ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, September 29, 2025

२७८. कन्याकुमारी परिसर भटकंती

(English translation of this post is available here.)

भाग २ विवेकानंदपुरम 

दुपारी कन्याकुमारीला पोचल्याने पहिल्याच दिवशी विवेकानंद शिला स्मारकावर (इथून पुढं सोयीसाठीयाचा उल्लेख आपण “रॉक” असा करुया) जाण्यात अर्थ नव्हता. म्हणजे जाता आलं असतं. पण जायला उशीर झाल्याने तिथं जास्त वेळ थांबता आलं नसतं. म्हणून मग पहिल्या दिवशी अगदी निवांत भटकले ती विवेकानंदपुरममध्ये.  

पहिल्या दिवशी दुपारीही आंघोळीला गरम पाणी मिळालं होतं याचं आश्चर्य वाटलं होतं. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी काही ते मिळालं नाही. स्वागतकक्षात गीझर दुरुस्तीसाठी किल्ली ठेवायला गेले. तर ते लोक 'खोलीची किल्ली ठेवून घेत नाहीत' असं कळलं. दिवसभर इकडंतिकडं भटकताना खोलीची किल्ली आपण सांभाळायची हे मला संकटच वाटतं. पण असो. त्यांनी इलेक्ट्रिशिअनला फोन केला. तो "पाच मिनिटांत येतो" असं म्हणाला खरा. पण पाच मिनिटांत भारतात खरोखर कुणीच येत नाही. पंधरा मिनिटं वाट पाहून मी तिथल्या बसने रॉककडं निघाले.  

बसची वाट पहात असताना त्रिसुर (Thrissur, पूर्वीचं त्रिचूर)  इथलं एक ज्येष्ठ नागरिक जोडपं भेटलं.  गेली काहीवर्ष  ते नियमितपणे कन्याकुमारीला (वार्षिक) भेट  देत  आहेत. त्यांच्याशी छान गप्पा झाल्या.

पुढचे दोन दिवस ते भेटत राहिले. सौम्य  बोलणारे  आजी- आजोबा होते ते. आजी बोलायच्या कमी.  आजोबा आपले हसून मला रांगेत पुढं जाण्याची जागा वगैरे  द्यायचे, कॉफी घेणार का विचारायचे.  भारतात एकंदर अनोळखी लोकांबद्दलसुद्धा सर्वसाधारणपणे गत्य असतं असा माझा अनुभव आहे. 

मग तो  उत्तरेत जा, की दक्षिणेत, पूर्वेला जा की पश्चिमेत.

विवेकानंदपुरममध्ये फारशी गर्दी नव्हती. तसा जुलै महिना म्हणजे शाळा-कॉलेज सुरु असण्याचे दिवस, त्यामुळे पर्यटकांची फारशी गर्दी नाही हे समजण्याजोगं होतं. त्याच अंदाजाने मी रॉकला जाण्यासाठी पोचले आणि आपला गर्दीबाबतचा अंदाज सपशेल चुकल्याचं माझ्या ध्यानी  आलं. 

                             

तिथं लोक दोन वेगळ्या रांगांमध्ये उभे होते. सुरक्षारक्षक गर्दीचं व्यवस्थापन करत होते. त्यांच्यापैकी एकाला विचारल्यावर कळलं की एक रांग शंभर रूपये प्रवेशशुल्कवाल्यांची आहे, तर  दुसरी तीनशे रूपये प्रवेशशुल्कवाल्यांची. हे प्रवेशशुल्क बोटीने (समुद्रातल्या) स्मारकापर्यंतच्या  जाण्या-येण्याच्या प्रवासाचं आहे.  मी २०११ मध्ये इथं आले होते, तेव्हा अशा वेगळ्या रांगा नव्हत्या. प्रवेशशुल्कही फक्त पन्नास रूपये होतं. महागाई वाढल्याने प्रवेशशुल्कात झालेली वाढ समजू शकते.  पण दोन रांगा? 

