ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, April 15, 2013

१६३. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १०. व्यावहारिक वेदान्त

भाग ९ 

विवेकानंद हे मुळात एक लोकशिक्षक असल्याने तात्त्विक चर्चेत, केवळ पारलौकिकाविषयीच्या शब्दच्छलात त्यांना अजिबात रस नव्हता हे आपण यापूर्वीच्या प्रकरणात पाहिले आहेच. पण नीट पहिले तर असे दिसते की वास्तवात मात्र त्यांनी वेदान्ताचाच प्रसार केला आहे. 'प्रत्येक जीव अव्यक्त ब्रह्म आहे’ हेच स्वामीजींच्या गीताचे ध्रुवपद आहे.

वेदान्त तत्त्वज्ञान म्हणून उच्च असेलही; पण वेदान्ताच्या शिकवणुकीमुळे (त्याबाबतच्या आपल्या समजामुळे) आपल्यापुढे अनेक व्यावहारिक प्रश्न निर्माण होतात. सगळेच जर ब्रह्म असतील तर मग चांगले-वाईट, खरे-खोटे सारे काही ब्रह्माच्याच इच्छेने होत आहे!  त्यात मानवाने करण्यासारखे काय आहे – काही आहे का नाही - असा प्रश्न स्वाभाविकपणेच मनात येतो. माणूस आणि पाषाण यांत काहीच फरक न करणारी ही तथाकथित वेदान्ताची विचारसरणी कोणाला जर अत्यंत भयावह वाटली तर त्यात काहीच नवल नाही. म्हणून मग अशा प्रकारच्या तत्त्वज्ञानावर आपली सर्वसाधारण प्रतिक्रिया असते की - 'तत्त्व म्हणून हे सारे ठीक आहे. पोटभर खाणे झाल्यानंतर आणि उद्याची चिंता नसल्यावर घरात आरामशीर बसून बोलायला हे असले विषय ठीक आहेत. प्रत्यक्ष रोजच्या जगात मात्र त्याप्रमाणे वागून चालत नाही, व्यवहार पाहावाच लागतो’. तात्पर्य? वेदान्त तत्त्वज्ञान म्हणून कितीही उच्च प्रकारचे असले तरी ते व्यावहारिक मात्र नाही असे सर्वसाधारण मत आढळून येते.

विवेकानंदांना अर्थातच आपले हे मत अमान्य आहे. ते म्हणतात, “वेदान्त दर्शन पूर्णपणे व्यवहार्य आहे. त्याच्या आस-याने जीवन जगणे व घडविणे शक्य आहे, अगदी शक्य आहे. सर्वात आधी आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती ही की वेदान्ताची तत्त्वे काही अरण्यात जन्माला आलेली नाहीत. सर्वसंगपरित्यागी संन्याशांना नव्हे तर राज्याच्या व्यवस्थेत, प्रजेच्या रक्षणात गुंतलेल्या क्षत्रियांना ब्रह्मज्ञान प्रथम झाले. त्यांनी नंतर ते पुरोहितांना शिकविले. यातील कितीतरी सिद्धान्त अरण्यवासात, एकान्तात जन्मलेले नसून, ज्यांची जीवने सर्वात जास्त गडबडीची आणि धकाधकीची असणे स्वाभाविक होय अशा सिंहासनाधिष्ठीत सम्राटांनी जगाला त्याचे दान दिलेले आहे.”

श्रीमद्भगवद्गीता तर कुरुक्षेत्रावर युद्धाच्या धुमश्चक्रीच्या वातावरणात सांगितली गेली आहे. (युद्धप्रसंगी हे तत्त्वज्ञान सांगायला-ऐकायला वेळ असतो का अशी शंका काहीजण घेतात, त्यावर बोलता येईल पण इथे नको!) आपण काय जनक, अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यापेक्षा कार्यव्यस्त आहोत काय? धकाधकीच्या जीवनात जर हे लोक वेदान्त तत्त्वज्ञानाचे आचरण करु शकले तर आपल्यासमोरच अशी काय मोठी अडचण आहे? आपल्यावर ना त्यांच्याइतका कामाचा ताण आहे, ना आपल्याला लाखो लोकांचे जीवन ज्यावर अवलंबून आहेत असे निर्णय घ्यायचे आहेत. मग का नाही आपण वेदान्त जगू शकत?

हं! आता एक मात्र खरे की वेदान्ताचा आदर्श आपल्या आदर्शाच्या कल्पनेपेक्षा फारच उच्च दर्जाचा आहे. एखाद्या माणसाने दिलेली वेळ पाळली, पत्राचे उत्तर लगेच दिले, शासकीय कार्यालयातील माणसाने वेळेत काम केले, रिक्षात विसरलेले पैशांचे पाकीट प्रामाणिकपणे परत केले अशा घटनांचे आणि लोकांचे कौतुक वाटावे अशी सध्याची स्थिती  आहे. आपण जर आपले आदर्श तपासायला गेलो, तर आपल्या असे लक्षात येईल की, जे आपल्या सोयीचे असते तेच आपल्याला व्यवहार्य वाटते. जे काही आपल्या गैरसोयीचे असेल, त्यावर लगेच आपण अव्यवहार्यतेचा शिक्का मारुन मोकळे होतो! चोराला चोरीइतके व्यवहार्य दुसरे काहीच वाटत नाही हे आपण लक्षातच घेत नाही. व्यवहार्यतेचा हा मुददा अतिशय सापेक्ष आहे हे आपण विसरता कामा नये.

