ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, January 21, 2013

१४७. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १ : मागोवा


स्वामी विवेकानंदांची ओळख होउन तशी बरीच वर्षे उलटली. प्राथमिक शाळेत शिकत असताना, इयत्ता तिसरीत 'थोरांची ओळख’ या पुस्तकात विवेकानंदांच्या शिकागो परिषदेतील दिग्विजयाचे वर्णन वाचल्याचे मला आठवते. शाळेच्या वाटेवर भेटलेल्या अनेक गोष्टी कालांतराने विस्मरणात जातात हा नेहमीचा अनुभव! पण सुदैवाने आयुष्याच्या पुढच्या वाटचालीत विवेकानंद मला पुन्हा भेटले. 

एकविसाव्या शतकात जग पुढे जात असताना मागे वळून विवेकानंदांच्या विचारांचा अभ्यास करणे यात एक विशेष औचित्य आहे. ११ सप्टेंबरच्या त्यांच्या विश्वबंधुत्वाच्या हाकेला शंभराहून जास्त वर्षे झाली आहेत. आता तर ११ सप्टेंबर म्हटले की विवेकानंद न आठवता अमेरिकेवरचा भीषण दहशतवादी हल्लाच आठवतो; आपण जणू विश्वबंधुत्व विसरलोच आहोत. पण विवेकानंद वाड्मय वाचणे हे फक्त वरवरचे वाचन राहत नाही. विवेकानंदांचे शब्द अत्यंत जिवंत, रसपूर्ण, चैतन्यमयी आहेत हा माझा आणि अनेकांचा अनुभव आहे. अर्थात त्यांचे शब्द केवळ वाचकांवर मोहिनी घालतात म्हणून सर्वश्रेष्ठ आहेत अशातला भाग नाही. त्यांच्या शब्दांनी प्रेरित होउन लक्षावधी माणसे समाजाच्या भल्याकरिता कृतिशील झाली हे विवेकानंदांच्या शब्दांचे मला सर्वात मोठे वैशिष्टय वाटते.
जगात सर्वसाधारणपणे दोन प्रकारची माणसे आढळतात. एक म्हणजे 'जुने तेच सोने’ असा अटटहास धरुन बसणारी माणसे. काळ बदलला की व्यवहार बदलतो हा साधा नियम हे लोक विसरतात. याउलट काही लोक सतत नव्याचा हव्यास धरुन जगतात. त्यात काही फायदे जरुर आहेत. माणसांसाठी सोयीची साधने निर्माण करण्यात या प्रकारच्या लोकांचा मोलाचा वाटा आहे. पण कधीकधी निव्वळ बदलालाच प्रगती मानण्याची चूक ते करतात. जुन्या झालेल्या विवेकानंदांकडे वळून पाहणे हे त्यांच्या दृष्टीने मागासलेपणाचे लक्षण ठरते. विवेकानंदांच्या मृत्युलाही आता शंभरपेक्षा जास्त वर्षे लोटली आहेत. मग त्यांच्या विचारांना सामोरे ठेवून आपण काळाची पावले तर मागे फिरवायचा प्रयत्न करत नाही ना? - अशी शंका काहींच्या मनात येते.

सद्यस्थितीतील प्रश्न

भारताचे सध्याचे जे प्रश्न आहेत त्याला धर्माची वाट सोडून वेगळया मार्गांनी उत्तरे शोधण्याची गरज जर कोणाला वाटली तर ते फारच स्वाभाविक आहे. स्वातंत्र्य मिळविण्याचा काळ, त्यासोबत आलेली फाळणी, धार्मिक दंगे आणि त्यापायी उध्वस्त झालेली लाखो लोकांची आयुष्ये हा इतिहास सहजासहजी विसरता येण्यासारखा नाही. त्याची वर्णने आजही अंगावर येतात. बाबरी मशिदीचा पाडाव व त्यानंतर उसळलेले दंगे, मुंबईतील बॉम्बस्फोट, पंजाब, जम्मू-कश्मीर, गोध्रा ..............असे सारे उद्रेक अनुभवताना आपण होरपळून गेलो आहोत. आणि हे सगळे कशासाठी तर ज्यांच्यात्यांच्या धर्माचा अभिमानासाठी! त्यामुळे 'मरो तो धर्म’ अशी अनेकांची तीव्र भावना आपण समजू शकतो – ती अगदी स्वाभाविक आहे.

गरीबी, वाढती महागाई, बेकारी, जागतिकीकरणाचे आक्रमण, दहशतवाद, महिलांवरील अत्याचार, ढासळलेली कायदा व सामाजिक व्यवस्था, राजकारण्यांचे व गुंडांचे साटेलोटे, कशाशी काहीही देणे घेणे नसल्यागत स्वत:च्याच विश्वात रमलेला समाज, शिक्षणाचे व्यापारीकरण, प्रसार माध्यमांचे आक्रमण, निरक्षरता, व्यसनाधीनता, प्रदूषण, भाषिक तंटे, पाणी वाटपावरुन होणारे राज्यांमधले वाद, विस्थापितांचे पुनर्वसन .................. असे असंख्य राष्ट्रीय प्रश्न आपल्यापुढे आहेत. दिवसेंदिवस ते अधिकच उग्र रुप धारण करत आहेत. त्याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर घडत आहेतच. पूर, दुष्काळ, सुनामी, भूकंप, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीही काही आपली पाठ सोडत नाहीत.

या सर्व प्रश्नांची साधकबाधक चर्चा करुन त्यावर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी धर्मावर चर्चा करणे ही एक पळवाटच आहे असे काहींना वाटू शकते. कारण खरे सांगायचे तर, कोणी पाहिला आहे ईश्वर? कोणाला माहिती आहे मोक्ष म्हणजे काय ते? असल्या खुळचट समजुतींमुळेच तर भारत आजवर मागासलेला राहिला आहे. भौतिक प्रगती साधण्याला खरे तर पर्याय नाही, ती न जमली की समाज असल्या खुळचट समजुतींच्या आहारी जातो असे दिसते – असे मत अनेक लोक मांडताना आढळतात.

