ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, February 21, 2013

१५२. बांधिलकी?

एका संस्थेचा कार्यक्रम.
संस्थापकांची जयंती. इथं तसं माझ्यासारखा एखादा अपवाद वगळता बाहेरचं कुणी नसतं.

विद्यार्थ्यांचं संचलन. बघायला ब-यापैकी गर्दी.
आम्ही बरेच लोक उभे. पण झाडाभोवतीच्या कट्ट्यावर काहीजण बसलेले.
मला किंचित ढकलत आणि मग ओशाळून ‘सॉरी’ म्हणत एक आठ वर्षांचा मुलगा माझ्या पुढ्यात येऊन उभा राहिला. मी हसून थोडी मागे सरकले. 

दहा पंधरा मिनिटांचा तर कार्यक्रम.
त्याची सांगता ‘वंदे मातरम्’च्या संपूर्ण गायनाने.  
आम्ही सगळेजण – अगदी तो आठ वर्षांचा मुलगाही- सोबत गातो. मला बरं वाटतं.

कट्ट्यावरचे मात्र लोक बसून. उभेही राहत नाहीत.
वयस्कर? वेगळ्या क्षमतेचे? आजारी? छे! तरुण लोक आहेत ते सगळे.

विचारांशी “बांधिलकी” असणा-या ठिकाणी हे असं.
बांधिलकी नसेलच – तिथं काय? 

(केवळ शंभर शब्दांत - शीर्षक सोडून शंभर शब्द-  अनुभव मांडण्याचा हा प्रयोग. या मालिकेत आणखीही काही सांगण्याचा विचार आहे.)

Sunday, February 17, 2013

१५१. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग ४: केवलाद्वैत (१)

भाग ३ 

शंकराचार्यांचा वेदान्त हा सर्वात प्रसिद्ध व लोकमान्य असा वेदान्त आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शंकराचार्यांचा जन्म केरळमधील कालडी या गावी इसवी सन ७८८ मध्ये झाला व इसवी सन ८२0 मध्ये त्यांनी समाधी घेतली याबाबत सर्वसाधारणपणे एकमत आढळते. (ठाणे शहरातील प्रसिद्ध अभ्यासक श्री. श्री. द. कुलकर्णी यांच्या मते मात्र हा कालावधी इसवी सन पूर्व ५0९ ते ४७७ असा आहे.) बालपणीच पितृछत्र गमावलेल्या शंकराने वयाच्या आठव्या वर्षीच चारी वेदांचे अध्ययन पूर्ण केले. वेदान्तमताचा म्हणजेच अद्वैतमताचा प्रसार करण्यासाठी त्यांनी भारतभ्रमण केले. द्वारका, ज्योर्तिमठ, पुरी व शृंगेरी या चार ठिकाणी त्यांनी मठांची स्थापना केली. आचार्यानी लिहिलेली मधुर स्तोत्रे आजही लोकांना आवडतात. त्यांना मायावादाच्या केलेल्या आग्रही प्रतिपादनामुळे काही विद्वान त्यांच्यावर ते 'प्रच्छन्न बौद्ध’ असल्याचाही त्यांच्यावर आरोप करतात. त्याचा विचार आपण पुढील विवेचनात करणार आहोत.

मूळ सिद्धान्त

वास्तविक शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान हा आयुष्यभराच्याच अभ्यासाचा विषय आहे. पण त्यांच्या तत्त्वज्ञानाचे सार त्यांनीच दोन ओळींत पुढीलप्रमाणे सांगितले आहे:
श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथ कोटिभि: । ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्रौव, नापर: ।।
(कोटी ग्रंथांनी जे सांगितले आहे, ते मी अर्ध्या श्लोकात सांगतो. ब्रह्म सत्य आहे, जगत् मिथ्या आहे, जीव आणि ब्रह्म एक आहेत, वेगळे नाहीत.)

शंकराचार्यांचा पहिला महत्त्वाचा सिद्धान्त म्हणजे ब्रह्म हेच काय ते सत्य होय. आणि सत्य म्हणजे काय? तर ज्याचा कधीही विनाश होत नाही ती वस्तू. 'नाभावो विद्यते सत:’ असे भगवद्गीतेतही त्याचे वर्णन आहेच. हे सत्य एकमेव आहे. त्यालाच ब्रह्म म्हणायचे! त्याशिवाय दुसरे काहीही विद्यमान नाही. 'सर्वं खल्विदं ब्रह्म’ या औपनिषदिक महावाक्याचे शंकराचार्य पूर्णत: समर्थन करतात.

ब्रह्म स्वयंप्रकाशी आहे. ते चिन्मय आहे. 'सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म’ किंवा 'सच्चिदानंद’ असे त्याचे शब्दांत वर्णन केले जाते. पण वस्तुत: ब्रह्माचे शब्दांत कधीही वर्णन करता येणार नाही. ते अनिर्वचनीय आहे. 'यतो वाचो निवर्तन्ते, अप्राप्य मनसा सह’ (जिथून वाणी माघारी येते, मनालाही त्याचा थांग लागत नाही) असे उपनिषदातही त्याचे वर्णन आहेच. ब्रह्म निर्गुण आहे, निराकार आहे, निरवयव आहे. सत्, चित्, आनंद हे काही ब्रह्माचे गुणधर्म नव्हेत. ब्रह्म हे दुस-या कशामुळचे निर्माण झालेले नाही. ते आहेच. अनादि आहे आणि अनंतही आहे. ते कोणत्याच मर्यादेने बांधले गेलेले नाही. म्हणून शब्दांत त्याचे वर्णन करताना ' ब्रह्म म्हणजे अमुक नाही अन तमुक नाही - नेति नेति (न इति – हे नाही)’ असे म्हणावे लागते.

शंकराचार्यांच्या मते ब्रह्म हे भेदरहित आहे. हे भेद तीन प्रकारचे असतात - विजातीय, स्वजातीय व स्वगत. गाय आणि घोडा यांच्यातील भेद विजातीय स्वरुपाचा आहे. काळी गाय आणि पांढरी गाय हा स्वजातीय स्वरुपाचा भेद झाला. गायीचे शिंग, शेपूट, पाय हे स्वगत भेद दर्शवितात. ब्रह्माशिवाय येथे दुसरे काहीच विद्यमान नसल्याने विजातीय, आणि स्वजातीय भेदाचा प्रश्नच उदभवत नाही. ब्रह्म निर्गुण असल्याने त्यात स्वगत भेदही नाही. ब्रह्माचे वर्णन करताना शंकराचार्य 'स्वरुपलक्षण’ आणि 'तटस्थलक्षण’ असे दोन शब्दप्रयोग करतात. हे दोन शब्द समजून न घेता आपण पुढे गेल्याने सध्याच्या चर्चेत फार मोठा अडथळा येणार नाही, त्यामुळे आपण त्याची चर्चा करणार नाही.

