ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, December 12, 2014

२१५.भीतीच्या भिंती: भाग २: जिवंत असण्याचा पुरावा

 (नोंद: काबूलमधील वास्तव्यावर आधारित लेखमालिका. संबंधित व्यक्तींची सुरक्षितता धोक्यात येऊ नये या हेतूने नावं बदलली आहेत. फार फोटोही देता येणार नाहीत. माझं तिथलं अनुभवविश्व मर्यादित आहे याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.)
भाग १

‘काबूलला जायचं’ असं ठरल्यावर सगळ्यात आधी खरेदी केली ती दोन पुस्तकांची. एक श्रीमती प्रतिभा रानडे यांचं ‘अफगाण डायरी’ (पूर्वी वाचलं होतं आणि आवडल्यामुळे लक्षात होतं) आणि दुसरं श्री. निळू दामले यांचं ‘अवघड अफगाणिस्तान’. दोन्ही पुस्तकं वाचल्यावर आपण काबूलला चाललोय म्हणजे रम्यनगरीत नाही जात आहोत याची पुनश्च प्रकर्षाने जाणीव झाली होती. या पुस्तकांचा परिणाम म्हणून की काय पण मी एक भली मोठी प्रश्नावली माझ्या ऑफिसला पाठवून दिली होती. राहण्याची व्यवस्था काय; सुरक्षितता कशी असते; रोज ऑफिसला जायला वाहनाची व्यवस्था असणार का; इंटरनेट उपलब्ध आहे का; सेलफोन चालतात का; संवादाची भाषा काय; ड्रेस कोड काही आहे का; सर्वसाधारणपणे अफगाण लोक भारतीयांना स्वीकारतात का; – असे असंख्य प्रश्न मी विचारले होते. ‘तुमच्यापैकी कुणाला तालिबानी हल्ल्याचा दुर्दैवी अनुभव आला आहे का’ असा एक आगाऊ प्रश्नही मी विचारला होता.  

इथं आल्या आल्या लगेच मला एका बंदूकधारी सैनिकाच्या दहशतीची झलक मिळाली आणि त्यात भर पडली जॉर्जसोबत घालवलेल्या तासाभराची. जॉर्ज माझ्या ऑफिसचा मुख्य सुरक्षा अधिकारी. हा निवृत्त सैनिक; युरोपियन देशातला. मी गाडीत बसताक्षणी.  त्याने अगदी शांतपणे मला एकेक सूचना द्यायला सुरुवात केली. 

पहिल्यांदा हातात दिला तो सेलफोन. त्यात आवश्यक ते सगळे नंबर आधीच घालून ठेवले होते. त्यात पुरेसे पैसे होते फोन करायला.

दुसरी वस्तू आली हातात ती थोडी अपेक्षित होती – पण काळजी वाढवणारी होती. 


हा आहे Very High Frequency Radio. मराठीत "वॉकी-टॉकी"! त्याच्या सोबत एक जादा बॅटरी. एक बॅटरी नेहमी चार्जड असायला हवी पूर्णपणे. अनेकदा सेलफोनला रेंज नसते, अशा वेळी संपर्कासाठी हा फोन हमखास उपयोगी पडतो म्हणे. तो कसा वापरायचा याचं प्रशिक्षण मला उद्या दिल जाईल असंही जॉर्ज म्हणाला. ती बॅटरी जड वाटली मला आणि तसं मी बोलूनही दाखवलं. त्यावर ‘ही कायम सोबत घेऊन हिंडायचं’ असा आदेश देऊन  जॉर्जने  माझ्या हाती आणखी एक चीज सोपवली. 

ते होतं बुलेटप्रुफ जाकीट. अत्यंत जड. एका हाताने मला ते पेलता येत नव्हतं. ‘हे जाकीट सदैव, अगदी चोवीस तास हाताशी ठेवायचं’ जॉर्जचा आणखी एक हुकूम. गोळीबार झाला तर या जाकिटामुळे जीव वाचण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ऑफिसात, घरात, प्रवासात सदैव हे जाकीट जवळ पाहिजे. माझा चेहरा पाहून जॉर्ज म्हणाला, “ मी तुला ऑफिसात वापरायला (!)वेगळं जाकीट देतो, पण मीटिंगसाठी इकडून तिकडे जाताना ते तू घेऊन जायचं.” मी फक्त मान डोलावली, काय करणार दुसरं?  त्यानंतर त्याने आणखी एक गोष्ट मला दिली – हेल्मेट.

”झालं? की अजून काही?” मी किंचित धास्तावत विचारलं.

”पासपोर्ट, युएनचं ओळखपत्र आणि एक आंतरराष्ट्रीय तिकीट स्वत: काढता येईल एवढे डॉलर्स सतत जवळ बाळगायचे. तिकिटाचे पैसे यासाठी की कधी आम्ही कुणी सोबत नसू आणि तुला देशाबाहेर पडायला लागलं तर असावेत पैसे जवळ. लक्षात ठेव, कोणत्याही क्षणी बॉम्बहल्ला होऊ शकतो, अशा वेळी किमान या तीन गोष्टी सोबत घेऊनच पळ काढायचा. म्हणून या गोष्टी सतत हाताशी हव्यात. जेवायला तर चाललेय असं म्हणत ऑफिसात पासपोर्ट ठेवून बाहेर पडायचं नाही. आणि हो, अत्यावश्यक वस्तूंनी (कपडे, औषधं वगैरे) भरलेली एक छोटी प्रवासी बॅग सतत जवळ बाळगायची, रोज ऑफिसात पण घेऊन यायची ती ” असं म्हणून त्याने मला त्याची बॅग दाखवली. हा गृहस्थ त्यावेळी फक्त मला घ्यायला विमानतळावर आला होता आणि मला राहण्याच्या जागी सोडून त्याच्या घरी परत जाणार होता. एक ते दीड तासाचा काय तो प्रश्न. पण नाही, शिस्त म्हणजे शिस्त.

“ही कशासाठी?” मी गोधळले होते. 
   
“परिस्थिती अचानक गंभीर होऊ शकते कधीही, तुला सामान आणायला तुझ्या राहत्या जागेत परत जाता येईलच असं नाही. काही वेळा इवॅक्युएशन (स्टाफला देशाबाहेर हलवणं) तातडीने करायला लागतं. तुम्ही जिथं असाल तिथून तुम्हाला उचललं जाईल – म्हणून ही बॅग सोबत ठेवायची.”

जॉर्ज अतिशय शांतपणे मला हे सगळं सांगत होता.   

बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला यांचा इशारा मिळाला की त्या क्षणी हे जाकीट चढवायचं, हेल्मेट घालायचं, व्हीएचएफ, सेलफोन आणि कागदपत्र घ्यायची सोबत आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यायचा; हे सगळं करायला वेळ मिळणार तो जास्तीत जास्त तीन मिनिटांचा! ‘आपण युद्धभूमीवर आलो आहोत’ याची एव्हाना मला खात्री पटली होती. 

मग त्याने माझ्या हातात काही कागद सोपवले. सुरक्षाविषयक अनेक सूचना होत्या त्यात – ‘ते सावकाश वाच रात्री, मग उद्या बोलू त्यावर’ असं तो म्हणाला.   

मी जरा हुश्श करून खिडकीतून इकडेतिकडे पाहायला लागले. “ते हिरवं कापड पाहिलंस?” एका इमारतीकडे बोट दाखवून त्याने विचारलं. असं कापड बांधकाम अथवा दुरुस्ती चालू असलेल्या इमारतीभोवती नेहमी दिसतं.  “त्याला छिद्र दिसताहेत ना, ती बंदुकीच्या मा-याने पडलेली आहेत.” जॉर्ज एकामागून एक धक्के देत होता मला. 