अर्थात श्रीमंताना पर्यटनस्थानी, तीर्थक्षेत्री, देवळांत जास्त पैसे देऊन अशी खास सेवा मिळावी यात  नवीन काही नाही म्हणा. समतेचा उद्घोष करणारे विवेकानंद आणि मानवी एकतेचा संदेश देणारे तिरूवल्लुवर यांच्या स्मारकाला भेट देताना भेदभावाचा असा अनुभव यावा - आपला समाज किती  निर्ढावलेला दांभिक आहे हेच यातून कळतं.

अर्थात हा निर्णय पुम्पुहार शिपिंग कॉर्पोरशनचा म्हणजे पर्यायाने तामिळनाडू सरकारचा आहे. रांगेत उभं राहायचं नसेल, तर ऑनलाईन तिकिट काढून जाण्याचीही व्यवस्था आहे,  पण ते मला आधी माहिती नव्हतं. नंतर शोध घेतल्यावर कळलं की दुहेरी शुल्क व्यवस्था अगदी  अलिकडंच म्हणजे ५ जून २०२५ पासून सुरू झाली आहे.  लोकांना वेळ वाचवण्याची फार हौस असते. त्यामुळे जास्त पैसे खर्च करून लोक वेळ वाचवण्याचा प्रयत्न करणार हे नक्की. ही तीनशेची रांग  राहणार तर. नेहमीसाठीच.

मी अर्थातच शंभर रुपयेवाल्या रांगेत उभं राहिले. एखाद्या देशाची संस्कृती जाणून घ्यायची असेल तर 
त्या देशातल्या एखाद्या सामान्य रांगेत काही काळ उभं रहायला हवं.  अशा रांगामध्ये एक प्रकारचं अफात समाजदर्शन घडतं. जितकी लांब रांग, तितके  अनुभव अधिक. आपण फक्त ऐकायचं आणि पाहायचं, व्यक्त व्हायचं नाही. मी कुणाच्याही खाजगी अवकाशात हेतूत: डोकावत नव्हते तरी त्यांचे आपापसातले संवाद माझ्या कानांवर पडत होतेच. 

रांग पुढं सरकत नसतानाही माणसं पुढं सरकायचा प्रयत्न करत होती, विनाकारण एकमेकांना  धक्काबुक्की करत होती. एक माणूस उभा आहे, पण रांग सरकायला लागली की त्याचे पाच ते दहा लोक रांगेत सामील होणं हेही होतंच. त्याबद्दल काही बोलायची सोय नव्हती. मोबाईलवर लोक मोठमोठ्याने बूोलत होते. लहान मुलं खाण्याचा- ज्यूस पिण्याचा हट्ट करत होते. लोक आपापसात भांडतही होते.   

गोंगाट,कलकलाट हे आपल्या समाजाचं वैशिष्टय आहे. आपल्या देशाची लोकसंख्या खूप जास्त आहे हे घराबाहेर पडलं की जाणवतंच. त्यात तो शनिवारचा दिवस असल्याने गर्दीला उधाण आलं होतं. तेवढ्या रांगेतही कॉफी विक्रीचा एक ठेला होता. मग कॉफी आणि चहा सांडणं वगैरेही ओघानचं आलं. रांग  थोडी पुढं गेल्यावर ठिकठिकाणी बसायला दगडी बाक आहेत. वृद्ध लोकांचं मी समजू शकते, पण  लहान (दहा ते बारा वर्षांची)  मुलंमुलंही दमून ठिकठिकाणी बाकावर बसत होती ते मात्र चिंताजनक  वाटलं.

एकदा बोट निघाली आणि हा सगळा त्रास विसरायला झाला. समुद्राच्या लाटांवर बोट हेलकावे खाताना वाहणारा गार वारा ......... समुद्राची ही विलक्षण जादू असते. रॉक किनाऱ्यापासून फक्त ५०० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे प्रवास सुरू होतो ना होतो तो संपतो.

या स्मारकाचं महत्त्व, त्याचा इतिहास, त्याची रचना याबाबत पुरेशी माहिती सार्वजनिक रीत्या उपलब्ध आहे, त्यामुळे त्याबद्दल  काही लिहिणार नाही.

