ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, May 31, 2019

२५५. ‘मी’ आणि ‘डवाव’: २७ ते ३१ मे २०१९



 (२८ मे २०१९ या दिवशी मी फिलिपिन्समधल्या डवाव शहरात राहायला आले. ही लेखमालिका म्हणजे हे शहर आणि हा देश मला कसाकसा उमजत गेला याची नोंद . हा प्रवास म्हणजे एक शोध आहे, त्यात शाश्वत सत्य असल्याचा कसलाही दावा नाही. हे शहर अनुभवताना ‘मी म्हणून माझे’ पूर्वग्रह आहेत याची नोंद वाचकांनीही घ्यावी. आणि हो, एक धोक्याची सूचना : नेहमीप्रमाणेच हे लेखन ‘डवाव’बद्दल कमी आणि ‘माझ्या’बद्दल जास्त आहे. 😊) 

२७ मे

एकदाची मी फिलिपिन्सला निघाले होते तर. खरं तर मी सत्तावीस मार्चला जाणं अपेक्षित होतं. पण विजा मिळायला झालेल्या उशिराने पुढचेही बेत बदलत गेले. अर्थात सहा आठवड्यांऐवजी चांगली चौदा आठवडे सुट्टी मिळाली म्हणून मी खुष होते. सुट्टी म्हणजे मात्र फक्त निवांतपणा नव्हता. साठेक कामं उरकली – त्यातली काही घरबसल्या उरकली. पंधरा पुस्तकं (मुख्यत्वे मराठी) वाचली. त्यात काही नवे (मला नवे) लेखकही मिळाळे, पाच-सहा प्रवास केले. पक्षी पाहिले. फोटो काढले. मुख्य म्हणजे कच्छचं छोटं रण आणि अजंठा लेणी पाहिली. पुण्यातही आगाखान पॅलेस, राजा केळकर संग्रहालय अशा अनेक स्थानांना भेट दिली. भरपूर चालले. पस्तीस-चाळीस लोकांना भेटून छान गप्पा झाल्या. सुमारे साठ वेगवेगळे भारतीय (आणि प्रामुख्याने मराठी) पदार्थ खाल्ले. लॅपटॉप-किंडल-फोन दुरूस्त्या झाल्या. कॅमेऱ्यातल्या फोटोंचं वर्गीकरण करून झालं. आणि हो, आरामखुर्चीत निवांत बसले .... वगैरे वगैरे. 
पुण्यातून मुंबई विमानतळावर जायचं हेही एक कामच असतं. यापूर्वीचा अनुभव चांगला असल्याने  'केके ट्रॅवल्स'च्या सेवेचा लाभ घेतला. वाटेत कारचालकाशी गप्पा झाल्या आणि त्याने लावलेली अनेक नवीन गाणीही ऐकायला मिळाली. सोबत एकच सहप्रवासी होते. त्यांनी झोपेचा पर्याय निवडल्याने त्यांच्याशी मात्र फारसं बोलणं झालं नाही. 

मुंबई विमातळावर पोचले. टर्मिनल २ वर यापूर्वी मी एकदाच आले होते, तेही २०१४ मध्ये. मागच्या पाच वर्षांत मुख्यत्वे येणंजाणं झालं ते दिल्लीतून. तिथलं टर्मिनल ३ मला आवडतं. मुंबईचं टर्मिनल २ ही मला आवडलं. मोबाईल-लॅपटॉप चार्जिंग पॉईंट्स कमी आहेत एवढी एकच उणीव मला भासली. बाकी टर्मिनल प्रशस्त आणि मुख्य म्हणजे स्वच्छ आहे.  


‘सिंगापूर एअरलाईन्स’ चांगली आहे असं ऐकून होते. त्यांची सेवा चांगली होती. प्रवासात ‘Bohemian Rhapsody’ हा चित्रपट पाहिला आणि तो मला आवडला. विमानाचा आवाज मात्र फारच त्रासदायक होता. 

२८ मे


सकाळी साडेसातला विमान सिंगापूरला पोचलं. माझं पुढचं विमान साडेबारा वाजता होतं. टर्मिनल ३ ला मी आले आणि पुढचं विमान टर्मिनल दोनवरून होतं. सिंगापूर विमानतळावर एकूण चार टर्मिनल्स आहेत आणि त्यांना एकमेकांशी जोडणारी स्कायट्रेन आहे. स्कायट्रेनचा अनुभव चांगला होता, मजा आली.  
एअरलाईन्सने मला ‘२० सिंगापूर डॉलर्सचं ट्रान्झिट व्हाऊचर’ दिलं. 
Gift Voucher
मला ही मार्केटिंगची कल्पना आवडली. मी एरवी विमानतळावर काही खरेदी करत नाही. पण इथं वीस डॉलर्स खर्च करायचे म्हणून मी जरा हिंडले आणि शेवटी हवेच्या झोताने किणकिणणारी ही छोटी घंटा खरेदी केली. ही सोळा (सिंगापूर) डॉलर्सला होती. आणि दुकानात सहा डॉलर्सच्या आतली एकही वस्तू नव्हती. त्यामुळे मी पदरचे दोन-तीन डॉलर्स खर्च करून काहीतरी खरेदी करावी अशी मला तिथल्या विक्रेतीने बरीच गळ घातली. पण मी काही बधले नाही. चार डॉलर्स वाया गेले तर माझं काही बिघडणार नव्हतं – कारण ते डॉलर्स मुळात मी कमावलेले नव्हते. 😊    
'सिंगापूर विमानतळ' मी आजवर पाहिलेल्या विमानतळांमधला एक उत्कृष्ट अनुभव म्हणावा लागेल. प्रवाशांच्या सोयींचा आणि त्यांच्या गरजांचा चांगला विचार करून विमानतळ चालतो असं म्हणावं लागले. जेव्हा मदत घ्यायची वेळ आली तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने आणि हसऱ्या चेहऱ्याने मदत केली.
टर्मिनल २ मध्ये मी Orchid Garden आणि Enchanted Garden पाहिल्या. 
Enchanted Garden

