ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, February 11, 2013

१५०. विवेकानंदांचा वेदान्त विचार : भाग ३: वारसा


भाग: १, २(अ), २ (आ) 

विवेकानंद मी पहिल्यादा वाचायला घेतले ते धर्मासंबंधी काही ठाम मते आणि त्यासोबतच त्याबाबतचे काही पूर्वग्रह मनात तयार झाल्यानंतरच! अर्थात तो १९८0 च्या आसपासचा काळ होता. आणिबाणी आणि त्यानंतरच्या राजकीय प्रयोगांचे आणि त्यातून होणा-या वाताहातीचे पडसाद आमच्या पिढीच्या मनावर उमटत होते. धर्मानेच देशाचे नुकसान केले आहे असे मानण्याचे माझे ते वय होते. मार्क्सवादी अभ्यासवर्गात जाऊन आल्याचा तो एक प्राथमिक परिणाम होता!

विवेकानंदांचे एक मोठे पुस्तक दोन दिवसांत वरवर चाळून पाहताना माझ्या मनात 'काय हे, यात तर नवीन काहीच नाही! तेच वेद आणि तीच पुराणे! अशी एक प्रतिक्रिया उमटलेली मला आजही स्पष्ट आठवते. ‘The Master as I Saw Him’ या त्यांच्या पुस्तकात भगिनी निवेदितांची एक उल्लेखनीय प्रतिक्रिया आहे. विवेकानंदांचे पहिले भाषण ऐकल्यावर त्यांच्या मनात 'या माणसाने काय मोठं नवीन सांगितलं? हे सगळ तर आधीच सांगितलं गेलं आहे!’ अशाच आशयाचे विचार आले होते.
भगिनी निवेदिता ते सामान्य वाचक या दोघांच्याही प्रतिक्रियांमध्ये साम्य असणे वैशिष्टयपूर्ण आहे. यामधून विवेकानंदांची एक विशेषता समोर येते. ती म्हणजे त्यांची अत्याधिक विनम्रता! 'मी केवळ भारवाहक आहे’, अशी विनम्र भूमिका विवेकानंदांसारखे महापुरुष (आणि स्त्रियाही) नेहमी घेतात असे दिसते.

भारतीय स्वभाव

हा स्वभाव विवेकानंद या व्यक्तीचा एकटयाचा आहे असे मात्र नव्हे. तर हा भारतीय स्वभाव आहे! भारतीय लोकांना, समाजाला काही ऐतिहासिक जाणिवाच नव्हत्या असा आरोप भारतीयांवर नेहमीच केला जातो. पण भारतीय लोक व्यक्तीपेक्षा विचारांना जास्त प्राधान्य देतात अशी एक शक्यता दिसते. विचार सांगणारा 'कोण आहे’ हे येथे फारसे कधी महत्त्वाचे नव्हते, तर विचार 'काय आहे’ हे महत्त्वाचे होते. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण प्राचीन काळी खरोखरच होऊन गेले की नाही याचे येथे फारसे सोयरसुतक नसते. श्रीकृष्णाचे अस्तित्व ऐतिहासिक दृष्टया सिद्ध होवो अथवा न होवो, गीतेचे महत्त्व त्यामुळे काही कमी होत नाही!

शंकराचार्यांपासून आजपर्यंतच्या कोणत्याही महापुरुषाचे उदाहरण घ्या. 'मी काही नवे सांगतो आहे’ असे कोणीच म्हणत नाही. म्हणजे इतक्या वर्षांमध्ये भारतात काहीच नवे सांगितले गेले नाही असे अजिबात नाही. सर्व महापुरुषांची समाजाला साद घालण्याची ती एक विलक्षण पद्धत आहे असे मला वाटते.

प्रत्येक महापुरुषाने भारताच्या ज्ञानाच्या आणि संस्कृतीच्या वारशात मोलाची भर घातली याबाबत मतभेद असण्याचे काही कारण नाही. धर्मावर आघात करुन नव्हे तर धर्माचे पोषण करुन त्यांनी ही भर घातली आहे. भगवद्गीतेचेच उदाहरण घ्या. किती विविध प्रकारांनी तिचा अन्वयार्थ लावण्यात आला आहे. हे विविध अर्थ म्हणजे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात त्या त्या महापुरुषांनी टाकलेली भर आहे. पण हे नवे विचार त्यांनी विघातक नव्हे तर विधायक पद्धतीने मांडले आहेत. हा भारतीय स्वभाव आहे!

विवेकानंदांनी काहीच नवे सांगितले नाही असे म्हणणे औद्धत्याचे ठरेल. विवेकानंदांचा वेदान्त विचार हा एका अर्थाने नव्या जुन्याचा, विविध विचारांचा समन्वय आहे - कडबोळे मात्र नव्हे. म्हणून विवेकानंदांचा वेदान्त विचार समजावून घेताना प्रस्थापित वेदान्त विचारांचा मागोवा घेणे अपरिहार्य ठरते.

हिंदुधर्म आणि वेदान्त

हिंदू धर्मावर वेदांचा फार मोठा पगडा आहे असा आपला समज आहे. सर्वसामान्य लोकांनी वेदग्रंथ वाचणे तर सोडूनच द्या,  पण पाहिलेलेही नसतात. बहुसंख्यांना कदाचित चार वेदांची नावेही पटकन आठवणार नाहीत.

आता हेच पहा ना! इंद्र हा ऋग्वेदकालीन समुहाचा प्रिय आणि आदर्श असा देव. या देवतेची स्तुती करणारी थोडीथोडकी नव्हे तर २५0 सूत्रे ऋग्वेदात आहेत. आज आपल्यापैकी किती लोकांना इंद्र हा राम आणि कृष्णासारखा देव वाटतो? भारतात आज इंद्राची किती मंदिरे आहेत? किती लोक इंद्राची पूजा करतात? वेदकाळात मूर्तिपूजा नव्हतीच असे उत्तर कोणाला सुचेल. पण गेल्या असंख्य वर्षांत इंद्रासाठी किती अभंग, कविता, प्रार्थना रचल्या गेल्या आहेत?