शिला स्मारकावर अफाट गर्दी होती. स्मारकाचा कोपरा ना कोपरा सेल्फी अथवा ग्रुप फोटो घेणाऱ्या  गर्दीने व्यापलेला होता. हल्ली सगळीकडं हेच चित्र आहे. कुठलीही विशेष गोष्ट माणसांविना पाहताच  येत नाही. पर्यटन करायचं म्हणजे फोटो काढायचे आणि ते सोशल मीडियावर लगोलग टाकायचे अशी  एक नवी प्रथा रूढ होते आहे.

मला शिला स्मारकावरचे ते दिवस आठवले की जेव्हा तिथं कॅमेरा न्यायला परवानगी नव्हती. तेव्हा  सगळं कसं निवांत पाहता यायचं, अनुभवता यायचं. मोबाईल अनेकांच्या हाती आल्यावर “कॅमेरा  नेण्यास परवानगी न देणं” याला काही अर्थ राहिला नाही, त्यामुळे तो नियम रद्द करण्यात आला  असावा. विवेकानंद मंडप आणि ध्यानमंदिरात जाऊन आल्यावर रॉकवर एखादं ठिकाण पकडायचं,  समुद्राच्या लाटा आणि त्याचे रंग पाहायचे, भणाणता वारा अनुभवायचा ....  हे मात्र या गर्दीत अजूनही साधता येतं हे चांगलं आहे. मजा आली.

नंतर मी मोर्चा वळवला तो तिरूवल्लुवर स्मारकाकडं. विवेकानंद शिला स्मारकाचं उद्घाटन २ सप्टेंबर १९७० या  दिवशी झालं. त्यानंतर जवळजवळ तीस वर्षांनी त्याच्या शेजारीच उभारण्यात आलेल्या  तिरूवल्लुवर पुतळ्याचं उद्घाटन झालं. (१ जानेवारी २०००). रॉकसाठी तीस रूपये प्रवेश फी आहे.  तिरूवल्लुवर स्मारकासाठी वेगळं प्रवेश शुल्क नाही. सुरुवातीच्या काळात दोन्ही स्मारकांवर बोटीने जावं लागायचं. आता मात्र या दोन्ही स्मारकांना जोडणारा काचेचा पूल आहे. पर्यटकांसाठी आणखी  एक  आकर्षण


तिरूवल्लुवर हे महान संत होते. त्यांचं स्मारक कन्याकुमारीच्या समुद्रात बनणं हा त्या महापुरुषाप्रति आदर व्यक्त  करण्याचा एक  चांगला मार्ग आहे. पण दोन्ही स्मारकांकडं पाहताना असं जाणवतं की  तिरूवल्लुवर यांचं स्मारक अधिक प्रमाणबद्ध बनवता आलं असतं. रॉकवरच्या विवेकानंद मंडपाची उंची सुमारे पंचावन्न फूट आहे. त्या तुलनेत शेजारच्या रॉकवरचा १३३  फूट उंचीचा तिरूवल्लुवर यांचा पुतळा फारच अवाढव्य वाटतो.  तो थोडा कमी उंचीचा बनवला  असता तरी चाललं असतं.  पण जगातला सर्वात उंच पुतळा बनवण्याची स्पर्धा आपल्याला कितीही  मानवत नसली तरी चालू  आहेच म्हणा.  अर्थात या उंचीचं एक स्पष्टीकरणही आहे. तिरूक्कुरल  या तिरूवल्लुवरलिखित ग्रंथात १३३ अध्याय आहेत. म्हणून त्यांच्या पुतळ्याची उंची १३३ फूट आहे.

रॉकवरून तिरूवल्लुवर पुतळा पाहणं आणि तिरूवल्लुवर पुतळ्यावरून विवेकानंद रॉक पाहणं हा  एक आनंददायी अनुभव होता. मजा आली.