हे असे प्रागतिक आणि बुद्धिवादी विचार मांडणा-या लोकांच्या प्रामाणिकपणाविषयी, त्यांना वाटणा-या तळमळीविषयी आदर व्यक्त करुनही असे म्हणावे लागते की,  भारतीय समाजाच्या मनाची नस कदाचित या लोकांना अदयाप गवसलेली नसावी!

हिंदुत्ववादाची लाट?

कारण देशातील सर्वच माणसे विचारवंतांच्या या बुद्धिवादी मताशी सहमत आहेत असे दिसत नाही. किंबहुना चित्र दिसते ते वेगळेच - समाजातील अधिकाधिक लोकांवर धर्माचा पगडा वाढतो आहे असे दिसते. आणि याचे सर्वात साधे कारण म्हणजे धर्म हा या देशाचा स्वभाव आहे!

'आपण पाहिले आहे की आपले तेज, आपले सामर्थ्य, एवढेच नव्हे तर आपल्या राष्ट्राचे जीवन - या सर्वांचा आधार धर्मच आहे. धर्माला आपल्या जीवनाचा आधार बनविणे हे बरोबर आहे की चूक आहे, चांगले आहे की वाईट आहे, परिणामी कल्याणकारक आहे की अकल्याणकारक आहे याची चर्चा मी आज करीत नाही, पण चांगले असो वा वाईट असो धर्मच आपल्या राष्ट्राच्या जीवनाचा आधार आहे. तो तुम्ही टाळू शकत नाही. तो नेहमीच तुमच्या राष्ट्राच्या जीवनाचा आधार राहणार आहे. आणि म्हणून आपल्या धर्मावर माझ्याइतकी तुमची श्रद्धा नसली तरीही तुम्हाला याचा आश्रय घ्यावाच लागेल. या धर्माने तुम्ही निबद्ध आहात आणि जर तुम्ही त्याचा त्याग केला तर तुमचा सर्वनाश होईल. आपल्या जातीचा तोच जीवनाधार आहे व तो सुदृढ केला पाहिजे. ........................... राजकीय व सामाजिक सुधारणा आवश्यक नाही असे सांगण्याचा माझा आशय नाही - माझे सांगणे हेच आहे, आणि ते तुम्ही नीट लक्षात ठेवा की या गोष्टी भारतात गौण आहेत व धर्म हीच मुख्य गोष्ट आहे........’ असे विवेकानंद म्हणतात.

भारतात गेल्या काही वर्षांत हिंदुत्त्ववादाची लाट आली आहे की काय अशी मनात शंका येते. 'तुमचा धर्म कोणता? या प्रश्नावर 'मानवधर्म असे उत्तर अभिमानाने देणारी एक पिढी आता जणू लयाला गेली आहे. 'गर्व से कहो हम हिंदु है’ असे स्टिकर्स मधल्या काळात कित्येक घरांमध्ये लावलेले दिसत असत. पण त्या आधी या देशात मध्यंतरीचा एक काळ असा होता ,की स्वत:ला हिंदू म्हणवून घेण्याची सामान्य माणसाला लाज वाटत होती. विवेकानंदांनी आपल्या या असल्या प्रवृत्तीवर सडकून टीका केली आहे. 'आज हिंदू शब्दाने जरी काही वाईट अर्थबोध होत असेल तरी हरकत नाही. हिंदू या शब्दाला कोणत्याही भाषेतील अधिकात अधिक गौरवपूर्ण अर्थ आपल्या कृतींनी आणून देण्यासाठी आपण सिद्ध होऊ या.’ असे अत्यंत रचनात्मक आवाहन स्वामीजी करतात. त्यामुळे हिंदू जनजागरणाचा भारतीयांना अभिमान वाटणेही स्वाभाविकच आहे, हे देखील समजून घेण्याची गरज आहे.

पण अर्थातच विवेकानंदांना अजिबात अभिप्रेत नसणारा जागरणाचा एक पैलूही येथे आहे. आजचा हिंदुत्ववाद, हिंदुत्ववादाची ही लाट निव्वळ राजकीय स्वरुपाची आहे. हिंदू धर्माच्या मूळ तत्वज्ञानाशी या जागरणाचे आणि तिच्या दुराग्रही पाईकांचे फारसे देणेघेणे नाही. त्यामागे मतांचे, सत्तेचे आणि स्वत:चा प्रभाव शाबूत राखण्याचे राजकारण आहे. समाजाचे जीवन सुरळीत राखण्याचा किंवा व्यक्तींना आध्यात्मिक मूल्ये देण्याचा यात काही विचारच केला जात नाही, असे माझे मत आहे.

हिंदुंच्या राजकीय अस्मितेचा प्रश्न महत्त्वाचा नाही असे मला म्हणायचे नाही. पण हिंदुत्वाचा ध्वज उंच राखण्याच्या नावाखाली गेली काही दशके जे राजकारण केले जात आहे त्यात अभिमान वाटण्याजोगे काहीही नाही, हे राजकीय नेते आणि त्यांचे धुंद अनुयायी सोयिस्करपणे विसरत आहेत.

हिंदू जनजागरणाच्या आंदोलकांनी स्वामी विवेकानंदांना आपले मार्गदर्शक, नेता, गुरु, नायक या स्वरुपात स्वीकारले आहे. अनेक पत्रकांमध्ये, जाहिरातींमध्ये, सभांमध्ये विवेकानंदांची वचने सर्रास उदधृत केली जात आहेत. विवेकानंदांना केवळ राजकीय हिंदुत्व अभिप्रेत नव्हते हे जाणूनबुजून नजरेआड केले जात आहे, यात फार मोठा धोका आहे. विवेकानंदांच्या, हिंदुत्वाच्या नावाने भावी पिढयांपुढे जर आपण हिंसेचा, अतिरेकाचा, असहिष्णुतेचा आदर्श ठेवणार असू तर आपण आपल्या पायावर धोंडा घालून घेत आहोत यात शंका नाही. या राजकीय चळवळीला आपण जर तत्त्वचिंतनाची जोड दिली नाही तर कालांतराने आपला समाज आणि देश अधिकच दुर्बल होईल. समाजाला ख-या तेजोमयी हिंदुत्वाची ओळख करुन घ्यायची असेल तर आपल्याला विवेकानंदांचे बोट धरुन चालले पाहिजे.