Orchid Garden
गार्डन म्हणजे एक छोटा भाग त्यांनी विकसित केला आहे. पण एकदम वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटतं. मी या दोन्ही बागांमध्ये काही वेळ निवांत बसून राहिले. मोबाईल हातात असताना आणि मोफत वायफाय सेवा असतानाही निवांत बसून राहण्याचा अनुभव चांगला होता. हातात जास्त वेळ असेल तर सिंगापूर विमानतळावरून मोफत ‘सिटी टूर’ करता येते. माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता पण पुन्हा कधी सिंगापूरमार्गे जायची संधी मिळाली तर मी ही टूर करता येईल अशा पद्धतीने प्रवासाची आखणी करेन हे नक्की.  
एका मैत्रिणीचा ‘तिथली बटरफ्लाय गार्डन छान आहे’ असा निरोप आल्यावर तिच्या शोधात निघाले, ती टर्मिनल ३ मध्ये असल्याचं कळलं. मग पुन्हा एकदा स्कायट्रेनने प्रवास केला. ही छोटीशी बाग सुंदर आहे. हजारो फुलपाखरं तिथं आहेत. 
Butterfly Garden
माझ्या विमानाची वेळ होत आल्याने मी तिथं जास्त वेळ थांबू शकले नाही. 
‘कावेरी’ मध्ये इडली-सांबार खाल्लं आणि कॉफी प्यायले. पानात येईल ते सगळं विनातक्रार खाण्याची सवय मला असली तरी मलाही आवडीनिवडी आहेत हे इथलं सांबार मला आवडल्यावर माझ्या पुन्हा एकदा लक्षात आलं. 'सांबार आवडल्याचं' मी आवर्जून सांगितल्यावर तिथं काम करणाऱ्या दोन्ही स्त्रिया मनापासून हसल्या. 
सिंगापूर सोडल्यावर लगेच ‘नभ मेघांनी आक्रमिले’ अशी स्थिती झाली. अचानक मला आता ‘रडारला आपलं विमान दिसणार नाही की काय’ अशी शंका आली. रडार-विमानं-ढग या नुकत्याच लागलेल्या नवीन शोधाच्या चर्चेचा हा परिणाम असावा!! पॅसिफिकवरून उडणं हा एक मस्त अनुभव होता. वरून पाहताना निरनिराळ्या टप्प्यांत पाण्याचे रंग वेगवेगळे दिसत होते. काही बोटी ‘एकला चलो रे’ म्हणत मार्गक्रमण करत होत्या तर काही एकमेकींची साथ करत चालल्या होत्या. 
पॅसिफिक महासागर
पृथ्वी म्हणजे जमीन अशी नेहमीची धारणा मागे पडून पृथ्वी म्हणजे जास्त पाणी आहे हे समजून घेणं महासागर दूरून पाहताना आपोआप घडलं. 
साडेतीन तासांनी डवावोला पोचले. दोनपैकी एकच कन्वेयर बेल्ट चालू होता आणि हाँगकाँगहून आलेल्या विमानाचे प्रवासी त्यांचं सामान शोधत होते, त्यामुळे अर्धा तास थांबावं लागलं. 
इमिग्रेशनवाल्यांनी काहीच कटकट केली नाही. इथं 'पहिल्यांदा येणं' हा काहीतरी सवलतीचा मुद्दा दिसतोय. ‘पहिल्यांदा आलात का’ एवढचं विचारून इमिग्रेशनने देशात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब केलं आणि कस्टमने पण लगेच ‘पुढे जा’ असा आदेश दिला. दिल्लीच्या फिलिपिन्स दूतावासाने दिलेल्या या बंद लिफाफ्याचं आता काय करायचं आहे हे कळेल कदाचित एक दोन दिवसांनी. 
दूतावासाकडून आलेलं सीलबंद पाकिट


