ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, July 9, 2010

३४. जीवो जीवस्य...

आज खूप दिवसांनी दुपारच्या वेळी मी घरात होते. रणरणत्या उन्हामुळे आसमंत चिडीचूप होता. मी राहते त्या भागात बरीच झाडे आहेत. मी खिडकीतून दिसणा-या झाडांकडे नुसतीच निरर्थकपणे पाहत होते. इतक्या उन्हात यांच्या आत काय लगबग चालू असेल, याचही मला कुतुहल होतं! इतक्यात एका फांदीवरून खार धावत गेली. तिच्या पुढेमागे कोणीच नव्हतं खर तर! याच बाईसाहेबांची दुपारच्या वेळी इतकी धांदल का चालली होती?

क्षणार्धात एक जुनच चित्र माझ्या डोळ्यांपुढे उभ राहिलं! तो क्षण आठवला की अजून माझ्या काळजाचा एक ठोका चुकतो. मी तेंव्हा नेमके काय करायला हवे होते? काहीच न करता नुसतीच अलिप्तपणे मी बघत राहिले, ते बरोबर की चूक? परिस्थितीची नीट माहिती न घेता आपल्या बळाच्या आधारावर कोणा एकाची बाजू मी उचलून धरणे योग्य झाले असते का?

पॉंडिचेरीला होते मी. अरविंद आश्रमाच्या परिसरात राहत होते. अरविंदांची काही पुस्तके तेथे बसून नीट वाचावीत या इराद्याने गेले होते, त्यामुळे तेथे बरेच महिने माझा मुक्काम होता. आश्रमाचे ग्रंथालय छानच होते (अजूनही आहे!). पुस्तकांचा संग्रह तर चांगला होताच, शिवाय वाचत बसायची जागा निवडायलाही पुष्कळ वाव होता. मी बहुधा पहिल्या मजल्यावरच्या उघडया गच्चीत बसायचे. सावली देणारा कोपरा एक दोन दिवसांतच ध्यानात आला. डॊळे पुस्तकातून उचलून समोर पाहिले की चकाकणारा निळा आणि संथ समुद्र दिसायचा. त्याच्यावरून येणा-या वा-याच्या झुळुकांनी जवळपासची झाडे जणू खुषीत नाचायची. गच्चीतल्या मोकळ्या जागेत फुलझाडांच्या ब-याच कुंडया होत्या. त्यांच्या संगतीत एकूण छान चालला होता माझा वाचनाचा कार्यक्रम.

तिस-या चौथ्या दिवशी खारींची वर्दळ सुरू झाली. आधी त्या बहुधा मला बिचकल्या होत्या. पण आता त्यांनाही माझी सवय झालेली दिसत होती. अगदी निर्भयपणे, आत्मविश्वासाने त्या आमच्यासमोर (आणखी एक दोन जण असायचे वाचत बसलेले!) वावरायच्या. हातभर अंतरावरून बिनधास्त धावायच्या. कधी एखादी खार निवांतपणे समोर बसून टुकूटुकू पाहत राहायची - तत्त्वचिंतक असल्याचा आव आणत! फार गंमत वाटायची मला. दोन तीन तास मी माझ्या ठराविक खुर्चीत बसून असायचे. थोडा वेळ अरविंद वाचणे आणि बाकी वेळ समुद्र आणि खारी पाहणे असे माझे एकंदर छान चालले होते.

एक दिवस मी नेहमीच्या वेळी ग्रंथालयात गेले. सायकल लावून प्रवेशद्वारात येते तोच डावीकडे झुडुपात असलेले मांजर इमारतीच्या पाठीमागे धावले. एकदम सात आठ खारींचा चित्कार मला ऐकू आला. काही कळायच्या आतच इमारतीला मागच्या बाजूने वळसा घालून तो बोका माझ्यासमोर उभा होता.

ही सगळी घटना सेकंदाच्या जणू काही अंशातच घडली. मी अद्याप खारींच्या आवाजाचा वेध घेत होते, तोवर हे बोकोबा माझ्यासमोर उभे ठाकले. त्याला पळ काढायला पुष्कळ वाव होता, तरीही तो बोका उभा का राहिला हे मला आजतागायत कधी कळले नाही. तो बोका तसाच उभा होता म्हणून माझी नजर अजाणता त्याच्याकडे वळली! क्षणभर माझी नजर गोठलीच. त्या बोक्याच्या तोंडात एक खार होती. सुटकेसाठी ती धडपडत होती. आणि एखाद्या विजयी वीराच्या थाटात बोका माझ्यासमोर उभा होता.

मी झटकन खाली पाहिले. आसपास एकही दगड नव्हता. बोक्याला काहीतरी फेकून मारले की स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तो खारीला सोडेल असा माझा हिशोब होता. बोका बिथरू नये म्हणून मी सावकाश हालचाल केली. एक पाय वरती उचलून हातात चप्पल घेतली. खार अजून तडफडत होती. बोका शांतपणे माझ्यासमोर उभा होता.

बोक्याच्या त्या नजरेने माझे अवसान गळाले. मला वाटले, आपण फक्त आपल्याच भावनेचा विचार करतो आहोत! ’जीवो जीवस्य जीवनम’ हा तर निसर्गाचाच न्याय आहे! रोजच्या सहवासामुळे आपल्याला खारीबद्दल जास्त आत्मीयता वाटते आहे. पण ही खार म्हणजे त्या बोक्याचे अन्न आहे. एवढया चपळ खारीला पकडण्यासाठी त्या बोक्यालाही काही कमी श्रम करावे लागले नसतील! त्याच्या तोंडचा घास काढून घेण्याचा मला काय अधिकार? निसर्गाने सर्वांना लढण्याची अस्त्रे दिली आहेत, तशीच बचावाचीही! आजवर किती खारी या बोक्याच्या तावडीतून निसटल्या असतील, पण आज बाजी याने मारली आहे. मी बळ वापरले तर कदाचित ही खार सुटेलही. पण या घटनेत मी मध्येच नाक खुपसणे न्याय्य होईल का?

माझा पुतळाच झाला होता. या विचारांच्या आंदोलनात मी गुंतलेली असतानाच खारीची तडफड संपली. बोका मला ओलांडून शांतपणे पुढे गेला. या सगळ्या घटनेला इतका कमी वेळ लागला की आसपासच्या माणसांना काही पत्ताही लागला नाही.

मला ती खार आठवते. तो बोका आठवतो. अनेक प्रसंग आठवतात. माणसे आठवतात. स्वत:च्या करण्याचे आणि नाकर्तेपणाचे सोयिस्कर समर्थन मला करता येते. पण दर वेळी मी न्याय्य बुध्दीने वागले असा कौल माझे मन मला देत नाही. मनालाही निसर्गाची एक गती आहे. त्या गतीचे मी समर्थन करते आहे का? पण ते तरी न्याय्य ठरते का?

पूर्वप्रसिद्धी: मुंबई तरूण भारत, १० जुलै १९९६

Saturday, July 3, 2010

३३. यशस्वी माघार

खरे तर मोठया सार्वजनिक कार्यक्रमांत ’मुख्य पाहुणे’ या नात्याने सामील होण्याचे मी सहसा टाळते. तरीही अनेकदा अनेक छोटया मोठया कार्यक्रमांमध्ये दीपप्रज्ज्वलन आणि प्रतिमा पूजन अशी कामे मला करावी लागतात. दत्तगुरू, सरस्वती, अंबाबाई, गणेश....अशा अनेक देवतांना फुलांचा हार घालणे, त्यांच्या प्रतिमांना हळद कुंकू वाहणे, त्यांची आरती करणे... या गोष्टी मी करते - मला पटत नाहीत तरी त्या क्षणी मनापासून करते.

वास्तविक माझ्या घरात एकाही देवतेची मूर्ती अथवा प्रतिमा नाही. मी नवे घर घेतले तेंव्हा कोणताही मुहूर्त न पाहता माझ्या सोयीने मी येथे राहायला आले. ’वास्तुशांत’ नावाचा प्रकार मी केला नाही, की जाणतेपणाने मी कसली पूजा केली नाही. मग तरीही सार्वजनिक कार्यक्रमांत मी अशा पूजा का करते? कारण बहुसंख्य लोकांच्या भावना अशा कृतींशी जोडल्या गेलेल्या असतात. ’त्या कृती निरर्थक आहेत’ असे म्हटले तर संवाद सुरू होण्यापूर्वीच थांबतो, अशा अनुभवातून पोळले गेल्यानंतर मी ही तडजोडीची भूमिका स्वीकारली आहे.