सर्वांचे विवेकानंद

हिंदू धर्माच्या पुनरुत्थानाची ताकद फक्त विवेकानंदांमध्येच आहे असे अतिरेकी मत मी मुळीच मांडणार नाही. भगिनी निवेदितांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, 'स्वामी विवेकानंदांच्या भाषणांतही वेदांमधील व उपनिषदांमधील उद्धरणे सढळपणे विखुरलेली आढळतात. भारताच्या स्वत:च्याच ठायी असलेल्या धनाचे त्यांनी त्याला फक्त स्वरुप समजावून सांगितले, त्याचा त्याला साक्षात्कार करवून दिला एवढेच. त्यांनी प्रचारलेली सत्ये, ते जन्माला आले नसते तरी देखील तितकीच खरी राहिली असती, नव्हे, याहीपेक्षा आणखी म्हणावयाचे म्हणजे ती तितकीच विश्वसनीय, अधिकृत नि अस्सलही असती.’

विवेकानंदांच्या बाबतीत असे दिसून येते की समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांना ते आपलेसे वाटतात. हिंदुत्ववादी चळवळीप्रमाणे मार्क्सवादी चळवळीलाही विवेकानंदांबददल प्रेम वाटते. (या दोन्ही चळवळी स्वत:च्या सोयीची वचने मागचा पुढचा संदर्भ वगळून वापरतात हेदेखील आपण लक्षात घेतले पाहिजे) युवकांना प्रेरित करण्याची असीम शक्ती विवेकानंदांच्या शब्दांत आहे. केवळ झोपी गेलेल्यांनाच नव्हे तर झोपेचे सोंग घेऊन बसलेल्यांनाही विवेकानंदांचे शब्द जागे करतात.

शिकागो सर्वधर्मपरिषदेच्या शताब्दीच्या निमित्ताने १९९३ च्या सप्टेंबरमध्ये The Week या साप्ताहिकाने विवेकानंदांवर विशेष अंक प्रसिद्ध केला होता. विवेकानंद सर्वांनाच कसे जवळचे वाटतात याविषयी त्या अंकात अनेक लेख होते. धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांना विवेकानंद आदर्श वाटावेत हे स्वाभाविकच आहे. पण त्याचबरोबर १९०५ मध्ये ‘बंगाल फाळणी’विरुद्ध झालेल्या आंदोलनात अनेक क्रांतिकारकांकडे विवेकानंद  साहित्य सापडल्याचा उल्लेख आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणा-या अनेक सेवाभावी संस्था विवेकानंदांच्या विचारांचे ऋण खुलेपणाने मान्य करतात. ज्याचा ज्या प्रकारचा स्वभाव, ज्याची जी गरज, त्याप्रमाणे अचूक मार्गदर्शन विवेकानंदांच्या लेखनातून आपल्याला मिळते. 'ये यथा मां प्रपद्यन्ते या भगवदगीतेतील वचनाची आठवण विवेकानंद वाचताना येतेच येते.

काळाची गरज

विवेकानंद सर्वांना आवडतात हे काही त्यांचा अभ्यास करण्याचे एकमेव कारण नव्हे. ‘विवेकानंद शिला स्मारकाचे’ शिल्पकार व विवेकानंद केंद्राचे संस्थापक कै. एकनाथजी रानडे यांच्या शब्दांत सांगायचे तर 'विवेकानंदांनी उदघोष केला तो शक्तीच्या – सामर्थ्याच्या उपासनेचा. शरीरबल, मनोबल आणि आत्मबलाच्या उपासनेचा! सर्व क्षेत्रांत बलाची उपासना करणे हीच आजची सर्वात मोठी आवश्यकता आहे. 'मन वज्र हवे अन मनगट ते पोलाद!’ लोखंडांच्या कांबीसारखे स्नायू, बेलाग पोलादाच्या नसा आणि वज्रासारखे अजिंक्य सामर्थ्यवान मन असलेल्या माणसांनी हे राष्ट्र घडले पाहिजे अशी त्यांची आस होती. सामर्थ्य आणि पुरुषार्थाने युक्त असे क्षात्रवीर्य आणि तप:पूत सत्त्वसंपन्न असे ब्राह्रातेज या दोन्हींचा वारसा भारतपुत्रांनी वाढवला पाहिजे असे ते म्हणत. आजच्या या संकटाच्या आणि विनाशाच्या काळात नेमकी याच गोष्टीची आवश्यकता आहे. आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात नेमक्या याच गोष्टींची आपण उपेक्षा केली आहे. कारण परदेशातून आयात केलेल्या भोगवादी विचारांच्या मायाजालात आपण गुरफटून गेलो आहोत.’

सद्यस्थितीतील प्रत्येक प्रश्नावर विवेकानंदांकडून आपल्याला तयार उत्तर मिळेल असा आशावाद केवळ भाबडाच नव्हे तर व्यर्थ देखील आहे. अणुध्वम, प्रदूषण, शिक्षण क्षेत्रातील अडचणी, बेकारी अशा प्रश्नांवर विवेकानंदांकडून तयार उत्तर मागणे आणि ते मिळत नाही म्हणून विवेकानंदांकडे लक्ष न देणे करंटेपणाचे ठरेल.

विवेकानंद शंभर वर्षांपूर्वी होऊन गेले म्हणून आजच्या प्रश्नांवर त्यांच्याकडून तयार उत्तर मिळणे अवघड आहे असे मला म्हणायचे नाही. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनविषयक दृष्टिकोनापेक्षा कितीतरी वेगळया पातळीवरुन विवेकानंद जीवनाकडे पाहतात. त्या विशिष्ट जीवनदृष्टीपर्यंत पोहोचायचे कसे याचे मार्गदर्शन आपल्याला विवेकानंदांकडून निश्चिततपणे लाभते. त्यांची जीवनविषयक दृष्टी एकांगी नसून सर्वसमावेशक आहे हे विशेषत्वाने जाणवते. विवेकानंदांचा मार्ग या जगातील समस्यांनी हैराण होऊन पळ काढणा-यांसाठी नाही, तो शूरांसाठी आहे, झुंजार लोकांसाठी आहे. विवेकानंदांचे वाड्मय उपनिषदातील 'उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत। क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत्त्कवयो वदन्ति ।।  या ओळीची आठवण करुन देतात.