किंबर्लेने आज-उद्या मला बाहेर पडावं लागू नये इतपत सामान आणून ठेवलं आहे. तिने एक कसलातरी अर्ज भरून घेतला आणि माझा फोटोही काढला तिच्या मोबाईलवर. माझी गृहसखी (housemate) जोआन कार्यालयातून आली. ती केनयाची आहे. मग गप्पा झाल्या. अनोळखी माणसांशी भरपूर गप्पा मारणं हे माझ्यासाठी नेहमीचं आहे. 
२९ मे 
प्रवासाचा शीण घालवण्यासाठी म्हणून मला आज सुट्टी होती. खरं म्हणजे मी चोवीस तासांचा प्रवास करूनही दमलेली नव्हते. पण फार महत्त्वाचा मुद्दा नसेल स्थानिक लोकांच्या निर्णयावर काही चर्चा करायची नाही हे माझं नेहमीचं धोरण मी अंमलात आणलं आणि निवांत बसले. 
काही काळाने लॅपटॉप आणि मोबाईल दोन्हींची बॅटरी संपत आली. त्यांच्या चार्जिंगसाठी आवश्यक असलेला adapter माझ्याकडं नव्हता. कार्यालयाने काल दिलेले पैसे (स्थानिक चलनात) आणि स्थानिक फोनच सिमकार्ड आणायचं कारचा चालक विसरला होता. त्यामुळे माझ्याकडं स्थानिक चलन नव्हतं. त्यामुळे बाहेर चक्कर मारायला जाण्यात अर्थ नव्हता. चालत जाता आलं असतं पण रस्ता चुकले तर परत कसं यायचं हा प्रश्न होता.माझ्या बीएसएलएल इंटरनॅशनल सिमला पुरेशी रेंज नव्हती. त्यामुळे किंडलची बॅटरी संपत आली होती. इंटरनेट-मोबाईलविना छत्तीस तास राहण्याचा अनुभव मजेदार होता. या गोष्टींची सवय झाली आहे इतकंच. त्यांच्याविना आयुष्य कसं जगायचं असतं हे मी फक्त विसरले आहे…
इथलं स्थानिक चलन आहे पेसो. इंटरनेटवर Peso हा शब्द आहे तर प्रत्यक्षात नोटेवर Piso असा शब्द आहे. म्यानमा भाषेतही ‘पैसा’ असा शब्द आहे. जोआन सांगत होती की स्वाहिली भाषेतही ‘पेसा’ (Pesa) हा शब्द वापरला जातो. भाषांमध्ये बाकी कितीही विविधता असली तरी ‘पैशाची’ भाषा मात्र जगभरात एकच आहे असं दिसतंय. 
नंतर काही वेळ टीव्ही पहात बसले. त्यातल्या कार्यक्रमांमधले काही शब्द – ते स्थानिक भाषेत असले तरी – मला कळत होते त्याचं मला नवल वाटलं. नीट ऐकल्यावर लक्षात आलं की काही शब्दांवर स्पॅनिश भाषेचा प्रभाव आहे. स्पॅनिश मला येत नाही. पण तिची बहीण पोर्तुगीज भाषा मी वर्षभर (मोझाम्बिकच्या वास्तव्यात) पुष्कळ ऐकली आहे आणि बोलायचा-वाचायचा-लिहायचा प्रयत्नही केला आहे. ‘आता इथं स्पॅनिशच्या निमित्ताने पोर्तुगीजची उजळणी होईल’ या विचारांनी मला एकदम उत्साह आला. 
म्यानमामध्ये असताना तिथल्या परिस्थितीमुळे मी ब्लॉग न लिहिण्याचा निर्णय घेतला होता. आता इथं तशी काही अडचण नाही त्यामुळे परत लिहायला सुरूवात करावी अशीही कल्पना मनात आली. लिहिण्याचं एक आहे – सराव सुटला की काही सुचत नाही. मी काबूलबद्दल लिहिलं ते मोझाम्बिकमध्ये असताना. तसंच मी आता इथल्या दिवसांबद्दल लिहायला सुरूवात केली तर म्यानमातले अनुभवही लिहिले जातील अशी आशा आहे. 
रात्री अचानक पाऊस आला. इथं पाऊस नेहमीच सोबत असणार आहे याचाही आनंद आहे. 
३० मे 
आज किम मला खरेदीला मदत करायला आली. चार एक तास आम्ही एकत्र होतो तेव्हा तिच्याकडून बऱ्याच गोष्टी समजून घेता आल्या. 
पहिली गोष्ट म्हणजे Davao चा उच्चार मी करते तसा डवावो नसून ‘डवाव’ असा आहे. तसंच मिंडानाओ (Mindanao) असा उच्चार नसून ‘मिंडनाव’ आहे असंही लक्षात आलं. आम्ही ‘जीपनी’ (jeepney) नावाच्या सार्वजनिक वाहनाने प्रवास करून मॉलला पोचलो. आपल्याकडच्या सहा आसनी रिक्षांसारखी पण जास्त प्रवासी नेण्याची क्षमता असलेली ही सार्वजनिक व्यवस्था. त्यांचे ठरलेले मार्ग आहेत आणि तशी पाटी (बसवर असते तशी) या जीपनीवर असते. किमान भाडं आठ पेसो आहे, पुढं टप्पे वाढतील तसतशी भाड्यात वाढ होते. 
डवाव शहर मोठं आहे. रस्ते रुंद आहेत, काही ठिकाणी कामामुळे ते खोदलेले होते. ठिकठिकाणी सिग्नल आहेत. रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहनं चालतात. रस्त्यांना नावं आहेत. एका ठिकाणी आम्ही जीपनी बदलली तेव्हा विद्यार्थ्यांचा एक मोठा गट आमच्यासोबत होता. त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्या. फिलिपिन्समध्ये एक गोष्ट सोयीची आहे – ते म्हणजे अनेक लोक इंग्लिश भाषा बोलतात. त्यामुळे संवादात अडचण येण्याची शक्यता कमी आहे. हळूहळू कळेलच म्हणा. 
'जी मॉल' नावाच्या एका मोठ्या मॉलमध्ये आम्ही गेलो. फिलिपिन्समधली माझी ही पहिली खरेदी.
माझी पहिली खरेदी

शब्दकोष आणि एक गोष्टीचं (लहान मुलांसाठीचं) पुस्तक. आता वाचेन ते. किमने नवं सिमकार्ड आणलं होत – Globe कंपनीचं. ते मॉलमधल्या एका दुकानात मोबाईलमध्ये बसवून घेतलं आणि तिथल्या मोफत वायफायचा उपयोग करून मी सर्वांना ‘मी मजेत आहे’ हे सांगितलं. 
मग मी आणि किम जेवलो. उपाहारगृहांत भरपूर गर्दी होती. शाळांना सुट्टी असल्याने पालकांसमवेत मुलं-मुलीही मोठ्या संख्येने दिसत होते. मी भात आणि भाजी खाल्ली. जेवण गरमागरम होतं त्यामुळे बरं वाटलं. मग आवश्यक गोष्टींची खरेदी उरकेपर्यंत तीन वाजले. मग हॉट चॉकलेटसोबत बिबिंगा (Bibingka) हा पदार्थ खाल्ला. 
Bibingka
भाताच्या पीठात साखर किंवा गूळ आणि नारळ घातलेला हा गोड पदार्थ मला आवडला. बिबिंगाचे अनेक प्रकार दिसले. या पदार्थाची रेसिपी आता शोधून काढते. 
अजून मी कार्यालयात गेलेली नाही आणि बाकी सहकाऱ्यांना भेटले नाही कारण ते सगळेजण एका प्रशिक्षण कार्यक्रमात आहेत, दरम्यान कार्यालयाने मला वाचण्यासाठी अनेक कागदपत्रं पाठवली आहेत. आज ते वाचून काढते. 