ज्या कोणाला लोकांबरोबर काम करायचे आहे, परिवर्तनाचे काम करायचे आहे, त्या व्यक्तीला सतत एका संघर्षाला सामोरे जावे लागते. आपले मत, आपले विचार यांच्याशी बेईमानी न करता, कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा बेताने मध्यम मार्ग काढत राहावा लागतो. यातून कदाचित ’व्यक्तिगत’ (Personal) आणि ’व्यावसायिक’ (Professional) अशी एक 'सोयीची' विभागणी अनेक कार्यकर्ते करताना दिसतात. मला अशी विभागणी मान्य नाही. प्रत्येक गोष्ट - अगदी आपले सामाजिक आणि व्यावसायिक कामही - व्यक्तिगत असते अशी माझी धारणा आहे. आपल्या भावना, आपली मूल्ये, आपले विचार यातूनच आपल्या बाह्य कृतींना वळण आणि दिशा मिळते. पण सार्वजनिक जीवनात देवदेवतांच्या, धार्मिक श्रद्धांच्या बाबतीत ही विभागणी पटत नसली तरीही मी मान्य केली आहे. एका अर्थी समाजाने 'माघार कशी घ्यायची असते’ याबाबत माझे केलेले दीर्घकाळचे हे शिक्षणच आहे म्हणा ना!

समाजात वावरताना ’धार्मिकता’ अनेक अंगांनी सामोरी येते. स्त्रिया धार्मिक असतात, पुरूष धार्मिक असतात, लहान मुले-मुलीही धार्मिक असतात. श्रद्धा फक्त गरीब आणि ग्रामीण भागातल्याच लोकांच्या असतात असे नाही. नावाजलेल्या संस्थेत शिकलेल्या आणि सामाजिक परिवर्तनाच्या कामात रमणा-या लोकांच्याही श्रद्धा असतात. काही पुराणातील देवांना भजतात तर काही ऐतिहासिक माणसांना देवासमान मानतात. काहींनी माणसांना जिवंतपणीच देवत्व बहाल केलेले असते. प्रत्येकाची देवता वेगळी, प्रत्येकाचे श्रद्धास्थान वेगळे आणि प्रत्येकाची आपल्याकडून असणारी अपेक्षाही वेगळीच! काहींची धार्मिकता सहिष्णू असते, तर अनेकांची आक्रमक; काहींची सौम्य असते, तर काहींची धगधगती; काहींची भयातून आलेली असते तर काहींची समजण्यातून. शिवाय व्यक्तीची धार्मिकता आणि सामूहिक धार्मिकता यांतही एक सूक्ष्म पण सतत जाणवणारा भेद असतो. जीवनाच्या सर्वांगाला व्यापून असणा-या धार्मिकतेला स्पर्श न करता काम करणे अवघड; आणि तिला छेद देऊन काम करणेही तितकेच अवघड!

काही अनुभव

मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील एक छोटे गाव. आमचा एक प्रकल्प तेथे चालू होता. परसबाग लागवड हा त्यातील एक उप-कार्यक्रम. घराच्या अंगणात, परसात सांडपाण्याचा वापर करून भाजीपाला लावायचा असा हा अगदी साधा आणि छोटा कार्यक्रम. स्त्रियांमधले कुपोषण कमी करण्यासाठी परसबाग उपयोगी पडते असा आजवरचा अनुभव. पण परसबागेचा उपक्रम तेथे काही केल्या नीट चालत नव्हता. फक्त पावसाळ्यात चार महिने परसबाग असायची आणि नंतर ती नाहीशी व्हायची. स्त्रियांच्या एका समूहाबरोबर याच विषयावर बोलायला मी आले होते.

’पावसाळ्यानंतर पाणी नसते आणि म्हणून परसबाग मरते. पिण्याच्या पाण्यासाठीच मग वणवण असते, झाडांना कोण पाणी घालणार?’ असे स्त्रियांचे मत पडले. परसबागेला वेगळे पाणी घालण्याची गरज नाही असे मी त्यांना समजावून सांगत होते. आम्ही बसलो होतो त्या पडवीतून मला समोर एक अर्ध्या भिंतीची मोरी दिसली. 'या मोरीतल्या आंघोळीच्या पाण्यावरही भाज्या वाढतील’ असे मी म्हटल्यावर बैठकीत क्षणभर सन्नाटा पसरला. एक तरूण स्त्री तिचे हसू काबूत राखू शकली नाही, ती खुदकन हसली. अनेकींच्या चेहर-यावर स्मित झळकले. “दीदी हमको बच्चा कम करनेका तरीका बता रही है", असे एकीने मोठयाने म्हटल्यावर त्या सगळ्याजणी खिदळायला लागल्या.

माझ्या बोलण्यामुळे नेमका काय विनोद झाला हे मला समजले नव्हते. त्यांच्या शेरेबाजीचा संदर्भ मला कळत नव्हता. “मी काही चुकीचे बोलले का?” या माझ्या प्रश्नावर हसण्याची आणखी एक जोरदार लाट आली. एका प्रौढ स्त्रीने मग मला ओढत एका कोप-यात नेले आणि ती मला रागावून म्हणाली, “औरतोंकी माहवारी के नहाने के पानीपर उगी सब्जिया हमारे मर्द खायेंगे, तो उनकी मर्दानगी कम नही होगी क्या? तुम शहरके लोग कुछ समझते नही हो, और आते हो हमे पढाने के लिये! यहा तुम्हारा यह कार्यक्रम नही होगा, अभी दुसरा कुछ बताना है तो बताओ, नही तो मीटिंग खत्म करके मेरे घर चाय पीने चलो".

प्रजननात्मक आरोग्यावर काम केल्याशिवाय परसबाग यशस्वी होणार नाही हा त्या स्त्रियांनी मला शिकवलेला एक धडा! विकास कार्यक्रमाचा जीवनविषयक दृष्टिकोनाशी - त्याला मी अंधश्रद्धा नाही म्हणणार – संलग्न असलेला हा पैलू तोवर माझ्या कधी ध्यानातच आला नव्हता. जे करायचे ते संदर्भ लक्षात घेऊन, लोकांच्या विचारांना सामावून घेऊन करायला शिकणे भागच असते अशा वेळी. कधी कधी मनात असलेले सगळे करायला जमत नाही, याचाही स्वीकार करावा लागतो.

खूप वर्षांपूर्वी अरूणाचल प्रदेशात गेले होते. गावात गेले की एखादे घर गाठायचे आणि बैठक मारायची. हळूहळू इतर माणसे जमा होत. पुरूष येत तशा स्त्रियाही येत, मुले मुली तर अगणित जमा होत. माझी भाषा त्यांना कळत नसे आणि त्यांची मला. सहकारी कार्यकर्ता दुभाषाचे काम करे, त्यामुळे संवादाची गती आपोआप कमी राही. मला शांतपणे निरीक्षण करायला भरपूर वेळ मिळत असे. अगदी मजेदार दिवस होते ते.

पहिल्या बैठकीत माझ्यासमोर एका पेल्यात पेय आले. माझ्या खाण्यापिण्याच्या फारशा आवडीनिवडी नाहीत. जेथे जाईन तेथले पदार्थ खाऊन बघायचे, त्याबद्दल जरा माहिती घ्यायची अशी माझी साधारण पद्धत. त्यानुसार मी त्या समोर आलेल्या पेयाचे नाव विचारले. त्यावर ’अपांग’ असे उत्तर आले, ज्यातून मला काहीच अर्थबोध झाला नाही. मी ते पेय घेणार तेवढयात माझ्या सहका-याचा चेहरा मला दिसला आणि मी पेला खाली ठेवला. 'कडू काढा वगैरे आहे की काय?’ असे मी त्याला गंमतीने विचारले. तो भयंकर गंभीरपणे मला म्हणाला, “दारू आहे ती".

आता नेमके काय करावे हे मला सुचेना. त्या आदिवासींनाही काही सुचेना. जमलेल्या सगळ्यांचे डोळे एका वृद्ध माणसाकडे वळले. वातावरणातील ताण हलका करण्यासाठी मी 'अपांग कशी करतात?’ असा प्रश्न विचारला, त्यावर एका युवकाने मला उत्साहाने दहा मिनिटे माहिती दिली. मी मग त्यांना शांतपणे म्हटले, “अपांग घ्यायला आवडली असती मला, पण आज ती मी नाही घेतली तर चालेल का तुम्हाला?”

