ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, December 3, 2012

१४३. सबलीकरण

पुरुष माणसं मीटिंगमध्ये हजर असताना त्या खुर्चीत बसू शकत नाहीत, मी मात्र बसू शकते.
मी महागडे कपडे वापरू शकते, त्या नाही वापरु शकत.
मी चारचाकीने प्रवास करू शकते, त्या कधीच चारचाकीत बसलेल्या नाहीत.
मी डिजीटल कॅमे-याने फोटो काढू शकते, त्यांनी कधीच फोटो काढलेला नाही.
मी वेगवेगळ्या राज्यांत प्रवास करते, त्यांच्यापैकी अनेकींनी शेजारचा तालुकाही पाहिलेला नाही.
माझ्याकडे मोबाईल फोन आहे, त्यांच्याकडे तो नाही.
मी वाचू शकते,लिहू शकते – त्या शाळेत गेलेल्या नाहीत.
मी माझ्या इच्छेने मला हवे तेव्हा आणि मला पाहिजे तितके पैसे खर्च करू शकते; त्यांना अशी चैन करता येत नाही.
मी इंग्रजी बोलते, त्या बोलायचे तर लांबच, समजूही शकत नाहीत ती भाषा.

माझ्या सोबत असलेल्या स्त्रियांचा दृष्टीने ‘तुम्ही किती हुशार आणि आम्ही किती अडाणी’ असा मुद्दा अधोरेखित करणारी ही यादी न संपणारी आहे. त्यांच्या दृष्टीने मी जणू कुठल्यातरी परग्रहावरून आले आहे. त्यांच्या आणि माझ्या जगण्यात साम्य तर नाहीच पण त्यांना कधी माझ्यासारखं जगता येईल ही शक्यताही त्यांना दिसत नाही. खरं तर या जाणीवेत, या भावनेत, या अभिव्यक्तीत एक संदेश पण आहे माझ्यासाठी. ‘तुम्ही जे काही बोलाल, ते आम्हाला लागू पडणार नाही’ असंच जणू त्या स्त्रिया मला सांगायचा प्रयत्न करताहेत. मी बरीचशी संदर्भहीन आहे त्या परिस्थितीत.
मला त्या स्त्रियांची भावना समजते. पण सत्याला अनेक बाजू असतात आणि त्यांना केवळ सत्याची एक बाजू दिसते आहे असं मला वाटतं. कारण त्या सत्याची दुसरीही एक बाजू आहे – ती मला आत्ताच दिसते आहे असं नाही, तर अनुभवाने मला ती माहिती आहे. त्या बाजूची चर्चा झाल्याविना हा संवाद पूर्ण नाही होणार माझ्यासाठी.
मी गुजरात राज्यात आहे. तापी जिल्ह्यातल्या छिन्दिया गावाच्या एका पाड्यात मी आहे. माझ्या सोबत पंधरा वीस कोटवालिया स्त्रिया आणि काही मुले-मुली आहेत. भारत सरकारने एकंदर ७५ आदिवासी समूहांना ‘आदिम जनजाती’ अशी मान्यता दिलेली आहे. या समुहांची जीवनशैली बरीच जुन्या पद्धतीची  आहे आणि विकासाचा वारा त्यांच्यापर्यंत न पोचल्याने त्याच्या फायद्यांपासून ते वंचित आहेत. त्यांची शेतीची आणि उपजीविकेची साधनं आधुनिक झालेली नाहीत अद्याप.
मीटिंगच्या आधी मी त्यांच्या वस्तीतून एक फेरफटका मारते आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा प्राथमिक स्वरूपाचा अंदाज मला आला आहे. शिवाय इथं येण्यापूर्वी माझ्या सहका-यांनी मला या समूहाची, या गावाची माहिती पुरवली आहे. त्यामुळे समोर येत असलेल्या दृश्यात अनपेक्षित, धक्का बसावं असं काही नाही माझ्यासाठी. जे आहे ते काही फारसं सुखावह नाही, हे मात्र निश्चित.
स्त्रियांच्या सोबत फेरफटका मारताना अनेक विषयांवर आमच्या गप्पा होत आहेत. त्यात मी वर उल्लेख केलेले अनेक मुद्दे येताहेत. इथं मला त्यांच्या जगण्याबद्दल जितकं कुतूहल आहे, तितकंच, किंबहुना थोडंसं जास्तच त्यांना माझ्या जगण्याबद्दल आहे. शिवाय मी एकटी आणि त्या वीस जणी – त्यामुळे एकापाठोपाठ मला प्रश्न विचारण्याची संधी त्यांना आहे. मला गुजराती भाषा चांगली समजते त्यामुळे त्या विनासंकोच प्रश्नांच्या फैरी माझ्यावर झाडत आहेत. मला गुजराती फार चांगलं बोलता येत नाही – बोलण्याच्या ओघात मी व्याकरणाच्या चुका करते आहेत. त्यामुळे खूष होऊन त्या स्त्रिया आणि  लहान मुलं हसत आहेत.
माझे प्रश्नही बहुधा विनोदी आहेत. पाड्यात भटकताना मला एक सायकल दिसते, तेव्हा ‘तुमच्यापैकी कुणाला येते सायकल?” या माझ्या प्रश्नावर सगळ्याजणी हसतात. कदाचित त्या प्रश्नातूनच ती वरची प्रश्नोत्तरी उगम पावली आहे. झाडाखाली एक पुरुष बसला आहे. तो माझा प्रश्न ऐकतो आणि त्या स्त्रियांना त्यांच्या (आदिवासी) भाषेत काहीतरी सांगतो, त्यावर एकच हशा उसळतो. “काय म्हणाले ते भाई?” मी विचारते. तर तो भाई म्हणालेला असतो की, “सांगा येते सायकल आम्हाला म्हणून. त्या बेनसमोर कशाला काही येत नाही म्हणता? तिला थोडचं खरं काय ते कळणार आहे?” पण त्या स्त्रिया खोटं सांगत नाहीत. कदाचित मी ‘दाखवा बरं चालवून’ असं म्हणेन याचा त्याना एव्हाना अंदाज आला असावा.
पण तो माणूस हुशार आहे – अनोळखी लोकांसमोर आपली बलस्थानंच फक्त जाहीर करावीत – हे त्याचं धोरण तसं पहायला गेलं तर योग्यच आहे.
भटकून झाल्यावर आम्ही एक ठिकाणी बसून ‘मीटिंग’ करतो आहोत आता. माझ्या इथं येण्याने स्त्रियांचा न्यूनगंड वाढणं योग्य नाही याची मला जाणीव आहे. त्यांनी त्यांना येत नसणा-या गोष्टी प्रामाणिकपणे मला सांगितल्या आहेत. आता गरज आहे मीही तितकंच प्रामाणिक असण्याची. 



मिटींगमधली औपचारिकता पार पडते – ओळख, स्वागत वगैरे. आता मी बोलायचं आहे. मी ती संधी घेते. त्या स्त्रियांच्या रोजच्या कामाची चर्चा सुरु करते.
आजपर्यंत कोटवालिया समाजाने गायीम्हशी कधीच पाळल्या नव्हत्या. पण सरकारी योजेनेचा भाग म्हणून आता त्यांना म्हशी मिळाल्या आहेत. इथल्या स्त्रिया आणि पुरुष काहीही अनुभव पाठीशी नसताना म्हशीची धार काढायला लागल्या आहेत.
“हं! मला नाही येत गायी-म्हशीची धार काढायला.कधीच काढली नाहीये मी धार,” मी सांगते. सगळ्या हसतात.
या सगळ्या स्त्रिया शेणाच्या गोव-या करतात, मला हेही काम येत नाही करता.
जंगलात एकटीने जायचं आणि जळणासाठी पाहिजे ती (योग्य या अर्थाने) लाकडं आणायची हे रोजचं काम आहे त्यांचं. मी जंगलात एकटी जाऊ शकणार नाही आणि कोणतं लाकूड जाळण्यासाठी योग्य आहे हे मला कळत नाही आणि मला लाकूड तर तोडताच येणार नाही हे मी जाहीर करते. सगळे पुन्हा हसतात. आता त्यांना गंमत वाटायला लागली आहे. आत्तापर्यंत मी ‘हुशार’ होते त्यांच्या दृष्टीने, पण मला अनेक गोष्टी येत नाहीत हे हळूहळू त्यांच्या लक्षात येतंय!!
हापशावरून त्या पाणी आणतात – घराला लागेल तितकं. मला भरलेली बादली उचलायला फारसं जमणार नाही हे मी त्यांना सांगते.
त्या स्त्रियांना त्यांची आदिवासी भाषा आणि गुजराती दोन्ही चांगल्या येतात, हिंदीही थोडी थोडी बोलता येते. म्हणजे त्यांना तीन भाषा येतात. मलाही हिंदी, गुजराती येत असलं तरी त्यांची भाषा मात्र येत नाही.
त्या चुलीवर स्वैपाक करतात, मला तर चूल पेटवताही येत नाही, स्वैपाक करणं तर फार पुढची गोष्ट!
त्यांना बांबूची बास्केट बनवता येते – जी मला येत नाही.



आता आमच्या चर्चेत रंग भरायला लागला आहे. मला असंख्य गोष्टी येत नाहीत याची त्यांना झालेली जाणीव त्यांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास जागा करते आहे.
त्यांना तालावर नृत्य करता येतं; मला येत नाही.
त्यांना गाणी गाता येतात वेगवेगळ्या प्रसंगाना अनुरूप; मला गाता येत नाही.
त्यांना झाडं ओळखता येतात, झाडांची नावं सांगता येतात – माझं ज्ञान दोन-चार झाडांपल्याड जात नाही.
त्यांना ‘माशांची आमटी आणि भाजी ’ बनवता येते मस्त – मला मासेही ओळखू येत नाहीत वेगवेगळे.
शहरतली असले, शिकलेली असले, पैसेवाली असले, इंग्रजी बोलता येणारी असले ... तरी मला सगळं येत नाही ही गोष्ट आता त्या स्त्रियांना चकित करून गेली आहे.
माझ्यासाठी ही साधी गोष्ट आहे. जगण्याची काही कौशल्य त्या स्त्रियांकडे आहेत – काही माझ्याकडे आहेत. काही माझ्याकडं असणारी कौशल्य जशी त्यांच्याकडं नाहीत तशीच त्यांच्याजवळ असणारी अनेक कौशल्य माझ्याकडं नाहीत. त्या काही बाबतीत अडाणी आहेत तर मी काही बाबतीत अडाणी आहे.
नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे आमच्यात फरक पडला आहे हा? शिक्षण? जात? आर्थिक स्थिती? शहर-खेड्यात असणा-या संधी? त्या आदिवासी आहे आणि मी नाही म्हणून? धर्म? हा फरक केवळ वर्तमानाताला आहे की त्याला भूतकाळ आहे? हा फरक इथं संपणार की भविष्यातही असाच राहील?
अनेक प्रश्न. त्या प्रश्नांची उत्तरं माहिती नाहीत; जी माहिती आहेत ती विषण्ण करणारी आहेत. म्हणून मी प्रश्न विचारत नाही, त्यांची उत्तरं इथं शोधायचा प्रयत्न करत नाही. आम्ही मिळून ज्या गप्पा मारतो आहोत, त्यातून आमची एकमेकीच्या आयुष्याबद्दलची समज वाढायला मदत होते आहे हे मात्र नक्की! त्यातून आमचे सगळ्यांचेच सबलीकरण होते आहे कळत नकळत!

स्वत:ला पाहिजे तसे निर्णय घेत स्वत:चं आयुष्य घडवण्याची क्षमता असणं अशी सबलीकरणाची ढोबळ व्याख्या करता येईल. ही क्षमता प्रत्येक व्यक्तीला आणि समूहाला मिळणा-या संधींवर अवलंबून असते. आपली बलस्थानं कोणती याचं भान असणं ही या प्रक्रियेतली महत्वाची गोष्ट आहे. आमच्या या चर्चेतून आम्हाला आमची बलस्थानं कळली हे फार चांगलं झालं! आपल्याला जे चांगलं करता येतं त्याबद्दल आपल्याला काय वाटतं याच्याइतकंच महत्त्व आहे ते आपल्याला जे काही चांगलं करता येत नाही त्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते!!
त्यादिवशी आमच्या त्या गप्पा आम्हाला सगळ्यांनाच नवा विचार देवून गेल्या.

मी काय केलं मला नाही माहिती; पण त्या स्त्रियांनी मला थोडं अधिक सबल केलं त्यादिवशी!!       
**                                                                                                                     

Saturday, November 24, 2012

१४२. लेखन: बाहेर आणि आत

‘लिहिणं’ ही जाणीवपूर्वक केली जाणारी कृती असूनही ती काहीशी धूसर आहे माझ्यासाठी.
म्हणून ‘लिहिण्या’बद्दल मला अनेक प्रश्न पडतात.
उदाहरणार्थ: ‘लिहिणं म्हणजे नेमकं काय?’
‘अव्यक्ताला व्यक्त होण्याची निकड का भासते?’
‘यासाठी शब्दांचं माध्यम का निवडलं जात?’
‘अभिव्यक्तीसाठी रचनाप्रकार (गद्य की पद्य, ललित की वैचारिक ..) कसा निवडला जातो?’
‘मला अक्षरओळख नसती, तर मी कशी व्यक्त झाली असते?’
‘लिहिण्याची प्रक्रिया आत किती असते आणि बाहेर किती असते?”
‘लिहिण्याला कशाची मदत होते? कशाचा अडथळा होतो?’
‘मी का लिहिते?’