मानवी मनाच्या या दुबळेपणाची, स्वार्थी प्रवृत्तीची जाणीव विवेकानंदांना नाही - असे कसे होईल? ते स्पष्टपणे सांगतात की, “एक गोष्ट मी तुमच्या मनावर बिंबवू इच्छितो की, वेदान्त हा पूरेपूर व्यवहार्य असला तरी तो या असल्या सर्वसाधारण अर्थाने नव्हे. वेदान्त आमच्यापुढे एखादाही अव्यवहार्य आदर्श ठेवत नाही. आणि त्याचबरोबर शंभर टक्के व्यवहार्य असूनही वेदान्ताचा आदर्श हा 'आदर्श’ होण्याइतका उच्चही खासच आहे.”

माणसाची एक स्वाभाविक प्रवृत्ती अशी असते की, अवघड गोष्टी सोप्या करुन घ्यायच्या. या प्रक्रियेत सोय होते खरी पण मूळ तत्व अथवा नियम शिथिल होतो. ‘सोपे द्या अन्यथा आम्ही करणार नाही’ (शुद्धलेखनाचे नियम माफ असले की कसे बरे वाटते!) ही एक सार्वजनिक प्रवृत्ती आहे. कुणाला ‘क्ष’ ही गोष्ट अवघड वाटेल तर दुस-या कुणाला ‘य’ ही गोष्ट – तो भाग वेगळा.

आपल्या स्वभावातील या उणीवेवर विवेकानंदांनी नेमके बोट ठेवले आहे. “आदर्शाला खाली खेचू नका, तर तुम्ही स्वत: त्या आदर्शाइतके उन्नत व्हा” असे त्यांचे आपल्याला कळकळीचे सांगणे आहे. वेदान्ताचा आदर्श व्यवहारात चालणार नाही असे तुम्ही का म्हणता? तुमचा व्यवहार तुम्ही वेदान्तातील आदर्शाप्रमाणे ठेवा. भोवतालचे जग कसेही असो, तुम्ही तुमच्या आदर्शानुसार जगा. भर्तृहरी त्याच्या नीतिशतकात म्हणतो,
निन्दन्तु नीतिनिपुणा: यदि वा स्तवन्तु।
लक्ष्मी: समविशतु गच्छतु वा यथेच्छम।
अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा ।
न्यायात पथ: प्रविचलन्ति पदं न धीरा:।।
(कोणी निंदा करो अथवाच स्तुती, लक्ष्मी येवो अथवा जावो, मरण समोर असेल वा युगांतराने, साहसी लोक न्यायाचा मार्ग सोडत नाहीत – म्हणजे ते आपले आदर्श कधी खाली आणत नाहीत)

याप्रमाणे वागणे तुम्हाला जमले की, तुमचा-आमचा व्यवहार आदर्श होऊन जाणार!

आपला आदर्श आपल्याला व्यवहार्य का वाटत नाही? कारण तशी आपल्या मनात इच्छा नाही म्हणून! एखाद्या खेळाडूकडे/गायिकेकडे पहा. त्या विशिष्ट खेळात/गायनात प्राविण्य मिळविण्याची त्याची किंवा तिची इच्छा असली की त्या व्यक्तीकडून केवढी मेहनत घेतली जाते! अशी व्यक्ती किती प्रकारच्या मोहांवर मात करते! पहाटे पाच वाजता उठून मैदानावर पळणे, विशिष्ट अन्नपदार्थांचे सेवन टाळणे अशा गोष्टी तुम्हा-आम्हाला अव्यवहार्यच वाटतात. पण विशिष्ट ध्येय समोर असणारी व्यक्ती मात्र इतरांना कितीही कठीण वाटले तरी त्यांचे आदर्श आचरणात आणतातच.

विवेकानंद म्हणतात, “आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी अधिक सवड आपल्याला आहे असे आपल्यापैकी बहुतेकांना आढळून येईल. प्रश्न वेळेचा नसतो, प्रश्न असतो वेळेचा सदुपयोग करण्याच्या इच्छेचा! खरोखरच इच्छा असेल तर, आपल्याला जी  सवड आहे तीत एकच काय पण असले पंचवीस आदर्श आपण याच जीवनामध्ये प्रत्यक्ष आणू शकू. इच्छा मात्र हवी. पण काही झाले तरी आपल्या आदर्शाला खाली खेचणे मात्र उचित् नाही.”