तो वृद्ध गृहस्थ त्याच्या भरदार आवाजात म्हणाला, “ ती दारू आहे म्हणून तू ती घेणार नाहीस हे माझ्या लक्षात आले आहे. पण तुला एक घोट तरी घ्यावाच लागेल. आलेल्या पाहुण्याला अपांग नाही पाजली तर आमचे पूर्वज कोपतील आणि आमच्या गावावर संकटे कोसळतील.” मी बराच वेळ त्याच्याशी बोलत होते. पण त्याने अखेर निर्वाणीचा इशारा दिला, “ तुला जसा तुझा धर्म आहे, तशी आम्हालाही आमची परंपरा आहे. आमच्या गावात तुला आमची परंपरा पाळावी लागेल. ही परंपरा न पाळण्याने तुझे काही नुकसान नाही होणार, पण आमचे होईल. यासाठीच तू आमच्याकडे आलीस का?” दुस-या बाजूने मी अपांगला स्पर्शही करू नये असा माझ्या सहका-याचा आग्रह. अपांगचा एक घोट घेऊन मी त्या समुहाच्या भावनेचा मान राखला खरा....पण त्या बदल्यात मी माझे अनेक सहकारी गमावले. काही राखायचं तर काही गमवावं लागतं --- हा मला मिळालेला आणखी एक धडा.

भारतीय रेल्वेची मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे गाडयांची नावे. पुष्पक, ज्ञानगंगा, झेलम, इंद्रायणी, राप्ती सागर ….अशा नावांच्या गाडयांतून प्रवास करताना जणू तो इतिहास आणि भूगोल आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. जम्मू ते कन्याकुमारी या गाडीचेही 'हिमसागर एक्स्प्रेस’ असे अत्यंत समर्पक नाव आहे. कार्यकर्त्यांच्या एका समूहात या गाडीला ’विवेकानंद एक्स्प्रेस’ असे नाव देण्याबाबत, तसा विनंतीअर्ज रेल्वेकडे पाठवण्याबाबत अत्यंत गंभीरपणे चर्चा चालू होती. मी ’हिमसागर’ हे नाव कसे अधिक चांगले आहे, व्यक्तीचे नाव गाडयांना न देण्याची रेल्वेची भूमिका कशी योग्य आहे, विवेकांनंदाचे मोठेपण असल्या भौतिक गोष्टींवरून ठरत नाही ….असे अनेक मुद्दे मांडले. पण मला आठवते तसे त्याही चर्चेची सांगता 'हिला विवेकानंदबद्दल काही आदर नाही’ अशीच झाली होती. तुमच्या श्रद्धा तुम्हाला बाजारात विकता आल्या तरच तुम्ही त्या विचारांचे खरे पाईक असता, हे मार्केटिंगचे तत्त्वज्ञान आजही मला समजत नाही, पण ते तसे आहे खरे! काल्पनिक देवता एक वेळ परवडल्या, पण माणसांना देवाचे स्थान दिले की बुद्धी गहाण ठेवणॆ अपरिहार्य बनते, हे न पचणारे सत्यही या प्रसंगाने मला दिले.

कर्नाटकमध्ये बचत गटाची बैठक एका देवळात ठेवली म्हणून गटाची अध्यक्षच बैठकीला येऊ शकली नाही - कारण त्यावेळी तिची मासिक पाळी चालू होती. राजस्थानमधील एका छोटया गावातील प्रशिक्षणात 'मुलगा व्हावा’ म्हणून उपवास करणारी सहा महिन्यांची गर्भवती, सातपुडयच्या अक्राणी परिसरात अश्वत्थामा दिसल्याचे सांगणारा आदिवासी म्हातारा, बाळाला लस टोचली तर देवतेचा कोप होईल म्हणून घरात लपून राहणारे आदिवासी....असे कितीतरी प्रसंग आठवतात. या सगळ्यातून वाट काढत चालायचे तर दमछाकही होते.

सकारात्मक बाजू

पण देवदेवतांवरील लोकांच्या श्रद्धेबाबत केवळ एवढेच लिहिणे एकांगी होईल. कोणाला पटो अथवा ना पटो, पण या सगळ्याला एक सकारात्मक बाजू आहे. भले ती विचारांनी स्वीकारलेली जीवनशैली असेल किंवा नसेल, पण याच श्रद्धेतून समाजात काही चांगले बदलही होताना दिसतात.

उदाहरणार्थ, शहरांत दारू पिण्याला प्रतिष्ठा मिळताना दिसते आहे. पूर्वी गावाच्या वेशीवर मंदिर असायचे; आता कोणत्याही गावात प्रवेश करताना दारूचे दुकान दिसते - अगदी सरकारमान्य दुकान! अशा परिस्थितीत एखादा आदिवासी पाडा जेंव्हा "आमच्या गावात दारू अजिबात नाही बरं ताई, आम्ही माळकरी आहोत" असे अभिमानाने सांगतो, तेंव्हा दूरच्या त्या विठोबाला 'अशीच कृपा राहू दे बाबा यांच्यावर’ अशी प्रार्थना मनात आपोआप उमटते.. घर सोडून दहा मैलांच्या पलिकडे न गेलेल्या स्त्रियांच्या समुहात जेंव्हा कोणीतरी ’त्रिंबकपर्यंत’ किंवा ’प्रयागपर्यंत’ जाऊन आल्याचे कौतुकाने सांगते तेंव्हा कुंभमेळ्याचा सामाजिक पैलूही समोर येतो. पूर्वजांची पूजा करणारे, त्यांच्या अधिभौतिक शक्तींवर विश्वास ठेवणारे लोक नकळत समाजाचा इतिहास जपत असतात. देवाच्या आवारातली झाडे तोडायची नाहीत, अशा पारंपरिक नियमातून मोजक्याच ठिकाणी का होईना ’देवराई’ आत्ताआत्तापर्यंत जगली आहे. विशेषतः हिंदू धर्मातले बरेच सण निसर्गाची जाणीव करून देणारे आहेत. - त्यामुळे झाडे, डोंगर, नद्या, पशु, पक्षी.. … अशा निसर्गातल्या अन्य घटकांशी माणसांचे नाते जुळलेले आहे. प्रवासात वाटेत दिसणा-या नदीत पैसे टाकण्याची लोकांची लगबग मजेदार वाटली तरी एखाद्याच्या मनात ते करताना सर्वस्व अर्पण करण्याची भावना असू शकते हेही लक्षात घ्यावे लागते.

समाजातील सगळी माणसे ज्ञानाच्या अथवा जाणीवेच्या एका पातळीवर एका वेळी पोचतील, असतील असे कदाचित कधीही घडणार नाही. हा प्रत्येकाचा एक स्वतंत्र प्रवास आहे. पण रस्ता परंपरेने, अनुभवाने आखलेला आहे, म्हणून वरवर पाहता, सगळ्यांचा प्रवास सारख्याच गतीने आणि एकाच दिशेने चालला आहे असे वाटते. पण तसे नसते.

देवदेवतांच्या या सकारात्मक बाजूच्या मोहात पडून याच मार्गाने समाजपरिवर्तनाचे काम करावे असे काहींना वाटते. पण यातून समाज बदलण्याऐवजी बहुसंख्यांच्या दबावाला बळी पडून आपणच बदलण्याचा धोका असतो. दुस-यांच्या भावनांचा आदर करता करता आपण स्वत:च्या भावना आणि विचारांना कमी तर लेखत नाही ना, हेही सतत तपासून पाहावे लागते. ध्येय साधण्यात अडसर ठरत नाही तेंव्हा माघारही यशस्वी ठरते – अशी आपली मी माझ्या मनाची वेळोवेळी समजूत घालत असते!

पूर्वप्रसिद्धी: विश्रांती दिवाळी अंक, २००९

Monday, June 28, 2010

३२. माझिया मना...

परवा पुन्हा एकदा मुंबई-पुणे प्रवास करावा लागला. सुट्टी सुरू होण्याचा अवकाश, की मुंबई -पुणे गाडया भरभरून वाहायला लागतात. आरक्षण एक तर मिळत नाही आणि चुकून मिळालेच तर त्याचा फारसा उपयोग होत नाही असा आजवरचा अनुभव! त्यामुळे गाडीत सुट्टी - गर्दी - आरक्षण – भ्रष्टाचार – रेल्वे - सरकार – लोकसंख्या या संदर्भात एक तरी चर्चासत्र नक्की असते. नियमित प्रवाशांच्या चेह-यावर ’हे असेच चालायचे’ असा स्थितप्रज्न्य भाव असतो किंवा ’ही गर्दी म्हणजे काहीच नाही’ असा अनुभवी आव असतो.

