ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Sunday, March 7, 2010

२३. नाडयावर चाले....

अनेक न कळलेल्या आणि तरीही मला आवडणा-या कवितांमध्ये या ऒळी इतक्या वर्षांनंतरही कायम आहेत.

तशी बोरकरांना एकदा ऐकण्याची मला संधी मिळाली होती. पुण्यातल्या चित्तरंजन वाटिकेत (हे एका बागेचं नाव आहे), रविवार सकाळच्या त्यांच्या मैफिलीत मला आमच्या होस्टेलच्या रेक्टरने आग्रहाने नेलं होतं. एक तर रविवारी सकाळीही लवकर उठावं  लागण्याचा वैताग, रेक्टरांच्या माझं व्यक्तिमत्त्व घडवण्याच्या उत्साहाचा राग.. अशा मिश्र भावनांनी मी त्या प्रसंगात हजर होते. शाळेत बोरकरांच्या काही कविता वाचल्या असल्या, अगदी पाठही केल्या असल्या (मार्कांसाठी! दुसरं काय?) तरी त्यांचं  कवी म्हणून असणारं मोठेपण मला तोवर नीटसं समजलेलं नव्हतं    - हे अर्थातच माझ करंटेपण. त्या भल्या सकाळच्या प्रौढांच्या गर्दीत मला पाहून बोरकर माझ्याशी दोन प्रोत्साहनपर शब्द बोलले होते इतकं आठवतं ... काय ते मात्र अजिबात आठवत नाही. त्याच मला तेव्हा अप्रूप वाटलं नव्हतं इतकंच खरं! 
असो.

नाडयावर चाले जशी सोनचेडी
तशी माझी नाडी चालवी तू
गर्दीच्या आरोळ्या ऐकू नेदी कानी
किंवा तृप्त ध्वनी टाळियांचे
दिसो नेदी डोळा प्रकाश वा दिशा
घेतलेली रेषा सुटो नेदी
खुर्द्याचे खाविंद करू देत सौदा
तू मात्र गोविंदा सांडू नको.

Friday, February 26, 2010

२२. घडयाळवाला

काही अनुभव वरवर पाहता अगदी छोटेसे दिसतात. पण ते आपल्याला बरेच काही देऊन जातात. त्याचेच हे एक उदाहरण.

माझे घडयाळ थोडे गंमतीदारपणे वागत होते! म्हणजे ते चालत होते, पण बरोबर विरूद्ध दिशेने! पाच वाजून गेल्यावर चार वाजायचे आणि नंतर साडेतीन! मी नवे घडयाळ विकत घ्यायला गेले. तिथला विक्रेता सुनील मला घडयाळे दाखवत होता. मी माझे जुने घडयाळ त्याला दाखवून तसेच नवे घडयाळ द्यायला सांगितले.

सुनील म्हणाला, "हेच घडयाळ मी तुम्हाला दुरुस्त करून देतो. कशाला उगीच जास्त पैसे खर्च करता?"

"तुम्ही नवे घडयाळ विकून फायदा कमावण्याऐवजी जुनेच घडयाळ दुरुस्त का करून देत आहात?", मी आश्चर्याने विचारले. सुनील हसून म्हणाला, " घडयाळ विकणे हे माझे काम आहे. पण घडयाळाच्या खपाचा नुसता आकडा महत्त्वाचा नाही. मी विकलेले घडयाळ चांगले चालणेही तितकेच महत्त्वाचे आहे."

सुनीलने माझे जुने घडयाळ व्यवस्थित करून दिले. जवळजवळ सहा महिने ते छान चालले. एके दिवशी टेबलावरून खाली पडल्यावर मात्र ते बंद पडले.

