ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Sunday, March 7, 2010

२३. नाडयावर चाले....

अनेक न कळलेल्या आणि तरीही मला आवडणा-या कवितांमध्ये या ऒळी इतक्या वर्षांनंतरही कायम आहेत.

तशी बोरकरांना एकदा ऐकण्याची मला संधी मिळाली होती. पुण्यातल्या चित्तरंजन वाटिकेत (हे एका बागेचं नाव आहे), रविवार सकाळच्या त्यांच्या मैफिलीत मला आमच्या होस्टेलच्या रेक्टरने आग्रहाने नेलं होतं. एक तर रविवारी सकाळीही लवकर उठावं  लागण्याचा वैताग, रेक्टरांच्या माझं व्यक्तिमत्त्व घडवण्याच्या उत्साहाचा राग.. अशा मिश्र भावनांनी मी त्या प्रसंगात हजर होते. शाळेत बोरकरांच्या काही कविता वाचल्या असल्या, अगदी पाठही केल्या असल्या (मार्कांसाठी! दुसरं काय?) तरी त्यांचं  कवी म्हणून असणारं मोठेपण मला तोवर नीटसं समजलेलं नव्हतं    - हे अर्थातच माझ करंटेपण. त्या भल्या सकाळच्या प्रौढांच्या गर्दीत मला पाहून बोरकर माझ्याशी दोन प्रोत्साहनपर शब्द बोलले होते इतकं आठवतं ... काय ते मात्र अजिबात आठवत नाही. त्याच मला तेव्हा अप्रूप वाटलं नव्हतं इतकंच खरं! 
असो.

नाडयावर चाले जशी सोनचेडी
तशी माझी नाडी चालवी तू
गर्दीच्या आरोळ्या ऐकू नेदी कानी
किंवा तृप्त ध्वनी टाळियांचे
दिसो नेदी डोळा प्रकाश वा दिशा
घेतलेली रेषा सुटो नेदी
खुर्द्याचे खाविंद करू देत सौदा
तू मात्र गोविंदा सांडू नको.

2 comments:

 1. फार पूर्वी शांताबाईंच्या एका पुस्तकात या कवितेबद्दल वाचले होते. आठवले तसे लिहितो आहे.

  या कवितेत डोंबार्‍याचा खेळ करणारी मुलगी आहे. नाड्यावर म्हणजे दोरीवर तोल सांभाळत ती चालते आहे. गर्दीच्या आरोळ्या, कौतुक करणाऱ्यांच्या टाळ्याचे आवाज तसेच तिच्या कलेचे किंवा तिचे पैशात मोल करणारे 'खुर्द्याचे खाविंद' या कुठल्याच गोष्टींकडे तिचे लक्ष नाही. घेतलेली दिशा सुटू नये हाच ध्यास तिला आहे.

  शांताबाईंना यात आपल्या कलेवर अव्यभिचारी निष्ठा असणाऱ्या कलाकाराचे चित्रण वाटते आहे.

  --- सुरजीत थोरात

  ReplyDelete
  Replies
  1. सुरजीतजी, या माहितीबद्दल आभार. अन्य एका वाचकानेही मला या पुस्तकाबद्दल लिहिलं होतं. शांताबाईंच "एकपानी" हे पुस्तक आहे ते. मी गेली दोन वर्ष ते शोधते आहे पण पुस्तक "आउट ऑफ प्रिंट" (हो! मराठीत असंच सांगतात!!) आहे हे उत्तर मिळतंय. तुमच्याकडे आहे का "एकपानी"?

   Delete