वेदान्ताने सांगितलेल्या सत्याचा अनुभव प्रत्येकाला येणे शक्य आहे, असे विवेकानंद आवर्जून सांगतात. वेदान्त तत्त्वज्ञान काही निवडक लोकांसाठी मुळीच नाही; ते सर्वांसाठी आहे, ते सर्वसमावेशक आहे. वेदान्त तत्त्वज्ञान कोणालाही कमी लेखत नाही; कोणाचाही तिरस्कार करीत नाही;  कोणालाही नाकारत नाही. माणूस पापी आहे आणि तो हळूहळू पवित्र होत जातो अशी कल्पना वेदान्ताला मान्य नाही. जो मूळचा पापी आहे, तो पवित्र होईलच कसा? आपण पवित्र होऊ शकतो याचा अर्थ असा की, आपण सारे मूलत: पवित्रच आहोत. अज्ञानाने आपण स्वत:ला दुबळे अथवा पापी म्हणवून घेत आहोत. पण वस्तुत: आपण सारे ‘सच्चिदानंद’ स्वरुप आहोत.

अर्थात वेदान्ताचे ध्येय व्यवहार्य जरी असले तरी सोपे मात्र नाही. कोठल्याही ध्येयाप्रत जायचे म्हणजे, काही ना काही त्याग करावाच लागतो. पण आपली गंमत अशी आहे, की हातातले काहीही न सोडता आपल्याला उच्च ध्येयाचा लाभ हवा असतो. ध्येयप्राप्ती ही काही लोकांसमोर, बाहेरच्या जगात मिरवण्याची गोष्ट नाही याचा आपल्याला सोयिस्करपणे विसरच पडलेला असतो. आपल्या आजच्या वागणुकीशी जुळेल असा सिद्धान्त आपण 'सोळा आणे व्यवहार्य’ म्हणून लगेच स्वीकारतो. पण ध्येयासाठी कोणी आपल्याला एक कप चहा कमी करायला सांगितला तर आपली पहिली प्रतिक्रिया असते - ' नको रे बाबा! कोणी सांगितले आहे इतका अवघड आदर्श ठेवायला? आम्ही आपले आहोत तेच आणि आहोत तसेच बरे आहोत!

इंद्रियांच्या दुर्बलतेचे समर्थन करणारा आदर्श आपल्याला व्यवहार्य वाटतो. पण 'इंद्रियांचे गुलाम असण्यात कसला आलाय आदर्श?’ - असा विचार आपण कधीही करत नाही. विवेकानंद सांगतात, “जे संप्रदाय भोग आणि भगवान यांची सांगड घालण्याचा, त्या दोघांचा मेळ बसविण्याचा कधीच प्रयत्न करत नाहीत, त्यांचीच उन्नती होत असते. जे मिलाफ साधतात, त्यांचा -हास नक्की आहे.”

“आपल्या शरीरात जर एखाद्या रोगाने प्रवेश केला, तर त्याचा नुसता विचार करुन काय उपयोग?  त्यावर काहीतरी औषध घेणे हाच खरा उपाय आहे. एक गोष्ट आपण जरुर समजावून घ्या की,  वेदान्ताचा ईश्वर काल्पनिक नाही. तो अनेकांना प्रत्यक्ष दिसलेला आहे. तो अनेकांचा अनुभव आहे. आणि ज्याअर्थी मानवी जाणीवेच्या प्रांतात या अनुभवांची नोंद झाली आहे, त्या अर्थी प्रत्येक मानवाला कधी ना कधी हा अनुभव येणारच आहे.”

वेदान्ताला “व्यावहारिक वेदान्त” असे नाव स्वामीजी का देतात हे आता आपल्या लक्षात आलेच असेल. या वेदान्ताचे मुख्य सूत्र म्हणजे 'आत्मविश्वास! “आपल्या पुराणातील तेहतीस कोटी देवांवर आणि परकीयांनी आपल्यात घुसवलेल्या आणखी देवदेवतांवर तुमचा विश्वास असेल, पण स्वत:च्या ठायी मात्र अविश्वास असेल, तर तुमच्या नशीबी मुक्ती लिहिलेली नाही. आधी स्वत:वर श्रद्धा ठेवा. त्या श्रद्धेच्या शिळेवर दृढपणे उभे रहा. सामर्थ्यसंपन्न व्हा! आजची आवश्यकता जर काही असेल तर ही आहे!” आजची काळाची ही गरज वेदान्त पूर्ण करु शकतो.

आपल्या आदर्शांच आपण सतत चिंतन केले पाहिजे. 'आत्मा वा अरे श्रोतव्य: मन्तव्य: निदिध्यासितव्य:” असे उपनिषदांनी सांगितलेले आहेच. आपण त्याचे अनुसरण केले पाहिजे. मग पाहा, आपल्याभोवतालचे जग कसे बदलून जाते ते! 'जशी दृष्टी, तशी सृष्टी’ अशी जी म्हण आहे त्यात तथ्य आहेच. सृष्टी बदलण्याचे काम अवघड आहे, पण आपली दृष्टी मात्र आपण बदलू शकतो. हे काम अगदी सोपे आहे अशातला भाग नाही, अशक्यप्राय मात्र नक्कीच नाही!

'आपण सारेच स्वरुपत: ईश्वर आहोत’ अशा म्हणण्याने जगात नुसता गोंधळ माजून जाईल अशी भीती काही लोकांना वाटते. कोणी काहीही करेल आणि त्याचे उत्तरदायित्व मात्र ईश्वरावर टाकेल अशी एक शक्यता या विचारामुळे निर्माण होते. विवेकानंदांना वाटते की, “होऊ दे असला गोंधळ! नाहीतरी आम्ही पापी आहोत, आम्ही सैतान आहोत असा घोष करुन जगाचे काय भले झाले आहे? यापेक्षा जगाचे आणखी काय वाईट होणे बाकी राहिले आहे? मग मी ईश्वर आहे असे म्हणताना लोक निदान सत्याच्या निकट तरी असतील. म्हणून भयाचे काहीच कारण नाही.”

वेदान्तधर्म सर्वसमावेशक असल्याने भांडणांना, तंटाबखेडयांना येथे अजिबात जागा नाही. निर्गुण  ईश्वराच्या उपासकांपेक्षा सगुण ईश्वराच्या उपासकांनी जगावर जास्त युद्धे लादली आहेत हे विवेकानंद आपल्या लक्षात आणून देतात. वेदान्तधर्मानुसार जर आपण सारेच आचरण करु, तर मग जगात युद्धांना आणि तंटाबखेडयांना जागाच उरणार नाही, सर्वत्र शांतीचे साम्राज्य प्रस्थापित होईल असे विवेकानंदांचे मत आहे. जगाच्या भल्यासाठी आणि स्वत:च्या विकासासाठी आपण वेदान्तधर्माचे पालन करणे आज खरोखरच 'व्यवहार्य’ ठरेल  यात शंकाच नाही!

छांदोग्य उपनिषदातील सत्यकाम जाबालाची कथा आपणा सर्वाना ठावूक असेल. या बालकाला अग्नीने, पक्षाने, वृषभाने ब्रह्मज्ञान दिले असा पुढील कथाभागात उल्लेख आहे. यातील कथेचा भाग सोडला तर तात्पर्य असे निघते की, सर्व ज्ञान हे अंतरंगातच असते आणि बाहय कालादि निमित्तांनी, कारणांनी त्या ज्ञानाची आपल्याला जाणीव होते इतकेच! ज्ञानविषयक वेदान्ताचे हे व्यवहार्य सूत्र आपण लक्षात घेतले तर आजच्या शिक्षणक्षेत्रातील आपल्या ब-याचशा समस्यांचे निराकरण होईल – निदान शक्यता तरी वाढेल.

वेदान्तमत हे जग मिथ्या – खोटे - असल्याचे सांगते असा आपला एक समज आहे. विवेकानंद वेदान्ताची ‘जगत्’विषयक भूमिका फार चांगल्या त-हेने मांडतात. ते म्हणतात, 'वेदान्त जग उडवून देत नाही, तर तो त्याचे स्वरुप खरोखर काय आहे हे स्पष्ट करुन सांगतो. वेदान्त 'मी’ चा नाश करत नाही, तर खराखुरा 'मी’ कोणता हे दाखवून देतो. हे जग व्यर्थ आहे, त्याला अस्तित्व नाही असे वेदान्त म्हणत नाही. वेदान्त एवढेच म्हणतो की, “हे जग खरोखर काय आहे ते जाणून घ्या म्हणजे तुमचे ते अनिष्ट करु शकणार नाही,  तुम्हाला ते घायाळ करु शकणार नाही.”

विवेकानंदांचे हे विचार वाचल्यावर वेदान्त आणि जीवन हातात हात घालून चालू शकतात अशी आपली नक्कीच खात्री पटली असेल! 

क्रमश:

Monday, April 1, 2013

१६२. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग ९. अमृतसंचय

भाग १ .........८

विवेकानंदांच्या वेदान्तावर ज्या ज्या विचारांचा प्रभाव आहे त्यांपैकी काही विचारांचा आढावा आपण यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये घेतला आहे. त्यात मुख्यत्वे भारतीय आचार्यांचा सामावेश होता. आणखी काही व्यक्तींचा आणि विचारांचाही विवेकानंदांवर बराच प्रभाव आहे, त्याचा आपण या ठिकाणी परामर्ष घेणार आहोत. निरनिराळया फुलांमधून मध गोळा करणा-या फुलपाखराची येथे आपल्याला आठवण येणे अगदी स्वाभाविक आहे. अर्थात विवेकानंदांनी केवळ मधुसंचयाची भूमिका निभावून नेली नाही; तर वेदान्त विचारांना त्यांनी एक नवे परिमाणही प्राप्त करुन दिले आहे.

सर्व वेदान्त दर्शने ‘प्रस्थानत्रयीं’वर आधारलेली आहेत हे आपण यापूर्वीच पाहिले आहे. यांपैकी ब्रह्मसूत्रे अथवा वेदान्तसूत्रांचा फार मोठा (थेट) प्रभाव विवेकानंदांवर असल्याचे दिसून येत नाही - अप्रत्यक्षरीत्या तो आहे यातही काही संशय नाही. पण उपनिषदे आणि भगवद्गीता या दोन प्रस्थांनावर विवेकानंदांचा वेदान्तविचार मुख्यत्वे आधारलेला आहे.