परत मी त्याच दुकानात गेले. सगळी कहाणी सांगून मी सुनीलला नवे घडयाळ दाखवायला सांगितले. सुनील म्हणाला, "मी दुरुस्त केलेले घडयाळ असे बंद पडायला नको होते. मी जरा एकदा बघतो." हे घडयाळ आता पुन्हा चालेल असे मला वाटत नव्हते. त्यामुळे मी दुरूस्तीस फार काही उत्सुक नव्हते. ते ऒळखून सुनील म्हणाला, " आम्ही घडयाळाच्या दुरुस्तीवर एक वर्षाची हमी देतो. त्यामुळे यावेळी तुम्हाला त्याच्या दुरुस्तीचे वेगळे पैसे द्यावे लागणार नाहीत. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, उगीच नवे घडयाळ खरेदी करण्याची घाई करू नका. "

सुनीलने माझे घडयाळ नीट करून दिले. ते वर्षभर व्यवस्थित चालले. त्यानंतर घरात चोरी झाली तेव्हा इतर अनेक वस्तू गेल्या त्यात हे घडयाळही गेले. ज्या चार मैत्रिणींनी वीस वर्षांपूर्वी मला हे घडयाळ दिले होते, त्यातली एक तर हे जगही सोडून गेली.

माझे काम योग्य असले पाहिजे असे मानणारा ........... घडयाळ विक्रीचे टार्गेट पूर्ण करताना गुणवत्तेशी तडजोड न करणारा ....... काही बिघडलेच तर त्याची पूर्ण जबाबदारी घेऊन ते काम तडीस नेणारा हा विक्रेता....

आपल्या अवतीभवती अशी अनेक माणसे आहेत.. ती भेटली की उत्साह वाढतो, आशा वाटते. आपल्यावरच्या जबाबदारीचे भानही येते.
*

Saturday, February 6, 2010

२१. काही कविता: ९ अप्राप्य

अप्राप्य आहे
तो तीर
म्हणून कदाचित
त्याची अशी
अनावर ओढ....

बेगुमान
हरपून टाकणारे
एकलेच
चिरंतन भटकणारे
मनाचे घोर वेड.....

प्राप्य जे
त्याचे इथे तिथे
पोसून झाले आहे
विणून घेतले आहेत
सारे पीळ, पेड...

देहाच्या या
पुरातन चक्राखातर
निमूट बराच
वेढून घेतला आहे
जगरहाटीचा जोड....

प्रवास
जीर्णशीर्ण होत जाताना
उरला नाही
काही मोह
यत्किंचितही तेढ....

अप्राप्य तू
असेच रहावे
एवढेच मागणे
बाकी सारे
बिनधास्त माझ्यावर सोड...


पुणे १३ सप्टेंबर २००५ ०२.००

Saturday, January 30, 2010

२०. नक्षत्रांचे देणे

आरती प्रभू याच्या शब्दांत नेहमीच ठसठसणारे दुःख असे ओतप्रोत भरलेले असते. आयुष्याच्या एखाद्या अचानक समोर आलेल्या वळणावर ’आता नक्की रस्ता चुकला बरं का आपला, परतीची वाट नाही यापुढे ’ अस मलाही कधीकधी वाटून जात. आणि ही कविता वाचताना तर नक्कीच तस वाटत. सगळी ताकद संपल्यावर मनाचा दगड उशाला घेऊन कण्हत झोपणे तुमच्या आमच्या सर्वांच्याच वाटयाला येते, पण ते दाहक सत्य इतक्या निरपेक्षपणे केवळ आरती प्रभूच व्यक्त करू शकतात. कवीच्या या सामर्थ्याचा मला हेवा वाटतो कधीकधी. अर्थात त्यासाठी कवीने मोजलेली किंमत माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या कुवतीच्या तर सोडाच, कल्पनेच्याही बाहेरची आहे.

तरी अनेक प्रश्न पडतातच. कविता वाचताना, तिचा अर्थ लावण्याची धडपड करताना, तिच्या सान्निध्यात मनावर चढणा-या मळभाकडे त्रयस्थपणे पाहताना... मागे उरलेल्या पाचोळ्यात जीव गुंतताना....

