ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, June 7, 2019

२५६. 'मी' आणि 'डवाव' भाग २ : १ ते ७ जून २०१९

भाग १


१ जून
काल संध्याकाळी परत येताना दोन-तीन दुकांनात डोकावले. एका ठिकाणी ‘ब्राऊन ब्रेड’ मिळाला. दुसऱ्या ठिकाणी ‘ब्राऊन राईस’ होता, पण दोन किलोंचं पाकिट होतं. माझं हे घर छोटं आहे आणि साठवण करायला फार जागा नाही म्हणून मी एक किलोचं पाकिट घेता येईल का ते बघत होते, पण नाही झालं काम. पण सगळे लोक इंग्लीश बोलतात हे किती सुखावह आहे. इथं सगळे ‘सेटलिंग ट्रबल्स’ जणू नाहीसेच झाले आहेत. जरी अन्य काही आहेत म्हणा ...

कोपऱ्यावर ‘एस ऍन्ड आर’ नावाचं एक सुपरमार्केट आहे. तिथं फक्त सभासदांना प्रवेश आहे असं कळलं म्हणून मी जरा कुतुहलाने तिकडं डोकावले. वर्षाला सातशे पेसो भरून सभासद व्हायचं हे कळलं. पण सभासद होण्याचे नेमके काय फायदे आहेत हे मात्र तिथल्या कर्मचारी वर्गाला नीटसं सांगता आलं नाही. कदाचित सुपरमार्केटमध्ये प्रवेश करता येतो हाच मोठा फायदा असेल.

घरी येऊन निवांत चहाचा आस्वाद घेत होते. ही ‘ग्रीन टी’ आणि विविध ‘फ्लेवर्ड टी’ (साखर आणि दूध नसलेले) घेण्याची सवय मला म्यानमामध्ये लागली. खरं तर दुपारी तीनपर्यंत बाहेर प्रचंड उकाडा होता. पण वातानूकुलित कार्यालयात दिवसभर बसले आणि नंतर ढगाळ हवा होती, त्यामुळे चहाची गरज भासली. तर अचानक सोफा जोरजोरात हलायला लागला. दोन सेकंदांनी माझ्या लक्षात आलं की भूकंप होतो आहे. मी हातातला चहाचा कप बाजूला ठेवला, पंखा बंद केला आणि बाहेर पडले. शेजारची दोन-तीन कुटुंबही बाहेर आली होती. मी दार ओढून घेईतो भूकंप थांबला आणि मी परत आत जाण्याचा विचार करत होते तेवढ्यात सायरन वाजला. मग आम्ही सगळे खाली गेलो. जॉय आणि रोझा अशा दोन शेजारणी, जॉयची मुलं (मोठी मुलगी, लहान मुलगा) असे आम्ही सगळे एकत्र उभे होतो. रोझा खूप घाबरली होती आणि जॉयच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. आम्ही उभ्याउभ्या दहा मिनिटं गप्पा मारल्या. जॉयच्या मते पूर्वी डवावला भूकंप होत नसे, अलिकडे मात्र कंप जाणवतो आहे. दोनेक महिन्यांपूर्वी मनिला शहराला भूकंपाचा धक्का बसला होता आणि तिथल्या काही इमारती खचल्या होत्या. त्यामुळे इथले लोक चिंतेत आहेत.

जोआन आली. तीही घाबरलेली होती. मग तिला जरा शांत केलं. पुन्हा भूकंपाचा धक्का बसला तर आम्ही दोघींनी काय करायचं याचं नियोजन केलं.

आमच्या घरात मोबाईल रेंज अजिबातच नाही. मग खाली जाऊन स्विमिंग पूलाजवळ रेंज मिळाली तेव्हा भूकंपाची माहिती वाचली. भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ६.१ होती आणि सुमारे नव्वद किलोमीटर अंतरावर (आणि ऐशी किलोमीटर खोलीवर – तपशिलातली चुभूदेघे.) त्याचा केंद्रबिंदू होता हे कळलं. ‘भूकंपाचे तुमचे अनुभव लिहा’ – असं या साईटवर आवाहन असतं. मग तिथं इमानेइतबारे अनुभव लिहून आले. डवाव शहरातल्या काही लोकांनी लिहिलेले अनुभव वाचले. आमच्यातल्या काहींनी सौम्य धक्का असं ज्याचं वर्णन केलं होतं, त्यालाच काहींनी तीव्र धक्का असं म्हटलं होतं. कदाचित घराची रचना, कितव्या मजल्यावर त्यावेळी व्यक्ती होती, खुल्या जागेत होती की बंदिस्त जागेत होती अशा अनेक गोष्टींवरून धक्क्याची परिणामकारकता बदलत असावी असं वाटलं. याविषयी जरा अधिक वाचायला हवं. बाकी या भूकंपाच्या धक्क्यामुळे आपलं इथलं वास्तव्य तात्पुरतं आहे – इथलं म्हणजे डवावमधलं नाही तर पृथ्वीवरचं – याची जाणीव झाली. आपण लॅपटॉप, पासपोर्ट वगैरे फार जपतो – पण कोणत्या क्षणी हे सगळं सोडून जायला लागेल त्याचा काही भरोसा नाही. अर्थात आहोत तोवर या गोष्टींना जपणंही क्रमप्राप्त आहे. प्रश्न मरणानंतरचे नसतातच (असले तर आपल्याला माहिती नाहीत), ते जगण्यातलेच असतात...