                           
परतीच्या रांगेतही दोन लोक घुसले, त्यावरुन  लोकांची आपापसात जोरदार भांडणं झाली. "हम इसमें कुछ नहीं बोलेंगे, याद रखना" असं एक तरुण त्याच्या मित्रांना म्हणाला. ते माझ्या मागेच उभे होते, मग त्यांच्याशी बोलल्यावर कळलं की तो नेपाळच्या शिक्षकांचा एक गट होता. दर सुट्टीत ते भारतात फिरायला येतात. महाराष्ट्रातही ते येऊन गेले आहेत. माझ्या पुढं सोलापूरचं एक तेलगु भाषिक कुटुंब होतं.  त्यांच्याशीही गप्पा झाल्या.  या रांगतेही सुमारे दोन तास उभं राहावं लागलं. पण समुद्राची सोबत असल्याने दोन तास कसे गेले ते कळलं नाही. 

मी कन्याकुमारी परिसरातल्या इतरही काही ठिकाणांना भेट देण्यासाठी रानडे टूर्स अँड ट्रॅवल्स  यांच्याकडं अर्ध्या दिवसाच्या सहलीसाठी नोंदणी केली. शुल्क केवळ दोनशे रूपये होतं.

या सहलीत कन्याकुमारी परिसरातल्या काही ठिकाणांना भेट दिली. मेणाचं संग्रहालय, तिरूपती वेंकटचलपती मंदिर, साईबाबा मंदिर, सुचिंद्रम इथलं ब्रह्मा-विष्णू-शिव मंदिर, संगीत-कारंजं, आणि सूर्यास्त पाहिला. एकूण या सहलीला तसा फारसा काही अर्थ नव्हता. कारण माहिती सांगणारं कुणी सोबत नव्हतं. बसचा चालक गाडी थांबवायचा, आणि “तीस मिनिटांत परत या” असं आम्हाला सांगायचा. अशा  सहलींना मी का जात नाही हे माझ्या  पुन्हा एकदा लक्षात आलं. पण निदान या निमित्ताने  या स्थळांची प्राथमिक माहिती तरी झाली.

मेणसंग्रहालयात काही मूर्ती छान जमल्या होत्या. मला सुब्बुलक्ष्मी यांची ही मूर्ती आवडली.

इथं 'त्रिमिती चित्र' (3D painting) असा एक अफलातून प्रकार होता.  म्हणजे जमिनीवर काढलेली चित्रं होती. त्यात आपण योग्य त्या स्थानावर बसून फोटो काढला तर वाघ आपल्या पाठीशी आहे, किंवा हत्ती सोंडेने आपल्या अंगावर पाणी उडवतोय ... असे फोटो आले. मजेदार प्रकार होता तो. मला आवडला. त्रिमिती चित्र ही केरळची पारंपरिक कला आहे असं तिथल्या अम्मा म्हणाल्या.   

तिरूपती वेंकटचलपती मंदिराची वास्तू भव्य आणि सुंदर आहे. त्याच्या चौथऱ्यावरून दिसलेला समुद्र अद्भुत होता. असं वाटलं की इथंच बसून राहावं. 

साईबाबा मंदिरात भली मोठी रांग होती. या परिसरातल्या सर्वच धार्मिक वास्तू उंच चौथऱ्यावर उभ्या आहेत असं लक्षात आलं. हेही देऊळ स्वच्छ होतं. पण हे काय, आणि वेंकटचलपती मंदिर काय - ही अशी आधुनिक देवळं मनाला तितकीशी भावत नाहीत. कार्पोरेट कार्यालयीन इमारतींसारखी ती झगझगीत वाटतात. या देवळाच्या बाहेरच्या खाद्यगृहावर चार भाषांत लिहिलेली पाटी होती, ते पाहून छान वाटलं.


आणि आर्थिक हितसंबंध असतील तर कुठल्याच भाषिक, सांस्कृतिक अस्मिता टोकदार रहात नाहीत असंही वाटलं.   

सुचिंद्रम (शुचिंद्रम) मंदिर अतिशय भव्य आहे. इथं मी पूर्वी येऊन गेले होते, म्हणून मला थोडीफार माहिती होती. अन्यथा मार्गदर्शकाविना या मंदिराचं महत्त्व समजणं अवघड आहे. स्थानुमलयन (किंवा थानुमलयन) असं या मंदिराचं नाव आहे. स्थानु म्हणजे शिव, मल म्हणजे विष्णु, आणि अयन म्हणजे ब्रह्मा. ब्रह्मा-विष्णु-महेश यांचं हे मंदिर आहे.