***
‘मी लिहायला कधी लागले’, हा काही महत्त्त्वाचा प्रश्न नाही. तो फार फार तर ‘मी लिहायला का लागले’ असा विचारणं अनेकजण पसंत करतील. खरं तर आपण जे कोणी शाळेत जातो, ते सगळेच ‘लिहायला’ शिकतो. मग तरीही ‘काही लिहू शकतात’ आणि ‘काही लिहू शकत नाहीत’ अशी विभागणी कसकशी होत जाते याबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटत आलेलं आहे. मान्यवर साहित्यिकांच्या जीवनात आणि साहित्यात या प्रश्नाचं उत्तर बहुधा मिळत असणार; पण त्यात मी ते कधी शोधलं नाही. कारण? आळस; बाकी काही नाही. स्वत:च्या आयुष्यात उत्तरं शोधणं मला नेहमी जास्त सोयीचं वाटतं. ते उत्तर सर्वसमावेशक नक्कीच नसतं. पण अगदी खरं सांगायचं तर ‘सर्वसमावेशक’ या शब्दाचा अर्थ संदर्भांनुसार बदलत जातो आणि तसं ‘सर्वसमावेशक’ काहीच नसतं!
‘मी कधी लिहायला लागले’ हा काही फार मोठा संशोधनाचा किंवा गूढ विषय नाही. कारण शाळेत गेले पहिल्या वर्गात, तेव्हा पाटीवर पेन्सिलनं वेगवेगळे आकार काढून त्यांना ‘ग’, ‘म’ अशी नावं असतात ती म्हणायला आणि काढायला मी शिकले. म्हणणं आणि लिहिणं या दोन्ही क्रिया एकाच वेळी व्हायच्या – म्हणजे बोलताना लिहिलं जाईलच अशी गरज नसायची. पण जो शब्द लिहायचा तो मोठमोठ्याने उच्चारत लिहायचा अशी पद्धत मला शिकवण्यात आली होती. नंतर कधीतरी लक्षात आलं की बोलणं आणि लिहिणं या दोन वेगळ्या क्रिया आहेत आणि त्या एकमेकींच्या सोबतीविनाही मजेदार असू शकतात. त्यातली कोणती गोष्ट अधिक सोपी याबद्दलचं माझं मत प्रसंगानुसार बदलत जातं!
शाळकरी वयात लिहिताना – विशेषत: पहिल्या दोन-चार इयत्तांत - डोक्यात नेमकं काय चालायचं हे माहिती नाही. पण इतरांकडे पाहून आणि शिक्षणपद्धतीचा एकंदर विचार करता ते ‘लिहिणं’ म्हणजे ‘केवळ नक्कल करणं असणार’ हे नक्की म्हणता येतं. म्हणजे पुस्तकाच्या धडयातली वाक्य ‘न पाहता’ जशीच्या तशी उतरवता येणं या कौशल्याला ‘लेखनकौशल्य’ म्हटलं जायचं असा तो काळ होता. पाटी, पेन्सिल, हात (एक पुरेसा होता!), स्मरणशक्ती आणि थोडंफार डोकं इतकंच लागायचं लिहिण्यासाठी.
आणखी पुढं गेल्यावर ‘निबंध लेखन’ हा प्रकार समोर आला. ‘कवितेतल्या ओळींचं स्पष्टीकरण’ हाही प्रकार आला. इथंही वाचलेले आणि ऐकलेले शब्द कागदावर उतरवले जाणं इतकंच अपेक्षित होतं. पण हे शब्द वर्गाबाहेरचे असायला मुभा होती. किंबहुना असे ‘बाहेरचे’ शब्द वापरल्याबद्दल कौतुक होतं. शब्दांशी खेळ करता येतो हे निबंध लिहिताना पहिल्यांदा लक्षात आलं. खरं आणि खोटं असंच फक्त नसतं – तर काल्पनिकही काही असतं आणि त्याला खऱ्या-खोट्याचा न्याय लावता येत नाही हे कळल्यावर थोडा गोंधळ झाला होता. माझा. ‘जे नाही त्याचाही विचार आपण करू शकतो’ (नाही अशा अर्थानं की जगण्यात नाही आणि पुस्तकांतही नाही) या अनुभवाने ‘ग्रेट’ वाटलं होतं. इथं आता लिहिण्याची कला ‘केवळ नक्कल’ यापल्याड जाऊ लागली. पण तरीही त्याला काही मर्यादा होत्याच. अनुभवविश्व मर्यादित असल्यानं कल्पना ताणून ताणून किती ताणली जाणार? कागद, पेन, हात, स्मरणशक्ती, थोडंफार डोकं – यासोबत ‘मनाला मोकाट सोडण्याची तयारी’ इथं जोडली गेली लेखनाच्या प्रक्रियेत. यात अनुभव, वास्तव आणि स्वप्न यांचं एक अनोखं मिश्रण व्हायला लागलं नकळत! आपल्या मनात जे काही असतं ते समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचायचं तर ‘नीट’ मांडावं लागतं (अक्षर चांगलं असणारे चांगलं लिहितात असा समज शाळेने घडवला आणि तो पुढे धक्का बसून सुटेपर्यंत सोबत होता!) हेही अनुभव शिकवून गेला होता तोवर. लिहायला ‘विचार’ करावा लागतो – निदान ते कसं मांडायचं याचा विचार करावा लागतो हे पुसटसं जाणवलं, पण त्यावर विचार नाही केला अधिक. प्राथमिक वर्गांपेक्षा इथला आवाका थोडा वाढला होता आता. काहींची कल्पनाशक्ती आणि अभिव्यक्ती इतर अनेकांपेक्षा वेगळी असते हे लक्षात आलं. चांगलं लिहिता येणं आणि हुशार असणं या दोन गोष्टींचा तसा संबंध नाही हेही कळलं. पण हा बदल सावकाश झाला असल्यानं तो जाणवलाही नव्हता.
महाविद्यालयात शास्त्र शाखेचं शिक्षण घेतल्यानं ‘भाषा’ विषयाची संगत सुटली. भाषेत ‘फक्त पास होण्यापुरते’ मार्क मिळवण्याची सोय होती. या काळात अभ्यासात जे लिहावं लागायचं त्यातून कल्पनाशक्तीला लगाम बसला पण ‘तर्क’ नावाची नवी गोष्ट आली. अंदाज तर्कानं बांधता येतात आणि अंदाज कल्पनेनंही करता येतात असं जाणवलं. मग यातले कोणते अंदाज जास्त बरोबर निघतात याचा शोध घेताना ‘तर्क’ हे जास्त चांगलं म्हणजे ‘विश्वासार्ह’ साधन आहे हे जाणवलं. लिहिण्यात आपण कल्पनाशक्ती स्वैर सोडू शकतो पण बोलताना ते करून चालत नाही हे कळल्यावर गंमत वाटून बोलणं आणि लिहिणं या दोन्हींमधली साम्यस्थळं आणि फरक शोधण्याचाही खेळ खेळून झाला.
शाळेत शिकत असताना वार्षिक हस्तलिखित अशी अभ्यासेतर लेखनाची मर्यादित संधी असायची. महाविद्यालयातही ती संधी होती. पण इथं जागा कमी आणि लिहिणारे भरपूर अशी स्थिती असल्यानं लिहू ते छापून येईलच अशी (शाळेत असणारी) खात्री नव्हती. लेखनाच्या प्रक्रियेत वाचक नावाचा वर्ग महत्त्वाचा असतो; वाचकाला काय आवडेल याचा अंदाज घ्यावा लागतो हेही ध्यानी आलं.
त्या काळात काही लिहावं वाटलं, तरी माझी पंचाईत झाली. नुसत्या तर्काच्या आधारे काही लिहावं तर त्यात नावीन्य नसायचं. अगदी नवीन लिहिण्यासाठी त्या विषयाचं सखोल ज्ञान असावं लागतं – जे माझ्याकडे तेव्हा नव्हतं (आजही नाहीच!) आणि मुख्य म्हणजे तर्काच्या आधारे लिहिलं तर ते पुरेसं मनोरंजक नसायचं वाचणाऱ्यांच्या आणि माझ्याही मते. ‘कशासाठी लिहायचं’ असा प्रश्न पडला आणि त्याचं उत्तर मी अजूनही शोधतेच आहे. कधी सापडल्यागत होतं ते – पण पुढच्याच क्षणी त्याच्या विपरीतही वाटतं.
‘पूर्ण काल्पनिक लेखन असतं का?’ याचं उत्तर ‘हो’ असं द्यायला हरकत नाही. पण वाचताना मात्र आपण ती गोष्ट पूर्ण काल्पनिक राहू देत नाही. अगदी काल्पनिक लेखनात सुद्धा एखादी व्यक्तिरेखा पुढे कशी वागेल याचा काही तर्क आपण करतो आणि तो अंदाज सारखा चुकत गेला तर लेखन वाचताना आपल्याला मजा येत नाही - याची जाणीव झाल्यावर गोंधळ वाढला. म्हणजे काल्पनिक व्यक्तिरेखेत, कथानकात आपण आपलं वास्तव आपल्या नकळत लादत असतो. एक वाचक म्हणून लेखकाकडून असणाऱ्या अपेक्षा आणि एक लेखक म्हणून वाचकांकडून असणाऱ्या अपेक्षा यात गल्लत होऊ न देणं अवघड असतं. ‘आपला तो बाब्या’ या भावनेतून लेखकाची सुटका होणं सोपं नसतं. लेखन प्रक्रियेतल्या वाचकाच्या भूमिकेचं नाही म्हटलं तरी दडपण आलं माझ्यावर. तर्क आणि कल्पना यांचा मिलाफ करत काही लिहिलं, त्याचं थोडंफार कौतुकही झालं, तरी एकंदर ‘लेखन हा आपला प्रांत नाही’ अशी खूणगाठ मी मनाशी बांधली. लिहायचं असेल तर कागद, पेन, कल्पना (प्रतिभा हा शब्द फार मोठा आहे माझ्यासाठी), विचार यांसोबत आणखी दोन गोष्टी हव्यात हे कळलं. एक म्हणजे शैली आणि दुसरं म्हणजे समज!
आयुष्याबद्दलची समज, चांगलं-वाईट याबाबतची समज. इतरांकडे आणि स्वत:कडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन.. अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव माझ्या मते ‘समज’ या संकल्पनेत होतो. शैली आणि समज यांचा नातेसंबंध पाहणं हा एक नवा छंद जडला मला या काळात. आणि एक चांगली गोष्ट झाली – ती म्हणजे माझं लिहिणं जवळजवळ थांबलं. आधीही फार काही लिहीत होते अशातला भाग नाही. पण महाविद्यालयीन काळात तर ते पूर्ण थांबलं. क्वचित कधी मास्तरांच्या आग्रहावरून काही लिहिलं – पण ते अगदी अपवादात्मक. काही लिहिलं तर ते कुणालाही न दाखवता तसंचं ठेवून द्यायचं असा एक नवा टप्पा आला.
पुढं मग अनेक वर्ष माझं लिहिणं हे उपयुक्ततावादाच्या चौकटीत बसणारं राहिलं. म्हणजे रोजचा जमाखर्च लिहा, कामाच्या ठिकाणी मीटिंगची टिपणं काढा, कार्यक्रमांची माहिती देणारी पत्रकं लिहा, वार्षिक अहवाल लिहा, प्रेस नोट लिहा, पत्रं लिहा इत्यादी. याचं मुख्य कारण - बहुधा माझं अक्षर इतरांना सहजी वाचता यायचं – असं होतं! दर मीटिंगमध्ये टिपणं काढायचं कामं माझ्याकडे यायला लागलं म्हणजे ‘आपण चांगलं लिहितो’ असं मला वाटण्याची काही शक्यता नव्हतीच. कारण माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्याने ‘तुला कामाला नाही लावलं की तू गप्पा मारत बसतेस, म्हणून तुला टिपणं काढण्याचं काम देण्यात येत आहे’ हे पहिल्याच वेळी सगळ्यांच्या समोर स्पष्ट केलं होतं. ती एक प्रकारे शिक्षा होती मला दिलेली. त्यामुळे टिपणं काढता काढता कागदाच्या कोप-यात मी रेघोट्या ओढायला लागले पण आपण चित्रकार नाही हे मला आधीच माहीत असल्यानं लोक वाचले माझ्या चित्रकलेपासून.
मीटिंगमधल्या चर्चेचं टिपण तयार करणं ही एक कला आहे. आपल्याकडे माणसं भारंभार बोलतात. आधीची व्यक्ती जे बोलली त्याच्याशी पुढची व्यक्ती जे बोलते त्याचा काही संबंध असतोच असं नाही – नसण्याचीच शक्यता जास्त. मुद्दा एकच असला तरी उदाहरणं बरीच असतात आणि ती उदाहरणं अनेकदा परस्परविरोधीही असतात. एक व्यक्ती एकच भूमिका सातत्यानं मांडेल असंही नसतं. त्यामुळे निष्कर्ष काय हे कळत नाही. बरं, बोलतात खूप काही खूप जण, पण अनेकदा निर्णय काहीच होत नाहीत. पण मीटिंगची टिपणं काढताकाढता विचारांच्या गोंधळातून मार्ग कसा काढायचा आणि नेमकं महत्त्वाचं काय ते कसं टिपायचं याच माझं प्रशिक्षण होत गेलं (ते अजूनही चालूच आहे!). लिहायचं म्हटलं की मनात असंख्य विचार येतात – त्यातले महत्त्वाचे आणि बिनमहत्त्वाचे कसे ओळखायचे आपले आपणच, त्यांचा क्रम अधिक परिणामकारक कसा करायचा याचे प्रयोग सुरु झाले.
या काळात माझ्या ओळखीच्या लोकांपासून मी दूर गेले होते. काम नवं होतं, अनुभव नवे होते, सभोवतालची माणसं नवी होती, शहर नवं होतं – या सगळ्याबद्दल विस्तारानं लिहायचं ‘पत्र’ हे एक साधन झालं. आठवडयाला कमीत कमी एक तरी पत्र – व्यक्तिगत पत्र – मी लिहायला लागले. त्यात भावना, विचार, प्रश्न हेही असायचं; काही अनुभव असायचे, काही चौकशा असायच्या वगैरे. बरीच पत्रं लिहून झाल्यावर लक्षात आलं की पत्र म्हणजे ‘आपुलाच संवाद आपणासी’ असतो आणि समोरची व्यक्ती ही केवळ निमित्तमात्र असते. आपण काय सांगतो? दुसऱ्याला जे पाहिजे ते नाही, तर स्वत:ला जे सांगायचं आहे ते. हं, ते सांगणं समोरच्याशी असलेलं नातं पाहून थोडं थोडं बदलतं हे खरं. म्हणजे परिस्थिती बदलत नाही, सांगण्याचा मुख्य मुद्दा बदलतो आणि दुसरं म्हणजे सांगण्याची ‘शैली’ बदलते. इथं लेखन होतं ते व्यक्तिसापेक्ष असतं. व्यक्तिनिरपेक्ष लेखनापेक्षा हे वेगळं असतं – पत्र हे जास्त व्यक्तिसापेक्ष असतं, इतर लेखन जास्त व्यक्तिनिरपेक्ष.
एकच गोष्ट सरळ सांगता येते, भावनिक होऊन सांगता येते, निराशेनं सांगता येते, आक्रमकपणे सांगता येते, विचारपूर्वक सांगता येते, उद्वेगानं सांगता येते, उद्रेकानं सांगता येते, रागावून सांगता येते, आनंदानं सांगता येते, समंजसपणे सांगता येते, अलिप्ततेनं सांगता येते आणि विनोदानंही सांगता येते हे समजल्यावर मजा वाटायला लागली. ‘रिक्षावाल्यानं फसवून जास्त पैसे घेतले’ हा साधा प्रसंग मी एकदा अशा वेगवेगळ्या पद्धतीने लिहून पाहिला गंमत म्हणून! मग मनाला तो एक नादच लागला. आपल्याला ज्यात आनंद वाटतो त्यात कुणाला दु:ख वाटत असेल तर, आपल्याला ज्याचा राग आला, त्याचं कुणाला हसू येत असेल तर – असे प्रश्न घ्यायचे आणि कल्पना करत बसायचं असं सुरु झालं – ते सगळं मी लिहिलं मात्र नाही कारण ‘लिहायचं तर सलग वेळ हवा’ अशी स्थिती आली होती आणि सलग वेळ मिळण्याची काही चिन्हं नव्हती. शिवाय लिहायला खासगीपणा, एकांत लागतो तोही नव्हता.
मी ज्या ठिकाणी काम करत होते, तिथं आम्ही एक नियतकालिक सुरू करायचं ठरवलं. आणि मग मी लिहावं अशी परिस्थिती निर्माण झाली. अंक काढायचा तर पुरेसे लेख हवेत. ते पुरेसे नसतील तर संपादक मंडळाची नैतिक आणि व्यावहारिक जबाबदारी असते अंकाची पानं भरून काढण्याची. नियतकालिक नवं असल्यानं त्याची काही प्रतिमा नव्हती की त्याबाबत काही परंपरा जपण्याची जबाबदारी आमच्यावर नव्हती. त्या स्वातंत्र्याचा फायदा घेत मी लिहायला लागले पुन्हा एकदा. विषय ठरवायचा, अनेकदा सहकारी विषय सुचवायचे. त्या विषयासाठी मुद्दे काढायचे, सगळे संदर्भ काही हाताशी नसायचे – मग त्यांचा शोध, पहिला मसुदा, दुसरा मसुदा .. हे सगळं हातानं लिहीत बसायचं. पुन्हा पुन्हा लिहायला लागू नये म्हणून काळजीपूर्वक, विचार करून लिहावं लागायचं. लिहिण्याच्या कृतीआधी कितीतरी विचार त्यावर केला जायचा. ‘अव्यक्त’ व्यक्त होण्याची ती एक मजेदार प्रक्रिया असली तरी त्यात गूढ काही नव्हतं – कारण हे ठरवून केलेलं लेखन होतं. एका अर्थी गरज म्हणून केलेलं लेखन होतं ते – स्वान्तसुखाय वगैरे नव्हतं, तर कामाचा भाग म्हणून होतं. माझ्या तिथल्या भूमिकेत मी लिहिणं ‘आवश्यक’ होतं. कागद, पेन, बैठक मारून लिहिणं यासारखं एक महत्त्वाचं काम म्हणजे लिहून झालेले कागद छपाई जिथं होत असे त्या शहरापर्यंत पोचवणं. आपण लिहिलेल्यात मुख्य किंवा इतर संपादक काटछाट करतात का, आणि काय करतात याचं उत्तर छापील अंक हातात पडल्यावरचं मिळायचं. त्याबद्दल कुतूहल असायचंच!
या काळात नुसतेच मुद्दे लिहिलेले कितीतरी कागद इतस्तत: पडलेले असत. त्यातल्या काहींचा विस्तार झाला, काही तसेच नामशेष झाले. काय नामशेष झाले ते आता आठवतही नाही.
बारा वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात संगणक आला आणि लिहायचं एक नवं तंत्र आलं. मी पहिल्यांदा लिहिला तो ‘स्त्रियांचे आरोग्य आणि सबलीकरण’ या एका प्रकल्पाचा ‘प्रोजेक्ट इम्प्लीमेंटेशन प्लान’. आम्ही पाच जणांनी पाच विभाग वाटून घेतले होते. सर्वात आधी माझं लिहून झालं म्हणून इतर सहकारी माझ्याकडे येऊन बसायला लागले. चर्चा करता करता त्यांनी बोलायचं आणि मी टंकन करायचं असं सुरु झालं. त्यांचं बोलणं मी आधी तसंच (ते जसं बोलायचे तसंच) लिहायचे आणि मग सोबत माझ्या शैलीत पण लिहायचे. असं करता करता मी माझ्या टीमची लेखनिक (पण थोडं अधिक स्वातंत्र्य असलेली) झाले. एक मसुदा झाला की तो टीममधल्या वरिष्ठ सहकारी लोकांना दाखवायचा. त्यांच्या सूचनांनुसार बदल करायचे. मग ते प्रकल्पासाठी निधी देणाऱ्या संस्थेला पाठवायचं. त्यांच्या सूचना यायच्या. मला कुणी सांगितलं नव्हतं – तरी मी आपले सगळे मसुदे एकामागोमाग एक तारखेनुसार साठवून ठेवले होते. हळूहळू लक्षात आलं की माणसं आपण आधी मांडलेली कल्पना मोडीत काढतात पण काही काळानंतर तीच स्वत:ची म्हणून मांडतात. मुद्दा काय आहे यापेक्षा तो कुणी मांडलाय याला आपला समाज महत्त्व देतो. माझी त्याबद्दल तक्रार नव्हती. मी ते परिच्छेदच्या परिच्छेद आधीच्या मसुद्यातून घेऊ शकत होतेच. या कॉपी-पेस्ट रोगाचे अधिक भयाण आविष्कार मी पुढं पाहिले – पण ते बरेच नंतर.
विचार आणि लिहिणं प्राथमिक शाळेत असताना एकत्रच व्हायचं. माध्यामिक शाळेत त्यात थोडा खंड पडला. महाविद्यालयीन जीवनात विचार आधी केलेला असायचाच – जरी लिहिताना विचार सोबत आहेत असं वाटलं तरी तो विचार पूर्वनियोजित असायचा. मीटिंगची टिपणं काढताना माझा विचार हा फक्त ‘काय टिपायचं आणि काय कोणत्या क्रमाने सादर करायचं’ इतकाच होता – विषयाबाबत फारसा विचार करण्याची संधी मला मिळत नसे. त्यामुळे विचार आणि लिहिणं यांतल्या अंतराचा मी चांगला अनुभव घेतला होता बरीच वर्षं. जे व्यक्त करायचं त्यात घाई करायची नाही हे सूत्र होतं. ते केवळ इतरांपुढं स्वत:ची प्रतिमा जपायची या भूमिकेतून आलेलं नव्हतं. आपल्याला नक्की काय सांगायचं आहे, जे सांगायचं आहे तेच आपण सांगतो आहोत ना, जे सांगतो आहोत तेच इतरांपर्यंत पोचतंय ना अशा विचारांतून सावकाश सांगितलं जायचं. मौन हा संवादाचा जणू अविभाज्य भाग होता. दोन लेखांमध्ये बराच काळ जायचा – आणि तो आवश्यकही असायचा.
या काळात मुख्य प्रवाहातल्या वृत्तपत्रांसाठीही लिहिलं – ते लिहिताना अभ्यासपूर्ण लेखन न करता माझे अनुभव सांगायचं धोरण मी स्वीकारलं. कारण एक तर माझा ‘अभ्यास’ नव्हताच. दुसरं म्हणजे माझे अनुभव मला सांगावेसे वाटले इतरांना – अगदी मी ज्यांना ओळखत नाही त्यांनाही. पण वृत्तपत्रांत लिहिण्याचा अनुभव एकंदरीत फारसा सुखद नव्हता. लेख मिळाल्याची पोच तर मिळत नसेच, लेख छापल्याचं कळवण्याचंही सौजन्य अनेकांकडे नसे. त्या ‘वाट पाहण्याचा’ मला कंटाळा आला आणि ते लेखन मी बंद केलं. शिवाय वाचकांशी थेट संवाद त्यात जवळजवळ होत नसे.
संगणकावर मी लिहायला लागले तेव्हा विचार आणि लिहिणं पुन्हा ‘एकसमयावच्छेदे’ घडायला लागलं. पण सुरुवातीला टंकन करण्याची गती कमी असल्याने विचारांची साखळी तुटून चिडचीड व्हायची. विचार पुढे पळायचे आणि हाताला त्या गतीने काम करता यायचं नाही. त्यावर उपाय म्हणून ‘टायपिंग ट्युटोरियल’ उतरवून घेतलं आणि त्याचे धडे गिरवले. मग ‘की बोर्ड’कडे न पाहताही बरोबर अक्षर स्क्रीनवर उमटायला लागल्यावर विचार आणि लिहिणं या क्रियांमध्ये असेलेलं द्वैत जणू संपून गेलं. सगळ्या कामाला गती आली.
पण म्हणून काम कमी झालं का? नाही, ते वाढलंच. त्यातला दबावही वाढला.