काहीतरी समजल्यासारख वाटतं ही कविता वाचताना पण तरीही काही तरी सुटतेच हातातून...

गेले द्यायचे राहून
तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्यापास आता कळया
आणि थोडी ओली पाने.

आलो होतो हासत मी
काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे आता ओझे
रात्र रात्र सोशी रक्त

आता मनाचा दगड
घेतो कण्हत उशाला
होते कळ्यांचे निर्माल्य
आणि पानांचा पाचोळा.

Saturday, January 23, 2010

१९. दहा रूपयांची सत्ता

पैशांना किती किंमत असते? हा प्रश्न तसं पाहायला गेल तर चमत्कारिक वाटतो. त्या त्या नाण्यावर किंवा नोटेवर जी काही किंमत लिहिली असेल ती - हे तर चिमुरडी मुलं- मुलीसुद्धा हसत हसत सांगतील. आपल्याच शहरात आपण वावरत असतो तेव्हा हे बरोबर असतं, पण जरा वेगळ्या जगात भटकायला गेल की सगळ चित्र बदलून जात. मी अर्थातच अमेरिका किंवा युरोपच्या सहलीविषयी बोलत नाही. विनिमयाच माध्यम बदललं म्हणून केवळ तिथे आपल्या पैशांची किंमत कमी होते अशातला भाग नाही. तो एक वरवरचा व्यावहारिक मुद्दा झाला. पण त्याच्या खोलात आत्ता नको जायला. आपल्याच देशात वावरतानासुद्धा पैशांची किंमत अनेक वेळा बदलत जाते या गोष्टीवर सहजासहजी कोणाचा विश्वास बसणार नाही हे मला माहिती आहे. माझा तरी कोठे होता विश्वास?

उत्तर प्रदेशातील चित्रकूट भागात पहिल्यांदा गेले, तेव्हा राहण्याच्या ठिकाणापासून कामाच्या ठिकाणी रोज ये-जा कशा पद्धतीने करायची हा प्रश्न उपस्थित झाला. चित्रकूट तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असल्याने रस्त्यांवर गर्दी भरपूर, पण माणस तिथे क्वचितच एकटी येतात. माझ राहण्याच ठिकाण आणि कामाच ठिकाण यात किमान पंधरा किलोमीटरच अंतर असल्याने रोजचा प्रवास अटळ होता.

इतकी गर्दी या शहरात असूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मात्र काहीच पत्ता नाही. लोकांनी आपली आपली काय ती व्यवस्था लावून घ्यावी, त्यातून जे काही हितसंबंध निर्माण होतील, त्यातून आपल्या बळावर मार्ग काढावा असं बहुधा शासनाच्या मनात असावं. लोकांनी पण याचा आनंदाने स्वीकार केला असावा असं दिसतं. कारण जिकडे तिकडे खांद्यावर बंदूक लटकवून लोक - म्हणजे पुरूषवर्ग - रोजच्या व्यवहारात मग्न असतात. बंदूक घेऊन चहा पीत बसलेले पुरूष, एका हातात बंदूक धरून एकमेकांना टाळी देत मनसोक्त हसणारे पुरूष , हे इथलं अगदी नेहमीचचं दृश्य!

असल्या असुरक्षित वातावरणाची मला सवय नसेल असं वाटून तिथेले माझे सहकारी माझी फार काळजी घ्यायचे. सकाळी घ्यायला यायचे, संध्याकाळी सोडायला यायचे. पण तीस किलोमीटरचा फेरा म्हणजे आपल्या सहकारी कार्यकर्त्यांच्या वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय असं मला सारखं वाटायला लागलं. तोवर खूप वेळा जाऊन माझ तिथलं पाहुणेपणही संपुष्टात आलं होतं.

मग पर्याय निघाला सहा आसनी रिक्षांचा. अर्थात सहा आसनी हे केवळ म्हणण्यापुरतं झालं. या रिक्षात कमीत कमी पंधरा प्रवासी भरायचे, असा तिथला अलिखित नियम. एवढ्या गर्दीत विड्या, दारू, गुटखा यांचे वास अंगावर घेत प्रवास करणं जिवावर यायचं. कितीही अंग चोरून बसलं तरी सहप्रवाशांचे आगंतुक स्पर्श झेलावे लागायचेच. हे सगळं करून मी कामाच्या जागी थेट पोचायचे नाही. त्यासाठी पुन्हा काही अंतर सायकलरिक्षाने काटावं लागायचं. संपूर्ण अंतर सायकलरिक्षाने एकदा गेले, तर भरपूर वेळ लागला. शिवाय सायकलरिक्षावाल्याला लागलेला दम पाहून मला अपराधीपण आलं.

स्थानिक प्रवासाच्या या प्रश्नावर उत्तर शोधण्याची मनाची नकळत बरीच धावपळ चालली असणार यात काहीच शंका नाही. एका सकाळी एका रिक्षावाल्या माणसाला मी धीर करून विचारलं, "पुढे तुम्ही किती माणसं बसवता?" त्याने जरा चमत्कारिक नजरेनं पाहिलं. तो म्हणाला, "आहे ना जागा, बसून घ्या." तरी पण मी तोच प्रश्न विचारल्यावर त्याने "तीन" असं उत्तर दिलं. प्रवासी फारसे नसल्यामुळे त्याला थोडा मोकळा वेळ होता. मला कुठे जायच आहे याची त्याने विचारणा केली. "पाच रूपये सीट, पाच रूपये सीट" असं ओरडत तो आणखी प्रवासी शोधू लागला.

मी त्याला म्हटलं, "मी पुढे बसते. मी तुम्हाला तीन प्रवाशांचे पैसे देते. तुम्ही कोणालाही पुढे बसवू नका." तो चांगल्यापैकी गोंधळला होता. तीन- चार लोकांनी मिळून प्रवास केला तर वाद घालून कमी पैसे द्यायची इथली पद्धत. अशा स्थितीत कोणी एकटंच प्रवास करून तीन लोकांचे पैसे द्यायला का तयार होतं आहे, हे त्याला समजत नव्हतं. माझा हिशोब सोपा होता. दहा रूपये खर्च करून मी माझी सोय बघत होते. पण त्या भागात दिवसभराचा खर्च भागविण्यासाठी दहा रूपये जवळ असणं ही चैनीची परिसीमा आहे. अशा वेळी कोणी दहा रूपये असे हकनाक कशाला उडवेल?

बराच वेळ मी त्याला तेच सांगत होते आणि तो नुसताच हसून दुर्लक्ष करत होता. मी त्यावेळी उत्तर प्रदेश सरकारच्या विश्रामगृहात राहत होते. मी बराच वेळ रिक्षावाल्याशी बोलतेय हे पाहिल्यावर तिथला एक कर्मचारी धावत माझी मदत करायला आला. त्याने मग त्या रिक्षावाल्याला सांगितलं, " मुंबईच्या आहेत
मॅडम."

स्वत:च्या सोयीसाठी दहा रूपये खर्च करणं म्हणजे फार मोठी चैन झाली तिथल्या हिशोबाने. सहा आसनी रिक्षात मी पुढच्या सीटवर एकटीने बसून केलेला प्रवास हा लोकांच्या कुतुहलाचा आणि चर्चेचा विषय झाला. दर दोन मिनिटांनी रिक्षा प्रवाशांसाठी थांबायची. पुढे मोकळ्या दोन जागा पाहून प्रवासी ऐटीत पुढे यायचे आणि रिक्षावाला त्यांना मागे जायला सांगायचा. पुढे मोकळी जागा असताना मागे का जावं लागत आहे हे त्यांना समजत नसे. मग मागे बसलेल्या प्रवाशांपैकी कोणीतरी स्पष्टीकरण देई, " मॅडम तीन सीट का पैसा दे रही है". माणस अवाक होत. मग आणखी कोणीतरी कुजबुजे," मॅडम बंबई से आयी है".