इंद्राने गौतम ऋषिंच्या वेषात येऊन गौतमपत्नी अहिल्येला फसवून तिचा उपभोग घेतला अशी ब्रह्मवैवर्त आणि पद्मपुराणात एक कथा आहे. गौतम ऋषि इंद्राला शाप देतात. दुसऱ्या एका लोककथेनुसार  ब्रह्मा-विष्णु-महेश हे सती अनुसया यांची परीक्षा घ्यायला येतात तेव्हा ती त्या तिघांना बालकरूप देते. (आता या कथेचा मागोवा घ्यायचा तर फारच मजेदार बाबी समोर येतात, पण ते असो.) ही घटना घडली ते हे ठिकाण. गौतमाच्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी इंद्राने या स्थानी ब्रह्मा-विष्णु-महेश या त्रिमूर्तीची प्रार्थना केली. शापातून मुक्त झाल्यावर इंद्राने या स्थानी हे मंदिर बनवले अशी कथा आहे. शापातून इंद्र मुक्त्त झाला, इंद्र शुद्ध झाला म्हणून हे शुचिंद्रम.

या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं आतमध्ये संगीत-खांब आहेत. या खांबांवर प्रहार केल्यास सारेगम ... निर्माण होते. मंदिरात फोटो काढायला परवानगी नाही, पण बाहेरून दिसणारं मंदिराचं हे चित्र त्याची भव्यता सांगतं. मंदिराबाहेरची पुष्करणीही मोठी आहे.



कन्याकुमारीमधून सूर्योदय अनेकदा पाहिला आहे, पण सूर्यास्त मात्र पहिल्यांदाच पाहिला. समुद्रकिनारा वेगळा आहे हा. खूप गर्दी होती. आणि खरेदी, खाणं यांच्या सोबतीने जमेल तितका सूर्यास्त पाहणारे लोक सभोवताली होते. तिथले बोल्डर्स आणि मेरीचा मोठा (मोठाच, दुसरं काय!) पुतळा पाहून मी जरा चकित झाले. या किनाऱ्यावर पुन्हा एकदा निवांत आलं पाहिजे.

एकंदर तशी ही सहल वरवरची झाली. आता पुन्हा कधी गेलेच तर काय पूर्वतयारी करून जायचं आणि सोबत कुणा स्थानिक मार्गदर्शकाला घेऊन जाण्याची गरज - या दोन्ही गोष्टी लक्षात आल्या. परिसरातलं अजून किती पाहायचं राहिलं आहे हेही लक्षात आलं. 

या सगळ्या ठिकाणांमधून फिरताना जाणवलं की कन्याकुमारी केवळ यात्रेचं ठिकाण नाही. 

ते केवळ स्मरणरंजनाचं ठिकाण नाही.

तर ते एक कोलाज आहे. शिल्पं आणि मेणाचे पुतळे, मंदिरं आणि समुद्रकिनारे, ध्यान आणि Music  Fountain. विवेकानंदपुरममधल्या शांततेनंतर शहराने त्याचं बहुरंगी रूप दाखवलं. 

दर भेटीत हे जुनं शहर माझ्यासाठी नवं काहीतरी घेऊन येतं.  

म्हणूनच मी वारंवार इथं  येते. ठिकाणं पुन्हा पाहायला नाही, माणसांना भेटायला नाही. 

तर माझ्या आतल्या वेगवेगळ्या बाजू पुन्हा एकदा शोधायला. 

त्यामुळे “ही माझी कन्याकुमारीची शेवटची भेट” असं मी स्वत:ला सांगितलेलं असलं तरी कदाचित कन्याकुमारीत पुन्हा जावं लागेलही ...


पुढचा आणि अखेरचा लेख लवकरच .... 

19 comments:

  1. आला एकदाचा पुढचा भाग. असल्या आयोजित सहली फार बेक्कार असतात. पण कधीकधी नाईलाज असतो आपलाही. रॉकवरचा व्हिडिओ बेष्टय.