आता हे ब्रह्म आहे हे तरी कशावरुन? तर श्रुतिंवरुन! शंकराचार्य श्रुतिप्रामाण्य, शब्दप्रामाण्य मानतात. 'अहं ब्रह्मास्मि’ सारखी वाक्ये ज्या अर्थी श्रुतिंमध्ये आहेत, त्या अर्थी ब्रह्म आहेच. अर्थात शंकराचार्यांचे शब्दप्रामाण्य म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. 'जरी शतश्रुतिंनी सांगितले की अग्नी शीत आहे तरी त्यावर विश्वास ठेवू नका’ असेही शंकराचार्य सांगतात! प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, उपलब्धि ..... या सर्व प्रमाणांची स्वत:ची अशी वेगवेगळी क्षेत्रे आहेत असे शंकराचार्यांचे मत आहे. म्हणून 'प्रत्यक्षाद्वारे ब्रह्मज्ञानाची अपेक्षा करणे’ शंकराचार्यांच्या मते व्यर्थ ठरते!

मायावाद

'सर्व जग म्हणजे ब्रह्म आहे’ असे म्हणणे तर फारच सोपे! पण प्रत्यक्षात जगताना आपण या जगात भेदच पाहतो. अगदी हरघडीला पाहतो. सगळेच ब्रह्म असेल तर दंगली, खून, मारामारी, हत्याकांडे होतीलच कशी? आणि कशासाठी? चोरही जर ब्रह्मच असेल तर त्याला किंवा तिला शिक्षा करण्याचा इतरांना काय अधिकार? उपनिषदांच्याच भाषेत सांगायचे तर ' सारे ब्रह्मच असल्यावर कोण कोणाला पाहणार?’ .. वगैरे. आता हे सगळे तत्त्वज्ञान म्हणून चर्चा करायला, भाषणे द्यायला आणि लेख लिहायला म्हणून ठीक आहे. पण खरे सांगायचे झाले तर हे जग आणि ब्रह्म यांच्या एकत्वावर विश्वास ठेवायचा म्हणजे वेडेपणाच आहे असे आपल्याला वाटते, जे स्वाभाविक आहे.

आता यावर एक उपाय असा की, ब्रह्माचा आणि जगाचा काही संबंधच नाही असे मानायचे! पण मग ब्रह्माच्या एकमेवाद्वितीयत्वाचे काय? जग ही दुसरी एक सत्ता मानली की ब्रह्म आपोआपच सान्त, सीमित आणि मर्यादित होते.

शंकराचार्यांना मात्र ही अडचण जाणवत नाही. 'जगत् मिथ्या’ असे त्यांनी आधीच आपल्याला सांगून ठेवले आहे. या मिथ्या शब्दाबाबत आपण फार घोळ घातला आहे. केवळ या एका शब्दामुळे 'शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान पलायनवादी आहे’ असे म्हणण्याइतपत काही टीकाकारांची मजल गेली आहे. पण शंकराचार्यांचा मायावाद जर आपण नीट समजावून घेतला तर आपला गोंधळ दूर होईल.

मिथ्या म्हणजे खोटे नव्हे, तर मिथ्या म्हणजे अशाश्वत, परिवर्तनीय! जग सत् नाही कारण ते सतत बदलत राहते. जगात अनेक गोष्टींचा नाश होतो आणि अनेक नव्या गोष्टी जन्माला किंवा उदयाला येतात. जगाला अस्तित्व आहे हेही खरेच. कारण जर जग पूर्णत: खोटे असेल तर त्याचा आपल्याला बोध होणार नाही. पण जगाच्या आपल्याला झालेल्या ज्ञानाच्या आधारे आपण दैनंदिन व्यवहार करत असतो. म्हणून जग पूर्णत: खोटे नाही. पण जग शाश्वत आणि अपरिवर्तनीय पण नाही. जग ‘सत्’ नाही आणि ते ‘असत्’ ही नाही - ते मिथ्या आहे.

मग हे जग नेमके आहे तरी काय? तर हे जग ब्रह्मावरील ‘विवर्त’ आहे. जगाचा आधार, जगाची प्रतिष्ठा, जगाचा पाया ब्रह्मच आहे. ब्रह्म नसतेच तर जगही नसते. पण जग असले काय अन नसले काय, त्याचा ब्रह्मावर मात्र काहीही परिणाम होत नाही. जगाच्या असण्याने ब्रह्मत्वाच्या मुकुटात काही तुरा घातला जात नाही आणि जगाच्या नसण्याने त्यात काही उणीव निर्माण होत नाही. ‘सर्प-रज्जूचे’ शंकराचार्यांचे उदाहरण अगदी प्रसिद्ध आहे. रात्रीच्या काळोखात रस्त्यावर पडलेल्या निरुपद्रवी दोरीला साप समजून आपण घाबरतो. आपण ओरडतो, आपल्या हृदयाची धडधड वाढते, आपल्याला घाम फुटतो ...... आपल्याला असे कितीही आणि काहीही वाटले तरी त्यामुळे प्रत्यक्षात त्या दोरीचे काही सर्पात रुपांतर होत नाही. आपल्या भाव-भावनांच्या अविष्कारांचा त्या दोरीवर काहीही परिणाम होत नाही.

अर्थात हे उदाहरण केवळ संकल्पना समजावून घेण्यापुरतेच ठेवायचे. कारण दोरी आपल्या नेहमीच्या अर्थाने अचेतन आहे तर ब्रह्म चैतन्यमय आहे. दोन्ही परिस्थितींमध्ये एक साम्य मात्र नक्कीच आहे. ते म्हणजे अज्ञानामुळे आपण एका वस्तूला दुसरीच काहीतरी समजतो. दोरीला साप समजून प्रतिक्रिया देतो तसेच ब्रह्माला जग समजतो. अविद्येमुळे आपण ब्रह्मावर जगाचा 'अध्यास’ करत असतो, आरोप करत असतो. जे त्या वस्तूचे (इथे वस्तू म्हणजे entity असे म्हणायचे आहे मला, कदाचित हा शब्द चुकीचा आहे, पण अन्य योग्य शब्द आठवत नसल्याने तोच वापरते आहे) वास्तविक स्वरुप नाही, त्या प्रकारे वस्तूला समजणे म्हणजे त्या वस्तुवर दुस-या वस्तूचा आरोप करणे! प्रथम पाहिलेल्या वस्तूचे दुस-या वस्तूच्या ठिकाणी होणारे स्मरणाच्या स्वरुपाचे ज्ञान म्हणजे अध्यास होय! ब्रह्म अविकारी, निश्चल, निरवयव असल्याने जगातील दोषांनी अथवा गुणांनी ब्रह्म लिप्त होत नाही.