यज्ञ हा वैदिक संस्कृतीचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू होता. आज आपल्यापैकी अनेकांनी यज्ञ पाहिलेलासुद्धा नाही. तरीही आपण (म्हणजे असंख्य लोक) हिंदू आहोत आणि वेदांना आपण मनोमन सर्वोच्च स्थान देतो. त्याचबरोबर आपण हे देखील लक्षात घेतले पाहिजे की वैदिक धर्मावर कडाडून टीका करणा-या गौतम बुद्धाची येथे अवतार म्हणून पूजा केली जात आहे. भारतातील देवतांचा विकास हा अभ्यासाचा एक स्वतंत्रच विषय होईल, म्हणून त्याबाबत इथे अधिक लिहीत नाही. पण थोडक्यात सांगायचे झाले तर वेदमान्य ते सर्वमान्य, आणि तेच लोकमान्य अशी आपल्याकडची स्थिती  आहे.

वेद आणि वेदान्त यातला फरकही सामान्य माणसाला ठाऊक नाही असे दिसते.. सांप्रदायिक अनुयायी वगळले तर सामान्यत: (निदान महाराष्ट्रात तरी प्रामुख्याने) लोकांना एकच आचार्य ठाऊक आहेत. ते म्हणजे शंकराचार्य! 'तुमच्या हिंदुधर्माची मूलतत्त्वे कोणती?’, या प्रकारच्या प्रश्नावर पुनर्जन्म, कर्मसिद्धान्त याबरोबरच 'जग म्हणजे माया’ असेही अनेकजण सांगताना दिसून येते. केवळ वेदान्तदर्शन म्हणजे हिंदू धर्म नव्हे आणि हिंदू धर्म म्हणजे निव्वळ आद्य शंकराचार्यांचा वेदान्त नव्हे हे अनेकदा आपल्या गावीही नसते.

वेदवाड्मय

वेद हा शब्द 'विद्’ या धातूपासून तयार झाला आहे. जाणणे, होणे, प्राप्त करणे, मनन करणे असे या धातूचे अनेक अर्थ आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद ही चार वेदांची नावे आपल्याला महिती आहेत. मंत्रांची रचना आणि त्यांचे संकलन ज्या काळात झाले त्याला 'मंत्र काल’ म्हणतात. हे मंत्र ज्या ठिकाणी संकलित केलेले आहेत त्यास 'संहिता’ असे म्हणतात. सर्वसाधारणपणे जेंव्हा जेंव्हा ऋग्वेदाचा संदर्भ दिला जातो तेंव्हा तेंव्हा तो ऋग्वेदसंहितेचा संदर्भ असतो.

संहितेप्रमाणेच वरील चारही वेदांची ब्राह्राणे, आरण्यके व उपनिषदे आहेत. संहितेत देवतांच्या स्तुतिपर मंत्र आहेत. ब्राह्राणग्रंथांत प्रामुख्याने यज्ञक्रियांचे विवेचन आहे. येथपर्यंतचे वेदवाड्मय कर्मकांडात्मक मानले जाते. त्यानंतर तत्त्वचिंतनाचे प्राबल्य असणारी आरण्यके व उपनिषदे येतात. आरण्यके व उपनिषदे यांतील सीमारेषा फारच लवचिक आहेत, अस्पष्ट आहेत. उपनिषदांना ज्ञानकांड असेही म्हटले जाते.

संहितांपैकी ऋग्वेद व  अथर्ववेद या दोन संहिता महत्त्वाच्या आहेत. सामवेदात ७५ नवे मंत्र सोडले तर बाकी सारी ऋग्वेदाचीच पुनरावृत्ती आहे. यजुर्वेदाच्या शुक्ल व कृष्ण अशा दोन शाखा आहेत. अथर्ववेद संहिता मात्र थोडी वेगळी आहे. प्राचीन काळी प्रारंभी फक्त तीन वेदांनाच मान्यता अथवा प्रतिष्ठा होती. अथर्वसंहितेला हे स्थान मिळविण्यासाठी बरीच वाट पाहावी लागली. ऋग्वेद हा उच्चभ्रूंचा व अथर्ववेद हा जनसामान्यांचा अशी एक त्याची संगती लावली जाते. आर्य जमातीतीलच बहुजनसमाजाच्या कल्पना, तसेच कदाचित आर्यपूर्व आणि आर्यकालीन स्थानिक आर्येतर समाजाच्या धर्मकल्पना अथर्ववेदात संग्रहित आहेत असाही एक मतप्रवाह आहे.

ब्राह्राणांपैकी शतपथ, ऐतरेय, जैमिनीय ब्राह्राणे प्रसिद्ध आहेत. उपनिषदांची संख्या बरीच आहे. 'अल्लोपनिषद्’ नावाचेही एक उपनिषद आहे. पण आदि शंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये उल्लेखिलेली
'ईश-केन-कठ-प्रश्न-मुण्ड-माण्डुक्य- तित्तरि:।ऐतरेय च छांदोग्यं बृहदारण्यकं तथा।।’
ही दहा उपनिषदे प्राचीन मानली जातात. कौषितकी, जाबालि आणि श्वेताश्वतर या तीन उपनिषदांनाही काही लोक वरील दहांइतकेच प्राचीन मानतात.

उपनिषदांचा उगम

साधारणपणे आपला असा समज आहे की, यज्ञसंस्थेवर, पशुहत्येवर गौतम बुद्धाने सर्वप्रथम कडाडून हल्ला केला. सिद्धार्थ गौतमाचा हल्ला अतिशय प्रखर होता यात काहीच शंका नाही. पण उपनिषद काळातील ऋषींनीही हे काम कौशल्याने केल्याचे दिसून येते. ब्राह्मणग्रंथांच्या काळात यज्ञसंस्थेला अतिरेकी महत्त्व प्राप्त झाले. ‘देवतेला प्रसन्न करण्यासाठी मंत्र’ ही कल्पना मागे पडून ‘मंत्र म्हटले की देवतांनी प्रसन्न झालेच पाहिजे’ - जणू देवता ही मंत्राची गुलामच आहे - असा सारा यांत्रिक मामला बनला. यज्ञवेदी कशी बनवावी, तिची मापे, त्यासाठी लागणारे साहित्य, वेदी कोणत्या दिशेने असावी, कशाची आहुती दयावी, त्यासाठी कोणती भांडी वापरावीत........... अशा माहितीने खचाखच भरलेल्या कर्मकांडाच्या रगाडयात काहीजणांना जे हवे नेमके तेच गवसेनासे झाले. त्यामुळे काही विचारवंत बाहय कर्मांचा नाद सोडून अंतर्मुखतेकडे वळले. याचा अर्थ ब्राह्मणग्रंथ टाकाऊ आहेत असे मात्र नव्हे! विनोबाजींची उपमा वापरुन मी म्हणेन: ब्राह्मणग्रंथांच्या खांद्यांवर बसून उपनिषदकारांनी नवी वाट धुंडाळली!