३१ मे 
आज एकदाची मी कार्यालयात आले. बाकीचे व्यग्र असले तरी जोआन मोकळी होती, त्यामुळे वायफाय पासवर्ड वगैरे शोधण्यात काही अडचण आली नाही. घरापासून चालत वीस मिनिटांच्या अंतरावर आहे कार्यालय. त्यामुळे रोज चालणं होईल. 

दुपारी जवळच एके ठिकाणी जेवायला गेलो. तिथलं मेन्युकार्ड पाहून काहीच कळेना. 



मग वेटरशी बोलून एक पालेभाजी आणि भात खाल्ला. 

आता उद्या-परवा सुट्टी. घर लावायचं काम, साफसफाई आणि किंडलवर पुस्तक वाचणे असा कार्यक्रम डोक्यात आहे. घरात इंटरनेट फारसं चालत नसल्याने  भरपूर रिकामा वेळ हाती येतो आहे तर 😊


क्रमश:

भाग २

Thursday, March 7, 2019

२५४. अवघड विषयाचा तास


पुण्यात बऱ्याच काळाने आलं की इथली वाहनांची गर्दी पाहून भीती वाटते. दरवेळी त्यावर मात करून काही आठवड्यांसाठी आले असले तरी मी स्कुटी चालवते. पण यावेळी मात्र काही ना काही कारणांनी मैत्रिणीकडं ठेवलेली स्कुटी आणायला जमलं नाही. वेगवेगळ्या कामांसाठी लांब अंतरांवर जायचं असल्याने तशीही मी स्कुटी वापरण्याची शक्यता जवजवळ नव्हतीच हे स्कुटी न आणण्यामागचं मुख्य कारण.

कामासाठी वेळेत पोचायचं असतं तेंव्हा रिक्षा वापरायची आणि घरी येताना निवांत वेळ हाताशी असल्याने बससेवेचा उपयोग करायचा असं एकंदर सोयीचं वाटलं आणि ते करत गेले.

गेल्या दोन-तीन आठवड्यांत अनेक रिक्षावाल्यांशी गप्पा झाल्या आणि पुण्याचे रिक्षावाले हे एक स्वतंत्र विद्यापीठ (चांगल्या अर्थाने)  असल्याचा मला (पुन्हा एकदा) साक्षात्कार झाला. एका रिक्षावाल्याने मला मसुद अजहर या दहशतवाद्याचा पूर्ण जीवनक्रम समजावून सांगितला. तर दुसऱ्या एकाने ‘नोटाबंदीने काय साधलं’ यावर त्याचे मौलिक विचार ऐकवले. विलास नावाच्या एका रिक्षाचालकाने (नाव बदलले आहे) त्याची सगळी जीवनकहाणी सांगितली, आणि ‘काकू, तुम्हाला काय वाटतं, बरोबर केलं ना मी?’ असं वारंवार मला विचारलं. आणखी एकाने आमच्या विभागातल्या राजकारणाची अद्ययावत माहिती मला दिली. तर कोणी मेट्रो झाल्यावरही वाहतुकीचा प्रश्न कसा मिटणार नाही हे सांगितलं.

आज पासपोर्ट कार्यालयातलं काम अपेक्षेपेक्षा लवकर संपलं. मग ‘आगाखान पॅलेस’ला भेट द्यायचा विचार मनात आला. पासपोर्ट कार्यालयाच्या बाहेर रिक्षांची रांग असते, पण जवळच्या अंतराला नकार देण्याची पुणेकर रिक्षावाल्यांची परंपरा लक्षात घेऊन मी ‘ओला’ रिक्षा बोलावली. पुढचा अर्धा तास मग त्या तरूण रिक्षावाल्याने माझी रीतसर शाळा घेतली.

“अहो मॅडम, इथं एवढ्या रिक्षा असतात, ओला कशाला बुक केली तुम्ही?” मी रिक्षात पाऊल टाकताक्षणी त्याचा प्रश्न.

मग ‘जवळच्या ठिकाणी जायला रिक्षावाले तयार नसतात’ असं मी म्हटलं तर तो म्हणाला, “अहो, ‘ओला’वाली रिक्षा महाग असते. वीसेक रूपये जास्त द्यावे लागतात तुम्हाला. ते ना आम्हाला मिळतात, ना तुम्हाला, मारवाडी मालकाची भरपाई करता तुम्ही लोक. त्यापेक्षा रिक्षावाल्याला दहा रूपये जास्त दिले तर काही बिघडणार नाही तुमचं!” त्याच्या या सल्ल्यावर मान डोलावत मी ‘पुढच्या वेळी लक्षात ठेवेन’ असं नम्रपणे सांगितलं.

मी वाद न घातल्याने किंवा रिक्षावाल्यांवर जास्त टीका न केल्याने या दादांना आणखी स्फुरण चढलं. “लोकसभेत कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतं?” असा थेट प्रश्न माझ्यावर येऊन आदळला. मी चकित झाले आणि सावधही. सावध अशासाठी की भारताची विभागणी सध्या मोदी-समर्थक आणि मोदी-विरोधक अशा दोन गटांत झाली असल्याचा प्रत्यय पुण्यात आल्यापासून मला वारंवार आला होता.

“तसं काही सांगता येणं अवघड आहे हो. तुम्हीच सांगा, तुमचा काय अंदाज?” कुंपणावरची भूमिका घेण्यात मी आता पटाईत झाले आहे.

दादांनी एकदम गाडी बदलली – म्हणजे संभाषणाची गाडी. मला विचारलं, “कुठं राहता तुम्ही?” मी माझ्या उपनगराचं नाव सांगितलं.

त्याने विचारलं, “तुमचे आमदार कोण आहेत, माहिती आहे का तुम्हाला?”

मला अर्थातच माहिती नाही. तरी मी अंदाजाने एक नाव घेतलं. तो हसला. मला म्हणाला, “त्या मॅडम कोथरूड मतदारसंघाच्या आमदार आहेत, तुमचे आमदार आहेत – श्री .....”.

मी आठवल्यासारखं मान डोलावत म्हटलं, “हो, त्या अमुक पक्षाचे आहेत ना ते, आता आठवलं.”

“काय मॅडम तुम्ही पण. ते त्या नाही तर ... पक्षाचे आहेत.” आता त्याच्या स्वरांत एक प्रकारची तुच्छता मला जाणवली. की तो फक्त आभास होता? चर्चा थांबवण्यासाठी मी मोबाईलमध्ये डोकं घातलं.

“तुमचे नगरसेवक कोण आहेत हे तरी माहिती आहे का तुम्हाला?” त्याचा पुढचा प्रश्न.

“नाही हो, नाही माहिती,” माझ्या मते मी सरळ उत्तर दिलं होतं.

“तुम्ही मतदान केलं होतं का हो?” दादा काही मला सोडायला तयार नव्हते.

“महापालिकेच्या वेळी नाही केलं. मी दिल्लीत होते तेव्हा.” मी अर्धसत्याचा आश्रय घेतला. म्हणजे मी मतदान केलं नाही हे खरं पण मी दिल्लीत होते हे मात्र खोटं.

“हे काही बरोबर नाही, मद्दान केलं पाहिजे मॅडम तुमच्यासारख्या लोकांनी. आता नाव नोंदवलं का पुन्हा?” मी होकार दिला.

“कुठं केली नावनोंदणी?” त्याने संशयाने विचारलं.

“ऑनलाईन केली,” मी सांगितलं. यावर मात्र त्याचा चटकन विश्वास बसला. “बायकोचं नाव राहिलंय नोंदवायचं, ते आता करतो ऑनलाईन,” असं तो म्हणाला.

एकदाची माझी (सत्व)परीक्षा संपली म्हणून मी सुस्कारा सोडला.

“मोदी साहेबांनी नोटाबंदी केली तेंव्हा किती लोकांनी पैसे फेकले तुम्हाला माहिती आहे का?” पुढचा प्रश्न आला. मी नकारार्थी मान हलवली. मग त्याने मला नोटबंदीचे फायदे, सुकन्या योजना, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ... अशा किमान अर्धा डझन योजनांवर प्रश्न विचारले. मी अंदाजपंचे दिलेली काही उत्तरं बरोबर आली (कारण नाव बदललं असलं तरी योजना जुन्याच आहेत) काही चुकली – कारण गेली काही वर्षी माझा इथल्या वास्तवाशी तुटलेला संपर्क.

तो दणादण बोलत होता, श्वास घ्यायलाही न थांबता. मग ‘आगाखान पॅलेस’ जवळ आला तसं समारोप करायच्या थाटात म्हणाला, “तुमच्यासारखे शिकले सवरलेले लोक काही माहिती घेत नाहीत आणि उगा मोदी साहेबांवर टीका करत बसतात. काँग्रेसची राजवट पाहिजे काय तुम्हाला परत?”

मी खरं तर मोदी सरकारवर कसलीही टीका केली नव्हती की काँग्रेसची भलावणही केली नव्हती. पण माझ्या विभागाच्या नगरसेवकाचं आणि आमदाराचंही नाव मला माहिती नसल्याने मी खजिल होते. आणि त्याहीपेक्षा या तरूण माणसाला असलेल्या राजकीय आणि प्रशासकीय माहितीने थक्क झाले होते. त्याचं बरोबर आहे. इतकी माहिती तर एक नागरिक या नात्याने मला असायलाच हवी.

‘मी भ्रष्ट काँग्रेस राजवटीची समर्थक नाही’ असं मी स्पष्ट केल्यावर त्याला जरासा दिलासा मिळाल्यासारखा वाटला. अर्ध्या तासाच्या संभाषणात तो पहिल्यांदा हसला. मला म्हणाला, “मॅडम, यावेळी मद्दान करा आणि कमळावरच शिक्का मारा. येऊद्यात परत मोदीच.”

मी हसून मान डोलावली. मी आगाखान पॅलेसच्या प्रवेशद्वाराकडे वळलं. तो पुढं गेला.

शाळेतला अवघड विषयाचा तास संपल्यावर वाटायचं तसं वाटलं.

Saturday, April 14, 2018

२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)




मागे कधीतरी मी ‘तडिंजु' (Thadingyut) या म्यानमा पारंपरिक उत्सवाबाबत सविस्तर लिहिलं होतं. म्यानमामध्ये दर पौर्णिमेला काही ना काही धार्मिक महत्त्व असणारा कार्यक्रम असतोच. पण तडिंजुइतकाच महत्त्वाचा दुसरा सण म्हणजे ‘तिंज्या’ (Thingyan). हा शब्द तिंज्या असा लिहिला जात असला तरी प्रत्यक्षात याचा उच्चार अनेक लोक ‘तज्या’ असाही करतात.
बर्मी सण हे चांद्रगणनेनुसार असतात, त्यामुळे दरवर्षी ते एकाच तारखेला असत नाहीत- थोडे पुढेमागे होतात. पण साधारणपणे हा सण एप्रिल महिन्यात येतो. चार ते पाच दिवस हा सण असतो. जेव्हा सण पाच दिवसांचा असतो तेव्हा त्यातला एक दिवस बहुतेक ‘भाकड’ असतो. या काळात पाचही दिवस सरकारी आणि अन्य कार्यालये बंद असतात. मागच्यावर्षीपर्यंत (२०१७) ही सुट्टी दहा दिवसांची असे. एनएलडी (National Democratic League) सरकारने मागच्यावर्षी ही सुट्टी कमी करण्याची योजना जाहीर केल्यावर शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली होती. अनेकांचे प्रवासाचे बेत खूप आधी ठरले होते आणि आयत्यावेळी सरकारी निर्णय आल्याने लोक नाराज झाले होते. सरकारने नमतं घेतलं आणि सुट्टी पूर्ववत दहा दिवसांची केली. २०१८ च्या दिनदर्शिकेत मात्र सरकारने पाचच दिवसांची सुट्टी जाहीर केली – त्यातही दोन दिवस शनिवार-रविवारचे गेले – आणि कर्मचाऱ्यांनी ते मान्यही केलं. १३ ते १७ एप्रिल या काळात २०१८ मधला तिंज्या महोत्सव आहे.
या उत्सवाला ‘जलोत्सव’ (Water Festival) असंही म्हटलं जात. या काळात लोक एकमेकांच्या अंगावर पाणी फेकतात-टाकतात, म्हणून हा जलोत्सव. या सणाचा शेवटचा दिवस हा म्यानमा नववर्षाचा पहिला दिवस असतो. लाओस आणि थाईलँड देशांमध्येही अशाच प्रकारचा उत्सव Songkran नावाने साजरा होतो. संक्रमण या संस्कृत शब्दापासून Songkran हा शब्द आला असावा.
सणाच्या चार-पाच दिवस आधीपासूनच वातावरणनिर्मिती झाली होती. कार्यालयातल्या सहकारी डोक्यात पटाव (Padauk) ची फुलं माळून आल्या होत्या. (पटाव हे genus Pterocarpus मधलं एक झाड आहे.)



एक दिवस तिंज्याचे खास पदार्थ मॉलोयोबा (Mont Lone Yay Baw – तांदळाच्या पीठाचे गोळे करून त्यात गूळ भरतात आणि तळतात – काहीसा मोदकासारखा पदार्थ) आणि माजिफ्योये  (चिंच पाण्यात उकळायची आणि त्यात गूळ घालायचा) कार्यालयात करून (आणि खाऊन) झाले.



मग दुसऱ्या दिवशी आणखी काही पदार्थ दर तासादोनतासांनी येत राहिले. मी सध्या ज्या मंत्रालयात काम करते तिथं एकाच इमारतीत मंत्रालयाची अनेक खाती आणि उपखाती आहेत (Departments and Divisions.) मग प्रत्येक टीम इतर  सर्वांसाठी काही ना काही खाद्यपदार्थ बनवून पाठवत होती. एकूण उत्सवी वातावरण होतं.
सुट्टीच्या काळात नेपिडॉत (ही म्यानमाची राजधानी, सध्या मी इथं राहते) फारसं काही घडत नाही कारण बहुसंख्य सरकारी कर्मचारी आपापल्या गावी जातात. शिवाय नेपिडॉत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. कुठं जायचं तर टॅक्सीशिवाय पर्याय नाही आणि ती मिळेल याची काही खात्री नाही. यांगोंच्या शहरी गोंधळात मला जायचं नव्हतं. म्हणून मग मी कलौ (Kalaw – लो आणि लौ यांच्यामधला उच्चार) शहरात आले.
इथं मी मागच्या वर्षी एकदा कामानिमित्त येऊन गेले होते. ऐन मार्च महिन्यातली इथली हवा मला आवडली होती. ब्रिटिशांनी विकसित केलेलं हे एक हिल-स्टेशन. गाव छोटं, सुबक, स्वच्छ, शांत आणि सुरक्षित. म्हणून मग कलौला आले.


शान राज्यातलं हे एक महत्त्वाचं शहर. पहिल्या दिवशी संध्याकाळी गावात फेरफटका मारला. इथं नेपाळी समाज मोठ्या संख्येने आहे त्यामुळे नेपाळी जेवण (पोळी-भाजी-भात-डाळ वगैरे) मिळतं.
माझी मंडलेमधली एक मैत्रीण रात्री दोन वाजता येऊन पोचली. आल्यावर तिच्या लक्षात आलं की तिचा फोन सापडत नाहीये. आपल्या भारतीय अनुभवावरून ‘फोन गेला’ असं मी समजले. पण तरीही माझ्या मोबाईलवरून तिचा फोन नंबर फिरवला तर समोरून तो चक्क उचलला गेला. फोन बंद करून सिमकार्ड फेकून द्यायची कला इथल्या लोकांना अजून अवगत नाहीये. बसच्या मालकाकडे फोन होता आणि तो व्यवस्थित होता. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरून फोन घेऊन यायचा असं ठरलं. म्यानमा लोकांची ही निरागसता किती काळ टिकून राहील असा प्रश्न मला नेहमीच पडतो. यांगों, मंडलेसारखी मोठी शहरं आणि उर्वरित देशात हा फरक आत्ताही दिसतो आहेच. तो एक वेगळाच विषय.
तिंज्याचा पहिला दिवस उजाडला. कलौ परिसरात दर पाच दिवसांनी एका गावात बाजार भरतो. (म्यानमामध्ये अनेक ठिकाणी ही पाच दिवस पाच गावांत बाजार ही पद्धत अस्तित्त्वात आहे.) सकाळी तिकडं चक्कर मारली. भरपूर गर्दी होती. तिंज्यानिमित्त पुढचे चार दिवस बाजार बंद राहणार आहे आणि सर्वांनाच सणासाठीची विशेष खरेदी करायची आहे, त्यामुळे गर्दी प्रचंड होती. पण कुठंही धक्काबुक्की नव्हती हे विशेष.

                              

तिंज्याचा पहिला दिवस ‘अच्यो’ (a-kyo) या नावाने ओळखला जातो. पूर्वी खरं तर या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत पाणी फेकलं जात नसे. या दिवशी लोक फक्त एक वेळा जेवत असत आणि पगोडात आणि मठात जाऊन दानधर्म करत असत. शहाळं आणि कच्ची केळी देण्याला विशेष महत्त्व आहे असं दिसतं. संध्याकाळी पाण्याचा खेळ सुरू होतो.

कलौच्या बाजारानंतर आम्ही टाँजीच्या दिशेने रवाना झालो. शान राज्याची ही राजधानी कलौपासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही तिथं गेलो ते मैत्रिणीचा फोन आणण्यासाठी. इथं रस्त्यांवर मोठमोठे मंडप उभारून आणि पाणी साठवण्याची व्यवस्था करून जोरदार तयारी चालली होती. महापालिकेतर्फे मोठा मंडप घातलेला दिसला.



जिकडंतिकडं पोलीसही मोठ्या संख्येने हजर होते. शासनातर्फे अधिकृतरीत्या हा उत्सव साजरा केला जातो. (म्यानमा अधिकृतरीत्या बौद्ध धर्मीय राष्ट्र आहे.) काही पोलीस मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने परिसर पिंजून काढण्याच्या कामात मग्न होते. ते पाहताना शान राज्यात चालू असलेल्या संघर्षाची आठवण पुन्हा एकदा झाली. (म्यानमा लष्कर आणि शानमधले काही सशस्त्र गट यांच्यात अनेक दशकांपासून अविरत संघर्ष चालू आहे.) लहान मुलांना दम धरवत नसल्याने रस्त्याने येणाऱ्याजाणाऱ्यांवर पाणी फेकणं चालू झालं होतं. आपल्याकडच्या रंगपंचमीची आठवण करून देणारं वातावरण होतं.



टाँजीतल्या सुलामुनी पगोड्यामध्ये येणाऱ्या सर्वांचं या मैत्रिणी असं स्वागत करत होत्या. यानमामधली अनेक कुटुंब सणांच्या-उत्सवांच्या दरम्यान असं अन्नदान करत असतात. दुसऱ्या दिवशी कलौमध्येही तीन-चार ठिकाणी आम्हाला खाद्यपदार्थ आणि फळांचे रस दिले गेले. अनोळखी माणसांनाही हे दिलं जातं.

                      


या सणामागे नेमकी काय पारंपरिक कथा आहे असं मी आमच्या चालकाला आणि माझ्या मैत्रिणीला विचारत होते. पण त्यांना नेमकं काही सांगता येत नव्हतं. आंतरजालावर शोध घेतल्यावर काही संदर्भ सापडले आणि त्यावरून समजलं ते असं :-
बौद्ध धर्मामध्ये शक्र अथवा सक्क (पाली शब्द) नामक एक देवता आहे. ही हिंदू धर्मातली इंद्रदेवता होय. पण बौद्ध परंपरेतला इंद्र युद्धं कमी करतो आणि अर्थातच भगवान बुद्धाची पूजा करतो. सक्क जरी देवांचा राजा असला तरी जन्म-व्याधि-जरा-मरण या चक्रातून त्याचीही सुटका नाही. त्याचीही टिंगलटवाळी होते आणि मानहानीचे प्रसंग त्याच्याही आयुष्यात येतात. ऐरावत नामक धवल हत्ती हे सक्काचं वाहन आणि ऐरावताला एक नाही तर तीन डोकी आहेत.
एकदा इंद्र आणि एक राजा यांच्यातली पैज (किंवा तो जुगार होता असं वाटतं, अजून फारसे संदर्भ मिळाले नाहीत मला) इंद्राने जिंकली. आधी ठरलेल्या अटीनुसार इंद्राने त्या राजाचा शिरच्छेद केला आणि त्या राजाच्या शरीरावर हत्तीचं शिर बसवलं. तो झाला गणपती. पण त्या राजाची ताकद इतकी मोठी होती की त्याच्या शिराचं काय करायचं ही समस्या तयार झाली. ते शिर समुद्रात टाकलं तर समुद्र आटून गेला, जमिनीवर ठेवलं तर जमीन हलायला लागली (भूकंप झाला असं म्हणायचं आहे की काय ते कळत नाही) आणि आकाशात फेकलं तर आकाश ज्वाळांनी भरून गेलं.
सक्काने मग आदेश दिला की एकेका राजकन्येने या मृत राजाचं शिर वर्षभर धारण करावं. नवीन वर्ष येतं म्हणजे त्या दिवशी हे शिर धारण करण्याची जबाबदारी एका राजकन्येकडून दुसऱ्या राजकन्येकडं जाते. आता या सगळ्या कहाणीत राजपुत्रांऐवजी राजकन्या का आल्या, त्या किती होत्या वगैरे काहीही मला माहिती नाही. एखाद्या जाणत्या भिक्षुशी या विषयावर संवाद साधायला पाहिजे, मग कदाचित सविस्तर कळेल कथा. दुसऱ्या एका संदर्भानुसार या राजकन्या नव्हत्या तर ‘नट’ होते. ‘नट’ म्हणजे कोण हे पुढच्या परिच्छेदात आहे.
ही पहिली कथा. ही गोष्ट वाचून मला बर्मी नव्या वर्षाबद्दल थोडंस कळलं. पण तरी पाण्याचं यात काय काम हे कळत नव्हतं.
बर्माच्या थेरवाद बौद्ध धर्मात ‘नट’ही अतिशय महत्त्वाचे आहेत. ३७ मुख्य नट आणि इतर अनेक गौण नट आहेत. यांच्यामध्ये अमानवी भौतिक-आध्यात्मिक शक्ती असते अशी धारणा आहे. पगोडांमध्ये मुख्य मूर्ती बुद्धाची असली तरी (त्या बहुतेक वेळा चारी दिशांना एकेक अशा असतात), तरी भवताली ‘नट’ही असतात आणि त्यांचीही उपासना केली जाते. पारंपारिक धार्मिक समजुती आणि बुद्धाची शिकवण यांचा असा अनोखा संगम म्यानमामध्ये दिसतो.
इंद्रदेवता किंवा सक्क हा पुढे परंपरेत दिसतो तो तज्यामिं नामक ‘नट’ म्हणून. हा बदल नेमका कधी आणि कसा झाला हेही मला माहिती नाही. याच्या एका हातात शंख असून याचं वाहन तीन डोक्यांचा पांढरा हत्ती आहे. याचा संबंध आहे तिंज्या सणाच्या दुसऱ्या दिवसाशी – जो ‘अच्या’ (a-kya) नावाने ओळखला जातो. या दिवशी तज्यामिं (उर्फ सक्क उर्फ इंद्र) स्वर्गातून पृथ्वीवर अवतरतो असं मानलं जातं. ठरलेल्या वेळी लोक रस्त्यावर पाणी ओतून तज्यामिंची प्रार्थना करतात. तज्यामिं कोणत्या वाहनावरून येतो आणि त्याच्या हातात काय असतं यावरून येणाऱ्या वर्षाबद्दलचं भाकित shaman मंडळी (देव-नट आणि माणूस यांच्यात संवाद साधणारी माध्यममंडळी- भगत) करतात. (आता त्यांना तज्यामिं कसा काय दिसतो वगैरे तार्किक प्रश्न बाजूला ठेउयात.) चांगलं वागणाऱ्या मुला-मुलींचं नाव तज्यामिं सोनेरी पुस्तकात लिहितो असं मानलं जातं.
माझ्या बमा बौद्ध मैत्रिणीला पहिली कथा माहिती नव्हती. तिच्या म्हणण्यानुसार दुसरी कथा तिंज्यासाठी जास्त योग्य आहे, कारण म्यानमामध्ये तीच जास्त प्रचलित आहे.
आम्ही दुसऱ्या दिवशी (अच्या) फिरत फिरत कलौमधल्या Hnee Pagoda मध्ये गेलो होतो. Hnee या शब्दाचा बर्मी भाषेत अर्थ होतो बांबूची पट्टी. इथली बुद्धाची मूर्ती बांबूपासून बनवलेली आहे. पगोडामध्ये अनेक लोक होते.