पूर्वी प्रकल्पांचे आराखडे लिहिले जायचे तेव्हा त्यात आधीच बराच विचारविमर्ष व्हायचा आणि सर्वांनुमते जे मुद्दे मान्य असतील त्यांचाच आराखडा लिहिला जायचा. समोरासमोर बसून चर्चा करण्याची जागा आता टेलि-कॉन्फरन्स, व्हिडीओ-कॉन्फरन्स, ई-मेल संवाद यांनी घेतली. पूर्वी एखाद्या व्यक्तीनं एखादं मत मांडल्यावर आपल्याला प्रतिसाद द्यायला वेळ मिळायचा. आता या बाबतीत ‘झिरो टॉलरन्स’ आला. त्यामुळे विचार करण्याची पद्धत प्रतिक्रियात्मक होऊ लागली. ‘काहीही सांगा पण लगेच सांगा’ असं वातावरण निर्माण झालं. आपण वेळ घेतला थोडासा तर आपण ‘स्लो’ आहोत असा शिक्का बसेल याची धास्ती निर्माण झाली. तो/ती काय म्हणतेय यावरच विचार केंद्रित होऊ लागला. स्वत:ला काही म्हणायचं आहे हे विसरून जायला होऊ लागलं. संवाद म्हणजे प्रश्नोत्तरी व्हायला लागली.
या नव्या तंत्रज्ञानाबरोबर माहितीचा भडीमार पण आला. एखादी कल्पना मांडायची असेल नव्याने किंवा खोडून काढायची असेल तरीही काहीतरी ‘विदा’ देण्याची अपेक्षा निर्माण होऊ लागली. विदा जणू काही दरबारात ‘सिवा’ला संपवण्याचा विडा उचलायचा आहे अशा थाटात कशाचाही मागितला जाऊ लागला आणि कुणीही मागू लागलं. सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ वेगळे असल्यानं एका ठिकाणचं उदाहरण दुस-या ठिकाणी तंतोतंत लागू होणार नाही याचंही भान काही माणसं विसरली. कुठल्या कुठल्या जुन्या प्रामाण्याऐवजी नवे लोक आले, नवी संकेतस्थळं आली – पण प्रामाण्य मानण्याची परंपरा मात्र कायम राहिली.
२००८ मध्ये एका नव्या प्रकल्पाचा मसुदा लिहिताना हा बदल मला जास्त जाणवला. आता आम्ही एकत्र बसून एल. सी. डी.चा वापर करून प्रकल्प ‘लिहीत’ होतो. प्रत्येकाची विचार करायची पद्धत वेगळी, अनुभव वेगळा आणि आज संध्याकाळी मसुदा पाठवायचा आहे हा ताण – त्यामुळे लिहिण्याताला आनंद जाऊन ते पुन्हा एकदा काम बनलं. फारसा विचार न करता वेळ गाठण्यासाठी मुद्दे उरकले जाऊ लागले. ‘अमुक एक गोष्ट केली तर त्याचे फायदे काय आणि तोटे काय’ असा विचार करण्याची प्रक्रिया थंडावली. म्हणून मग संवाद वाढला पण त्याची अर्थपूर्णता कमी झाली. संवादाचं ओझं व्हायला लागलं आमच्या टीमला. मसुदा हाताने लिहायचो तेव्हा फार फार तर तीन वेळा लिहायला लागायचं. आता एकेका प्रकल्पाचे चौदा-पंधरा मसुदे आमच्या संगणकात साठायला लागले. पूर्वी एकच ‘फायनल फाईल’ असायची. आता ‘फायनल वन’ ‘फायनल टू’ ‘फायनल फायनल’ अशी नावं आम्ही सहज द्यायला लागलो. त्यात काही चुकतं आहे असं कुणाला वाटेनासं झालं. विचार करून लिहायचं हा क्रम बदलून आधी लिहायचं आणि मग विचार करायचा असं चक्र सुरु झालं – जे अजूनही कायम आहे मी काम करते त्या क्षेत्रात!
हे काम करत असताना प्रक्रियांचं डॉक्युमेंटेशन करण्याची संधी मिळाली. स्वतंत्र लिहिण्याचा थोडाफार अनुभव असणा-या व्यक्तींना ब-यापैकी डॉक्युमेंटेशन करता येतं, की डॉक्युमेंटेशन करण्याच्या अनुभवामुळे इतर स्वतंत्र लेखन सुधारतं – याचा अजून मी नीट विचार केला नाही. त्या दोन्ही कृती एकमेकींना बळ देत असाव्यात असा अंदाज मात्र बांधला आहे मी.
दरम्यान ‘ब्लॉग’ समोर आला. माझ्या ओळखीत तेव्हा कुणी ब्लॉग लिहायचं तर सोडून द्या, वाचतही नव्हतं. त्यामुळे मला हे एक नवं खेळणं मिळाल्यासारखं झालं. त्यापूर्वी इंग्रजीत ललित लेखन कधीच केलं नव्हतं – इंग्रजीत लिहायचं ते फक्त कामाचं. पण मराठी टंकनाची माहिती नव्हती म्हणून इंग्रजी ब्लॉग सुरु केला. त्यात अनेक अडचणी आल्या. पण ओळखदेख नसलेले लोक आपण लिहिलेलं वाचतात, त्यावर प्रतिसाद देतात, त्यातलं कुणीतरी कधीतरी परखडपणे चार शब्द सुनावतं आणि त्याचा आपल्याला उपयोग होतो, लोक आपल्याला तांत्रिक मदतही करतात - हा अनुभव नवा आणि बरंच शिकवून जाणारा ठरला. (मराठीत टीका तत्परतेने होते, मदत मात्र क्वचित – असा निदान माझा अजून तरी अनुभव आहे!) ब्लॉगवर लिहिण्यासाठी मग विषय सुचत गेले. पूर्वी जे अनुभव न सांगता तसेच विरून गेले असते, ते आता सांगितले जाऊ लागले. मराठीत ब्लॉग सुरु केला तो इंग्रजी ब्लॉगनंतर जवळजवळ सहा महिन्यांनी. आधी मराठी लिहायला अडचण यायची. ‘बरहा’ वापरून लिहायचं आणि ते ब्लॉगरमध्ये पेस्ट करायचं असे उद्योग चालायचे. त्यात प्रचंड वेळ जायचा आणि कंटाळा यायचा. पण काही वाचकांनी ‘तुम्ही मराठी ब्लॉग गांभीर्याने घेत नाही’ अशी तक्रार केली आणि मी जागी झाले!
इथं आता लेखनप्रक्रिया पुन्हा वेगळी व्हायला लागली. ब्लॉग स्वत:चा असल्यानं लिहिलंच पाहिजे असं काही बंधन नव्हतं (नसतं). पण लिहायचा उत्साह, व्यक्त व्हायचा उत्साह मात्र होता. ब्लॉग लिहिताना विचार जाणीवपूर्वक केला जात नाही हे ध्यानात आलं. बरेचदा ‘अमुक एक लिहू’ म्हणून मी संगणकावर बसते पण प्रत्यक्षात दुसराच एखादा विषय लिहून उठते. मी इंग्रजीत अमुक एक विषय का लिहिते आणि मराठीत अमुक एक विषय का लिहिते – याचीही कारणमीमांसा मला अद्याप सापडलेली नाही. पण मनात कधी येईल तेव्हा लिहा, समाधान नाही वाटलं तर काढून टाका, किंवा साठवून ठेवा आणि नंतर कधीतरी त्यावर काम करा – अशा सोयीमुळे लिहिणं सोपं झालं, स्वत:साठी तरी आनंददायी झालं (– वाचकांचे काय हाल व्हायचे ते होवोत!). वाचकांशी थेट संवाद वाढला. यातल्या काही वाचकांनी केवळ लेखन प्रक्रियेत नाही तर जगण्यातही मोलाची भर घातली.
संगणक आणि त्यासोबत मराठीत लिहिण्याची सोय ही एक क्रांती आहे मी पाहिलेली. संगणक नसता तर मी किती लिहिलं असतं? किती लिहीत होते मी? – वर्षाकाठी पाच ते सहा लेख म्हणजे खूप झाले. आता संगणक आहे तर मी किती लिहिते? जवळजवळ पंधरा ते वीस पट. लेखांची संख्या ही लेखांचा दर्जा ठरवण्याचा निकष असू नये असं माझं मत आहे. लेखन कमी असलं म्हणजे दर्जेदार असतंच असं काही जरुरी नाही आणि खूप लेख लिहिले म्हणजे लेखक लोकप्रिय आहे असंही मानण्याची गरज नाही.
पण लेखकाला बाह्य अडचणींतून मोकळीक देण्यात संगणकाची भूमिका फार मोठी आहे यात मला तरी शंका नाही. हे स्वातंत्र्य सुखाचं आहे की अडचणीचं आहे हे माझं मला ठरवावं लागेल. लेखन हा एक आंतरिक प्रवासही असतो आणि त्यातल्या अडचणींना लेखक कसे सामोरे जातात यावर त्यांच्या लेखनाचा दर्जा अवलंबून असतो, असेल. पण संगणक क्रांतीनं पुन्हा एकदा मला सांगितलं आहे की: लिहिणं किंवा न लिहिणं हा निर्णय सर्वस्वी माझा आहे; त्याचं खापर मला बाहेरच्या कोणत्याही गोष्टीवर फोडता येणार नाही!
****
लिहिण्याची प्रक्रिया आधी ‘आत’ कुठेतरी घडत असते, तिला ‘बाहेर’ यायचं तर सोयी हव्यात. जुन्या काळी या सोयी नव्हत्या म्हणून लिहिण्याचा आळस, कंटाळा केला जायचा. आता बाहेरची सोय आहे चांगली म्हणून हवं तितकं लिहिता येतं. पण तंत्रज्ञानानं ‘विचार’ आणि ‘लेखन’ यांतला अवकाश (स्पेस, अंतर) कमी करून टाकलं आहे एकदम – त्याची काळजीही वाटते. त्याचा एकंदर विचारप्रक्रियेवर आणि लेखनप्रक्रियेवर काय परिणाम होतो हे मी कामाच्या क्षेत्रात जवळून पाहिलं आहे, अनुभवलं आहे. ते तोटे व्यक्तिगत पातळीवर लिहिताना होऊ नयेत असं वाटतं खरं – पण ते होत असतील तर आत्ता कळायलाही मार्ग नाही.
‘लिहिणं’ हा एका अर्थी इतरांपर्यंत पोचण्याचा एक रस्ता आहे. या संवादासाठी मी ‘शब्द’ वापरते कारण तेच एक साधन मला त्यातल्या त्यात माहीत आहे. रंग, रेषा, स्वर, ताल यांची ओळख होण्याच्या फार पूर्वी शब्द ओळखीचे झाले. म्हणून शब्द वापरताना तितकासा ताण येत नाही. रंग किंवा स्वर वापरून मला जे सांगायचं आहे ते नीट सांगता येणार नाही हे मला माहिती आहे – म्हणून मी शब्द वापरते. मी निरक्षर असते तर कदाचित मी काहीतरी पर्याय शोधला असता. पण ‘गमभन’ गिरवण्यातून शब्दांचा पर्याय मला सहज मिळाला – म्हणून तो मी वापरत राहते.
हं, शब्द ओळखीचे आहेत म्हणून हवे तसे वापरायला गेले की मात्र फजिती होते अनेकदा. अति-आत्मविश्वास नडतोच. बऱ्याचदा शब्द जुने असले, वापरातले असले, तरी नवे वाटत राहतात मला त्यांचा अर्थ नीट न कळल्यानं. त्यांचं हे एकाच वेळी पुरातन असणं आणि नवं असणं अजून मला भुरळ घालतं!
‘मी का लिहिते’ या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळत नाही तोवर मी लिहीत राहणार बहुतेक. प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा तोच एक मार्ग आहे ना! लिहिणं थांबलं तर प्रश्न नाहीसा होईल किंवा प्रश्न नाहीसा झाला की लिहिणं थांबेल. असं काही होईल का, यातलं काय आधी होईल, ते उत्तर काय असेल, लिहिण्याची गरज संपेल का एक दिवस, लिहिणं थांबल्यावर संवादासाठी मी काय माध्यम शोधेन ....
आणि कदाचित त्यावेळी हेच सगळे जुने प्रश्न नव्याने समोर येतील ...

Monday, November 12, 2012

१४१. हे अरुणाचल ....

“हे अरुणाचल! माझ्या घरात प्रवेश करून आणि मला आकर्षित करून तू मला आपल्या हृदयगुहेत कैदी का बनवून ठेवले आहेस?”
“हे अरुणाचल! तू स्वत:च्या आनंदासाठी माझे हृदय जिंकले आहेस? की माझ्यासाठी? आता जर तू माझा त्याग केलास, तर सारे जग तुलाच दोष देईल!”
“हे अरुणाचल! मला वारंवार तुझी आठवण का येते आहे? मी आता तुला विसरूच शकत नाही ...”
***
‘अरुणाचल’ हे नाव उच्चारताक्षणी त्या दिवसापर्यंत बर्फाच्छादित शिखरांशी लपंडाव खेळणा-या ‘लोहित’चे आणि हिरव्यागर्द जंगलांचं चित्र डोळ्यांसमोर तरळून जायचं. पण त्या दिवशी मी आणखी एका ‘अरुणाचल’ला भेटून आले होते. इथं नदी नव्हती, फारसं घनदाट जंगलही नव्हतं. तरीही मन गुंतवून ठेवणारं, विस्मयचकित करून टाकणारं खास काहीतरी याही अरुणाचलात होतं! स्वाभाविकच आहे म्हणा! अभिमानाने मिरवण्याजोगी एक खूण या अरुणाचलाजवळ आहेच मुळी!! ती म्हणजे रमण महर्षींची आठवण. त्यांच्या सान्निध्यामुळे की काय, अरुणाचल अधिकच विनम्र आणि भव्य वाटतो. भव्य असूनही भयप्रद न वाटता आपलासा वाटतो.
या अरुणाचलची जुजुबी ओळख होऊन तशी बरीच वर्ष उलटली होती. पॉल ब्रन्टनच्या A Search in Secret India या पुस्तकात रमण महर्षी आणि अरुणाचल हे दोन्ही पहिल्यांदा भेटले. “रमण महर्षी यांच्या मौनातच माझे सारे प्रश्न नाहीसे होऊन मला मानसिक शांती मिळाली” अशा आशयाचे ब्रन्टन महोदायांचे विधान वाचून गंमत वाटली होती मला. पण त्याचा फारसा कीस काढायच्या फंदात मी तेव्हा पडले नव्हते.
अशीच आणखी काही वर्ष गेली. दरम्यान दक्षिण दौरा करून आलेल्या काही लोकांकडून तिरुवण्णामलैचे गुणगान कानी पडायचे. त्यामुळे अरुणाचलबद्दलचं माझं कुतूहल जागृत झालं. रमण महर्षीचं चरित्र मी याच काळात वाचलं. अशक्यप्राय स्वप्नं पाहण्याच्या माझ्या सवयीने अरुणाचल भेटीचं स्वप्न जागं ठेवलं.
त्यावर्षी एका मैत्रिणीने पॉन्डिचेरी भेटीचा बेत आखला. मीही गेले. पॉन्डिचेरीचा समुद्रकिनारा मला फारच आवडला. सकाळ-संध्याकाळ तिथं निवांत आनंदात जायची. अशातच एक दिवस “रमणाश्रमात जाऊ यात काय?” अशी विचारणा झाली. मी तयारच होते. भेटीची आखणी आणि तयारी बाकीच्यांनी केली. मी मात्र पॉन्डिचेरी पर्यटन विकास महामंडळात जा, नकाशे गोळा कर, ग्रंथालयात बसून संदर्भ पाहा .. अशी निरर्थक कामं नेहमीप्रमाणे केली.
पहाटे पाच वाजता आमचा प्रवास सुरु झाला. काळोखात फारसं काही दिसत नव्हतंच आधी पण रविराजाच्या आगमनाने सारं चित्र बदललं. दूरपर्यंत दिसणारी वळणावळणाची काळीशार सडक, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झुलणारी हिरवळ, निळसर आकाश मधेच झाकोळून टाकणारे ढग, अंगावर झेपावणारा वारा ...या सगळ्याचं सुख अनुभवत  प्रवास झाला.
वाटेत दुरून जिंजी किल्ल्याचे अवशेष दिसले. छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर येऊन गेले आहेत म्हणून त्याला भेट द्यायची इच्छा होती – पण तेवढा वेळ हातात नव्हता. आणि बसने प्रवास करत असल्याने ‘पाहिजे तिथं’ थांबायची चैन आम्ही करू शकत नव्हतो. थोड्या वेळातच ‘तिरुवण्णामलै’ अशी पाटी दिसली आणि मी सावरून बसले.
अरुणाचलाचं पहिलं दर्शन मोठ ओबडधोबड आणि रखरखीत होतं. पाषाणखंड प्रचंड मोठे होते. निसर्गाच्या या रुद्र आणि काहीशा रुक्ष रुपाने मी बावरून गेले. इथं ना डेरेदार वृक्ष दिसत होते ना खळाणणारे झरे! ‘इतक्या कोरड्या आणि उजाड डोंगराचं माहात्म्य स्थानिक लोकांना कां वाटत असेल’ – असा प्रश्न माझ्या मनात नकळत आलाच.
पण या अरुणाचलाची महती फार प्राचीन काळापासून आहे. स्कंद पुराणात याला ‘विश्वाचे हृदय’ म्हटलं गेलं आहे. ब्रह्माण्ड आणि वायू पुराणांत “कैलासाच्या पश्चिमेस असणा-या पर्वताचे” असेच वर्णन आहे. अनेक संतांनी इथं तपश्चर्या केली असं लोक मानतात. रमण महर्षीही अरुणाचलास अत्यंत पवित्र स्थान मानत. अरुणाचलाच्या सान्निध्यात अखंड शांतीचा स्रोत आपल्यालाही स्पर्श करून जातो असा अनेक लोकांचा अनुभव आहे- माझाही आहे. यात वास्तव किती आणि श्रद्धा किती हा चर्चेचा आणि वादाचा विषय असू शकतो हे मला माहिती आहे.  
या पर्वताबद्दल एक पौराणिक कथा आहे – जी मला अतिशय आवडली. एकदा ब्रम्हा आणि विष्णू यांच्यात ‘सर्वश्रेष्ठ कोण’ असा वाद सुरु झाला. दोन मानवी सत्ताधीश भांडायला लागले तर काय होतं, याचा अनुभव आपण अनेकदा घेतला आहे. हे तर साक्षात देवांचं भांडण! साहजिकच पृथ्वीवर अराजक माजलं. सृष्टी लयाला जाते की काय अशी वेळ आली. इतर देवतांनी मग शिवशंकरांना ‘यातून मार्ग काढा’ असं साकडं घातलं.
मग शिव स्वत: एका प्रकाशस्तंभाच्या रूपात प्रकट झाले. “या स्तंभाचा आदि अथवा अंत जो जाणेल तोच खरा श्रेष्ठ” अशी आकाशवाणी झाली. विष्णूने वराहरूप धारण केलं आणि प्रकाशस्तंभाचा उगम शोधण्यासाठी जमीन खणायला सुरुवात केली. ब्रह्माने राजहंसरूपात आकाशात भरारी घेतली – प्रकाशस्तंभाचा अंत शोधण्यासाठी. पण ब्रह्माने थोडी लबाडी केली (देव कसा लबाडी करेल हा प्रश्न गैरलागू आहे!).एका पर्वतशिखराच्या वृक्षावरून पडणारं फूल त्याने आणलं आणि ‘ते प्रकाशस्तंभाच्या शिखरावरून आणलं आहे’ असं खोटंचं सांगितलं. विष्णू मात्र परमप्रकाशाच्या साक्षात्काराने नम्र होऊन परत आला. यातून विष्णूचं श्रेष्ठत्व सिद्ध झालं. विष्णू म्हणजे अहं(कार), ब्रह्मा म्हणजे मन आणि शिव म्हणजे आत्मा असं लक्षात घेतलं की या कथेचा आशय अधिक अर्थपूर्ण होतो. या कथेतला प्रकाशस्तंभ म्हणजे आजचा अरुणाचल अशी परंपरागत धारणा आहे.
रमणाश्रमाच्या दिशेनं जाताना डाव्या बाजूला एक भव्य मंदिर दिसलं. हेच ते अरुणाचलेश्वराचे मंदिर – ज्यात तेजोरूप शिवलिंग आहे. हे मंदिर विजयनगरच्या कृष्णदेवरायाने सोळाव्या शतकात बांधलं आहे. याचा विस्तार थोडाथोडका नाही तर पंचवीस एकर आहे. चारी दिशांना गोपुरं आहेत. मुख्य गोपूर बारा मजल्यांचे असून त्याची उंची दोनशे फुटांहून जास्त आहे. अरुणाचलावरील स्कन्दाश्रमातून या मंदिराचं दृश्य फार मनोहर दिसतं. “दगडात कसला आला आहे देव?” हा प्रश्न या मंदिराच्या दर्शनाने मला अर्थहीन वाटू लागला. अशा प्राचीन मंदिरांचा आपल्याशी नि:शब्द संबाद होतो, तेव्हा मानवी प्रवासाचा, त्यांच्या आशा-आकाक्षांचा एक रस्ता थोडासा दिसतो – निदान दिसल्याचा भास मला तरी झाला. या मुक्या मंदिरांच्या निश्चलतेआड एका सामाजिक कालखंडाचा जिताजागता इतिहास आहे ही जाणीव मनाला विलक्षण स्थितीत नेते. अर्थात माझ्याबरोबरच्या लोकांना इतिहासात फारसा रस नव्हता – त्यामुळे थोड्यात समाधान मानून घ्यावं लागलं मला.
पर्यटन संस्कृतीच्या प्रभावामुळे “रमणाश्रमात पाहण्यासारखं काय आहे?” असा प्रश्न लोक हमखास विचारतात. रमणाश्रमात कसलाही चकचकाट नाही, श्रीमंती बडेजाव नाही, फार कसली औपचारिकता नाही .. आहे ती फक्त शांतता. आणि स्मशानशांतता नाही तर आनंदी शांतता. निदान मला तरी असंच दिसलं!
आश्रमाच्या एका कोप-यातून मोराचा आवाज आला. आम्ही लगोलग तिकडं मोर्चा वळवला. एक-दोन नाही तर पंचवीस-तीस मोर होते. आमची चाहूल लागताच काही दूर निघून गेले, तर काही आमच्याकडे दुर्लक्ष करत तिथंच रेंगाळले. पण नृत्य करायचं मात्र कुणीच मनावर घेतलं नाही म्हणून माझी निराशा झाली. जगात प्रत्येक गोष्ट ‘मेड टू ऑर्डर” मिळणार नाही आपल्याला याचं भान पुन्हा एकदा आलं! आमच्या सोबत गाय-वासरांची फौजही होती. एका वासराला मी जरासं थोपटलं तर दुसरंही माझ्याजवळ आलं – थोपटून घायला! रमणमहर्षी यांच्या प्राणीप्रेमाच्या अनेक कथा आधी वाचल्या होत्या. जेवणाची वेळ झाल्यावर पातेली भरभरून अन्न आधी प्राण्यांसाठी जाताना पाहून त्या कथा ख-या असाव्यात असं वाटलं.
महर्षींचं शेवटचं वास्तव्य ज्या सभागृहात होतं, तिथं आम्ही गेलो. त्या छोट्याशा सभागृहाला आता ध्यानकक्षाचे रूप प्राप्त झालं आहे. आत जाताच रमणांच्या भव्य चित्राने नजर खेचून घेतली. त्यांच्या डोळ्यांतला शांत आणि आश्वासक भाव; चेह-यावरची किंचित करुणेची छटा; आधार देणारे स्मितहास्य ....ते चित्र इतकं जिवंत आहे की वाटतं आता पुढल्या क्षणी महर्षी आपल्याशी बोलतील, आपल्याला आशीर्वाद देतील, काही सांगतील ... (या अनुभवावर लिहिलेला एक संवाद इथं आहे) .माझ्यासारख्या अश्रद्ध व्यक्तीलाही नतमस्तक करण्याचं सामर्थ्य त्या चित्रात आहे असं मी म्हणू शकते अनुभवानं!! महर्षीनी वापरलेल्या वस्तू तिथं ठेवलेल्या आहेत. आजकाल पंचतारांकित संस्कृतीचे अनेक “साधु-संत” पहायला मिळतात. त्या पार्श्वभूमीवर रमणांचा साधेपणा विलक्षण चकित करून गेला मला.
अरुणाचलाच्या माथ्यापर्यंत चढत जायचा माझा विचार होता. पण आश्रमाच्या लोकांनी फक्त ‘स्कन्दाश्रमापर्यंत जाऊन या, पुढे निर्मनुष्य भागात आज जाऊ नका” अशी कळकळीने विनंती केली. त्या डोंगरावर त्या दरम्यान स्त्रियांशी गैरव्यवहाराच्या काही घटना घडल्या होत्या हे कळल्यावर (आणि आम्ही सगळ्या स्त्रियाच होतो म्हणून) मी माझा हट्ट सोडून दिला. अनेक भक्त मंडळी जातात तिथवर मिळून ठराविक दिवशी – पण त्या दिवसापर्यंत मी काही तिथं असणार नव्हते.
स्कन्दाश्रम ही अरुणाचलाच्या कुशीत वसलेली एक छोटीशी गुहाच आहे खरं तर. तिथं आता बांधकाम केलेलं आहे. रमणांनी इथं काही काळ राहून साधना केली होती. डोंगरातून एक झरा इथवर येतो त्यामुळे गुहेत एकदम मस्त थंड वाटतं. इथं आम्ही बराच वेळ नुसतेच निवांत, काहीही न बोलता बसून होतो. इथल्या वातावरणाचा प्रभावच आहे तसा.
रमण महर्षींचं तत्त्वज्ञान आणि उपदेश अद्वैत वेदांताला अनुसरणारा आहे. आत्मसाक्षात्कार हेच रमणांच्या मते मानवी जीवनाचं ध्येय आहे – असायला हवं.  ‘या साक्षात्कारासाठी गुरुकृपा आवश्यक आहे’ असंही त्यांनी आवर्जून सांगितलं आहे.  “कृपा असतेच, ती घेण्याची आपली पुरेशी क्षमता हवी” अशी मिस्कील पण कठोर आठवणही ते आपल्याला करून देतात. उपदेश देण्याची महर्षींची पद्धत वरवर साधीसोपी वाटली तरी अतिशय गूढ आणि सखोल होती असं दिसतं. आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी संन्यासच घेतला पाहिजे असा त्यांचा आग्रह नव्हता. महर्षींचं स्वत:चं जीवन अतिशय अद्भूत आणि अविश्वसनीय आहे. अशी माणसं आजही असतात याचं नवल वाटतं.
***
अरुणाचलावरून परतताना संध्याकाळ झाली. पाहता पाहता ‘नभ मेघांनी आक्रमिले’ आणि झिम्मड पाउस कोसळायला लागला. त्या सरींनी हातभर अंतरावरचं काही पाहणंही अशक्य करून टाकलं. काळोखाची झूल मग आसमंतावर पसरत गेली. क्षणाक्षणाला मी पाठ फिरवून जणू अरुणाचलापासून दूर चालले होते.
डोळ्यांसमोर मात्र त्याचंच रूप होतं आणि मनात महर्षींचे शब्द:
“हे अरुणाचल! काय, तू मला आत नाही बोलावलेस? पण मी तर आत येऊन चुकलो आहे. माझ्या रक्षणाचा भार आता तुझ्यावरच आहे!”
“हे अरुणाचल! माझे मन इतस्तत: भटकू नये म्हणून तू सदैव माझ्या मनात विराजमान रहा ...”
“हे अरुणाचल! हे अरुणाचल!”

Wednesday, October 31, 2012

१४०. निमित्त कॉफीचं ...

वैभवला कशाचा तरी आनंद साजरा करायचा होता, कसला ते तो मला आधी सांगायला तयार नव्हता. पण त्यासाठी तो मला एका प्रसिद्ध ‘कॉफी शॉप’मध्ये घेऊन गेला.

वैभवने मला हुकूम सोडला. “साधं-सरळ वाच. तुझं उर्दू वाचन इथं आत्ता दाखवायची गरज नाही.”

छे! मला उर्दू वाचता येत नाही. पण ‘जनरेशन नेक्स्ट’च्या या मुलाला आमच्या पिढीची सवय माहिती आहे. हॉटेलमध्ये मेन्यू कार्ड वाचताना आधी उजवीकडची पदार्थाची किंमत वाचायची आणि मग नेमकं काय आपल्या खिशाला परवडतंय याचा अंदाज घ्यायचा ही माझी (आणि माझ्या पिढीतल्या अनेकांची) सवय. वैभवचे आई-बाबा माझे मित्र आहेत. त्यामुळे लहानपणापासून अनेकदा वैभवने आम्हाला असं मेन्यू कार्ड वाचताना पाहिलेलं आहे. हातात पैसे आले तरी ती एक प्रतिक्षिप्त क्रिया होतेच अजूनही. वैभव आणि भवतालची ‘जनरेशन नेक्स्ट’ आमच्या या सवयीची ‘उर्दू वाचन’ म्हणून संभावना करते.

आता वैभव मोठा झालाय, तो भरपूर पैसे कमावतो. ही नवी पिढी त्यांच्या पगाराबद्दल बोलते तेव्हा तो महिन्याचा पगार असतो की वर्षाचा असतो याबाबत माझा अनेकदा गोंधळ होतो. एकदा माझे एक सहकारी मला सांगत होते की ‘त्यांच्या जावयाला वीस हजाराची वाढ मिळालीय.’ त्यावर मी ‘वा! छान!’ असं म्हटलं खरं; पण मी बहुतेक फार प्रभावित नव्हते झाले. त्यामुळे त्यांनी लगेच सांगितलं ‘ वर्षाची नाही, महिन्याची पगारवाढ सांगतोय मी’. माझे हे सहकारी माझ्याहून जुन्या काळातले असल्याने ‘महिन्याच्या’ पगाराबद्दल बोलले. नाहीतर आजकाल कोण मासिक उत्पन्नाबद्दल बोलतंय? वैभवही मला लहान असला तरी आता या भरपूर पैसे कमावणा-या गटात मोडतो. पैसे भरपूर कमावत असल्यामुळे या लोकांचा खर्चही अफाट असतो. ‘एवढे पैसे कशाला लागतात?’ या माझ्या प्रश्नावर वैभव आणि त्याच्या वयाच्या मुला-मुलीचं एकचं उत्तर असतं – “जाऊ दे, तुला नाही कळायचं ते!’ ते बरोबरचं असणार त्यामुळे मीही जास्त खोलात कधी जात नाही.

“काय घेणार मावशी तू?”, वैभवने अगदी मायेनं विचारलं मला.

“अरे, हे कॉफी शॉप आहे ना? मग कॉफीचं घेणार ना, दुसरं काय?” माझ्या मते मी अत्यंत तर्कशुद्ध मत व्यक्त केलं होतं.

वैभव समंजसपणे हसला. मग मी त्याच्या लहानपणी त्याला ज्या थाटात त्याला समजावून सांगायचे त्याच पद्धतीने म्हणाला, “अगं, असं नाही मावशी. इथं कॉफीच्या आधी खायचे पदार्थ मिळतात, कॉफीसोबत खायचे पदार्थ मिळतात. कॉफीचे तर असंख्य प्रकार आहेत. तू फक्त सांग तुला काय हवंय ते. आणि प्लीज, किंमत पाहून नको ठरवूस काय मागवायचं ते! मी काही आता लहान नाही राहिलो ..मला आज पैसे खर्च करायचेत, तुझ्यासाठी खर्च करायचेत. तू उगीच माझी मजा किरकिरी करू नकोस.”

मला वैभवची भावना समजली. पण असल्या भपकेबाज ठिकाणी माझी आणखी एक अडचण असते.  ब-याच पदार्थांची नावं वाचून मला नेमकं काहीच कळत नाही. मागवलेला पदार्थ आवडला नाही तरी ‘ताटात काही टाकून द्यायचं नाही’ या सवयीने संपवला जातो. पदार्थांची नावं लक्षात रहात नसल्याने मागच्या वेळी कोणता पदार्थ आवडला नव्हता हेही लक्षात रहात नाही. त्यामुळे अशा ठिकाणी माझ्या प्रयोगशील वृत्तीला मी गप्प बसवते. त्यातल्या त्यात ‘चीज सॅन्डविच’ मला माहिती आहे – मग मी तेच पाहिजे म्हटलं. मी खायला इतकं स्वस्त काहीतरी निवडावं याचं वैभवला वाईट वाटलं, पण तो घेऊन आला ते माझ्यासाठी.

आम्ही गप्पा मारत बसलो. वैभवचे आई-बाबा माझे मित्र असले तरी वैभवचं आणि माझंही चांगलं गूळपीठ आहे. तो अनेक गोष्टी मला सांगतो, अनेक विषयांवर आमच्या गप्पा होतात. मी ब्लॉग लिहिते, मी फेसबुक वापरते – अशा गोष्टींमुळे वैभवला मी नव्या जगाशी जुळवून घेणारी वाटते. मी पहिल्यांदा मोबाईल वापरायला सुरुवात केली तेव्हा काही अडचण आली की वैभवकडे मी धाव घ्यायचे. एस एम एस कसा करायचा, ब्लू टूथ म्हणजे काय, ते कसं वापरायचं – असं काहीबाही वैभवने मला शिकवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला गप्पा मारायला विषयांची कधी वानवा नसते.

मग कॉफीची वेळ. मीही वैभवबरोबर काउंटरपाशी गेले.

तिथल्या तरुण मुलाने विचारलं, “काय घेणार?”
“कॉफी”, मी सांगितलं.
"कोणती?" 
मी एक नाव सांगितलं.
“साखर हवी की नको?” त्या मुलाने विचारलं.
“पाहिजे”, मी सांगितलं.
“किती?” पुढचा प्रश्न – त्याचंही उत्तर मी दिलं.
“दूध?” आणखी एक प्रश्न.
“हो” माझं उत्तर.
“गरम का थंड?” प्रश्न – त्याचंही उत्तर दिलं.
“ क्रीम हवं?” प्रश्न काही संपेनात.

“अरे बाबा, मी साधी एक कप कॉफी प्यायला इथं आलेय तर किती प्रश्न विचारशील मला?” मी हसत पण काहीशा वैतागाने त्या मुलाला म्हटलं . वैभव आणि तो मुलगा दोघांच्याही चेह-यावर हसू होतं.

काउंटरवरच्या त्या मुलाला माझ्या पिढीला तोंड द्यावं लागत असणार नेहमी – किंवा त्यांना प्रशिक्षण देणारी व्यक्ती थोर असेल. कारण तो मुलगा मिस्कीलपणे मला म्हणाला, “आपल्या आवडीचं काही हवं असेल आयुष्यात तर अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात शांतपणे आणि निर्णय करावा लागतो प्रत्येक टप्प्यावर  ...”

मला त्याच्या या उत्तराचं आश्चर्य वाटलं. तो जे काही म्हणाला त्यात तथ्यही होतंच म्हणा. पण माझ्या         चेह-यावरचं आश्चर्य पाहून त्याला राहवलं नाही. तो पुढे म्हणाला, “असं परवाच ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक त्यांच्या एका विद्यार्थ्याला इथं सांगत होते ...” तो हसून पुढच्या ग्राहकाकडे वळला आणि आम्ही आमच्या टेबलाकडे परतलो. वैभवने एकही प्रश्न विचारायला न लागता त्याला काय हवं ते सांगितलं होतं आणि मिळवलंही होतं , हे माझ्या लक्षात आलं.

एक तर प्रश्न माहिती पाहिजेत किंवा त्यांची उत्तरं देता आली पाहिजेत. नाहीतर मग नको ते वाट्याला येईल आणि त्याचा आनंद न मिळता ते फक्त एक ओझं होईल – हे मला पटलंच! साधं कॉफी शॉपमध्येही शिकण्यापासून सुटका नाही.

या प्रसंगानंतर काही महिन्यांनी मी पॉन्डिचेरी आणि कन्याकुमारीला गेले. एकटीच होते मी. कन्याकुमारीला पोचल्यावर कॅन्टीनमध्ये गेले आणि ‘कॉफी’ एवढंच सांगितलं. माझ्यासमोर मला आवडते तशी – अगदी पहिजे तितकी साखर, दूध, पाहिजे त्या चवीची गरमागरम कॉफी समोर आली. तिचा वास, तिची चव, तिचं रूप – सगळं अगदी माझ्या आवडीचं – मुख्य म्हणजे एकही प्रश्न मला न विचारला जाताच! अशी कॉफी मी एक दिवस, दोन दिवस नाही तर पुढचे दहा दिवस घेत राहते. मला कॉफी या विषयाचा काही विचार करावा लागत नाही, त्याबाबत काही निर्णय घ्यावे लागत नाहीत (साखर किती वगैरे...). मला ज्यातून आनंद मिळतो ती कॉफी मिळवण्यासाठी मला डोकेफोड करावी लागत नाही, धडपड करावी लागत नाही.

कॉफी शॉपमध्ये एक ग्राहक म्हणून माझी आवडनिवड लक्षात घेऊन कॉफी बनवली जाते – निदान तसा प्रयत्न तरी असतो. पण तिथं मला मजा येत नाही. मला हव्या त्या चवीची कॉफी तिथं मिळत नाही सहसा. इथं सगळ्यांसाठी जी कॉफी बनते, तीच माझ्या समोर येते. इथं मला काही खास वागणूक  मिळत नाही, पण इथल्या कॉफीचा आस्वाद मी सहाही इंद्रियांनी घेऊ शकते, घेते. हो, इथं ग्लासातून वाटीत कॉफी ओतण्याचा आवाज ऐकायलाही मजा येते!

माझ्या मनात नकळत या दोन्ही प्रसंगांची तुलना होते. कॉफी शॉपमध्ये जे हवं त्यासाठी धडपड करावी लागत तर होती, पण जे हवं तेच हाती येईल अशी खात्री नव्हती. दुस-या परिस्थितीत फार धडपड न करावी लागता जे पाहिजे ते मिळत होतं. पहिली कॉफी दुसरीच्या कैक पट महाग होती (असते) हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नसला तरी दुर्लक्ष करण्यासारखाही नाही.

जगताना बरेचदा पहिली परिस्थिती आपल्या वाट्याला येते. धडपड करायची आणि काहीतरी कमवायचं पण त्याचा आनंद, समाधान मात्र नाही. पण अनेकदा दुसरी परिस्थितीही असते. फार काही न करता अचानक सुख, समाधान, आनंद समोर येतो. यातली फक्त एकच परिस्थती असत नाही – साधारणपणे दोन्हीही असतात. अनुकूल वातावरण असेल तर चांगलंचं – पण तितकसं अनुकूल नसेल तरी आपल्याला पाहिजे ते मिळवता येतचं – प्रश्न विचारायची आणि उत्तरं शोधायची तयारी मात्र पाहिजे आपली.

मग निमित्त कॉफीचं असेल किंवा नसेल ...
**

Thursday, October 18, 2012

१३९. एकटीची मीटिंग

आम्ही सगळेजण हैराण होतो. आणि आमची अडचणही मजेदार होती. आम्हाला नको इतक्या संख्येने, आम्ही बोलावलेलं नसतानाही स्त्रिया येत होत्या. 

'स्त्रियांचे आरोग्य आणि सबलीकरण' असे भारदस्त नाव असलेला तो एक प्रकल्प होता. त्या आदिवासी क्षेत्रात आमच्या संस्थेचं आधीपासून काम होतं, त्यामुळे स्त्रियांसोबत काम करायला फार अडचणी नाही आल्या. गावोगावी स्त्रियांचे गट तयार झाले, त्यांच्या नियमित बैठका व्हायला लागल्या, पैसे बचत आणि कर्ज याव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांतही स्त्रियांचा चांगला सहभाग होता. दर वर्षाचं नियोजन असायचं कार्यक्रमांचं, त्यानुसार कार्यक्रम व्यवस्थित व्हायचे. या कार्यक्रमांची आखणी करताना सगळ्या नाही, तरी काही स्त्रियांना सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नांनाही थोडंफार यश येत होतं.  

हं, आता गावांत जायला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नव्हती, रस्ते नव्हते, पाऊस खूप पडायचा .. असली कारणं होती अनेक. पण लोकांकडून आम्हाला सहकार्य मिळत होतं. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनाही उत्साह होता भरपूर. आता तसं 'अजिबात अडचणी न येणं' प्रत्यक्षात शक्य नसतं. अडचणी यायच्या पण त्या सोडवता यायच्या - कधी सहज, कधी कष्ट घेऊन. पण दर अडचणीतून शिकत शिकत पुढं जात होतो. 

स्त्रियांना तोवर 'मीटिंग' हा शब्द माहिती झाला होता आणि तो त्यांनी सरसकट वापरायला सुरुवात केली होती. 'बैठक' शब्द वापरला तर तो कुणालाच कळायचा नाही. आम्ही गावात प्रवेश केला की पोरंसोरंही 'आज मीटिंग आहे बायांची' असं एकमेकांना ओरडून सांगायचे. पुरुषमाणसंही आम्हाला पाहिलं की 'मीटिंगच्या ताई आल्या बरं का' अशी घोषणा करायचे. गटाची मीटिंग, पंचवीस तीस गटांच्या अध्यक्ष- सचिवांची मीटिंग म्हणजे क्लस्टरची मीटिंग हे एव्हाना सर्वांना माहिती होतं. तालुक्याच्या दुस-या गावांत गटांच 'फेडरेशन'ही झालं होतं. त्यामुळे 'आपलीही फेडरेशनची मीटिंग लावा बघू एकदा' अशी मागणीही अधूनमधून व्हायची. 

आमच्या प्रकल्पाच्या रचनेत दर सहा महिन्यांनी प्रत्यक्ष प्रकल्पात सहभागी असणा-या स्त्रियांची मुलाखत घ्यायची (खरं तर ते सर्वेक्षण होतं - पण ते कुणीतरी प्रश्न विचारायचे आणि माहिती लिहून घ्यायची अशा प्रकारे करायचं होतं - म्हणून टीममध्ये त्याला नावं पडलं ते 'मुलाखत'!)  आणि प्रकल्पाची परिणामकारकता तपासून पाहायची असं अपेक्षित होतं.  या मुलाखतींच्या आधारे आम्ही आमचा सहामाही अहवाल तयार करत असू. आमचा हा प्रकल्प पाच राज्यांत नऊ वेगवेगळ्या ठिकाणी चालू होता.  प्रकल्पात सहभागी स्त्रियांची संख्या पाच हजारांच्या आसपास होती.  प्रत्येक वेळी एवढ्या सगळ्या स्त्रियांची मुलाखत घेणं शक्य नव्हतं हा एक भाग. आणि दुसरं म्हणजे दर सहा महिन्यांनी तेच तेच प्रश्न ऐकून स्त्रियांनी 'आम्हाला जी अपेक्षित आहेत' ती उत्तरं दिली असती अशी शक्यता जास्त.  तसंचं त्यांना कंटाळा येऊनही चालणार नव्हतं आम्हाला. 

त्यावर एक उपाय असा की दर वेळी प्रश्न बदलायचे. पण मग एका सहामाहीची तुलना दुस-या सहमाहीशी करता येत नाही. शिवाय प्रकल्पाचे उद्देश स्पष्ट होते - त्यामुळे दरवेळी आम्ही काही प्रश्न बदलायचो पण मुलाखतींच स्वरूप मुख्यत्वे तेच असायचं. प्रश्न अगदी साधे असायचे आणि त्या विषयांवर पुरेसं प्रशिक्षण दिलेलं असायचं त्या स्त्रियांना. म्हणजे - भाजी आधी चिरण्याआधी धुवावी की चिरून धुवावी, पाणी शुद्धीकरणाची पद्धत, जुलाबावरचे घरगुती उपाय, लसीकरणाचे वेळापत्रक  - अशा थाटाचे प्रश्न. त्या त्या सहामाहीत जे आम्ही काम करणार आणि प्रशिक्षण देणार त्यावर आधारित प्रश्न. काही बदलायचे, तर काही कायम असणार होते. अर्थात हे प्रश्न विचारताना केवळ माहितीवर भर नव्हता तरप्रकल्पात सहभागी स्त्रियांचा व्यवहार आणि दृष्टिकोन यात काही बदल झाले का यावरही भर होता. 

ही मुलाखत गटाच्या बैठकीत घ्यायची नाही, कारण मग ते सामूहिक उत्तर होतं. ही मुलाखत त्या स्त्रीच्या घरात घ्यायची नाही, कारण घरातील इतर माणसांना ती त्या स्त्रीची परीक्षा वाटू शकते. ही मुलाखत संस्थेच्या तालुक्याच्या कार्यालयातही घ्यायची नाही - कारण तिथं स्त्रिया थोड्या दडपून जायच्या, गप्प बसायच्या. प्रकल्पाच्या दहा गावांना केंद्रस्थानी असणारी एक जागा  स्त्रियांच्या गटांच सामूहिक ऑफिस म्हणून तयार केली होती एका गावात. तिथं आमची प्रशिक्षणं आणि मीटिंग व्हायच्या नेहमीच्या. प्रकल्पातील गावं तिथून चारी दिशांना विभागलेली होती. तालुक्याच्या ठिकाणी जायचं तर याच गावातून जावं लागायचं सगळ्यांना. कुणालाही निरोप द्यायचा असेल पंचक्रोशीत, तर तो या गावात दिला की पोचत असे. 

दर सहा महिन्यानी ज्या मुलाखती घ्यायच्या आहेत स्त्रियांच्या; त्या या गावातल्या ऑफिसात घ्यायच्या असं आम्ही ठरवलं. ठरलेल्या पद्धतीने आम्ही स्त्रियांची नावं निवडली. त्यांना मुलाखतीला बोलावायचं कसं हा प्रश्न पडला. अगदी पहिल्या वेळी स्त्रिया एकट्या गावातून इथवरही येणार नाहीत हे माहिती होतं. शिवाय हे 'मुलाखत' प्रकरण नवीन असल्याने त्या घाबरणार नाहीत, बिचकणार नाहीत हेही  आम्हाला पहायचं होतं. म्हणून आम्ही एक युक्ती केली. एक प्रशिक्षणाचा कार्यक्रम ठेवला - त्यात 'प्रत्येक गटातून कमीत कमी तीन तरी स्त्रियांनी यावं' असं आम्ही त्यांना सांगितलं. कार्यकर्त्यांपैकी एक दोघींनी प्रशिक्षण घ्यायचं आणि दोघींनी निवडलेल्या  स्त्रियांच्या मुलाखती घ्यायच्या असं ठरलं. कागदावर तरी आमची योजना परिपूर्ण वाटत होती. 

पण प्रत्यक्षात ती फसली. एकीकडे प्रशिक्षण चालू असताना मुलाखतीसाठी एकेका स्त्रीला बोलावून न्यायचं ठरलं होतं. अशी स्त्री तिला हाक मारल्यावर तत्परेतेने उठत होती - पण ती दोन मिनिटांत परत येत होती मुख्य सभागृहात. एका मुलाखतीला कमीत कमी दहा मिनिटांचा वेळ लागायला पाहिजे होता. पण कुणीच दहा मिनिटं आत थांबताना मला दिसत नव्हतं. मुख्य कार्यक्रम सोडून मग मी तिकडं गेले तर माझ्या दोन सहकारी कपाळाला हात लावून बसल्या होत्या. जी ती बाई, 'हे काय, कारेक्रम संपू दया तो तिकडला, मग सांगते मी' असं म्हणून बाहेर पळ काढत होती. तीन तासांत आम्हाला एकाही स्त्रीची मुलाखत घेता आली नाही. आणि कार्यक्रम संपल्यावर त्या तीस स्त्रिया - 'हं, विचारा मघा काय विचारत होता ते' म्हणत बसल्या आणि उरलेल्या पस्तीस-चाळीस स्त्रियाही तिथंच ठाण मांडून बसल्या. "आता उशीर होईल तुम्हाला घरी जायला, पुढच्या वेळी बोलू" असं म्हणत आम्ही तो विषय संपवला. 

पण सहामाही अहवाल देण्यासाठी आम्हाला या मुलाखती लवकर घेणं आवश्यक होतं. इतर आठ ठिकाणचे वृत्तांत यायलाही लागले होते तोवर आमच्याकडे. आम्ही बरीच चर्चा केली. मग गावा-गावात जाऊन त्या ठराविक तीन स्त्रियांच्या मुलाखती शाळेत अथवा ग्रामपंचायतीत त्यांना बोलवून करायच्या असं ठरलं. पण तिथंही गावातल्या ब-याच स्त्रिया जमा झाल्या. "अगं, तुम्हाला तिघी जणींना फक्त बोलावलं होतं ना? बाकीच्या गेल्या तरी चालतील" अस म्हटल्यावर "नाही, तुम्ही एवढ्या आमच्या गावात आलात, आहे की आम्हाला वेळ" असं म्हणत सगळ्याजणी बैठक मारून बसल्या. त्याही दिवशी आमचं काम झालं नाही. 

दोन दिवसांनी आमचे लोक त्या त्या स्त्रियांच्या घरांत गेले- तिथंही तेच झालं पुन्हा एकदा. सभोवतालच्या बायांची गर्दी जमा झाली. "कशाला सगळ्यांना बोलावतेस?" असं मी शेवंताला म्हटलं तर गोड हसून म्हणाली, "तुम्ही काही तरी महत्त्वाचं सांगितलं आन त्या बाया नसल्या तर त्यांच नुस्कान नाही का व्हायचं?" तिचा उदात्त हेतू पाहून मला काय बोलावं ते सुचेना. 

शेवंता हुशार होती एकदम. त्यामुळे काहीतरी गडबड आहे हे तिच्या लगेच लक्षात आलं. मीटिंग झाली, बाया आपापल्या घरी गेल्या, आम्ही निघालो. तेव्हा शेवंता आपणहोऊन म्हणाली, "चला, मी येते तुमच्याबरोबर तिथवर." लांब झाडाखाली आमची गाडी होती तिथवर ती आली. "ताई, काय झालंय? बाया गोळा होताहेत चांगल्या तर तुम्हाला का नको आहेत त्या? मागच्या आठ-धा दिवसात तिस-यांदा असं होतंय. काही चुकलं का आमच्या बायांच? " शेवंता अगदी काळजीत पडली होती. 

"नाही गं शेवंता, चुकलं वगैरे काही नाही बायांच. पण त्याचं काय आहे ..." असं म्हणत मग मी तिला निवडल्या गेलेल्या बाईने एकटीने प्रश्नांची उत्तरं देणं कसं गरजेचं आहे, दर सहा महिन्यांनी वेगळ्या बाईला ही संधी कशी मिळेल, असे प्रश्न विचारण्याचा काय उद्देश आहे - हे सगळं सोप्या भाषेत समजावून सांगितलं. ती एकदम जोरजोरात हसायला लागली. ते पाहून चिंतेत असलो तरी आम्ही पण हसायला लागलो.

 मी म्हटलं, "आता कसं करायचं तूच सांग. आपणच मागे पडलोय सगळ्यात."  
"तुम्ही चार दिवसानी या. तोवर कोण बाया हव्यात तुम्हाला त्यांची नावं मला दया. मी करते बरोबर काय करायचं ते", शेवंता म्हणाली. 
आम्ही शेवंताला त्या तीस बायांची नावं दिली. त्यापैकी बहुतेक स्त्रियांना शेवंता ओळखत होतीच. 

आमची वेळ संपत आली होती. आता काहीही करून चार दिवसांत मुलाखती संपवयाला हव्या होत्या आम्हाला. आता बघू शेवंता काय चमत्कार करतेय ते म्हणून पुढचे तीन दिवस आम्ही तो विषय डोक्यातून काढून टाकला. 

चौथ्या  दिवशी आम्ही आमच्या त्या गटाच्या ऑफिसात परत आलो. पाच-सहा स्त्रिया होत्या. शेवंताही होती. "ताई, यादीतल्या नंबरानिशी नाहीत बाया हजर" तिचा स्वर काळजीचा होता. पण मुलाखत नंबरानुसार घेतली पाहिजे असं काही आमच्यावर बंधन नव्हतं. ज्या आहेत त्यांच्यापासून आम्ही सुरुवात केला. एकेका बाईची ती मुलाखत पंधरा-वीस मिनिटं चालली. त्या उत्तरांतून आम्ही काय चांगलं केलं आणि आमचे कोणते प्रयत्न फसले, नवे प्रयत्न कसे करायला हवेत याचं स्पष्ट दर्शन होत होतं आम्हाला. मी एकदम खूष झाले. 

मधेच रखमाने कोरा चहा आणून दिला. काही काळाने आम्ही नाचणीची भाकरी खाली. मुलाखती चालूच होत्या. शेवंता जागेवरून हलत नव्हती. येणा-या बाईचे नाव लिही, तिला चहा दे, जेवणाची चौकशी कर, मुलाखत संपलेल्या बाईला इतरांशी त्या विषयावर बोलू न देणे - अशी सगळी कामं ती सराईतपणे हाताळत होती. मला तिचं फार कौतुक वाटलं. एक दोनदा तिचं कौतुकही केलं मी जमलेल्या स्त्रियांसमोर आणि आमच्या टीमजवळ. 

सगळ्या मुलाखती संपल्या. पुन्हा एकदा शेवंताचं आम्ही तोंड भरून कौतुक केलं. 
मी तिला विचारलं, "शेवंता, आम्हाला चार वेळा जे जमलं नाही ते आज तू एका फटक्यात करून दाखवलंसं! चमत्कारचं केलास तू आज. काय सांगितलंस तू या स्त्रियांना आणि इतरही स्त्रियांना?" 

"अहो काही नाही ताई, मी प्रत्येक बाईला सांगितलं की आज तिची एकटीची मीटिंग आहे म्हणून!! बाकी कुणी विचारलं तर त्यांचा नंबर पुढच्या वेळी येईल म्हणून सांगितलं", शेवंता सहजपणे म्हणाली.  "एकटीचीच मीटिंग आहे म्हणल्यावर मग एकटीच येणार ना बाई?" तिचा पुढचा प्रश्न. 

एकटीची मीटिंग! 
वा! काय मस्त शब्द शोधला शेवंताने!
एकदम समर्पक.
काय करायचं याची थेट माहिती देणारा शब्द.
आपल्याला कधी हा शब्द सुचला नसता! 
एक नवा शब्दप्रयोग. 
एक नवी संकल्पना.
एक नवा व्यवहार. 

पुढच्या साडेचार वर्षांत आम्हाला त्या सर्वेक्षणात काहीच अडचण आली नाही!! 
आणि एकटीची मीटिंग हा शब्द सगळ्यांच्या तोंडी अगदी रुळून गेला सहजपणे! 

Friday, October 5, 2012

१३८. खान मार्केट

'हे एक अजब शहर आहे ..' हे वाक्य  कोणत्याही शहराला लागू पडेल इतकं आता शहरी जगणं अजब झालं आहे.  म्हणून सहसा हे वाक्य मी म्हणत नाही, पण तरीही  दिल्लीबाबत माझ्या मनात ही भावना नेहमी जागी होते. खरं तर इतर इतक्या शहरांत आणि गावांत राहिले मी! त्या प्रत्येक गावात राहताना आपण इथले 'आजन्म निवासी' आहोत अशा थाटात मी राहिले. दिल्लीत मात्र पहिल्या क्षणापासून आपण इथले पाहुणे आहोत आणि एक ना एक दिवस आपण इथून जाणार आहोत अशी स्पष्ट जाणीव माझ्या मनात आहे. आणि कदाचित म्हणूनच दिल्ली मला एक अजब शहर वाटत असावं! 