मराठी माणसांना चर्चा करायला आवडते. मतैक्य असणा-या बाबींमध्येही आपण उत्साहाने चर्चा करतो. हवामानानुसार, परिस्थितीनुसार मतैक्याचा मुद्दा बदलतो इतकेच! त्या दिवशीही गाडीत ’यंदा फारच उन्हाळा आहे बुवा/बाई’ याबाबत मतभेद नसल्याने जोरदार चर्चा चालू होती. उन्हाळ्याबाबत फारसा मतभेद दिसत नाही म्हणा.

पूर्वी उन्हाळा हा विषय थोडक्यात संपायचा. कारण तो उन्हाळा नुसताच कमी - जास्त – असह्य अशा गुणवत्तेचा उन्हाळा असायचा. हल्ली चिमण्या पोरीही ’अगं, पुण्यात काल ३९ होतं बर का, आपली मुंबईच बरी - फक्त ३४!’ अशा नेमक्या आकडेवारीत बोलतात. ही २४ तास बातम्या देणा-या वाहिन्यांची कृपा! तशा कोणत्याही वाहिनीवरच्या बातम्या हा मला नेहमी विनोदी कार्यक्रम वाटतो. पण अशा प्रकारच्या सामूहिक चर्चांमध्ये लोक त्यांचा हवाला अगदी गंभीरपणे देतात हेदेखील खरे!

एकीकडे या गप्पा चालू असताना जो तो घामाच्या धारांमध्ये वाहून निघत होता. शीतपेयांच्या किंमती ऐकून घाम वाढत होता. उन्हाळ्याच्या अनुषंगाने ’पिण्याचे पाणी’ हा विषय समोर आला. मागील वर्षी लांबलेल्या पावसाची आठवण मग आपोआप निघाली. पाऊस कमी होण्यामागच्या कारणांची यथासांग चिकित्सा झाली. आणि ’यंदा मात्र पावसाने लवकर आले पाहिजे’ अशी सदिच्छाही व्यक्त झाली.

चर्चा चालू होती. कल्याण – कर्जत स्थानके ओलांडून गाडी व्यवस्थितपणे पुढे धावत होती. कधी नव्हे ती गाडी वेळेत असल्याने पुण्यातील कार्यक्रमांचे मनसुबे माणसे रचत होती. बाहेर सूर्य तळपत होता. डोंगर उजाड, रखरखीत होते. सारेजण प्रवास संपायची वाट पाहत होते.

मंकी हिल स्थानकाच्या परिसरात वातावरणात एकदम बदल झाला. सोसाटयाच्या वा-याचा धुमाकूळ आम्हा सर्वांपर्यंत पोहोचला. काळ्या ढगांमुळे आकाश काही वेगळेच दिसत होते. सूर्य ढगांआड लपून बसला होता. मातीचा वास आसमंतात दरवळत होता.... आणि बाहेर पावसाचा मनसोक्त धिंगाणा चालू होता!

मला पाऊस फार आवडतो. त्याच्या नुसत्या चाहुलीनेही मन प्रसन्न आणि टवटवीत होतं! जणू माझ मन पावसाच्या संगतीत त्याचाच एक हिस्सा बनतं!

मी आनंदाने सहप्रवाशांकडे नजर टाकली. पण काय आश्चर्य! कोणीही त्या कोसळणा-या पावसाचा थेंब झेलायला उत्सुक नव्हते. सर्व खिडक्यांच्या काचा फटाफट बंद झाल्या. हळूहळू गाडी रखडायला लागली. खंडाळा स्थानकात दहा मिनिटे, खंडाळा ते लोणावळा वीस मिनिटे अशा कूर्म गतीने गाडी आता पुढे जात होती. प्रवासी अस्वस्थ होऊ लागले. दर दोन मिनिटांनी कळत नकळत घडयाळाकडे नजरा वळू लागल्या. गाडीला जसजसा उशीर होऊ लागला, तसतशी प्रवाशांची पावसाबद्दलची कुरकूर वाढत चालली. कुरकुरीचे रुपांतर तारस्वरातील तक्रारीत झाले. बघता बघता ’काय हा पाऊस, त्याला वेळ नाही, काळ नाही’ यावर सर्वांचे एकमत झाले. ’पाऊस फक्त शेतावरच पडला तर बरे होईल’ असेही एकाने कल्पक धीटपणे सुचवले.

या बदलत्या दृष्याची मला मोठी गंमत वाटली. परिस्थितीबाबत नेहमी असमाधान बाळगायला आपण कोठून शिकतो? उन्हाळ्यातील तापत्या सूर्याबद्दल तक्रार न करता आपण कधी त्याच्याकडे हसून बघितले आहे काय? उन्हाळ्यात उन्हाबद्दल तक्रार, हिवाळ्यात थंडीबद्दल कुरकूर आणि पावसाळ्यात पावसाला शिव्याशाप – असे आपण का करतो? ’पावसाबद्दल शेतक-याने आनंद मानावा फार तर’ हा दृष्टिकोन आपल्याला शोभतो का?

मला जे हवे, तेच जगाकडून मिळाले पाहिजे, असा आग्रह कशासाठी? आणि मुळात आपल्याला काय हवे आहे, ते आपल्याला तरी कळले आहे का? जे नाही, त्याची ओढ, त्याचे वेड ….... आणि जे आहे त्याचा त्रास, त्याचा उबग.. हा कसला खेळ आपण मांडून बसलो आहोत? या खेळाला कधी तरी अंत असणार आहे का?
*

पूर्वप्रसिध्दी: ३ जुलै १९९६, मुंबई तरूण भार

Saturday, June 19, 2010

३१. रस्ते

आधी खूप रस्ते होते
आधी खूप चालणे होते
एकेक रस्ता कमी झाला
चालण्याला मग वेग आला
एक दिवस अवचित कळले
अर्धे अधिक रस्ते सरले
मग उरल्या रस्त्यांवरून
चालणे थोडे पसरट करून
चालत राहिलो तुकडे-तुकडे
थोडे इकडे थोडे तिकडे
आता काळ फिरला आहे
एकच रस्ता उरला आहे
पावलांमध्ये चालणे नाही
रस्ता दूर दिसत राही
सरपट लंगडत चालून थकलो
चालता-चालता मधेच बसलो
रस्त्यांमध्ये पाय गेले
कुणास ठाऊक काय झाले

सौमित्र, अक्षर दिवाळी २००४

Saturday, June 5, 2010

३०. ’सायलेंट स्प्रिंग’चा झंझावात

हल्ली शहरात, खेडयात कोठेही गेले तरी संध्याकाळ होताना घराची दारे खिडक्या बंद करण्याची सर्वांची लगबग दिसते. कारण? डास. आणि मग सुरू होते चर्चा डासांच्या वाढत्या प्रतिकारशक्तीची आणि त्यांना रोखण्यास कमकुवत ठरलेल्या ’डीडीटी’ ची! डीडीटीच्या फवारणीचे प्रमाण वाढवायला पाहिजे; ग्रामपंचायत अथवा महापालिकेने त्याची फवारणी जरा जास्त वेळा केली पाहिजे असे चर्चेच्या ओघात मत जोरदारपणे मांडले जाते. मग कोणीतरी जाणकार ’डीडीटी माणसांसाठी कसे घातक आह” हे सांगतात. अशा चर्चा लहानपणापासून इतक्या वेळी आपण ऐकलेल्या आहेत, की त्याचे मला स्वतःला फारसे गांभीर्य कधी जाणवत नसे.