ब्रह्मावर जगाचा जो काही भास आपल्याला होतो, तो ‘माये’मुळे होतो. मायेची कल्पना सर्वप्रथम शंकराचार्यांनी मांडली असे काहीजण मानतात. तर काही तिचा उगम थेट ऋग्वेदापर्यंत नेऊन भिडवतात. मायावादाचा जनक कोण या वादात आपण फारसे लक्ष घालणार नाही. शंकराचार्यांनी मायावादाचा सिद्धान्त अतिशय लोकप्रिय केला इतके खात्रीने म्हणता येईल.

मायेची शक्ती दोन प्रकारची आहे. असलेली दोरी झाकून ठेवणे ही एक - हिला म्हणायचे ‘आवरण’ शक्ती. आणि असलेल्या वस्तूच्या जागी दुसरीच वस्तू दाखवणे - जसे दोरीच्या जागी साप - तिला म्हणायचे ‘विक्षेप’ शक्ती. विशेष म्हणजे माया अनादि आहे पण अनंत मात्र नाही. ही दोरी आहे, साप नाही हे व्यक्तीला कळल्यावर सापाच्या भावनेतून व्यक्ती मुक्त होते. ब्रह्मसाक्षात्कार झालेली व्यक्ती मायेच्या पाशातून सुटते म्हणून माया सान्त आहे. यातून ज्या व्यक्तीला साप (प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष) माहिती नाही, तिला दोरीच्या जागी साप दिसणार नाही, दोरीच दिसेल – अशी व्यक्ती ब्रह्मज्ञानी मानायची का असा एक तार्किक प्रश्न लगेच येईल. साप आणि दोरी हे उदाहरण आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. आजच्या जमान्यात कदाचित ही संकल्पना समजण्यासाठी वेगळे उदाहरण द्यावे लागेल – गरज असल्यास.

मायेला शंकराचार्य 'सद्सद्विलक्षण’ असे म्हणतात. माया सत् आहे का? तर नाही! कारण तिचा नाश होतो. म्हणजे माया असत् आहे का? तर तसेही नाही. कारण दोरीच्या जागी त्या क्षणापुरता का होईना पण आपल्याला खरोखरच साप दिसतो. तो खोटा आहे हे कळत नाही तोवर आपण घाबरुन पळ काढतोच.

या मायेमुळेच आपण आत्म्यावर देहाचा, भावनांचा, अहंकाराचा अध्यास करतो. ' मी लठठ आहे......मी आंधळा आहे.......मी रागीट आहे ......हे माझे आहे....... हे मला आवडत नाही....... हे सारे भावाविष्कार म्हणजे आपल्या सच्चिदानंद स्वरुपावर आपण केलेले आरोप होत......अध्यास होय.

जग आणि ब्रह्म यांच्या नातेसंबंधात शंकराचार्यांनी हा जो काही सिद्धान्त मांडला त्यालाच 'विवर्तवाद’ असेही म्हटले जाते. तो थोडा विस्ताराने समजावून घेऊ.

कोणत्याही गोष्टीच्या निर्मितीसाठी जो मालमसाला लागतो त्याला 'उपादान’ कारण म्हणायचे. ज्या क्रियेच्या अथवा हालचालीच्या योगाने उपादान कारणात गुणांचा अथवा अवस्थांचा बदल घडून येतो, ते 'निमित्त’ कारण होय. ब्रह्मच या जगाचे उपादान कारण व निमित्त कारण आहे. माया ही ब्रह्माचीच शक्ती आहे. ज्याप्रमाणे जादुगाराला त्याच्या जादूची कधीही भूल पडत नाही त्याचप्रमाणे ब्रह्मही मायेत कधीच अडकत नाही. जग ज्या अर्थी दिसते, भासते, असते त्या अर्थी मायेने ब्रह्मावर कुरघोडी केली असे मानणारांनी शंकराचार्यांचे माया - ब्रह्माचे विवेचन नीटपणे समजावून घेतले पाहिजे.

नैयायिकांच्या मते 'कारण व्यापारानंतर कार्य नव्यानेच उत्पन्न होते. ते पूर्वी नसते. त्याच्या अस्तित्वाला खराखुरा आरंभ असतो’. नैयायिकांचे हे मत 'आरंभवाद या नावाने ओळखले जाते. सांख्यकार म्हणतात की, 'प्रत्यक्ष उत्पन्न होण्यापूर्वी कार्य हे अस्तित्वात असतेच. पण फक्त निराळया स्वरुपात’! सांख्यांचे हे मत 'सत्कार्यवाद’ या नावाने ओळखले जाते. 'उपादानकारणाच्या घटकांचा संघात दर क्षणाला संपूर्णपणे नष्ट होऊन त्याच्या जागी दुसरा संघात उत्पन्न होतो’ असे बौद्ध मानतात. या मताला 'संघातवाद’ म्हटले जाते. शंकराचार्यांच्या अद्वैतवेदान्तालाही 'जे पूर्वी नव्हते ते नव्याने निर्माण होऊ शकणार नाही’ हे सर्वस्वी मान्य आहे. पण त्याचबरोबर ब्रह्मामध्ये काही परिवर्तन होऊन सृष्टी घडली हे मात्र त्यांना अमान्य आहे.   'ब्रह्म हे अविकृतच राहते. मात्र त्याच्यामुळे सृष्टीची प्रचिती येते’ असे शंकराचार्य मानतात. हा सिद्धान्त 'विवर्तवाद’ या नावाने ओळखला जातो.
क्रमश: भाग ४(२) 

Monday, February 11, 2013

१५०. विवेकानंदांचा वेदान्त विचार : भाग ३: वारसा


भाग: १, २(अ), २ (आ) 

विवेकानंद मी पहिल्यादा वाचायला घेतले ते धर्मासंबंधी काही ठाम मते आणि त्यासोबतच त्याबाबतचे काही पूर्वग्रह मनात तयार झाल्यानंतरच! अर्थात तो १९८0 च्या आसपासचा काळ होता. आणिबाणी आणि त्यानंतरच्या राजकीय प्रयोगांचे आणि त्यातून होणा-या वाताहातीचे पडसाद आमच्या पिढीच्या मनावर उमटत होते. धर्मानेच देशाचे नुकसान केले आहे असे मानण्याचे माझे ते वय होते. मार्क्सवादी अभ्यासवर्गात जाऊन आल्याचा तो एक प्राथमिक परिणाम होता!