उपनिषदे

'शक्ती! शक्तीची उपासना!’, विवेकानंद म्हणतात, 'हाच सांगावा मला उपनिषदांच्या पानोपानी दिसतो. हा एकच संदेश मी आयुष्यभर शिकत आलो आहे; हे बंधो! दुर्बल बनू नको! शक्तीची उपासना कर!’ बलाची उपासना हाच विवेकानंदांचा जगाला संदेश आहे. दुर्बल शरीरात रोग ठाण मांडून बसतो याची आपल्याला आठवण करुन देऊन विवेकानंद म्हणतात की आपण निर्भय बनले पाहिजे. विवेकानंद म्हणतात, ' उपनिषदे म्हणजे सामर्थ्याचा, शक्तीचा अक्षय कोषच आहे. सर्व विश्व गदागदा हलवील असे सामर्थ्य उपनिषदांमध्ये भरलेले आहे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वातंत्र्य हे उपनिषदांचे प्राणसूत्र आहे.’

शक्तीइतकाच उपनिषदांचा “श्रद्धे”चा संदेश विवेकानंदांना महत्त्वाचा वाटतो. 'नचिकेताची श्रद्धा आपल्या सर्वांच्या मनात उदय पावो’ अशी त्यांची इच्छा आहे. 'शक्तिमान आणि श्रद्धावंताच्या पायाशी यश चालत येते’ असे ते पुन:पुन्हा सांगतात.

वेदांमधील कर्मकांडाला विवेकानंद फारसे महत्त्व देत नाहीत. ते म्हणतात, 'जेंव्हा बुद्धीला जीवनातल्या मोठया प्रश्नांचा आवाका येईनासा होतो, सर्व प्रतिभा, सर्व मन:शक्ती, विचारशक्ती यांचा -हास होतो आणि बुद्धी टीचभर वर्तुळात भ्रमत राहते तेव्हा बुद्धिमांद्य आले आहे असे खुशाल समजावे!’ कर्मकांडात गुंतून या देशाने स्वत:ची जी काही अवस्था करुन घेतली आहे त्याबददल स्वामीजींना अतिशय खेद वाटत असे. उपनिषदांच्या संदेशाकडे आपण परत फिरले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे.
उपनिषदांमध्ये परा आणि अपरा विद्यांचे विवेचन आहे. 'अध्यात्मविद्या हीच सर्वश्रेष्ठ विद्या आहे’ असे विवेकानंदांचे मत होते. 'अध्यात्मज्ञान ही एकच अशी वस्तू आहे की जी आमच्या दु:खकष्टांचा कायमचा अंत करण्यास समर्थ आहे. दुसरी कोणतीही विद्या किती झाले तरी फक्त काही काळासाठी आमची वाण दूर करु शकते’ असे  विवेकानंद जेंव्हा म्हणतात तेंव्हा ते अप्रत्यक्षरीत्या मोक्षमार्गाचेच दिग्दर्शन करीत असतात.

'नायमात्मा प्रवचनेन लभ्यो, न मेधया न बहुधा श्रुतेन’ असे कठोपनिषदात म्हटले आहे. विवेकानंदही माहिती आणि साक्षात्कार यातील फरक स्पष्ट करतात. पांडित्याचा गवगवा करणा-या जमान्यात 'ग्रंथांच्या मा-यांनी आध्यात्मिक शक्ती कधी साधत नसते’ असे रोखठोक मत विवेकानंद व्यक्त करतात. अन्यथा   ' सारी ग्रंथालयेच चालतेबोलते ऋषी ठरले असते’ असा शेराही ते मिस्कीलपणे मारतात!

'संहिता व ब्राह्राणांपेक्षा उपनिषदे श्रेष्ठ आहेत’ असा अभिप्राय स्वामीजी देतात. 'औपनिषदिक तत्त्वे आधी आचरणात आणली गेली आहेत आणि मग त्यांना तत्त्वज्ञानाचे रुप लाभले आहे’ अशी ग्वाहीही विवेकानंद देतात. 'सर्व तत्त्वज्ञांना प्रमाण म्हणून उपनिषदांचा आधार घ्यावाच लागला, नाहीतर त्यांच्या तत्त्वज्ञानाला कोणताच आधार राहिला नसता’ असे स्वामीजी म्हणतात तेंव्हा उपनिषदे हाच त्यांच्या तत्त्वज्ञानाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे असे ते आपल्याला सांगतात.

भगवद्गीता

युद्धभूमीवर, कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला 'तस्मादुत्तिष्ठ’ (म्हणून उभा रहा (आणि लढ)) हा संदेश विवेकानंदांसारख्या योद्धा संन्याशाच्या वृत्तीला साजेसा, अनुरूप असाच आहे यात काहीच शंका नाही. 'गीतेने कर्मकांड आणि ज्ञानकांड यांचा समन्वय साधला’ अशी तिची महती विवेकानंद सांगतात.

पाचही आचार्यांनी सांगितलेल्या मोक्षमार्गाची माहिती आपण यापूर्वी विस्ताराने घेतली आहे. भक्तीने मोक्ष मिळतो,  की ज्ञानाने मोक्ष मिळतो की कर्माने मोक्ष मिळू शकतो हा त्या आचार्यांच्या वादाचा एक महत्त्वाचा मुददा आहे. विवेकानंदांनी मात्र ज्ञान, कर्म, भक्ती आणि राजयोग या चारही मार्गांना समान महत्त्व दिले आहे. पारंपरिक वेदान्तात फक्त ज्ञान आणि भक्ती यांनाच महत्त्व आहे असे माझे मत आहे. मला वाटते की कर्मयोग आणि राजयोग यांना दिलेले महत्त्व विवेकानंदांवरील गीतेचा प्रभाव स्पष्ट करणारे आहे.

निष्काम कर्माची, कर्मयोगाची संकल्पना विवेकानंदांनी गीतेच्या शिकवणुकीतून घेतली असावी. गीता समजून घेण्यासाठी सुदृढ मन आणि सुदृढ शरीर हवे असे स्वामीजी आवर्जून सांगतात. श्रीकृष्णाच्या लोकसंग्रहाच्या कल्पनेचाही स्वामीजींवर प्रभाव पडला असावा असे म्हणता येते. कारण संन्याशांनी लोकसंग्रहाचे, लोकशिक्षणाचे काम हाती घ्यावे असा प्रयत्न विवेकानंदांनी पश्चिमेतून भारतात परत आल्यावर केला आहे.

वेदान्त परंपरा

वेदान्त दर्शनाच्या परंपरेपैकी शंकराचार्यांचा विवेकानंदांवरील प्रभाव सर्वात मोठा आहे असे दिसते. शंकराचार्यांची सगुण-निर्गुण  ब्रह्माची कल्पना विवेकानंद स्वीकारतात. मायावादही त्यात काही बदल करुन विवेकानंदांनी मान्य केला आहे. 'जीवो ब्रह्रौव नापर:’ हे तर विवेकानंदांच्याही वेदान्ताचे सूत्र आहे. केवळ ज्ञानानेच मोक्ष मिळतो हे शंकराचार्यांचे मत मात्र विवेकानंदांना अमान्य आहे.

रामानुजाचार्यांचा आणि मध्वाचार्यांचा भक्तीमार्ग मोक्षाचे साधन म्हणून विवेकानंद स्वीकारतात. पण निर्गुण-सगुण ब्रह्माबाबत वादविवाद करण्यात त्यांना फारसा रस नाही. ते ब्रह्माची दोन्हीही रुपे स्वीकारतात. जग सत्य आहे असे विवेकानंद मानतात. ईश्वर सर्वव्यापी आहे म्हणून मानवरुपी ईश्वराची सेवा करणे आपले कर्तव्य आहे असे विवेकानंद सांगतात. या संदेशाद्वारे 'तत्त्वमसि’ (ते तू आहेस) या महावाक्याची आणि भक्तीमार्गाची विलक्षण अलौकिक अशी सांगड विवेकानंद घालतात.
पुढे या प्रत्येक मुद्द्याचा विचार आपण एकेका स्वतंत्र भागात करणार आहोत.

गौतम बुद्ध

गौतम बुद्धाचाही विवेकानंदांच्या विचारसरणीवर फार मोठा प्रभाव आहे. गयेला - बोधगयेला विवेकानंदांनी भेट दिली होती आणि त्या भेटीच्या आठवणी त्यांच्या मनात नेहमी रेंगाळत होत्या. गौतम बुद्धाच्या ‘करुणे’ने विवेकानंदांना झपाटून टाकले होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बौद्ध विचारसरणीतील दहा ‘अव्याकृत प्रश्न’ प्रसिद्ध आहेत. 'या जीवनातले दु:ख दूर करणे सर्वात महत्त्वाचे आहे. उगीच तात्त्विक चर्चा करत बसण्यात काय हशील आहे?’ अशा आशयाचे गौतम बुद्धाचे विधान विवेकानंद नेहमी उदधृत करीत असत. बुद्धाचा उपदेश प्रामुख्याने नैतिक स्वरुपाचा होता. हाती तलवार न घेता, हृदयात शांतीचा मंत्र जपत बौद्ध धर्माने ज्या पद्धतीने जग पादाक्रांत केले त्याबददल स्वामीजींना नेहमीच अभिमान वाटत असे. बौद्धांच्या भिक्षु संघाबददलही विवेकानंदांना अपार प्रेम होते.