संध्याकाळी बाहेर पडलो तर पाऊस आला. पाऊस इथं बाराही महिने (आणि महिन्यातले बारा ते पंधरा दिवस नक्की) असतो. पावसामुळे कामं पुढं ढकलण्यात काहीही अर्थ नसतो. मग चालत राहिलो. मला मॉल दाखवायची जोआनला इच्छा होती आणि मला मात्र काहीही खरेदी करायची नव्हती, मग ते समजल्यावर चाळीस एक मिनिटांनी आम्ही परत फिरलो. वाटेत एक कप कॉफी घेतली. तिथंही पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला – अगदी दोन ते तीन सेकंद इतकाच होता तो.

२ जून
आज सकाळी मला पहिली पोलिस वॉर्निंग मिळाली. त्याचं असं झालं की वाहनांसाठी सिग्नल लाल झाल्यावर मी रस्ता ओलांडला. असं करणारी मी एकटीच होते हे माझ्या तितकंस लक्षात आलं नाही.

समोर फूटपाथवर पिवळा शर्ट घातलेला एक पुरूष माझ्याशी बोलायला आलं. “Do you speak English?” त्याने विचारलं. मी हो म्हटल्यावर तो म्हणाला (आमचा संवाद आता मराठीत लिहिते) , “तू आत्ता जिथून रस्ता ओलांडलास ती रस्ता क्रॉस करण्याची अयोग्य जागा आहे. थोडं पलिकडं पहा, तुला ते पांढरे आडवे पट्टे (Zebra crossing) दिसताहेत ना? ती रस्ता क्रॉस करायची योग्य जागा आहे. बघ, सगळे लोक तिथूनच रस्ता ओलांडत आहेत. या बाजून रस्ता ओलांडणारी तू एकटीच आहेस.” मी म्हटलं, “माफ करा. मी इथं नवीन आहे. मी नियम माहिती करून घेण्यात आळस केला आणि माझ्याकडून चूक झाली.” त्यावर तो हसून म्हणाला, “ठीक आहे, इथून पुढं लक्षात ठेव.” मीही मान डोलावली. आणि पाहिलं तर तो डवाव पोलिस दलाचा कर्मचारी होता.

पादचारी आणि वाहनचालक या दोघांसाठीही अतिशय सोयीची व्यवस्था आहे. पादचाऱ्यांना शिस्त लावण्याचं काम इथले पोलिस करताना पाहून आदर वाटला. नंतर मी पहात होते तर खरोखर सगळे लोक झेब्रा क्रॉसिंगचा वापर करत होते. सिग्नल नसलेल्या ठिकाणी आपण झेब्रा क्रॉसिंगवर चालत असलो तर वाहनं थांबतात, हॉर्न वगैरे न वाजवता शांतपणे सगळ्या लोकांना रस्ता ओलांडू देतात हे चित्र दिवसभर सर्वत्र दिसलं.

भाषा शिकण्यासाठी काल एक मोबाईल ऍप डाऊनलोड करून घेतलं होतं. बातम्यांच्या खालच्या ओळी वाचून, त्यातले शब्द ऍपवर शोधून बातम्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न चालला होता. बातम्यांच्या ओळी थोड्या वेळाने परत समोर येत असल्याने शब्द ते वाक्यं असा प्रवास करता आला. ते करत असताना मात्र एक धक्का बसला. Hindi या शब्दाचा अर्थ इथल्या भाषेत पूर्ण नकारात्मक आहे .



-  not, no, negative vote, negative answer, didn’t, weren’t , doesn’t ….असे या शब्दाचे अर्थ पाहून विचारांत पडले.

७ जून

मागचे दोन-तीन दिवस ऑफिसातल्या लोकांशी ओळख करून घेणं, इथलं काम समजून घेणं यात जात आहेत. फिलिपिन्सचा इतिहास आणि भूगोल समजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या देशाबद्दलची माझी पाटी कोरी असल्याने जरा वेळ लागणार आहे खरं, पण वेळ आहे माझ्याकडं भरपूर त्यामुळे काळजी नाही.

काबूल आणि यांगून या दोन्ही ठिकाणी एक पाहिलं होतं की फिलिपिन्सच्या लोकांचं नेटवर्क जबरदस्त असतं. सगळे एकमेकांना कायम मदत करत असतात. अडचण आली तर फिलिपिन्सचे नागरिक त्यांच्या दूतावासाकडं सहज जाऊ शकतात. यांगूनला ते सगळे एकत्र बॅडमिंटन खेळायचे, पार्ट्या करायचे हे माझ्या फिलिपिनो सहकाऱ्यांकडून नेहमी ऐकलं होतं. कोण कोणत्या संस्थेत आणि कोणत्या पदावर आहे याचा त्यांना फरक पडत नाही. ते सगळे एकमेकांना धरून असतात.