कसलीही पाटी नसलेल्या एका पोलादी दरवाजासमोर आमची गाडी थांबली. मग गाडीची शिस्तशीर तपासणी झाली; ओळखपत्रं पाहिली गेली. माझ्याकडे ओळखपत्र नव्हतं, पण माझ्या नावाचं ऑफिसने दिलेलं पत्र जॉर्ज सोबत घेऊन आला होता. मग तसाच दुसरा दरवाजा, पुन्हा सगळी तपासणी. रिसेप्शनवर नोंद केली. मी खोलीत गेले. ‘उद्या सकाळी आठ वाजता तुला घ्यायला गाडी येईल, तयार रहा’ असं सांगून जॉर्ज निघून गेला. 
        
हॉटेल ठीकठाक आहे. मुख्य म्हणजे स्वच्छ आहे. बाहेरचं दृश्य तर एकदम मस्त आहे.



आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वायफाय कनेक्शन आहे. त्यामुळे संपर्क ठेवणं सोपं जाईल. खोलीत टीव्ही आहे – एरवी मी तो फारसा पाहत नाही (माझ्या घरी टीव्ही नाही) – पण आता इथं बातम्या पाहाव्यात आणि जमल्यास काही चित्रपटही. हॉटेलचा माणूस वायफायचा  पासवर्ड द्यायला आला होता   - एकदम म्हणाला 'बारिश..' त्यावेळी बाहेर पाऊस पडायला लागला होता. दुस-या एकाकडून पाण्याच्या बाटलीचं झाकण उघडून घ्यायला मला हातवारे करावे लागले - भाषा उपयोगी नाहीच पडली. आता ‘दरी’ शिकायला हवी. 

मी सहज खोलीच्या बाहेर नजर टाकली आणि मला हे दृश्य दिसलं. 


माझ्या समोर दहा फूट अंतरावर संरक्षणाची ही अशी जय्यत तयारी. २४ x ७.

जाताना जॉर्ज मला गृहपाठ देऊन गेला होता. त्या गृहपाठातला एक भाग होता ‘प्रुफ ऑफ लाईफ क्वेश्चन्स’. युद्धक्षेत्रात, संवेदनशील क्षेत्रांत काम करणा-या लोकांसाठी हे प्रश्न वापरले जातात. त्यामागची कल्पना अशी आहे:

समजा ‘क्ष’ या व्यक्तीचं  अपहरण झालं आणि अपहरणकर्ते खंडणी मागताहेत. अशा वेळी तुमच्या ऑफिसला दोन गोष्टींची खात्री करून घ्यायची असते. एक म्हणजे अपहरण ‘क्ष’ या व्यक्तीचंच झालं आहे – अपहरणकर्ते खोटं सांगून, दुस-याच कोणा व्यक्तीला ताब्यात घेऊन ‘क्ष’चं  नाव सांगत  नाहीत ना याची खातरजमा करणे. आणि दुसरं म्हणजे ‘क्ष’ जिवंत आहे, त्याची/तिची हत्त्या झालेली नाही याचीही खात्री करणे. टेलिफोन संवादावरून आवाजाची खात्री करता येईल असं नाही. व्हिडीओ क्लिप्सवर विश्वास ठेवता येत नाही; कारण व्हिडीओ आधीच कधीतरी चित्रित केला असेल आणि त्यानंतर ‘क्ष’ची हत्त्या झाली नसेल असं खात्रीपूर्वक सांगता येत नाही. मग खात्री कशी करणार? तर या ‘प्रुफ ऑफ लाईफ’ प्रश्नांवरून!

“प्रुफ ऑफ लाईफ” प्रश्न फक्त लिहून देणा-या व्यक्तीलाच माहिती असतात, थोडक्यात तुमचा पासवर्ड व्हेरीफिकेशन म्हणा ना! हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं त्याने/तिने ते दुस-या कुणाला सांगू नयेत अशी अपेक्षा असते, कारण या माहितीचा कोण कधी दुरुपयोग करेल याचा भरवसा नसतो. हे प्रश्न आणि त्यांची उत्तरे साधारण सार्वजनिक जीवनात माहिती असलेल्या गोष्टींबाबत असू नयेत असं मार्गदर्शक तत्त्व सांगते. म्हणजे उदाहरणार्थ मी प्रश्न लिहिताना “मी काबूलला कोणत्या वर्षी आले?” किंवा “मी कोणत्या वर्षी पहिली नोकरी स्वीकारली?” किंवा “माझं घर कोणत्या शहरात आहे?”, “माझ्या मुलाचे नाव काय आहे?”  असले प्रश्न लिहायचे नसतात कारण या घटना किंवा परिस्थिती इतर अनेकांना माहिती असू शकते. ही माहिती इतर माध्यमांतून काढता येते. अपहरण ज्या व्यक्तीचे होते, तिचा पुरेपूर अभ्यास अपहरणकर्त्यांनी केलेला असतो हे वारंवार दिसून आले आहे. 

हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं शक्यतो आनंददायक घटनांची असावीत. कारण प्रत्यक्ष जेव्हा अपहरण होते तेव्हा अपहृत व्यक्ती आधीच प्रचंड तणावाखाली असते. अशा वेळी दु:खद प्रसंगाच्या आठवणी शक्यतो काढू नयेत, येऊ नयेत; त्यामुळे मृत्यू, अपघात, नोकरी सुटणे, घटस्फोट अशा मुद्द्यांचा उल्लेख या प्रश्नावलीत करायचा नसतो. प्रतिकूल परिस्थितीत ज्या आठवणी आशा जागी ठेवतील, आनंद देतील, चेह-यावर हसू आणतील, उमेद जागवतील असेच प्रश्न द्यावेत अशी अपेक्षा असते; आणि ज्या परिस्थितीत ही प्रश्नोत्तरं होतील तिचा विचार करता हा सल्ला योग्यच म्हणावा लागेल. 

हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं लिहून देताना मला बराच विचार करावा लागला. एक म्हणजे आपल्या आयुष्यातले अनेक महत्त्वाचे टप्पे सार्वजनिक असतात; ते अनेकांना माहिती असतात. 

दुसरी गोष्ट म्हणजे सांस्कृतिक संदर्भ. म्हणजे उदाहरणार्थ मी “आवडता संगीतकार”  असा प्रश्न आणि त्याचं उत्तर सहजतेने देऊ शकते. पण आनंद मोडक, श्रीधर फडके, ओ पी नय्यर, सचिनदा (बर्मन) अशी काही नावं मी लिहिली; तर माझ्या युरोपियन किंवा अमेरिकन किंवा ब्रिटीश सुरक्षा अधिका-याला (जे अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी करतील) ही नावं बरोबर कळतील का? त्यामुळे केवळ माझा सांस्कृतिक संदर्भ लक्षात न घेता समोरच्या माणसात आणि माझ्यात कोणते समान धागे आहेत त्याचा विचार मला करायला लागला. बिकट परिस्थितीत, इथले लोक माझे उच्चार समजू शकतील का, आणि मी त्यांचे उच्चार समजू शकेन का – असा प्रश्न मनात आला. आपल्याकडच्या जागांची नावं, आपल्या लोकांची नावं, आपले सांस्कृतिक संदर्भ आपल्याला जितके सहज वाटतात तितके इतरांना वाटणार नाहीत हे लक्षात घेऊन काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं बदलावी लागली. 

तिसरं म्हणजे अगदी प्रतिकूल परिस्थितीत; जगण्या-मरण्याच्या सीमारेषेवर आपल्याला खरंच काय आठवेल याचाही विचार करावा लागला. ज्या गोष्टी आत्ता महत्त्वाच्या वाटतात त्या नेहमी तितक्याच महत्त्वाच्या रहात नाहीत हे लक्षात ठेवून ‘खरोखरचं आनंदाचे क्षण’ लिहावे लागले. तसे खूप क्षण आपल्या आयुष्यात आहेत हे कळून बरं वाटलं. उच्चांरांमध्ये गडबड होऊ नये, उत्तर चुकीचं दिलं असं वाटू नये म्हणून मी सगळं कॅपिटल अक्षरांमध्ये लिहिलं.

दुस-या दिवशी पहाटे पाचच्या सुमारास जाग आली ती पक्षांच्या किलबिलाटाने. इतक्या विध्वंसातही हा ऐकू येतो आहे याचा त्या क्षणी फार दिलासा वाटला. आणि उत्साहाने मी उठले. 