विवेकानंदांचे एक मोठे पुस्तक दोन दिवसांत वरवर चाळून पाहताना माझ्या मनात 'काय हे, यात तर नवीन काहीच नाही! तेच वेद आणि तीच पुराणे! अशी एक प्रतिक्रिया उमटलेली मला आजही स्पष्ट आठवते. ‘The Master as I Saw Him’ या त्यांच्या पुस्तकात भगिनी निवेदितांची एक उल्लेखनीय प्रतिक्रिया आहे. विवेकानंदांचे पहिले भाषण ऐकल्यावर त्यांच्या मनात 'या माणसाने काय मोठं नवीन सांगितलं? हे सगळ तर आधीच सांगितलं गेलं आहे!’ अशाच आशयाचे विचार आले होते.
भगिनी निवेदिता ते सामान्य वाचक या दोघांच्याही प्रतिक्रियांमध्ये साम्य असणे वैशिष्टयपूर्ण आहे. यामधून विवेकानंदांची एक विशेषता समोर येते. ती म्हणजे त्यांची अत्याधिक विनम्रता! 'मी केवळ भारवाहक आहे’, अशी विनम्र भूमिका विवेकानंदांसारखे महापुरुष (आणि स्त्रियाही) नेहमी घेतात असे दिसते.

भारतीय स्वभाव

हा स्वभाव विवेकानंद या व्यक्तीचा एकटयाचा आहे असे मात्र नव्हे. तर हा भारतीय स्वभाव आहे! भारतीय लोकांना, समाजाला काही ऐतिहासिक जाणिवाच नव्हत्या असा आरोप भारतीयांवर नेहमीच केला जातो. पण भारतीय लोक व्यक्तीपेक्षा विचारांना जास्त प्राधान्य देतात अशी एक शक्यता दिसते. विचार सांगणारा 'कोण आहे’ हे येथे फारसे कधी महत्त्वाचे नव्हते, तर विचार 'काय आहे’ हे महत्त्वाचे होते. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण प्राचीन काळी खरोखरच होऊन गेले की नाही याचे येथे फारसे सोयरसुतक नसते. श्रीकृष्णाचे अस्तित्व ऐतिहासिक दृष्टया सिद्ध होवो अथवा न होवो, गीतेचे महत्त्व त्यामुळे काही कमी होत नाही!

शंकराचार्यांपासून आजपर्यंतच्या कोणत्याही महापुरुषाचे उदाहरण घ्या. 'मी काही नवे सांगतो आहे’ असे कोणीच म्हणत नाही. म्हणजे इतक्या वर्षांमध्ये भारतात काहीच नवे सांगितले गेले नाही असे अजिबात नाही. सर्व महापुरुषांची समाजाला साद घालण्याची ती एक विलक्षण पद्धत आहे असे मला वाटते.

प्रत्येक महापुरुषाने भारताच्या ज्ञानाच्या आणि संस्कृतीच्या वारशात मोलाची भर घातली याबाबत मतभेद असण्याचे काही कारण नाही. धर्मावर आघात करुन नव्हे तर धर्माचे पोषण करुन त्यांनी ही भर घातली आहे. भगवद्गीतेचेच उदाहरण घ्या. किती विविध प्रकारांनी तिचा अन्वयार्थ लावण्यात आला आहे. हे विविध अर्थ म्हणजे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात त्या त्या महापुरुषांनी टाकलेली भर आहे. पण हे नवे विचार त्यांनी विघातक नव्हे तर विधायक पद्धतीने मांडले आहेत. हा भारतीय स्वभाव आहे!

विवेकानंदांनी काहीच नवे सांगितले नाही असे म्हणणे औद्धत्याचे ठरेल. विवेकानंदांचा वेदान्त विचार हा एका अर्थाने नव्या जुन्याचा, विविध विचारांचा समन्वय आहे - कडबोळे मात्र नव्हे. म्हणून विवेकानंदांचा वेदान्त विचार समजावून घेताना प्रस्थापित वेदान्त विचारांचा मागोवा घेणे अपरिहार्य ठरते.

हिंदुधर्म आणि वेदान्त

हिंदू धर्मावर वेदांचा फार मोठा पगडा आहे असा आपला समज आहे. सर्वसामान्य लोकांनी वेदग्रंथ वाचणे तर सोडूनच द्या,  पण पाहिलेलेही नसतात. बहुसंख्यांना कदाचित चार वेदांची नावेही पटकन आठवणार नाहीत.

आता हेच पहा ना! इंद्र हा ऋग्वेदकालीन समुहाचा प्रिय आणि आदर्श असा देव. या देवतेची स्तुती करणारी थोडीथोडकी नव्हे तर २५0 सूत्रे ऋग्वेदात आहेत. आज आपल्यापैकी किती लोकांना इंद्र हा राम आणि कृष्णासारखा देव वाटतो? भारतात आज इंद्राची किती मंदिरे आहेत? किती लोक इंद्राची पूजा करतात? वेदकाळात मूर्तिपूजा नव्हतीच असे उत्तर कोणाला सुचेल. पण गेल्या असंख्य वर्षांत इंद्रासाठी किती अभंग, कविता, प्रार्थना रचल्या गेल्या आहेत?

यज्ञ हा वैदिक संस्कृतीचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू होता. आज आपल्यापैकी अनेकांनी यज्ञ पाहिलेलासुद्धा नाही. तरीही आपण (म्हणजे असंख्य लोक) हिंदू आहोत आणि वेदांना आपण मनोमन सर्वोच्च स्थान देतो. त्याचबरोबर आपण हे देखील लक्षात घेतले पाहिजे की वैदिक धर्मावर कडाडून टीका करणा-या गौतम बुद्धाची येथे अवतार म्हणून पूजा केली जात आहे. भारतातील देवतांचा विकास हा अभ्यासाचा एक स्वतंत्रच विषय होईल, म्हणून त्याबाबत इथे अधिक लिहीत नाही. पण थोडक्यात सांगायचे झाले तर वेदमान्य ते सर्वमान्य, आणि तेच लोकमान्य अशी आपल्याकडची स्थिती  आहे.