मी इथं आल्याचं कळल्यावर लगेच सिसिलिया आणि पिटा यांचं मनिलाला त्यांच्या घरी येण्याचं आमंत्रण आलं. सिसिलिया आणि मी काबूलमध्ये एकाच संस्थेचं काम करत होतो. तर पिटा म्यानमामध्ये माझ्याचं संस्थेचं पण मंडले शहरात काम करत होती. कोरा माझ्याबरोबर काम करत होती, ती सध्या बांगलादेशमध्ये आहे, तर ज्युल्स म्यानमातच आणखी काही काळ राहण्याचा विचार करत आहे. त्या सगळ्यांचं अगत्यपूर्ण बोलणं ऐकताना हे फक्त फिलिपिन्स नागरिकांशीच नाही तर इतरांशीही तितकेच मैत्रीपूर्ण वागतात असं लक्षात आलं.

देशातली सध्याची ठळक बातमी म्हणजे ‘Trash Shipped Back to Canada’.


२०१३-१४ मध्ये ‘रिसायकल करण्यासाठी’ या नावाखाली कॅनडातून काही हजार टन कचरा फिलिपिन्समध्ये पाठवण्यात आला होता. गेली पाच वर्ष या मुद्द्यावरून मनिला-ओटावा संबंध बिघडले होते. अखेर शुक्रवारी (३१ मे) ६९ कंटेनरमधून हा कचरा कॅनडाला परत पाठवण्यात आला. पडद्यासमोर आणि पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडून गेल्यावर ही कृती झाली आहे. विकसित देश आता त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावताना अधिक काळजी घेतील अशी एक आशा या घटनेतून निर्माण झाली आहे.

जालावर वाचत असताना अचानक लक्षात आलं की मिंडनाव विभागात मे २०१७ मध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला होता. त्याची कालमर्यादा वाढवत वाढवत आता डिसेंबर २०१९ पर्यंत करण्यात आली आहे. आपण मार्शल लॉ लागू असलेल्या शहरात आणि विभागात राहतो आहोत हे मला मागच्या आठवड्यात कधी जाणवलंच नव्हतं. शहरातल्या मॉलमध्ये प्रवेश करताना सुरक्षा तपासणी होणं हे आता नेहमीचं दृष्य असल्याने त्याबाबत काही वेगळं वाटलं नव्हतं. लायका (माझी सहकारी) मला आजच सांगत होती, “डवावमध्ये तुला जे दिसतं आहे त्यावर जाऊ नको. या शहराबाहेर दहा-वीस किलोमीटर गेलं की जग एकदम बदलून जातं. आमचा देश गरीबी, आंतरिक संघर्ष आणि क्लायमेट चेंज या तीन महाकाय समस्यांशी एकाचवेळी लढतो आहे. आणि उद्याचं चित्र काही फारसं आशादायक नाही... ”

भारतात मी हेच म्हणते. अफगाण सहकारी हेच सांगत होते. मोझाम्बिक आणि म्यानमा सहकाऱ्यांचंही हेच म्हणणं होतं. देश बदलला, भाषा बदलली, रीतीरिवाज बदलले, सत्ताधारी बदलले तरी समस्या मात्र कमीअधिक त्याच आहेत. ग्लोबल विलेज या संकल्पनेच हे एक स्पष्ट उदाहरण. आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत? आपण कुठं पोचणार आहोत? जिथं कुठं जेव्हा कधी आपण पोचू तेव्हा कितीजण शिल्लक असतील? त्यांच्यापुढं काय वाढून ठेवलं असेल?

क्रमश:
भाग ३

Friday, May 31, 2019

२५५. ‘मी’ आणि ‘डवाव’: २७ ते ३१ मे २०१९



 (२८ मे २०१९ या दिवशी मी फिलिपिन्समधल्या डवाव शहरात राहायला आले. ही लेखमालिका म्हणजे हे शहर आणि हा देश मला कसाकसा उमजत गेला याची नोंद . हा प्रवास म्हणजे एक शोध आहे, त्यात शाश्वत सत्य असल्याचा कसलाही दावा नाही. हे शहर अनुभवताना ‘मी म्हणून माझे’ पूर्वग्रह आहेत याची नोंद वाचकांनीही घ्यावी. आणि हो, एक धोक्याची सूचना : नेहमीप्रमाणेच हे लेखन ‘डवाव’बद्दल कमी आणि ‘माझ्या’बद्दल जास्त आहे. 😊) 