उन्हाळ्यामुळे मागचे तीन चार महिने दिल्लीत कुठं भटकले नव्हते. त्यादिवशी सुरेखा नारायणचा निरोप आला की 'अमुक दिवशी खान मार्केटला भेट आहे'. इकडे थोडासा पाऊस पडून गेला असला तरी उकडंत होतंच भरपूर - अगदी ऑगस्ट संपला तरी. मी सुरेखाबरोबर आधी एक दोन ठिकाणं पहिली होती. तिचा गट छोटा असतो आणि ती माहिती सांगते व्यवस्थित. तिने खान मार्केट परिसर निवडला आहे म्हणजे तिथं पाहण्यासारखं नक्कीच काहीतरी असणार.  

मी आधी सहका-यांना विचारलं, "खान मार्केट परिसरात पाहण्यासारखं काय आहे?" त्यावर त्या सगळ्यांनी माझ्याकडेच पाहिलं आणि "मार्केट" असं उत्तर देऊन त्यांनी विषय बदलला. मग मी विकीबाबाला शरण गेले. तिथं  हे मार्केट १९५१ मध्ये सुरु झाले, त्याला खान अब्दुल गफारखान यांच नाव देण्यात आलं आहे आणि जगातल्या महागड्या बाजारपेठेत याचा क्रमांक २१ वा लागतो - अशी बरीच माहिती मिळाली. ती वाचून मात्र मी चिंतेत पडले आणि खान मार्केटला जावं का नाही अशा द्विधा मनस्थितीत सापडले.

Hotel Ambassador, Khan Market, New Delhi 
खान मार्केट मेट्रो स्थानकाच्या बाहेर त्या सकाळी आम्ही आठ वाजता भेटलो तेव्हा सहाच लोक होतो ते पाहून मला बरं वाटलं. शनिवारची सकाळ असल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हती. समोर एक मोठी इमारत दिसली. हा सगळाच भाग तसा उच्चभ्रू गणला जाणारा. त्यामुळे असेल एखादी निवासी इमारत असं मला आधी वाटलं. पण इतरांच्या बोलण्यातून कळलं की ती अ‍ॅम्बेसेडर (Ambassador) हॉटेलची मागची बाजू आहे.  तासाभराने आम्हाला तिथंही डोकावण्याची संधी मिळाली - त्याबद्दल पुढे सांगते मी. 

Bagwali Masjid, Khan Market, New Delhi
डावीकडे वळून आम्ही पाच एक मिनिटं चाललो आणि पोचलो ते 'बागवाली मशीद' इथं - हो बागवालीच, 'बांगवाली' नाही. या माशितीत दोन तीन लोक (अर्थात पुरुष) प्रार्थना करत होते. स्त्रियांना या ठिकाणी प्रवेश करण्याची परवानगी आहे का नाही याची खात्री नसल्याने आम्ही जरा बिचकतच प्रवेश केला. सावधानता म्हणून प्रत्येकीने डोक्यावर ओढणी किंवा स्कार्फ ओढून घेतला. दोन लोकांनी आमच्याकडे पाहिलं पण ते आम्हाला काही बोलले नाहीत त्यामुळे आमची भीड चेपली. 

या मशिदीचे घुमट छान दिसत होते. रंग मात्र पांढरा देऊन टाकला होता. परिसरात शांतता होती.  आमच्यातले अभ्यासक लोक ही मोगल कला आहे की आणखी कोणती अशी चर्चा करत होते. पूर्वी ही मशीद चारी बाजूंनी बागेने वेढलेली होती म्हणून ही बागवाली मशीद.  रस्त्यावरून आत मशीद असावी अशी कल्पनाही येत नाही. आता इथली रोपवाटिका प्रसिद्ध आहे. 

नंतर आम्हाला दिसलं ते सुजानसिंग पार्क.  हे दिल्लीतलं पहिलं अपार्टमेंट - ते बांधलं गेलं १९४५ मध्ये. कोण आहेत हे सुजानसिंग? ते आहेत सोभासिंग या बांधकाम ठेकेदाराचे वडील.  कोण आहेत हे सोभासिंग? ते आहेत खुशवंतसिंग यांचे वडील. ब्रिटीशांची नवी दिल्ली बांधण्यात यांचाही मोठा सहभाग होता.एके काळी ते अर्ध्या दिल्लीचे मालक होते असं म्हणतात. त्यांची आणखी एक ओळख म्हणजे भगतसिंग आणि बटूकेश्वर दत्त यांनी दिल्ली विधानसभेवर बॉम्ब टाकला होता - त्यांची ओळख पटवून देणारे गृहस्थ. यांची आणखी एक ओळख म्हणजे नवी दिल्ली महापालिकेचे ते चारवेळा अध्यक्ष (महापौर) होते. लोक कुणाला निवडून देतात याचा एक त्रासदायक इतिहास आहे हे त्या निमित्ताने लक्षात आलं माझ्या.

Sujan Singh Park, Khan Market, New Delhi
हे अपार्टमेंट आहे मात्र सुंदर. देखणी वास्तू आहे एकदम. प्रत्येक घराला खुला व्हरांडा दिसत होता. इथं दिल्लीतले अतिश्रीमंत लोक रहात असणार - तिथले सुरक्षारक्षक लगेच धावत आले. पण त्यांना आम्ही फक्त 'पाहायला' आलो आहे, असं सांगितल्यावर ते निमूट आमच्या मागोमाग फिरत राहिले. असे आमच्यासारखे कदाचित बरेच लोक येत असणार ही इमारत पाहायला! या इमारतीची एक विशिष्ट बंदिस्त रचना आहे -  तीन बाजूंना इमारती, समोर प्रवेशद्वार आणि मध्ये छान बाग आहे. एकदम ऐतिसाहिक काळात आपण असल्याचा भास क्षणभरच टिकला - कारण प्रांगणात अत्याधुनिक गाड्याही होत्या. इथल्या सदनिकेची किंमत काय असेल असं एकीने विचारलं - मी त्या चर्चेत अजिबात लक्ष घातलं नाही!!

Old Telephone in Hotel Ambassador, New Delhi 
या इमारतीच्या समोरच्या बाजूला आम्ही गेलो. अ‍ॅम्बेसेडर हॉटेलमध्ये आम्हाला प्रवेश करू देतील का नाही याची कल्पना नव्हती - पण प्रवेश द्वारावरच्या रखवालदारांनी 'सुप्रभात' म्हणत आमचं स्वागत केलं . असं स्वागत करणं हा त्यांच्या कामाचा एक भाग असतो म्हणा. सुरेखाने हॉटेलमधल्या लोकांशी काहीतरी बोलणं केलं आणि आम्हाला आत जाऊन खोली पाहायची परवानगी मिळाली. गेली ३५ वर्ष तिथं काम करणारा एक कर्मचारी पंखे कसे जुने आहेत, पूर्वीच्या लिफ्ट कशा होत्या .. अशा आठवणी सांगत होता. तिथं एक जुन्या काळचा टेलिफोनही दिसला - त्यामुळे एकदम जुन्या हिंदी सिनेमाच्या सेटवर गेल्यासारखं वाटलं मला. हॉटेलच्या भिंती पूर्ण पांढ-या आहेत आणि त्या त्रिकोणी इमारतीच्या मध्यभागी एक घुमट आहे. तो कसला ते कळलं नाही. त्या घुमटाकार जागेत एक उपाहारगृह चालायचं पण आता ते बंद आहे इतकीच बातमी कळू शकली. इतके जास्त पैसे देऊन लोक इथं राहायला का येतात हे मात्र मला कळलं नाही.

पुढची आमची भेट होती ती सिनगॉगला. Synagogue म्हणजे ज्यू धर्मियांच प्रार्थनास्थळ. इथले सचिव आणि राबी (म्हणजे धर्मगुरू - ते मात्र राबा म्हणत होते - म्हणजे आजवर मी ऐकलेला राबी शब्द चुकीचा आहे तर!) आहेत इझिकेल माळेकर. त्यांना मराठी येत असल्यामुळे मी त्यांच्याशी थोडं (थोडंसंचं - कारण इतराना संभाषणातून बाजूला ठेवायचं नव्हतं आम्हाला) मराठी बोलले. त्यांच्या सांगण्यानुसार भारतात फक्त ५००० ज्यू लोक आहेत आणि दिल्लीत तर फक्त पन्नास.  पण विदेशी राजदूत आणि त्यांचे दूतावास यामध्ये ज्यू धर्माचे अनुयायी मोठया प्रमाणावर असतात - ते इथं प्रार्थनेला येतात. "मी आधी भारतीय आहे आणि मग ज्यू" ;" इस्रायल माझ्या हृदयात आहे तर भारत माझ्या रक्तात" अशासारखे त्यांचे उद्गार त्या समूहातल्या आम्हा इन मीन तीन भारतीयांना सुखावून गेले.

श्री. माळेकर यांनी आम्हाला ब-याच गोष्टी विस्ताराने सांगितल्या. राबीने जी शाल वापरून धर्मोपदेश करायचा असतो, त्यात ठराविक संख्येचे गोंडे असतात, ठराविक प्रकारची टोपी त्याने घालायची असते. मेंढीच्या शिंगापासून बनवलेले शोफर (Shofar) वाजवायचे असते. राबी जिथून धर्मोपदेश करतात त्या कोर्टात दिसणा-या लाकडी पिंज-यात अन्य कुणालाही जायची परवानगी नसते. ते  एक ठरलेले परंपरागत कर्मकांड असते. त्यात फार बदल झालेले नव्हते - पण अलिकडे व्हायला लागले आहेत.

या सिनगॉगचा इतिहास आणि तिथे होणारे कार्यक्रम याबाबत त्याच्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती आहेच - त्यामुळे ती इथं पुन्हा देत नाही. श्री माळेकर यांनी सांगितलेली इतर माहिती फार रोचक वाटली मला - म्हणजे पारंपारिक ज्यू धर्मात स्त्रियांचे जे स्थान होते (जवळ जवळ नव्हतेच म्हणा ना) ते आता कसे बदलत चालले आहे याची काही उदाहरणे त्यांच्या बोलण्यात आली. या ठिकाणी स्त्रिया आणि पुरुष यांच्यासाठी एकत्रित प्रार्थना आता होते, ज्यू नसलेले लोकही या प्रार्थनेत सामील होऊ शकतात. पारंपरिक मान्यतेप्रमाणे तोराह (Torah) या धर्मग्रंथाचे वाचन करायचे तर किमान दहा पुरुष उपस्थित हवेत - इथं मात्र तसा काही नियम पाळला जात नाही. स्त्रिया आणि पुरुष मिळून दहा जण असावेत - अशी सुधारणा इथं करण्यात आली आहे.  'शनिवार' हा खर तर पवित्र सुट्टीचा '- साबाथ'चा दिवस पण तरीही आम्हाला माहिती सांगण्यासाठी श्री माळेकर यांनी वेळ काढला. बदल होताहेत धर्मात आणि परंपरेत हे नक्की - असा एक दिलासा त्यातून मिळाला.

Parasi Cemetery, Khan Market, New Delhi 
या मंदिराच्या जवळच  दफनभूमी आहे. तिथून थोड्या अंतरावर पारशी लोकांची दफनभूमी . त्या दोन्ही आम्ही पहिल्या. (वाटेतली ख्रिश्चन धर्मियांची दफनभूमी मात्र पाहिली नाही). तिथं काही थडगी आकाराने लहान दिसत होती त्यावर माझ्या गटातले लोक चर्चा करत होते. आकाराने लहान असणारी थडगी ही लहान मुलांची आहेत हे त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर सगळेच हळहळले. पारशी लोकांची आयुर्मान जास्त असते असं एक तिथल्या माहितीवरून जाणवलं....वस्तुस्थिती नीट जाणून घ्यायला पाहिजे.  दहन आणि दफन यावर एक छोटी चर्चा झाली आमच्या समुहात तेव्हा.

दोन-तीन तासांच्या अवधीत तीन पुरातन धर्मांच्या महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन आलो आम्ही याची गंमत  वाटली. एरवी खान मार्केट म्हणजे खरेदी किंवा खाणे  हे सूत्र दिल्लीत प्रचलित असताना आम्ही काहीच खरेदी न करता आणि काहीही न खाता - पण बरेच काही मिळवून त्या परिसरातून बाहेर पडत होतो हा एक चमत्कारचं होता. दिल्ली शहराच्या अजबपणाचा माणसांवरही परिणाम होतो - हा अनुभव पुन्हा एकदा आला.

तुकडया-तुकड्यांनी माझ्यासमोर आलेल्या या माहितीचं एक सलग चित्र माझ्याही मनात अजून बनलं नाही - ब-याच गोष्टी धूसर आहेत अद्याप माझ्यासाठी! हे सगळं नीट जुळवून पुन्हा एकदा खान मार्केट परिसरात भटकायचा माझा विचार तरी आहे - तो अंमलात कधी येतोय ते पाहायचं!! तोवर या अजब दिल्लीची आणखी कोणती रुपं समोर येताहेत ते कळेलच!!
*