वेद आणि वेदान्त यातला फरकही सामान्य माणसाला ठाऊक नाही असे दिसते.. सांप्रदायिक अनुयायी वगळले तर सामान्यत: (निदान महाराष्ट्रात तरी प्रामुख्याने) लोकांना एकच आचार्य ठाऊक आहेत. ते म्हणजे शंकराचार्य! 'तुमच्या हिंदुधर्माची मूलतत्त्वे कोणती?’, या प्रकारच्या प्रश्नावर पुनर्जन्म, कर्मसिद्धान्त याबरोबरच 'जग म्हणजे माया’ असेही अनेकजण सांगताना दिसून येते. केवळ वेदान्तदर्शन म्हणजे हिंदू धर्म नव्हे आणि हिंदू धर्म म्हणजे निव्वळ आद्य शंकराचार्यांचा वेदान्त नव्हे हे अनेकदा आपल्या गावीही नसते.

वेदवाड्मय

वेद हा शब्द 'विद्’ या धातूपासून तयार झाला आहे. जाणणे, होणे, प्राप्त करणे, मनन करणे असे या धातूचे अनेक अर्थ आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद ही चार वेदांची नावे आपल्याला महिती आहेत. मंत्रांची रचना आणि त्यांचे संकलन ज्या काळात झाले त्याला 'मंत्र काल’ म्हणतात. हे मंत्र ज्या ठिकाणी संकलित केलेले आहेत त्यास 'संहिता’ असे म्हणतात. सर्वसाधारणपणे जेंव्हा जेंव्हा ऋग्वेदाचा संदर्भ दिला जातो तेंव्हा तेंव्हा तो ऋग्वेदसंहितेचा संदर्भ असतो.

संहितेप्रमाणेच वरील चारही वेदांची ब्राह्राणे, आरण्यके व उपनिषदे आहेत. संहितेत देवतांच्या स्तुतिपर मंत्र आहेत. ब्राह्राणग्रंथांत प्रामुख्याने यज्ञक्रियांचे विवेचन आहे. येथपर्यंतचे वेदवाड्मय कर्मकांडात्मक मानले जाते. त्यानंतर तत्त्वचिंतनाचे प्राबल्य असणारी आरण्यके व उपनिषदे येतात. आरण्यके व उपनिषदे यांतील सीमारेषा फारच लवचिक आहेत, अस्पष्ट आहेत. उपनिषदांना ज्ञानकांड असेही म्हटले जाते.

संहितांपैकी ऋग्वेद व  अथर्ववेद या दोन संहिता महत्त्वाच्या आहेत. सामवेदात ७५ नवे मंत्र सोडले तर बाकी सारी ऋग्वेदाचीच पुनरावृत्ती आहे. यजुर्वेदाच्या शुक्ल व कृष्ण अशा दोन शाखा आहेत. अथर्ववेद संहिता मात्र थोडी वेगळी आहे. प्राचीन काळी प्रारंभी फक्त तीन वेदांनाच मान्यता अथवा प्रतिष्ठा होती. अथर्वसंहितेला हे स्थान मिळविण्यासाठी बरीच वाट पाहावी लागली. ऋग्वेद हा उच्चभ्रूंचा व अथर्ववेद हा जनसामान्यांचा अशी एक त्याची संगती लावली जाते. आर्य जमातीतीलच बहुजनसमाजाच्या कल्पना, तसेच कदाचित आर्यपूर्व आणि आर्यकालीन स्थानिक आर्येतर समाजाच्या धर्मकल्पना अथर्ववेदात संग्रहित आहेत असाही एक मतप्रवाह आहे.

ब्राह्राणांपैकी शतपथ, ऐतरेय, जैमिनीय ब्राह्राणे प्रसिद्ध आहेत. उपनिषदांची संख्या बरीच आहे. 'अल्लोपनिषद्’ नावाचेही एक उपनिषद आहे. पण आदि शंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये उल्लेखिलेली
'ईश-केन-कठ-प्रश्न-मुण्ड-माण्डुक्य- तित्तरि:।ऐतरेय च छांदोग्यं बृहदारण्यकं तथा।।’
ही दहा उपनिषदे प्राचीन मानली जातात. कौषितकी, जाबालि आणि श्वेताश्वतर या तीन उपनिषदांनाही काही लोक वरील दहांइतकेच प्राचीन मानतात.

उपनिषदांचा उगम

साधारणपणे आपला असा समज आहे की, यज्ञसंस्थेवर, पशुहत्येवर गौतम बुद्धाने सर्वप्रथम कडाडून हल्ला केला. सिद्धार्थ गौतमाचा हल्ला अतिशय प्रखर होता यात काहीच शंका नाही. पण उपनिषद काळातील ऋषींनीही हे काम कौशल्याने केल्याचे दिसून येते. ब्राह्मणग्रंथांच्या काळात यज्ञसंस्थेला अतिरेकी महत्त्व प्राप्त झाले. ‘देवतेला प्रसन्न करण्यासाठी मंत्र’ ही कल्पना मागे पडून ‘मंत्र म्हटले की देवतांनी प्रसन्न झालेच पाहिजे’ - जणू देवता ही मंत्राची गुलामच आहे - असा सारा यांत्रिक मामला बनला. यज्ञवेदी कशी बनवावी, तिची मापे, त्यासाठी लागणारे साहित्य, वेदी कोणत्या दिशेने असावी, कशाची आहुती दयावी, त्यासाठी कोणती भांडी वापरावीत........... अशा माहितीने खचाखच भरलेल्या कर्मकांडाच्या रगाडयात काहीजणांना जे हवे नेमके तेच गवसेनासे झाले. त्यामुळे काही विचारवंत बाहय कर्मांचा नाद सोडून अंतर्मुखतेकडे वळले. याचा अर्थ ब्राह्मणग्रंथ टाकाऊ आहेत असे मात्र नव्हे! विनोबाजींची उपमा वापरुन मी म्हणेन: ब्राह्मणग्रंथांच्या खांद्यांवर बसून उपनिषदकारांनी नवी वाट धुंडाळली!