२७ मे

एकदाची मी फिलिपिन्सला निघाले होते तर. खरं तर मी सत्तावीस मार्चला जाणं अपेक्षित होतं. पण विजा मिळायला झालेल्या उशिराने पुढचेही बेत बदलत गेले. अर्थात सहा आठवड्यांऐवजी चांगली चौदा आठवडे सुट्टी मिळाली म्हणून मी खुष होते. सुट्टी म्हणजे मात्र फक्त निवांतपणा नव्हता. साठेक कामं उरकली – त्यातली काही घरबसल्या उरकली. पंधरा पुस्तकं (मुख्यत्वे मराठी) वाचली. त्यात काही नवे (मला नवे) लेखकही मिळाळे, पाच-सहा प्रवास केले. पक्षी पाहिले. फोटो काढले. मुख्य म्हणजे कच्छचं छोटं रण आणि अजंठा लेणी पाहिली. पुण्यातही आगाखान पॅलेस, राजा केळकर संग्रहालय अशा अनेक स्थानांना भेट दिली. भरपूर चालले. पस्तीस-चाळीस लोकांना भेटून छान गप्पा झाल्या. सुमारे साठ वेगवेगळे भारतीय (आणि प्रामुख्याने मराठी) पदार्थ खाल्ले. लॅपटॉप-किंडल-फोन दुरूस्त्या झाल्या. कॅमेऱ्यातल्या फोटोंचं वर्गीकरण करून झालं. आणि हो, आरामखुर्चीत निवांत बसले .... वगैरे वगैरे. 
पुण्यातून मुंबई विमानतळावर जायचं हेही एक कामच असतं. यापूर्वीचा अनुभव चांगला असल्याने  'केके ट्रॅवल्स'च्या सेवेचा लाभ घेतला. वाटेत कारचालकाशी गप्पा झाल्या आणि त्याने लावलेली अनेक नवीन गाणीही ऐकायला मिळाली. सोबत एकच सहप्रवासी होते. त्यांनी झोपेचा पर्याय निवडल्याने त्यांच्याशी मात्र फारसं बोलणं झालं नाही. 

मुंबई विमातळावर पोचले. टर्मिनल २ वर यापूर्वी मी एकदाच आले होते, तेही २०१४ मध्ये. मागच्या पाच वर्षांत मुख्यत्वे येणंजाणं झालं ते दिल्लीतून. तिथलं टर्मिनल ३ मला आवडतं. मुंबईचं टर्मिनल २ ही मला आवडलं. मोबाईल-लॅपटॉप चार्जिंग पॉईंट्स कमी आहेत एवढी एकच उणीव मला भासली. बाकी टर्मिनल प्रशस्त आणि मुख्य म्हणजे स्वच्छ आहे.  


‘सिंगापूर एअरलाईन्स’ चांगली आहे असं ऐकून होते. त्यांची सेवा चांगली होती. प्रवासात ‘Bohemian Rhapsody’ हा चित्रपट पाहिला आणि तो मला आवडला. विमानाचा आवाज मात्र फारच त्रासदायक होता. 

२८ मे


सकाळी साडेसातला विमान सिंगापूरला पोचलं. माझं पुढचं विमान साडेबारा वाजता होतं. टर्मिनल ३ ला मी आले आणि पुढचं विमान टर्मिनल दोनवरून होतं. सिंगापूर विमानतळावर एकूण चार टर्मिनल्स आहेत आणि त्यांना एकमेकांशी जोडणारी स्कायट्रेन आहे. स्कायट्रेनचा अनुभव चांगला होता, मजा आली.  
एअरलाईन्सने मला ‘२० सिंगापूर डॉलर्सचं ट्रान्झिट व्हाऊचर’ दिलं. 
Gift Voucher
मला ही मार्केटिंगची कल्पना आवडली. मी एरवी विमानतळावर काही खरेदी करत नाही. पण इथं वीस डॉलर्स खर्च करायचे म्हणून मी जरा हिंडले आणि शेवटी हवेच्या झोताने किणकिणणारी ही छोटी घंटा खरेदी केली. ही सोळा (सिंगापूर) डॉलर्सला होती. आणि दुकानात सहा डॉलर्सच्या आतली एकही वस्तू नव्हती. त्यामुळे मी पदरचे दोन-तीन डॉलर्स खर्च करून काहीतरी खरेदी करावी अशी मला तिथल्या विक्रेतीने बरीच गळ घातली. पण मी काही बधले नाही. चार डॉलर्स वाया गेले तर माझं काही बिघडणार नव्हतं – कारण ते डॉलर्स मुळात मी कमावलेले नव्हते. 😊    
'सिंगापूर विमानतळ' मी आजवर पाहिलेल्या विमानतळांमधला एक उत्कृष्ट अनुभव म्हणावा लागेल. प्रवाशांच्या सोयींचा आणि त्यांच्या गरजांचा चांगला विचार करून विमानतळ चालतो असं म्हणावं लागले. जेव्हा मदत घ्यायची वेळ आली तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने आणि हसऱ्या चेहऱ्याने मदत केली.
टर्मिनल २ मध्ये मी Orchid Garden आणि Enchanted Garden पाहिल्या. 
Enchanted Garden