विवेकानंदांचा वेदान्त विचार

‘विवेकानंदांनी शिकागो जागतिक सर्वधर्मपरिषदेत हिंदू धर्माचा ध्वज फडकावला’ अशा आशयाचे विधान आपण वाचले आणि ऐकले आहे. विवेकानंदांचा धर्म संकुचित नाही तर तो सार्वजनीन धर्म आहे, सनातन धर्म आहे. त्यात पांथिक, सांप्रदायिक अभिनिवेशाला यत्किंचितही जागा नाही; आहे ती उदारता. परमताबददल निव्वळ सहिष्णुता नाही तर आहे खराखुरा स्वीकार! १९ सप्टेंबर १८९३ रोजी त्या परिषदेसमोर विवेकानंदांनी वाचलेला 'हिंदुधर्म हा निबंध आपण मुळातून वाचला पाहिजे.

विवेकानंदांचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी होते, की मनात येते तर ते एका नव्या संप्रदायाची निर्मिती करु शकले असते. पण त्यांच्या मते 'पंथाभिमान, स्वमतान्धता आणि तज्जन्य अनर्थकारी धर्मवेड यांनी या आपल्या वसुंधरेवर दीर्घकाळ अंमल गाजवला आहे. त्यांनी जगामध्ये अनन्वित अत्याचार माजविले असून कितीदा तरी ही पृथ्वी नररक्ताने हाणून काढली आहे ....’ पाश्चिमात्य देशांत आणि भारतातही त्यांनी श्रद्धेचा, भक्तीचा, बलाचा संदेश वारंवार दिल्याचे दिसते. इतर सर्व धर्मांबददल आदर राखताना स्वधर्माचे पालन त्यांना महत्त्वाचे वाटे.

विवेकानंदांचा विचार हा मूलत: वेदान्त विचारच आहे असे आपल्याला नि:शंकपणे म्हणता येते. वेदान्त हा केवळ वाचनाचा किंवा मननाचा विचार नसून तो प्रत्यक्ष जीवन जगण्याचा अत्युत्कृष्ट मार्ग आहे अशी त्यांची स्पष्ट धारणा होती. ते म्हणतात ' वेदान्तदर्शन पूर्णपणे व्यवहार्य आहे, त्याच्या आस-याने जीवन जगणे व घडविणे शक्य आहे, अगदी शक्य आहे.’

धर्म, शिक्षण, स्त्रियांचे प्रश्न आणि संघटना या चारही क्षेत्रांमध्ये विवेकानंदांचे विचार प्रभावी योगदान देऊ शकतात. विवेकानंदांच्या विचारांचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे 'देश हा देव असे माझा’ अशी भावना चेतविण्यात त्यांना कमालीचे यश लाभलेले दिसून येते. ईश्वर केवळ मंदिरातच नाही तर तो सर्वत्र आहे ही विवेकानंदांची शिकवण म्हणजे 'सर्वं खल्विदं ब्रह्म’ या औपनिषदिक मंत्राचे प्रतिबिंबच होय! दरिद्रीनारायण, मूर्खनारायण, अज्ञानीनारायण याही देवतांची पूजा करण्याचे आदेश त्यांनी आपल्याला दिले. पारमार्थिक आयुष्याबाबत स्वप्ने रचत राहणे हे विवेकानंदांचे जीवनध्येय नव्हते. तर अ‍ॅनी बेझंट यांनी वर्णन केल्याप्रमाणे ते खरेखुरे 'योद्धा संन्यासी’ होते.

‘आपण सारे सिंहाचे छावे आहोत पण स्व-स्वरुपाच्या अज्ञानामुळे आपण बकरीचे जिणे जगत आहोत’ अशी एक कथा विवेकानंद त्यांच्या श्रोत्यांना ऐकवत असत. विवेकानंदरुपी सिंहाच्या गर्जनेला प्रतिसाद देण्याचे ऐतिहासिक काम या जगाने करण्याची वेळ आता आली आहे.

Thursday, January 10, 2013

१४६. सौदा

"बहनजी," कुणीतरी मला हाक मारत होतं.
मी  थांबले, माझ्या विचारांतून बाहेर आले आणि इकडंतिकडं पहायला लागले कोण बोलतंय म्हणून. 

एक तरुण - साधारण पंचविशीचा असावा तो - माझ्याकडे हसत पाहत होता. 
त्या हसण्याचा अर्थ काही मला लागला नाही. ओळखीच्या लोकांच्या हसण्याचा अर्थ लक्षात येतो, पण हा तरुण तर अनोळखी होता मला. 

पण हास्याची एक गंमत असते - ते तुमच्याही नकळत तुमचा भाग बनून जातं. 
मीही हसले. 
माझ्या हसण्याने त्याला आणखी धीर आला असावा. 

"माझ्याकडे चांगल्या कानटोप्या आहेत. एक घेऊन तर बघा," तो म्हणाला. 
मग मी त्याच्याकडे नीट पाहिलं. 
रसत्यावर मफलर, टोप्या, मोजे .. असं थंडीसाठीच (म्हणजे थंडी कमी होण्यासाठी) सामान विकणारा एक किरकोळ विक्रेता होता तो. 

पण मला काही नको होतं. 
मी नकारार्थी मान हलवली आणि पुढे चालायला लागले. 
तो घाईघाईने म्हणाला, "अहो, थंडी आहे खूप. तुम्ही कुडकुडताय. घ्या कानटोपी माझ्याकडची. एकदम कमी होऊन जाईल थंडी. बघा तर एकदा घेऊन. अगदी खरं सांगतोय मी. शिवाय आता थंडी वाढेल अजून."

शनिवार होता तो. दुपारचा एक वाजला होता. मी बँकेत चालले होते पासबुक भरून घ्यायला. दिल्लीच्या थंडीचा कडाका इतका होता की एक वाजताही थंडी वाजत होती. धुक्याचा पदर अजून तसाच होता आणि सोबत बोचरा वारा होता. सूर्य गेले बरेच दिवस ढगांआड लपलेलाच होता. आत्ताही होता तो चंद्र की सूर्य असा प्रश्न पडावा इतका मलूल दिसत होता. 

मला धुकं आवडतं. मला हिवाळा आवडतो. खरं सांगायचं तर निसर्ग जसा असतो तसा मला आवडतो. ही एक अशी गोष्ट आहे की जी तुमच्यापासून अलिप्त असते आणि तरी तिच्यामुळे तुम्हाला अपरंपार सुख मिळतं. निसर्गावर हुकुमत चालत नाही आपली, त्याला आपण ताब्यात ठेवू शकत नाही. त्याच्या  लहारीपुढे आपल्याला नमतं घ्यावं लागतं नेहमी - आणि तरीही त्याचा राग मात्र येत नाही. त्याच्यातून पोषण मिळतं, मदत मिळते, आनंद मिळतो. अतिशय जवळ आणि तरीही अतिशय दूर ...

म्हणूनच हवापाण्याबद्दल, तापमानाबद्दल मी क्वचितच तक्रार करते. त्यामुळे आता  जितक्या उत्साहाने मी थंडीबद्दल बोलतेय तितक्याच उत्साहाने उन्हाच्या झळा किंवा बेफाम पाऊस यांच्याबद्दल बोलले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. 

असो. हे विषयांतर झालं.

मन कितीही चिरतरुण असल्याचा दावा करत असलं, तरी शरीर मनाला बरोबर जमिनीवर आणतं. आत्ताही माझ्या लक्षात आलं की वाढतं वय लक्षात न घेता मी दिल्लीच्या थंडीत रस्त्यावर आले होते आणि त्यामुळे मी खरंच कुडकुडत होते. मला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी काहीतरी घेणं आवश्यक होतं याची मला त्या क्षणी जाणीव झाली. 

"ठीक आहे, कोणती कानटोपी उपयोगी आहे मला? दाखवा बरं..." मी म्हणाले. 
त्याने मला चार पाच प्रकार दाखवले. मला खरेदीतलं शून्य कळतं. त्यामुळे मी त्यालाच निवडायला सांगितली टोपी. ती घेतली. मग तो मुलगा म्हणाला, "मोजे पण आहेत माझ्याकडं." मी तेही घेतले दोन जोड.

"किती पैसे झाले?" मी विचारलं. 
त्याने हिशोब केला आणि सांगितलं, "एकशे तीस रुपये."
मी त्याला एक शंभरची आणि एक पन्नासची अशा दोन नोटा दिल्या. 
त्याने मला दहा रुपयांच्या तीन नोटा परत केल्या.

"तुम्ही मला फक्त वीस परत द्यायचेत. दहा जास्त दिलेत तुम्ही," असं म्हणत मी दहाची नोट त्याला द्यायला लागले. 
आश्चर्य म्हणजे त्याने ती नोट घेतली नाही. 
याचा बिचा-याचा हिशोबात गोंधळ झालेला दिसतोय असं मी स्वत:शीच म्हणत होते तोवर त्याच्या चेह-याकडं पाहून मी थबकले. 

तो मिस्कीलपणे हसत होता. 
तो म्हणाला, "हिसाब ठीक है, बहनजी,"

मग मला समजावून सांगत म्हणाला, " कुठलचं गि-हाईक घासाघीस केल्याविना पैसे देतच नाही. त्यामुळे नेहमी मी सांगितलेल्या पैशांपेक्षा दहावीस रुपये कमीच मिळतात मला. पण तुम्ही काही पैसे कमी करून मागितले नाहीत. तुमच्यासारखं गि-हाईक काय रोज भेटत नाही. म्हणून माझे मीच दहा रुपये कमी केले - तुम्ही न मागताही." 

मला त्या तरुणाचं आश्चर्य वाटलं. 
मीही देते - न मागता देते - ते फक्त ओळखीच्या लोकांना. 
अनोळखी लोकांनाही देते अनेकदा - पण ते त्यांनी मागितलं तरच. 
अनोळखी लोकांना, त्यांनी न मागता काही देणं - ही गोष्ट माझ्या हातून क्वचितच घडते. 
मला त्या तरुणाचं कौतुक वाटलं. 

मी त्याची थोडी गंमत करायचं ठरवलं. 
मी त्याला विचारलं, "जर मी घासाघीस केली असती, तर मला किती पैसे कमी द्यावे लागले असते?" 
त्याने एकदम चिंतेत पडून माझ्याकडं पाहिलं. आता त्याच्या कपाळावर एक आठी उगवली होती. त्याच्या चेह-यावर मघापासून असलेलं हसू गायब झालं. त्याने डोळे बारीक करत माझ्याकडं 'आता काय' अशा नजरेनं पाहिलं. 

मी म्हटलं, "काळजी करू नकोस. मी काही तुला पैसे परत मागणार नाही आणखी. तू दहा रुपयाची सूट दिलीस मला आपणहोऊन त्यातच मी खूष आहे. मी आपलं सहज कुतूहल म्हणून विचारतेय. कदाचित पुढच्या वेळी खरेदी करताना मला या माहितीचा उपयोग होईल."

त्याचा काही माझ्यावर विश्वास बसला नाही. पण त्याने बहुधा थोडा धोका पत्करायचा ठरवलं. माझी नजर चुकवत, खाली मान घालून तो म्हणाला, "शंभर रुपये."
आणि मग आता त्याला मी वीस रुपये परत मागणार अशा शंकेने त्याने माझ्याकडं पाहिलं. 

मी हसले आणि पुढं निघाले. 

एक तरुण माणूस, जो गरीब आहे, तो माझ्यासारख्या अनोळखी व्यक्तीसाठी, मी मागितलेले नसतानाही, जाणीवपूर्वक दहा रुपये सोडू शकतो. 

मध्यमवयीन आणि मध्यमवर्गीय मी, एका अनोळखी माणसासाठी, त्याने थेट न मागितलेले वीस रुपये सोडून देण्यात मला कसली आलीय अडचण? 

त्या तरुण माणसाचं स्मितहास्य,  न मागितलेली सूट देताना त्याने दिलेलं सुखद आश्चर्य, त्याचा खरेपणा, त्याचा भाबडेपणा  .... त्यातली गंमत आणि त्यातला आनंद .... 

वीस रुपयांत एवढा मौल्यवान आणि आनंददायी अनुभव एरवी  कुठं मिळाला असता मला?

म्हणजे त्या दृष्टीने पाहता हा सौदा चांगला पडला म्हणायचा मला. 
तुम्हाला  काय वाटतं? 
**

Monday, December 31, 2012

१४५. क्षुल्लक

दिल्लीत परतल्यापासून जंतर-मंतर, इंडिया गेट इथल्या निदर्शनात सामील व्हायची संधी मिळत नव्हती. म्हणजे रोज काही ना काही घडत होतं तिथं; पण संचारबंदी लागू असल्याने आणि त्याहीपेक्षा दहा मेट्रो स्थानकं बंद असल्याने मी तिथवर पोचू शकले नव्हते.


आज मात्र गेले. जंतर-मंतरला. आजपर्यंत मी या ठिकाणी गेले आहे ती अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं. तेव्हा भरपूर गर्दी असायची. आज तितकी नव्हती. ते स्वाभाविकच. सोमवार संध्याकाळ किती लोकांना मोकळी असणार? निळ्या गणवेशातले 'रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स'चे  लोक होते – पण कमी होते तेही. सुरक्षा तपासणी नव्हती. ठिकठिकाणी वेगवेगळे गट बसले होते. एका गटात दोन पुरुष गेले आठ दिवस उपोषण करत आहेत – तिथं मेणबत्त्या लावलेल्या होत्या बरेचजण बसून घोषणा देत होते. त्यात पुरुषांचा सहभाग चांगला दिसत होता. ‘देश का युवा जाग गया, राहुल गांधी भाग गया’ ही एक नवी घोषणा ऐकायला मिळाली.


दुसरा एक गट अनेक ट्यूबलाईट घेऊन बसला होता . त्यावर लोक मार्करने सह्या करत होते, संदेश लिहित होते. दोन-तीन लोक होते तिथं. दुस-या एका गटात आठ दहा स्त्रिया आणि दोन पुरुष उभे राहून घोषणा देत होते. ‘बलात्कार करणा-यांना फाशी द्या’ ही त्यांची मुख्य मागणी होती. एका गटात ‘शहर कुणाचं’ अशा आशयाचं एक गीत चालू होतं. एका ठिकाणी कागदावर संदेश लिहून तिथं मेणबत्त्या ठेवल्या होत्या. दोन मुली बसल्या होत्या तिथं. एक मुलगी एकटीच  ‘न्याय मिळाल्याविना नव्या वर्षाचा आनंद होणार नाही’ असा फलक हातात घेऊन एकटीच बसली होती. तिचा चेहरा अतिशय विदीर्ण दिसत होता. आणखी एका गटात बरीच जास्त गर्दी होती, मेणबत्त्याही जास्त होत्या. तिथं काहीतरी धार्मिक वाटावा असा विधी चालला होता.


त्या विधींकडे मी पाहतच होते तेवढ्या माझ्या पाठीवर हात पडला. स्वेटर, जीन्स, गळ्यात मफलर अशी एक तिशीची स्त्री होती. “तुम्ही निदर्शनात सहभागी व्हायला आलात का?” तिनं मला विचारलं.
“हो,” मी सांगितलं.
“माझ्याबरोबर पाच मिनिटं याल?” ती स्त्री.

मला काही कळेना. कुठं जायचं? कशासाठी?

“ती म्हणाली मी ----- वाहिनीची आहे (नाव सांगत नाही, सगळ्या वाहिन्या सारख्याच, एकीला झाकावं आणि दुसरीला काढावं!). आमचा आत्ता पाच वाजता लाईव्ह शो आहे. तुम्ही प्रतिक्रिया द्याल का? प्लीज..”

या ठिकाणी वाहिन्यांचे कॅमेरे अगणित होते. नेहमीच असतात. पण मी त्यांच्यापासून नेहमी लांब राहते. परिवहन मंडळाच्या बसस्थानकावर प्रवासी शोधत जसे खासगी जीपवाले फिरतात तसे पत्रकार फिरत असतील याची मात्र मी कधी कल्पना केली नव्हती. मला जरा हसू आलं पण मी नकार दिला.

ती म्हणाली, “या बलात्काराच्या घटनेत एक अल्पवयीन मुलगा आहे. त्याच्या शिक्षेबद्दल तुमचं काय मत आहे?”
“ही काही एका क्षणाची घटना नव्हती. स्व-संरक्षणार्थ अथवा भीतीतून हे कृत्य घडलेलं नाही. त्या मुलाने जे क्रौर्य केलं त्याची शिक्षा त्याला व्हायला हवी. ते घृणास्पद कृत्य करताना तो लहान नव्हता मग शिक्षेच्या वेळीच कसा लहान?” मी उत्तर दिलं.

“अगदी हेच हवं आहे मला, “ ती पत्रकार स्त्री म्हणाली. “बालगुन्हेगार कायद्यात बदल -याच विषयावर आमचा शो आहे.”
“अहो, पण मला कायद्याची काही माहिती नाही. इथं पुष्कळ अभ्यासक कार्यकर्ते असतील, त्यांची तुम्हाला जास्त मदत होईल,” मी काढता पाय घेत म्हणाले.
“छे! मी जास्त काही विचारणार नाहीच. तुम्ही आत्ता जे वाक्य बोललात ना तेच फक्त बोला, मी माईक धरणारच नाही तुमच्यापुढे त्याहून जास्त.” ती अजीजीने म्हणाली.

माझे काही मित्र-मैत्रिणी पत्रकार आहेत. त्यांना बिचा-यांना अशीच अजीजी करावी लागत असेल का रोज  – असा विचार माझ्या मनात आला, आणि मी तिच्याबरोबर गेले.

एका टोकाला वाहिन्यांच्या कॅमे-यांची भिंत होती. वाट काढत, मी येत आहे अशी खात्री करून घेत ती चालत होती. मी म्हटलं, हाही एक अनुभव घेऊन पाहू.

एक सरदारजी होते. पन्नाशीचे असतील. एक बाई होत्या त्याही त्याच वयाच्या. आणि मी.
सरदारजी म्हणत होते, “लहान असला म्हणून काय झालं? त्याला तर उलट जास्त शिक्षा द्या. ते पाहून बाकीच्या लहान मुलांना चांगली जरब बसेल आणि पुन्हा कुणी असं वागणार नाही.”

त्यांच्या पाठीमागे काही पुरुष उभे होते. एक म्हणाला, “लहान आहे मुलगा, त्याला सुधरायची संधी दिली पाहिजे.” आणखी कुणीतरी म्हणालं, “त्या मुलाला कसली शिक्षा देताय? त्याच्या आई-बापाला दिली पाहिजे शिक्षा. मुलाला वळण लावत नाहीत म्हणजे काय?” आणखी कुणी विचारत होतं, “त्याला आयुष्यभर तुरुंगात टाकून द्या, तीच शिक्षा त्याला.” “झोपडपटटी वाढली की दुसरं काय होणार?” आणखी एक प्रश्न. प्रश्नातच जणू उत्तर आहे दडलेलं अशा अविर्भावात.

तेवढ्यात कॅमेरामन आणि एक पुरुष यांची वादावादी झाली. कॅमेरामन त्याला बाजूला व्हायला सांगत होता आणि तो माणूस म्हणत होता, ‘होऊ तर द्या तुमचं सुरु, मग होतो की बाजूला.”माझ्या डावीकडे दुस-या वाहिनीचा माणूस ताडताड माईकमध्ये बोलत होता. आता रोजची सवय असणार झालेली त्याला या विषयावर बोलायची. ‘सिंगापूरमधल्या डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची’ असं काहीतरी तो बोलत होता.  उजवीकडे तिसरा वाहिनीवाला कुणालातरी फोनवर ‘अबे, अंग्रेजी बोलनेवाला चाहिये, पकडके ला किसीको जल्दी’ असं सांगत होता.

माझ्या शेजारच्या बाई मुलाला सांगत होत्या – “मावशीला फोन कर लगेच. तिला सांग हे लाईव्ह पहायला.” त्यांची मुलगी तिच्या डिजीटल कॅमे-यात बहुधा व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होती. मागे घोषणा चालूच होत्या. आमच्याभोवती बरेच बघे जमा झाले होते. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालू होती. पाच मिनिटं झाली, दहा मिनिटं झाली .. पंधरा झाली. आमची पत्रकार हेडफोन कानात अडकवून तयारीत उभी होती. तेवढ्या एक पठ्ठा धावत आला. कॅमेरामन आणि त्याची गळाभेट झाली. मग तो “लाईव्ह शो" सुरु झाला.

पहिला नंबर सरदारजींचा. ते आधी बरेच तावातावाने बोलत होते पण कॅमे-यासमोर अगदी शांत निर्धाराने बोलले. त्यांना बहुधा सवय असावी अशा कार्यक्रमात सामील व्हायची. नंतर नंबर त्या बाईंचा. त्याही “इतर देशात बालगुन्हेगारांना अशा प्रसंगी कडक शिक्षा दिली जाते’ अशा आशयाचं एक वाक्य बोलल्या. मग अचानक ती पत्रकार आणि कॅमेरामन दोघंही निवांत झाले आणि मागच्या मेणबत्त्यांकडे पहायला लागले. मग मला कळलं की ते लाईव्ह दाखवलं जातंय. सरदारजी आणि बाई दोघांनाही अजून काही बोलायला सुचत होतं. ते पत्रकार बाईना सारखं काहीतरी सांगू पाहत होते. आणि ती त्यांना ‘गप्प रहा, नंतर बोलू” अशी खूण करत होती. ती बहुतेक ऐकत असणार कार्यक्रम.

अशी आणखी पाच एक मिनिटं गेली. मेणबत्त्यांजवळचा कॅमेरामन परत आला.
“मेरा हो गया?” असं पत्रकार स्त्रीने कुणालातरी विचारलं.

मग मला म्हणाली, “सॉरी, तिकडे स्टुडीओत पण एक-दोन लोक होते बोलायला. त्यामुळे वेळ संपली.”

मी “ठीक आहे” म्हणून निघाले.
बाईट हुकली माझी. ते चांगलंचं झालं. त्यामुळे काहीच बिघडलं नाही. वरवर पाहता.

एका बाईटमागे काय काय असतं ते कळलं.
मात्र आत खूप काही विस्कटून गेलं.
बाहेरच्या झगमगाटात खरी घटना, खरी वेदना, खर दु:खं किती क्षुल्लक होऊन जातं तेही अनुभवाला आलं.

Monday, December 17, 2012

१४४. प्रदर्शन


फोन वाजला. अनोळखी नंबर होता. पण फक्त ओळखीचे, यादीत असलेलेच फोन घेण्याची चैन मला करता येत नाही. मला असेच कुठूनकुठून फोन येतात. हा फोन नंबर त्या अर्थाने सार्वजनिक आहे.
“नमस्कार”, एक बाई होत्या. दिल्लीतल्या. त्यांनी स्वत:चं नावं सांगितलं आणि मग “श्रीयुत क्ष यांनी मला तुमच्याशी बोलायला सांगितलं आहे” म्हणाल्या. या ‘क्ष’ना मी अनेक वर्षांपासून आणि चांगली ओळखते. एका सामाजिक संस्थेचं काम करतात ते. त्यांच्या संस्थेबद्दल मला काही फार प्रेम आहे अशातला भाग नाही; पण ‘क्ष’ अतिशय तळमळीने आणि निस्वार्थीपणाने काम करतात. मग ‘क्ष’चं नाव घेत कुणीही माझ्याकडे आलं की मी त्यांना जमेल तितकी मदत करणं स्वाभाविक आहे माझ्यासाठी.
“बोला, काय मदत हवी आहे?” मी इकडेतिकडे वेळ न घालवता थेट मुद्याला हात घातला.
“क्ष म्हणाले की तुमच्याकडे बरीच माहिती आहे,” त्या बाई मोघमपणे म्हणाल्या.
या असल्या स्तुतीच्या चक्रात अडकायचं आता काही माझं वय राहिलेलं नाही – हे कदाचित त्या बाईंना माहिती नसणार.
“कसली माहिती हवी आहे तुम्हाला?” मी सरळ विचारलं.
“स्त्रियांची” त्यांनी एका शब्दात उत्तर दिलं.
आता स्त्रियांची माहिती हा फार मोठा आवाका असलेला विषय आहे. या बाईंना नेमकी कसली माहिती हवी आहे हे जोवर मला कळत नाही तोवर मी त्यांना मदत करू शकत नव्हते.
“कुठल्या स्त्रियांची? कोणत्या विषयावर?” मी पुन्हा विचारलं.
“भारतीय स्त्रियांची. कोणत्याही विषयावर चालेल.” त्या बाई तितक्याच शांतपणे बोलत होत्या.
मला जरा वैताग आला. पण ‘क्ष’चा संदर्भ असल्याने मी फोन ठेवून देऊ शकत नव्हते.
दहा मिनिटं गेल्यावर आणि मी बरीच चौकशी केल्यावर कळलं की क्ष आणि या बाई यांची संस्था प्राचीन भारतीय इतिहासावर एक प्रदर्शन भरवणार होती, त्यासाठी त्यांना माझी मदत हवी होती.
“तुम्ही काही नावं काढली आहेत का?” मी विचारलं.
“तुमचं नाव आहे की...” बाई उत्तरल्या. विनोदी दिसत होत्या बाई.
“ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या स्त्रियांबद्दल बोलत होते मी. काय काय पूर्वतयारी केलीय तुम्ही त्याचा अंदाज दिलात तर मी पुढची मदत काय करायची ते बघते.” मी.
“नाही हो, मला वेळच नाही मिळाला. तुम्ही सांगाल ती नावं घेता येतील, त्यात काही अडचण नाही,” बाई उत्तरल्या. अडचण कसली म्हणा? यांचा काही विचारच झालेला दिसत नव्हता. ठीक आहे, नावं देऊ यात यांना असा मी स्वत:शी विचार केला.
प्रदर्शन दिल्लीत असणार म्हणजे मजकूर हिंदीत असायला हवा.
“मी इंग्रजीत मजक्रूर दिला तर तुमच्यापैकी कुणी हिंदीत करेल ना तो?” मी होकाराच्या अपेक्षेने विचारलं.
“नाही हो .. तुम्हीच दिलीत माहिती हिंदीत तर बरं होईल. तुम्ही पण दिल्लीत राहता म्हणजे तुम्हाला हिंदी येत असेलच की ...” बाईची फटकेबाजी चालूच होती.
ते नंतर बघू ‘क्ष’शी बोलून असा विचार करत मी पुढचा प्रश्न विचारला.
“बरं, तुम्ही पोस्टर्स करणार असाल ना?” मी विचारलं.
“हो, बहुतेक ...” त्या बाई उत्तरल्या.
“चित्र कोण काढणार आहे? पोस्टरवर किती मजकूर द्यायचा याला मर्यादा असतात त्यामुळे मजकूर विचारपूर्वक निवडावा लागेल, पोस्टर्सचा आकार काय असेल  ...” माझी विचारांची गाडी सुरु झाली होती.
“तुमच्याकडे नाहीत का चित्र?” त्या बाईंनी विचारलं.
“नाहीत,” मी शांतपणे उत्तरले. आता ‘क्ष’च्या ओळखीच्या असल्या तरी या बाईंचा मला थोडा राग यायला लागला होता.
“मग काय करायचं?” बाई विचारत्या झाल्या.
प्रदर्शन यांनी ठरवलं होतं की मी?
“तुम्ही ठरवा. मग मला सांगा सावकाश,” मी त्या बाईंना सांगितलं.
“अहो वेळ कुठं आहे?” त्या बाई करवादल्या.
आता मात्र मी राग विसरले आणि मला कुतूहल वाटायला लागलं. या बाईना प्रदर्शन करायचं आहे, त्याच्या विषयाची त्यांना काही माहिती नाही, त्याची कसलीही तयारी नाही यांची. मदत मागण्यासाठी मला फोन करून या मला हुकूम देत सुटल्या आहेत. आमची काही ओळख नाही तरी या माझ्यावर कारण नसताना वैतागत आहेत. यांना ‘क्ष’ने नेमकं काय सांगितलं होतं माझ्याबद्दल? कारण मी या बाईंचा अपेक्षाभंग करत होते हे अगदी उघड होतं. ‘असा कुणालाही माझा फोन नंबर देत जाऊ नका’ असं ‘क्ष’ला सांगितलं पाहिजे याची मी मनातल्या मनात नोंद केली.
“घाई होतेच हो अशा वेळी,” मी समजूतदारपणा दाखवला.
उत्साहाने मी पुढे बोलले (सवय! सवय!), “तुम्ही एकदा तुमच्या टीमशी बोला. मग आपण एकत्र बसू आणि ठरवू. काही काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित.”
बाईंना जरा बरं वाटलेलं दिसलं. “आज येता संध्याकाळी?” त्यांनी विचारलं.
“मी आत्ता दिल्लीत नाही. आठवडाभराने येईन परत. मग फोन करते तुम्हाला. तोवर तुम्ही चित्रकार आणि हिंदी अनुवाद करणारे लोक शोधून ठेवा ...” मला बहुतेक त्या बाईंची दया आली .
“आठवडाभर नाही तुम्ही? मग काय तुमचा उपयोग?” बाई मला मोडीत काढत म्हणाल्या.
“म्हणजे?” मी आवाजावर काबू ठेवत विचारलं.
“अहो, प्रदर्शन या शनिवार रविवारी आहे ...”बाई उत्तरल्या.
“मी तुम्हाला यावेळी काही मदत करू शकत नाही, क्षमस्व. आणि तुम्हाला प्रदर्शनासाठी शुभेच्छा.” असं म्हणत मी फोन बंद केला.
प्रदर्शन!
कशाचं प्रदर्शन?
आपण काम करतो याचं? आपल्याला संस्कृती-इतिहास यांचं फार पडलं आहे याचं? आपण सामाजिक काम करतो म्हणजे कसंही केलं तरी चालेल या मानसिकतेचं? वेळ मारून नेण्याच्या वृत्तीचं? आपल्याला इतरांकडून अपेक्षा करण्याचा हक्क आहे या समजुतीचं?
कशाकशाचं प्रदर्शन!!