ऑफिसात पोचल्यावर मी लिहून दिलेला कागद न पाहताच जॉर्जने सीलबंद केला आणि त्याच्या कपाटात ठेवून दिला. मग हसून मला म्हणाला, “ही आपत्कालीन परिस्थितीसाठीची एक व्यवस्था आहे. आजवर मला एकदाही अशा कागदाचा उपयोग करावा लागला नाही अफगाणिस्तानमध्ये. त्यामुळे काळजी करू नकोस उगाच, मात्र काळजी घे! ” 

जॉर्जच्या स्वरांतली भावना ओळखून मी हसले. अखेर आपल्या जिवंत असण्याचा पुरावा फक्त कागदांवर थोडाच असतो? तो तर जगण्यात असतो. आता इथं जे काही असेल ते उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या मनाने पाहून घेतलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे असं म्हणत मी पुढच्या कामाला लागले.


क्रमश:

Friday, December 5, 2014

२१४. भीतीच्या भिंती: १

(नोंद: काबूलमधील वास्तव्यावर आधारित लेखमालिका. सुरक्षेच्या कारणांमुळे नावं बदलली आहेत. फार फोटोही देता येणार नाहीत.)

१. एक तास जास्तीचा 

“विमानतळातून बाहेर पडलं की डाव्या बाजूला वळायचं, पाच मिनिटं चाललं की ‘पार्किंग बी’ अशी पाटी दिसेल, मी तिथं उभा असेन तू पोचशील तेव्हा” असं जॉर्जने मला लिहीलं होतं. आत्तापर्यंतचे सोपस्कार त्याने सांगितल्यानुसार पार पडले होते – आधी दोन फोटो देऊन आणि पासपोर्ट दाखवून नोंदणी करण्याचा सोपस्कार अपेक्षेपेक्षा फार सहजतेने पार पडला होता. माझा पासपोर्ट पाहून त्या दोनपैकी एका युवकाने “इंडिया?” असं विचारलं होतं. बहुधा ‘एअर इंडिया’च्या विमानाने मी आल्यामुळे हा प्रश्न ‘प्रश्न’ नव्हताच खरं तर!  मी होकारार्थी मान हलवताच त्यानं माझ्याशी थेट हिंदीत बोलायला सुरुवात केली होती. त्यामुळे बसलेल्या आश्चर्याच्या धक्क्यातून मी सावरत होते; तोवर माझं सामान अचूक ओळखून सरकत्या बेल्टवरून ते माझ्या ताब्यात दुस-याने दिलं होतं. याला आपलं सामान कसं काय ओळखू आलं – हाही प्रश्न मनात होता माझ्या. कस्टमच्या अधिका-याने माझ्याकडे न पाहताच पासपोर्टवर शिक्का मारून दिला होता. आणि मी बाहेर आले होते. 

मी डावीकडे वळणार तितक्यात एक बंदूकधारी सैनिक समोर दिसला. त्याने समोरच्या बसमध्ये चढण्याची मला खूण केली. पण मला बसने जायचं नव्हतंच! पाच मिनिटं चालत जायला बस कशाला हवी? मी त्याला शांतपणे “पार्किंग बी” असं सांगितलं. त्यावर ठसक्यात “बस” असं तो म्हणाला. ते म्हणताना त्याची नजर इतकी शांत होती की मी घाबरले. मी आणखी काही बोलायच्या आधी तो पुन्हा म्हणाला, “नो डिस्कशन”. आमचा हा प्रेमळ संवाद ऐकत असणारा बसचा चालक समोर आला आणि मला म्हणाला, “चलिये,” आणि मी काही म्हणायच्या आत त्याने माझं सामान बसमध्ये चढवलं देखील. मलाही त्या बसमध्ये चढण्याविना पर्याय नव्हता. 

ही बस नेमकी कुठं घेऊन जाणार मला या विचारात मी पडले.
मग मी चालकाला विचारलं “मुझे तो ‘पार्किंग बी’ जाना था, क्यों नही जाने दिया?”
तो म्हणाला, ”व्हीआयपी है कोई आज! आप चिंता मत करो, मै आपको पार्किंग बी छोड दूंगा”. 

दिल्लीत काही काळ राहून “व्हीआयपी” ही काय चीज आहे हे मला माहिती होतं. मी विचार करायचं सोडून दिलं. 

पाचेक मिनिटांत ईप्सित स्थळी आमची बस पोचली होती. चालकाने सामान काढून दिलं. दुसरा कोणीतरी समोर आला – त्याला सांगितलं, “पार्किंग बी छोड दो इन्हे.” त्याने ट्रॉलीवर माझं सामान तोवर उतरवून घेतलं होतंच. 

“पैसा,” चालक म्हणाला.
बक्षीसी मागतोय तो, हे मला कळलं.
माझ्याकडे डॉलर्स नव्हते. दिल्ली विमानतळावर गडबडीत रुपयांचे डॉलर्स करून घ्यायचे राहिलेच होते. “डॉलर्स नही है मेरे पास” मी स्पष्टीकरण दिलं. हो, उगाच अपेक्षाभंग नको त्याचा व्हायला. 

“इंडियन रुपी चलेगा, चलता है वो यहाँ ”, तो शांतपणे म्हणाला. 
एक नोट त्याच्या हातात ठेवून मी निघाले. खरं तर पैसे देण्याइतकं काही काम त्याने केलं नव्हतं. पण परक्या देशात कंजूसपणा करून मित्रांचे शत्रू करण्याचं मी टाळायला हवं – निदान जॉर्ज भेटेपर्यंत तरी – हे मला कळत होतं. 

‘पार्किंग बी’ मध्ये सामसूम होती. जॉर्ज ‘वाटेल’ असा कुणी माणूस दिसत नव्हता. किंबहुना कुणी माणसं नव्हतीच. दुपारची तीनची वेळ होती – तरी एक क्षण मला भीती वाटली. अनोळखी प्रदेश; दहशतवाद्यांचा प्रदेश; युद्धाचा प्रदेश. “तिथं जायचं काही अडलंय का? एवढा अटटहास का? दुसरी ठिकाणं नाहीत का जगात जायला तुला?” या तिरकस प्रश्नाचा सामना करण्यात मागचे दोन तीन महिने गेले होते माझे.  “या प्रश्नाला काहीही अर्थ नाही कारण सगळं जग आता दहशतवादाचा सामना करतंय” असा माझा त्यावरचा युक्तिवाद एक क्षणभर का होईन डळमळीत झाला. 

पण आपल्या प्रतिक्रिया फार “क्षणिक” असतात, त्या बदलतात हे मला माहिती होतं आजवरच्या अनुभवाने. इथं काम करायला येण्याचा माझा निर्णय भावनिक नव्हता, पर्याय नसण्याच्या अगतिकतेतून नव्हता किंवा कसल्या उद्वेगातूनही नव्हता. ‘एक नवं जग पाहण्याची संधी’ म्हणून मी इथं आले होते. मग या जगाचे ताणेबाणे समजून न घेताच निष्कर्ष काढण्याची घाई कशाला करत होते मी ? मी स्वत:शीच हसले. 

तेवढ्यात मला माझ्या ऑफिसची गाडी दिसली. पण त्या गाडीत कुणीच नव्हतं. पण गाडीच्या मागच्या बाजूला एक माणूस फोनवर बोलताना दिसला. मी त्याला “जॉर्ज?” असं विचारल्यावर गडबडीने त्याने तो फोन बंद केला, दुस-या कुणाला तरी फोन केला, आणि सामान गाडीच्या मागच्या भागात ठेवायला सुरुवात केली. जॉर्ज मला शोधत तिकडे प्रवेशद्वाराशी उभा असणार. म्हणजे हा गाडीचा चालक होता तर! 

ट्रॉलीवर माझं  सामान आणणारा माणूस माझ्याकडे अपेक्षेने पहात होता. त्याच्या हाती पुन्हा एकदा काही पैसे देऊन मी सुटकेचा निश्वास टाकला. 

डोळे मिटले तर नुकताच पाहिलेला बर्फाच्छादित शिखरांचा हिंदुकुश दिसला. अखेर मी इथे पोचले आहे तर! आता हे माझं गाव असणार आहे आणि इथले रस्ते माझे होऊन जाणार आहेत – काही काळ तरी. 

कारण हे आहे काबूल!
**
काबूल!
चार महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानची राजधानी इतकीच मला त्याची ओळख होती.

एक दिवस उगाच ‘काबूलमध्ये अमुक एक काम आहे’ अशी जाहिरात वाचली. अर्ज ऑनलाईन करायचा होता तो केला आणि गंमतीचा अनुभव घेऊन हसत ती विसरून गेले. पुढे यथावकाश मुलाखतीचं आमंत्रण आलं. या आंतरराष्ट्रीय मुलाखतींचं  एक चांगलं असतं. आपल्याकडे किती माहिती आहे यापेक्षा आपलं ज्ञान काय आहे आणि मुख्य म्हणजे दृष्टिकोन काय आहे हे तपासतात ते. त्यामुळे मुलाखत देणं हा दडपणाचा मुद्दा न ठरता आत्मपरीक्षणाची संधी ठरते. मजा आली मला ती मुलाखत देताना. मुलाखत झाल्यावर लोक ‘आपली निवड होणार का नाही’ याचा आडाखा कसा बांधतात याबद्दल मला कुतूहल वाटतं – कारण आपण इतर उमदेवार पाहिलेले नसतात. मी आपली पुढच्या कामांना लागले. 

दोन-तीन आठवडे निवांत गेले. गडबड सुरु झाली ती ‘तुमची निवड झाली आहे’ हे पत्र आल्यावर. एखादी संधी आपल्यासमोर आली तर त्याला काहीतरी अर्थ असतो – त्यामुळे ती विनाकारण नाकारू नये हे माझं मत. शिवाय संस्था युनायटेड नेशन्सच्या संस्थांपैकी एक. त्याच संस्थेच्या दिल्ली ऑफिसबरोबर मी अडीच वर्ष काम करत होते – त्यामुळे संस्थेची विश्वासार्हता हा प्रश्न नव्हता. “सौदीत पासपोर्ट कंपनीला द्यावा लागतो” या बातमीचा बराच पगडा आपल्या लोकांच्या मनावर आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी मी “युएनमध्ये असं काही नसतं; माझा पासपोर्ट माझ्याकडेच राहील; मला पाहिजे तेव्हा मी परत येऊ शकते” म्हणत होते. हे वाक्य मी पुढच्या दोन महिन्यांत किमान शंभर वेळा उच्चारणार आहे याचा मला अंदाज आलाच. 

‘ही संधी घ्यावी असं वाटतंय’ हे कळल्यावर मी जरा गंभीरपणे माहिती काढायला सुरुवात केली. इंटरनेटवरच्या सगळ्या बातम्या भयावह होत्या – एकही सकारात्मक बातमी नाही. तालिबानी हल्ले, बॉम्बस्फोट, अपहरण आणि मृतांची संख्या. त्यात भर पडली ती अमेरिका २०१४ पर्यंत अफगाणमधून सैन्य माघारी घेणार आणि एप्रिल २०१४ मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणूक असणार या बातम्यांची. २०१४ नंतर देश पुन्हा तालिबानच्या ताब्यात जाणार की काय, अंतर्गत यादवी होणार की काय... अशाच बातम्या.

मग मी एक काम केलं. प्रत्यक्ष काबूलमध्ये कामासाठी एक वर्ष राहून आलेल्या दोन तीन लोकांशी बोलायचं ठरवलं. पत्रकार निळू दामले यांचा नंबर मिळाला, त्यांच्याशी बोलले. “बिनधास्त जा” असं त्यांनी सांगितलं तरी मी काही पत्रकार नाही; त्यामुळे त्यांचा सल्ला जसाच्या तसा स्वीकारण्यात अर्थ नव्हता. शिवाय ‘स्त्रियांसाठी कितपत धोकादायक आहे तिथं’ हे एखादी स्त्रीच जास्त चांगलं सांगू शकेल. म्हणून मग इंडियन इकॉनॉमिक सर्विसच्या अधिकारी मंजुळा यांच्याशी बोलले. त्या २००८ मध्ये एक वर्ष तिथं काम करत होत्या. त्यांनीही “चांगला अनुभव आहे, तुला खूप काही नवं पहायला मिळेल, शिकायला मिळेल” असं प्रोत्साहन दिलं. सध्या अमेरिकेत असलेल्या रेणू यांच्याशी स्काईपवर बोलणं झालं तेव्हा काबूलमधल्या राहायच्या व्यवस्था कोणत्या आहेत, त्यापैकी मी कोणत्या व्यवस्थेचा आग्रह धरावा याबद्दल त्यांनी आवर्जून सांगितलं. सुचिथ या श्रीलंकेच्या गृहस्थांशी एकीने जोड घालून दिली होती; तोही तासभर माझ्याशी बोलला. यातल्या कुणाशीच माझी काहीही ओळख नव्हती – पण ज्या आपुलकीने त्यांनी माझ्या प्रश्नांना न कंटाळता उत्तरं दिली, त्यातून माझ्या लक्षात आलं की काबूलला मी जाण्यापूर्वीच त्या धाग्याने ते माझ्या मदतीस तयार होते. यातला ‘सुचिथ’ तर प्रत्यक्ष काबूलमध्ये होता आणि मी ज्या संस्थेत जाणार तिथं काम करत होता. त्याची पुढे मला खूप मदत झाली. 

पण दरम्यान मी माझ्या मनातले सगळे प्रश्न – विशेषत: सुरक्षेविषयीचे प्रश्न – लिहून पाठवले; आणि संस्थेच्या लोकांकडून त्याचं सविस्तर उत्तरही आलं. कामाबाबत मला काळजी नव्हती, ते आव्हानात्मक असेल तितकं चांगलंच असतं. माझ्या मनाची पूर्ण तयारी झाली होती. मग ‘नको जाऊ’ असा आग्रह धरणा-या जवळच्या लोकांचं मतपरिवर्तन करण्याचं कामही पार पडलं. 

मग विसा मिळण्यात ज्या यायच्या त्या अडचणी आल्या. अफगाणमध्ये नोकरीसाठी यायचं तर इथल्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक क्रमांक आपल्या देशातील अफगाण दुतावासाला कळवला जातो. तिकीट ऑफिस काढणार असल्याने विसा मिळाला नाही म्हणून प्रवास पुढे ढकलला गेला, तर त्यात माझं आर्थिक नुकसान काहीच नव्हतं म्हणून मी निवांत होते. नउ एप्रिलला मला तो नंबर मिळाला, दहा एप्रिलला मी मुंबईत. तिथल्या एका मराठी स्त्रीच्या (कर्मचारी) सहकार्यामुळे त्याच संध्याकाळी विसा मिळाला.

१३ एप्रिल. दिल्ली विमानातळ. अफगाण स्त्रिया आधुनिक पेहरावात होत्या पण डोकं झाकलेलं होतं त्याचं. पुरुष सूट-टाय-कोट या वेशात होते. म्हणजे अफगाणी लोक काही मागच्या शतकात राहत नाहीत असा दिलासा मिळाला. ते आपापसात बोलत होते; हळू आवाजात, त्यामुळे फार काही ऐकू येत नव्हतं आणि कळतही नव्हतं. बरेच विदेशी लोकही दिसत होते सोबत प्रवास करणारे. विमानतळावर वर्तमानपत्राच्या  कागदात बांधून आणलेले काहीतरी सगळे अफगाण स्त्री-पुरुष आनंदाने खात होते – काय असावं ते? 
काबूलमध्ये प्रवेश करताना हिंदुकुश पर्वताच्या रांगा दिसल्या - त्यावर अजून थोडं बर्फ शिल्लक होतं - हिवाळ्यात काय दृश्य दिसते असेल ना ते! काबूल खूप मोठ शहर दिसतंय  - घर मातीची दिसताहेत - आणि बहुमजली इमारती जवळजवळ नाहीतच. 


एरवी उजाड दिसणारा भाग एकदम हिरव्या तुकड्यांचा दिसला. काय लावतात हे आत्ता उन्हाळ्यात? पाणी कुठून येतं?
प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. यथावकाश या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. 

त्या दिवशी पुणे दिल्ली आणि मग दिल्ली काबूल असा प्रवास करत मी इथं पोचले. इथलं घड्याळ भारतापेक्षा  एक तास मागं आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आयुष्यात एक तास जास्तीचा मिळालाय.

क्रमश:

Monday, November 3, 2014

२१३. "काल-प्रवास" (टाईम ट्रॅवल)

प्रास्ताविक: “कालकूपि” (टाईम मशीन) मधून प्रवास करणं; भूत अथवा भविष्यकाळात जाता येणं ही काही तज्ज्ञांच्या मते निव्वळ कविकल्पना आहे. त्यांच्या मते प्रत्यक्षात असं काही घडल्याचा पुरावा नाही; आणि असं काही घडण्याची शक्यताही नजीकच्या भविष्यात दिसत नाही. पण एक तर आपल्याला भूतकाळाचं परिपूर्ण ज्ञान आहे असं समजण्यात आपण चूक करत आहोत. कुणाला माहिती कशाच्या पायावर आपली आजची इमारत उभी आहे ते! ज्ञाताहून अज्ञात अधिक आहे. शिवाय कोणे एके काळी अशक्य वाटणा-या कल्पना आज आल्या आहेत ना अस्तित्वात? मानवी मनाची ताकद तर्काच्या ब-याच पल्याड असते. म्हणून “टाईम मशीन” आज ना उद्या अस्तिवात येईल असं मला वाटतं. त्यातून कुठे जायचं याची स्वप्नं पहायलाही मला आवडतं. पण ते असो. तो आजचा आपला मुख्य विषय नाही.

मुख्य विषय आहे – “काल-प्रवास” (टाईम ट्रॅवल) केल्याचा माझ्याकडे असलेला पुरावा. योगायोगाची बाब अशी, की एका वेगळ्या विषयावर संशोधन करत असताना अचानक काही कागदपत्रं नुकतीच माझ्या हातात आली. त्यावरून असं निष्पन्न होतंय, की “टाईम मशीन”, “टाईम ट्रॅवल” या काही केवळ रिकामटेकड्या लेखकांनी रचलेल्या कल्पना नाहीत. असा प्रवास प्रत्यक्ष केला गेला आहे; त्याचं शब्दांकन केलं गेलं आहे. तेही अमेरिका किंवा जपानमध्ये नाही, तर या प्राचीन भारतवर्षात!

विश्वास नाही बसत? ठीक आहे. सांगते मी सविस्तर. भाषांतरात काही उणिवा राहिल्या आहेत याची मला जाणीव आहे. पण तरी आशय नक्कीच पोचेल तुमच्यापर्यंत. वाचून बघा आणि सत्य-असत्याचा निर्णय तुमचा तुम्हीच करा.

*****

कोवळा नचिकेत अत्यंत बुद्धिमान आणि ओजस्वी होता. त्याच्या वयाच्या मनाने तो अत्यंत प्रगल्भ होता. त्याची स्वयंशिस्त वाखाणण्याजोगी होती. शिवाय अत्यंत नम्र, कसली म्हणून घमेंड नव्हती त्याच्यात. खरं तर नचिकेतच्या या रूपाची ओळख त्याच्या संपर्कात येणा-या सर्वांना होती आणि त्याला विपरीत नचिकेत कधी वागला नव्हता. पण नचिकेतच्या स्वभावाचा आणखी एक पैलू मात्र जवळजवळ कुणालाच माहिती नव्हता.

नचिकेत जितका बहिर्मुखी वाटायचा सगळ्यांना, तितकाच तो अंतर्मुखी होता. त्याला असंख्य प्रश्न पडायचे. सुरुवातीला तो सारखे प्रश्न विचारायचा – तातांना विचारायचा, गुरुजींना विचारायचा, सोबत्यांना विचारायचा. पण त्याला हळूहळू लक्षात येत गेलं, की जी उत्तरं तात किंवा गुरुजी देताहेत; त्याला तसा काही अर्थ नाही. म्हणजे त्याला तात्पुरती गप्प करायची ती उत्तरं; पण थोडा विचार केला की त्या उत्तरांत काही दम नाही हे त्याच्या लक्षात यायचं. तात समोर असताना तर हल्ली नचिकेत फारसा बोलत नसे. एक तर ते त्यांच्या व्यापात व्यग्र होते; आणि दुसरं म्हणजे त्यांना नाही आवडायचे नचिकेतचे प्रश्न. गुरुजीही हल्ली त्याला प्रश्न विचारण्यापासून प्रवृत्त करायचे – मग समजून उमजून नचिकेत पण गप्प बसायला लागला. प्रश्न थांबले ते फक्त बाहेरच्या लोकांसाठी – स्वत:शी मात्र नचिकेतचा वाद-संवाद चालू होता; त्यात काही खंड पडला नव्हता.

*****
अगदी लहानपणापासून नचिकेतला सभोवताली घडणा-या गोष्टींबद्दल प्रचंड कुतूहल होतं. झाडं, डोगर, घरं, जमीन, आकाश – एका जागी स्थिर असतात; पण प्राणी, पक्षी, माणसं मात्र इकडे-तिकडे भटकू शकतात, एक जागा सोडून दुसरीकडे जाऊ शकतात याचं त्याला नेहमी आश्चर्य वाटे. यांच्या हालचालींचं काही नक्की गणित दिसत नव्हतं. आज चालतील, उद्या निवांत बसतील तर परवा धावतील – कशाचा काही भरोसा नाही यांचा. त्याउलट वारा – कुठून येतो, कुठं जातो माहिती नाही. त्याच्या येण्याजाण्याचा काही अंदाज बांधता येतो – पण खात्री नाही. तेच पावसाचं. एरवी कुठं असतो हा पाऊस? चंद, सूर्य आणि रात्रीच फक्त दिसणा-या त्या चांदण्या - यांची तिसरीच गोष्ट. माणूस, वारा, पक्षी यांच्यापेक्षा चंद्र-सूर्याची गोष्ट वेगळी. रोज सकाळी सूर्य उगवणार म्हणजे उगवणारच – या सूर्याला कोणी नियम घालून दिला असेल असा. तो चंद्र ठराविक दिवसांनी काही काळ दिसत नाही – तेव्हा तो कुठं असतो? हे सगळे कुठून येतात? कुठं जातात? परत पहिल्या ठिकाणी कसे येतात? कुणाच्या हुकुमावरून?

आजूबाजूच्या माणसांमधले बदल पाहून नचिकेत अधिकच गंभीर झाला. लहान मुलं जन्माला येतात, ती मोठी होतात आणि तोवर म्हातारी माणसं मात्र श्वास थांबवतात आणि नाहीशी होतात. माणसं मरतात म्हणजे कुठं जातात? ही इतकी नवीन बाळं जन्म होईपर्यंत कुठं असतात? हे चंद्र, सूर्य जसे पुन्हापुन्हा येतात तशी ही मेलेली माणसंचं लहान मुलं म्हणून पुन्हा जन्माला येतात की काय? पण कोण ठरवतं हे सगळं? काय गुपित आहे नेमकं? कुणाला माहिती असेल ते?

नचिकेत जसजसा मोठा झाला तसतसा ‘काळ’ आणि ‘अवकाश’ या दोन संकल्पनांबाबत तो अधिक सखोल विचार करायला लागला होता. अगदी नेमकं सांगायचं तर या विचारांत त्याने एक ‘तप’ व्यतीत केलं होतं – कुणाच्याही मार्गदर्शनाविनाच. या प्रवासात त्याला ‘भौतिक शक्ती’चा म्हणजे जडद्रव्य मानल्या जाणा-या वस्तूंच्या शक्तीचा अजून चांगला उपयोग करता येईल अशी कल्पना सुचली होती. नचिकेतची विचार करण्याची ही पद्धत कालविसंगत होती. कारण सभोवताली जो तो विद्वान फक्त ‘मनाच्या’ ताकदीबद्दल बोलायचा. मानसिक शक्तीने सगळं काही साध्य होतं अशी त्याच्या भोवती विचारसरणी होती. भौतिक शक्तीचा नुसता विचार करणं देखील हिणकस मानलं जात होतं. पण नचिकेतला ‘मानसिक शक्ती’ला मर्यादा आहेत असा प्रत्यय अनेकदा आला होता. निव्वळ मानसिक शक्तीने सत्याचा अनुभव येत नाही, आलेला अनुभव कुठल्याही निकषांवर तावून सुलाखून बघता येत नाही हे त्याला कळत होतं. सत्याचा शोध व्यक्तीसापेक्ष असतो हे खरं, पण त्याची सिद्धता मात्र व्यक्तीनिरपेक्ष असायला हवी अशी नचिकेतची धारणा होती.

जे तर्कसंगत नाही, ते केवळ जुनं आहे म्हणून त्याला जास्त किंमत द्यायची हे नचिकेतला पटत नव्हतं. काही नवे प्रयोग करून पाहायला हवेत; आणि या नव्या प्रयोगात भौतिक शक्तीचा यथोचित वापर होऊ शकतो अशी त्याची मनोमन खात्री पटली होती. त्या दिशेने त्याची वाटचाल आता एका विशिष्ट निष्कर्षाप्रत येऊन ठेपली होती. ‘आपला शोध आपण जाहीर करू तेव्हा समाजधुरीणांच्या काय प्रतिक्रिया येतील’ याविषयी अजून त्याच्या मनात शंका होती. त्याने भौतिक शक्तीचा वापर करणं बुजुर्गांना मान्य होणार नाही याचा त्याला अंदाज होता. आपल्या यशाने त्यांना कसा धक्का बसेल याचं चित्र नजरेसमोर येताना नचिकेतच्या चेह-यावर मंद हसू उमललं.

आणि दुस-या क्षणी त्याच्या कपाळावर आठी उमटली. त्याचा इतका महत्वाचा प्रयोग चालू असताना त्यासाठी वेळ देण्याऐवजी त्याला या फडतूस कार्यक्रमात भाग घ्यावा लागत होता. काय ही सक्ती? तात त्यांना काय करायचं ते करोत, मला कशाला यात गुंतवताहेत? केवढा वेळ वाया जाणार या समारंभात! तो नसला तर नाही का चालणार?

*****
नीट पाहिल्यावर नचिकेताच्या लक्षात आलं की हा समारंभ काही नेहमीसारखा लवकर आटोपणार नाही; काहीतरी मोठं प्रकरण दिसतंय यावेळी. फारच आवाज, गोंधळ आहे; आणि किती लोक ये-जा करताहेत सारखी? सगळे धावपळीत दिसताहेत! तात म्हणाले होते काहीतरी या कार्यक्रमाविषयी महिन्याभरापूर्वी – पण खरं तर नचिकेतने त्यांच्या बोलण्याकडे फार काही लक्ष दिलं नव्हतं. तो आज्ञाधारक मुलगा आहे – पण कधीकधी तो तंद्रीत असतो, त्यामुळे विसरतो. तात राज्याचे प्रमुख आहेत, त्यामुळे सारखे काहीतरी ‘महत्त्वाचं’ करत असतात आणि नचिकेताला सांगत असतात. ‘आपण तेव्हा नीट ऐकायला पाहिजे होतं तात काय सांगतात ते, आणि सौम्य पण स्पष्ट नकार द्यायला होता या समारंभात सामील व्हायला’ असा विचार नचिकेतच्या मनात आला – पण आता त्याला उशिर झाला होता. नचिकेत काळजीत पडला.

राजा वाजश्रवस, नचिकेतचा ‘तात’ देखील काळजीत होता. हा मुलगा सदैव कसल्या तंद्रीत असतो, हे त्याला कळत नव्हतं. राजपुत्र या नात्याने नचिकेतला त्याने काही कमी पडू दिलं नव्हतं. पण राजपुत्र असणं म्हणजे केवळ सुखाचा उपभोग घेणं नव्हे किंवा फक्त स्वत:ला जे पाहिजे ते करणं नव्हे. उपभोगासोबत कर्तव्यही असतात. पण नचिकेताला ना उपभोगात रस होता ना कर्तव्यांत. तो सदा एका वेगळ्याच विश्वात असतो हल्ली. त्याचं शरीर इथं असतं, पण मन भलतीकडेच.

काळ मोठा कठीण आहे सध्या, वाजश्रवस विचार करत होता स्वत:शी: लोकांना राजा म्हणजे सर्वसत्ताधीश, अमाप संपत्ती हे दिसतं. पण राजाला कर्तव्यांचं किती ओझं असतं हे माझं मलाच माहिती आहे. नचिकेतचं भवितव्य ठरवण्याची आता वेळ आली आहे. ‘पित्याचा वारसा पुत्राकडे जावा’ अशी परंपरा आहे खरी, पण वास्तवात ते काही तितकं सोपं नाही. राजपुत्राला अनेक अनौपचारिक परीक्षांना सामोरं जावं लागतं, राजदरबारातल्या विद्वान आणि अनुभवी मंडळीच्या विविध अपेक्षांना पुरं पडणं काही सोपं नाही. त्यांचं समाधान झालं तरच ही गादी नचिकेतला मिळणार. नाहीतर राजदरबारी शोधतील कुणी नवा मुलगा आणि माझ्या मनात नसतानाही मला राज्यावर पाणी सोडावं लागेल. हा विश्वजित’ यज्ञ म्हणजे एक निमित्त आहे, ही आहे नचिकेतची परीक्षा. त्याची निवड झाली तर माझा अधिकार कायम राहील.

काहीही झालं तरी हे साम्राज्य दुस-याच्या हाती जाता कामा नये. अर्थात नचिकेत तसा गुणी मुलगा आहे. नचिकेत बुद्धिमान आहेच, राज्य चालवण्यासाठी आवश्यक कौशल्यंही त्याच्यात आहेत. त्याच्यात शोधून पण दोष सापडणार नाही इतकं व्यवस्थित मी त्याला तयार केलं आहे. प्रजेला नचिकेत आवडतो, त्याच्यावर प्रजेचं आदरयुक्त प्रेम आहे हे अनेकदा दिसलं आहे. शिवाय नचिकेतमध्ये काही आध्यात्मिक शक्ती आहेत असंही लोकांना वाटतं ही उत्तम बाब आहे. राजपुत्राच्या आध्यात्मिक शक्तीमुळे ब्राह्मणावृंदाचा निदान काही वर्ष तरी त्रास नाही. पण राजपुत्राला या सगळ्या गोष्टीचं काही सोयरसुतक दिसत नाही. सगळ्या प्रजेचं लक्ष याच्याकडे असताना हा असा गंभीर आणि विचारमग्न का आहे? याच्या मनात काय चालू आहे नेमकं?

काहीतरी विपरीत घडणार आहे अशी वाजश्रवसला मनोमन भीती वाटते आहे. पण ही भीती दुस-या कुणाला या अशा नाजूक वेळी सांगताही येणार नाही. न जाणो, अफवा पसरायची आणि राजदरबारी दुस-याच एखाद्याचं नाव पुढे आणायचे! आपणच आपली नचिकेतवर नीट नजर ठेवावी म्हणजे झालं! चार दिवस निभावले हे, की सगळं व्यवस्थित होईल.

*****
‘दानधर्म’ हा या ‘विश्वजित’ यज्ञाचा एक आवश्यक विधि. गरीब आले, विद्वान आले, लुळेपांगळे आले. शेकड्यांनी नाही तर हजारोंनी आले. सगळ्यांना काही ना काही देणं; त्यांचं समाधान होईल तोवर देणं भाग आहे. वाजश्रवसला आपण महत्प्रयासाने कमावलेलं धन असं अपात्री उधळून टाकायला खरं तर आवडत नाही. ‘या सगळ्या आळशी लोकांना दोन चाबूक मारून कामाला लावायला पाहिजे’ असं त्याला वाटतं; पण या क्षणी असं काही बोलायचं तर लांब, विचार करूनही चालणार नाही. हसतमुखाने धन वाटलं पाहिजे. राजा म्हणून त्याचं हे कर्तव्य आहे, ते पार पाडायलाच पाहिजे.

