास्तविक पाहू गेल्यास या जगाचे अस्तित्व  मानसिक आहे!

विवेकानंद पुढे म्हणतात की, या जगाला निरपेक्ष अस्तित्व नाही, याला फक्त सापेक्ष अस्तित्व आहे. केवळ तुमच्या, माझ्या नि इतर प्रत्येकाच्या मनाच्या बोधाच्या सापेक्षानेच या जगाला अस्तित्व आहे. सारांश, त्याचे अस्तित्व आमच्या मनावर अवलंबून आहे. आपल्या पाच इंद्रियांच्या द्वारा आपल्याला या जगाचा प्रत्यय येत असतो. पण तेच जर आपल्याला आणखी एखादे इंद्रिय असते तर हेच जग मग आणखी काही निराळेच भासले असते.

यावरुन काय निष्कर्ष निघतो? हाच की, या जगाला निरपेक्ष, शाश्वत असे अस्तित्व नाही - त्याला न बदलणारे, न चळणारे, न संपणारे अस्तित्व नाही. पण त्याचबरोबर त्याला अस्तित्वच नाही असेही म्हणता यायचे नाही. कारण हे जग आहे हे आपण प्रत्यक्ष बघतो, अनुभवतो. या जगात राहून त्यातूनच आपल्याला मार्ग काढतच आपल्याला जगायचे असते. मग हे जग नाही असे म्हणणे ही एक प्रकारची स्वत:चीच फसवणूक केल्यासारखे होईल. म्हणजेच काय तर हे जग आहेही आणि नाहीही - ते आहे नाहीचे, त् असत् यांचे मिश्रण आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा विवेकानंद शंकराचार्यांच्या विचारसरणीच्या निकट आलेले दिसतात. पण विवेकानंदांचा मार्ग शंकराचार्यांपेक्षा थोडा वेगळा आहे. विवेकानंदांच्या माया संकल्पनेचा आपण नंतर विचार करु. तत्पूर्वी  त्यांच्या मते अनंताचे सान्त कसे होते या मुद्याकडे वळू.

निर्गुण ब्रह्मातून जगाच्या निर्मितीची विवेकानंदांची कल्पना आपल्याला पुढील प्रकारे सांगता येते. जगत हे काल, देश, कारणातून आपल्याला दिसते, अन्यथा ते अनंत ब्रह्मच आहे या विवेकानंदांच्या विधानाचा अर्थ आपण आता पाहू . 

 ब्रह्मामध्ये देश, काल, कारण यांचा अंतर्भाव होत नाही. ब्रह्मामध्ये कोठल्याही प्रकारचे परिवर्तन होऊन जगत् अस्तित्वात येत नाही - ब्रह्म अनंत आणि सर्वव्यापी असल्याने त्याचे परिवर्तन होणार तरी कशात?  ब्रह्माच्या 'बाहेर असे काहीच नसते. ब्रह्माहून वेगळे असे 'दुसरे काहीही नसते. त्यामुळे ब्रह्मामध्ये परिवर्तन होण्याचा प्रश्नच  उदभवत नाही.

वेळेची कल्पना विचारांच्या सापेक्ष असते हा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला असेलच. वेळ सापेक्ष आहे हा आईन्स्टाईन यांच्या सापेक्षता सिद्धांताचा एक महत्त्वाचा पैलू आहे. बसची वाट पाहत आपण जेंव्हा रांगेत उभे असतो तेंव्हा पाच मिनिटे एका तासासारखी वाटतात आणि आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात 'एक पल जैसे; एक युग बीता अशी आपली अवस्था होते. पृथ्वीवरची वेळ, चंद्रावरची वेळ या सा-या  भिन्न गोष्टी आहेत. वेळेचे आणि अवकाशाचे - मितींचे जवळचे नाते आहे हेही आपण जाणतो. ब्रह्मामध्ये असा कोणत्याही प्रकारचा बाहय विचार अथवा बल नसल्याने ब्रह्म कालातीत आहे.

ब्रह्म हे एकमेवाद्वितीय असल्याने कारण कार्य असा भेद त्याच्याबाबतीत संभवत नाही. ब्रह्म स्वजातीय, विजातीय व स्वगत भेदांच्या पलिकडे असल्याने कोठले कारण अन कोठले कार्य ?
म्हणून सृष्टीक्रियेचा उदय झाल्यावरच देश-काल-कारण यांचा उदय झाला असे आपल्याला म्हणावे लागते.

यातून काही प्रश्न नव्याने उदभवतात. देश-काल-कारण हे कोठून येतात? कशातून उगम पावतात? जर ते ब्रह्मामध्ये नसतील तर मग ते कोठे असतात? त्यांची अशी काही स्वतंत्र सत्ता आहे की काय? मग ब्रह्माच्या अविचिछन्न सत्तेचे काय?

विवेकानंद या प्रश्नाचे उत्तर अतिशय सहजपणाने देतात. ते असे म्हणतात की, देश-काल-कारण हे वास्तविकरीत्या नाहीत, तर ती केवळ रुपे आहेत. त्यांची स्वतंत्र अशी सत्ता नसल्याने त्यांना वास्तविक अस्तित्व आहे असे आपल्याला म्हणता येणार नाही. काळ ही संकल्पना तर, वर उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या मानसिक स्थितीवरही अवलंबून असते (म्हणजे प्रत्यक्ष काळ नाही, कारण त्याबाबत काही सर्वमान्य नियम आपण बनवले आहेत – पण त्या काळाविषयीचा आपला अनुभव). तीच स्थिती  देशाची. इथं देश या शब्दाचा अर्थ भारत देश असा नसून दिक्, अवकाश अथवा  space असा घ्यायचा आहे. आगगाडीचे समांतर धावणारे रुळ दूरवर एकमेकांना जोडले गेले आहेत असे आपल्याला दिसते. विमानातून पाहिले असता जमिनीवरील माणसे मुंग्यांसारखी दिसतात. आगगाडीतून प्रवास करताना जमीन आणि झाडे धावत आहेत असे आपल्याला वाटते.

देश-काल-कारण यांना स्वतंत्र अस्तित्व  नाही याचे दुसरे एक कारण असे की त्यांना फक्त 'स्वत:चे असे अस्तित्व नाही. कोठल्यातरी वस्तूच्या संदर्भातच त्यांना अस्तित्व  असते. आपण नुसत्या अवकाशाचा विचार करु शकत नाही, तो नेहमीच कोणत्यातरी वस्तूच्या सापेक्षच असतो. आपण नुसत्या वेळेचा विचार करु शकत नाही, तो नेहमीच कोणत्यातरी घटनेच्या अथवा प्रसंगाच्या सापेक्ष असतो - मग तो भूत, वर्तमान, भविष्य कोणताही काळ असो! कार्यकारणभावालाही तोच तर्क लागू होतो.

देश-काल-कारण ही केवळ अशी रुपे आहेत की ज्यांच्या माध्यमातून ब्रह्म या जगाची निर्मिती करते. देश-काल-कारणाला कायमचे अस्तित्व नसते हे जितके खरे तितकेच हेही खरे की ती संपूर्णतया खोटी असत नाहीत. समुद्राचेच उदाहरण घ्या ना! समुद्राच्या लाटा ख-याच असतात, पण त्या लाटा म्हणजे समुद्र नव्हे. उसळत्या लाटा हे त्या अथांग सागराचे केवळ एक रुप असते. समुद्राचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्याला केवळ लाटांवर अवलंबून राहावे लागत नाही - लाटांविनाही समुद्र समुद्रच असतो.
हे जगही या सागरासारखेच आहे. ते नामरुपात्मक ब्रह्म आहे आणि म्हणून ते सत्यच आहे. हे नामरुप लयास जाऊन जग ब्रह्मात विलीन होईल तेंव्हा होईल, तोवर हे जग सत्यच आहे. अन् या जगात आणि या जगासाठी आपल्याला अविरतपणे काम केलेच पाहिजे.

एका अर्थी शंकराचार्यांचे 'जगन्मिथ्या’ हे प्रचलित असलेले मत विवेकानंदांना मान्य नाही असेही म्हणता येईल. कारण जगाचे मिथ्यत्व मान्य केल्याने आपल्यापुढचे जगातले व्यावहारिक प्रश्न नष्ट होत नाहीत याची विवेकानंदांना जाणीव आहे. जगन्मिथ्या’ ही त्यांना एका दृष्टीने पळवाट वाटते किंवा व्यवहाराचे भान सोडून अती ताणलेली तर्ककठोर भूमिका वाटते. शंकराचार्यांची ‘जगन्मिथ्या’ ही भूमिका त्यांच्या अनुयायांना नीट समजली नाही आणि त्यांनी ती चुकीच्या पद्धतीने राबविली असेही विवेकानंदांचे मत आहे. सत्तात्रयाची शंकराचार्यांची भूमिका नीट समजावून न घेताच इतर आचार्यानी त्यांच्यावर टीकेची झोड उडविली अशी विवेकानंदांची धारणा आहे.

'ईश्वराने सहा दिवस जग निर्माण केले आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली अशा प्रकारचे मत विवेकानंदांना निव्वळ हास्यास्पद वाटते. जगाची निर्मिती करुन देव दमला असे म्हणणे म्हणजे ईश्वराची थटटाच केल्यासारखे आहे. वस्तुत: जगाची उत्क्रांती चालूच आहे, जगाची प्रगती चालूच आहे. जग पूर्ण तयार, एखादे final product नाही असे विवेकानंदांचे ठाम मत आहे.

अर्थात डार्विनच्या उत्क्रांतीवादापेक्षा विवेकानंदांचा उत्क्रांतीवाद भिन्न स्वरुपाचा आहे. 'पहिला जीव कसा निर्माण झाला?’ याचे उत्तर डार्विनकडे नाही. विवेकानंदांना वाटते की, “The story of the world is the story of the unfolding of the rudimentary elements into their more clearly expressed forms.”

हे जग खरे आहे आणि म्हणूनच यात आपण कार्य केले पाहिजे. जोवर या जगातील सुखदु:खांनी आपण पोळले जात आहोत तोवर ब्रह्माच्या अन मायेच्या व्यर्थ गप्पा मारुन उपयोग नाही. आपल्याला काम हे केलेच पाहिजे, ईश्वराचे कार्य म्हणून केले पाहिजे. श्री मुजुमदार याबाबत लिहितात, For Swami Vivekananda, the world was real so long as his mission in his life was to be fulfilled. After his work was done, the Swami was convinced that he would transcend the material world and merge in the Supreme Oneness.‟ 

क्रमश: 

No comments:

Post a Comment