यज्ञसंस्थेची बहिर्मुखता हे उपनिषदोदयाचे एकमेव कारण नसावे. एकंदरितच यज्ञ हा प्रकार प्रचंड खर्चिक झाला होता. यज्ञाच्या महत्त्वामुळे पुरोहित वर्गाचे समाजातील वजन भलतेच वाढले होते. उपनिषदांतील उल्लेखांवरुन असे दिसते की ब्रह्मविद्या प्रथम क्षत्रियांना उपलब्ध झाली. त्यांनी मग ती ब्राह्मणवर्गाला शिकविली. यज्ञाचे अपेक्षित फळ न मिळण्याचे अनेक प्रसंग घडल्यानंतर स्वाभाविकपणेच पुरोहित वर्ग फसवणूक करीत असल्याची भावना वाढीला लागली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अग्नी सर्व देवतांसाठी स्वर्गापर्यंत आहुती वाहून नेतो ही कल्पना निव्वळ बुद्धीच्या निकषावर हास्यास्पद वाटते. ईश्वरजिज्ञासेपेक्षा आत्मजिज्ञासा या काळात प्रभावी ठरली असावी. उपनिषदांत सृष्टीतील एकाही देवतेचे वर्णन नसून त्यात 'या सृष्टीच्या मुळाशी व सृष्टीस आधारभूत असे कोणते तत्त्व आहे’  या प्रश्नाचा शोधक बुद्धीने व शास्त्रीय दृष्टीने विचार केला आहे. 'ऋग्वेद हा भावनाप्रधान असून उपनिषदे ही बुद्धिप्रधान आहेत’ हे गुरुदेव रानडे यांचे विधान मग सहज मान्य होते.

वेदान्त

'वेदान्त याचा शब्दश: अर्थ 'वेदानाम् अंत:’ – ‘वेदांचा अंत’ असा होतो. उपनिषदांना वेदान्त असे म्हटले जाते. कारण क्रमानुसार उपनिषदे हा वेदांचा अंतिम भाग होय. काहींच्या मते गुरुकुलांमध्ये उपनिषदांचे पठण सर्वात शेवटी केले जायचे म्हणून ती 'वेदान्त’ होत. वेदान्त शब्दाचे विवेचन करताना प्रा. आर. आर. देशपांडे म्हणतात, ‘What is most important, however, is that the Upanishads were the culmination, the ultimate goal of Veda thought, the very highest point or acme, the point of perfection reached in respect of the Knoweldge, which is Spiritual Knowledge, Philosophical Knowledge.’

उपनिषद या शब्दाचा दोन तीन प्रकारे अर्थ लावला गेला आहे. गुरुच्या जवळ बसून केलेला रहस्यमय, गूढ संवाद असे त्याला थोडक्यात म्हणता येईल. उपनिषदांतून व्यक्त होणारी तत्त्वप्रणाली बांधीव स्वरुपाची नाही. वेगवेगळया विषयांवर विचारवंतांनी संवादरुपात प्रकट केलेले चिंतन असे उपनिषदांचे स्वरुप आहे. त्या तत्त्वविचारांची चर्चा आपण काही काळाने विस्ताराने करणार आहोत.

दर्शने

भारतीय तत्त्वज्ञानाच्या प्रांतात तत्त्वज्ञानाला 'दर्शन’ असे अत्यंत समर्पक नाव आहे. या दर्शनांचे प्रणेते म्हणून काही महापुरुषांची नावे घेतली गेली असली तरी ही दर्शने अतिशय प्राचीन आहेत असे मानले जाते. या दर्शनांचे वर्गीकरण दोन गटांत केले जाते. ते असे –

वैदिक दर्शने
अवैदिक दर्शने
सांख्य (कपिल)
चार्वाक
योग (पतंजलि)
बौद्ध (भगवान गौतम बुद्ध)
न्याय (गौतम)
जैन (भगवान महावीर)
वैशेषिक (कणाद)

पूर्वमीमांसा (जैमिनी)

उत्तरमीमांसा अथवा वेदान्त (बादरायण)


गणिताच्या काटेकोर भाषेत बोलायचे तर भारतीय तत्त्वज्ञानात वेदान्ताचे स्थान १/९ इतकेच आहे. पण जनमानसावर असलेला वेदान्ताचा प्रभाव पाहता या संदर्भात 'गणिताची भाषा’ बोलून चालणार नाही हे सहज लक्षात येते.

उपनिषदांतील तत्त्वज्ञान पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे बांधीव स्वरुपाचे नाही. ‘तार्किक पद्धतीचा अवलंब करुन अंतिम सत्याचे ज्ञान होणार नाही’ अशी उपनिषदांची धारणा आहे. उपनिषदांच्या स्वरुपाविषयी चर्चा करताना प्रा. दीक्षित म्हणतात की, 'एका व्यक्तीने सलगपणे निर्माण केलेले वाड्मय असे उपनिषदांचे स्वरुप नाही. भिन्नभिन्न काळात निरनिराळया ऋषींना स्फुरलेले विचार आणि आलेले काही महत्त्वाचे अनुभव यांचे उपनिषदांत कथन केलेले आहे. अर्थात तर्कदृष्टया चिरेबंद अशी एखादी इमारत उपनिषदांत आढळणार नाही. अंतिम सत्याच्या स्वरुपासंबंधी सर्वस्वी एकसारखे नसलेले विचार उपनिषदांत निश्चितपणे आहेत.’

त्यामुळे वेदान्त दर्शनाचा विचार करताना फक्त उपनिषदांचाच नाही तर आणखी दोन प्रस्थानांचा विचार करावा लागतो. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे व भगवद्गीता ही प्रस्थानत्रयी म्हणजे वेदान्त दर्शन होय. वेदान्त दर्शनातही पुन्हा अनेक विचारप्रवाह आढळतात. निरनिराळया आचार्यांनी या प्रस्थानत्रयीवर भाष्ये लिहिली आहेत. किंबहुना, प्रस्थानत्रयीवर स्वतंत्रपणे जो भाष्य रचतो तोच आचार्य असाही अर्थ रुढ आहे. या आचार्यांमध्ये मतभेद खूपच आहेत. वेदान्ताचे प्रमुख आचार्य व त्यांच्या मतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
१ शंकराचार्य: केवलाद्वैत
२ रामानुजाचार्य: विशिष्टाद्वैत
३ मध्वाचार्य: द्वैत
४ वल्लभाचार्य: शुद्धाद्वैत
५ निम्बार्काचार्य:द्वैताद्वैत

या सर्व वेदान्त मतांची थोडक्यात माहिती आपण पुढे घेऊ. 