यज्ञसंस्थेची बहिर्मुखता हे उपनिषदोदयाचे एकमेव कारण नसावे. एकंदरितच यज्ञ हा प्रकार प्रचंड खर्चिक झाला होता. यज्ञाच्या महत्त्वामुळे पुरोहित वर्गाचे समाजातील वजन भलतेच वाढले होते. उपनिषदांतील उल्लेखांवरुन असे दिसते की ब्रह्मविद्या प्रथम क्षत्रियांना उपलब्ध झाली. त्यांनी मग ती ब्राह्मणवर्गाला शिकविली. यज्ञाचे अपेक्षित फळ न मिळण्याचे अनेक प्रसंग घडल्यानंतर स्वाभाविकपणेच पुरोहित वर्ग फसवणूक करीत असल्याची भावना वाढीला लागली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अग्नी सर्व देवतांसाठी स्वर्गापर्यंत आहुती वाहून नेतो ही कल्पना निव्वळ बुद्धीच्या निकषावर हास्यास्पद वाटते. ईश्वरजिज्ञासेपेक्षा आत्मजिज्ञासा या काळात प्रभावी ठरली असावी. उपनिषदांत सृष्टीतील एकाही देवतेचे वर्णन नसून त्यात 'या सृष्टीच्या मुळाशी व सृष्टीस आधारभूत असे कोणते तत्त्व आहे’  या प्रश्नाचा शोधक बुद्धीने व शास्त्रीय दृष्टीने विचार केला आहे. 'ऋग्वेद हा भावनाप्रधान असून उपनिषदे ही बुद्धिप्रधान आहेत’ हे गुरुदेव रानडे यांचे विधान मग सहज मान्य होते.

वेदान्त

'वेदान्त याचा शब्दश: अर्थ 'वेदानाम् अंत:’ – ‘वेदांचा अंत’ असा होतो. उपनिषदांना वेदान्त असे म्हटले जाते. कारण क्रमानुसार उपनिषदे हा वेदांचा अंतिम भाग होय. काहींच्या मते गुरुकुलांमध्ये उपनिषदांचे पठण सर्वात शेवटी केले जायचे म्हणून ती 'वेदान्त’ होत. वेदान्त शब्दाचे विवेचन करताना प्रा. आर. आर. देशपांडे म्हणतात, ‘What is most important, however, is that the Upanishads were the culmination, the ultimate goal of Veda thought, the very highest point or acme, the point of perfection reached in respect of the Knoweldge, which is Spiritual Knowledge, Philosophical Knowledge.’

उपनिषद या शब्दाचा दोन तीन प्रकारे अर्थ लावला गेला आहे. गुरुच्या जवळ बसून केलेला रहस्यमय, गूढ संवाद असे त्याला थोडक्यात म्हणता येईल. उपनिषदांतून व्यक्त होणारी तत्त्वप्रणाली बांधीव स्वरुपाची नाही. वेगवेगळया विषयांवर विचारवंतांनी संवादरुपात प्रकट केलेले चिंतन असे उपनिषदांचे स्वरुप आहे. त्या तत्त्वविचारांची चर्चा आपण काही काळाने विस्ताराने करणार आहोत.

दर्शने

भारतीय तत्त्वज्ञानाच्या प्रांतात तत्त्वज्ञानाला 'दर्शन’ असे अत्यंत समर्पक नाव आहे. या दर्शनांचे प्रणेते म्हणून काही महापुरुषांची नावे घेतली गेली असली तरी ही दर्शने अतिशय प्राचीन आहेत असे मानले जाते. या दर्शनांचे वर्गीकरण दोन गटांत केले जाते. ते असे –

वैदिक दर्शने
अवैदिक दर्शने
सांख्य (कपिल)
चार्वाक
योग (पतंजलि)
बौद्ध (भगवान गौतम बुद्ध)
न्याय (गौतम)
जैन (भगवान महावीर)
वैशेषिक (कणाद)

पूर्वमीमांसा (जैमिनी)

उत्तरमीमांसा अथवा वेदान्त (बादरायण)


गणिताच्या काटेकोर भाषेत बोलायचे तर भारतीय तत्त्वज्ञानात वेदान्ताचे स्थान १/९ इतकेच आहे. पण जनमानसावर असलेला वेदान्ताचा प्रभाव पाहता या संदर्भात 'गणिताची भाषा’ बोलून चालणार नाही हे सहज लक्षात येते.

उपनिषदांतील तत्त्वज्ञान पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे बांधीव स्वरुपाचे नाही. ‘तार्किक पद्धतीचा अवलंब करुन अंतिम सत्याचे ज्ञान होणार नाही’ अशी उपनिषदांची धारणा आहे. उपनिषदांच्या स्वरुपाविषयी चर्चा करताना प्रा. दीक्षित म्हणतात की, 'एका व्यक्तीने सलगपणे निर्माण केलेले वाड्मय असे उपनिषदांचे स्वरुप नाही. भिन्नभिन्न काळात निरनिराळया ऋषींना स्फुरलेले विचार आणि आलेले काही महत्त्वाचे अनुभव यांचे उपनिषदांत कथन केलेले आहे. अर्थात तर्कदृष्टया चिरेबंद अशी एखादी इमारत उपनिषदांत आढळणार नाही. अंतिम सत्याच्या स्वरुपासंबंधी सर्वस्वी एकसारखे नसलेले विचार उपनिषदांत निश्चितपणे आहेत.’

त्यामुळे वेदान्त दर्शनाचा विचार करताना फक्त उपनिषदांचाच नाही तर आणखी दोन प्रस्थानांचा विचार करावा लागतो. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे व भगवद्गीता ही प्रस्थानत्रयी म्हणजे वेदान्त दर्शन होय. वेदान्त दर्शनातही पुन्हा अनेक विचारप्रवाह आढळतात. निरनिराळया आचार्यांनी या प्रस्थानत्रयीवर भाष्ये लिहिली आहेत. किंबहुना, प्रस्थानत्रयीवर स्वतंत्रपणे जो भाष्य रचतो तोच आचार्य असाही अर्थ रुढ आहे. या आचार्यांमध्ये मतभेद खूपच आहेत. वेदान्ताचे प्रमुख आचार्य व त्यांच्या मतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
१ शंकराचार्य: केवलाद्वैत
२ रामानुजाचार्य: विशिष्टाद्वैत
३ मध्वाचार्य: द्वैत
४ वल्लभाचार्य: शुद्धाद्वैत
५ निम्बार्काचार्य:द्वैताद्वैत

या सर्व वेदान्त मतांची थोडक्यात माहिती आपण पुढे घेऊ. 