Orchid Garden
गार्डन म्हणजे एक छोटा भाग त्यांनी विकसित केला आहे. पण एकदम वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटतं. मी या दोन्ही बागांमध्ये काही वेळ निवांत बसून राहिले. मोबाईल हातात असताना आणि मोफत वायफाय सेवा असतानाही निवांत बसून राहण्याचा अनुभव चांगला होता. हातात जास्त वेळ असेल तर सिंगापूर विमानतळावरून मोफत ‘सिटी टूर’ करता येते. माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता पण पुन्हा कधी सिंगापूरमार्गे जायची संधी मिळाली तर मी ही टूर करता येईल अशा पद्धतीने प्रवासाची आखणी करेन हे नक्की.  
एका मैत्रिणीचा ‘तिथली बटरफ्लाय गार्डन छान आहे’ असा निरोप आल्यावर तिच्या शोधात निघाले, ती टर्मिनल ३ मध्ये असल्याचं कळलं. मग पुन्हा एकदा स्कायट्रेनने प्रवास केला. ही छोटीशी बाग सुंदर आहे. हजारो फुलपाखरं तिथं आहेत. 
Butterfly Garden
माझ्या विमानाची वेळ होत आल्याने मी तिथं जास्त वेळ थांबू शकले नाही. 
‘कावेरी’ मध्ये इडली-सांबार खाल्लं आणि कॉफी प्यायले. पानात येईल ते सगळं विनातक्रार खाण्याची सवय मला असली तरी मलाही आवडीनिवडी आहेत हे इथलं सांबार मला आवडल्यावर माझ्या पुन्हा एकदा लक्षात आलं. 'सांबार आवडल्याचं' मी आवर्जून सांगितल्यावर तिथं काम करणाऱ्या दोन्ही स्त्रिया मनापासून हसल्या. 
सिंगापूर सोडल्यावर लगेच ‘नभ मेघांनी आक्रमिले’ अशी स्थिती झाली. अचानक मला आता ‘रडारला आपलं विमान दिसणार नाही की काय’ अशी शंका आली. रडार-विमानं-ढग या नुकत्याच लागलेल्या नवीन शोधाच्या चर्चेचा हा परिणाम असावा!! पॅसिफिकवरून उडणं हा एक मस्त अनुभव होता. वरून पाहताना निरनिराळ्या टप्प्यांत पाण्याचे रंग वेगवेगळे दिसत होते. काही बोटी ‘एकला चलो रे’ म्हणत मार्गक्रमण करत होत्या तर काही एकमेकींची साथ करत चालल्या होत्या. 
पॅसिफिक महासागर
पृथ्वी म्हणजे जमीन अशी नेहमीची धारणा मागे पडून पृथ्वी म्हणजे जास्त पाणी आहे हे समजून घेणं महासागर दूरून पाहताना आपोआप घडलं. 
साडेतीन तासांनी डवावोला पोचले. दोनपैकी एकच कन्वेयर बेल्ट चालू होता आणि हाँगकाँगहून आलेल्या विमानाचे प्रवासी त्यांचं सामान शोधत होते, त्यामुळे अर्धा तास थांबावं लागलं. 
इमिग्रेशनवाल्यांनी काहीच कटकट केली नाही. इथं 'पहिल्यांदा येणं' हा काहीतरी सवलतीचा मुद्दा दिसतोय. ‘पहिल्यांदा आलात का’ एवढचं विचारून इमिग्रेशनने देशात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब केलं आणि कस्टमने पण लगेच ‘पुढे जा’ असा आदेश दिला. दिल्लीच्या फिलिपिन्स दूतावासाने दिलेल्या या बंद लिफाफ्याचं आता काय करायचं आहे हे कळेल कदाचित एक दोन दिवसांनी. 
दूतावासाकडून आलेलं सीलबंद पाकिट


किंबर्लेने आज-उद्या मला बाहेर पडावं लागू नये इतपत सामान आणून ठेवलं आहे. तिने एक कसलातरी अर्ज भरून घेतला आणि माझा फोटोही काढला तिच्या मोबाईलवर. माझी गृहसखी (housemate) जोआन कार्यालयातून आली. ती केनयाची आहे. मग गप्पा झाल्या. अनोळखी माणसांशी भरपूर गप्पा मारणं हे माझ्यासाठी नेहमीचं आहे. 
२९ मे 
प्रवासाचा शीण घालवण्यासाठी म्हणून मला आज सुट्टी होती. खरं म्हणजे मी चोवीस तासांचा प्रवास करूनही दमलेली नव्हते. पण फार महत्त्वाचा मुद्दा नसेल स्थानिक लोकांच्या निर्णयावर काही चर्चा करायची नाही हे माझं नेहमीचं धोरण मी अंमलात आणलं आणि निवांत बसले. 
काही काळाने लॅपटॉप आणि मोबाईल दोन्हींची बॅटरी संपत आली. त्यांच्या चार्जिंगसाठी आवश्यक असलेला adapter माझ्याकडं नव्हता. कार्यालयाने काल दिलेले पैसे (स्थानिक चलनात) आणि स्थानिक फोनच सिमकार्ड आणायचं कारचा चालक विसरला होता. त्यामुळे माझ्याकडं स्थानिक चलन नव्हतं. त्यामुळे बाहेर चक्कर मारायला जाण्यात अर्थ नव्हता. चालत जाता आलं असतं पण रस्ता चुकले तर परत कसं यायचं हा प्रश्न होता.माझ्या बीएसएलएल इंटरनॅशनल सिमला पुरेशी रेंज नव्हती. त्यामुळे किंडलची बॅटरी संपत आली होती. इंटरनेट-मोबाईलविना छत्तीस तास राहण्याचा अनुभव मजेदार होता. या गोष्टींची सवय झाली आहे इतकंच. त्यांच्याविना आयुष्य कसं जगायचं असतं हे मी फक्त विसरले आहे…
इथलं स्थानिक चलन आहे पेसो. इंटरनेटवर Peso हा शब्द आहे तर प्रत्यक्षात नोटेवर Piso असा शब्द आहे. म्यानमा भाषेतही ‘पैसा’ असा शब्द आहे. जोआन सांगत होती की स्वाहिली भाषेतही ‘पेसा’ (Pesa) हा शब्द वापरला जातो. भाषांमध्ये बाकी कितीही विविधता असली तरी ‘पैशाची’ भाषा मात्र जगभरात एकच आहे असं दिसतंय. 
नंतर काही वेळ टीव्ही पहात बसले. त्यातल्या कार्यक्रमांमधले काही शब्द – ते स्थानिक भाषेत असले तरी – मला कळत होते त्याचं मला नवल वाटलं. नीट ऐकल्यावर लक्षात आलं की काही शब्दांवर स्पॅनिश भाषेचा प्रभाव आहे. स्पॅनिश मला येत नाही. पण तिची बहीण पोर्तुगीज भाषा मी वर्षभर (मोझाम्बिकच्या वास्तव्यात) पुष्कळ ऐकली आहे आणि बोलायचा-वाचायचा-लिहायचा प्रयत्नही केला आहे. ‘आता इथं स्पॅनिशच्या निमित्ताने पोर्तुगीजची उजळणी होईल’ या विचारांनी मला एकदम उत्साह आला. 
म्यानमामध्ये असताना तिथल्या परिस्थितीमुळे मी ब्लॉग न लिहिण्याचा निर्णय घेतला होता. आता इथं तशी काही अडचण नाही त्यामुळे परत लिहायला सुरूवात करावी अशीही कल्पना मनात आली. लिहिण्याचं एक आहे – सराव सुटला की काही सुचत नाही. मी काबूलबद्दल लिहिलं ते मोझाम्बिकमध्ये असताना. तसंच मी आता इथल्या दिवसांबद्दल लिहायला सुरूवात केली तर म्यानमातले अनुभवही लिहिले जातील अशी आशा आहे. 
रात्री अचानक पाऊस आला. इथं पाऊस नेहमीच सोबत असणार आहे याचाही आनंद आहे. 
३० मे 
आज किम मला खरेदीला मदत करायला आली. चार एक तास आम्ही एकत्र होतो तेव्हा तिच्याकडून बऱ्याच गोष्टी समजून घेता आल्या. 
पहिली गोष्ट म्हणजे Davao चा उच्चार मी करते तसा डवावो नसून ‘डवाव’ असा आहे. तसंच मिंडानाओ (Mindanao) असा उच्चार नसून ‘मिंडनाव’ आहे असंही लक्षात आलं. आम्ही ‘जीपनी’ (jeepney) नावाच्या सार्वजनिक वाहनाने प्रवास करून मॉलला पोचलो. आपल्याकडच्या सहा आसनी रिक्षांसारखी पण जास्त प्रवासी नेण्याची क्षमता असलेली ही सार्वजनिक व्यवस्था. त्यांचे ठरलेले मार्ग आहेत आणि तशी पाटी (बसवर असते तशी) या जीपनीवर असते. किमान भाडं आठ पेसो आहे, पुढं टप्पे वाढतील तसतशी भाड्यात वाढ होते. 
डवाव शहर मोठं आहे. रस्ते रुंद आहेत, काही ठिकाणी कामामुळे ते खोदलेले होते. ठिकठिकाणी सिग्नल आहेत. रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहनं चालतात. रस्त्यांना नावं आहेत. एका ठिकाणी आम्ही जीपनी बदलली तेव्हा विद्यार्थ्यांचा एक मोठा गट आमच्यासोबत होता. त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्या. फिलिपिन्समध्ये एक गोष्ट सोयीची आहे – ते म्हणजे अनेक लोक इंग्लिश भाषा बोलतात. त्यामुळे संवादात अडचण येण्याची शक्यता कमी आहे. हळूहळू कळेलच म्हणा. 
'जी मॉल' नावाच्या एका मोठ्या मॉलमध्ये आम्ही गेलो. फिलिपिन्समधली माझी ही पहिली खरेदी.
माझी पहिली खरेदी

शब्दकोष आणि एक गोष्टीचं (लहान मुलांसाठीचं) पुस्तक. आता वाचेन ते. किमने नवं सिमकार्ड आणलं होत – Globe कंपनीचं. ते मॉलमधल्या एका दुकानात मोबाईलमध्ये बसवून घेतलं आणि तिथल्या मोफत वायफायचा उपयोग करून मी सर्वांना ‘मी मजेत आहे’ हे सांगितलं. 
मग मी आणि किम जेवलो. उपाहारगृहांत भरपूर गर्दी होती. शाळांना सुट्टी असल्याने पालकांसमवेत मुलं-मुलीही मोठ्या संख्येने दिसत होते. मी भात आणि भाजी खाल्ली. जेवण गरमागरम होतं त्यामुळे बरं वाटलं. मग आवश्यक गोष्टींची खरेदी उरकेपर्यंत तीन वाजले. मग हॉट चॉकलेटसोबत बिबिंगा (Bibingka) हा पदार्थ खाल्ला. 
Bibingka
भाताच्या पीठात साखर किंवा गूळ आणि नारळ घातलेला हा गोड पदार्थ मला आवडला. बिबिंगाचे अनेक प्रकार दिसले. या पदार्थाची रेसिपी आता शोधून काढते. 
अजून मी कार्यालयात गेलेली नाही आणि बाकी सहकाऱ्यांना भेटले नाही कारण ते सगळेजण एका प्रशिक्षण कार्यक्रमात आहेत, दरम्यान कार्यालयाने मला वाचण्यासाठी अनेक कागदपत्रं पाठवली आहेत. आज ते वाचून काढते. 