मग हे नेहमीचचं झालं. रिक्षावाल्यांना पण ही व्यवस्था सोयीची होती, कारण त्यांना दोन प्रवासी कमी शोधायला लागायचे. एखाद्या रिक्षात पुढे कोणी प्रवासी बसले असतील तर त्यांना उठवू नका, अशी मी रिक्षावाल्यांना विनंती करायचे. आपल्याकडे त्यांच्यापेक्षा दहा रूपये जास्त आहेत, हा केवळ सुदैवाचा भाग आहे याची मला जाणीव होती.

मी दूरवर दिसले की ते पुढे बसलेल्या प्रवाशांना मागे बसवायचे. कधीच कोणा प्रवाशाने " मी उठणार नाही, त्यांच्याकडे पैसे जास्त असले म्हणून काय झालं?" असं प्रत्युत्तर दिलं नाही. "एवढी पैशांची मस्ती असेल तर स्वतःची गाडी घेऊन हिंडा" असा अनाहूत सल्लाही मला कोणी दिला नाही.

चार साडेचार वर्षांच्या काळात किमान पंचवीस वेळा मी चित्रकूटला गेले असेन, त्या सगळ्या काळात स्थानिक प्रवास मी असाच केला. दहा रूपयांत घेता येईल तितकं सुख विकत घेण्याचा मी प्रयत्न केला.

मी खरे तर दहा रूपयांची सोय घ्यायला गेले, दहा रूपयांच सुख मिळवायला गेले. ते तर मला मिळालच,पण त्याचबरोबर मिळाली दहा रूपयांची सत्तादेखील! ही काही अनिर्बंध सत्ता नव्हती, पण ती ठोस होती.

पैशांची किंमत नोटेवरच्या आकडयावरच अवलंबून नसते. इतरांच्या तुलनेत पैसा तुम्हाला काय मिळवून देऊ शकतो, यावर पण ती अवलंबून असते तर! पैसे मिळवताना सत्तेची ही सुप्त प्रेरणा तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात असणारच. म्हणूनच आपण सारे कदाचित पैशांच्या मागे धावतो. सुखाची प्रेरणा स्वाभाविक आहे, पण सत्तेची ऊर्मी आपल्याला टाळता येईल का? एकदा इतर व्यक्तींच्या मापाने आपण आपल्याला तोलायला लागलो की सुख आणि समाधान हाती लागण्याची शक्यता दुरावणारच....पैसा कितीही असला तरी! म्हणून आपल्यावर पैशांची सता चालणार की नाही हे आपल्यालाच ठरवावं लागतं ---- कितीही कठीण असलं तरी!

पूर्वप्रसिद्धी: तनिष्का, आगस्ट २००९ **

Thursday, January 14, 2010

१८. काही कविता: ८ सख्य

आपण ज्या समाजात वावरतो, ज्या संस्कृतीत वाढतो, त्याचा आपल्यावर कळत नकळत - बरेचदा नकळतच! - फार मोठा पगडा असतो. माझ्या कवितांमध्ये जेव्हा जेव्हा कृष्ण प्रकटतो, तेव्हा त्याच्या अचानक येण्याने मी आश्चर्यचकित होते.

मी कोणत्याही अर्थाने धार्मिक नाही. मी व्रत करत नाही, उपास करत नाही, नवस करत नाही, पूजा करत नाही. मला देऊळ आवडते, पण मी देवाला नमस्कार करत नाही. या जगात आपल्याला न कळणारे बरेच काही आहे हे मला जाणवते. दुःख दिसते तसेच सुखही दिसते. या शक्तीचा शोध मानवी मनाच्या पल्याड आहे आणि तो माझा प्रांत नाही असे मी स्वतःला फार पूर्वी सांगितले आहे.

कृष्ण मला माहिती नाही असे नाही. लहानपणापासून अनेक गोष्टी ऐकताना तो भेटला आणि त्याचा खोडकरपणा आणि त्याचे शूरपण भावले. मोठेपणी भगवद्गीता वाचायची संधी मिळाली. ती समजली नाही अजुनही, पण त्याची भव्यता आकर्षक वाटली. हा लोणी वगैरे चोरून खाणारा आपल्या लहानपणीचा कृष्ण तत्त्ववेत्ता आहे हे लक्षात आल. पुढे एकदा नेटाने मी संपूर्ण महाभारतही वाचल.. त्यातला मानवी मनाचा व्यापक आवाका पाहून मन थक्क झाल.

ते सगळ नेणीवेत रूजले असणार आणि संधी मिळताच मला त्याची जाणीव करून देत असणार...अन्यथा या कल्पनेचा दुसरा काय अर्थ लावणार?


सुदाम्याने पोहे केले,
मला बोलावले;
कृष्ण होता भुकेजला,
त्याला सारे दिले.

कृष्ण तृप्त झाला,
जरा डोळाही लागला;
स्वप्न त्याने पाहिले,
त्याचा अंश मला आला.

सख्य ओतप्रोत दिले,
जिणे बहकून गेले;
सावळ्याच्या सावलीला,
मीच घुंगरू बांधले.

पुणे, ८ नोव्हेंबर २००५ ११.५०

Friday, January 8, 2010

१७. अज्ञेयाचे रुद्धद्वार

काही वेळा शब्दांचा अर्थ लागत नाही पण त्यामागची भावना आपल्यापर्यंत पोचते. हे नेमके कसे घडते ते सांगता येत नाही, ते शब्दांत पकडता येत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही कविता वाचताना मला हा अनुभव आला. एकदा नाही, तर अनेकदा आला. आजही ही कविता मला नीट ’समजलेली’ नाही, पण ही माझी एक आवडती कविता आहे.

आणखी एक मुद्दा. बुद्धिवाद आणि कविता यांचा काही संबंध असतो अस मला कधीच वाटल नव्हत. ही कविता वाचताना कविता म्हणजे नुसता भावनांचा झंझावात असत नाही, तर त्यात विचारांनाही स्थान असते हे मला अगदी पटलेच म्हणा ना!

ज्या घरापासुनी मार्ग सर्व फुटणारे
येणार घरासी मार्ग त्याची ते सारे

ऐकोनी तुझ्या भाटांच्या
गप्पांसी गोड त्या त्यांच्या
घ्यायासि विसावा माझ्या
जीवासि ये घरी तुमच्या

ठोठावित थकलो! अजुनि नुघडतो बा रे
आंतूनि तुझी ती बंद सदोदित दारे

अशी शॊधाची साद देणारी ही एक वेगळीच कविता. हा शोध घेताना कवी काही शक्यता बाकी ठेवत नाही. तो पुराण कथांचा वेध घेतो, परपरेच्या मांदियाळीत सामील होतो, एकान्तपथाचीही कास धरतो. अगदी अणुंच्या बोगद्यातून हिंडून कवी अनंतत्त्वाचा शोध घेतो.

अखेर कवी म्हणतो,

घर दुजे बांधु देईना
आपले कुणा उघडीना
या यत्न असा चालेना
बसवे न सोडुनी यत्ना

ठोठावित अजि मी म्हणुनि पुनरपि बा रे
ती तुझ्या घराची बंद सदोदित दारे!

कवितेचे फक्त पहिले आणि शेवटचे कडवे येथे आहे. मूळ कविता वाचायला तुम्हाला नक्कीच आवडेल!