Sunday, February 3, 2013

१४९. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग २ (आ) पाऊलखुणा

भाग: १, २ (अ)

देशासाठी

विवेकानंदांनी तत्त्वज्ञान कधीही केवळ चर्चेच्या पातळीवर जास्त काळ ठेवले नाही. चर्चेला त्यांनी नेहमीच क्रियाशीलतेची जोड दिली. ''आता अन्य देवदेवतांना मनात स्थानच नको. आपले एकमेव दैवत म्हणजे आपले राष्ट्र. त्याचीच आराधना करा. ते जागृत आहे. सर्वत्र त्याचेच चरण. त्याचेच हात. त्याचेच श्रवण. तो सर्वव्यापी आहे. बाकी सर्व दैवते झोपली आहेत. त्या विराटाचे दर्शन सर्वत्र होत असताना अन्य देवतांची ही व्यर्थ आराधना कशाला? या एकमेव उपास्य दैवताची उपासना आपल्या हातून घडू दे. त्यातच इतर दैवतांची उपासना आपोआप घडेल”, असे आवाहन काळाच्या अक्षुण्ण प्रवाहात विवेकानंद नावाच्या या संन्याशाने केले आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. 'सर्वं खल्विदं ब्रह्म’ या औपनिषदिक वाक्याचा हा किती तेजोमयी अविष्कार आहे!

व्यक्तीच्या विकासाला स्वामीजींनी जितके महत्त्व दिले, तितकेच राष्ट्राच्या विकासाला दिले. राष्ट्राच्या विकासाचा धागा विकसित व्यक्तिमत्वे असतात हे भान त्यांना होते. म्हणूनच व्यक्तिमत्व विकासाची दिशा राष्ट्रहितविरोधी असू नये अशी त्यांची भूमिका होती. 'प्रत्येक राष्ट्राला काही नियतीनियोजित कार्य असते’ असा त्यांचा दृढ विश्वास होता. अध्यात्म हाच भारताचा स्वभाव आहे आणि तेच त्याचे उर्वरित जगाला देणे आहे याची त्यांना जाणीव होती. म्हणूनच 'अध्यात्मावर तुमचा विश्वास असो वा नसो, तुम्हाला राष्ट्रजीवनासाठी अध्यात्माला धरुन राहिलेच पाहिजे’, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. अवास्तव व्यकितस्वातंत्र्याची मागणी करणारांना हा विचार म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा अथवा आक्रमण वाटेलही कदाचित. पण शेवटी व्यक्तीपेक्षा राष्ट्र आणि व्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा राष्ट्राचे स्वातंत्र्य (भौतिक आणि वैचारिकही!) अनेकदा जास्त मोलाचे असते हा धडा इतिहासाने आपल्याला वारंवार शिकविला आहे.

संघटना

सुधारणेची, परिवर्तनाची कोणतीच कामे एकटयाच्या हातून होत नाहीत. सुधारणा केवळ कायदा करुनही होत नाही. त्यासाठी लोकांनी एकत्रित येणे फार गरजेचे असते. स्वामी विवेकानंदांना अमेरिकेत सर्वात प्रभावित करुन गेलेली गोष्ट म्हणजे 'संघटना’! आळसाइतकाच मत्सर हा देखील भारतीय समाजाचा सर्वात मोठा शत्रू आहे असे त्यांना नेहमीच वाटे. पण या सर्व दुर्गुणांवर मात करुन संघटित स्वरुपात आपण लोकशिक्षणाचे कार्य केले पाहिजे असे विवेकानंद आग्रहाने प्रतिपादन करीत असत. 'रामकृष्ण मठ आणि मिशनची’ त्यांनी केलेली स्थापना म्हणजे समाजपरिवर्तनाच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल होते. संन्याशांची संघटना बांधणे आणि तिच्या द्वारे भारताच्या आध्यात्मिक आणि भौतिक प्रगतीचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करणे ही गोष्ट अलौकिक होती यात काहीच शंका नाही!

हे काम करत असताना विवेकानंदांवर काही कमी टीका झाली नाही. त्यांच्या हेतूंबद्दल संशय व्यक्त केले गेले. मनस्तापाचे प्रसंग त्यांच्याही आयुष्यात आले. पण विनम्र वृत्तीने आणि नि:स्वार्थ बुद्धीने विवेकानंदांनी आपले काम केले. 'मदांध आणि एकांतिक होऊ नका’ हा त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेला संदेश त्यांच्या उदारमतवादाची साक्ष देतो!

मातृदेवो भव

स्त्रियांबद्दल अत्यंत उदार असा मानवी दृष्टिकोन हे मला विवेकानंदांचे आणखी एक वैशिष्टय वाटते. सामान्यत: संन्यासी म्हटला की त्याने स्त्रियांपासून चार हात दूर राहावे असाच आपल्याकडे संकेत आहे. पण 'सर्वांमध्ये एकच आत्मा वि़द्यमान आहे’ असे सांगणा-या स्वामींजींच्या व्यवहाराने त्यांच्या तत्त्वज्ञानाला कधीही छेद दिला नाही. स्वत: सांगितलेल्या तत्त्वज्ञानाच्या विरोधात त्यांचा व्यवहार कधीच गेला नाही. भगिनी निवेदितांनी एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे 'स्त्रियांचे भय वाटावे इतकी स्वामीजींची वैराग्यवृत्ती उथळ नव्हती’. स्वामीजींच्या उदार मनोवृत्तीचे मोहक दर्शन यातून घडते.

स्वामीजी म्हणतात, 'पाश्चात्यांच्या दृष्टीने सारी नारी शक्ती पत्नीत्वात केंद्रिभूत झाली आहे. आणि भारतातील सामान्य माणसाच्या दृष्टीने सारी नारी शक्ती घनीभूत झालेली असते मातृत्वात!’ पण त्याचबरोबर बालविवाह, विधवांच्या पुनर्विवाहास असंमती यासारख्या काही मुद्यांवर स्वामीजींची मते काही वेळा अत्यंत मागासलेली, प्रतिगामी वाटतात हे नाकारता येत नाही. 'स्त्रिया जर पवित्र असतील तर माणूस (पुरुष) अपवित्र, पतित होईलच कोणामुळे?’ हा विवेकानंदांचा प्रश्न मला अत्यंत धक्कादायक वाटलेला आहे. विवेकानंद असे बोलले नसते तर अधिक बरे झाले असते अशी हळहळही मला अनेकदा वाटली आहे. पण व्याख्यानाचा मागचा-पुढचा संदर्भ, समोरच्या श्रोत्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी काय होती अशा अनेक मुद्यांचाही आपल्याला विचार करावा लागतो.

विवेकानंद अंध संस्कृतीरक्षक नव्हते असे मात्र नक्कीच म्हणता येईल. सीतेचा आदर्श स्त्रियांपुढे ठेवणारे विवेकानंद धर्ममार्तंडांना रोखठोक विचारतात की, 'स्त्री पुरुषांच्या ठिकाणी बाहय भेद असले तरी स्वरुपत: त्यांच्यात काही फरक नसतो. यामुळे पुरुष जर ब्रह्मज्ञ होऊ शकत असेल तर स्त्री का नाही होऊ शकणार?’ ते पुढे म्हणतात की, 'बालविवाह मला अगदी घृणास्पद वाटतो. ..... ही प्रथा गाडून टाकण्याचा शक्य तितका प्रयत्न मला केलाच पाहिजे..............बालिकेसाठी वर पाहून देणाराचा मी खूनही करु शकेन......’

स्त्री दाक्षिण्यासंबंधीचे त्यांचे काही विचार आधुनिक काळातील आपल्या विचारांच्याही दोन पावले पुढे आहेत असे जाणवते. स्त्रियांकडे भोगवस्तू म्हणून पाहिले जाऊ नये तर माणूस म्हणून पाहिले जावे असे त्यांनी आग्रहाने प्रतिपादन केले. त्यांच्या शिष्य परिवारात अनेक स्त्रिया होत्या. ‘स्त्रियांना शिक्षण दया (आणि शिक्षण म्हणजे आंतरिक क्षमतांचा विकास) म्हणजे त्यांचे प्रश्न त्या स्वत:च सोडवतील’ अशी भूमिका विवेकानंदांनी काळाच्या फार पुढे जाऊन सहजतेने मांडलेली आढळते.

मानवतावाद

विविध विषयांवरचे स्वामीजींचे विचार हा एक अनमोल खजिना आहे. त्यांच्या सर्वच विचारांचा विस्ताराने उहापोह येथे करता येणे शक्य नाही. पण शंभर वर्षांपूर्वी मांडले गेलेले विचार आजही तितकेंच महत्त्वाचे आहेत हे विशेष  आहे.

वास्तविक गेल्या शतकात जगाची फार मोठी प्रगती झाली आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या मदतीने दळणवळणामध्ये क्रांती घडून आली आहे. त्यामुळे कोणत्याही नव्या विचारांची लाट वेगाने जग पादाक्रांत करत आहे. जगावरती आपला प्रभाव टाकणा-या समाजवाद, मार्क्सवादासारख्या विविध विचारप्रणाली येथे निर्माण तर झाल्या पण त्या फार काळ, सर्वत्र तग धरु शकल्या नाहीत. त्या येथे रुजल्या नाहीत. चंद्रावर आणि मंगळावर स्वारी करणारा माणूस स्वत:च्या विचारांना काबूत ठेवण्यात, त्यांना योग्य दिशा देण्यात अयशस्वी ठरतो आहे ही आधुनिक युगाची मोठी शोकांतिका आहे.

'सत्य फक्त आम्हालाच समजले आहे...... या पृथ्वीतलावर राहण्याचा अधिकार फक्त आमचाच आहे..’ असा सत्याचा बाजार मांडणारांच्या गदारोळात 'एकं सत विप्रा: बहुधा वदन्ति’ (सत्य एकच आहे, विद्वान त्याला वेगवेगळया नावांनी ओळखतात) असा उदघोष पुन्हा करणारे विवेकानंद खचितच ‘वेगळे’ जाणवतात. शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेतील इतर विचारवंतांची भाषणे आणि स्वामीजींचे भाषण यात फरक असेल तर तो केवळ स्वामीजींच्या उदारमतवादी सहृदयतेचा आणि सर्वधर्मसमभावावरील त्यांच्या दृढ निष्ठेचा! पण त्यामुळे परिणामांमध्ये केवढा फरक पडतो!

स्वामीजींचा राष्ट्रवाद संकुचित कधीच नव्हता. श्री. इ. टी. स्टर्डी यांना ९ ऑगस्ट १८९५ रोजी लिहिलेल्या पत्रात विवेकानंद म्हणतात, 'भारताविषयी मला प्रेम आहे यात शंका नाही. पण दररोज माझी दृष्टी अधिकाधिक स्वच्छ होत चालली आहे. आपल्याला भारत, इंग्लंड, अमेरिका यांचे काय? अज्ञानी लोक ज्याला मानव समजतात, त्या ईश्वराचे आपण सेवक आहोत. जो वृक्षाच्या मुळाला पाणी घालतो तो सबंध वृक्षालाच पाणी घालत नाही काय?’ स्वामीजींच्या मते राष्ट्रवाद ही मानवतावादाच्या प्रवासातील पहिली पायरी होय.

विवेकानंद केवळ धार्मिक अथवा आध्यात्मिक क्षेत्रात मार्गदर्शन करणारे पारंपरिक गुरु नव्हते. वेदान्ताचा वसा घेऊन समाजपरिवर्तनाची स्वप्ने पाहणारा अन त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी अखंड धडपडणारा तो एक मनस्वी आणि निष्ठावान कार्यकर्ता होता! त्यांचे विचार चिरंतन काळापर्यंत महत्त्वाचे राहतील. त्यांचे युवाशक्तीला आणि राष्ट्र पुनरुत्थानाला शाश्वत आवाहन आहे - 'मृगेंद्राचे धैर्य, ईश्वरावरील श्रद्धेतून लाभलेले सामर्थ्य यांनी संपन्न असे लक्षावधी स्त्री पुरुष येथील पददलितांविषयीच्या अपार करुणेने प्रेरित होऊन जेंव्हा देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत संचार करतील आणि मुक्तीचा, सेवेचा, सामाजिक जागृतीचा आणि एकतेचा संदेश सर्वत्र पोहोचवतील तेंव्हा हिंदुस्थानच्या पुनरुत्थनाची पहाट उजाडेल!’

क्रमश:

Monday, January 28, 2013

१४८. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग २ (अ) पाऊलखुणा



'व्यक्तीपेक्षा विचार श्रेष्ठ असतात’ असे आपण म्हणतो आणि त्यात तथ्यही आहे. पण एखाद्या व्यक्तीचे विचार जाणून घेताना त्या व्यक्तीवर आयुष्यात कोणकोणत्या गोष्टींचा प्रभाव पडला आहे हे जाणून घेणेही आवश्यक आहे. त्यातून त्या व्यक्तीची जडणघडण आपल्या ध्यानात येते. श्री. अरविंद आश्रमाच्या माताजींनी सामान्य माणसाबाबत केलेले एक विधान येथे उदधृत करण्याचा मोह मला होतो आहे.  माताजी म्हणतात, “One believes he has his own way of thinking. Not at all. It depends totally upon the people one speaks with or the books he has read or on the mood he is in. It depends also on whether you have a good or bad digestion; it depends on whether you are shut up in a room without proper ventilation or whether you are in the open air; it depends on whether you have a beautiful landscape before you; it depends on whether there is a sunshine or rain! You are not aware of it; but you think all kinds of things; completely different according to a heap of things which have nothing to do with you!” तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या बाबतीत किती तंतोतंत खरे आहे हे!

विवेकानंदांसारखे महापुरुष अर्थातच बाहय प्रकृतीचे असे गुलाम नसतात. पण कोटयवधींची लोकसंख्या असलेल्या या देशात जेंव्हा एखादाच विवेकानंद जन्माला येतो तेंव्हा त्यांच्या आयुष्याच्या, परिस्थितीच्या  त्यांना भेटलेल्या माणसांच्या अभ्यासातून विवेकानंद अधिक चांगले समजायला मदत होते. विवेकानंदांच्या विचारांइतकेच त्यांचे चरित्र समजून घेणेही म्हणून मला महत्त्वाचे वाटते.

जॉर्ज विल्यम्स (George Williams) यांनी Swami Vivekananda: Archetypal Hero or Doubting Saint? या त्यांच्या लेखात विवेकानंदांच्या आयुष्याची विभागणी पुढीलप्रमाणे केली आहे -
      I.      Wondrous Child: Visions, Meditations
      II.      Exceptional College Student: Master of Western thought, Independent Thinker
     III.      Carefully trained by Sri Ramakrishna
     IV.      Warrior Monk: Conquers West, Awakens India

विवेकानंदांचे सर्वच चरित्रकार तपशीलातील बदल सोडल्यास सर्वसाधारणपणे याच प्रकारे त्यांच्या जीवनाचा अभ्यास करताना दिसून येतात. मी विवेकानंदांच्या चरित्राची मांडणी करताना पहिल्या दोन टप्प्यांना फारसे महत्त्व देणार नाही. पण विल्यम्स यांनी न मांडलेला 'परिव्राजक’ काळ मला स्वत:ला महत्त्वाचा वाटतो. त्याचा विचार येथे केला जाईल. स्वामीजींच्या वेदान्तविषयक विचार वगळून इतर विचारांचाही येथे मी थोडक्यात परामर्ष घेतला आहे.

पहिली काही वर्षे

विवेकानंदांचे मूळ नाव नरेन्द्रनाथ दत्त. त्यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी कलकत्त्यात झाला. त्यांचे वडील विश्वनाथबाबू दत्त हे प्रख्यात वकील होते. आई भुवनेश्वरी देवी अत्यंत धार्मिक प्रवृत्तीची स्त्री होती. नवसायासाने झालेल्या या मुलाचे फाजील लाड मात्र त्या दोघांनीही अजिबात केले नाहीत. प्रत्येक प्रसंगातून आपल्या मुलाला चांगले शिक्षण कसे देता येईल हेच त्यांनी सदैव पाहिले.

नरेन्द्राचे लहानपण मजेत गेले. त्याच्यातील आध्यात्मिक भूक, मनाचा मोठेपणा, साहस, निर्भयता, विरक्तता या मोठेपणी विशेषत्वाने दिसून आलेल्या गुणांची चाहूल त्याच्या बालपणीच्या अनेक प्रसंगांतून दिसून येते.

उघडया डोळयांनी जग पाहणे हे नरेन्द्राचे आणखी एक वैशिष्टय! ब्रिटीश राजवटीच्या निमित्ताने पाश्चात्त्य जडवादी विचारांचे आक्रमण भारतावर झाले होते. कलकत्ता ही तर त्या वेळची भारताची राजधानी. पण परंपरागत संस्कार आणि उपजत आध्यात्मिक प्रेरणा नरेन्द्राला वेगळे काही सांगत होत्या. त्यावेळच्या सर्व युवकांप्रमाणेच नरेन्द्रही नेमका कोणता रस्ता निवडायचा या द्वंद्वात सापडला व काही काळ तो सुधारणावादी 'ब्राह्मो समाजा’कडे आकृष्ट झाला. पण अनुभवाची आस काही त्याला स्वस्थ बसू देईना. पाश्चिमात्य विचारवंतांचे वाचन त्याने केले. पण त्यातील उणीवांमुळे त्याची भूक भागू शकली नाही. 'देव आहे का? अन् असला तर तो मला दिसलाच पाहिजे’ या विचारांनी नरेन्द्र झपाटला गेला. साधुसंन्याशांनी गजबजलेल्या या देशात वास्तविक ईश्वराची अनुभूती घेतलेले खूप लोक असायला हवेत. पण नरेन्द्राची निराशाच झाली!

रामकृष्ण ...... रामकृष्ण

'ज्याअर्थी देव दिसत नाही त्याअर्थी तो नसावाच’ अशा पक्क्या नास्तिकतेकडे नरेन्द्र झुकत असतानाच दक्षिणेश्वरच्या कालीमातेच्या मंदिराच्या पुजा-याशी त्याची भेट झाली. हे पुजारी म्हणजेच श्री. रामकृष्ण परमहंस. नरेन्द्राचे हृदय उर्वरित आयुष्यात याच माणसाचे गीत गाणार होते! ही भेट केवळ नरेन्द्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातही महत्त्वाची ठरली. 'होय, ईश्वर आहे आणि जितक्या स्पष्टपणे मी तुला पाहतो त्याहून कैक पटींनी स्पष्टपणे मी ईश्वराला पाहतो’ या त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण उद्गारांनी नरेन्द्र आश्चर्यचकित आणि आनंदितही झाला! अंधश्रद्धाळू भक्ती नरेन्द्राच्या स्वभावात अर्थातच नव्हती. पण रामकृष्णांबद्दलच्या त्याच्या प्रत्येक संशयाचे निराकरण झाले अन वरवर रुक्ष दिसणा-या नरेन्द्राच्या अंतरंगातील कोमलता प्रकट होऊ लागली.

रामकृष्णांच्या परिसस्पर्शाने नरेन्द्राचे जीवन उजळून निघाले. रामकृष्ण-नरेन्द्राच्या सहवासाचा चार वर्षांचा हा कालावधी (१८८२ ते १८८६) मला सर्वार्थाने विलोभनीय वाटतो. नरेन्द्राच्या रुक्ष वादविवादांनी रामकृष्णांचे हळवे अंत:करण घायाळ होई; तर नरेन्द्राच्या वैज्ञानिक दृष्टीला रामकृष्णांच्या अनेक कृती, त्यांचे अनेक अनुभव सहजासहजी पचनी पडत नसत. पुढे अनेक वर्षांनी स्वामीजी भगिनी निवेदितांना म्हणाले,  “Let none regret that they were difficult to convince! I fought my Master for six long years, with the result that I know every inch of the way! Every inch of the way!!”

रामकृष्णांचे नरेन्द्रावरील नितांत प्रेम, मातेचे कार्य करण्यासाठीच नरेन्द्र जन्माला आला आहे हा त्यांचा दृढ विश्वास आणि रामकृष्णांचे खुले अंत:करण, त्यांच्या भावातीत अवस्थेचे वेळोवेळी घडणारे दर्शन, त्यांच्या तत्त्वज्ञानाची व्याप्ती आणि त्यानुसार घडणारे आचरण यामुळे याच गुरुकडून आपल्याला मोक्षप्राप्ती मिळेल असा नरेन्द्राचा दृढ विश्वास .......!! या परस्पर विश्वासाच्या आधारावरच दोघांचे एकमेकांशी नाते टिकून राहिले! नरेन्द्र ‘खूप मोठे काम करणार आहे’ अशी रामकृष्णांची खात्री (स्वत: नरेन्द्रला मात्र तसे अजिबात वाटत नसे) त्यामुळे त्यांनी नरेन्द्रच्या विरोधात एक चकार शब्दही कधी कोणाकडून ऐकून घेतला नाही.

रामकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करीत असतानाच अचानक नरेन्द्रचे वडील मृत्युमुखी पडले. मायेचे छत्र तर गेलेच शिवाय आर्थिक सुरक्षितताही गेली. आईचे अन भावंडांचे पोट भरण्यासाठी नरेन्द्र वणवण फिरु लागला. सुस्थितीतून अचानक दारिद्र्यात फेकले गेल्याने अवाक् आणि हताश बनलेली नरेन्द्रची आई ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल साशंक झाली आणि ही साशंकता नरेन्द्रच्या मनापर्यंत पोहोचली. पण त्याचवेळी रामकृष्णांनी अद्वैताचा असा एक अनुभव नरेन्द्रला दिला की, उर्वरित आयुष्यात नरेन्द्रने प्रतिकूल परिस्थितीतही ईश्वराबददल कधीच शंका घेतली नाही.

रामकृष्णांचे आजारपण वाढले आणि १८८६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. कोवळया नरेन्द्रवर हा दुसरा मोठा आघात होता. पण त्याचे उपजत नेतृत्व इथे सिद्ध झाले. त्याच्या अभ्यासाची धार इथे लखलखीत झाली. त्याच्यामधले संघटन कौशल्य इथे दिसून आले. समवयस्क संन्यासी बांधवांना गुरुच्या मृत्युनंतर एकत्र बांधून ठेवणे, त्यांची आध्यात्मिक प्रगती होईल हे पाहणे, एकत्रित साधनेबरोबरच आर्थिक व्यवहार सांभाळणे ही सगळी कामे त्याने इतक्या तयारीने केली की 'नरेन्द्र तुम्हाला शिकवेल’ हे रामकृष्णांचे उद्गार त्याने सार्थ ठरविले.

पण नुसत्या अभ्यासाने नरेन्द्रचे मन शांत होत नव्हते! आयुष्यात नेमके आणि नक्की काय करायचे आहे याची स्पष्ट कल्पना नसल्याने त्याच्या मनाची तगमग होत होती. गुरुने मुक्त हस्ते उधळलेले ज्ञान आपल्यापर्यंत का पोहोचले नाही याची त्याला खंत होती. अन नरेन्द्र भारतभ्रमणाला बाहेर पडला.

भारतभ्रमण

हा परिव्रजनाचा काळ नरेन्द्रच्या आणि भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला यात शंकाच नाही. हिमालय ते कन्याकुमारी या प्रवासात नरेन्द्र समाजाच्या विविध अंगांना, व्यक्तींना, घटनांना सामोरा गेला. एक साधा संन्यासी या प्रवासातच झपाटून गेला. जडवाद आणि चैतन्यवाद, पाश्चात्य विज्ञान आणि भारताची आध्यात्मिकता यांची एकमेकांना ओळख झाली नाही तर माणसाचे माणूसपण हरवून जाईल, या दोहोंना जोडणे हेच आपले काम आहे याचीही या तरुण संन्याशाला या प्रवासातच जाणीव झाली.

स्वामीजींनी भारतभ्रमंतीच्या काळात जी दैन्यावस्था पाहिली त्यामुळे ते व्याकूळ झाले. धर्माच्या नावाखाली इथल्या दीनदलितांचे जे शोषण उच्चवर्णीयांनी चालवले होते, त्याची जाणीव त्यांना झाली. 'अहो, भारतातील उच्चवर्णीयांनो! या मायामय जगात तुम्हीच खरोखर आभासमय आहात, गूढ आहात, वाळवंटातील मृगजळ आहात! तुम्ही भूतकाळाचे प्रतिनिधी आहात. भूतकाळातील विविध प्रकारांचे तुम्ही नुसते प्रतिनिधी आहात..............भविष्याच्या दृष्टीने तुम्ही नुसते शून्य आहात.......प्राचीन भारताच्या मृत शरीराच्या रक्तमांसहीन अस्थिपंजरांनो, तुम्ही ताबडतोब धुळीला मिळून हवेत विलीन का नाही होत? एक गोष्ट मात्र खरी, अजून तुमच्या बोटांच्या हाडांवर तुमच्या पूर्वजांनी सांभाळलेल्या हि-याच्या अमूल्य अंगठया झळकत आहेत...... आता तुमचा तो खजिना अगदी झटपट आपल्या वारसदारांना देवून टाका बघू......’ या त्यांच्या घणाघाती उद्गारांमागे भारतभ्रमणाचा जिवंत अनुभव होता!

धर्म हा मूठभर लोकांसाठी सत्तासाधन म्हणून उपयोगात आणला जातो आहे हेही त्यांनी पाहिले. ज्या देशामध्ये अद्वैत तत्त्वज्ञानाचा उद्घोष झाला त्याच देशात तत्त्वज्ञान पोपटपंचीसाठी आणि व्यवहार मात्र माणुसकीला काळीमा फासणारा............. हा विरोधाभास पाहून त्यांचे अंत:करण हळहळले. वर्षानुवर्षे अंध:कारात खितपत पडलेल्यांना या समाजरचनेत अंध:कार, अन्याय आणि शोषण याव्यतिरिक्त काही मिळणार नाही हीही वस्तुस्थिती  त्यांनी उघडया डोळयांनी पाहिली.

समाजाच्या अवनतीचे मुख्य कारण म्हणजे धर्मातील कर्मकांडांना दिलेले अवाजवी महत्त्व. एखादी गोष्ट माणूस कशी वापरतो यावरच त्या वस्तुची उपयुक्तता व उपद्रवता अवलंबून असते. आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीतही आपण हेच पाहत आहोत. स्वामीजींच्या हे प्रकर्षाने लक्षात आले होते. म्हणूनच त्यांच्या उर्वरित आयुष्यातील विचारांचा आणि कृतींचा धागा माणसाची फक्त बाहय परिस्थिती बदलविणे हा कधीच नव्हता, तर माणसाला स्वत:मधील सत्प्रवृत्तींची ओळख करुन देणे त्यांनी स्वत:चे जीवितकार्य मानले. धर्म हा मुळात वाईट नाही, आपण त्याला वाईट पद्धतीने वापरतो. आपल्या समाजरचनेतील काही रुढी या सद्यस्थितीत योग्य नसतील तर आपण नव्या परंपरा निर्माण केल्या पाहिजेत असा क्रांतिकारी विचार त्यांनी मांडला.

विधायक क्रांती

स्वामीजींचे वैशिष्टय हे की, क्रांतिकारक विचार मांडताना त्यांना कसल्याही विध्वंसाचा आधार घ्यावा लागला नाही. धर्मावर आघात करुन सुधारणा आणू पाहणा-या समकालीन सुधारकांबद्दल, त्यांच्या प्रामाणिक हेतूंबद्दल त्यांना आदर होता. पण त्यांनी स्वत: मात्र तो मार्ग कधीही चोखाळला नाही. ‘पाश्चात्यांची भ्रष्ट नक्कल म्हणजे सुधारणा’ असे मानण्याइतके उथळ विचारवंत विवेकानंद कधीच नव्हते. सर्व प्रकारची प्रगती ही आतूनच होत असते असे त्यांचे ठाम मत होते. 'Each soul is potentially Divine’ ही औपनिषदिक तत्त्वाची त्यांनी केलेली घोषणा इतर कोणत्याही वादाच्या जाहीरनाम्यापेक्षा मला श्रेष्ठ वाटते. कारण त्यामधून जात, प्रांत, भाषा, इतकेच नव्हे तर धर्म, लिंग आणि देश यांच्याही पल्याड जाऊन सर्व माणसांना विकासाची समान संधी असल्याचे शाश्वत सत्य विवेकानंद आपल्या समोर मांडतात.

‘सुधारणा म्हणजे मोडतोड नव्हे तर पुनर्बांधणी’ हा नवा दृष्टिकोन त्यांनी सुधारकांना दिला. आणि त्याच वेळी पुराणमतवाद्यांवर त्यांच्याइतकी प्रखर टीका त्या काळात तरी अन्य कोणीच केली नसेल. विवेकानंद म्हणतात, 'आमचा धर्म स्वयंपाकघरातल्या सोवळया-भांडयांमध्ये गुदमरुन जात आहे. आम्ही वेदान्ती कसले, पौराणिक कसले नि तांत्रिक कसले! आम्ही आहोत 'शिवू नको’ वादी! आमचा धर्म आहे स्वयंपाकघरात, देव आहे चुलीवरच्या भांडयात.........’

गूढवाद आणि अंधश्रद्धा यांचा आधार घेऊन उभ्या असलेल्या धर्मावर त्यांनी कठोर प्रहार केले. आपल्याकडच्या जुनाट, भ्रामक समजुती आणि युरोपीयनांचा भोगवाद नि जडवाद - दोन्हीही आपल्याला नको आहेत - या दोन्हींमधूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. भारताचा स्वभाव 'अध्यात्म’ हाच आहे आणि त्याला यात्किंचितही धक्का न लावता, किंबहुना त्याचाच योग्य तो उपयोग करुन आपण आपल्या राष्ट्रीय जीवनाचा स्तर कसा उंचावू शकतो याचे स्पष्ट चित्र विवेकानंदांनी रंगविले.

भारतभ्रमणात स्वामीजींना जे अनेक अनुभव आले त्यातून अध्यात्म हाच भारताला एकसंध राखणार दुवा आहे याबाबत त्यांची खात्री पटली होती. भारताची मर्मस्थळे कोणती याची त्यांना जाणीव झाली. अंधार आहे म्हणून नुसतेच उसासे टाकत राहण्यापेक्षा 'आपण प्रकाश आणण्याचा प्रयत्न करु या’ अशा विधायक भूमिकेतून विवेकानंद अंतापर्यंत काम करत राहिले.

क्रमश: