ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, July 9, 2009

६. दरवेशी

"पण आपण चालावे. दरवेशी नसलो तरी.
 सोबत घेऊन आपली सावली. 
शोधावा नवा रस्ता. 
पायांना जर फुटल्याच आहेत दिशा 
आणि जर आहेतच गावे प्रत्येक रस्त्यावर, 
तर सापडेलही एखादे आपल्यासाठी थांबलेले. 
नाही तर आहेच रस्ता रस्त्यांना मिळणारा 
आणि ते रस्ते दुसरया रस्त्यांना मिळत जाणारे" 

 प्रभा गणोरकर यांची ही कविता गेली २५ वर्षे माझी अखंड सोबत करत आहे. ती मला नेमकी कोठे आणि कधी भेटली ते अजिबात आठवत नाही. पण त्याने काय फरक पडतो? तेव्हापासून ती माझ्या जगण्याचा अविभाज्य हिस्सा आहे. 

भटकंतीचे, शोधाचे अनेक प्रकार असतात. हेतू-विरहित भटकंतीलाही काही वेळा अर्थ असतो. या कवितेमुळे भटकंतीबाबत एक सखोल जाण माझ्यात निर्माण व्हायला मदत झाली. शोधाची अपरिहार्यता, त्यातली वेदना, त्यात असलेली अनिश्चितता, त्यातील अर्थहीनता ... आणि तरीही एक अथांग आशावाद फार ताकदीने हे शब्द आपल्यापर्यंत पोचवतात. आपणच आपल्याला आधार द्यायचा असतो हेही अटळ सत्य या शब्दांनी मला दिले. 

रस्ते असतातच; ते आपण शोधायचे असतात; ते मिळतात; हे लक्षात येऊन माझा जगण्यावरचा विश्वास बळावतो. दुसरा रस्ता शोधण्याची ऊर्मी ही कविता माझ्यात जागी करते!

Saturday, May 23, 2009

५. अनिलांचा ’पाऊस’

काल परवा पुण्यात आमच्या भागात वीज आणि ढग यांच्या दंगामस्तीसह पाऊस आला. अशा वेळी मला हमखास अनिलांची "पेर्ते व्हा" या संग्रहातली ही कविता आठवते. 

येत हा पाऊस येत पाऊस 
मातीचा सुटला मस्त सुवास

 झंझावात वाहे उठे वादळ 
आभाळास मिळे पृथ्वीची धूळ 

 मेघांनी भरून आकाश वाके
 भूमीस आपल्या छायेत झाके 

अवचित लवे वीज साजिरी 
होतसे मीलन अश्रूंच्या सरी 

गरजे बरसे आसुसलेला 
पहिला पाऊस उल्हासलेला

आला हा पाऊस आला पाऊस 
मातीचा भरला उन्मत्त वास.

Monday, April 13, 2009

४. काही कविता २

खेळ मांडलेला तेव्हा
त्याचे खुळखुळे झाले,

ललाटीच्या भग्न रेषा
पायतळी ठसे ओले,

इथे तिथे व्यर्थ व्यर्थ
सारे सारे क्षुद्र झाले,

नाही सुटले काहीही
त्याने भलतेच केले,

खोळ काही काळ पुन्हा
मी टाकते गहाण,

आता त्याच्या पुण्याईला
उरे त्याचेच आव्हान

२७ फेब्रुवारी २००९ पहाटे ००.३० पुणे

Friday, March 13, 2009

३. भटकत फिरलो......

कवीला शब्दांमधून नेमकं काय सांगायचं असतं हा एक संशोधनाचा विषय... कवी सांगतात एक आणि आपण कदाचित त्याचा वेगळाच अर्थ लावतो... कवीने ते आपल्याला सांगितलेलं असतं का? ... एक अनुत्तरित प्रश्न...

"भटकत फिरलो भणंग आणिक
मिळेल तेथे पाणी प्यालो
जुळेल तेथे खूण जुळविली
परि होतो हा तसाच उरलो"

मर्ढेकरांनी १९५०च्या सुमारास लिहिलेल्या एका कवितेच्या या पहिल्या चार ओळी.....थेट मनाला भिडतात.... ठाण मांडून बसतात...

प्रत्येक वेळी या चार ओळी मला तितक्याच नव्या वाटतात. आपल्या देशात, संस्कृतीत विरक्तीचं, संन्यासाचं कौतुक आहे ... पण तो स्वेच्छेने असतो असं मानलं जातं म्हणून! भणंगपणा मात्र वाटयाला येतो... न मागताच... भटकंतीनंतरही तो उरतोच....तहान जागी ठेवून उरतो.

पहिल्या वाचनात या ओळी माझ्या अंगावर आल्या होत्या, त्यातली भीषणता, दाहकता मनाला चटका लावून गेली होती... कवितेची पुढ्ची तीन कडवी न वाचताच मी पान मिटून बसले होते..... आता अलिकडे मात्र या ओळी मला उदास करत नाहीत. "अखेर तसंच उरणार आहे" याची आठवण येऊन, या खटाटोपाची व्यर्थता जाणवून हसायला येतं ...

आपल्या भटकंतीचा शेवट आपल्या हातात आहे अशी मला आलेली आश्वस्तता किती खरी आणि किती खोटी हे काळच ठरवेल.... तेव्हा मला या ओळी आजच्यासारख्या वेढून टाकतील का?

Sunday, March 1, 2009

२. काही कविता: १

'अब्द शब्द'ची कल्पना आणि ही कविता यातलं कोण माझ्या मनात आधी आलं हे सांगणं अवघड आहे.....
म्हणून ही कविता या ठिकाणी....

चाल चालले मी
श्वास राहिला पेटता
पाणी उसळले किती
गूढ डोहाने जपता

जाणत्याला सारे भय
तण माजताना रानी
मस्तवाल झाले मी
त्याने तुला काय हानी?

वाया गेले एक तप
पुढे चालू राही धंदा
तुला नाही सुख दु:ख
तू रे पल्याड गोविंदा!

२६ फेब्रुवारी २००९ पुणे सकाळी ७.४०

Saturday, February 28, 2009

१. अब्द शब्द

आपली शब्दांशी जवळीक स्वाभाविक असते.... काहींच्या बाबतीत ती केवळ नेणीवेत राहते तर काहींच्या आयुष्यात ती खुलेपणाने प्रकट होते. सुदैवाने शब्दांची मला नेहमीचा सोबत राहिली.  

कविता हे शब्दांचं एक अनोखं रूप .... 'अब्द शब्द'मध्ये  मला आवडलेल्या कविता तुम्हाला वाचायला मिळतील ... ... काही माझ्या कविता असतील.... तुमची तयारी असेल तर तुमच्याही शब्दांना येथे जागा असेल .... 

शब्दांसाठी ही एक वेगळी जागा.