    ReplyDelete
    Replies
    1. होय. अशा सहलींना कधीकधी पर्याय नसतो, असतो तो फार खर्चिक असतो.

      Delete
  2. समुद्रातली ती दोन स्मारकं सोडली तर बाकी इतर कोणत्याही पर्यटनस्थळासारखं दिसतंय.

    ReplyDelete
    Replies
    1. होय, अगदी खरं आहे.

      Delete
  3. कन्याकुमारीत रानडे टूर्स ऍन्ड ट्रॅवल्स? स्थानिक उद्योगात मराठी नाव पाहून छान वाटलं.

    ReplyDelete
    Replies
    1. स्थानिक तामिळ गृहस्थांचीच आहे ही ट्रॅवल एजन्सी. कै. एकनाथजी रानडे यांच्या स्मरणार्थ त्यांनी एजन्सीचं नाव "रानडे" असं ठेवलेलं आहे.

      Delete
  4. एखाद्या ठिकाणचे मूळ रूप काळाच्या ओघात किती बदलत जाते, हा अनुभव कितीही तटस्थ राहून घ्यायचा म्हटले तरी हरवलेल्या जुन्या गोष्टींसाठी मन खंतावते .
    नवीन गोष्टींचे कौतुक वाटतेच. खूप सुंदर लिहिले आहेस सविता.

    ReplyDelete
    Replies
    1. As they say : Change is the only constant. आपण बदलतो तशा इतर गोष्टीही बदलणारच हे एकदा समजलं की मग काही खंत वगैरे वाटत नाही. (तशी त्यांनाही आपल्याकडं पाहून आपण बदललो, म्हणून खंत वाटत असेल का - असा एक प्रश्न डोक्यात येऊन गेला होता म्हणा!) :-)

      Delete
  5. त्या बोर्डवर 'कॅफे'चं 'कफ' केलं आहे 😂

    ReplyDelete
  6. ओघवतं लेखन. खूप वर्षापूर्वी म्हणजे १९८१ साली विवेकानंद स्मारक शाळेच्या सहलीमुळे पाहिलं होतं. शांत, सुंदर होतं तेव्हा ते. तसंच्या तसं अजूनही मनात कोरलेलं आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. होय. १९८१ मध्ये खूपच शांत जागा होती ती.

      Delete

  7. सविता ताई ही तुमची कन्याकुमारीची शेवटची भेट नसावी आणि नसणारंच त्याचप्रमाणे पुढचा लेखही शेवटचा नसावा...असे वाटत होते की मी स्वतः तुमच्या डोळ्यातून कन्याकुमारी बघत आहे...❤️🌹😊 - युवराज पाटील

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, युवराज. आता पैसे साठले की परत कन्याकुमारीला जाण्याऐवजी दुसरं एखादं ठिकाण बघावं - अशा विचाराने 'शेवटची भेट' म्हटलं आहे. :-)

      Delete
  8. तुमचा कन्याकुमारी ब्लॅाग मालिका आवडली. शेअर करते आहे.

    ReplyDelete
  9. कन्याकुमारीची भटकंती आवडली. एकंदर पूर्ण भारतातच शनिवार रविवार सगळीकडे गर्दीच असते.

    "ते केवळ स्मरणरंजनाचं ठिकाण नाही.
    तर ते एक कोलाज आहे" -- किती छान

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, इंद्रधनु.

      Delete
  10. खरं सांगायचं तर तुमच्या लिहिण्याच्या उत्साहापुढे आमच्यासारख्यांचा वाचण्याचा उत्साह कमी पडतो. आधीच्याही पोस्ट वाचतो आता.

    ReplyDelete

पोस्टवरती प्रतिसाद नोंदवण्यात अडचण येत असल्याचे काही वाचकांनी कळवले आहे. तांत्रिक बाबी तपासून पहात आहे. प्रतिसाद येथे प्रकाशित होत नसल्यास मला इमेलवर (aativas@gmail.com) तो पाठवावा ही विनंती. धन्यवाद.