लोक शांतपणे बसले होते, वस्तू देणगी म्हणून बुद्धाच्या मूर्तीपुढे ठेवत होते. अशा सर्व प्रसंगी पगोडा येणाऱ्या सर्व भक्तांसाठी चहापाण्याची व्यवस्था करतो. लोकसहभागातून आणि लोकश्रमातून हे काम बिनबोभाट चालू असतं. भाविकांना मार्गदर्शन करण्याचं काम भिक्षु करत होते तर चहापाण्याची जबाबदारी भिक्षुणी सांभाळत होत्या – हे पाहून मी आणि माझी मैत्रीण एकमेकींकडे पाहून फक्त हसलो. अर्थात ती बमा (म्यानमामधला एक गट) बौद्ध असल्याने तिला हे नवीन नव्हतं – तिने मग तिच्या लहानपणच्या मठांच्या आणि अशा उत्सवांच्या अनेक आठवणी मला सांगितल्या.
जुन्या काळी Padauk च्या डहाळीने पाणी एकमेकांवर फक्त शिंपडलं जायचं. जुनी पापं वाहून जावीत, तन-मन स्वच्छ व्हावं आणि नव्या वर्षाची सुरूवात लोकांनी नव्याने करावी अशी त्यामागची संकल्पना होती. पण आता मात्र पिचकाऱ्या आणि पाईप यांचा सर्रास वापर केला जातो.
तिसरा दिवस आहे ‘अच्च्या’ (a-kyat). Leap year मध्ये दोन दिवस असतो. चौथा दिवस आहे ‘अट्टे’ (a-tet) – या दिवशी तज्यामिं स्वर्गात परत जातो. जलमहोत्सवाची सांगता होते. एका संदर्भानुसार या तीन दिवसांत तज्यामिंने पृथ्वीतलावर चांगलं काम करून काही पुण्य कमवावं लागतं, अन्यथा त्याचं स्वर्गातलं स्थान डळमळीत होईल.
पाचवा दिवस म्हणजे म्यानमा नववर्षदिन – न्हिह्सांटय्ये - hnit hsan ta yet. पूर्वी या दिवशी घरातल्या ज्येष्ठांचे केस लहानांनी धुवायचे अशी प्रथा होती. लहान जलाशयांतून मासे मोठ्या जलाशयांमध्ये सोडले जातात. लहान मुलांना बौद्ध धर्माच्या शिक्षणाची दीक्षाही या दिवशी दिली जाते. या समारंभानंतर मुलं काही काळ तरी (किमान तीन दिवस) मठात राहतात.
बदलत्या काळानुसार या पारंपारिक उत्सवाचं स्वरूप बदलत चाललं आहे. शहरात आणि ग्रामीण भागांत उत्सवाचं स्वरूप भिन्न आहे हे कलौ आणि टाँजी या दोन शहरातल्या अनुभवांवरून मला स्पष्ट दिसलं. छोट्या शहरांत, ग्रामीण भागात अजूनही परंपरेला महत्त्व आहे आणि उत्सवाचं स्वरूप काहीसं निरागस आहे. कलौमध्ये लोक आपापसात स्पर्धा करताना दिसले नाहीत. टाँजीमध्ये मात्र प्रायोजकांच्या मदतीने उत्सवाचं बाजारीकरण घडताना दिसलं. कुणाचा मंडप मोठा, कुणाकडं पाण्याचा साठा जास्त, कुणाकडं वाटायचे खाद्यपदार्थ जास्त चांगले ... हे हळूहळू आकार घेऊ लागलं आहे असं स्थानिक लोकांशी बोलताना कळलं.
रोजच्या जगण्यातले प्रश्न काही काळापुरते विसरून जाण्याला, त्या प्रश्नांना नव्याने सामोरं जायला असे उत्सव ताकद देतात असं मला वाटलं खरं. पण कितीही म्हटलं तरी हा माझा पहिलाच तिंज्या (मागच्या वर्षी मी भारतात आले होते) आणि तोही वरवर पाहिलेला. त्यामुळे त्याचे सगळे ताणेबाणे माझ्या लक्षात आलेच असतील असं अजीबात नाही. एकंदर मला मजा आली इतकंच काय ते खरं.
यावर्षीच्या तिंज्याचे अजून तीन दिवस बाकी आहेत, त्याकडे कुतुहलाने पाहते आहे.
संदर्भ – Wikipedia, The Myanmar Times,  The Irrawaddy,  स्थानिक लोकांशी झालेला संवाद