कोषागार रिकामा होतो आहे. जमीन, सोने, दागिने, गोधन, घोडे, हत्ती ... एकामागून एक त्याच्या हातातून जाताहेत. अजून बरीच गर्दी आहे मंडपाबाहेर. त्यांनाही रिकाम्या हाताने परत पाठवता येणार नाही. आपण कंगाल झालो तरी चालेल पण एकही प्रजाजन आज रिक्त हाताने पाठवता येणार नाही.

नोकर गायींचा एक नवा कळप घेऊन आले आहेत. या गायी धष्टपुष्ट दिसत नाहीत. या आहेत म्हाता-या गायी, भाकड गायी, मरणपंथाला टेकलेल्या गायी. त्यांचे अखेरचे पाणी पिऊन झाले आहे; शेवटचे गवत खाऊन झाले आहे; त्यांचे शेवटचे दूध केव्हाच काढले गेले आहे; त्या गलितगात्र आहेत. अशा गायी दान देणे योग्य नाही याची वाजश्रवसला जाणीव आहे; पण त्याचाही नाईलाज आहे. देण्यायोग्य सारे देऊन झाले तरी यज्ञमंडपात अजून इच्छुकांची गर्दी आहे. त्यांना जे शिल्लक आहे ते दिले पाहिजे. आता कुणाला नाही म्हणणे शक्य नाही, नचिकेतच्या भवितव्याच्या दृष्टीने आता कुणालाही दुखावता कामा नये. एकदा नचिकेतची राजा म्हणून निवड झाली की आज गेलेले सारे धन दामदुपटीने परत येईल. काही दिवसांचा तर प्रश्न आहे आता; कदाचित काही तासांचाच!

नेमक्या त्या क्षणी नचिकेत तंद्रीतून जागा झाला. ‘भाकड गायी दान देऊन तातांना पुण्य मिळणार नाही, उलट ते पापाचे धनी होतील’ या जाणीवेने नचिकेत चिंताक्रांत झाला आहे. तात दांभिकपणा का करताहेत? चांगल्या गायी लपवून भाकड गायी का दान देताहेत? आत्ता आपण गप्प बसलो, तर या दांभिकपणात, या पापात आपणही सामील होणार. नकोच ते राज्यपद! राजा व्हायचं आणि स्वार्थाने पापाचं धनी व्हायचं – कोणी सांगितलाय हा उद्योग करायला? नचिकेताला तिथून निघून जावं वाटतं, त्याला तातांना जाब विचारावासा वाटतोय. त्याला भर यज्ञमंडपात या विधिचा फोलपणा सांगावासा वाटतोय.

नचिकेतला उभा राहताना पाहून वाजश्रवसच्या काळजाचा ठोका चुकतो. नचिकेत ‘भाकड गायींचे दान शास्त्रसंमत नाही’ याची पित्याला आठवण करून देतो आणि उपरोधाने विचारतो, “मला कुणाला दान द्याल तुम्ही?” यज्ञाचे ज्येष्ठ ऋत्विज यातून काहीतरी मार्ग काढतील या अपेक्षेने वाजश्रवस शांत राहतो; पण ते तर नचिकेतकडे भारावल्या नजरेने पाहताहेत. पूर्ण यज्ञमंडपाची नजर नचिकेतवर खिळली आहे. लोकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसलेला दिसतो आहे.

पुढच्या क्षणी प्रजा वाजश्रवसकडे अपेक्षाभंग झाल्याच्या नजरेने पाहते आहे, काहींच्या चेह-यावर तिरस्कार प्रकट होतो आहे. नचिकेतसारख्या बुद्धिमान आणि गुणी पुत्राने भर सभेत आरोप केला म्हणजे वाजश्रवसने नक्कीच जाणूनबुजून लांछनीय कृत्य केले आहे; शंकाच नाही काही.

“मला कुणाला दान द्याल तुम्ही?” नचिकेत दुस-यांदा विचारतो. हजारो लोकांच्या या गर्दीत स्वत:च्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू यावी इतकी शांतता आहे. सगळ्यांच्या नजरा वाजश्रवसवर रोखलेल्या आहेत. आता मात्र वाजश्रवसची सहनशक्ती संपते. “हे माझं साम्राज्य आहे, यासाठी मी रक्त ओतलं आहे. माझ्या आयुष्याचा, माझ्या नावाचा, माझ्या कीर्तिचा, माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे हा. आता मी गप्प बसलो, तर आजवर कमावलेलं सारं धुळीस मिळेल. माझ्याच प्रियतम पुत्राने माझी प्रतिष्ठा अशी मातीमोल करावी हे हृदयद्रावक आहे खरं – पण आता गप्प बसून चालणार नाही. हा माझा पुत्र असला तरी या क्षणी हा माझा शत्रू होऊन समोर आला आहे, त्याचा नायनाट करण्याविना गत्यंतर नाही”, वाजश्रवस विचार करतो आहे. “या मुलाला नको ते प्रश्न विचारायची खोड आहे – आपण ती नष्ट करू शकलो नाही हे दुर्दैवच. पुत्राच्या मूर्ख वागण्याने प्रजेला संभ्रमात टाकले आहे, प्रजेने त्याच्यावर विश्वास ठेवला तर मला वनवासात जावं लागेल हे राज्य सोडून. आता या मुलाचा त्वरित बंदोबस्त केलाच पाहिजे.”

शेवटच्या क्षणी काहीतरी चमत्कार घडेल अशी आशा वाजश्रवसला आहे. पण नाही! “मला कुणाला दान द्याल तुम्ही?” नचिकेत तिस-यांदा विचारतो. शांत स्वरांत, ठामपणे, स्वत:ची वेदना लपवत वाजश्रवस म्हणतो, “नचिकेत, माझ्या प्रियतम पुत्रा, मी तुला यमराजाला दान देतो.”

यज्ञमंडपात उपस्थितांच्या अंगावर जणू वीज कोसळली. सगळे अवाक् झाले. आपण एका ‘न भूतो न भविष्यति’ अशा क्षणाचे साक्षीदार आहोत या जाणिवेने अनेकांच्या हृदयाचे स्पंदन क्षणभर थांबले. मग भानावर येऊन कोणीतरी वाजश्रवसचा जयजयकार केला. ‘स्वत:च्या प्रिय पुत्राचं यमराजाला दान’ – केवढा मोठा त्याग आहे हा! असा त्याग ना आजवर कोणी केला, ना भविष्यात कोणी करेल. अत्यंत उच्च दर्जाचे आध्यात्मिक स्वरूपाचे दान आहे हे – जे केवळ वाजश्रवससारखा पुण्यवान पिता करू शकतो. मग आणखी कोणीतरी नचिकेतचा जयजयकार केला. असा दान देणारा पिता विरळा आणि असे दान मागणारा पुत्र त्याहून विरळा!

*****
तातांची आज्ञा ऐकून नचिकेत क्षणभर गोंधळला. आपण आपल्या इच्छेने मरू शकत नाही याची नचिकेतला जाणीव आहे. आपले तात आपला वध करू शकणार नाहीत, त्यांचं हृदय इतकं कठोर नाही याचीही नचिकेताला जाणीव आहे. मग आता यमराजाकडे जायचं कसं? न गेलो, तर पित्याच्या आज्ञेचा भंग होईल, तोही प्रजेसमोर! तसं करून चालणार नाही, मग मी सुपुत्र म्हणवून घेण्याच्या लायकीचा राहणार नाही. त्यामुळे यमराजाकडे जायला तर हवं – पण कसं?

विचार करताकरता नकळत त्याच्या सोन्याच्या अंगठीत बसवून घेतलेल्या एका खड्याला नचिकेतचा स्पर्श झाला; आणि त्याचा चेहरा उजळला. हीच वेळ आहे ‘भौतिक शक्ती महत्त्वाची आहे’ हे गृहितक तपासून पाहण्याची. नचिकेतकडे विचार करायलाही वेळ नाही. एका क्षणात त्याने निर्णय घेतला. प्रजा जयजयकारात मग्न असताना, हजारो लोकांच्या साक्षीने, ज्यात असंख्य विद्वज्जनही होते त्यांच्या साक्षीने, हतबल पित्याच्या समोर नचिकेत अदृश्य झाला. गर्दी पुन्हा एकदा चकित झाली. अनेकांच्या अंगावर काटा आला, कैक लोकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले. वाजश्रवसच्या आध्यात्मिक शक्तीचा याहून कोणता मोठा पुरावा पाहिजे? त्याचे शत्रू आता राज्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाहीत. अशा पुण्यवान पित्याचा तितकाच पुण्यवान पुत्र! दोन पुण्यात्म्यांचे दर्शन आज झाले! पुन्हा एकदा वाजश्रवस आणि नचिकेत यांचा जयघोष सुरु झाला.

*****
भौतिक आणि मानसिक शक्तींचा संगम कसा साधायचा याबाबत नचिकेतच्या मनात हजारो कल्पना येऊन गेल्या होत्या आजवर. प्रयोग अयशस्वी झाला तर काय याचा विचारही केला नव्हता त्याने – कारण ती कल्पनाही भयावह होती. भौतिक आणि मानसिक यांच्यात परंपरा ‘मानसिक’ सामर्थ्याच्या बाजूने झुकली होती. त्याचा प्रतिवाद करताना कळत-नकळत नचिकेत भौतिक सामर्थ्याच्या बाजूला झुकला होता. पण आज प्रत्यक्ष कल्पना अंमलात आणताना नचिकेतने भौतिक आणि मानसिक दोन्ही शक्तींचा यथायोग्य वापर केला होता. एकाच शक्तीवर जोर देण्याऐवजी भौतिक सामर्थ्य आणि मानसिक सामर्थ्य यांचा समतोल साधत वाटचाल केली तर अनेक नवी क्षितिजे पादाक्रांत करता येतील याची नचिकेतला प्रचिती आली.

आपण असे क्षणात अदृश्य झाल्याचा उपस्थितांवर काय परिणाम होईल याचा विचार आणि त्याची चिंता करत बसायला नचिकेतकडे त्याक्षणी वेळ नव्हता. पण जे झाले त्यातून अनेक नव्या शक्यता नचिकेतला दिसू लागल्या. उरलेलं आयुष्य मानसिक आणि भौतिक शक्तींच्या संतुलनाचे अधिक प्रयोग करण्यात घालवायचा, राजा बनायचं नाही हे नचिकेतचं त्या क्षणी पक्कं ठरलं.

*****
Rest, as they say, is a History! नचिकेतचा “काल-प्रवास” उत्तम रीत्या शब्दबद्ध झाला आहे. त्यासंबधी अधिक माहिती जाणून घेण्यास उत्सुक असणा-या वाचकांनी ‘कठोपनिषद’ जरूर वाचावे. नचिकेत यमाकडे गेला; तिथे तीन दिवस आणि तीन रात्री त्याने उपाशीतापाशी यमाची कशी वाट पाहिली; यमराज आणि नचिकेत यांची भेट; यमराजाने नचिकेतला दिलेले तीन वर .... सगळं वर्णन आहे कठोपनिषदात! त्याची सविस्तर चर्चा इथं नको.

महत्त्वाचा मुद्दा असा की, मानवी ज्ञात इतिहासात “काल-प्रवास” करणारा नचिकेत हा पहिला मनुष्य आहे. तो भविष्यात गेला (यमराजाची भेट म्हणजे मृत्यू, आयुष्याचा शेवट) आणि सुरक्षित परत आला. त्याचे तात आणि प्रजाजन त्याला ओळखतील अशा पूर्वीच्याच रुपात तो परत आला.

अर्थात कशामुळे ते नक्की नाही सांगता येणार (संशोधन करावं लागेल) पण त्याच्या समकालीनांना नचिकेतच्या ‘काल-प्रवासाची’ काही कल्पना आलेली दिसत नाही, ते कायम ईश्वरेच्छा, नचिकेतची पुण्याई, यमराजाची कृपा, नचिकेतची आध्यात्मिक ताकद अफाट असल्याने तो यमराजाला भेटून परत येऊ शकला असे समजत राहिले.

नचिकेतसारख्या बुद्धिमान आणि चाकोरी तोडणा-या माणसानंद इतरांपासून सत्य लपवून ठेवलं असेल असं प्रथमदर्शनी वाटत नाही. कदाचित काळाच्या ओघात नचिकेतने लिहिलेला “काल-प्रवासाचे मूलभूत सिद्धान्त” (बेसिक कन्सेप्ट्स ऑफ टाईम ट्रॅवल) हा ग्रंथ नष्ट झाला असेल; कदाचित ते ज्ञानही नष्ट झालं असेल अज्ञानातून, वापर न झाल्याने. एकदा ज्ञान नष्ट झालं की उरतात त्या फक्त “कथा” – दुर्दैवाने तसंच काहीसं इथंही झालं असेल असं वाटतं.

*****
समारोप: मूळ कागदपत्रं वाचून त्यांचा अर्थ लावण्यात बरेच दिवस गेले. तोवर आणखी एक बातमी मिळाली. काही नवी (म्हणजे जुनीच पण नव्याने) कागदपत्रं सापडली आहेत. ती अजून पूर्ण वाचून व्हायची आहेत. पण थोडक्यात सांगायचं तर “नचिकेतच्याही आधी एका स्त्रीने असा “काल-प्रवास” केला होता” असं नुकतंच उघडकीस आलं आहे. म्हणजे पहिल्या “काल-प्रवासा”चं श्रेय पुरुषाला नसून एका स्त्रीला आहे. नचिकेत आपलाच आहे, त्यामुळे त्यातही आनंद होताच, पण तो मान भारतीय स्त्रीला मिळण्यात एक भारतीय स्त्री म्हणून मला विशेष आनंद होतोय. विशेष म्हणजे या भारतीय स्त्रीने काही सिद्ध करण्यासाठी नाही तर एका पुरुषाचा (अर्थात तिच्या पतीचा) जीव वाचवण्यासाठी “काल-प्रवास” केला. यातला परोपकार या “काल-प्रवासा”ला ‘मानवी चेहरा’ देतो हे निर्विवाद!

बरोबर आहे तुमचा अंदाज! मानवी ज्ञात इतिहासात पहिला “काल-प्रवास” केला तो सावित्रीने! होय, तीच ती सत्यवान- सावित्री मधली सावित्री. पण इथंही अभ्यासकांत वाद आहेत. वाद नसतील तर ते तज्ज्ञ कसले म्हणा! नचिकेत यमराजाच्या घरी पोचला होता तर प्रत्यक्ष यमराज सत्यवानाचे प्राण हरण करण्यासाठी पृथ्वीतलावर आले होते – त्यामुळे सावित्रीचा प्रवास “काल-प्रवास” नाही असं काही लोकांचं मत आहे. याही क्षेत्रात स्त्री विरुद्ध पुरुष असा वाद निर्माण होणं मला दुर्दैवी वाटतं. पण नाईलाज आहे.

सध्या अनेक विषयातली तज्ज्ञ मंडळी एकत्र येऊन सावित्रीच्या “काल-प्रवासा”विषयी संशोधन करण्याची योजना बनवत आहेत. त्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे, स्वयंसेवी कार्यकर्त्या स्त्री-पुरुषांचीही गरज आहे. निवडक लोकांना “काल-प्रवासा”ची संधी मिळेल.


नोंद: ‘कठोपनिषद’ माझं अत्यंत आवडतं उपनिषद आहे. माझ्यासाठी ते अमूल्य आहे. त्यातल्या मूळ कथेचा आधार घेऊन केलेला हा कल्पनाविलास आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.

*****
पूर्वप्रसिद्धी: 'मिसळपाव दिवाळी अंक २०१४ ' http://misalpav.com/node/29227