बौद्ध धर्मातील बोधिसत्त्वाची, सामूहिक मुक्तीची कल्पना विवेकानंदांच्या विचारांतही कधीकधी आपल्याला दिसून येते. 'जोवर या पृथ्वीतलावर एखादा कुत्राही उपाशी असेल तोवर पुन्हा पुन्हा जन्म घेऊन मी त्याची सेवा करेन’ असे एक विवेकानंदच म्हणू शकतात! 'ज्या नावेतून आपण नदी पार केली, ती नाव इतरांना वापरण्यास द्यावी’ (म्हणजे ज्ञानाचा प्रसार करावा) अशा अर्थाची बौद्ध संकल्पना स्वामीजींच्या आयुष्यातही आपल्याला दिसते. म्हणूनच कदाचित त्यांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मठ आणि मिशनचे ध्येयवाक्य 'आत्मनो मोक्षार्थं, जगदहितायच‘ असे आहे - फक्त ‘आत्मनो मोक्षार्थम्’ असे नाही! विवेकानंदांनी संन्यासी धर्माला सेवाव्रताची जी जोड दिली तीही बौद्ध मताचा परिणाम असावा असे आपल्याला म्हणता येते.

ब्राह्मो समाज

रामकृष्ण परमहंसांच्या सहवासात येण्यापूर्वी काही काळ आणि दक्षिणेश्वरला येणे जाणे सुरु झाल्यानंतरही नरेन्द्रनाथ ब्राह्मो समाजात जात असे हे सर्वज्ञात आहे. ब्राह्मो समाजाचे दोन गटांत विभाजन होऊन केशवचंद्र एका गटाचे नेते बनले. त्यानंतर १८८१ मध्ये केशवचंद्र गटात पुन्हा फूट पडून ‘साधारण ब्राह्मो समाज’ व ‘नवविधान ब्राह्मो समाज’ असे दोन गट निर्माण झाले.

Spencer Lavan त्यांच्या The Brahmo Samaj: India’s First Modern Movement of Religious Reform या लेखात ब्राह्मो समाजाच्या विचारसरणीची रुपरेखा देतात. इसवी सन १८४३ मध्ये देवेन्द्रनाथ ठाकूर यांनी ही रुपरेखा मांडली होती. ती थोडक्यात अशी सांगता येईल: १. ईश्वर सगुण आहे. २. ईश्वराने कधीही अवतार धारण केला नाही. ३. ईश्वर आपल्या प्रार्थना ऐकतो आणि त्याला उत्तरही देतो. ४. ईश्वराची पूजा फक्त आध्यात्मिक रीतीनेच केली पाहिजे. हिंदूंची संन्यासी परंपरा, मंदिरे आणि निशिचत पूजापद्धती पूर्णत: अनावश्यक आहेत. पण सर्व जाती आणि धर्म त्यांना हव्या त्या पद्धतीने ईश्वराची पूजा करु शकतात.  ५. पश्चाताप आणि पापकर्माचा त्याग हा ईश्वरी क्षमेचा आणि मुक्तीचा एकमेव मार्ग आहे. ६. निसर्ग आणि अंत:प्रेरणा यातूनच केवळ ईश्वराचे ज्ञान होऊ शकते. कोणत्याही पुस्तकाद्वारे ते होऊ शकत नाही.

विवेकानंदांच्या ब्रह्म संकल्पनेवर ब्राह्मो समाजाच्या विचारांचा पगडा होता असे दिसते. त्याचे विवेचन आपण पुढील भागात पाहणार आहोत.

रामकृष्ण

इतके सारे असूनही विवेकानंदांच्या विचारांवर श्रीरामकृष्ण परमहंसांच्या विचारांचा पगडा सर्वात जास्त होता हे तर त्रयस्थ वाचकही सांगू शकेल. रामकृष्ण लौकिक अर्थाने फारसे शिकलेले नव्हते - त्यांना काहीशी अक्षरओळख होती इतकेच म्हणता येईल. पंडितांच्या रुक्ष वादविवादांतही श्रीरामकृष्णांना अजिबात रस नव्हता. साक्षात्कार प्राप्त करुन घेणे हेच मानवी जीवनाचे ब्रीद असले पाहिजे असे त्यांचे मत होते. स्वत:ला योग्य वाटेल त्या मार्गाने साक्षात्कार साधला पाहिजे असेच विवेकानंदही आपल्याला वारंवार सांगत असतात.

एकदा साक्षात्कार होऊन श्रीरामकृष्ण त्याच ठिकाणी थांबले नाहीत, तर त्यांनी अनेकविध साधना केल्या. प्रत्येक मार्गाच्या शेवटी, सा-यांचे पोहोचण्याचे, मुक्कामाचे ठिकाण एकच आहे हे त्यांनी त्यांच्या स्वत:च्या अनुभवातून पुन्हा एकदा जगासमोर मांडले.

मूर्तिपूजेसंबंधीचे विवेकानंदांचे मत श्रीरामकृष्णांच्या साक्षात अनुभूतीवर आधारलेले आहे. प्रतिकांची माणसाला गरज असते हे एक. आणि दुसरे म्हणजे जर मूर्तिपूजेतून श्रीरामकृष्ण निर्माण होत असतील, आपल्याला लाभत असतील तर आपण का म्हणून प्रतिकांच्या पूजेचा निषेध करावा? – असा विचार विवेकानंद मांडतात.