या विषयावरचे एक अतिशय चांगले पुस्तक नुकतेच माझ्या वाचनात आले. रेचल कार्सन या अमेरिकन लेखिकेचे १९६२ मध्ये प्रसिद्ध झालेले ’सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक आपल्याला विचार करायला प्रवृत्त करते. वसंत ऋतुमध्ये कोकिळेचे गाणे कानी पडले नाही, तर आपल्याला नक्कीच चुकल्यासारखे वाटेल. असे चुकलेसे वाटण्याची वेळ आपल्यावर आपल्याच कृतींनी येऊन ठेपली आहे, याची जाणीव हे पुस्तक वाचताना पदोपदी होते. जागतिक पातळीवरच्या आणि विशेषतः अमेरिकेतील पर्यावरण चळवळीचा पाया रचणारे पुस्तक अशी ’सायलेंट स्प्रिंग’ची ख्याती आहे. न्यू्यॉर्क टाईम्स्च्या बेस्ट सेलर यादीत हे पुस्तक आहे आणि मॉडर्न लायब्ररीच्या विसाव्या शतकातील श्रेष्ठ पुस्तकांच्या यादीत त्याला पाचवे स्थान देण्यात आलेले आहे. अमेरिकेत ५० आणि ६०च्या दशकात जे घडत होते, विकासाचे जे धोरण तेथे राबवले जात होते, ते कमी अधिक फरकाने आज आपल्याकडे आहे. विकासाच्या निसर्गविरोधी धोरणाबाबत जागे होऊन आज आपण कृतीशील नाही झालॊ, तर कीटकांची, प्राण्यांची, जलचरांची आणि पक्षांची आज जी अवस्था झाली आहे, तेच मानवजातीचेही भविष्य आहे असा इशारा ’सायलेंट स्प्रिंग’ आपल्याला देते.

या पुस्तकाची आणि पर्यायाने या महत्त्वाच्या विषयाची सुरुवात ओल्गा हकिन्स या मैत्रिणीने रेचल कार्सनला लिहिलेल्या एका पत्रामुळे झाली. खरे तर ओल्गाने ते पत्र ’बोस्टन हेराल्ड’ या दैनिकाला पाठवले होते आणि त्याची प्रत रेचलला पाठवली होती. डास मारण्यासाठी डीडीटीची हवाई फवारणी ओल्गाच्या परिसरात केल्यामुळे तिच्या शेतीच्या परिसरातल्या पक्षांचा मृत्यू मोठया प्रमाणात झाल्याचे निरीक्षण ओल्गाने नोंदवले होते. रेचल कार्सन आधीपासूनच वर्तमानपत्रात सागरी जीवशास्त्रावर आणि निसर्ग इतिहासावर लेखन करत होती. २७ मे १९०७ या दिवशी जन्मलेल्या रचेलने वयाच्या आठव्या वर्षी लिखाणाला सुरूवात केली होती. महाविद्यालयीन काळात प्राणीशास्त्राचा अभ्यासक्रम तिने पूर्ण केला. सागरी माशांचा अभ्यास हा तिच्या कामाचा भाग होता. समुद्रासबंधी तिची तीन पुस्तके १९५५ पर्यंत प्रसिद्ध झाली होती. ओल्गाच्या पत्रातला मजकूर तिच्या तोवरच्या कामाशी प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यपक्षपणे निगडित होता.

ओल्गाच्या पत्रानंतर रेचल कार्सनने ”रासायनिक कीटकनाशकांचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम’ या विषयावर अधिक लक्ष केंद्रित केले. अर्थात डीडीटी विरोधातला लढा त्यापूर्वी म्हणजे १९४० मध्ये सुरू झाला होता. १९५७ मध्ये अमेरिकेत लॉन्ग आयलंडवर डीडीटीची हवाई फवारणी केल्याबद्दल अमेरिका सरकारच्या कृषि खात्यावर एक खटलाही दाखल करण्यात आला होता. रेचल या विषयाचा अभ्यास करत होतीच. ओल्गाच्या पत्रामुळे त्याला गती मिळाली.

कीटकनाशकाचे - मुख्यत्वे डीडीटीचे - पर्यावरणावर आणि विशेषतः पक्षांवर होणा-या दुष्परिणामांचे विवेचन या पुस्तकात अतिशय परिणामकारकरीत्या केले आहे. डीडीटीमुळे पक्षांच्या अंडयाचे कवच पातळ होते आणि त्यामुळे पिल्लांच्या वाढीत समस्या निर्माण होतात आणि पिलांच्या मृत्युचे प्रमाण वाढते असे कार्सनचे मत आहे. रासायनिक उद्योग स्वतःचा माल खपवण्यासाठी आम जनतेला चुकीची माहिती पुरवतात आणि शासनही त्याकडे डोळेझाक करते असा कार्सनचा आरोप आहे. परंतु रासायनिक कीटकनाशकांचा वापर पूर्णपणे थांबवावा असे रेचल कार्सनने कधीही म्हटले नव्हते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. रासायनिक कीटकनाशके आपण पूर्ण जबाबदरीने वापरली पाहिजेत असे तिचे मत होते. त्यांचा पर्यावरणावर आणि माणसांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन, रासायनिक कीटकनाशकांचा अवास्तव वापर टाळून आवश्यक तेवढाच वापर आपण करावा या तिच्या मताला कोणाचाही विरोध असण्याचे खरे तर काही कारण नाही. जैविक कीटकनाशकांचा पर्याय आपल्याला खुला आहे हे देखील ती आवर्जून सांगते.

’सायलेंट स्प्रिंग’ लिहिताना रेचल कार्सनने अनेक कागदपत्रांचा सखोल अभ्यास केला. रासायनिक पदार्थांशी संपर्क वाढल्याने मानवजातीत कॅन्सरसारख्या असाध्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आहे असे रेचलचे मत बनले. रासायनिक कीटकनाशकांचा संसर्गात आल्यामुळे दुर्धर रोगांना तोंड देत असलेल्या हजारो व्यक्तींबरोबर तिने संपर्क साधला. पर्यावरणाच्या विनाशाबाबत अशीच अनेकांची निरीक्षणे जाणून घेतली. पुस्तकाचा कच्चा मसुदा त्या त्या विषयातील जाणकार शास्त्रज्ञांकडून तपासून घेउन पुस्तकात माहितीच्या पातळीवर कोणतीही चूक राहू नये याची तिने खबरदारी घेतली. या दूरदृष्टीचा पुढे चांगला उपयोग झाला. दुर्दैवाने पुस्तक लेखनाच्या या काळातच रेचलला स्तनांच्या कॅन्सरचा विकार झाला असल्याचे निदान झाले आणि १४ एप्रिल १९६४ या दिवशी म्हणजे पुस्तकाच्या प्रसिद्धीनंतर दोन वर्षांच्या आतच मृत्युने तिच्यावर घाला घातला.

रेचल कार्सनने केवळ डीडीटीबद्दल प्रश्न विचारले नाहीत. तर दुस-या महायुद्धानंतर अमेरिकेने ’वैज्ञानिक प्रगती’, ’शेती विकास’ अशा नावाखाली जे धोरण स्वीकारले होते, त्या धोरणालाच तिने आरोपीच्या पिंज-यात उभे केले. माणसांच्या ध्येयधोरणांचा फक्त माणसांवर परिणाम होत नाही तर तो सबंध जीवसृष्टीवर होतो हे तिने असंख्य उदाहरणांसह सांगितले - आणि असे करण्याचा माणसाला काही अधिकार नाही असेही ठणकावून सांगितले.

रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शत्रू कीड काही काळ नष्ट होते हे खरे - कालांतराने ती पुन्हा येते, आणि अधिक बळकट होऊन येते - हे आपण आता अनुभवले आहे. पण अशी बेधुंद फवारणी मित्र कीडही नष्ट करते आणि पर्यायाने पर्यावरणाचे संतुलन ढासळते. रासायनिक पदार्थ पाण्यातून, हवेतून वापराच्या क्षेत्राबाहेर पोचतात आणि जीवनसाखळीत हैदोस माजवतात हे आपण कधी लक्षात घेत नाही. एखाद्या कीडीचा सामना करताना जणू काही पूर्ण निसर्गाच्या विरोधात आपण युद्धाला उभे ठाकले आहोत असा आपला व्यवहार असतो. असे करण्याचा ना आपल्याला नैतिक अधिकार आहे ना त्यात काही शहाणपण आहे हा ’सायलेंट स्प्रिंग’चा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे असे मला वाटते.

अमेरिकेत आज परागीकरणात महत्वाची भूमिका बजावणा-या मधमाशा नाहीशा होत आहेत हे आपण वाचले असेल. भारतातही सागरी किना-यांवर मृत माशांचा ढिगारा पडल्याच्या, गिधाडे नष्ट होत असल्याच्या, बेडूक नाहीसे होत असल्याच्या बातम्या आपण वाचतो. पुण्यात मध्यतरी ’चिमण्या कोठे गायब झाल्या?’ हा चर्चेचा विषय होता हे आपल्याला आठवत असेल. म्हणजे आपल्या कल्पनेपेक्षा जास्त जीवजंतूंना आपण मारत सुटलो आहोत. जमिनीत रसायने साठून तिची सुपीकता कमी होत चालली आहे.

राष्ट्राध्यक्ष केनेडींच्या Science Advisory Committee' समोर रेचल कार्सनने साक्ष दिली. १९६३ मध्ये या समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला तेव्हा समितीने रेचल कार्सनच्या मताचे समर्थनच केले. कीटकनाशकांचे दुष्परिणाम, प्रदूषण याबाबत जनमानसात मोठया प्रमाणात जागृती घडवून आणण्याचे या पुस्तकाचे निःसंशय श्रेय आहे. अमेरिकन सरकारने १९७२ मध्ये डीडीटी वर बंदी घातली, ज्याची सुरूवात रेचल कार्सनच्या लेखनातून झाली. Deep Ecology, Environmental Justice सारख्या पुढे निर्माण झालेल्या अनेक चळवळी रेचल कार्सनचे ऋण मान्य करतात. ’सायलेंट स्प्रिंग’ ने पर्यावरण जागरूकतेचा एक प्रचंड झंझावातच निर्माण केला.

’सायलेंट स्प्रिंग’ मध्ये व्यक्त करण्यात आलेल्या मतांमुळे अनेक उद्योगसमुहांच्या पोटावर पाय आला. हितसंबध दुखावलेली मंडळी पुस्तकावर तुटून पडली. व्यक्तिगत स्वरूपाच्या टीकेलाही रेचल कार्सनला तोंड द्यावे लागले. शेती खात्याच्या निवृत्त एका माजी सचिवांनी तर "रेचल कार्सन इतकी सुंदर असूनही ती अविवाहित राहिली, म्हणजे ती नक्की कम्युनिस्ट असावी’ अशी टिप्पणी केली. एखाद्याला जीवनातून उठवायचे असले की त्या व्यक्तीला ’कम्युनिस्ट’ म्हणायचे ही अमेरिकेची त्या काळची रीत होती. रेचलच्या मृत्युनंतरही या पुस्तकावर टीका होत राहिली, कारण ’सायलेंट स्प्रिंग’ ने काही मुलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत, जे आजही तितकेच वाजवी आहेत.

’डीडीटीमुळे मलेरिया आटोक्यात आला आणि लाखो माणसांचे प्राण वाचले, या वस्तुस्थितीकडे रेचलने डोळेझाक केली. डीडीटीला विरोध करून, मलेरिया प्रतिबंधात अडचणी निर्माण करून, अनेकांना तिने जणू मरणाच्या खाईत ढकलले’, असा आरोप अगदी अलिकडे म्हणजे २००५ मध्ये डिक टव्हर्न या ब्रिटिश राजकारण्याने केला. "रेचल कार्सनचे ऐकायचे ठरवले तर तमोयुगात परतण्याशिवाय आपल्याला गत्यंतर राहणर नाही’ अशीही टीका झाली. पण रेचल कार्सनचे असे म्हणणे होते की : मलेरिया नियंत्रणासाठी डीडीटीच्या वापराची फक्त एक बाजू - यशाची बाजू - आपण आजवर पाहिली. पण त्यात आपल्याला झेलाव्या लागलेल्या पराभवांबाबत आपण कधी काही ऐकले आहे का? आपले विजय क्षणभंगूर आहेत हेच पुनःपुन्हा दिसून येत नाही का? रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे काय झाले, तर फक्त कीटकांची प्रतिकारशक्ती वाढली. आजचे मरण आपण पुढे ढकलले इतकेच! मोठया क्षेत्रावर डीडीटीची हवाई फवारणी करूनही डास तसेच राहिले, इतर प्रजातींना त्याला हकनाक बळी पडावे लागले.

सन २००० मध्ये Human Events नामक मासिकाने १९ व्या आणि २० व्या शतकातील ’सर्वात जास्त हानी करणा-या’ पुस्तकांच्या यादीत सायलेंट स्प्रिंगला ’मानाचे स्थान’ दिले. ’रेचल कार्सनच्या काळात फारशी आकडेवारी उपलब्ध नव्हती. पण तिने मांडलेले धोके काल्पनिक आहेत, निदान डीडीटीच्या वापरामुळे हानी होते असा ठोस पुरावा अब्जावधी डालर्स खर्च करूनही मिळालेला नाही’ हा आरोप पर्यावरणाच्या चळवळीचे पाय मागे खेचण्यासाठी केला जात आहे असे कार्यकर्त्यांचे मत आहे.

पैसा कमावणे हेच ज्यांचे ध्येय आहे अशा मोठया उद्योगांचे ’आधी उत्पादन, मग विचार’ असे स्वार्थी धोरण असते. जनसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण होईपर्यंतच्या काळात त्यांनी त्यांचे खिसे भरून घेतलेले असतात. आज एकटया अमेरिकेत १०००० हून अधिक मानवनिर्मित रासायनिक पदार्थ आहेत, ज्यांचा मानवजातीवर आणि निसर्गावर काय दुष्परिणाम होऊ शकतॊ याचा कसलाही अभ्यास नाही. अमेरिकेत बंदी असलेल्या गोष्टी ’विकासाच्या’ गोंडस नावाखाली भारतासारख्या विकसनशील देशांच्या गळ्यात मारल्या जातात. उत्पादन वाढवण्याच्या हव्यासापायी आपणही पुढच्या पिढयांचा विचार न करता, तात्कालिक फायद्यांच्या मागे धावून आपल्या पायांवर धोंडा पाडून घेत आहोत. होणा-या नुकसानीला मोठया उद्योगांइतके आणि शासनाइतकेच आपणही जबाबदार आहोत. कारण आपण शिकलेले असूनही प्रश्न विचारणे, एखाद्या बाबीमागील वैज्ञानिक तत्त्व समजून घेणे , जास्तीत लोकांच्या दीर्घकालीन फायद्याचा विचार करणे आणि मुख्य म्हणजे निसर्गाला आपले शत्रू न मानता जगणे... यातले आज आपण काहीच करत नाही. कोणी हे काम तळमळीने, निष्ठेने करत असेल तर त्या व्यक्तीला आपण वेडयात काढतो, किंवा टीका करत बसतो.

’सायलेंट स्प्रिंग’ यातून आपल्याला जागे करते. पुस्तक इंग्रजी भाषेत आहे आणि त्यात वैज्ञानिक परिभाषा आहे म्हणून ते वाचण्याचा आपल्याला थोडा कंटाळा येऊ शकतो. पण रेचल कार्सनने अतिशय सोप्या पद्धतीने एक अवघड विषय आपल्यापुढे मांडला आहे. तो तुमच्याआमच्या सर्वाच्या जीवनाशी संबंधित आहे, म्हणून आपण सर्वांनी हे पुस्तक वाचले पाहिजे, गटाने मिळून वाचले पाहिजे, आपल्याला झेपेल, जमेल असा कृती कार्यक्रम आपण आखला पाहिजे ही काळाची गरज आहे.

हा लेख लिहिताना ’सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकासोबत ’विकिपीडिया’ या संकेतस्थळावरील माहितीचाही आधार घेण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी www.rachelcarson.org या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी.

Friday, May 28, 2010

२९. प्रयाग: भाग २

प्राचीन काळी प्रयाग ’तीर्थराज प्रयाग’ या नावाने ओळखले जायचे. भरद्वाज मुनींचा आश्रम या संगमाच्या काठी होता. वनवास काळात राम, लक्ष्मण आणि सीता या आश्रमात मुनींच्या दर्शनाला आले होते असा रामायणात उल्लेख आहे. ययातिकन्या माधवीशी गालव मुनींनी येथेच विवाह केला होता. रामायण, महाभारत, मत्स्यपुराण, वामनपुराण, पद्मपुराण, शिवपुराण, कूर्मपुराण, ब्रह्मपुराण अशा अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये प्रयागचा उल्लेख आहे. भक्त प्रल्हादाने येथील संगमात स्नान केले होते असे भाविक मानतात. जैनांचे पहिले तीर्थंकर श्री आदिनाथ स्वामींनी याच ठिकाणी तप करून कैवल्यद्न्यान प्राप्त करून घेतले होते असेही मानले जाते.

प्रयागसंबंधीचे अनेक उल्लेख ऐतिहासिक काळातही आढळतात. यमुनातीरीचा किल्ला सम्राट अशोकाने बांधलेला आहे. समुद्रगुप्ताचा ’प्रयाग प्रशस्ती’ शिलालेख प्रसिद्ध आहे. चिनी प्रवासी ह्युएन्संगने इसवी सन ६४३ मध्ये प्रयाग नगरीत सम्राट हर्षवर्धनची भेट घेतल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

इलाहाबाद ही उत्तर प्रदेशची सांस्कृतिक राजधानी आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आधुनिक काळात इलाहाबादने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पंडित मदनमोहन मालवीय, मोतीलाल आणि जवाहरलाल नेहरू, पुरूषोत्तमदास टंडन, सर तेजबहादूर सप्रू, चंद्रशेखर आजाद असे अनेक धुरंधर नेते दिले आहेत. तर साहित्याच्या दरबारात पंडित रामनरेश त्रिपाठी, श्रीमती महादेवी वर्मा, श्री. सुमित्रानंदन पंत, पंडित सूर्यकांत त्रिपाठी निराला, हरिवंशराय बच्चन अशी अनेक रत्ने सादर केली आहेत.

या थोर व्यक्तिमत्त्वांचा परिणाम म्हणून की काय, पण प्रयागमध्ये मला भेटलेले सर्व तरूण आणि तरूणी एकतर राजकीय कार्यकर्ते तरी होते किंवा कवी तरी होते. चर्चेचे, गप्पांचे विषय दोनच – राजकारण आणि साहित्य. अयोध्येसारखा भावनिक आणि स्फोटक विषय मी जाणीवपूर्वक टाळत होते पण ’आज सकाळच्या जेवणासाठी कोणती भाजी करायची?’ या साध्या प्रश्नाची सांगताही राजकीय विचारांनी अथवा कवितेने व्हायची. जीवनातल्या कोणत्याही समस्येवर उत्तरे दोनच – एक म्हणजे राजकीय व्यवस्था बदला; किंवा चांगल साहित्य लिहून जनमत परिवर्तन घडवून आणा! चर्चेला मी सोडून कोणीच कंटाळायचं नाही. इतक्या थकवा आणणा-या चर्चा फक्त पुणेकरच करतात असा माझा तोवरचा अनुभव होता. पण प्रयागकर पुणेकरांपुढे सहजासहजी हार मानणार नाहीत अशी माझी तेंव्हा खात्री पटली होती.

उत्तर भारतात हिंडताना महाराष्ट्र प्रगतीशील असल्याचा एरवी पोकळ वाटणारा दावा खरा वाटायला लागतो. सामाजिक शिस्त, सामाजिक जबाबदारी हे शब्द आपण येथे बोलतो तरी! माझ असलं बोलंण प्रयागच्या मुलामुलींना अगदी विनोदी वाटायच. परतीच्या प्रवासाला मी निघाले तेंव्हा रेल्वे स्थानकावर मला निरोप द्यायला आलेल्यांना मी ’प्लटफार्म तिकिट काढू तुमची’ असं सुचवताच एखाद्या गावंढळ माणसाला हसावं तसे सगळे मला हसले. “आमचं एवढं मोठं टोळकं पाहून हिंमतच नाही व्हायची कोणाला तिकीट विचारायची" असं त्यांनी मला स्वच्छपणे सांगितलं! त्यांच्या सांगण्यात काही साहसाची झलक नव्हती, होता सहज स्वाभाविकपणा!

बांदा जिल्ह्यातून प्रवास करताना माणसांचं एक वेगळं दर्शन घडलं. ठिकठिकाणी लोक खांद्यांवर बंदूक घेऊन हिंडत होते. मला तर आधी सैनिक किंवा पोलीस गणवेषात का नाहीत हे कळेना. एका सहप्रवाशाला विचारल्यावर ’पोलिसाबिलिसांवर आमचा विश्वास नाही, इकडे आपल रक्षण आपणच करायच असतं’ अशी त्याने माहिती दिली. ’आम्ही तिकीट काढणार नाही. एखाद्या दिवसाची गोष्ट वेगळी, आम्ही रोज शाळेत जातो ते शिकायला. तेथे काही आम्हाला पैसे मिळत नाहीत, मग आम्ही कुठून द्यायचे?” असली शाळकरी मुलांची गुंडगिरी कोणालाच खुपत नव्हती. वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षीच त्यांच्या गाठीशी इतका अनुभव होता!

प्रशासनव्यवस्थेवरचा लोकांचा अविश्वास लक्षात येण्याजोगा होता. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असल्याचा आपण तोरा तर मिरवतो, पण त्या लोकशाहीची खरी अवस्था काय आहे? लोकशाही म्हणजे फक्त आमदारकी, खासदारकी, महामंडळांची अध्यक्षपदे, मंत्रीपद, गाडया, बंगले, चैन! आणि मतदारांच्या दृष्टीनेही आपल्या पुढा-याकडून गैरमार्गाने आपापली कामे करून घेण्याचा परवाना! प्रशासनव्यवस्थेची स्थिरता, तिची विश्वासार्हता, तिची कार्यक्षमता, यांचे महत्त्व कोणालाच – अगदी जनता जनार्दनालाही नाही! एका प्रसंगी आमची बस ’चक्का जाम’मुळे बराच वेळ थांबून होती. त्यावेळी प्रवासी आपापसात गप्पा मारत होते. कशावरून तरी संजय दत्तचा विषय निघाला. एक तरूण म्हणाला, “ हे मराठी लोक जरा जास्तच संवेदनशील आहेत. एक एके ५६ मिळाली तर त्याला टाडा लावून तुरूंगात ठेवलय त्यांनी! त्या लोकांना इकडे आपल्याकडे येऊन बघा म्हणावं! घरोघरी एके ५६ आणि ५७ मिळतील. टाडा लावता लावता पळापळ होईल मराठी लोकांची!” त्यावर बसमधले सगळे लोक मनापासून हसले. तो संवाद ऐकताना माझ्या हृदयाचा एक ठोका नक्कीच चुकल होता!

याचा अर्थ उत्तर प्रदेशात सगळं काही वाईट आहे आणि महाराष्ट्रात सगळं काही आलबेल आहे, असा मात्र मुळीच नाही. सगळ्याच समाजांमध्ये, सर्वच काळात चांगल्या आणि वाईट गोष्टी बरोबरीने, अगदी हातात हात घालून नांदत असतात. महाराष्ट्रात गुंडगिरी, दहशतवाद नाही असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल. पण आपण आपल्यासाठी त्यातल्या त्यात सुरक्षित जागा शोधलेली असते, आणि इतरांनीही ती शोधली असेल हे आपण गृहित धरतो. आपली जागा सोडली की दुसरी बाजू दिसायला लागते. प्रवासात असे प्रसंग वारंवार येतात!

प्रयागमधल्या माणसांची खरी ताकद प्रयागच्या ऐतिहासिक महत्त्वात आणि इलाहाबाद विश्वविद्यालयात दडलेली आहे. अगदी सामान्य माणूसही या दोन विषयांवर भरभरून बोलतो. प्रयागची थंडी आणि गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर गूळ तूप खाणं हा एक अस्सल ’गावरान’ अनुभव होता. तेथील सांस्कृतिक चर्चासत्रांचे केंद्र असणा-या ’काफी हाऊस’ ला भेट देणे मात्र जमले नाही वेळेअभावी.

प्रयागला परत येण्यासाठी म्हणून तिथल्या मित्रमंडळींनी अर्धकुंभमेळ्याचे दिलेले आमंत्रण अजूनही तसे बाकी आहे. आठवणींच्या कप्प्यातले ते प्रयाग आता मला भेटत नाही. मागच्या दहा वर्षांत किमान पंचवीस वेळा प्रयागला जाणे झाले. पण आता मला वेगळेच प्रयाग दिसते, भेटते. मी बदलेले तशीच प्रयागही तर बदलणारच जगण्याच्या ओघात!

Sunday, May 23, 2010

२८. प्रयाग: भाग १

प्रयागला मी पहिल्यांदा १९९२ मध्ये गेले तेंव्हाची ही गोष्ट! त्यानंतर अनेकदा या शहरात जाण्याची, तेथे राहण्याची संधी मला मिळाली. पण तो पहिला अनुभव अजूनही मनात आहे......त्यावेळी लिहिलेली काही पाने परवा अचानक सापडली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या......

पूर्वी लोक तीर्थयात्रेला जायचे तेंव्हा म्हणे ’परत येऊ की नाही’ या आशंकेने आपल्या मागची सगळी तरतूद करून जायचे. स्वाभाविकच होतं ते! आजकाल परिस्थिती बदलली आहे, असं आपलं आपण म्हणतो! पण प्रत्यक्षात प्रवासाला निघालं की ’सा-याच बदलांना प्रगती मानू नये’ असा साक्षात्कार चडफडत का होईना पण होतोच!

गाडी ’ऊशीराने’ - ( हा खास मध्य रेल्वेचा शब्दप्रयोग!) धावत असल्याने आत्ताच्या वेळेचं काय करायचं हा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला. पहाटे निघायचं म्हणून मैत्रिणीने दुपारच्या जेवणाचा डबा सोबत दिला होता, तो दादर स्थानकात संपवला मी. बसल्या बसल्या झोप काढत असताना दुपारी कधीतरी माझा प्रवास सुरू झाला.

सहप्रवाशांशी बोलताना अलाहाबादला इलाहाबाद आणि खरं तर प्रयाग म्हणायचं असतं अशी माहितीत भर पडली. गंगा आणि यमुनेचा एकेरी उल्लेख करणं म्हणजे तर ’शांतं पापम!!’ ’गंगाजीके दर्शन हररोज सुबह करोगे ना बेटा?” असं एका बाईंनी मला विचारल्यावर मी जरा घाबरलेच! नदी म्हणजे निव्वळ H2O असं समजण्याइतकी मी टोकाची तर्कनिष्ठ नाही. मलाही नदी आवडते. पण नदीच दर्शन? डिसेंबरच्या थंडीत? पहाटे? जास्तच होती नुसती कल्पनाही. पण वाराणसीला ’गंगामय्या’ पाहताना ’दर्शन’ हाच शब्द मनात आला. पण ती पुढची गोष्ट झाली!

प्रयागला मी पोचले, तेंव्हा संध्याकाळचे फक्त साडेपाच झाले होते, पण अंधार असा की जणू रात्रीचे आठ वाजलेत! रस्ते अगदी सूनसान. थंडीचा पहिला झटका आधी जाणवला आणि मग प्रयागच्या आतिथ्याची झलक!

’केल्याने देशाटन’ माणूस शहाणा होतो म्हणतात. आजकाल माहितीचा इतका भडिमार आपल्यावर होत असतो की, जणू आपल्याला सगळ माहिती आहेच असं आपल्याला वाटायला लागतं! पण आपल्या देशाच्या विशालतेची, भव्यतेची खरी जाणीव प्रवासात होते. इतके दिवस अलाहाबाद आणि पंडित नेहरू एवढ एकच समीकरण डोक्यात होतं. पण जगदगुरू शंकराचार्यांनी ज्या पूर्वमीमांसकाचे श्रध्दापूर्वक दर्शन केले ते कुमारिल भट्ट प्रयागनिवासी होते हे येथे पोचल्यावरच लक्षात आलं.

मला प्रवास करायला आवडतं ते वेगवेगळी माणसं भेटतात म्हणून. बाकी निर्जीव ठिकाणं पाहण्यात मला काही रस नसतो. प्रयागच्या लोकांबरोबर हिंडताना त्यांचा एक वेगळा पैलू जाणवला- तो म्हणजे ते कोणतीही बाब निर्जीव मानत नाहीत. सिंहगडावर जाऊन तानाजीची समाधी न पाहताच परत येणारे अनेक लोक मला माहिती आहेत. ’त्यात काय पाहायचं? समाधीसारखी समाधी असणार..” हे तुम्हीही ऐकलं असेल वाक्य! पण प्रयागमध्ये माणसं त्या त्या स्थानाशी मनाने जोडली गेली आहेत असं वाटतं. ’ब्रह्माने या ठिकाणी १०० अश्वमेध केल्याची’ माहिती ते मला अशा थाटात सांगत होते, की ते जणू त्याचे एक यजमान होते! गंमत वाटली मला.

प्रयागमधील सर्वात प्रेक्षणीय स्थळ म्हणजे अर्थातच त्रिवेणी संगम! गंगा, यमुना आणि सरस्वती या ठिकाणी एकमेकींना भेटतात! सरस्वती तुम्हा आम्हाला दिसत नाही, पण ती असते .. सूक्ष्म, अदृष्य पण प्रवाही...पहिल्या दिवशी काही वेळ यमुनेवर जाऊन बसलो होतो. विस्तीर्ण पण गलिच्छ घाट, पिण्डदानासाठी, श्राद्धासाठी तेथे जमलेले लोक, .. जणू मृत्यूच सर्वव्यापी होता.. ते दृष्य पाहून मन काहीसं उदास झालं. नंतर एक दोन वेळा चालण्याच्या हौसेपायी, तर कधी चक्का जाम म्हणून रात्री यमुनेच्या काठी भटकलो. रात्रीच्या अंधारात मात्र यमुना सौम्य, स्नेहमयी वाटली. खट्याळ श्रीकृष्णाच्या बालक्रीडांच गुपित तिच्याजवळ आहे याची जाणीव काळॊखात तिचा आवाज ऐकताना झाली.

प्रथमदर्शनी गंगेने मात्र माझा भ्रमनिरास केला. विस्तीर्ण वाळवंटात दूरवर एक इवलीशी जलधारा दिसत होती. ती गंगा, यावर माझा विश्वास बसेना. कदाचित गंगेबद्दल माझ्या अपेक्षाच अवास्तव होत्या. ऐकून, वाचून – विशेषत: आद्य शंकराचार्यांनी लिहिलेले गंगास्तोत्र वाचून मी केलेली अपेक्षा अगदीच फोल ठरली. मागे एकदा पानशेत धरण पाहायला गेले होते तेंव्हा आणि गोहत्तीला ब्रह्मपुत्रेचं ’दर्शन’ घ्यायला गेले तेंव्हाही माझी अशीच फसगत झाली होती. माझ्या मनातले भाव मला लपवून ठेवता आले नाहीत. कारण माझ्याबरोबरचे लोक पावसाळ्यात गंगेला किती पाणी असतं, त्याच पुन:पुन्हा वर्णन करत होते.

गंगा ही नदी मोठी मजेदार आहे. मला ती भारतीय जीवनशैलीची, संस्कृतीची प्रतिनिधी वाटते. दोन्ही गोष्टींची आपण थोरवी ऐकलेली असते, पण प्रत्यक्षात आपल्याला पहिल्यांदा दिसते ती त्यातली घाणच! गंगेबाबतही मला तोच अनुभव आला. पाणी इतक घाण होतं, की त्यात हात काय पायही घालावेसे वाटले नाहीत. चिकाटीने मागोवा घेत राहिलं, की भारतातल्या चांगल्या गोष्टीही दिसायला लागतात, मन त्यामुळे भारावून जातं! गंगेला एक सूक्ष्म नाद आहे, तिला एक विशिष्ट गंध आहे. तिच्या काठचा वारा इतका सुखद आहे, की त्याला कशाचीही उपमा देता येत नाही. माणूस हळूहळू गंगेच्या प्रेमात पडतो. ’नाहं जाने तव महिमानम, पाहि कृपामयी मामद्न्यानम’ या शंकराचार्यांच्या ओळी मी नकळत तोवर गुणगुणायला लागले होते. गंगेचा महिमा असा अपार आहेच.

गंगा यमुनेच्या संगमावर नावेत बसून जाताना उगीच भव्य दिव्य काहीतरी वाटलं मला. कोणी म्हणेल, त्यात काय एवढं? नद्यांसारख्या नद्या. पण त्या दोन्ही नद्यांच्या व्यक्तिमत्त्वांचा, शेकडॊ- हजारॊ वर्षे चालत आलेल्या त्यांच्याविषयीच्या कथांचा मनावर प्रभाव पडतो. गंगेचं पाणी गढूळ, काहीस घाण दिसणारं, हलक्या लाटांचं! आणि यमुना भव्य, काळीशार, मोठया लाटांची! त्यांच्या मीलनाचा तो क्षण चिरंतन आणि अविरत....कुठे तक्रार नाही, समर्पणाचा अविर्भाव नाही.. त्या संगमात स्नान करणारे असंख्य लोक, त्यांच्या आसपास उडणारे अगणित पांढरेशुभ्र बगळे... रमणीय दृष्य होत ते! या ठिकाणी मान्यतेनुसार यमुनेच अस्तित्त्व संपतं, आता ती गंगाच आहे. गंगा सगळ्यांना आपल्यात सामावून घेते, गंगेचं रूप देते. द्वैत संपून हा अद्वैताच्या प्रवासाचा शुभारंभ! म्हणून भारतीय संस्कृतीने इतक महत्त्व दिल का गंगेला?
भाग २ लवकरच...