३१ मे 
आज एकदाची मी कार्यालयात आले. बाकीचे व्यग्र असले तरी जोआन मोकळी होती, त्यामुळे वायफाय पासवर्ड वगैरे शोधण्यात काही अडचण आली नाही. घरापासून चालत वीस मिनिटांच्या अंतरावर आहे कार्यालय. त्यामुळे रोज चालणं होईल. 

दुपारी जवळच एके ठिकाणी जेवायला गेलो. तिथलं मेन्युकार्ड पाहून काहीच कळेना. 



मग वेटरशी बोलून एक पालेभाजी आणि भात खाल्ला. 

आता उद्या-परवा सुट्टी. घर लावायचं काम, साफसफाई आणि किंडलवर पुस्तक वाचणे असा कार्यक्रम डोक्यात आहे. घरात इंटरनेट फारसं चालत नसल्याने  भरपूर रिकामा वेळ हाती येतो आहे तर 😊


क्रमश:

भाग २

Thursday, March 7, 2019

२५४. अवघड विषयाचा तास


पुण्यात बऱ्याच काळाने आलं की इथली वाहनांची गर्दी पाहून भीती वाटते. दरवेळी त्यावर मात करून काही आठवड्यांसाठी आले असले तरी मी स्कुटी चालवते. पण यावेळी मात्र काही ना काही कारणांनी मैत्रिणीकडं ठेवलेली स्कुटी आणायला जमलं नाही. वेगवेगळ्या कामांसाठी लांब अंतरांवर जायचं असल्याने तशीही मी स्कुटी वापरण्याची शक्यता जवजवळ नव्हतीच हे स्कुटी न आणण्यामागचं मुख्य कारण.

कामासाठी वेळेत पोचायचं असतं तेंव्हा रिक्षा वापरायची आणि घरी येताना निवांत वेळ हाताशी असल्याने बससेवेचा उपयोग करायचा असं एकंदर सोयीचं वाटलं आणि ते करत गेले.

गेल्या दोन-तीन आठवड्यांत अनेक रिक्षावाल्यांशी गप्पा झाल्या आणि पुण्याचे रिक्षावाले हे एक स्वतंत्र विद्यापीठ (चांगल्या अर्थाने)  असल्याचा मला (पुन्हा एकदा) साक्षात्कार झाला. एका रिक्षावाल्याने मला मसुद अजहर या दहशतवाद्याचा पूर्ण जीवनक्रम समजावून सांगितला. तर दुसऱ्या एकाने ‘नोटाबंदीने काय साधलं’ यावर त्याचे मौलिक विचार ऐकवले. विलास नावाच्या एका रिक्षाचालकाने (नाव बदलले आहे) त्याची सगळी जीवनकहाणी सांगितली, आणि ‘काकू, तुम्हाला काय वाटतं, बरोबर केलं ना मी?’ असं वारंवार मला विचारलं. आणखी एकाने आमच्या विभागातल्या राजकारणाची अद्ययावत माहिती मला दिली. तर कोणी मेट्रो झाल्यावरही वाहतुकीचा प्रश्न कसा मिटणार नाही हे सांगितलं.

आज पासपोर्ट कार्यालयातलं काम अपेक्षेपेक्षा लवकर संपलं. मग ‘आगाखान पॅलेस’ला भेट द्यायचा विचार मनात आला. पासपोर्ट कार्यालयाच्या बाहेर रिक्षांची रांग असते, पण जवळच्या अंतराला नकार देण्याची पुणेकर रिक्षावाल्यांची परंपरा लक्षात घेऊन मी ‘ओला’ रिक्षा बोलावली. पुढचा अर्धा तास मग त्या तरूण रिक्षावाल्याने माझी रीतसर शाळा घेतली.

“अहो मॅडम, इथं एवढ्या रिक्षा असतात, ओला कशाला बुक केली तुम्ही?” मी रिक्षात पाऊल टाकताक्षणी त्याचा प्रश्न.

मग ‘जवळच्या ठिकाणी जायला रिक्षावाले तयार नसतात’ असं मी म्हटलं तर तो म्हणाला, “अहो, ‘ओला’वाली रिक्षा महाग असते. वीसेक रूपये जास्त द्यावे लागतात तुम्हाला. ते ना आम्हाला मिळतात, ना तुम्हाला, मारवाडी मालकाची भरपाई करता तुम्ही लोक. त्यापेक्षा रिक्षावाल्याला दहा रूपये जास्त दिले तर काही बिघडणार नाही तुमचं!” त्याच्या या सल्ल्यावर मान डोलावत मी ‘पुढच्या वेळी लक्षात ठेवेन’ असं नम्रपणे सांगितलं.

मी वाद न घातल्याने किंवा रिक्षावाल्यांवर जास्त टीका न केल्याने या दादांना आणखी स्फुरण चढलं. “लोकसभेत कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतं?” असा थेट प्रश्न माझ्यावर येऊन आदळला. मी चकित झाले आणि सावधही. सावध अशासाठी की भारताची विभागणी सध्या मोदी-समर्थक आणि मोदी-विरोधक अशा दोन गटांत झाली असल्याचा प्रत्यय पुण्यात आल्यापासून मला वारंवार आला होता.

“तसं काही सांगता येणं अवघड आहे हो. तुम्हीच सांगा, तुमचा काय अंदाज?” कुंपणावरची भूमिका घेण्यात मी आता पटाईत झाले आहे.

दादांनी एकदम गाडी बदलली – म्हणजे संभाषणाची गाडी. मला विचारलं, “कुठं राहता तुम्ही?” मी माझ्या उपनगराचं नाव सांगितलं.

त्याने विचारलं, “तुमचे आमदार कोण आहेत, माहिती आहे का तुम्हाला?”

मला अर्थातच माहिती नाही. तरी मी अंदाजाने एक नाव घेतलं. तो हसला. मला म्हणाला, “त्या मॅडम कोथरूड मतदारसंघाच्या आमदार आहेत, तुमचे आमदार आहेत – श्री .....”.

मी आठवल्यासारखं मान डोलावत म्हटलं, “हो, त्या अमुक पक्षाचे आहेत ना ते, आता आठवलं.”

“काय मॅडम तुम्ही पण. ते त्या नाही तर ... पक्षाचे आहेत.” आता त्याच्या स्वरांत एक प्रकारची तुच्छता मला जाणवली. की तो फक्त आभास होता? चर्चा थांबवण्यासाठी मी मोबाईलमध्ये डोकं घातलं.

“तुमचे नगरसेवक कोण आहेत हे तरी माहिती आहे का तुम्हाला?” त्याचा पुढचा प्रश्न.

“नाही हो, नाही माहिती,” माझ्या मते मी सरळ उत्तर दिलं होतं.

“तुम्ही मतदान केलं होतं का हो?” दादा काही मला सोडायला तयार नव्हते.

“महापालिकेच्या वेळी नाही केलं. मी दिल्लीत होते तेव्हा.” मी अर्धसत्याचा आश्रय घेतला. म्हणजे मी मतदान केलं नाही हे खरं पण मी दिल्लीत होते हे मात्र खोटं.

“हे काही बरोबर नाही, मद्दान केलं पाहिजे मॅडम तुमच्यासारख्या लोकांनी. आता नाव नोंदवलं का पुन्हा?” मी होकार दिला.

“कुठं केली नावनोंदणी?” त्याने संशयाने विचारलं.

“ऑनलाईन केली,” मी सांगितलं. यावर मात्र त्याचा चटकन विश्वास बसला. “बायकोचं नाव राहिलंय नोंदवायचं, ते आता करतो ऑनलाईन,” असं तो म्हणाला.

एकदाची माझी (सत्व)परीक्षा संपली म्हणून मी सुस्कारा सोडला.

“मोदी साहेबांनी नोटाबंदी केली तेंव्हा किती लोकांनी पैसे फेकले तुम्हाला माहिती आहे का?” पुढचा प्रश्न आला. मी नकारार्थी मान हलवली. मग त्याने मला नोटबंदीचे फायदे, सुकन्या योजना, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ... अशा किमान अर्धा डझन योजनांवर प्रश्न विचारले. मी अंदाजपंचे दिलेली काही उत्तरं बरोबर आली (कारण नाव बदललं असलं तरी योजना जुन्याच आहेत) काही चुकली – कारण गेली काही वर्षी माझा इथल्या वास्तवाशी तुटलेला संपर्क.

तो दणादण बोलत होता, श्वास घ्यायलाही न थांबता. मग ‘आगाखान पॅलेस’ जवळ आला तसं समारोप करायच्या थाटात म्हणाला, “तुमच्यासारखे शिकले सवरलेले लोक काही माहिती घेत नाहीत आणि उगा मोदी साहेबांवर टीका करत बसतात. काँग्रेसची राजवट पाहिजे काय तुम्हाला परत?”

मी खरं तर मोदी सरकारवर कसलीही टीका केली नव्हती की काँग्रेसची भलावणही केली नव्हती. पण माझ्या विभागाच्या नगरसेवकाचं आणि आमदाराचंही नाव मला माहिती नसल्याने मी खजिल होते. आणि त्याहीपेक्षा या तरूण माणसाला असलेल्या राजकीय आणि प्रशासकीय माहितीने थक्क झाले होते. त्याचं बरोबर आहे. इतकी माहिती तर एक नागरिक या नात्याने मला असायलाच हवी.

‘मी भ्रष्ट काँग्रेस राजवटीची समर्थक नाही’ असं मी स्पष्ट केल्यावर त्याला जरासा दिलासा मिळाल्यासारखा वाटला. अर्ध्या तासाच्या संभाषणात तो पहिल्यांदा हसला. मला म्हणाला, “मॅडम, यावेळी मद्दान करा आणि कमळावरच शिक्का मारा. येऊद्यात परत मोदीच.”

मी हसून मान डोलावली. मी आगाखान पॅलेसच्या प्रवेशद्वाराकडे वळलं. तो पुढं गेला.

शाळेतला अवघड विषयाचा तास संपल्यावर वाटायचं तसं वाटलं.