श्रीरामकृष्णांना साधनेतील कर्मकांड, गुंतागुंत आवडत नसे. विवेकानंदांनीही पुढे साधनेतील साधेपणाचाच पुरस्कार केला आहे. श्रीरामकृष्णांनी कधीही कोणत्याही संकुचित धर्माचा पुरस्कार केला नाही. विवेकानंदांच्या स्वभावात आणि प्रतिपादनात आपल्याला हीच उदारता दिसते.  ‘ईश्वर साकारही आहे आणि निराकारही आहे, जो ज्या स्वरुपाची उपासना करतो त्याला त्या स्वरुपात ईश्वर प्राप्त होतो’ असे श्रीरामकृष्णांचे मत होते. त्यांचे हे शब्द म्हणजे निव्वळ शब्द नव्हते तर तो त्यांचा अनुभव होता.

श्रीरामकृष्ण पुरुष आणि प्रकृतीत भेद मानीत नसत. त्यांच्या दृष्टीने ती एकाच चैतन्याची दोन रूपे. ‘निरनिराळी वेदान्तदर्शने एकमेकांच्या विरोधी नसून एकमेकांना पूरक आहेत; एकाच शिडीच्या त्या निरनिराळया पाय-या आहेत’ असे श्रीरामकृष्णांचे मत होते. विवेकानंदांच्या कथनातही आपल्याला हाच संवादी सूर सर्वत्र आढळतो. प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य मार्ग कोणता हे त्या व्यक्तीच्या स्वभावानुसार आणि गरजेनुसार ठरते असे विवेकानंद मानतात. मार्ग हे उदिदष्ट नसून केवळ साधन आहे. म्हणूनच त्यांच्या मते मार्गांमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असा काहीही भेद नाही. दुस-याची नक्कल करुन आपले काहीही भले होत नाही;  आपण आपल्या स्वधर्माचे पालन विनातक्रार करावे असाही सल्ला विवेकानंद आपल्याला देतात तो याच भूमिकेतून!

विवेकानंदांच्या मते सत्याचे विभाजन करता येत नाही म्हणून प्रत्येकच धर्ममार्ग पूर्णत: सत्य ठरतो. चूक धर्माची नाही, चूक असेलच तर ती धर्म वापरणारांची आहे असे त्यांचे मत आहे.

'अरे, जीवावर दया करणारे तुम्ही कोण? शिवभावाने जीवाची सेवा करा’ या श्रीरामकृष्णांच्या वचनाने तर विवेकानंदांच्या जीवनात फार मोठे परिवर्तन घडवून आणले. 'मानवसेवा हीच माधवसेवा’ असे विवेकानंद आपल्याला गर्जून सांगतात ते याच भावनेच्या आधारावर! मूर्खनारायण, दरिद्रीनारायण, अज्ञानीनारायण अशी विवेकानंदांची नारायणाची सारी रुपे श्रीरामकृष्णांच्या वरील वचनातून उगम पावलेली आहेत यात काहीच संशय नाही.

निर्विकल्प समाधीच्या अनुभवातच राहण्याची इच्छा नरेन्द्राने व्यक्त केल्यावर श्रीरामकृष्ण त्याला रागावतात आणि 'आईचे काम करण्याची’ आज्ञा देतात. हेच विवेकानंद पुढे गुरुबंधुंच्या टीकेला तोंड देताना म्हणतात, 'बाबांनो, तुमची मुक्ती-बिक्ती सगळं मायेच्या राज्यातल बरं का!’ -  तेंव्हा वेदान्ताचा एक नवा व्यावहारिक अर्थ झळाळून निघतो!

श्रीरामकृष्णांच्या वेदान्तात गृहस्थांचा तिरस्कार नव्हता. विवेकानंदांनीही स्त्रियांपासून, गृहस्थांपासून, तथाकथित अध:पतित वर्गातील लोकांपासून कधीही पळ काढला नाही. त्यांच्या लेखी ‘सारे पतित जीव म्हणजे त्याचीच वाट चुकलेली रुपे आहेत’. ईश्वरसाक्षात्कारासाठी संसाराचा त्याग करणे आवश्यकच असते अशातला भाग नाही अशी विवेकानंदांची धारणा होती.

विज्ञानाच्या तार्किक पद्धतीचे अनके फायदे आहेत तशाच त्याच्या काही अंगभूत मर्यादा आहेत आणि सत्य त्यामुळे दरवेळी विज्ञानाच्या आवाक्यात येईलच असे नाही. (खरं तर विज्ञान ‘सत्य शोधल्याचा’ दावाही कधी करत नाही.) श्रीरामकृष्णांनी तर्काच्या मर्यादेपलिकडचा मार्ग बुद्धिवादी नरेन्द्रला दाखविला. श्रीरामकृष्णांच्या सान्निध्याने नरेन्द्राचे सारे जीवन उजळून निघाले. त्याच प्रकाशात विवेकानंदांनी आपल्यासारख्या कोटयवधी लोकांना जगण्याचा मार्ग दाखविला आहे. विवेकानंदांनी हे जे देणे आपल्याला दिले त्यातील सिंहाचा वाटा श्रीरामकृष्णांचा आहे. त्यांचे हे ऋण विवेकानंदांनीही मान्य केले आहे, अतिशय कृतज्ञतेने मान्य केले आहे! 

क्रमश: