ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, October 22, 2011

९६. खेळ


माझी स्मरणशक्ती अगदी वाईट आहे, हे मी पूर्वीही तुम्हाला सांगितलं आहे – माझ्या सवयीप्रमाणे अनेकदा सांगितलं आहे बहुतेक! त्याबद्दल (म्हणजे अनेकदा सांगण्याबद्दल नाही तर स्मरणशक्ती वाईट असल्याबद्दल)  मी फारशी चिंता कधीच केली नाही आजवर. पण कधीकधी त्यामुळे मला अगदी कानकोंड व्हायला होतं. आजचा दिवसही त्यातलाच एक होता.

एका मीटिंगची तयारी करायची होती आणि दुसरं म्हणजे संध्याकाळी मला नेहमीपेक्षा एक तासभर आधी बाहेर पडायचं होतं – म्हणून सकाळी मी घरातून नेहमीपेक्षा लवकर बाहेर पडले. मेट्रो स्थानकात मी वेगळ्या वेळी आल्यामुळे माझ्याभोवतीची गर्दीही वेगळीच होती. नेहमीच्या सहप्रवासी स्त्रिया बोलत नसल्या तरी एकमेकींकडे पाहून आम्ही हसतो – इतकी दखल आम्ही नक्की घेतो. क्वचित कोणीतरी ’खूप दिवसांनी दिसताय तुम्ही’ असं मला म्हणते आणि मग मी माझ्या ताज्या प्रवासाचा वॄत्तांत तिला ऐकवते असंही घडतं. आजही मी खूप काळाने मेट्रोने चालले होते पण ओळखीचं कोणी मला भेटण्याची शक्यता नव्हती.

मेट्रो आली, त्यात चढले. बसायला जागा मिळाली. माझा मेट्रोचा प्रवास जमिनीखालून असतो, त्यामुळे बाहेर पाहण्यासारखं काही नसतं अंधाराव्यतिरिक्त. आतमध्ये मग उगाच नजर इकडे तिकडे फिरत राहते आणि अनोळखी लोकांकडे असं पहात राहणं (त्या सगळया स्त्रिया असल्या आणि पाहणारी मी पण एक स्त्री असले तरी) जरा विचित्र वाटतं. बरं, प्रवास जेमतेम वीस मिनिटांचा असतो माझा – त्यामुळे पुस्तक काढून वाचत बसायलाही फारसा वाव नसतो. मग डोळॆ मिटून बसणं हा एकमेव पर्याय राहतो.

मी डोळॆ मिटणार तेवढ्यात माझ्या समोर बसलेली एक तरूण मुलगी ’हॅलो’ असं म्हणत माझ्याकडे पाहून हसली. प्रतिक्षिप्त क्रियेने मी पण हसले – पण मी ’हॅलो’ म्हटलं नाही तिला. कारण ती मुलगी काही माझ्या ओळखीची नव्हती. बहुधा तिने माझ्या शेजारच्या एखाद्या स्त्रीला संबोधलं असावं असं मी गॄहित धरलं. ओळख नसली तरी हसायला चालतं मला – बोलायलाही चालतं म्हणा! एरवी बोललेही असते मी – पण आज गप्प बसले.

माझ्या डाव्या –उजव्या बाजूच्या दोन्ही स्त्रिया किंवा खरं तर आजुबाजूचं  कोणीच त्या मुलीशी काही बोललं नाही म्हणून मी जरा विचारात पडले. हे अर्थात लिहायला भरपूर वेळ लागतो आहे – पण तुम्हाला वाचायला जेवढा वेळ लागतो आहे त्याच्या शतांश कालावधीत हा प्रसंग घडत होता. मी त्या मुलीच्या चेह-याकडे पहात होते. तिला एकदम अपमान झाल्यासारख वाटलं आणि तिच्या चेह-यावरचं हसू मावळलं. तिचे डोळे एकदम निराश झाल्यासारखे वाटले. तिने एकदम नजर खाली झुकवली आणि मोबाईलचा इअरफोन काढून ती गाणी ऐकायला लागली. पण ती अस्वस्थ झाली होती.

अस्वस्थ तर मी पण झाले होते – कारण त्या मुलीला मी कुठतरी पाहिलं आहे असं मला तोवर वाटायला लागलं. मेंदूला ताण दिल्यावर तिचा चेहरा, तिचं हसणं, तिचा आवाज, तिचे डोळॆ ….. सगळे माहितीचे आहेत असं वाटायला लागलं. ही मुलगी मलाच ’हॅलो’ म्हणाली याची मला खात्री पटली. मग मी तिच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करायला लागले पण आता ती माझ्याकडे बघतही नव्हती. आमच्यातलं  ते दोन तीन फुटांच अंतर एकदम मैलांच झालं जणू. एकदा मला वाटलं, की बसायला मिळालेली जागा सोडून तिच्याजवळ जावं आणि तिच्याशी बोलावं. पण मला आता तिची खात्री नव्हती. आणि आता ती माझ्याकडे बघतही नव्हती त्यामुळे ती माझ्याशी बोलली होती की आणखी दुस-याच कोणाशी अशी शंका माझ्या मनात परत निर्माण झाली.

माझ्याही नकळत मी तिच्याकडे पहात राहिले. जितक जास्त पहावं तितक ती मुलगी ओळखीची आहे असं मला वाटायला लागलं. माझी तिच्यावर सतत रोखलेली नजर तिला जाणवली असावी, कारण तिनेही परत एकदा माझ्याकडे पाहिलं. तो क्षण अचूक पकडून मी तिला विचारलं, “रोज तुम्ही मेट्रोने येता का?”

तिने नुसतीच मान डोलावली. पण आता तिचा चेहरा जरा सैलावला. तेवढा धागा पुढे नेत मी पुन्हा म्हणाले, “पण आपण आज पहिल्यांदाच मेट्रोत भेटतो आहोत, नाही का?”

आता ती छान हसली. मग म्हणाली, “आज चाणक्यपुरीच्या कार्यालयात येणार आहेस का? रेस कोर्स स्थानकावर उतरायला लागेल आपल्याला ……”

तिचा आवाज ऐकून मला एकदम कळल की ही शहनाज आहे.

आणि मला स्वत:ची लाज वाटली.

शहनाजला मी गेले एक वर्षभर ओळखते. तिला मी किमान पंचवीस वेळा भेटले आहे. तिच्याशी मी किमान शंभर वेळा फोनवर बोलले आहे – शहनाज माझ्या एका ऑफिसमधली रिसेप्शनिस्ट –टेलिफोन  ऑपरेटर आहे.

शहनाज स्वभावाने फार चांगली आहे. ती कार्यतत्पर आहे. तिच्या कामाची गुणवत्ता नेहमी चांगली असते. ती अनेक गोष्टी स्वत: होऊन करते – तिच्यात सांगकामेपणा अजिबात नाही. तिने मला अनेकदा मदत केली आहे. मी कधीही त्या कार्यालयात गेले की शहनाज माझ स्वागत करते, मी कशी आहे ते विचारते, मला आवडते ती  कॉफी  देते. आणि मुख्य म्हणजे फक्त माझ्याशीच नाही तर कार्यालयात येणा-या सगळ्यांशी शहनाज तितक्याच अगत्याने वागते. आणि हे ती सगळ मनापासून करते. माझ शहनाजबद्दल फार चांगलं मत आहे – तसं मी त्या कार्यालयाच्या वरिष्ठ अधिका-यांना एकदा लेखी कळवलंही आहे.

मी आता शहनाजशी मनापासून गप्पा मारते. पाचच मिनिटे मिळतात आम्हाला कारण रेस कोर्स स्थानक आता आलंच आहे. शहनाज आता मनापासून हसते आहे. मेट्रोतून ती उतरते, दरवाजे बंद होतात तेव्हा हात हलवून आम्ही एकमेकींचा निरोप घेतो. मी अजूनही अस्वस्थच आहे.

मी शहनाजला लगेच का ओळखलं नाही हा प्रश्न मला पुन्हा एकदा सतावतो आहे. कोणीतरी खूप काळाने भेटल्यावर, कोणीतरी तितक्या नियमित न भेटणारं समोर आल्यावर मी न ओळखणं  स्वाभाविक आहे. पण मला नेहमी भेटणा-या, जिच्याबद्दल माझ चांगलं मत आहे अशा मुलीला मी ओळखू नये याच मला वाईट वाटलं.

एक शक्यता आहे की शहनाज मेट्रोत भेटेल असं मला वाटलं नव्हतं – त्यामुळे अनपेक्षितपणॆ एखादी व्यक्ती भेटल्यावर आश्चर्य वाटावं हे बरोबर आहे, पण ओळखच पटू नये हे काय आहे? शहनाजला मी एका विशिष्ट भूमिकेत कार्यालयात पाहिलं होत नेहमी – एक माणूस म्हणून मी तिला आजवर कधी पाहिलंच नव्हतं का? माणूस म्हणजे त्याचं/तिचं काम – अशी तर माझी काही धारणा होऊन नाही ना बसली?  स्वत:च्याच विश्वात मग्न होऊन मी इतरांची जाणीवही न राहण्याइतपत असंवेदनशील तर नाही ना बनले? माणसांना विसरणं हा माझा स्वभाव बनत चाललाय का? तंद्रीत राहून मी वास्तवापासून तुटत तर नाही  ना चालले?

माझ्या आयुष्याला एक विलक्षण गती आहे, त्यात सतत नव्या गोष्टी घडत राहतात. त्यामुळे जुन्या गोष्टी मागे पडत जातात; त्याचे फायदेही आहेत. पण सतत जुन्याची जागा नव्याने भरून काढणं  असा एक खेळ तर मी खेळत नाही ना? जगणं  म्हणजे जणू मनाचा एक खेळ आहे अशा माझा अविर्भाव आहे का? त्यातून काय निष्पन्न होणार आहे नेमकं? आता हात पाय चालते फिरते आहेत, इंद्रिय शाबूत आहेत म्हणून दरवेळी हा खेळ तितक्या उत्साहाने मला खेळता येतो.

पण समजा मला दीर्घायुष्य मिळालं तर असाही एक काळ येईल की जेव्हा  निसर्गनियमानुसार मला नवं काही रचता येणार नाही. जे रचलं ते सगळं  नामशेष होत जाणार हळूहळू. मग जेव्हा नवं काहीच घडणार नाही आयुष्यात, तेव्हा मला जुनं नेमकं काय आठवेल? आणि जे जुनं मला आठवेल – ती माणसं, त्या  जागा, ते क्षण तोवर माझे उरतील का? आणि ते जर नसतील तर जी पोकळी निर्माण होईल, त्यात मला आजच्यासारखा नवा खेळ रचता येईल का? 
*

6 comments:

 1. It happens sometime with me too. But never thought about how it would be in the future. It is scary .. is it not?

  Sangita

  ReplyDelete
 2. माझ्याबरोबरही झाल आहे ग अस... खरच असे खेळ रचता येतील का पुढे...

  ReplyDelete
 3. देवेन, बहुतेक येतीलच रचता .. सवय असेल स्वत:ला तर ती तर!!

  ReplyDelete
 4. mast shevtche 2 paragraph kharach sundar....aplyala nehmi navinyachi aas aste pan kadhi kadhi navinya shodhtana apan aplyahi naklat junya goshtina visrun jato ki jyaat aplyala ananda milalela asto....

  ReplyDelete
 5. प्रज्ञाजी, हो, काळाच्या प्रवाहात मागे पडलेल्या अथवा नामशेष झालेल्या सगळ्याच गोष्टी वाईट (किंवा चांगल्या) होत्या अशा टोकाला आपण माणसं कधी कधी जातो. पण खर म्हणजे प्रत्येक क्षणाच एक देण असत आपल्याला ...आणि म्हणून त्याच महत्त्वही.

  ReplyDelete