Sunday, February 3, 2013

१४९. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग २ (आ) पाऊलखुणा

भाग: १, २ (अ)

देशासाठी

विवेकानंदांनी तत्त्वज्ञान कधीही केवळ चर्चेच्या पातळीवर जास्त काळ ठेवले नाही. चर्चेला त्यांनी नेहमीच क्रियाशीलतेची जोड दिली. ''आता अन्य देवदेवतांना मनात स्थानच नको. आपले एकमेव दैवत म्हणजे आपले राष्ट्र. त्याचीच आराधना करा. ते जागृत आहे. सर्वत्र त्याचेच चरण. त्याचेच हात. त्याचेच श्रवण. तो सर्वव्यापी आहे. बाकी सर्व दैवते झोपली आहेत. त्या विराटाचे दर्शन सर्वत्र होत असताना अन्य देवतांची ही व्यर्थ आराधना कशाला? या एकमेव उपास्य दैवताची उपासना आपल्या हातून घडू दे. त्यातच इतर दैवतांची उपासना आपोआप घडेल”, असे आवाहन काळाच्या अक्षुण्ण प्रवाहात विवेकानंद नावाच्या या संन्याशाने केले आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. 'सर्वं खल्विदं ब्रह्म’ या औपनिषदिक वाक्याचा हा किती तेजोमयी अविष्कार आहे!

व्यक्तीच्या विकासाला स्वामीजींनी जितके महत्त्व दिले, तितकेच राष्ट्राच्या विकासाला दिले. राष्ट्राच्या विकासाचा धागा विकसित व्यक्तिमत्वे असतात हे भान त्यांना होते. म्हणूनच व्यक्तिमत्व विकासाची दिशा राष्ट्रहितविरोधी असू नये अशी त्यांची भूमिका होती. 'प्रत्येक राष्ट्राला काही नियतीनियोजित कार्य असते’ असा त्यांचा दृढ विश्वास होता. अध्यात्म हाच भारताचा स्वभाव आहे आणि तेच त्याचे उर्वरित जगाला देणे आहे याची त्यांना जाणीव होती. म्हणूनच 'अध्यात्मावर तुमचा विश्वास असो वा नसो, तुम्हाला राष्ट्रजीवनासाठी अध्यात्माला धरुन राहिलेच पाहिजे’, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. अवास्तव व्यकितस्वातंत्र्याची मागणी करणारांना हा विचार म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा अथवा आक्रमण वाटेलही कदाचित. पण शेवटी व्यक्तीपेक्षा राष्ट्र आणि व्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा राष्ट्राचे स्वातंत्र्य (भौतिक आणि वैचारिकही!) अनेकदा जास्त मोलाचे असते हा धडा इतिहासाने आपल्याला वारंवार शिकविला आहे.

संघटना

सुधारणेची, परिवर्तनाची कोणतीच कामे एकटयाच्या हातून होत नाहीत. सुधारणा केवळ कायदा करुनही होत नाही. त्यासाठी लोकांनी एकत्रित येणे फार गरजेचे असते. स्वामी विवेकानंदांना अमेरिकेत सर्वात प्रभावित करुन गेलेली गोष्ट म्हणजे 'संघटना’! आळसाइतकाच मत्सर हा देखील भारतीय समाजाचा सर्वात मोठा शत्रू आहे असे त्यांना नेहमीच वाटे. पण या सर्व दुर्गुणांवर मात करुन संघटित स्वरुपात आपण लोकशिक्षणाचे कार्य केले पाहिजे असे विवेकानंद आग्रहाने प्रतिपादन करीत असत. 'रामकृष्ण मठ आणि मिशनची’ त्यांनी केलेली स्थापना म्हणजे समाजपरिवर्तनाच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल होते. संन्याशांची संघटना बांधणे आणि तिच्या द्वारे भारताच्या आध्यात्मिक आणि भौतिक प्रगतीचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करणे ही गोष्ट अलौकिक होती यात काहीच शंका नाही!

हे काम करत असताना विवेकानंदांवर काही कमी टीका झाली नाही. त्यांच्या हेतूंबद्दल संशय व्यक्त केले गेले. मनस्तापाचे प्रसंग त्यांच्याही आयुष्यात आले. पण विनम्र वृत्तीने आणि नि:स्वार्थ बुद्धीने विवेकानंदांनी आपले काम केले. 'मदांध आणि एकांतिक होऊ नका’ हा त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेला संदेश त्यांच्या उदारमतवादाची साक्ष देतो!

मातृदेवो भव

स्त्रियांबद्दल अत्यंत उदार असा मानवी दृष्टिकोन हे मला विवेकानंदांचे आणखी एक वैशिष्टय वाटते. सामान्यत: संन्यासी म्हटला की त्याने स्त्रियांपासून चार हात दूर राहावे असाच आपल्याकडे संकेत आहे. पण 'सर्वांमध्ये एकच आत्मा वि़द्यमान आहे’ असे सांगणा-या स्वामींजींच्या व्यवहाराने त्यांच्या तत्त्वज्ञानाला कधीही छेद दिला नाही. स्वत: सांगितलेल्या तत्त्वज्ञानाच्या विरोधात त्यांचा व्यवहार कधीच गेला नाही. भगिनी निवेदितांनी एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे 'स्त्रियांचे भय वाटावे इतकी स्वामीजींची वैराग्यवृत्ती उथळ नव्हती’. स्वामीजींच्या उदार मनोवृत्तीचे मोहक दर्शन यातून घडते.

स्वामीजी म्हणतात, 'पाश्चात्यांच्या दृष्टीने सारी नारी शक्ती पत्नीत्वात केंद्रिभूत झाली आहे. आणि भारतातील सामान्य माणसाच्या दृष्टीने सारी नारी शक्ती घनीभूत झालेली असते मातृत्वात!’ पण त्याचबरोबर बालविवाह, विधवांच्या पुनर्विवाहास असंमती यासारख्या काही मुद्यांवर स्वामीजींची मते काही वेळा अत्यंत मागासलेली, प्रतिगामी वाटतात हे नाकारता येत नाही. 'स्त्रिया जर पवित्र असतील तर माणूस (पुरुष) अपवित्र, पतित होईलच कोणामुळे?’ हा विवेकानंदांचा प्रश्न मला अत्यंत धक्कादायक वाटलेला आहे. विवेकानंद असे बोलले नसते तर अधिक बरे झाले असते अशी हळहळही मला अनेकदा वाटली आहे. पण व्याख्यानाचा मागचा-पुढचा संदर्भ, समोरच्या श्रोत्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी काय होती अशा अनेक मुद्यांचाही आपल्याला विचार करावा लागतो.

विवेकानंद अंध संस्कृतीरक्षक नव्हते असे मात्र नक्कीच म्हणता येईल. सीतेचा आदर्श स्त्रियांपुढे ठेवणारे विवेकानंद धर्ममार्तंडांना रोखठोक विचारतात की, 'स्त्री पुरुषांच्या ठिकाणी बाहय भेद असले तरी स्वरुपत: त्यांच्यात काही फरक नसतो. यामुळे पुरुष जर ब्रह्मज्ञ होऊ शकत असेल तर स्त्री का नाही होऊ शकणार?’ ते पुढे म्हणतात की, 'बालविवाह मला अगदी घृणास्पद वाटतो. ..... ही प्रथा गाडून टाकण्याचा शक्य तितका प्रयत्न मला केलाच पाहिजे..............बालिकेसाठी वर पाहून देणाराचा मी खूनही करु शकेन......’

स्त्री दाक्षिण्यासंबंधीचे त्यांचे काही विचार आधुनिक काळातील आपल्या विचारांच्याही दोन पावले पुढे आहेत असे जाणवते. स्त्रियांकडे भोगवस्तू म्हणून पाहिले जाऊ नये तर माणूस म्हणून पाहिले जावे असे त्यांनी आग्रहाने प्रतिपादन केले. त्यांच्या शिष्य परिवारात अनेक स्त्रिया होत्या. ‘स्त्रियांना शिक्षण दया (आणि शिक्षण म्हणजे आंतरिक क्षमतांचा विकास) म्हणजे त्यांचे प्रश्न त्या स्वत:च सोडवतील’ अशी भूमिका विवेकानंदांनी काळाच्या फार पुढे जाऊन सहजतेने मांडलेली आढळते.

मानवतावाद

विविध विषयांवरचे स्वामीजींचे विचार हा एक अनमोल खजिना आहे. त्यांच्या सर्वच विचारांचा विस्ताराने उहापोह येथे करता येणे शक्य नाही. पण शंभर वर्षांपूर्वी मांडले गेलेले विचार आजही तितकेंच महत्त्वाचे आहेत हे विशेष  आहे.

वास्तविक गेल्या शतकात जगाची फार मोठी प्रगती झाली आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या मदतीने दळणवळणामध्ये क्रांती घडून आली आहे. त्यामुळे कोणत्याही नव्या विचारांची लाट वेगाने जग पादाक्रांत करत आहे. जगावरती आपला प्रभाव टाकणा-या समाजवाद, मार्क्सवादासारख्या विविध विचारप्रणाली येथे निर्माण तर झाल्या पण त्या फार काळ, सर्वत्र तग धरु शकल्या नाहीत. त्या येथे रुजल्या नाहीत. चंद्रावर आणि मंगळावर स्वारी करणारा माणूस स्वत:च्या विचारांना काबूत ठेवण्यात, त्यांना योग्य दिशा देण्यात अयशस्वी ठरतो आहे ही आधुनिक युगाची मोठी शोकांतिका आहे.

'सत्य फक्त आम्हालाच समजले आहे...... या पृथ्वीतलावर राहण्याचा अधिकार फक्त आमचाच आहे..’ असा सत्याचा बाजार मांडणारांच्या गदारोळात 'एकं सत विप्रा: बहुधा वदन्ति’ (सत्य एकच आहे, विद्वान त्याला वेगवेगळया नावांनी ओळखतात) असा उदघोष पुन्हा करणारे विवेकानंद खचितच ‘वेगळे’ जाणवतात. शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेतील इतर विचारवंतांची भाषणे आणि स्वामीजींचे भाषण यात फरक असेल तर तो केवळ स्वामीजींच्या उदारमतवादी सहृदयतेचा आणि सर्वधर्मसमभावावरील त्यांच्या दृढ निष्ठेचा! पण त्यामुळे परिणामांमध्ये केवढा फरक पडतो!

स्वामीजींचा राष्ट्रवाद संकुचित कधीच नव्हता. श्री. इ. टी. स्टर्डी यांना ९ ऑगस्ट १८९५ रोजी लिहिलेल्या पत्रात विवेकानंद म्हणतात, 'भारताविषयी मला प्रेम आहे यात शंका नाही. पण दररोज माझी दृष्टी अधिकाधिक स्वच्छ होत चालली आहे. आपल्याला भारत, इंग्लंड, अमेरिका यांचे काय? अज्ञानी लोक ज्याला मानव समजतात, त्या ईश्वराचे आपण सेवक आहोत. जो वृक्षाच्या मुळाला पाणी घालतो तो सबंध वृक्षालाच पाणी घालत नाही काय?’ स्वामीजींच्या मते राष्ट्रवाद ही मानवतावादाच्या प्रवासातील पहिली पायरी होय.

विवेकानंद केवळ धार्मिक अथवा आध्यात्मिक क्षेत्रात मार्गदर्शन करणारे पारंपरिक गुरु नव्हते. वेदान्ताचा वसा घेऊन समाजपरिवर्तनाची स्वप्ने पाहणारा अन त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी अखंड धडपडणारा तो एक मनस्वी आणि निष्ठावान कार्यकर्ता होता! त्यांचे विचार चिरंतन काळापर्यंत महत्त्वाचे राहतील. त्यांचे युवाशक्तीला आणि राष्ट्र पुनरुत्थानाला शाश्वत आवाहन आहे - 'मृगेंद्राचे धैर्य, ईश्वरावरील श्रद्धेतून लाभलेले सामर्थ्य यांनी संपन्न असे लक्षावधी स्त्री पुरुष येथील पददलितांविषयीच्या अपार करुणेने प्रेरित होऊन जेंव्हा देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत संचार करतील आणि मुक्तीचा, सेवेचा, सामाजिक जागृतीचा आणि एकतेचा संदेश सर्वत्र पोहोचवतील तेंव्हा हिंदुस्थानच्या पुनरुत्थनाची पहाट उजाडेल!’

क्रमश: